टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • सुमन घोष, अमर्त्य सेन, अमिताभ बच्चन, कुमार विश्वास, डेक्कन क्वीन, जेंग शुआंग आणि उर्जित पटेल
  • Thu , 13 July 2017
  • विनोदनामा Vinodnama टपल्या सुमन घोष Suman Ghosh अमर्त्य सेन Amartya Sen अमिताभ बच्चन Amitabh Bachchan कुमार विश्वास Kumar Vishwas डेक्कन क्वीन Deccan Queen जेंग शुआंग Zheng Zeguang उर्जित पटेल Urjit Patel

१. पुण्यात डेक्कन क्वीन सुपरफास्ट एक्स्प्रेस रोखून धरणाऱ्या तीन महिला प्रवाशांवर बुधवारी कारवाई करण्यात आली. नेहमी फलाट क्रमांक १ वरून निघणारी डेक्कन क्वीन गेल्या सहा महिन्यांपासून फलाट क्रमांक ५ वरून निघत आहे. यासंबंधी प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्यानं नियमित प्रवाशांनी डेक्कन क्वीन रोखून धरली. त्यामुळे ही गाडी तब्बल पाऊण तास उशीरा सुटली होती. या प्रकरणी रेल्वे प्रशासनानं सीमा सुहास गाडगीळ, वर्षा योगेश रेळे आणि फातिमा जाफर हुसैन या तीन महिला प्रवाशांवर रेल्वे कायद्यानुसार कारवाई केली. डेक्कन क्वीन रोखून धरणाऱ्या अन्य १०० प्रवाशांची सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. त्यांच्यावरदेखील लवकरच कारवाई करण्यात येईल, असं रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलं. ही ट्रेन यापुढेही पाच नंबर प्लॅटफॉर्मवरूनच सुटेल, असंही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं.

रेल्वेची मुजोरी आणि मस्तवालपणा यांचा हा खास नमुना आहे. गाडी रोखून धरण्याचा गुन्हा करणाऱ्यांना शिक्षा फर्मावणाऱ्या रेल्वेनं एक नंबरची गाडी रोज पाच नंबरवरून सोडण्याचं प्रयोजन मात्र सांगितलेलं नाही. डेक्कन क्वीन ही केवळ दोन शहरांमध्ये धावणारी एक गाडी नाही. तिच्यातून रोज प्रवास करणारे लोक खूप मोठ्या संख्येनं आहेत. सकाळी शहराच्या वेगवेगळ्या भागांमधून निघून स्टेशनात पोहोचून गाडी गाठण्यामध्ये पाच नंबरचा जिन्याचा फेरा तापदायक ठरू शकतो. आधीच या गाडीची सगळी सुपरफास्ट शान रेल्वे प्रशासनानं घालवून टाकली आहे. आता प्रवाशांच्या सोयीचा विचार न करण्याची असंवेदनशीलता दाखवून रेल्वे प्रशासनानं मोठ्या आंदोलनाची पायाभरणी करून ठेवली आहे.

.............................................................................................................................................

२. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारावेत, यासाठी आम्हाला काश्मीर प्रश्नात दोन्ही देशांमध्ये समेट घडवून आणायचा आहे, अशी इच्छा चीननं व्यक्त केली आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जेंग शुआंग यांनी म्हटलं आहे की, गेल्या काही दिवसांत दोन्ही देशांमध्ये नियंत्रण रेषेवर निर्माण झालेल्या तणावामुळे जगाचं लक्ष काश्मीरकडे वेधलं गेलं आहे. भविष्यात दोन्ही देश काश्मीरमध्ये शांतता व स्थैर्य राखण्यासाठी प्रयत्न करतील, अशी आम्हाला आशा आहे. या सगळ्यात चीनला सकारात्मक भूमिका बजावायची आहे, असंही जेंग शुआंग यांनी सांगितलं.

हे पुतनामावशीचं प्रेम म्हणजे रोगापेक्षा औषध भयंकर असा प्रकार आहे. काश्मीरच्या प्रश्नावर भारतानं अन्य कोणत्याही देशाच्या, संघटनेच्या मध्यस्थीला नकार दिला आहे आणि हा द्विपक्षीय प्रश्नच आहे, यावर भर दिला आहे. यात चीनची ‘सकारात्मक भूमिका’ नवी डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते. मात्र, चीननं वारंवार हा प्रस्ताव द्यायला हवा. या देशाच्या हस्तक्षेपानं दोन्ही देशांचं केवढं नुकसान होईल आणि या उपखंडाची काय अवस्था होईल, याच्या जाणीवेतून तरी दोन्ही देशांना या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची बुद्धी मिळू शकेल.

.............................................................................................................................................

