स्कार्फ, बुरखा, बुर्किनी आणि लिपस्टिक
अर्धेजग - कळीचे प्रश्न
अलका गाडगीळ
  • फ्रेंच रिव्हिएरावरील नीसचा नयनरम्य समुद्रकिनारा आणि बुर्किनीची प्रतिकृती
  • Tue , 21 March 2017
  • अर्धे जग कळीचे प्रश्न स्कार्फ बुरखा बुर्किनी आणि लिपस्टिक

सभोवती बिकिनी घातलेल्या गौरांगना वाळूवर पहुडल्या आहेत. जोडपी एकमेकांमध्ये गुरुफटून गेली आहेत. लहान मुलं इथं-तिथं पळत आहेत, पाण्यात जाण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचे पालक त्यांच्यामागे पळत आहेत. किशोरवयीन मुलं-मुली त्यांच्या मित्र-मैत्रिणींसोबत धम्माल करत आहेत. काही एकेकटे जीव खोल पाण्यात पोहत आहेत, तर काही तरंगत आहेत. सगळा परिसर मौज आणि उत्फुल्लतेनं भरलेला आहे. फ्रेंच रिव्हिएरावरील नीसचा नयनरम्य समुद्रकिनारा सुखवस्तू फ्रेंचांचं सुट्टीतील आवडतं गंतव्य स्थान आहे. या इतक्या ‘फ्रेंच’ माहोलात बुर्किनी परिधान केलेली एक महिला समुद्रात पोहायला उतरते. बुर्किनी म्हणजे पावलं आणि चेहरा वगळता सर्व शरीर झाकणारा स्विमसूट. तिथं आधीपासून पोहणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या कपाळावर आठी उमटते. थोडा वेळ पोहल्यावर ती स्त्री वाळूवर आडवी होते. सर्वांच्या त्रासलेल्या नजरा तिच्याकडे वळतात. तेवढ्यात पोलीस तिथं दाखल होतात.

‘धीस इज फ्रान्स, काढा ते एकावर एक घातलेले कपडे... नाहीतर निघा इथून’. आजूबाजूंनीही प्रतिक्रिया येतात- ‘गो बॅक, लिव्ह’. बुर्किनी घातलेली स्त्री सर्वांसमोर स्वतःचं जाकीट, डोक्याचा स्कार्फ आणि वरचा टीशर्ट काढत असल्याचा व्हिडियो इंटरनेटवर पाहायला मिळतो. ‘फ्रान्समध्ये बुर्किनी आणि हिजाब चालणार नाही. इथं राहायचं तर भलते लाड चालणार नाहीत’. तिच्या हातात एक नोटीस देऊन पोलीस तिथून निघून जातात. काय असते नोटीस? ‘निधर्मीपणा आणि नीतीला धरून नसलेला पोषाख’. 

फ्रान्समध्ये गेल्या काही वर्षांपासून हिजाबविरोधात जनमत तयार झालं आहे. युरोप आणि पाश्चिमात्य देशांमध्ये इस्लामच्या सामाजिक चालीरीतींसंबंधातील कटूपणा वाढतो आहे. या लढाईनं फ्रान्समध्ये अतितीव्र रूप धारण केलं आहे. फ्रेंचांना हिजाब, बुरखा किंवा स्कार्फ म्हणजे स्त्रीदास्याचं चालतं-बोलतं प्रतीक वाटतं. ‘हिजाब म्हणजे स्त्रीचं आणि तिच्या लैंगिकतेचंही शोषण’ अशी मांडणी केली जात आहे.

फ्रान्समधील अनेक शहरांमध्ये हिजाबवर बंदी घालण्यात आली आहे आणि नीस या समुद्रकिनाऱ्यावरील शहरानं बुर्किनीवरही बंदी घातली आहे. ‘फार मोठा लढा देऊन स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं फ्रेंच समाजानं प्रस्थापित केली. स्त्रीस्वातंत्र्यासाठीही आम्ही लढलो. आपल्या डोळ्यासमोर वैयक्तिक आणि नागरी स्वातंत्र्याचं हनन होत असताना आपण स्वस्थ बसायचं काय?’ अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरू लागल्या आहेत. खरं तर हिजाबच्याच बुरख्याआड संस्कृती आणि वंशश्रेष्ठत्वाची लढाई लढली जात आहे.

