प्रिय व्हायोला, तू ऑस्कर जिंकलेस… तुझ्या आयुष्यात प्रथमच तुला खऱ्या अर्थाने जिवंत असल्यासारखं वाटलं...
अर्धेजग - कळीचे प्रश्न
मीनाक्षी पाटील
  • ‘ऋतुरंग’ दिवाळी २०२२चे मुखपृष्ठ आणि अभिनेत्री व्हायोला डेव्हिस
  • Thu , 03 November 2022
  • अर्धेजग कळीचे प्रश्न व्हायोला डेव्हिस Viola Davis

मराठीत दिवाळी अंक तर खूप प्रकाशित होतात. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचं व्यवच्छेदक वैशिष्ट्य बनलेल्या दिवाळी अंकांनी यंदाची दिवाळी नुकतीच पार पडली. करोनाने वेढून टाकलेल्या जगाने काही महिन्यांपूर्वीच बाहेर पडून मोकळा श्वास घेतला असल्याने ही दिवाळी दिव्यांची रोषणाई, फटाके, रांगोळी, फराळ अशा गोष्टींनी भरून वाहिली. महाराष्ट्रात दिवाळी म्हणजे दिवाळी अंक. या दिवाळी अंकांचं वाचन, त्यावरील चर्चा, त्यांतील लेखनाविषयीची मत-मतांतरं अजून दीड-महिने चालू राहतील… राहायलाही हवीत.

मराठी दिवाळी अंकांमध्ये अरुण शेवते संपादित ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकाने आपलं एक वैशिष्ट्यपूर्ण आणि हटके स्थान निर्माण केलंय. या अंकाचा दरवर्षीचा विषय आगळावेगळा असतो. हा अंक एकाच विषयावर असतो. यंदाचं ‘ऋतुरंग’चं तिसावं वर्ष आहे. आणि या वर्षीचा विषय आहे – ‘उद्या पहाटे दुसऱ्या वाटा’. त्याविषयी शेवते त्यांच्या संपादकियामध्ये म्हणतात - “...आयुष्याचा प्रवास कधी स्थिर नसतो तर तो गतिशील असतो. एका वाटेवर अनेक वाटा खुणावत असतात. मनाला थांबून ठेवता येत नाही. मनाला हजार वाटा असतात. कुठली वाट निवडायची हे आपल्यालाच ठरवावे लागते. आपल्या विचारात, भावनेत अनेक बदल होत असतात. कधी हे बदल स्वीकारावे लागतात तर कधी नाकारून पुढे जावे लागते. वाटा आपल्याला बोलवत असतात. पहाट तर आपल्याला हवीच असते. वाटा बदलण्यासाठी धाडस लागते. माणसे बदलतात; भूमिका बदलतात. परिस्थिती बदलते. यातूनच आपल्या वाटेवरून पुढे जावे लागते आणि आयुष्य सुंदर होते.”

आणि खरोखरच या अंकातले काही लेख जळजळीत आहेत. ते वाचताना जळत्या निखाऱ्याचा चटका बसावा, तसे ‘शॉक’ बसतात. नेहमीच्या खंद्या लेखकांच्या वाचनीय लेखांसोबतच या अंकात अगदीच नवे, अनोळखी लेखक भेटतात आणि नवे लेखनविषयही. मिन्तल मुखिजा, रसिका रेड्डी, लक्ष्मण चव्हाण, संजन मोरे, भास्करराव पेरे पाटील, सुरेखा वसंत कोरडे, शिवराम भंडारी, हे त्यापैकी काही लेखक. प्रस्तुत लेख त्यापैकीच एक लेख… संपादकांच्या पूर्वपरवानगीसह…

आफ्रिकन-अमेरिकन अभिनेत्री व्हायोला डेव्हिस यांचा जीवनप्रवास उलगडणारा हा लेख वाचलाच पाहिजे, असा आहे.

.................................................................................................................................................................

प्रिय व्हायोला,

तू अशी अगदी अचानक सापडलीस... अर्थात सापडायला तू काही हरवली नव्हतीस की, अगोदर कधी भेटली नव्हतीस, आणि मुळात आपली तशी फार पूर्वीपासून खूप ओळखही नाही. मग तरी तू मला सापडलीस असं मला का वाटतंय? अर्थात मला जे वाटतंय, ते तरी पूर्ण खरं आहे का? कारण तुला तरी तू पूर्ण सापडलीयस का? कारण ‘फाइंडिंग मी’ असं जरी तू म्हणालीस तरी मला खात्रीय की, तुझ्या स्वभावानुसार तू शोधतच राहशील स्वतःला शेवटपर्यंत...

खूपच वेगात पळतेस मुली तू! शाळेची घंटा वाजताच तू जी पळत सुटलीस, ती आजपर्यंत पळतेच आहेस... तुझ्या रंगरूपावरून तुला चिडवणारी ती मुलं खरं तर खूपच मागे पडलीयत. पण त्यांच्या शिव्याशापांनी, त्यांनी तुझ्यावर फेकलेल्या दगडधोंड्यांनी तनामनाने घायाळ झालेली तू प्रचंड वेगाने पळतच सुटलीस... त्यांच्या शिव्याशापांचे प्रतिध्वनी, त्यांच्या भयंकर सावल्या वेगवेगळ्या रूपांत तुझा सतत पाठलाग करत राहिल्याने घाबरलेली, चिडलेली अशी तू कितीतरी काळ पळत सुटलीस.... अशा एका गंतव्याकडे की, ज्याला शेवटच नाही.

तुझ्या लहानपणच्या अनेक दुःखद आठवणींमधली तुझ्या मनाला प्रचंड घायाळ करणारी, तुला उन्मळून टाकणारी आणि म्हणूनच तुला सतत पळवत ठेवणारी तू आठ वर्षांची असतानाची ही सर्वांत दुःखद आठवण... जी सतत तुझ्या डोळ्यांत कायमच दाटून आलेली दिसते मुली! अशा दिशाहीन भटकंतीत आपलं कुणीच नाही, आपण अगदी एकटे एकटे आहोत. सर्वांनी, अगदी देवानेही आपल्याला नाकारलंय, या भयंकर जाणीवेने आलेलं भणंगपण कवटाळत तू प्रचंड धावत सुटलीस. सर्व दिशांनी घायाळ करणाऱ्या जगाने दिलेल्या वेदना आणि त्यात भरीस भर म्हणून आईला सतत मारझोड करणाऱ्या बापाच्या आघातांवर निदान आकाशातल्या बापाने तरी फुंकर घालावी, म्हणून तू कळवळून प्रार्थना करत होतीस पण... ‘I felt ugly. I felt unwanted, even by God’ असं तू म्हणतेस, तेव्हाचं तुझं प्रचंड एकाकीपण पोटात खड्डा पाडतं ग. सर्व दिशांनी अंधारून आणतं...

