टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मोहन भागवत, योगी आदित्यनाथ आणि उद्धव ठाकरे
  • Mon , 14 August 2017
  • विनोदनामा टपल्या मोहन भागवत योगी आदित्यनाथ आणि उद्धव ठाकरे

१. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला एकसंधपणाच्या माध्यमातून भारताला महासत्ता बनवायचे आहे, असे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे. ‘संघाला भारताला सोव्हियत युनियनसारखी महासत्ता बनवायचे नसून एक समर्थ महासत्ता म्हणून नावारूपाला आणायचे आहे,’ असेही ते म्हणाले. भक्ती-शक्ती समागम कार्यक्रमात मोहन भागवत यांनी चार हजार स्वयंसेवकांशी संवाद साधला. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही राजकीय संघटना नाही. संघ दैनंदिन राजकीय घडामोडींमध्ये सहभाग घेत नाही. मात्र संघाचे काही स्वयंसेवक इतर प्रकल्पांमध्ये सहभागी होतात. त्यामुळे काही स्वयंसेवकांचा राजकारणात सहभाग असतो,’ असेही ते म्हणाले.

याला वेळ पाहून कानावर हात ठेवण्याची सोय म्हणतात... आपल्याकडे अशा घटनाबाह्य सत्ताकेंद्रांविषयी फार ममत्व आहे लोकांमध्ये. सत्तेचे, संघटनेचे सगळे लाभ मिळवायचे आणि सदस्यांच्या कृत्यांची जबाबदारी मात्र टाळायची, वर सत्तालोभ नसल्याचे डिंडिम वाजवायचे, याची ती सुंदर व्यवस्था आहे. संघाला अपेक्षित एकत्व हे एका विशिष्ट घटकाच्या कल्पनेतल्या एकसाची, एकसुरी हिंदुत्वाचं एकत्व आहे, हे लक्षात घेतलं की संघाला अपेक्षित महासत्ता काय असेल, तेही समजतं. वैविध्याचा मुक्त आणि प्रगल्भ स्वीकार हा हिंदुत्वाचा मूळ पाया आहे, हेच संघाला अमान्य आहे.

.............................................................................................................................................

२. भारत आणि चीन यांच्यात डोकलाम परिसरावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने भारताची प्रशंसा केली आहे. या वादात भारत एखाद्या परिपक्व सत्तेप्रमाणे वागत आहे. याउलट चीनचे वर्तन लहान मुलासारखे असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.

अमेरिकेसारखा बलाढ्य देश आपल्या पाठिशी उभा आहे, ही भावना छान वाटते खरी. पण, तीही काटेकोरपणे तपासून पाहायला हवी. चीनने अमेरिकेला प्रबळ आव्हान निर्माण केलेलं असल्याने पाव्हण्याच्या काठीने विंचू मारायचा हा प्रकार असू शकतो. शिवाय, ज्यांचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्पतात्या आहेत, त्यांनी इतरांच्या वर्तनाला बालिश म्हणावं, हाही एक वेगळाच विनोद आहे.

.............................................................................................................................................

३. आरोप करायचे आणि राजीनामे घ्यायचे, हा पायंडा राज्यासाठी हिताचा नाही, असे सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची पाठराखण केली. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या विरोधकांनी ज्या पद्धतीने आरोप केले आणि चिखल उडवला, ही गोष्ट लांच्छनास्पद आहे. आरोप करणारे हे स्वत: भ्रष्टाचाराच्या आरोपांमध्ये गुंतले आहेत. हे घोटाळेबाज लोक तोंड वर करून आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, ही गोष्ट लाजिरवाणी आहे, असं उद्धव यांनी म्हटले.

उद्धव यांच्यामध्येही त्यांच्या पिताश्रींप्रमाणे विनोदबुद्धी खूप आहे. विरोधकांवर घोटाळ्यांचे आरोप असतील किंवा ते भ्रष्टाचाराने बरबटलेले असतील, तर सध्या सत्तेत असलेल्या उद्धव यांच्या पक्षाने त्यांच्यावर कारवाई का केलेली नाही? तुम्ही करताय तीही नुसती आरोपबाजीच नाही का? त्यांनी घोटाळे केल्याचा तुम्ही डांगोरा पिटला, म्हणून त्यांना हटवून तुम्हाला सत्ता मिळाली. देसाई स्वच्छ आहेत, याची खात्री असेल, तर चौकशी होईपर्यंत ते कारभार सांभाळणार नाहीत, असं सांगता आलं असतं. ते आपल्या तथाकथित बाण्याला शोभलं असतं. ही तर भ्रष्टांची केविलवाणी पाठराखण झाली.

.............................................................................................................................................

४. उत्तर प्रदेशात काही बालकांसह ६०हून अधिक लोकांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी अक्षम्य निष्काळजीपणाच्या मुद्द्याला बगल देत सर्व खापर मेंदूज्वराच्या समस्येवरच फोडले. उत्तर प्रदेशात १९७८ पासून मेंदूज्वराची समस्या आहे. येथील लहान मुलांच्या अकाली मृत्यूला कोण जबाबदार असेल तर, ती अस्वच्छता आहे, उघड्यावर मलविसर्जन करण्याची सवय आहे. मेंदूज्वर एक मोठे संकट आहे. आपल्यासाठी हे खूप मोठे आव्हान असून आपल्याला त्यावर मात करायची आहे. मात्र, त्यासाठी सरकारला दोष देऊन चालणार नाही. सरकार ही कधीच समस्या असू शकत नाही. सरकार स्वत: समस्या असेलच तर या व्यवस्थेलाच काही अर्थ नाही, असे आदित्यनाथ यांनी सांगितले.

छान आहे फिडल आदित्यनाथांचं. सरावही चांगलाच जमलाय. वाद्यावर पकडही आली आहे छान. बाकी उत्तर प्रदेशातच नाही, देशभरात मेंदूज्वर ही मोठी समस्या आहे, हे दिसतंच आहे.

.............................................................................................................................................

५. लोकांना हिंसेसाठी चिथावणी दिल्याप्रकरणी स्वित्झर्लंडच्या एका मशिदीतील इमामावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा इमाम मुळचा इथियोपिया येथील आहे. त्याने शुक्रवारी मशिदीत जमलेल्या लोकांसमोर उपदेशपर भाषण केले. यावेळी त्याने जे मुसलमान धर्मातील परंपरांचे पालन करणार नाहीत, त्यांना जाळून टाका, असे प्रक्षोभक वक्तव्य केल्याचे समजते. जे मुसलमान मशिदीत येऊन नमाज अदा करणार नाहीत, त्यांना मारून टाकले पाहिजे. नमाज अदा न करणाऱ्यांना या मुसलमानांना धर्मातून बहिष्कृत केले पाहिजे. एवढे करूनही ते नमाज आणि धर्मातील अन्य परंपरांचे पालन करत नसतील तर या मुस्लिमांना त्यांच्या घरात जाऊन जाळले पाहिजे, असे प्रक्षोभक वक्तव्य या इमामाने केले.

अरेच्चा, स्वित्झर्लंडमध्ये कोणी याला ‘भारतात जा’ किंवा ‘भारतात पाठवा’ असं सांगितलं नाही? कमाल झाली. त्याची एकंदर भाषा पाहता तो आहे असाच भारतात खपून जाईल... त्याच्या धर्मात राहिला तरी आणि धर्मांतर केलं तरी. खूप स्कोप आहे इकडे.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.