३. चित्रपट निर्माता सुमन घोष यांनी नोबेलविजेते शास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांच्या आयुष्यावर तयार केलेल्या माहितीपटात सेन्सॉर बोर्डानं अनेक शब्दांना कात्री लावण्याची सूचना केली आहे. ‘आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन’ या माहितीपटातून ‘गाय’, ‘गुजरात’, ‘हिंदू भारत’, भारताचा ‘हिंदुत्ववादी विचार’ हे शब्द ‘बीप’ वापरून काढले गेले, तरच ‘U/A’ सर्टिफिकेट देण्यात येईल, असं सेन्सॉर बोर्डाकडून सांगण्यात आलं. मात्र, चित्रपटाचे निर्माते सुमन घोष यांनी सेन्सॉर बोर्डाविरोधात दंड थोपटून उभं राहण्याचा पवित्रा घेतला आहे. एक तासाच्या या माहितीपटाचे २००२ आणि २०१७ असे दोन भाग आहेत.

सुमन घोष हे मुळात त्यांच्या माहितीपटाच्या नावाला जागत आहेत. सेन्सॉर बोर्डानं हे नावही बदलायला लावलं पाहिजे. या नावाचा अनुबोधपट पाहिल्यानंतर सध्या सुतासारखे सरळ असलेले अनेक भारतीय ‘आर्ग्युमेंटेटिव्ह’ बनण्याचा धोका आहे. शिवाय, कोणत्याही माहितीपटात किंवा अन्यत्र लोकांनी गाय, गुजरात, हिंदुत्ववादी विचार यांची चर्चा किंवा चिकित्सा करण्याचीही काही गरज नाही. या सगळ्यांचा उल्लेख किंबहुना सगळ्या परंपरांचा, रूढींचा, समजुतींचा उल्लेख गौरवपूर्णच असायला हवा, अशी एक ब्लँकेट ऑर्डर काढायला काय हरकत आहे?

.............................................................................................................................................

४. आपचे नेते आणि कवी कुमार विश्वास यांनी हरिवंशराय बच्चन यांची एक कविता एका समारंभात सादर केल्यानं नाराज झालेले ज्येष्ठ अभिनेते आणि हरिवंशराय यांचे सुपुत्र अमिताभ बच्चन यांनी त्यांना नोटिस पाठवली आहे. अमिताभ यांनी कुमार विश्वास यांना कविता मागे घेण्याची विनंती केली असून यातून होणारी कमाईही परत करा, असं म्हटलं आहे. अमिताभ इतके नाराज झाले की, त्यांनी कुमार विश्वास यांच्या विरोधात कॉपीराईटची केस केली आहे, तसंच ही केस मागे घ्यायलाही नकार दिला आहे. हरिवंशराय बच्चन यांची कविता माझ्या परवानगीशिवाय सार्वजनिक कार्यक्रमात सादर केलीच कशी, असा प्रश्न विचारत अमिताभ बच्चन यांनी कुमार विश्वास यांच्यावर चोरीचा आरोप लावला आहे.

‘मेरे अब्बा सिर्फ मेरे है’ असा काही सिनेमा येतो आहे का? ज्याने आयुष्यभर इतर कोणीतरी लिहिलेल्या संवादांवर, गाण्यांवर, इतर कोणाच्या सांगण्याबरहुकूम अभिनय केला आहे, त्यांचं वेळीअवेळी ठिकठिकाणी ‘उत्स्फूर्त’ सादरीकरणही केलं आहे आणि त्या आधारावर आपली सार्वजनिक प्रतिमा उभी केली आहे, अशा अभिनेत्यानं आपल्या वडिलांच्या कवितेबद्दल इतकं पझेसिव्ह होणं- कॉपीराइट कायदा त्याच्या बाजूने असला तरी- आश्चर्यकारक वाटतं. आपले वडील जनकवी आहेत, त्यांच्या कविता जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात, असं अमिताभ यांना का वाटत नसावं?

.............................................................................................................................................

५. आठ नोव्हेंबर २०१६ रोजी जाहीर झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर ५०० आणि १ हजारच्या चलनातून बाद झालेल्या किती नोटा सरकारकडे जमा झाल्या, या प्रश्नाचं उत्तर रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्याकडे नाही, सरकारडे नाही किंवा आरबीआयकडेही नाही. संसदेच्या आर्थिक घडामोडी पाहणाऱ्या स्थायी समितीनं पटेल यांना या निर्णयानंतर रिझर्व्ह बँकेकडे नेमके किती पैसे आले, असा प्रश्न विचारला, तेव्हा त्यांच्याकडे याचं उत्तर नव्हतं. कर्मचाऱ्यांच्या सुट्यांना कात्री लावून, नव्या यंत्रांच्या साह्यानं वेगानं नोटा मोजण्याचा प्रयत्न सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.

मुळात संसदीय समितीला या आकड्यात एवढा काय रस आहे? त्यांनी नोटाबंदीतून झालेल्या इतर फायद्यांवर लक्ष केंद्रित करायला काय हरकत आहे? देशात आता पाच पैशांचाही भ्रष्टाचार होत नाही. सगळ्या दहशतवादी संघटनांचं कंबरडं मोडलेलं असल्यामुळे नोटाबंदीपासून ना दहशतवादी हल्ला झाला, ना सीमेपलीकडून घुसखोरी झाली. शिवाय काळ्या पैशाचं नामोनिशाण उरलेलं नाही. हे सगळं सोडून नोटांची संख्या विचारत राहणं, हे काँग्रेसी षडयंत्रच नाही का?

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.