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक  : ‘मोदी महाभारत’

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

त्या दिवशीही अशाच मध्यरात्रीच्या अंधारात आईला बेदम मारहाण करणाऱ्या वडलांना पाहून तू प्रचंड घाबरलीस. त्यांनी आईला मारणं थांबवावं म्हणून कळवळून तू मोठमोठ्याने ओरडत होतीस, पण घरासकट दारा-मनाची कवाडं बंद केलेल्या आजूबाजूच्या जगाला ना तुझा आक्रोश ऐकू आला, ना तुझ्या आईचा. खूप हताश होऊन रडत-ओरडत तू नेहमीप्रमाणे तुझ्या बाथरूमच्या गुहेमध्ये स्वतःला कोंडून घेतलंस, अन् गडघे टेकून निरागस विश्वासाने तळमळून प्रार्थना सुरू केलीस, ‘हे बाप्पा, तुला जर मी आवडत असेन तर... तर इथून मला कायमसाठी घेऊन जा. मी डोळे मिटून एक ते दहा अंक मोजते... आणि मी जेव्हा डोळे उघडेन ना... तेव्हा मी इथून गायब व्हायला हवे. अन्यथा तू अस्तित्वातच नाहीस असं मी समजेन...’ असं म्हणत आकाशाच्या बाप्पाला तू कळवळून प्रार्थना करू लागलीस... एक... दोन... तीन म्हणता म्हणता तू डोळे घट्ट बंद केले होतेस. कारण तुला ठाम विश्वास होता की, बाप्पा तुला नक्की नेणार म्हणून! पण... आठ... नऊ... दहा! आणि तू डोळे उघडलेस तर तिथे तू एकटीच होतीस...

प्रचंड विश्वासाने एखाद्या गोष्टीची जीव तोडून वाट पाहत असताना एका विराट पोकळीने घेरलं जावं, अशा एकटेपणाची प्रचंड खोल जाणीव होऊन तू स्वतःशीच पुटपुटलीस, ‘मला वाटलेलंच की तू नाहीयेस म्हणून’. नऊ वर्षाच्या तुला अंतर्बाह्य हलवून टाकणाऱ्या, प्रचंड एकटं करणाऱ्या या अनुभवानंतर मात्र तुझ्या मनाची पोकळी सतत विस्तारतच गेली आणि क्षणोक्षणी होणाऱ्या मनाच्या जखमांवर स्वतःच फुंकर मारत तू मात्र एक अथक शोध घेत पळतच सुटलीस!

तू एवढी मोठी झालीयस मुली, तरी तुझ्यातली ती आठ-नऊ वर्षांची मुलगी मात्र कायमच तुझ्या डोळ्यांतून सतत डोकावताना दिसतेच ग... तुझ्या साऱ्या प्रवासात ती पावलोपावली भेटतच राहते अन् तुझ्या त्या नजरेने जर पाहिलं तर प्रत्येक बाईतच लपलेली दिसते एक मुलगी... मग अगदी नातवंडांना खेळवणाऱ्या तुझ्या आईतही वयाच्या पंधराव्या वर्षीच लग्न करून पोटातल्या बाळासह प्रचंड वेगात धावत असलेली मुलगी तुला दिसते की, जिलाही गरज आहे मदतीच्या हाताची, आश्वासक शब्दांची... पण ते शब्द तिला कधी मिळालेच नाहीत. त्यामुळे आपल्या आईने ही लग्न नावाची झूल फेकून द्यावी अन् स्वतःसाठी जगावं, असं तुला पदोपदी वाटूनही आई मात्र स्वतःचं अस्तित्व विरघळवून तिच्या गोतावळ्यात रमलेली बघून तुला खूप प्रश्न पडायचे, ज्या प्रश्नांची उत्तरं मिळवायला तुला आईच्याच वेगाने धावावं लागलं.

वडिलांची सततची मारहाण सहन करणाऱ्या आईचं त्याच काळात नागरी हक्काच्या लढ्यात सहभागी होऊन जेलमध्ये जाणं; स्वतःचं नाव बदलणं, अशा असंख्य आठवणी तुला सतत गोंधळवतच राहिल्या. अर्थात वेळ पडली तर रडूबाईसारखं रडत न बसता जशास तसा ठोसा द्यायला सांगताना ‘किती काळ घाबरून पळशील’ असं सांगणाऱ्या आईचं ते योद्धा रूपही तुला कायमच भुरळ घालायचं, हेही तितकंच खरं!

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

वयाच्या पंधराव्या वर्षीच घर सोडून पळत सुटलेल्या आई-बापांच्या पोटी जन्माला येण्यापासूनच त्यांच्याचसारखं प्रचंड राग पोटात घेऊन पळणं तुलाही अटळ होतं. कदाचित तेच तुमच्या जगण्याचं इंधनही होतं. तुझ्या बालपणीच्या आठवणी वाचताना प्रचंड गलबलायला होतं ग. सर्व बाजूंनी आघात करणारं, एकटं पाडणारं जग आणि त्यात भर म्हणून रोजरोजची आई-बापांची रक्तरंजित भांडणं, यांनी तुझं सारं बालपण होरपळून निघालं. वर्षानुर्षांचं दडपलेपण, प्रचंड शोषण आणि अतृप्त स्वप्न उराशी बाळगून जगण्याशी दोन हात करणाऱ्या आई-बापांच्या पोटी जन्माला येण्याची प्रचंड किंमत मोजतानाही तू त्यांच्याविषयी कधीच कडवट होताना दिसत नाहीस, हेही खरंच थक्क करणारं आहे.

‘गरीब आणि काळी म्हणून सतत हेटाळणी करणाऱ्या, चिडवणाऱ्या जगाने टाकून दिलेलं, झिडकारलेलं आयुष्य जगायचं, की काहीतरी वेगळं होऊन दाखवायचं, हे तुझं तू ठरव’ हा तुझ्या वयाच्या पाचव्या वर्षी मोठ्या बहिणीने दिलेला कानमंत्र तुझ्याही नकळत तुझ्या आयुष्याचं ध्येयवाक्य कधी झालं, ते तुलाही कळलं नाही. काहीतरी भव्यदिव्य करणं; काहीतरी मोठं होणं म्हणजेच ‘जिवंत राहणं’ हेच तुझ्या मनात ठाम बसलं! मोठ्या बहिणीमुळे सतत नवं शोधत राहणं; निर्माण करणं; आकारत राहणं हा जणू तुझा छंदच झाला. याविषयी बोलताना तू सहजतेनं म्हणून जातेस की, या साऱ्या प्रवासात जणू ती तुझी अदृश्य सोबतीणच होती. कॉलेज, ज्यूलीअर्ड, ब्रॉडवे स्टेजेस किंवा एमी, ऑस्कर, टोनी या पुरस्कारासाठीची नामांकनं, हे सारं काही अगदी त्या अस्तित्वाच्या संघर्षातूनच जणू आकारलं असावं...

