पुराणातली वांगी आणि वर्तमानातले इमले
पडघम - विज्ञाननामा
आदित्य कोरडे
  • पुराणाच्या हस्तलिखिताचं एक पान
  • Sat , 05 November 2016
  • आपले वेद रामायण महाभारत पुराण आदित्य कोरडे Aditya Korde

मागे एकदा कुठंतरी ज्ञानेश्वरीतलं विज्ञान किंवा असंच काहीतरी भन्नाट लिहिलेला लेख वाचला होता. त्यात ज्ञानेश्वरांना ऋतुचक्र, मानसशास्त्र ते अगदी प्रसूतिशास्त्र यांची साद्यंत माहिती कशी होती आणि त्याचे संदर्भ ज्ञानेश्वरीत कसे ठायी ठायी सापडतात याचं रसभरीत वर्णन केलेलं होतं. तसाच काहीसा लेख समर्थ रामदासांवरसुद्धा वाचनात आला. एक पुण्यात राहणारे लेखक (?) जे चांगले एमबीबीएस डॉक्टर आहेत, त्यांनी तर अशा विषयांवर भरपूर पुस्तकं लिहिली आहेत. माणूस डॉक्टर आहे म्हणून माझ्या वडिलांनी ती पुस्तकं घेतली आणि भयंकर निराशा झाली. रामायणात जम्बो जेट काय, महाभारतात अण्वस्त्र काय, सूक्ष्मदर्शक आणि टेस्ट ट्यूब बेबी काय. राम राम राम .... हे म्हणे स्वतः योग सामर्थ्याने मंगळावर गेले होते आणि त्यांची निरीक्षणं चक्क नासाने खरी मानली आहेत. (नासाला दुसरे कामधंदे नसावेत!)

माझा एक मित्र आहे. त्याची बायको भांडारकर संस्थेत जुन्या संस्कृत ग्रंथांचं भाषांतर करायचं काम करते. तिच्याशी नुकतीच चर्चा झाली की, हे जे वेदकालात विमान, अंतराळयान, ब्रह्मास्त्र म्हणजे अॅटमबॉम्ब अशा गोष्टी होत्या असं आम्ही ऐकतो-वाचतो, त्यात काही तथ्य आहे का? यावर तिने सांगितलेली माहिती उद्बोधक ठरेल.

एक तर काय असतं की, जुने ग्रंथ असं जे म्हणतात ते फार फार तर आठव्या किंवा नवव्या शतकातले असतात. तेसुद्धा अत्यंत जीर्ण आणि तुटक. त्या आधीचे असे ग्रंथ मिळत नाहीत. शिलालेख, ताम्रपत्र मिळतात. ते अत्यंत महत्त्वाचे, पण ते म्हणजे ग्रंथ नाहीत. त्यातली माहिती त्रोटक आणि मुख्य म्हणजे फक्त मथळे (Notice Board) स्वरूपाची असते. आता यावरून प्राचीन भारतात उच्च तंत्रज्ञान होतं, अशी खातरजमा करता नाही आली तरी या गोष्टी निखालस खोट्या असल्याचंही खात्रीलायकरित्या म्हणता येत नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे, हे ग्रंथ जरी जुने असले, तरी ते अस्सल असतात, असं नाही. म्हणजे त्यात प्रक्षेप असतात. उदा. महाभारत. अनेक थोर इतिहास संशोधकांनी (सुखटणकर, कोसंबी, मिश्र वगैरे ) अनेक वर्षांच्या अनंत परिश्रमांद्वारे सिद्ध केलेली महाभारताची जी चिकित्सक आवृत्ती आहे, तिच्या मध्येसुद्धा प्रक्षेप आहेत. ते साधारणतः दुसर्‍या किंवा तिसर्‍या शतकातले आहेत. यावरून महाभारताची ही चिकित्सक आवृत्ती साधारण इ.स. १५०च्या सुमारास प्रचलित असलेल्या महाभारतकथेकडे घेऊन जात असल्याचं आपण म्हणू शकतो. महाभारतकथेच्या त्यातल्या त्यात अस्सल प्रतीपर्यंत पोहोचायला इतक्या महान इतिहास संशोधकांना इतकी प्रचंड मेहनत घ्यावी लागते!

