कुंकू स्त्रीआरोग्यापेक्षा जास्त गरजेचं आहे?
अर्धेजग - कळीचे प्रश्न
डॉ. संध्या शेलार
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Sun , 28 May 2017
  • अर्धे जग कळीचे प्रश्न मासिक पाळी Masik Pali पिरिअडस Periods Menstrual Cycle सॅनिटरी नॅपकिन्स Sanitary Napkins

माझा जन्म जरी ग्रामीण भागातला असला आणि अर्धं शिक्षण ग्रामीण भागात झालं असलं, तरी वैद्यकीय सेवेनं मला विचारसमृद्ध आणि अनुभवसमृद्ध केलं. सणासुदीच्या काळात कितीतरी मुली, महिला पाळी पुढे ढकलण्यासाठी येतात. मी त्यांना समजावते, ''असं अनैसर्गिपणे पाळी पुढे नेणं चांगलं नाही. त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात.'' चार-दोन जणी ऐकतात, पण बाकीच्यांचा आग्रह असतो - 'देवदेव आहे; चालत नाही. गणपती बसायचेत; घट बसायचे; यात्रा आहे; लग्न आहे; जागरण आहे; दिवाळी आहे...' एक ना अनेक सण येतात. ही अंधश्रद्धा आणि मासिक पाळीबद्दल असलेले हे समज-गैरसमज दूर करण्याचा कितीही प्रयत्न केला, तरी त्यांचे विचार बदलत तर नाहीतच, उलट आपल्यालाच 'नास्तिक आहात' असं ऐकून घ्यावं लागतं. भारतासारख्या रूढीप्रिय देशात या गोष्टींचं कुणालाच वैषम्य वाटत नाही. उलट सुशिक्षित लोकांचा तर या गोष्टींवर ठाम विश्वास असतो. याविरुद्ध बोललं की, आगाऊपणाचं बिरुद आपल्याला मिळतं. कितीतरी सुशिक्षित मुली, शिक्षिका ‘देवाचं आहे नं’ म्हणून केविलवाणा चेहरा करतात, तेव्हा मला हसू आवरत नाही. एक वेळ आंधळ्यांना हे पटवता येईल, पण मानसिक आंधळ्यांचं काय! नवनिर्माण करण्याच्या क्षमतेला स्वतःच विटाळ म्हणून संबोधणं यासारखी मानसिक विकलांगता ती कुठली!

या चौदा-पंधरा वर्षांच्या काळात मला अतिशय खटकली, ती म्हणजे पाळी पुढे ढकलण्यासाठी द्यावी लागणारी हॉर्मोनल ट्रीटमेंट. ही गोष्ट मला जशी खटकायची तशीच ती करताना खूप वैषम्यही वाटायचं. ते अशासाठी की, 'हे चुकीचं आणि कुठलाही शास्त्रीय आधार नसलेलं मानसिक आजारपण आपण अधिक वाढवत आहोत', असं मला वाटायचं. निसर्गचक्रात मानवाची ही ढवळाढवळ म्हणजे खरोखर अक्षम्य असा गुन्हा आहे! नैसर्गिक स्राव आपण अनैसर्गिकरित्या रोखणं किंवा पुढे ढकलणं कितपत योग्य आहे, हा विचार मला अनेकदा छळत राही. 'आपण ही गोष्ट सर्वांच्या पचनी पाडू शकत नाही', याबद्दलची खंत मला सतत वाटे. एक-दोनदा मला मुलींना मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली. त्यात पाळी येणं आणि त्याबद्दलची शास्त्रीय माहिती मी मुलींना दिली, पण पुढे जाऊन त्याच मुली पाळी लांबवण्यासाठी माझ्याकडे यायला लागल्या! इतक्या मोठ्या समाजाच्या या चुकीच्या धारणा मी एकटी बदलण्यास असमर्थ होते. तरी जे कोणी पेशंट येतील, त्यांना मी समजावत असे; पण आयुष्यभराचे गैरसमज किंवा चुकीच्या धारणा पाच मिनिटांच्या समजावण्याने बदलणं शक्य नसल्याचं मलाही पटत होतं. मग एक क्लुप्ती शोधली, जेणेकरून तिच्या शरीरात हार्मोन्सही जाणार नाहीत आणि तिला औषध घेतल्याचं समाधानही वाटेल. विशेष म्हणजे, त्याने इतका चांगला परिणाम साधला की, जवळजवळ ६० टक्के महिलांना याचा फायदा झाला. याहून कहर तेव्हा झाला, जेव्हा या महिलांनी बाकीच्याही महिलांना त्या उपचारासाठी माझ्याकडे पाठवलं, पण यातून माझ्या मनावर हार्मोन्स देताना येणारा ताण कमी झाला. विशेष म्हणजे हार्मोन्समुळे त्या महिलेला होणारे त्रासही यातून टाळले गेले. फक्त मानसिक समाधान करणं इतकं परिणामकारक ठरत असल्याचंही लक्षात आलं.