काहीतरी मोठं करायचं, कोणीतरी मोठं व्हायचं म्हणजे नेमकं काय करायचं या तुला पडलेल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर देणाऱ्या सिसली टायसनविषयी तू कायमच ऋण बाळगलंस... तिला टीव्हीवर पाहूनच तुझ्या अभिनयाच्या ऊर्मीला धुमारे फुटले. याच ऊर्मीतून आपल्या बहिणींना सोबत घेऊन तुला नाटक करावंसं वाटलं. तुम्हा लहानग्यांच्या त्या नाटकाचं साऱ्यांनी खूप कातुक केलं, पण अगदी त्या आनंदाच्या क्षणीही तुला खूप खूप एकटं वाटत होतं... खरं तर केवळ त्या क्षणीच नव्हे, तर तुला कायमच सर्वत्र परकं वाटत राही…

आपल्या बापाच्या मारहाणीत एखाद्या दिवशी आपली आई मरणार तर नाही ना, या सततच्या भीतीने तू कायमच गोठलेली असायचीस. बऱ्याचदा उपाशीपोटी झोपावं लागणं आणि त्यात भरीस भर म्हणून आई-बापांच्या रात्रंदिवस चालणाऱ्या भांडणांमुळे, मारझोडीमुळे रात्रीची झोपही न मिळाल्याने तुला शाळेत दिवसभर झोपेची गुंगीच येत राहायची. आणि या साऱ्याचा अपरिहार्य परिणाम म्हणून की काय तुझ्या आत कोंडलल्या दुःखाचं, रागाचं रूपांतर शाळेमधल्या रोजच्या भांडणांत व्हायचं... अशा पद्धतीने भवतालाच्या पिंजऱ्यात करकचून अडकलेल्या तुझ्या जगण्यात फक्त एकच दिलासा होता. आणि तो म्हणजे तुझी लहान बहीण डॅनिली! तिच्या जन्मानंतर तुझ्या सुखदुःखांत तिची एक अबोल साथ तुला मिळाली. तिला सांभाळणं; तिला जपणं म्हणजे जणू स्वतःलाच जपणं आहे, अशा एका नव्याच जबाबदारीने तुझा ताबा घेतला. डॅनिलीच्या जन्माने जणू स्वतःच्या पलीकडे पाहायला शिकायची तुझी सुरुवातच झाली. तसंही ‘सिस्टरहूड’चं महत्त्व तुम्हा बहिणींना फार लहानपणीच कळून चुकलं होतं. तुम्हाला काहीही करून काहीतरी, कोणीतरी मोठं व्हायचं होतं. जिंकायचं होतं. जगण्याचा असा सतत दृश्य-अदृश्य संघर्ष सुरू असतानाही तुम्हा बहिणींच्या पहिल्यावहिल्या नाटकाच्या यशाने मात्र तुझ्यातल्या अभिनयाच्या ठिणगीला सतत चेतवतच ठेवलं.

आई-वडिलांच्या सतत सुरू असलेल्या भांडणाच्या कटू अनुभवांपासून दूर जाण्यासाठी तुम्ही सतत नवनवीन काल्पनिक खेळ शोधून काढले. तुम्हा बहिणीच्या ‘हॉट शॉट म्युझिक बँड’मध्ये खरं तर ना वाद्यं होती, ना गाणी, पण त्यामुळे सर्व दुःखांपासून दूर नेणाऱ्या एका जादूई दुनियेत शिरायचा मार्ग मात्र तुम्हाला सापडला होता.

वडिलांचं दारुडेपण, कौटुंबिक हिंसा, पराकोटीचं दारिद्र्य, त्यासोबत येणारी भूक अन प्रचंड एकटेपण, या साऱ्या दुष्टचक्रातून कायमची सुटका व्हावी, असं तुला जीव तोडून वाटत होतं... पण यातून सुटका कशी करून घ्यायची, हे मात्र तुला कळत नव्हतं. शेवटी नेहमीप्रमाणे स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेऊन तू सारं सारं पुसून टाकायचा प्रयत्न करत राहायचीस. तुझ्या बाथरूमच्या गुहेत तू करत असलेल्या नवनव्या प्रयोगातल्या अशाच एका खेळात तुला तुझ्या शरीराची चौकट ओलांडता येण्याचा तो सुंदर क्षण सापडला... स्वतःच्या देहाबाहेर पडून वरवर, अगदी छतापर्यंत पोहचून तिथून स्वतःच्या शरीराकडे, स्वतःच्या आरपार पाहण्याची जादूई युक्ती तुला सापडली अन् त्याच क्षणी, अगदी त्याच क्षणी एका अमर्याद मोकळेपणाचा अनुभव तुला प्रथमच घेता आला. स्वतःच्या देहाच्या पिंजऱ्यातून, दुःखी एकाकी व्हायोलातून बाहेर पडता येण्याचा हा क्षण तुझ्यासाठी प्रचंड मोठा मुक्ततेचा क्षण होता... या लोकविलक्षण मुक्तिदायी अनुभूतीतूनच तुला कदाचित अभिनयात फार महत्त्वाचं मानलं जाणारं, भावनिक ताटस्थ्य राखून केलेल्या परकायाप्रवेशाचं सामर्थ्य फार ताकदीनं गवसलं असावं!

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

एव्हाना तुला मिस टायसनसारखं एक मोठी अभिनेत्री व्हावंसं वाटू लागलं होतं. अभिनयातल्या परकायाप्रवेशामुळे स्वतःच्या सर्व सुखदुःखांपलीकडे जाता येऊन, स्वतःच्या जखमा भरून आणणारं एक वेगळंच शस्त्र आणि शास्त्र तुला गवसू लागलं होतं. इतकी वर्षं आत साठलेल्या, दडपलेल्या ऊर्जेचा आपल्या अभिनयातून निचरा करता करता, स्वतःच्या शोधाला आकार देण्यासाठी तू ‘अपवर्ड बाउंड’ या सहा आठवड्याच्या उन्हाळी शिबिरात सहभागी व्हायचं ठरवलंस. या ठिकाणी प्रचंड भयंकर अशा वेगवेगळ्या स्थितिगतीतून आलेल्या मुलामुलींची दुःखं पाहिल्यानंतर तुझा स्वतःकडे, स्वतःच्या परिस्थितीकडे बघण्याचा दृष्टीकोनच पार बदलला.

‘अपवर्ड बाउंड’मध्ये जात-धर्मपंथ-वंश अशा कोणत्याही भिंतींना स्थान नव्हतं. तिथे आलेली सर्व मुलं वेगवेगळ्या वंशांची तर होतीच, पण हृदय पिळवटून काढणारी प्रत्येकाची अशी एक जीवघेणी कहाणी होती. प्रत्येकाचा संघर्ष आगळावेगळा होता. प्रत्येक जण आपापला क्रूस घेऊन आपला मार्ग शोधताना दिसत होता. हे सारं पाहून स्वतःच्या अडचणी तुला खुज्या वाटू लागल्या आणि आपल्या भवतालाच्या सुखदुःखाशी अभिनयाच्या माध्यमातून जोडून घेण्याचं नेमकं तंत्र तुला गवसलं. अभिनयातून, आपल्या भावभावनांच्या विरेचनातून मिळणारा आनंद हा आपल्या आत्मशोधाला पूरकच आहे, हे लक्षात आल्यावर तुझा खरा शोध सुरू झाला. या शोधातूनच मियामीच्या ‘आर्ट रेकग्निशन अँड टॅलेंट सर्च कॉम्पीटिशन’मध्ये बाराशेजणांमधून तुझी निवड होऊन तू तुझ्या अभिनयाचा ठसा उमटवलास आणि तिथूनच तुझ्या खऱ्या अभिनयप्रवासाची सुरुवात झाली.