‘आमच्यावर स्कार्फ घालण्याची सक्ती करू नका. तो घालायचा की नाही ते आम्हाला ठरवू द्या’. गेली अनेक वर्षं इराणमधील महिला स्कार्फसक्ती विरोधात लढत आहेत. इराणमध्ये महिला डोकं उघडे ठेवून घराबाहेर पडू शकत नाहीत. स्कार्फ डोक्यावरून घसरलेलाही चालत नाही. अशाने पोलीस तुम्हाला अटक करू शकतात; प्रशासन तुमच्या विरोधात न्यायालयात दावा दाखल करू शकतं. या सक्तीच्या विरोधातील स्त्रियांच्या लढ्यात इराणी पुरुषही सहभागी झाले आहेत. त्यांच्या आंदोलनास सहमती दर्शवण्याकरता त्यातील काहींनी हेडस्कार्फ वापरून स्वतःचा विरोध दर्शवायला सुरुवात केली आहे.

१९५३ साली इराणमधील निर्वाचित सरकारला उलथवून शहा पहलवी यांनी सारी सूत्रं हाती घेतली. परंपरागत इराणी पोषाखाची शहांना लाज वाटू लागली. त्यांनी पाश्चिमात्यीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला. प्रथम सरकारी सुविधा आणि नोकऱ्यांचा लाभ घेणाऱ्या मुली आणि महिलांच्या पोषाखवर संक्रांत आली. इराणमधील स्त्रियांच्या डोक्यावरून घेण्याच्या पारंपरिक ओढणीवर, चादोरवर बंदी घालण्यात आली. सरकारी कार्यालयं, न्यायालयं आणि शाळा-कॉलेजातील स्त्री-कर्मचाऱ्यांना पाश्चात्य पोषाखाची सक्ती करण्यात आली. याचा परिपाक म्हणून शहांच्या विरोधात अनेक चळवळी उभ्या राहिल्या. राजकीय कार्यकर्त्यांसोबत विद्यार्थी, महिला आणि बुद्धिजीवीही मोठ्या संख्येनं सामील झाले होते. धर्मगुरू आयातोल्ला खोमेनी या चळवळीच्या अग्रभागी असल्यामुळे तिचं नेतृत्व आपोआप त्यांच्या हाती गेलं. इराण सरकारनं खोमेनींना हद्दपार केलं. पुढे पॅरिसमध्ये राहून त्यांनी चळवळ चालवली.

१९७९ साली शहांच्या विरोधातील वातावरण तापलं होतं आणि जनतेचा रेटा इतका वाढला होता की, त्यांना इराणमधून पळ काढावा लागला. चादोर बंदीचा प्रतीकात्मक विरोध करण्यासाठी आंदोलक महिलांनी आंदोलनादरम्यान ती आग्रहानं वापरली होती. कायम चादोर वापरण्याचा त्यांचा विचार नव्हता. शिवाय ती वापरावी की नाही याचा निर्णय स्त्रियांनीच करावा, यासाठीही त्या लढत होत्या. नवीन सरकार नागरी स्वातंत्र्य आणि स्त्री-स्वातंत्र्याच्या मूल्यांची जपणूक करेल, असं आंदोलनकर्त्यांना वाटलं होतं, पण झालं उलटं. खोमेनींनी धार्मिक सरकार स्थापन केलं. एवढंच नाही, तर सत्ताग्रहणानंतर एका महिन्यात स्त्रियांनी चादोर वापरणं अनिवार्य करणारा वटहुकूमही काढला. आंदोलनात सामील झालेल्या स्त्रियांनी शहाच्या सांस्कृतिक क्रांतीला विरोध दर्शवण्यासाठी चादोर वापरली होती; धार्मिक कारणांसाठी वापरली नव्हती. सरकारं बदलली, पण स्त्रियांचा लढा अजून सुरूच आहे. शहांची आधुनिक आणि खोमेनींची धार्मिक पुनरुज्जीवनाधारित राजवट, या दोहोंनीही स्त्रियांच्या पोषाख-स्वातंत्र्यावर अतिक्रमण केलं.

ओरहान पामुक या नोबेल पारितोषिक प्राप्त ज्येष्ठ तुर्की लेखकाच्या ‘स्नो’ या कादंबरीला स्त्रियांच्या स्कार्फवरून उभ्या राहिलेल्या वादंगाची पार्श्वभूमी आहे. प्रशासनानं तुर्कस्थानमध्ये सरकारी-निमसरकारी शाळा, महाविद्यालयं, विद्यापीठं, कार्यालयं, न्यायालयं आणि इतर आस्थापनांमध्ये स्त्रियांच्या स्कार्फवर बंदी घातली होती.