आजही ९० टक्के स्त्रिया मासिक पाळीतलं ‘बाहेरपण’ पाळताना दिसतात. वास्तविक, प्रत्येक स्त्रीला वयाच्या १२ वर्षानंतर (हे वय १७ वर्षापर्यंत लांबू शकतं ) ते रजोनिवृत्तीपर्यंत २७-३० दिवसानंतर मासिक पाळी येते. सर्वसाधारणपणे चार-पाच दिवस रक्तस्राव होतो. स्त्रीची मासिक पाळी सुरू होणं, हे तिची प्रजोत्पादन क्षमता जागृत झाल्याचं लक्षण आहे. हे मासिक पाळी चक्र शास्त्रीयदृष्ट्या तीन भागांमध्ये विभागलेलं आहे. त्यात रक्तस्राव होण्याचा चार-पाच दिवसांचा एक भाग असतो, बीज तयार होण्याचा एक भाग असतो आणि त्या बिजाच्या फलनासाठी आवश्यक स्रावांचं स्रवन होण्याचा एक भाग असतो. जेव्हा फलनाचा कालावधी संपुष्टात येतो आणि त्यासाठी आवश्यक स्रावांचं प्रमाण कमी होत जातं, तेव्हा गर्भाशयात तयार झालेले (गर्भाच्या वाढीसाठी आवश्यक असलेले) थर हळूहळू गर्भाशयापासून विलग व्हायला लागतात आणि योनीतून रक्तस्राव व्हायला लागतो. बिजांडात तयार झालेलं बीज फलन न होता बाहेर पडतं (म्हणून याला ‘cry of uterus’ असंही संबोधलं जातं).

अशा प्रकारे नवनिर्मितीची ही दैवी देणगी स्त्रियांना लाभली आहे, पण आज साऱ्या शास्त्राचं आकलन होऊनही धर्मशास्त्राने त्याला 'विटाळ' म्हणून संबोधलं आहे. ‘कृत्यकल्पतरू’ या ग्रंथात सांगितलं आहे, ‘मासिक पाळी स्त्रिला अस्पर्श बनवते.’ मासिक पाळी आलेल्या स्त्रीला ‘शिक्षापत्री’ या ग्रंथात 'रजस्वला' असं म्हटलं आहे. त्यात मासिक पाळीला ‘मासिक व्रत’ असं म्हटलं आहे. या ग्रंथांनी सांगितल्याप्रमाणे स्त्री चौथ्या दिवसानंतर डोक्यावरून आंघोळ करून घरातल्या कामांमध्ये शिरू शकते. या काळात पाळायचे नियम म्हणजे - जमिनीवर झोपावं, माती आणि लोखंडाच्या ताटात जेवावं, तीन दिवस आंघोळ करू नये, जुनेच कपडे घालावेत, डोक्याला तेल लावू नये, दात घासू नयेत (हे तर हास्यास्पद आहे), अग्नी प्रज्वलित करू नये, दिवसा झोपू नये, पूजेसाठी फुलं गोळा करू नयेत, ग्रहतारेसुद्धा पाहू नयेत - असे आहेत! (त्या वेळच्या परिस्थितीत हे कसं गरजेचं होतं, हे सांगून याचं समर्थन अनेक जण करतात. उदाहरणार्थ, आंघोळीसाठी एकच कुंड असे आणि बरंच काही... पण माझा प्रश्न आहे की, दात न घासणं आणि ग्रहतारे न पाहणं याचं समर्थन कसं कराल?)