वयाच्या सतराव्या वर्षी घर सोडून ऱ्होड आयलँड कॉलेजला अ‍ॅडमिशन घेतल्यावर कोणत्याही परिस्थितीत डिग्री मिळवायचीच, ही एकच गोष्ट तुझ्या मनात पक्की होती. डिग्री मिळाली नाही तर आपल्या आई-बापांसारखं प्रचंड अभावांनी भरलेलं भणंग जगणं आपल्या वाट्याला आल्याशिवाय राहणार नाही, या कटू वास्तवाची तुला पक्की जाणीव होती. तुझं आई-वडिलांवर नितांत प्रेम असलं तरी त्यांच्या पराकोटीच्या दारिद्रयाचं, वडिलांच्या नशेबाजपणामुळे घरात होणाऱ्या हिंसेचं, अत्याचाराचं प्रचंड भय तुझ्या मनात होतं. त्यामुळे एकतर जिंकायचं किंवा मरायचं, या दोनच गोष्टी नजरेसमोर ठेवून तू स्वतःला झोकून दिलं होतंस.

मुळात तुझ्या आयुष्यातल्या नकारात्मक अनुभवांचं गाठोडं एवढं मोठं होतं की, कोणत्याही परिस्थितीत यश मिळालंच पाहिजे, या दडपणाखाली तुझी प्रचंड घुसमट होत होती. दिवसेंदिवस वाढणाऱ्या या डिप्रेशनमधून बाहेर पडायचा तुझ्यासमोर एकच मार्ग होता आणि तो म्हणजे कितीतरी वर्षं मनाच्या तळाशी जपलेल्या अभिनेत्री होण्याच्या स्वप्नाला प्रत्यक्षात उतरवण्याचा दृढनिश्चय करणं!

कॉलेजात तुझा मित्र-मैत्रिणींचा गोतावळा तसा बराच मोठा होता; परंतु कितीही गर्दीत किंवा जवळच्या माणसांमध्येही तुला लहानपणापासूनच जे कायम एकटं, परकं वाटायचं, ते कॉलेजात भरपूर मित्र-मैत्रिणी मिळाल्यावरही संपलं नाही. कॉलेजातल्या केवळ गोऱ्या मुलांसोबतच नव्हे, तर काळ्या मुलांसोबतही तुला जुळवून घेता येत नव्हतं. खरं तर तुला कुणाशी जुळवून घेता येत नव्हतं, असं म्हणण्यापेक्षाही तीव्र रंगभेदाच्या भिंतींमुळे गोऱ्यांमध्ये जसा तुझा सहज स्वीकार नव्हता, तसाच काळ्यांमध्येही. त्या त्या प्रांतांचे, रंगछटांचे गटतट असल्याने तिथेही उपरेपणाच होता.

गोऱ्यांच्या रंगद्वेषापेक्षाही काळ्यांनी आपापल्या भुऱ्या, निमगोऱ्या, सावळ्या अशा वेगवेगळ्या रंगछटा मिरवत आपापसात भेदभाव करणं तर तुला जास्तच घायाळ करत होतं. अशा साऱ्या प्रतिकूल वातावरणात खूपदा उपाशी-तापाशी राहून दोन वेळच्या जेवणासाठी तुला सतत नोकरी करणं अपरिहार्यच होतं. अगदी शालेय जीवनापासून ते कॉलेजच्या काळातही तुझी नोकरी कधी सुटली नाही. गोठवणाऱ्या कडाक्याच्या थंडीतही वेगवेगळ्या बसेस बदलत तू दोन वेळच्या जेवणाच्या भ्रांतीमुळे अखंड नोकरीसाठी फिरत राहिलीस. या प्रचंड कष्टाविषयी विचार करताना तुला सतत एक गोष्ट जाणवत राहिली- ती म्हणजे एखाद्या वेडाने, प्रेमाने आणि उत्साहाने झोकून देऊन काम करणं वेगळं आणि एखाद्या अभावाच्या, उणिवेच्या जाणिवेने कष्ट करणं, हे कधीही आनंददायी असू शकत नाही.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

ऱ्होड आयलँड कॉलेजात वंशभेदाचं वातावरण बऱ्यापैकी तीव्र होतं. जवळपास नऊ हजार विद्यार्थ्यांमध्ये सर्व गोरे विद्यार्थी सोडले, तर जास्तीत जास्त एक टक्का इतर म्हणजे हिस्पॅनिक, एशियन, ब्लॅक, मिडल इस्टर्न असे विद्यार्थी होते. या साऱ्या पसाऱ्यात हरवलेल्या तुला तुझा मार्ग शोधायचा होता. त्या दृष्टीने तू अभिनयावर लक्ष केंद्रित करायचं ठरवून नाट्येइतिहास, नाट्यसमीक्षा, नाटकांतील पात्रांचा, पात्रागणिक बदलणाऱ्या आवाजातील आरोह-अवरोहांचा एकूणच नाटकाशी संबंधित सर्व घटकांचा सूक्ष्म अभ्यास सुरू केलास. पण हे सारं करताना अभिनयक्षेत्रात मोठी कारकीर्द घडवण्यासाठी मात्र ऱ्होड आयलँड कॉलेजमधून पुढचा कोणताही मार्ग नाही, याची तुला स्पष्ट जाणीव झाली होती.

लहानपणापासून तू जे भयंकर जगलीस; तू जे अनुभवलंस त्याचंही एक फार मोठं ओझं तुझ्या मनावर कायम होतं. तुझी इच्छा नसतानाही या साऱ्या प्रवासात त्या ओझ्याची तुला कायमच सोबत होती. थिएटर करताना संपूर्ण स्टेज जिवंत करणारी तू थिएटरच्या बाहेर मात्र प्रचंड अवघडलेली, लाजरीबुजरी, आत्मकेंद्री, कुणाशीही संवाद न साधणारी, आपल्याच कोषात गुरफटलेली अशी होतीस. त्यामुळे तुझ्या शरीरातच जणू नसावीस, अशा पद्धतीने तू एका प्रचंड दडपणाखाली धावत होतीस. सतत वेगवेगळ्या क्लृप्त्यांनी हजारो व‌र्षांचं ओझं असलेलं आपलं ‘ब्लॅक’ असणं पुसायचा तू प्रयत्न करत होतीस. या साऱ्या गोंधळातही अत्यंत जिद्दीने तू पाच वर्षांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलंस, त्या वेळी तुझ्या पदवीदान समारंभाला तुझ्या आजीसह सारे कुटुंबीय हजर होते. ज्या क्षणाची तू इतकी वर्षं आतुरतेने वाट पाहत होतीस, त्याची स्मृती तुझ्या मनात कायमसाठी कोरली गेली.

