व्हॅलेंटार्इन, ‘कामसूत्र’ आणि लवजिहाद!
अर्धेजग - कळीचे प्रश्न
अलका गाडगीळ
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Wed , 15 February 2017
  • अर्धे जग कळीचे प्रश्न व्हॅलेंटार्इन डे Valentine Day लवजिहाद Love Jihad मनुस्मृती Manusmriti मनू Manu कामसूत्र Kamasutra वात्सायन Vatsyayana

डेटिंगसंबंधीच्या एका संकेतस्थळावर मजेशीर क्विझ सापडते.

प्रश्न : भारतातील सर्वांत लोकप्रिय असूनही अजिबात चर्चा केली जात नाही अशी गोष्ट कोणती?

उत्तर : सेक्स.

भारतातील प्रजनन दर प्रगत देशांपेक्षा अधिक असूनही प्रणयाराधनाच्या प्रांतात आपला टक्का घसरलेला असतो. पण आश्चर्य वाटायला नको, अनेक विरोधाभासांपैकी हा एक! अविवाहित प्रेमी युगुलांचं एकत्र राहणं वा सार्वजनिक स्थळावरील त्यांचं प्रणयाराधन समाजाला मान्य नसतं. ‘लव्हजिहाद’वालेच कशाला, अविविहित जोडप्यांना सहजासहजी भाड्यानं जागा मिळत नाही.

एका बाजूला व्हॅलेंटार्इन डे सारख्या ग्राहक संस्कृतीतील आविष्काराचा अंगीकार तर दुसऱ्या बाजूला विवाहपूर्व तरुण स्त्री-पुरुषांच्या प्रणयसाहसांचा धिक्कार करणारा आपला समाज अनेक अंतर्विरोधांनी भरलेला आहे. समाजाने लादलेल्या नीतीनियमांना छेद देत लग्नबंधनाच्या बाहेरील प्रेम आणि लैंगिकतेचा काही तरुणींचा शोध घेण्याचा प्रयत्न पितृसत्ताक नैतिक चौकटीला आव्हान देत आहे. लग्नामध्येही लैंगिक आणि भावनिक परिपूर्णता मिळवण्याच्या  आपल्या हक्काची जाणीव त्यांना होतेय. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झाल्यास प्रजननापलीकडील भावनिकता, प्रेम आणि सामायिक मूल्यांचा शोध त्या घेऊ लागल्या आहेत. पण समाज आणि कुटुंबव्यवस्था स्त्रियांच्या या शोधाला लागणारं अवकाश देण्यास मात्र असफल ठरताहेत.      

समाजाच्या जोखडातून मुक्त होऊ पाहणाऱ्या स्त्रीपुढे अनेक आव्हानं आहेत. व्हॅलेंटार्इन डे जमके साजरा करणारी, रात्री-बेरात्री पार्टीसाठी बाहेर पडणारी स्त्री ‘अव्हेलेबल’ असते, असं मानणाऱ्या पुरुषी मानसिकतेशीही तिला सामना करावा लागत आहे.

बंगळूरूच्या न्यू इयर पार्टीमध्ये हेच घडलं. गर्दीचा फायदा घेऊन सेलिब्रेशनमध्ये सामील झालेल्या स्त्रियांच्या शरीराला हात लावण्याचं धारिष्ट्य काही पुंडांनी दाखवलं. समाजाने त्यांना मर्दानी आणि आक्रमक व्हायला शिकवलं होतं. प्रेम आणि प्रणयाचे धडे हिंदी चित्रपट पाहून गिरवले असल्यास नवल वाटायला नको. लैंगिक छळ आणि पाठलाग म्हणजेच प्रियाराधन या बॉलिवुडच्या नीतीमूल्यांवर भारतीय पुरुष पोसला जातोय.

हक्कांची जाणीव झालेल्या स्त्रिया कुटुंबव्यवस्थेला तसेच सामाजिक-राजकीय व्यवस्थेला आव्हान देत असतात. ग्राहक-संस्कृतीलाही त्यांची अडचण होते. ‘लवजिहाद’सारखे उपक्रम म्हणूनच हाती घेतले जातात. 

महानगरापलीकडील भारतात मात्र स्त्री-पुरुष विभागणी अधिक पक्की असते. जातीधर्माच्या सीमा पार करून प्रेमात पडण्याचं कोणी धाडस केलं तर माफ केलं जात नाही, हे ‘सैराट’नं आणि सतत घडणाