टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • ई‌्व्हीएम मशीन, ओदिशातील पत्रकार, टोमॅटो, दहशतवादी आणि गाय
  • Mon , 24 July 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या ई‌्व्हीएम मशीन EVM Machine नितीन गडकरी Nitin Gadkari ओदिशातील पत्रकार Odisha Journalists टोमॅटो Tomato दहशतवादी Terrorist गाय cow

१. महाराष्ट्रातील बुलढाणामध्ये इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात (ईव्हीएम) फेरफार झाल्याचे सिद्ध झाले आहे. माहिती अधिकारांतर्गत ही बाब उघड झाल्याचा दावा माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी केला आहे. बुलढाण्यात सहा महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लोणार तालुक्यातील सुल्तानपूर गावात मतदानादरम्यान हा प्रकार घडला आहे. मतदार जेव्हा एका अपक्ष उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटन दाबत होते, तेव्हा भाजपच्या कमळ या चिन्हासमोरील एलईडी बल्ब लागत असल्याचे समजते. याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती, याचा खुलासा माहिती अधिकाराच्या माध्यमातून झाला आहे.

एका छोट्याशा निवडणुकीतल्या किरकोळशा अपक्षाच्या मतांना वळवून भाजपचा कितीसा फायदा झाला असता? हजारो यंत्रांमधल्या एका यंत्रातली चूक ही किती किरकोळ चूक आहे. उगाच काहीतरी आरोप करायचे म्हणजे काय! शेवटी ते एक यंत्र आहे, त्यात भारतात वापरलं जातंय, शिवाय आपल्या थोर पूर्वजांनी त्याचा शोध लावलेला नाही, त्यामुळे तेवढी अचूकता नसणार, हे समजून नको घ्यायला?

.............................................................................................................................................

२. ओडिशात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पत्रकारांना ५००-५०० रुपये दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या वेळी उपस्थित पत्रकारांना पाकीट देण्यात आलं. या पाकिटात ५०० रूपयांच्या नोटा होत्या. ही पाकिटं पाहिल्यानंतर पत्रकारही हैराण झाले. त्यांनी याबाबत आयोजकांकडेही विचारणा केल्याचं बोललं जातं. पत्रकारांनी तक्रार केली असून याबाबत तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

नक्की तक्रार कसली आहे, ते तपासून घेतलं पाहिजे. प्रेस किट उघडल्यानंतर पाचशे रुपयांची नोट पाहून पत्रकारांना धक्का बसलाच असणार... फक्त पाचशे रुपये? दोन दोन केंद्रीय मंत्री उपस्थित असलेल्या कार्यक्रमात फक्त पाचशे रुपये? त्यापेक्षा एखादी बिझनेस प्रेस कॉन्फरन्स अटेंड केली तर सहज तीनचार हजारांची व्हाउचर्स मिळतात. गडकरींसारख्या देशभर हजारो कोटींच्या प्रकल्पांचा धडाका लावलेल्या अतिशय कार्यक्षम मंत्र्याच्या कार्यक्रमात तर केवढी मोठी निराशा झाली ही!

.............................................................................................................................................

३. दहशतवाद्यांच्या छायेत जगत असलेल्या देशांची यादी अमेरिकेने प्रसिद्ध केली आहे. यामध्ये भारत पाकिस्तानच्याही पुढे आहे. म्हणजे २०१६मध्ये भारतात पाकिस्तानपेक्षा अधिक दहशतवादी हल्ले झाले आहेत. २०१६ मध्ये जगातील विविध ठिकाणी ११,०७२ दहशतवादी हल्ले झाले आहेत. यामध्ये ९२७ म्हणजे एकूण १६ टक्के हल्ले भारतात झाले आहेत. याच्या उलट पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांची संख्या घटली आहे. नक्षली संघटनांना जगातील तिसरी सर्वांत क्रूर दहशतवादी संघटना असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. इसिस आणि तालिबाननंतर नक्षलवाद्यांचा क्रमांक लागतो. नक्षलवादी बोको हरमपेक्षाही क्रूर आहेत.