ऱ्होड आयलँड कॉलेजमधून पदवी मिळाल्यानंतर थोड्याच दिवसात न्यूयॉर्कमधील ‘सर्कल इन द स्क्वेअर थिएटर’मध्ये सहा आठवड्यांच्या उन्हाळी शिबिरासाठी तुझी निवड झाली. अर्थात हे सारं काही फार सोपं नव्हतं. हे सारं करताना पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी वेगवेगळ्या फॅक्टऱ्यांमध्ये अगदी कामगार म्हणूनही तू छोट्या-मोठ्या नोकऱ्या केल्यास. कारण कोणत्याही परिस्थितीत व्यावसायिक अभिनेत्री व्हायचं मनोमन जपलेलं तुझं स्वप्न तुला पूर्ण करायचं होतं!

तुझ्या या स्वप्नाला न्यूयॉर्कमधील वास्तव्यात खऱ्या अर्थाने गती मिळाली. तुझ्या आयुष्यातले उत्तम शिक्षक आणि अभिनयाचं उत्तम शिक्षण तुला तिथे मिळालं. देशभरातल्या वेगवेगळ्या प्रांतांतून आलेल्या शंभर विद्यार्थ्यांमध्ये तू सहभागी झालीस. तुझ्या तीस जणांच्या ग्रुपला वेगवेगळ्या विषयांवरचे नाट्यप्रवेश सादर करावे लागत. त्यासाठी तुमच्या सततच्या चर्चा, सराव असा संपूर्ण वेळ फक्त नाटक आणि नाटक याच विषयाला वाहिलेला असे. या साऱ्या अनुभवांना कवेत घेत तुझा स्वतःशीच अखंड संघर्ष, संवाद, शोध सुरू होता. ज्यामुळे तुझ्या भूतकाळाच्या जखमांना भरून निघायला मदत तर होतच होती, किंबहुना खऱ्या अर्थाने तुझं जगणं आता सुरू झालं होतं.

या सहा आठवड्यांच्या शिबिराच्या शेवटी सर्व शंभर विद्यार्थ्यांमधून शिबिर आयोजकांकडून थिएटर करण्यासाठी फक्त एका विद्यार्थ्याची निवड करण्यात आली आणि ती म्हणजे तुझी. पण एव्हाना तुला तुझा नेमका मार्ग कळला होता. कोणत्याही परिस्थितीत तुला आई-वडिलांकडे सेंट्रल फॉल्सला परत जायचं नव्हतं, तर तुझी व्यावसायिक अभिनयाची कारकीर्द सुरू करायची होती. यासाठी तू जीव तोडून प्रयत्न करत होतीस. अभिनयाची कारकीर्द घडवण्यासाठी ज्यूलीअर्डला जाण्यापूर्वी एका वर्षाच्या गॅपमध्ये स्वतःला सर्वार्थाने घडवण्यासाठी तू झोकून दिलंस.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक  : ‘मोदी महाभारत’

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

वयाच्या एकविसाव्या वर्षी ‘टर्नर्स कम अँड टर्नर्स गो’ या नाटकातून तुझी व्यावसायिक अभिनेत्री म्हणून सुरुवात झाली. याच दरम्यान तुला ज्यूलीअर्डला प्रवेश मिळणं आणि केथ डेव्हिड आयुष्यात येणं, या दोन महत्त्वाच्या घटना तुझ्या आयुष्यात घडल्या. डेव्हिडसोबत तुझं कलासक्त जगणं सुरू होतं, पण तरीही, ‘आहे मनोहर तरी...’ अशा घुसमटीत राहूनही तू एक दिवस सगळं छान होईल, या क्षणाची जीव तोडून वाट पाहत होतीस. डेव्हिड कलावंत म्हणून कितीही ग्रेट असला तरी आपल्यावर जीव टाकणारा तो एक चांगला बॉयफ्रेंड नाही, हे तुझ्या लक्षात यायला तब्बल सात वर्षं गेली. या दरम्यानच्या प्रचंड भावनिक अस्वस्थतेच्या काळातही वेगवेगळ्या फेस्टिव्हल्सच्या नाटकांमध्ये कामं करत तू स्वतःचा अखंड शोध सुरूच ठेवला होतास.

ज्यूलीअर्डमध्ये प्रवेशाच्या वेळी तुझ्या ग्रुपमध्ये तुझ्यासोबत अठरा विद्यार्थी होते; ज्यातले चार जण वर्ष संपायच्या आतच वेगवेगळ्या कारणांनी बाहेर पडले. ज्यूलीअर्डमध्ये सकाळी आठ वाजता सुरू झालेलं प्रशिक्षण रात्री अगदी उशिरापर्यंत चाले- ज्यामध्ये उच्चार, आवाजातील आरोह-अवरोह, शारीरिक हालचाली, दृश्याचा अभ्यास, अॅलेक्झांडर टेक्निक- ज्यामध्ये कोणत्याही तणाव व चिंतेशिवाय अभिनय कसा करावा, अशा अनेक गोष्टी शिकवल्या जात. ज्यूलीअर्डमध्ये दृश्यमाध्यमातील घटकांचा परिचय विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी मोठमोठे प्रसिद्ध अभिनेते, संवादलेखक, तंत्रज्ञ म्हणून मुख्यत्वे गोऱ्या मंडळींनाच बोलावलं जाई.

विशेष म्हणजे ज्यूलीअर्डमधल्या नृत्य, नाट्य, संगीत अशा विविध ज्ञानशाखांमध्ये प्रवेश घेतलेल्या एकूण आठशे छप्पन्न मुलांमध्ये फक्त तीस मुले ‘ब्लॅक’ होती. जी स्वतःला ‘ब्लॅक कॉकस’ म्हणवून घेत. त्यांच्यासमवेत मार्टिन ल्यूथर किंग सोहळ्यात सादरीकरण करताना संपूर्ण कृष्णवर्णीय समूहाचा इतिहास, काळ्यांचं सारं जगणं, किंबहुना तुझंच सारं जगणं त्या प्रयोगातून साकार करताना तुला विलक्षण समाधान मिळालं. ज्युलीअर्डमधल्या प्रशिक्षणात कलावंताने काम करताना ‘स्व’ विसरून एका कलात्मक अस्तित्वाला जन्माला घालावं, या विचाराला फार महत्त्व दिलं जात असलं, तरी संपूर्ण सादरीकरणावर गोऱ्यांच्याच विचारांचा प्रभाव असे किंवा एकूणच त्यांच्याच संस्कृतीचं कळत-नकळत सबलीकरण होताना दिसत होतं, ते ब्लॅक कलावंतांना फारसं पटत नव्हतं.