देशाचा काही भाग युरोपमध्ये असल्याने युरोपियन युनियनमध्ये (इ.यु.मध्ये) सामील होण्याची मनीषा तुर्कस्थान बाळगून आहे. तुर्कस्थानला अजूनही या युनियनेचे पूर्ण सभासदत्व मिळालेलं नाही. ‘ख्रिश्चन’ मुस्लीम तुर्कस्थानला सभासद करून घेण्याचे लांबणीवर टाकत आहे. स्त्रियांचं स्कार्फ वापरणं तुर्की प्रशासनाला मागासपणाचं आणि अयुरोपीय वाटतं. त्याला युरोपीय होण्याची घाई झाली आहे. त्यामुळे स्त्रियांचा स्कार्फ हा त्यातील अडसर ठरू लागला. इस्तंबूलमधील बुद्धिजीवी, पुरोगामी आणि अभिजन युरोपळलेले आहेत, तर सर्वसामान्य तुर्की समाजापासून पार तुटलेले आहेत. ‘स्नो’ कादंबरीतील घटना कार्स या देशाच्या पूर्वेकडील शहरात घडतात. इस्तंबूलपलीकडच्या या समाजाचा आवाज राजधानीपर्यंत पोचत नाही. शाळांमधून आलेल्या स्कार्फबंदीनंतर काही शाळकरी मुलींच्या आत्महत्यांच्या घटना घडतात. त्यामुळे या शहरात अस्वस्थता पसरली आहे. तुर्कस्थानातील इस्लामवादी गट या मुद्यावरून वादळ उठवतात. सरकारला मात्र स्कार्फबंदी म्हणजे सेक्युलर होण्याच्या दिशेनं टाकलेलं पाऊल वाटलं. सरकारच्या या दडपशाहीमुळेच इस्लामवादी पक्षांना एक प्रकारे बळ मिळतं. 'स्कार्फ' हे इस्लामी आणि तुर्की संस्कृतीचं प्रतीक असल्याचा दावा उजवे गट करतात.

परंपरा आणि आधुनिकता, तुर्की आणि पाश्चात्त्य, मागासलेपणा आणि प्रगती, सेक्युलर विरुद्ध धार्मिकतावाद, या मांडणीच्या आधारे तुर्की-इस्लामिक अस्मितेचं राजकारण समजून घेता येत नाही. आधुनिकतावादातून निघालेल्या या दुहेरी मांडणीतील फोलपणाकडे ही कादंबरी निर्देश करते. मुलींच्या आत्महत्यांनंतर सर्वसामान्य समाज भयभीत आणि अस्वस्थ झाला आहे. या समाजाला बळ देण्याचं कार्य ‘ब्लू’ नावाचा इस्लामवादी गटाचा एक तरुण करतो. मुख्य पात्र ‘का’ याचा या तरुणासोबत सतत संवाद होत राहतो. इस्लामवाद्यांची नैतिकता, त्यांचं गाऱ्हाणंही या कलाकृतीतून पुढे येतं. आधुनिक तुर्कस्थानातील विसंगतींवर पामुक यांनी अस्सल तुर्की परिप्रेक्ष्यातून दृष्टिक्षेप टाकला आहे. पामुक इस्तंबूलमधील एलीटपैकी असून गेली अनेक वर्षं अमेरिकेत वास्तव्य करून आहेत. या कादंबरीसाठी पामुक यांना नोबेल पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.

.... स्त्रिया वेगवेगळ्या कारणांसाठी हिजाब घालतात. त्यातील एक कारण तसं धर्मात सांगितले गेल्याचंही असू शकतं. अमेरिकेतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या हल्ल्यानंतर मुस्लीम धर्म आणि समाज टीकेचे लक्ष्य बनले. इस्लाम धर्मातील 'जिहाद' ही संकल्पना दोषाची धनी ठरवली गेली. मुस्लिमांसोबत जोडलेल्या प्रतीकांची मोठया प्रमाणात निंदा केली गेली. ९/११च्या हल्ल्यानंतर हिजाबला मुस्लिमांच्या ‘मागासलेपणा’सोबत जोडलं गेल्यामुळे या मांडणीला आव्हान देण्यासाठी काही स्त्रियांनी तो हेतूपुरस्सर वापरायला सुरुवात केली. अनेक ठिकाणी परंपरा असल्यामुळे हिजाब/चादोर किंवा स्कार्फ वापरला जातो. इराणमध्ये इस्लाम येण्याच्या आधी झरतुष्टाचा धर्म होता. पाचव्या शतकातील आखिमिनद साम्राज्यकालीन शिल्पांमधील स्त्रियांनी चादोरने डोकं झाकल्याचं दिसतं.