उठसूट कोणीही प्राचीन भारतात विमानं, अंतराळयानं, अण्वस्त्रं आणि काय काय असल्याचं शोधून काढत असेल, तर अशा लोकांच्या विश्वासार्हतेबद्दल आपण काय बोलावं! रामायणात येणारा पुष्पक विमानाचा उल्लेख घ्या. एक तर हा एक प्रक्षेप आहे. तो नंतर कुणीतरी घुसडलेला आहे; पण पुष्पक विमान असल्याचं घटकाभर गृहीत धरलं, तर ते कोणत्या इंधनावर चालायचं? ते इंधन कुठून मिळायचं? ते कुठे आणि कसं शुद्ध केलं जायचं? हे इंधन जिथे बनवलं जायचं तिथून ते विमानापर्यंत कसं आणलं जायचं? रथातून कि गाढवावर लादून की तेव्हाही आजच्यासारख्या रेल्वे गाड्या, मोटारी आणि डांबरी सडका होत्या? असतील, तर त्यांचे उल्लेख कुठेच कसे नाहीत? कसे असतील! कुणा शहाण्या माणसाने आपल्या गोष्टीवेल्हाळ स्वभावाला अनुसरून एक छान गोष्ट रचून ती रामायणात घुसडून दिली आहे! आणि एकच विमान बनवलं? विमानांचा ताफा नाही? कमाल आहे!

तीच गोष्ट अण्वस्त्रांची. अण्वस्त्रं म्हणजे दिवाळीचे आपट बार आहेत का? ती अण्वस्त्रं घोडागाडीतून (रथ) किंवा बैलगाडीतून तीर-कमठ्याने हात-दोन हात दूरवरच्या शत्रूवर मारायची! एवढा मोठा अणुबॉम्ब टाकायचा, तर काही क्षेपणास्त्र वगैरे नको? अण्वस्त्रं बनवायला लागणारं तंत्रज्ञान होतं, मग क्षेपणास्त्र बनवायचं तंत्रज्ञान नव्हतं? ते सोडा, साध्या तोफासुद्धा नव्हत्या तेव्हा.

मूळ मुद्दा असा की, कोणी ऋषी-मुनी तप:सामर्थ्याच्या जोरावर एखादं विमान किंवा तत्सम गोष्ट बनवू शकत नाही (ते बनवत असतील, असं कुणाचं म्हणणं असेल, तर मग प्रश्नच मिटला). विमान सोडा, एक साधा विजेचा दिवा बनवायचा म्हटला तर काय गोष्टी लागतात बघा - १) विजेचा शोध, उत्पादन आणि खात्रीशीर पुरवठा / वितरण करणारी यंत्रणा (नुसता दिवा पेटवायला नव्हे, तर बनवायलासुद्धा!) २) अत्यंत पातळ आणि स्वच्छ पारदर्शक काच बनवण्याची परिष्कृत पद्धती. ३) Tungstonसारख्या धातूंचा शोध, उत्पादन, तसंच त्यांच्या गुणधर्माची छाननी करणारी सुसज्ज प्रयोगशाळा आणि metallurgyसारख्या शास्त्राचा पुरेसा विकास. शिवाय या धातूचे अत्यंत पातळ तंतू (फिलामेंट) बनवण्याची पद्धत. याचबरोबर दिवा बनवण्याच्या निरनिराळ्या विभागांमध्ये देण्यासाठी drawingsच्या असंख्य प्रती काढण्यासाठी छपाईचं तंत्र. हे तरी लागेल की नाही? (वेदामध्ये काचेचा उल्लेख नाही, तसाच लोखंडाचा आणि कोळशाचाही उल्लेख नाही . वेदाइतक्याच जुन्या आणि कदाचित त्यांची जन्मभूमी असलेल्या सिंधू संस्कृतीच्या अवशेषांमध्येही काच, लोखंड, कोळसे सापडत नाहीत. आपल्या पुराणांमध्ये विमानाचे, वेगवेगळ्या अस्त्रांचे उल्लेख आहेत, पण आपण आधुनिक विज्ञानकथाकारांच्या गोष्टी वाचल्या, तर त्यासुद्धा आपल्याला खऱ्याच वाटतात, पण वास्तवात त्या माणसाच्या कल्पनेच्या भराऱ्या असतात, खऱ्याखुऱ्या नसतात). तसंच या सगळ्यापेक्षा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, प्रयोजन आणि बाजारपेठ. जर साधे तेलाचे दिवे पेटत असतील, तर विजेच्या दिव्याच्या साहाय्याने उजेड पाडायचा कशाला? एवढे उपदव्याप करून विजेचे दिवे बनवून घ्यायला जर खात्रीची बाजारपेठ नसेल, तर हा धंदा कोण करेल? रामायण-महाभारत या चांगल्या, मनोरंजक कथा आहेत, एवढंच खरं. पण इतिहास इतिहास म्हणताना शिवाजी महाराजांना भवानी माता खरोखर प्रसन्न झाली आणि तिने त्यांना भवानी तलवार दिली, यावर विश्वास ठेवणं हा वेडेपणाच नाही का! (भवानी खरंच प्रसन्न झाली असती, तर तिला महाराजांना एखादी AK47 द्यायला काय हरकत होती? भवानी मातेला काय अशक्य आहे!)