अर्थात असं असलं तरी या साऱ्या वातावरणामुळेच स्वतःच्या ‘काळेपणा’च्या शक्तीची नेमकी जाणीव तुला झाली, असं तुझ्या मनात येई. काळेपणामुळे वाट्याला आलेला टोकाचा तिरस्कार आणि त्यापासून सतत स्वतःचा बचाव करणं, यातच तुझं सार लहानपण वाया गेलं, तर कॉलेजात सतत स्वतःला सिद्ध करण्यात तुझी सर्व शक्ती खर्च होत राहिली. तरीही एक गोष्ट मात्र निश्चित घडली होती. ती म्हणजे ज्यूलीअर्डमध्येच तुला तुझा खरा आवाज गवसला!

तुझ्यातली ही काळेपणाची जिवंत धग पाहूनच दर वर्षी तुला मार्टिन ल्यूथर किंग सोहळ्याच्या आरंभाचं भाषण करायची संधी मिळे. या पहिल्या सोहळ्यातच तू सांगितलीस कायमच कैदेतून निसटू पाहणाऱ्या कॅरेबियन बेटावरच्या काळ्या गुलामाची कथा... जो इतका शक्तिमान होता की, त्याला कुणाच्याही बंधनात राहायला आवडत नसल्याने तो कैदेतून सतत पलायन करायचा. प्रत्येक वेळी पलायन केल्यावर तो सापडला की, त्याला प्रचंड मारहाण केली जाई, पण त्याचं पळणं काही थांबत नव्हतं. शेवटी त्याचं पळणं कायमचं थांबवण्यासाठी त्यांनी एका दुसऱ्या गुलामाला मारायचं ठरवलं. त्या मेलेल्या गुलामाचं शरीर या शक्तिमान गुलामाच्या पाठीवर करकचून बांधण्यात आलं. तशाच पाठीवर प्रेत बांधलेल्या अवस्थेत त्यानंतर त्याला कायम तळपत्या उन्हात दिवसभर आणि रात्रीदेखील सतत कामाला जुंपलं गेलं. हळूहळू पाठीवरचं प्रेत सडून झडू लागलं. त्या भयंकर दुर्गंधीने या शक्तिमान गुलामाची भूक हळूहळू मरू लागली. हळूहळू त्याचं शरीर संसर्गग्रस्त होऊन तो मृत्यू पावला...

कथा संपताच शांत पण ठाम स्वरात तू श्रोत्यांना प्रश्न विचारायचीस की, ‘आपल्या पाठीवरही असंच प्रेत करकचून बांधलंय असं किती काळ्यांना अनुभवायला येतंय? किती जण अशा जीवघेण्या सांस्कृतिक ओझ्याच्या दडपणाखाली भणंगपणे जगता जगता झगडताहेत?’ पराकोटीच्या शांततेत तुझे प्रश्न विरून जात. तुझ्या साऱ्या आयुष्याला पोखरणाऱ्या वर्ण-वंशभेदाच्या वाळवीवर तुझे प्रश्न तीव्रतेने आघात करत होते. माणसाच्या शोषणाला पूरक अशा कोणत्याही गोष्टीला तुझा निक्षून विरोध होता.

याच दरम्यान क्रीस वर्ल्ड या मैत्रिणीच्या ग्रूपबरोबर तुला पश्चिम आफ्रिकेतल्या गँबियाला जाण्याची संधी मिळाली. वयाच्या पंचविसाव्या वर्षीच्या या आफ्रिका वारीने एका नव्या अर्थाने तुझं जुनं आयुष्य संपुष्टात येऊन जणू आयुष्याची एक नवी सुरुवात झाल्याचा अनुभव तुला मिळाला. ज्यूलीअर्डमध्ये तुझ्या मनात सुरू असलेल्या सर्व तात्त्विक प्रश्नांची जणू तुला उत्तरं मिळाली. गँबियातल्या मुक्त, निकोप जगण्याच्या अनुभवातून मिळालेल्या पुंजीने तिसऱ्या वर्षाच्या सादरीकरणात तू तुझा एकपात्री प्रवेश सादर केलास आणि ज्यूलीअर्डमधून ग्रॅज्युएट व्हायच्या आतच चित्रपटात काम करण्यासाठी तुला एका नामांकित एजंटकडून साईन करण्यात आलं... कोणतंही काम न मिळता ऱ्होड आयलँडला परत जाणं म्हणजे मृत्यूला सामोरं जाणं आहे, असं तुला वाटत असल्याने तुला कोणत्याही परिस्थितीत काम हवं होतं आणि ज्यूलीअर्डमधून बाहेर पडायच्या आत तुला निदान एजंट मिळाला होता.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची वार्षिक वर्गणी (५००० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

................................................................................................................................................................. 

ज्यूलीअर्डमधून बाहेर पडल्यावर अभिनयाच्या संधी मिळवून देणारा प्रसिद्ध एजंट मिळूनही दुर्दैवाने तुला कामं मिळत नव्हती. त्या वेळी आयुष्यात केवळ कलात्मक समाधान मिळवणं हेच महत्त्वाचं नाही, तर त्यासोबत जगण्याची भ्रांत मिटणं हेही तितकंच महत्त्वाचं आहे, या कटू सत्याची तुला स्पष्ट जाणीव झाली. अशा परिस्थितीत तुला जी काही कामं मिळाली, ती तुझ्या काळेपणाच्या चौकटीला साजेशीच होती. प्रत्येक ऑडिशनला तुझा काळा रंग तुला आडवा येऊ लागला. अशा पद्धतीने तुझा मार्ग शोधताना मोठी, महत्त्वाची भूमिका मिळणं हे उद्दिष्ट बाजूला पडून ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ या वळणावर तू पोहचलीस. तसा अगदी लहानपणापासूनच तुझा अस्तित्वाचा संघर्ष सुरू होता. या साऱ्या धडपडीत तुला लॉईड रिचर्डस् दिग्दर्शन करत असलेल्या ‘सेव्हन गिटार्स’मध्ये भूमिका मिळाली. ही तुझ्या आयुष्यातली खऱ्या अर्थाने पहिली महत्त्वाची भूमिका होती. ब्रॉडवेत काम करताना ग्लॅमरबरोबरच कामाचं मिळणारं समाधानही तुझ्या दृष्टीने फार महत्त्वाचं होतं. तुझ्या आयुष्यात अभिनेत्री म्हणून समृद्ध होण्यात ‘सेव्हन गिटार्स’चा फार मोठा वाटा तू कायमच मानलास!

लहानपणी शाळेत असताना दरवर्षी जो टोनी पुरस्कार सोहळा तू फार उत्साहात पाहायचीस, त्याच सोहळ्यातलं या वर्षीचं ‘टोनी नॉमिनेशन’ तुला मिळालं! तुझ्या आयुष्यातला तो पहिला पुरस्कार सोहळा होता. वर्षभर ‘सेव्हन गिटार्स’ वेगवेगळ्या शहरांतून सादर केलं जात होतं आणि त्याच वेळी आर्थिक मदतीबाबत घरच्यांच्या तुझ्याकडून अपेक्षा मात्र वाढतच जात होत्या... त्यांची ओझी तुझी ओझी होत होती... त्यांच्या अवास्तव अपेक्षांना कसा नकार द्यावा ते तुला कळत नव्हतं... त्या भयंकर दुष्टचक्रात तू भरडली जात होतीस. प्रचंड कष्ट करत होतीस; टीव्ही, फिल्म यासाठी ऑडिशन देत वणवण फिरत होतीस, पण तुला हवा असलेला ड्रीम रोल मात्र तुला मिळत नव्हता. निराशेने घेरलेली असतानाही तुझ्यातल्या लहानग्या व्हायोलाची मात्र सतत धडपड सुरूच होती. सर्व वेदना उराशी कवटाळून ती अखंड धावतच होती....