पूर्वी पाळी आलेल्या स्त्रीला ‘बाहेरची आहे’ असं संबोधले जाई. आजच्या या वेगवान युगात बाहेर बसण्याचं प्रमाण जरी कमी असलं, तरी ‘विटाळ’ ही धारणा तशीच शाबूत आहे. ती काम करण्यासाठी मोकळी असली, तरी धार्मिक कार्यात मात्र तिची हेटाळणी चालूच आहे. अगदी नगण्य लोक आजकाल तिथंही स्त्रीचा वावर मान्य करतात, पण बोलून दाखवत नाहीत. धार्मिक गोष्टींचा पगडा जनमानसात इतका खोलवर रुजला आहे की, एखादी बोलायला लागलीच, तर तिला मूर्ख किंवा अतिशहाणी म्हणून हिणवलं जातं.

कुटुंब चौकोनी होत गेली, पण धार्मिक कार्यं थांबली नाहीत आणि धर्माच्या नियमांचा पगडाही तसाच अबाधित राहिला. आधी कुटुंब एकत्र असल्याने पर्याय उपलब्ध असत, पण आता तेही नाहीत. मग यातून वैद्यकीय ज्ञानाची मदत घेणं चालू झालं. त्या कालावधीपुरती पाळी पुढे ढकलणं किंवा अगोदर घेणं यासाठी होर्मोन्स घेतले जायला लागले. अगदी सर्रासपणे काउंटर सेलला यासाठीची औषधं उपलब्ध व्हायला लागली. माला डीच्या गोळ्या गर्भनिरोधक म्हणून वापरल्या जातात आणि त्या सरकारी दवाखान्यात, आशा आणि बालवाडी सेविकांकडे सहज उपलब्ध असतात. पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या म्हणून त्यांचा सर्रास वापर होऊ लागला. नैसर्गिक चक्रात अडथळे आणले जाऊ लागले, तशा पाळीसंबंधित आजारांचं प्रमाणही वाढू लागलं. ‘कृत्यकल्पतरू’ आणि ‘शिक्षापत्री’ जसे मासिक पाळीला 'विटाळ' सांगतात, तसं याविरुद्ध ‘ज्ञानार्णवतंत्र’ या ग्रंथात सांगितलं आहे – ‘ज्याला धर्म आणि अधर्म याचे ज्ञान आहे, त्याच्या दृष्टीने विष्ठा, मूत्र, मासिक स्राव, नखे आणि हाडे अशी प्रत्येक गोष्ट शुद्ध आहे. शरीरच मासिक पाळीचं रक्त तयार करते. त्यामधून कुणी मुक्तीपर्यंत न पोचेल असा दोष का द्यावा?’ 

आज २८ मे. जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन. जिथं मासिक पाळीबद्दल उघड बोलणं टाळलं जातं, त्या समाजात या दिनाबद्दल कौतुक निर्माण व्हायला किती वर्षं जावी लागतील? दुसरी एक समस्या विशेषतः ग्रामीण भागात जास्त भयावह आहे. ती आहे, मासिक पाळी आणि त्यासंबंधित आजारांबद्दल उघडपणे चर्चा न करणं. पाळी काय असते, याची बहुतेक घरातल्या स्त्रिया मुलींना कल्पना देत नाहीत. त्यामुळे त्या मुलींना जेव्हा पाळी येते, तेव्हा त्यांची मानसिक उलघाल, ताणतणाव जबरदस्त असतात.