सरंजामशाही कधीच तंत्रज्ञानाचा विकास आणि समाजात त्याचा सर्वदूर प्रसार करत नाही. सरंजामशाहीला सर्वसामान्य लोकांना गुलाम करण्यासाठी त्यांना अज्ञानात ठेवणं आणि मागास ठेवणं भाग असतं. भांडवलशाही जरी सरंजामशाहीशी हातमिळवणी करून मजूर, गुलाम वर्गाला सुरुवातीला वेठीला धरत असल्याचं, त्यांचं शोषण करत असल्याचं दिसत असलं, तरी भांडवलशाहीला एका मर्यादेनंतर स्वतःच्या फायद्यासाठी तरी लोकांचं राहणीमान उंचावण्यासाठी/ त्यांची क्रयशक्ती वाढवण्यासाठी अनिर्बंध शोषणाला आळा घालावा लागतो. लोकांची क्रयशक्ती अचानक घटली, तर कसा हाहाःकार माजतो, ते काही वेगळ्यानं सांगायला नको. समजा, शाम्पू विकत घ्यायची लोकांची ऐपत नसेल, तर कुणी धंदा करावा कसा? आणि खायची-प्यायची भ्रांत असलेला गरीब-गुलाम माणूस शाम्पू का विकत घेईल? त्याची, त्याच्या बायकोची चार लोकांमध्ये ऊठबस करण्याची आणि किमान प्रतिष्ठा मिळवण्याची ऐपत असेल, तरच तो हा खर्च करून स्वतःला/ स्वतःच्या बायकोला सुंदर दाखवायचा प्रयत्न करेल. त्याची दोन वेळची खायची-प्यायची सोय झाली, तर तो पुढेपुढे काही जास्त खरेदी करायला लागेल; पण उद्योग-धंद्याशिवाय हे शक्य आहे का?

सरंजामशाहीत मोठमोठे शोध लागून त्याची उपयुक्तता पटल्यावर सरंजामशाही सरकार हे शोध स्वीकारतं. आधी संशोधकांना पदरमोड करून शोध लावावे लागतात. भांडवलशाहीत स्पर्धेत टिकून राहण्यासाठी कमी खर्चात जास्त उत्पादन करण्यासाठी उद्योग संशोधकांना प्रोत्साहन देतात. आपले वेद , रामायण, महाभारत हे सरंजामशाही समाजव्यवस्था दाखवतातच, पण तेव्हा उद्योग आणि औद्योगिकीकरण हा प्रकारच नव्हता. तो काळच काय, पण पेशवाईच्या शेवटी शेवटी, म्हणजे १९व्या शतकाच्या सुरुवातीलासुद्धा आपल्याकडे छापील नकाशे बनवायचं तंत्र, होकायंत्र, दुर्बीणी नव्हत्या. त्यादेखील आपण इंग्रज-पोर्तुगीजांकडून विकत घ्यायचो. शेतातले साधे नांगराचे फाळ लोखंडी करण्यासाठी विसावं शतक उजाडावं लागलं अन लोकांनी आगगाडीमध्ये बसावं म्हणून ब्रिटिश सरकारला सुरुवातीला लोकांना पैसे द्यावे लागले. आपल्याकडे औद्योगिकीकरण सुरू झालं, तेच मुळी एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी आणि तेसुद्धा जुजबी!

तेव्हा आपल्या समृद्ध वारशाचा अभिमान असावा, पण उगाच कुणी सुबुद्ध माणूस टर उडवेल, असं काही करू नये. त्याने त्या वारशाचाच अपमान होतो. हा प्रश्न नास्तिक, आस्तिक, पुरोगामी, मूलतत्त्ववादी असा नाही. साधा बुद्धी आणि तर्काचा आहे.

 

लेखक टाटा मोटर्स, पुणे इथं डिझाईन इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत.

aditya.korde@gmail.com

Post Comment

Vasudha Vijay Deshpande

Sun , 06 November 2016

very nice article...