...आणि एक दिवस अशाच एका ऑडिशननंतर तुला तुझ्या एजंटचा फोन आला आणि तुला कळलं की, स्टिव्हन सोडरबगच्या ‘आऊट ऑफ साइट’ या चित्रपटात तुला काम मिळालंय म्हणून! त्यानंतर थोड्याच दिवसांत एचबीओ मुव्हिजच्या ‘द पेण्टॅगॉन वॉर्स’ तसंच ‘आऊट ऑफ साइट’ या चित्रपटांमध्येही तुला काम मिळालं. ही कामं करत असतानाच तुझी थेरपिस्ट तुझ्यातल्या व्हायोलाशी संवाद साधत होती. कारण अजूनही तुझ्यातलं अवघडलेपण तुला स्वास्थ्य मिळू देत नव्हतं. आठ वर्षाची व्हायोला आजही तशीच अनेक दडपणाखाली पळत सुटली होती. त्यात भरीस भर म्हणून तुझ्या तब्बेतीच्या तक्रारी तुला अस्वस्थ ठेवत होत्या... तुझी थेरपिस्ट तुझ्यातल्या छोट्या व्हायोलाला समजून घेण्यासाठी तुला वेगवेगळे मार्ग दाखवत होती. तुला कामं मिळायला सुरुवात झाल्यावरही तुझी अस्वस्थता संपत नव्हती. खरं तर तुला आता वणवण फिरायचा कंटाळा आला होता. शांतपणे जगता येईल असं घर तू शोधत होतीस.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची अर्धवार्षिक वर्गणी (२५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

लहानपणी गुडघे टेकवून तू जशी प्रार्थना करायचीस तशी तू आकाशातल्या बाप्पाकडे कळवळून प्रार्थना करत होतीस आणि बरोबर तीन आठवड्यांनंतर ‘सिटी ऑफ एंजल्स’च्या सेटवर तुझी ज्यूलिअस टेननशी भेट झाली. तुझ्या प्रार्थनेतलं माणूस साक्षात तुझ्यासमोर उभं होतं. ‘सिटी ऑफ एंजल्स’च्या पब्लिसिटीपासूनच व त्यानंतरच्या प्रत्येक क्षणात ज्यूलिअस तुझ्यासोबत कायम भक्कमपणे उभा राहिला. ज्यूलिअसच्या येण्याने तुझ्या आयुष्यात खऱ्या अर्थाने समाधान निर्माण झालं. ज्यूलिअसच्या रूपाने तुझ्यावर पराकोटीचं प्रेम करणारा, तुला सर्वार्थाने समजून घेणारा जोडीदार मिळाल्याने तुझ्यातल्या छोट्या व्हायोलालाही आता पळावं लागणार नव्हतं. हळूहळू तुझं आयुष्य स्थिरस्थावर झालं. वयाच्या अठ्ठाविसाव्या वर्षी ज्यूलीअर्डमधून ग्रॅज्युएट झाल्यावर तू करिअरला सुरुवात केलीस अन् बरोबर दहा वर्षांनंतर वयाच्या अडतिसाव्या वर्षी ज्यूलिअससोबत लग्न ठरलं, त्या वेळीही तुझी ‘फार फ्रॉम हेवन’ आणि ‘सोलारीस’ या चित्रपटांची कामं सुरूच होती.

या साऱ्या प्रवासात आपलं सारं आयुष्य आपण घडवू शकतो; त्याला हवा तसा आकारही आपण देऊ शकतो, या सत्याचा शोध तुला लागला. अर्थात यासाठी भूतकाळाचं भूत सोडावं लागतं, हे तुला आता उमगलं होतं. याच काळात तुझ्या वडिलांच्या वागण्यातही खूप हळुवार बदल होत गेला. ते अधिकाधिक प्रेमळ होत गेले. त्यांच्या मृत्यूच्या क्षणी तुला मनापासून वाटलं की, त्यांच्यासोबत तुझ्या हृदयाचाही एक भाग जणू कायमसाठी नाहीसा होतोय. पण तरी त्याच क्षणी तुला ही पण स्पष्ट जाणीव झाली की, आपल्या साऱ्या आयुष्याचा नेमका हेतू काय असेल, तर तो म्हणजे ते भरभरून जगणं.

वडिलांच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी म्हणजे २००८ साली ‘डाऊट’ या सिनेमापासून तुझा स्टेज अक्टर ते हॉलिवुड अ‍ॅक्टर असा प्रवास पूर्ण झाला. स्टेजवरच्या कामासाठी तुला टोनी अ‍ॅवॉर्ड मिळालं, तर वयाच्या बेचाळिसाव्या वर्षी ‘डाऊट’ या चित्रपटासाठी तुला बेस्ट सर्पोटिंग अ‍ॅक्ट्रेसचं ऑस्कर नॉमिनेशन मिळालं. याच काळात गोल्डन ग्लोब अवॉर्ड, स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड अवॉर्ड या पुरस्कार सोहळ्यांना तू ज्यूलिअससोबत हजेरी लावलीस. २००९ साली तुला प्रथमच ऑस्कर नॉमिनेशन मिळालं अन् याच दरम्यान तुझी सर्जरी पण झाली. त्यानंतर बरोबर दोन वर्षांनी तुझ्या आयुष्यातला निरागस आनंद असलेल्या जेनेसिसला तू दत्तक घेतलंस.

याच काळात तुला ‘द हेल्प’ चित्रपटात काम मिळालं; ज्यासाठी तुला प्रथमच फिमेल लीडसाठी ऑस्कर नॉमिनेशन मिळालं. या चित्रपटाच्या संपूर्ण निर्मितीप्रक्रियेत तुला प्रचंड आनंद मिळाला. पण याच काळात तुला एक विचित्र गोष्ट अनुभवायला आली. ती म्हणजे २०१२ साली ‘द हेल्प’ चित्रपटात बेस्ट अ‍ॅक्ट्रेससाठी नॉमिनेशन मिळूनही तुला मुख्य भूमिका असलेले चित्रपट मिळत नव्हते. तरीही तुझे अविरत प्रयत्न सुरूच होते. २०१२ साली जगातल्या शंभर प्रभावशाली व्यक्तींमध्ये ‘टाइम’ साप्ताहिकाने तुझ्या नावाचा समावेश केला. यापाठोपाठ २०१४ साली वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी ‘हाऊ टू गेट अवे विथ मर्डर’ या टेलिव्हिजन ड्रामासाठी तुला आऊटस्टँडिंग लीड अ‍ॅक्ट्रेससाठीचं एमी अवॉर्ड मिळालं. हे अ‍ॅवॉर्ड मिळवणारी पहिली आफ्रिकन-अमेरिकन अभिनेत्री म्हणून तुझं प्रचंड कौतुक झालं, पण या पुरस्काराचं महत्त्व त्याहीपलीकडे आहे, असं तुला मनापासून वाटत होतं.