मला यासंबंधी एक अनुभव सांगावासा वाटतो. घरातला महिला वर्ग पाळी आली की, वेगळं बसताना एक आठव्या इयत्तेतल्या मुलीला सांगे की, ‘कावळा शिवल्याने’ त्या चार दिवस बाजूला बसतात. त्यामुळे या मुलीच्या मनात शंका येण्याचं काही कारण नव्हतंच. सहा महिन्यांपूर्वी तिच्या चुलत आजीचं गर्भाशयाच्या कर्करोगाने निधन झालं. तेव्हा कर्करोगाबद्दल असा समज होता की, एकदा हा आजार जडला की, मरणाची वाट पाहण्याशिवाय काही उपाय नसतो. अशा वेळी त्या मुलीला पाळी आली. सुरुवात असल्याने तिला थोडाच रक्तस्राव झाला, पण तिला असं वाटलं की, तिला कर्करोग झाला आहे. एकतर औषधउपचारांची भीती आणि दुसरं, 'मी मरणारच आहे, तर मग कशाला आई-बाबांना आणि घरच्यांना दु:ख द्या!' या मानसिक दोलायमान परिस्थितीत तिची होरपळ चालू झाली. शेवटी जेव्हा ती डिप्रेशनमध्ये गेली, तेव्हा सारे जागे झाले.

ही गोष्ट नैसर्गिक असल्याचं आणि ती का व कशी होते, हे तिला समजावलं, तेव्हा ती मुलगी नॉर्मल अवस्थेत आली. अशा अनेक मुली अवतीभवती आपल्या प्रश्नांची लिस्ट घेऊन आहेत. उत्तरं देणारे फार कमी आहेत. चुकून एखादी धाडस करून विचारू लागलीच, तर बाकीच्या लोकांचं हसणं, टाळाटाळ करणं सुरू होतं. मग ओठांपर्यंत आलेले त्या मुलींचे प्रश्न घशात तसेच अडकून राहतात. आता जरी लैंगिक शिक्षण अनिवार्य केलं असलं, तरी खेड्यातल्या शाळांमधून या विषयाचा एखादा तास वर्षभरात घेतला जातो. त्यातही एखादे डॉक्टर किंवा आरोग्यसेवक बोलावले जातात. निम्माअधिक वेळ हारतुरे करण्यात संपतो आणि अर्ध्या वेळात भले ते डॉक्टर अगदी तज्ज्ञ असोत, पण मुलींना त्यांच्यावर विश्वास निर्माण होईस्तोवर तास संपतो. या मुलींचे प्रश्न बऱ्याचदा अनुत्तरित राहतात. एकतर आधीच लैंगिक शिक्षण म्हटल्यावर शिक्षक-पालकांचा अर्धाअधिक वेळ नाकडोळे मुरडण्यातच जातो. मग त्याबद्दलची उदासीनता तर विचारायलाच नको!

काही मुली पाळीदरम्यान अस्वास्थ्याची आणि पोटदुखीची तक्रार घेऊन येतात. तेव्हा मी त्यांच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करते. त्यांना या दिवसांमध्ये शाळेत जायला नको वाटत असतं. त्या मेडिकल सर्टिफिकेटची मागणी करतात. त्यांची पोटदुखी थांबली, तरी तीन-चार दिवस त्यांना शाळेत जायचं नसतं. त्याची पुढे दिलेली कारणं त्या सांगतात -

- तिथे कपडे बदलण्यासाठी स्वच्छ आणि चांगल्या प्रकारे बंदिस्त, वेगळ्या स्वच्छतागृहाचा अभाव असतो.

- सुरुवातीच्या काळात होणारा जास्त रक्तस्राव आणि त्यामुळे डाग पडण्याची भीती वाटते.

- अचानक दुखायला लागलं, तर शाळेत प्राथमिक औषध-उपचारांचा अभाव.

- पाळीत वास जास्त येतो. मग मुली लांब सरकतात. त्याबद्दल त्यांना वैषम्य वाटतं.

- बऱ्याच मुली पारंपरिक कपडा वापरत असतात. बदलण्याची सोय असली, तरी मग हे कपडे बदलणं आणि बदललेले सांभाळणं किळसवाणं वाटतं.

अशी अनेक कारणं सांगत या मुली एका भीतीपायी, आरोग्यसुविधांच्या अभावापायी त्यांच्या शैक्षणिक करिअरचं नुकसान करत असतात. मी तर अशाही मुली पहिल्यात, ज्या पाळी आल्यानंतर शाळाच बंद करतात. याला बऱ्याचदा आई-वडलांची फूस असतेच. एकतर मुलीच्या बाहेर जाण्याने त्यांच्या काळजीत भर पडत असते की, तिचं पाऊल वाकडं पडेल. दुसरं कारण मुलगी हाताखाली येते. बऱ्याच वेळा पहिलं कारण सांगितलं जातं. 