भारतात पारशी समाज नवव्या शतकात दाखल झाला. तेव्हाही पारशी स्त्रिया चादोरने स्वतःचं डोकं झाकत असत. मुंबईतील हा समाज खूप पुढारलेला आहे, परंतु ७०-८० वर्षांपूर्वीपर्यंत मुंबईतील पारशी स्त्रिया आणि पुरुषही डोकं झाकल्याशिवाय घराबाहेत पडत नसत. झरतुष्ट धर्मानुसार सूर्यादेवाला स्वतःचे केस दाखवायचे नसतात. आजही अग्यारीमध्ये जाताना स्त्रिया स्कार्फ लावतात. या कारणांमुळे हिजाबला फक्त मुस्लीम धर्माशी जोडणं चुकीचं ठरतं. काही समाजांनी आपले स्कार्फ टाकून दिले, तर काहींनी टाकले नाहीत. औद्योगिक क्रांतीनंतर लोकांच्या जीवनशैलीत झपाट्याने बदल झाले.

युरोपमध्ये एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत स्त्रिया पायघोळ झगे घालत असत आणि स्कार्फ वापरत असत. पश्चिम आशियातील आणि युरोपमधील स्त्रियांचा पोषाख मिळताजुळता होता. त्या काळातील अनेक तैलचित्रं याची साक्ष आहेत. अरबप्रांत वालुकामय असल्यामुळे आणि तिथं वाळूची वादळं होत असल्यामुळे पुरुषही स्वतःचं डोकं आणि तोंड झाकतात. बुरख्याआड केवळ दास्य आणि लैंगिक शोषण नसतं. पडद्याआडच्या मुस्लीम स्त्रियांमध्ये इतर चारचौघींप्रमाणे रागलोभ, लैंगिकता, अस्मिता आणि ईर्ष्या असतात. त्या पुऱ्या करण्याचे मार्गही त्या शोधून काढतात.

राजा अल्सानिया या अरबी लेखकाची ‘गर्ल्स ऑफ रियाध’ नावाची कादंबरी खूप गाजते आहे. कॉलेजमधील चार कन्या प्रेमाचा शोध घेत असतात, पण सौदी समाजात अविवाहित स्त्री-पुरुष संवाद होऊ शकत नाही. मुलं मुलींशी बोलायला उत्सुक असतात, पण तिथं तर तो गुन्हाच मानला गेला आहे. मग काही करून या मुलींचा सेल नंबर कसा मिळवता येईल, यासाठी मुलं धडपडत असतात. तेही प्रत्येक वेळी शक्य होत नाही. प्रत्यक्षात नाही, तरी इंटरनेटमुळे आता भावना व्यक्त करण्यासाठी अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. कादंबरीची नायिका गोष्टी लिहिते आणि त्या कोणत्याही, कोणाच्याही ईमेलवर पाठवून देते. ती तिच्या तीन मैत्रिणींचं प्रेम, प्रेमातील परिपूर्ती आणि सेक्शुअल फँन्टसीच्या कहाण्या सांगते. या कादंबरीतील प्रमुख पात्र आणि निवेदक स्त्री असल्यामुळे आणि तिच्या लैंगिक आशयामुळे अरब समाजात वादळ उठलं.

'बुरखा किंवा स्कार्फ म्हणजे स्त्रीदास्याचं प्रतीक! आम्ही कष्ट करून मिळवलेल्या मूल्यांचा आणि नागरी स्वातंत्र्याचा अवमान आम्ही होऊ देणार नाही', असं आता अनेक पश्चिम युरोपीय देश म्हणू लागले आहेत. पण चादोर-हिजाब-बुरख्याचा अभाव किंवा तो न घालायला लागल्यामुळे स्त्रीमुक्ती किंवा स्त्रीचा दर्जा वाढतो, असं काही सिद्ध करता येणार नाही. बुरख्याची प्रथा नसणाऱ्या समाजामध्येही स्त्रियांचे हक्क नाकारले जातात.

