दिवाळी अंक : लसाविमसावि
पडघम - सांस्कृतिक
टीम अक्षरनामा
  • यंदाचे दिवाळी अंक
  • Fri , 04 November 2016
  • दिवाळी अंक Diwali Ank टीम अक्षरनामा

साधना बालकुमार

या वर्षीच्या साधना बालकुमार अंकात एक समांतर धागा असलेल्या दोन गोष्टींची तसंच दोन लेखांची गुंफण केली आहे. अशा प्रकारच्या कल्पकतेमुळे एकाच धाग्याच्या दोन वेगवेगळ्या मिती आपल्यासमोर येतात. कारण धागा समान असला, तरी पार्श्वभूमी, वातावरण आणि काळ या घटकांमुळे या गोष्टींचं परिमाण बदलतं, आणि त्या एकापाठी एक वाचल्या गेल्याने त्यांचा खोल ठसा उमटतो; त्या विचारप्रवृत्त करतात. त्या मुलांच्या मनाला स्पर्शून जातील, इतक्या सहज प्रवाही शैलीत येतात. मात्र त्यांना असलेली अनेक भावनिक, सामाजिक आणि राजकीय अस्तरंही मुलांच्या मनाच्या वेगवेगळ्या स्तरांवर निश्चितच रुंजी घालत राहणारी आहेत. या दृष्टीने उत्तम कांबळे आणि विशेषतः हमीद दलवाई यांच्या कथा विशेष प्रभावी ठरतात. तसंच मिशेल ओबामा आणि हिलरी क्लिंटन यांचं लेखनही बोलकं आहे. कथा आणि लेखांचा क्रम लावतानाही या अस्तरांच्या खोलीची पुरेपूर काळजी घेतलेली दिसून येते. अंकाच्या शेवटी येणाऱ्या रहस्यकथेमध्ये पुढे घडणाऱ्या घटनांचा सहज अंदाज बांधता येत असला, तरी लेखनशैली आणि कथेच्या एकूण वेगाच्या स्तरावर सफल झाल्याने कुतूहल जागं करण्याच्या दृष्टीने ती यशस्वी ठरते. अंकाचं मुखपृष्ठ मात्र अनुरूप असलं तरी तितकंसं आकर्षक किंवा प्रभावी नाही. अंकांमधली चित्रं आणि छायाचित्रं मात्र त्या-त्या कथेची किंवा लेखाची परिणामकारता वाढवण्याच्या दृष्टीने परिणामकारक ठरतात. मनुष्याकृतींचे हावभाव, रंगसंगती आणि अचूक प्रसंगांची रेखाटनं यांमुळे हे लेखन जिवंत होण्यासाठी निश्चित मदत होते. हा अंक मुलांना केवळ बालबुद्धीचे न समजता त्यांच्या क्षमता पणाला लावणारा अंक आहे.

सर्वोत्तम (लेख\कथा) - सिंहाचा दिवा, आहमद, ब्रिटनमधील मुलींच्या शाळेत केलेलं भाषण  

उत्तम मध्यम - ज्ञानेश, तू कुठे आहेस?, कोंबडा उलटला, मुले वाढवण्यासाठी खेडे 

मध्यम मध्यम - परग्रहावरचा माणूस 

‘साधना बालकुमार’, संपादक विनोद शिरसाठ, पाने - ४२ , मूल्य – ३० रुपये.