मासिक पाळीविषयीची मराठी पुस्तके ऑनलाइन खरेदीसाठी पुढील लिंक्स वर क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3490

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3488

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3489

……………………………………………………………………………………………

अशा अनेक अडथळ्यांना सामोरं जात या मुली शिक्षण पूर्ण करत असतात. प्राथमिक आरोग्यसुविधा देणं, ही गोष्ट प्रत्येक शाळेने मनावर घेतली पाहिजे. नाहीतर लज्जेचं कारण देत घरी राहणाऱ्या मुलींना शिक्षणाला मुकावं लागेल. जिथं शहरातल्या मुली स्वतःची रक्ताने माखलेली जीन्स फेसबुकवर पोस्ट करण्याचा मोकळेपणा दाखवतात, तिथं या ग्रामीण मुली अजूनही त्यांची घुसमट दाराच्या आतच घेऊन बसल्या आहेत. कुठेतरी त्यांना मोकळं करणं नक्कीच गरजेचं झालं आहे.

या मुलींच्या प्रश्नाबद्दल काम करणाऱ्या धन्वंतरी सोशल फोरमच्या सदस्य डॉ. शुभांगी आणि डॉ. सचिन जाधव (चिंभळे, ता. श्रीगोंदा) यांच्याशी ओळख झाली. धन्वंतरी सोशल फोरमचं काम पाहून या अंधःकारातल्या उजेडाची तिरीप दिसली. तालुक्यातल्या उत्साही डॉक्टरांना घेऊन ही टीम प्रत्येक शाळेत जाऊन फोरमच्या माध्यमातून जागृतीचं काम करते आहे. मुलींना शास्त्रीय दृष्टिकोन देऊन अज्ञानाच्या अंधारातून, घुसमटीतून बाहेर पडण्यासाठी हे फोरम मदत करत आहे. बहुतेकदा महिला डॉक्टर जाऊन व्हिडिओ-ऑडिओ माध्यमातून, चित्र दाखवून मुलींना शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करतात. एवढ्यावर हे थांबत नाही, तर कपड्याला पॅड्सचा पर्याय कसा चांगला आहे, पर्यावरणपूरक पॅड्स का वापरावं, कसं वापरावं आणि त्यांची विल्हेवाट कशी लावावी याचंही मार्गदर्शन केलं जातं. फोरमने आजवर ७३ शाळांमध्ये या प्रकारचं मार्गदर्शन केलं आहे. एवढंच करून ते थांबत नाहीत, तर याबद्दलचं प्रशिक्षण तेथील शिक्षकांना देऊन त्यांच्याही संगणकामध्ये हे सारे फीड करून देतात. वेळोवेळी पाठपुरावा करतात.

या त्यांच्या कार्याला त्यांनी अभ्यासाचीही जोड दिली आहे. काही प्रश्नावली तयार करून ते या मुलींना भरायला लावतात. तो सर्व डाटा यांच्याकडे तयार आहे. जवळजवळ ७,००० मुलींची उत्तरं यांनी अभ्यासून त्यांच्या बेसिक गरजांचा अभ्यास चालू केला आहे. स्वतःच्या मुलीच्या प्रश्नाने व्यथित झालेले डॉ. जाधव आणि त्यांची धन्वंतरी सोशल फोरम नक्कीच कौतुकास पात्र आहे! 