अगदी लहानपणापासून तुझ्या संपूर्ण अस्तित्वाला वेढून असलेली ‘कृष्णवर्णीय’ असण्याची गडद छाया तुझ्या स्टेज तसेच स्क्रीनवरच्या कारकिर्दीलाही तशीच वेटाळून असल्याचा तुला कायमच अनुभव येत गेला. पण याला अपवाद ठरली ती ‘हाऊ टू गेट अवे विथ मर्डर’मधली अ‍ॅनालिस किटिंगची भूमिका! ही भूमिका साकारताना तुझ्या अभिनयक्षमतेच्या सर्व शक्यता पणाला लागल्या. अमेरिकन टेलिव्हिजनवर अ‍ॅनालिस किटिंगच्या निमित्ताने प्रथमच एका वेगळ्या स्त्रीरूपाचं दर्शन दर्शकांना घडलं. या भूमिकेविषयी तुला पूर्ण वैचारिक स्पष्टता होती. तुझ्या मते अ‍ॅनालिस या पात्राचं वर्णन करताना सरसकट ‘सेक्सी’ हा शब्दप्रयोग न करता ‘सेक्शुलाइज’ हा शब्दप्रयोग वापरणं योग्य होईल. कारण ब्लॅक स्त्री आकर्षक असूच शकत नाही, अशा पारंपरिक सांस्कृतिक धारणेला या व्यक्तिरेखेच्या चित्रणाने फार मोठा धक्का बसला. मुळात ही व्यक्तिरेखा साकारताना चारशे वर्षांचं वंशभेदाचं राजकारण जोपासणाऱ्या, बुरसटलेल्या व्यवस्थेच्या संस्कारांचं जू तुला झुगारायचं होतं; स्वतःचं हजारो वर्षांचं एकटेपण झुगारायचं होतं, आणि भूतकाळाच्या या साऱ्या जखमा भरून आणण्यासाठी तुझं अभिनयकौशल्य हेच मोठं शस्त्र तुझ्याकडे होतं. अॅनालिसच्या अत्यंत गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखेतून अमेरिकेतल्या कृष्णवर्णीय स्त्रियांकडे पाहायचा, साऱ्या जगाचा दृष्टीकोनच जणू तू पूर्णपणे बदलायला निघाली होतीस. खरं तर तुझ्या अभिनयक्षमतेच्या सर्व शक्यता पणाला लावणाऱ्या या व्यक्तिरेखेतून जणू तूच स्वतःला नव्याने सापडत होतीस! या भूमिकेने तुझ्या मुक्ततेचा क्षण तुला गवसला आणि तुझ्यासाठी तेच फार महत्त्वाचं होतं!

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ची मासिक वर्गणी (५०० रुपये) भरणाऱ्यांना हे पुस्तक भेट म्हणून पाठवण्यात येईल. 

सवलत योजना फक्त १५ नोव्हेंबर २०२२पर्यंत.

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now

.................................................................................................................................................................

अगदी असाच आनंद तुला ‘फेन्सेस’ चित्रपटाच्या वेळी मिळाला. या साऱ्या प्रवासात तुला एक सत्य गवसलं, ते म्हणजे तुझ्या एखादी भूमिका खऱ्या अर्थाने समजून घेणं; ती भूमिका नेमकी आकळणं म्हणजे जणू आत्मशोधाच्या एका टप्प्यापर्यंत पोहचणं! तुझ्या प्रत्येक भूमिकेगणिक तू स्वतःला शोधत खूप खूप आत आत, स्वतःतच शिरत होतीस. तुझ्या आयुष्याचं एक ध्येय होतं. ज्यासाठी तू अहोरात्र झटत राहिलीस. ‘फेन्सेस’साठी तुला ऑस्करसोबतच गोल्डन ग्लोब अवॉर्डदेखील मिळालं. ऑस्कर, गोल्डन ग्लोब, टोनी असे महत्त्वाचे पुरस्कार मिळवणारी पहिली कृष्णवर्णीय अभिनेत्री म्हणून तुझं सर्वत्र कौतुक झालं. तुझ्या आयुष्यात प्रथमच तुला खऱ्या अर्थाने जिवंत असल्यासारखं वाटलं.

अर्थात हा सारा प्रवास अजिबात सोपा नव्हता. भुकेने, दारिद्र्याने, चिंतेने, भयाने, इतरांच्या सततच्या टोमण्यांनी, श्वासाश्वासाला उन्मळवून टाकणाऱ्या असंख्य कारणांनी जीवाच्या आकांताने लहानपणापासून सतत पळत सुटलेल्या छोट्या व्हायोलाला या साऱ्या प्रवासात असंख्य प्रश्न पडले होते. ज्याची उत्तरं मिळत नाहीत, म्हणून आकाशातल्या बाप्पाने आपल्याला या जगातून कायमचं घेऊन जावं, म्हणून लहानपणी तू कळवळून प्रार्थना केली होतीस. तुझी निरागस प्रार्थना त्याने ऐकली नाही, म्हणून त्या क्षणी तुला प्रचंड एकटं वाटलं होतं. पण खरं तर त्या क्षणापासूनच आपले सारे परतीचे दोर जणू पूर्ण कापले गेले आहेत, या भयाण जाणीवेने तुझ्या पळण्याला अधिकच वेग आला. ज्याच्यावर प्रचंड विश्वास ठेवला, असा तो अस्तित्वातच नाही, या भयाण सत्याने जणू त्याच क्षणाला तुझा आत्मा खुडला गेला. पुढील आयुष्यातल्या असंख्य उन्मळवणाऱ्या क्षणांना खरं तर या प्रसंगानेच तुला प्रचंड आत्मिक बळ दिलं. तुझ्या आत्मशोधाच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला नेलं!

म्हणूनच प्रिय व्हायोला, तुझा हा सारा प्रवास तुझा एकटीचा वाटतच नाही ग! तर तो धडपडणाऱ्या प्रत्येक बाईचा, तिच्यातल्या छोट्या व्हायोलाचा कधी होऊन जातो, ते कळतच नाही. म्हणूनच जगाच्या कानाकोपऱ्यांत बंद बाथरूमच्या गुहेच्या आत, जिथे जिथे भरून येणारे डोळे न पुसता, त्यांना घट्ट बंद न करता एखादी लहानगी स्वतःला शोधत धावत सुटेल, तिथे तिथे तू (की, ती स्वत:च?) मात्र तिला नक्कीच सापडशील; नव्हे नक्की भेटशील, याची मला खात्री आहे!

‘ऋतुरंग’ दिवाळी २०२२मधून साभार

............................

‘ऋतुरंग’ : संपादक - अरुण शेवते

पाने - २००

मूल्य - ३०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......