------------

साधना युवा

केवळ युवांपुरताच नव्हे, तर एकूणच सर्वोत्तम दिवाळी अंकांच्या रांगेत या अंकाचा नंबर लागावा. कारण वर्तमान राजकीय-सामाजिक स्थिती-स्थित्यंतरांचा प्रादेशिक स्तरापासून जागतिक स्तरापर्यंतचा आलेख मांडण्यात, त्याद्वारे समतोल विचारप्रक्रियेच्या अनेक सूक्ष्म धाग्यांशी ओळख करून देण्यात आणि समाजशील घटक म्हणून माणसाचं, विशेषतः तरुणाईचं भान जागृत करण्यात हा अंक निर्विवाद यशस्वी ठरतो. रझिया पटेल, आँग सान सू की आणि मोनिका लुईन्स्की यांचे लेख खडतर भूतकाळाचे आणि आव्हानात्मक वर्तमानाचे नवे, व्यापक,  वास्तवाधिष्ठित आणि तरीही प्रेरक अनुबंध थेट, तरीही संवेदनशीलपणे पुढे आणतात. तर रघुराम राजन आणि रामचंद्र गुहा यांचे लेख भारतातलं राजकीय वास्तव, त्यामुळे येऊ घातलेले नैतिक पेच आणि त्यांच्यातली व्यामिश्रता मांडतानाच त्यांच्याशी सामना करणाऱ्या मूल्यांची सविस्तर चर्चा करतात. त्यामुळेच या लेखांमधून एकाच वेळी परखड वास्तव आणि आवाहक कृतिशीलतेचा प्रत्यय येतो. नरेंद्र दाभोलकर यांचा लेख व्यक्तिगत पातळीपासून सामाजिक पातळीपर्यंतच्या कळत-नकळत जोपासलेल्या, सहज सामावून घेतलेल्या अनेक संस्कारांबद्दल आणि धारणांबद्दल रोखठोक, मुळातून विचार करायला लावणारे अनेक प्रश्न उपस्थित करतो आणि तारतम्य सुटल्याने जगण्यात आलेली आंतरविसंगती अगदी साध्या-सोप्या उदाहरणांमधून निदर्शनास आणून देतो. इंदिरा गांधी यांची मुलाखत त्यांचं एकूण व्यक्तिमत्त्व आणि जडणघडण समजून घेण्यासाठी, विशेषतः त्यांच्या नेतृत्वातली धडाडी समजून घेण्यासाठी उदबोधक ठरते आणि काही प्रश्नचिन्हं उपस्थित करण्यासाठीही कारक ठरते. अंकाचं मुखपृष्ठ रंगसंगतीमुळे वेधक ठरतं, मात्र ते प्रभावी नाही. आतील मांडणी व छायाचित्रं मात्र एकूण मजकुराची परिणामकारकता वाढवण्याच्या दृष्टीनं मोलाची ठरतात.

सर्वोत्तम - प्रमुख पाहुण्याचा धर्म, लोकशाहीतील उंदीर, सुशिक्षितांच्या अंधश्रद्धा

उत्तम मध्यम - सिनेमाबंदीला विरोध,ऑक्सफर्डमधील दिवस, लज्जेची किंमत, इंदिरा गांधींची मुलाखत 

मध्यम मध्यम -  या वर्गात टाकण्यासारखं या अंकात काही नाही.

‘साधना युवा’, संपादक - विनोद शिरसाठ, पाने - ५८, मूल्य – ४० रुपये.

साहित्य सूची

एकूण दिवाळी अंकांच्या तुलनेत हा अंक आगळावेगळा, वैशिष्ट्यपूर्ण व अत्यंत कल्पक अंक ठरावा. हा व्यंगचित्र विशेषांक आहे आणि याचा प्रत्यय मुखपृष्ठापासून शेवटच्या पानापर्यंत पदोपदी येत राहतो. या दृष्टीने अनुक्रमणिकेची रचना विशेष आकर्षक ठरते. शि. द. फडणीस आणि राज ठाकरे यांसारख्या दिग्गजांपासून प्रशांत कुलकर्णी, चारुहास पंडित यांसारख्या कर्त्या ते अतुल पुरंदरेंसारख्या नवोदित व्यंगचित्रकारांपर्यंतचा आवाका या अंकाने व्यापला आहे. तसंच प्रादेशिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, लिंगविशिष्ट, अगदी आंतरविद्याशाखीय जुन्या-नव्या व्यंगचित्रकारांचा आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण व्यंगचित्रकलेचा लेखाजोखा अंकातून बर्‍यापैकी सविस्तरपणे घेतला गेला आहे. यासाठी संपादक नांदुरकरांबरोबर अतिथी संपादक चारुहास पंडित आणि प्रशांत कुलकर्णी यांचा विशेषत्वाने उल्लेख करावा लागेल. कारण व्यंगचित्रकलेची खोली, त्यामागचं गांभीर्य आणि प्रतिभा उलगडून दाखवताना अंक कुठेही सपाट होऊन त्यातल्या नर्मविनोदाची खुमारी हरवू नये, याची पुरेपूर काळजी या दोघांनी अंकाच्या मांडणीतून घेतली आहे.