वर उल्लेखलेले प्रश्न बहुतांश करून मुलींचे झाले. परंतु महिलांचे प्रश्न याहून जास्त बिकट आहेत. उघड्यावर शौचाला जावं लागणं, कापड सुकवण्यासाठी बंदिस्त खोल्यांचा वापर करणं. यामुळे जननइंद्रियांना होणारा जंतुसंसर्ग आणि त्यामुळे उद्भवणारे आजार जेव्हा भयावह रूप घेऊन समोर येतात, तेव्हा या महिला दवाखान्यात येतात. एकतर त्यांचं उशिरा उपचार घेणं आणि उपचार घेताना सातत्य नसणं, यामुळे हे बुरशीजन्य आजार जास्तच फोफावत जातात. सततच्या संसर्गामुळे लवकरच या महिला गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या बळी ठरतात. लवकर निदान होणं यासाठी लागणाऱ्या आरोग्यसुविधा यांची वानवा यांच्या आजाराच्या गंभीरतेत भर घालते आणि त्यासोबत या महिलांची आरोग्यप्रश्नाबद्दल, स्वच्छता पाळण्याबद्दल, पाळीच्या दिवसात अस्वच्छ कपडे वापरण्याबद्दल असलेली उदासीनताही या आजारांना निमंत्रण देते.

सरकारी दवाखान्यात असलेलं निराशाजन्य वातवरण, ग्रामीण भागात महिला डॉक्टर उपलब्ध नसणं, त्यासाठी लागणाऱ्या औषधांची कमतरता, यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांस याबद्दल उपचार मिळणं जिथं दुरापास्त आहे, तिथं जागृतीविषयक कार्यक्रमांबद्दल न बोललेलं बरं. राजीव गांधी आरोग्य योजनेमुळे जरी काही महिलांचा फायदा होत असला तरी बऱ्याच वेळा त्यांना विनाकारण गर्भाशय काढण्याला बळी पडावं लागतं. अवेळी येणाऱ्या रजोनिवृतीच्या लक्षणांमुळे ती महिला भांबावून जाते. तिची कष्ट करण्याची शारीरिक क्षमता कमी होत असलेली पाहून ती आतून ढासळून जाते. याउलट काही स्रिया अज्ञानामुळे किंवा कर्करोगाच्या भीतीने साध्या लक्षणांनंतर लगेच hysterectomy चा आग्रह करतात. या महिलांचं समुपदेशन करणं गरजेचं बनलं आहे. मासिक पाळी आणि त्यासंबंधित आजारांबद्दल जागृती करणं आज ग्रामीण महिलांची महत्त्वाची निकड बनलेली आहे.

स्त्रियांची ही फरपट छाया सतीश काकडे (पारधेवाडी, ता. औसा, जि. लातूर) यांना अंतर्मुख करून गेली आणि त्यांच्या कार्याला सुरुवात झाली. त्यांनी आधी मासिक पाळी आणि त्यांच्याशी सलग्न अंधश्रद्धा, समजुती याविषयी महिलांचं मार्गदर्शन चालू केलं. त्यात त्यांना या महिलांच्या अनारोग्याची गोम सापडली, ती त्यांच्या पाळीत वापरल्या जाणाऱ्या अस्वच्छ कपड्यांत. तिथून सुरू झालं सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याबद्दल जनजागरण. तेवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर पर्यावरणपूरक अशा सॅनिटरी नॅपकिन्सच्या निर्मितीचं शास्रशुद्ध शिक्षण अमेरिकेतून घेऊन गावातच त्यांनी ती बनवायला सुरुवात केली. गावाने त्यांचं कौतुक करणं तर सोडा पण ‘चड्ड्याचा कारखाना’ म्हणून हिणवलं. काही दिवस त्यांना काम बंद करावं लागलं. पण स्त्रियांच्या प्रश्नाने झपाटलेल्या छायाताई थांबल्या नाहीत. आज सॅनिटरी नॅपकिन्स घरपोच देतात, तेही पाळीच्या तारखेच्या आठ दिवस आधी. अगदी नगण्य किमतीत. जिल्ह्यांत घराघरात पोहचणारे सॅनिटरी नॅपकिन्स आणि तेही तारखेच्या आठ दिवस आधी यावरून ताईच्या कार्याची व्याप्ती लक्षात येते. अशा छाया काकडे जितक्या निर्माण होतील तितक्या आजच्या देशातील ग्रामीण महिलांना हव्या आहेत! 