काहीतरीच काय? अहो, इकडे नोटबंदी झाल्यामुळे तिकडे पापस्थानात, म्हणजे जागतिक दहशतवादाच्या जन्मस्थळीच डायरेक्ट इफेक्ट झाला, म्हणून तिकडचे बळी कमी झाले. आता तिकडचे कमी झाले की, इकडचेही आपोआपच हळूहळू कमी होतील की नाही? ही अदभुत बनिया स्ट्रॅटेजी आहे... त्या घायकुत्या अमेरिकनांना कळत नाही आपलं दीर्घकालीन प्लॅनिंग!

.............................................................................................................................................

४. गायीच्या मदतीनं आता एचआयव्ही म्हणजेच एड्सविरोधी लस बनवता येईल. ‘नेचर’ या अमेरिकन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार गायीतील अँटिबॉडी म्हणजेच रोग प्रतिकारकक्षमतेनं एचआयव्हीचा परिणाम ४२ दिवसांत २० टक्क्यांनी कमी केला जाऊ शकतो. यासाठी शास्त्रज्ञांनी या प्रयोगासाठी चार गायी निवडल्या होत्या. त्यांना एचआयव्हीची २-२ इंजेक्शन दिली गेली. एका महिन्यानंतर त्यांच्यामध्ये प्रतिरक्षीकोषिका विकसित होऊ लागलं. ३८१ दिवसांत हे अँटिबॉडीज एचआयव्हीचा परिणाम ९६ टक्के संपुष्टात आणून शकतात. जटील आणि जिवाणूयुक्त पचन तंत्रामुळे गायींमध्ये प्रतिकारकक्षमता जास्त विकसित होते, असं मानलं जातं. गायीच्या मदतीनं एचआयव्हीपीडित व्यक्तीला पहिल्या टप्प्यातून वाचवता येऊ शकतं.

हे सगळं कळण्यासाठी या मागासलेल्या पाश्चिमात्यांना प्रयोग वगैरे करावे लागतात. आम्हा स्वघोषित जगदगुरूंना गायीच्या याहून अधिक दैवी गुणांची कधीपासूनची माहिती आहे. हे पाश्चिमात्य लोक तर जर्सी गायींवर संशोधन करतायत... आमच्या देशी गायी त्यांच्यापेक्षा हजार टक्क्यांनी अधिक पॉवरफुल आहेत, हे आम्हाला कसलंही संशोधन न करता माहिती आहे. आम्ही तिचं मूत्रही पितो आणि शेणही खातो, ते काय उगाच?

.............................................................................................................................................

५. टोमॅटोचे दर आकाशाला भिडलेले असल्यामुळे टोमॅटोविक्रेत्यांना चोरीची भीती सतावू लागली आहे. इंदूरच्या बाजारात टोमॅटोच्या सुरक्षेसाठी चक्क बंदुकधारी गार्ड तैनात करण्यात आले आहेत. किरकोळ भाजीबाजारात टोमॅटोचा दर १०० रुपये किलो आहे. त्यामुळे टोमॅटो चोरीचं प्रमाण वाढलं आहे. देशातल्या अनेक भागात टोमॅटोचोरीच्या घटना समोर आल्या आहेत. मुंबईतल्या बाजारपेठेतून दोन दिवसांपूर्वीच एका बाजारपेठेतून ३०० किलो टोमॅटो चोरी झाल्याची बातमी आली होती. एकेकाळी टोमॅटोला बाजार समितीत योग्य दर न मिळाल्यानं उत्पादकांनी ते रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला होता.

आता टोमॅटो पिकवणाऱ्या शेतकऱ्यांनी त्यांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशातून बंगले बांधले आहेत आणि त्यांना टोमॅटोचा लाल रंग दिला आहे. ‘टोमॅटोकृपा’, ‘टोमॅटोचे’ आशीर्वाद अशी नावं दिली आहेत, हे तुम्हाला बिकाऊ मीडिया दाखवणार नाही. तो फक्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या, कर्जाच्या ओझ्याखाली पिचणं वगैरे बनावट बातम्याच दाखवत राहणार. सगळ्या शहरी बांधवांनी आपापल्या घरातल्या कुंडीत एकेक टोमॅटोचं झाड लावून शेतकऱ्यांचा हा बनाव मोडून काढला पाहिजे.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.