शि. द फडणीस-राज ठाकरे यांचे सुरुवातीलाच येणारे लेख अगदी साध्या-सोप्या भाषेत व्यंगचित्रकलेच्या मूलतत्त्वांशी ओळख करून देतात. त्यामुळे पुढे-पुढे येणार्‍या अधिक सखोल व्यंगचित्रकलेसंदर्भातल्या लेखांशी आपण सहज जोडले जातो. तसंच त्यानंतर येणारी श्याम जोशी, वसंत गवाणकर आणि वसंत हळबे या व्यंगचित्रकारांची व्यक्तिचित्रं व्यंगचित्रकाराची एकूण जीवनमूल्यं, त्याचं आयुष्य आणि रोजच्या आयुष्यातली त्याची कलाप्रक्रिया यावर प्रकाश टाकतात आणि या कला व कलाकाराकडे बघण्याचा एक नवा कोन खुला करतात. याशिवाय अविनाश कोल्हे, चारुहास पंडित, राजू परुळेकर, मधुकर धर्मापुरीकर, मनोहर सप्रे, शशिकांत सावंत, प्रशांत कुलकर्णी (सुकीवरचा लेख), असीम कुलकर्णी, गणेश मतकरी या सर्वांचे लेख व्यंगचित्रकलेचे अनेक पदर बारकाईने उलगडून दाखवणारे आणि मोठा आवाका कवेत घेणारे लेख आहेत. याशिवाय कुठल्याही विवेचनाशिवाय मध्येमध्ये पेरलेली व्यंगचित्रं आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या व्यंगचित्रकारांची अगदी मोजक्या शब्दांत अभय इनामदार आणि गणेश मतकरी यांनी उलगडून दाखवलेली व्यगंचित्रं या दोन्ही कल्पना सामान्य वाचकाचं कुतूहल अधिकाधिक जागृत करणार्‍या आहेत. त्यामुळे प्रतिभा आणि प्रत्यक्ष श्रम यांची एक चुणूक पाहायला मिळते.

थोडक्यात या कलेकडे पाहण्याची, तिच्या निर्मितीप्रक्रियेकडे पाहण्याची, तिच्यातल्या विलक्षण बौद्धिक व संवेदनाशील क्षमतांची तीव्र आणि पुरेपूर जाणीव करून देण्यात हा अंक यशस्वी ठरला आहे. लेखाच्या गरजेनुसार तसंच त्याशिवायही मध्ये मध्ये पेरलेली व्यंगचित्रं वाचकाच्या सेन्स ऑफ ह्युमरला खतपाणी घालतात, समृद्ध करतात. कारुण्य, विसंगीत, उपरोध, उपहास, बोचरेपणा याचबरोबर या कलेत असणारी चिंतनक्षमतेची ताकद अंकातल्या सगळ्या हसऱ्या छटांमधून सातत्याने जाणवत, खुणावत राहते.

हा संपूर्ण अंक आर्टपेपरवर छापल्याने त्यातील चित्रांना उठाव प्राप्त झाला आहे आणि त्यांच्यातली अर्थपूर्णता कायम राहिली आहे. व्यंगचित्रांचा पुरेपूर पण पूरक वापर कुठेही भडिमारात रूपांतरित होणार नाही याची संपादकांनी काळजी घेतली आहे. मुखपृष्ठात वापरेलेली मिरर इमेजची साधी, पण तरल कल्पना एकूण अंकाची चुणुक, अंकातला विचार आणि तरलता सूचकपणे दर्शवतो. मुद्रितशोधनाच्या चुका मात्र भारंभार आढळतात. तरी हा अंक संग्राह्य ठरतो.

सर्वोत्तम – कल्पना ते चित्र, राज ठाकरे (मुलाखत), कलावंत गवाणकर (अल्बम)

उत्तम मध्यम – अभय अरुण इनामदार यांची पानपुरके

मध्यम मध्यम – जावईशोध (अल्बम), विकास सबनीस

‘साहित्य सूची’, अतिथी संपादक – चारुहास पंडित, प्रशांत कुलकर्णी, पाने - २३४, मूल्य – १५० रुपये.

 

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......

महाराष्ट्राच्या राजकारणाचा हा ‘खेळखंडोबा’ असाच चालू राहू द्यायचा की, त्यावर ‘अक्सिर इलाज’ करायचा, याचा निर्णय घेण्याची एकमेव ‘निर्णायक’ वेळ आलेली आहे…

जनतेला आश्वासनांच्या, ‘फेक न्यूज’च्या आणि प्रस्थापित मीडिया व सोशल मीडियाद्वारे भ्रमित करूनही सत्ता मिळवता येते, राखता येते, हे गेल्या दहा वर्षांत भाजपने दाखवून दिले आहे. पूर्वी सत्ता राजकीय नेत्यांना भ्रष्ट करते, असे म्हटले जायचे, हल्ली सत्ता भ्रष्ट राजकीय नेत्यांना ‘अभय’ वरदान देण्याचा आणि एकाधिकारशाही प्रवृत्तीच्या राजकारण्यांना ‘सर्वशक्तिमान’ होण्याचा ‘सोपान’ ठरू लागली आहे.......