आता अलीकडच्या काळात टीव्हीच्या माध्यमातून आणि सततच्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या येणाऱ्या जाहिरातींमुळे या महिलांची मुलींची भीड चेपली असली तरी आजही मुली किंवा महिला पुरुष केमिस्टला सॅनिटरी नॅपकिन्स मागायला लाजतात. काहीजणी तर डॉक्टरकडून चिठ्ठी लिहून नेतात. मीही अनेकदा असं प्रिस्क्रिप्शन लिहून दिलं आहे! दुसरं असं जाहिरातीत दाखवले जाणारे सारेच सॅनिटरी नॅपकिन्स पर्यावरणपूरक नाहीत. उलट ते जितके सफेद आणि जास्त स्राव शोषण्याचा दावा करतात, तितके ते विघटन होण्यास वेळ घेतात आणि पर्यावरणाला घातक ठरतात. ज्या नॅपकिन्समध्ये जेल वापरलं जातं, ते acrylic acid चं sodium compound असतात. ते जास्त द्रव्य शोषून घेतात तसंच त्वचेमधला ओलावा शोषून घेतात. परिणामी मासिक पाळीत स्त्रियांना rashes येतात. गौरी दाभोळकर याविषयी बोलताना म्हणाल्या, “जास्त पांढरेपणा येण्यासाठी यात वापरले जाणारे ब्लिचिंग एजंट आरोग्यासाठी घातक ठरतात. अशा वेळी पर्यावरणपूरक नॅपकिन्सची निर्मिती काळाची गरज बनत आहे. शिवाय त्यात वापरले जाणारे प्लॅस्टिक विघटनास जड असतं. एक महिला साधारण तिच्या पाळी येण्याच्या कालावधीत १.५ किलो प्लास्टिक तयार करते. मग संपूर्ण महिलावर्गाचे प्लॅस्टिक विचारात घेतलं तर पुन्हा जुन्या कपड्यांकडे वळावं का? असा प्रश्न पडतो. नॅपकिन्सला पर्याय ठरत असलेल्या कप आणि cloth pads ला मागणी वाढत असली तरी अजून खूप गैरसमज आहेत!”

एकीकडे सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्याबद्दल ग्रामीण महिलांची उदासीनता संपत नाही, तोवर सरकारची या प्रश्नाबद्दल असलेली अनासक्ती पुन्हा समोर आली आहे. GST कर सॅनिटरी नॅपकिन्सवर लागू करून यावर सरकारने मोहोर उठवली असं म्हणणं फारसं वावगं ठरणार नाही. याविरोधात सुश्मिता देव यांनी याचिका दाखल केली आहे. त्यात त्यांनी पर्यावरणपूरक napkins नॅपकिन्सवरील कर हटवला जावा अशी मागणी केली आहे. सोशल मीडियावर ‘लहू का लगान’ (taxation on blood) ही मोहीम राबवली जात आहे. त्याला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.

इथं आणखी एक गोष्ट नमूद करावी वाटते. जिथं सॅनिटरी नॅपकिन्सला १२ टक्के कर लागू केला जात आहे, तिथं कुंकू (टिकल्या) यावर कर नाही. सरकारला असं वाटतंय का कि, सौभाग्यचं चिन्ह मिरवणं स्त्रीआरोग्यापेक्षा जास्त गरजेचं आहे? यातून सरकारला काय सिद्ध करायचे आहे?

(या लेखासाठी डॉ. शुभांगी सचिन जाधव, छायाताई काकडे, गौरी दाभोळकर, विकीपिडीया आणि आर्याबाग सांस्कृतिक ग्रुप यांची मदत झाली. त्यांचे आभार.)    

लेखिका मुक्ताई ग्रामीण महिला संघ (नागरगाव, शिरूर, जि. पुणे)च्या अध्यक्ष आहेत.

shelargeetanjali16@gmail.com    

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

ADITYA KORDE

Tue , 30 May 2017

आधी सॅनिटरी नॅपकिन्सवर १४.५% कर होता तो १२% झालेला आहे ....म्हणजे कमीच पण तो ० असायला हवा होता हे मान्य....


Nivedita Deo

Sun , 28 May 2017

खूप छान लेख आहे वास्तव खूप चांगल्या पद्धतीने मांडले आहे सर्वानाच विचार करायला लावणारा लेख आहे