फ्रान्समध्ये समान कामासाठी समान वेतन मिळत नाही. सरकारी नोकरी तसंच खाजगी क्षेत्रातही पुरुषांना स्त्रियांपेक्षा सरासरी २८ टक्के जास्त पगार मिळतो. फ्रान्सच्या पार्लमेंटमध्ये सेसील डफ्लो ही घरबांधणी मंत्री बोलायला उभी राहिली, तेव्हा पुरुष खासदारांनी शिट्ट्या मारून सभागृहात गोंधळ घातला होता. कारण काय, तर तिने फुलाफुलांचा समर ड्रेस घातला होता! संसद सदस्यांनी औपचारिक पोषाख घालावा असा प्रघात आहे. हा प्रघात पुरुष सदस्यही मोडतात. तेव्हा त्यांची हुर्यो झाल्याच्या घटना घडलेल्या नाहीत. स्त्रियांच्या कपड्यांवरून अनेक देशांमध्ये राजकारण केलं जातं. मुस्लीम महिलांना पछाडणाऱ्या फ्रान्समधील हे बोलकं उदाहण!

राज्य कोणाचंही असो, स्त्रियांच्या पोषाखावरून वाद होतोच. ‘पाश्चात्य पद्धतीचे पोषाख केल्यामुळे महिलांसोबत अभद्र व्यवहार करण्यात आला’, असं बंगळुरूच्या न्यू इयर पार्टीदरम्यान झालेल्या अत्याचारांच्या संदर्भात बोलताना कर्नाटकचे गृहमंत्री म्हणाल्याचं वृत्त मध्यंतरी प्रसारित झालं होतं. स्त्रियांवरील अत्याचार त्यांच्याच वर्तनामुळे होतात, असं यातून ध्वनित केलं जातं. पाश्चात्य पोषाख केलेली स्त्री अत्याचारास आमंत्रण देते आणि ‘सभ्य’ भारतीय पोषाख केलेली स्त्री ‘सुरक्षित’ राहते, अशी दुहेरी मांडणी केली जाते आणि ती सामान्य जनांच्या पचनी पडते. भले आणि बुरे, उच्च आणि नीच, ते आणि आपण अशी ही दुहेरी विभागणी प्रचलित असते. यामध्ये स्मशान व कब्रस्तानही सामील करायला हरकत नाही. राजकारणी हटकून दुहेरी मांडणीच करतात. त्यामुळे भ्रम निर्माण होतात, असलेले भ्रम अधिक पक्के केले जातात. प्रत्यक्षातील वास्तव बहुपेडी असतं, गुंतागुंतीचं असतं. ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ हा चित्रपट या गुंतागंतीच्या वास्तवाकडे निर्देश करतो.

सौदी अरेबिया प्रशासन स्त्रियांना बुरखा घालण्याची सक्ती करतं, तर फ्रेंच सरकार स्त्रियांचे कपडे फेडण्याचा प्रयत्न करत आहे. बुरखाबंदी करणारे फ्रेंच, बुरखा घालण्याची सक्ती करणारे सौदी, ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ला प्रमाणपत्र नाकारणारं सेन्सॉर बोर्ड, विशिष्ट पोषाख घातल्यामुळे लैंगिक अत्याचार होत असल्याचं विधान करणारे मंत्री, हे सगळेच स्त्री-शरीराचं राजकारण करत आहेत.

सध्याचा काळ देशांतराचा आहे. पश्चिम आशियातील अनेक देशांमध्ये यादवी सुरू आहे. 'इस्लामिक स्टेट' या दहशतवादी संघटनेनं विध्वंस मांडला आहे. या देशांमधील त्रस्त नागरिक पश्चिम युरोपातील देशांमध्ये स्थलांतर करत आहेत. परदेशातील, परसंस्कृतीतील वास्तव्य; तेथील चालीरीती, जीवनशैली आणि मूल्यं या नागरिकांमध्ये परकेपणाची आणि पोरकेपणाचीही भावना निर्माण करते आहे. सभोवताली असलेला परवर्ण, परवंश, परभाषा आणि परसंस्कृती या वातावरणामुळे आपली भाषा आणि चालीरीती नाहीशा होतील आशंका निर्माण होते. त्यातूनच संस्कृतीच्या बाह्य रूपांना महत्त्व येतं. मग संस्कृतीतील बाह्य रूपं अभिव्यक्त करण्याची बरीचशी जबाबदारी स्त्रियांवर येऊन पडते. कोणती संस्कृती ‘धर्मांध’ आणि कोणती ‘उदारमतवादी’ हे संस्कृतीच्या बाह्य रूपांवरूनच ठरवलं जातं आणि या बाह्य रूपांवरून होणाऱ्या हिंसेला स्त्रियांना तोंड द्यावं लागतं.

लेखिका मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com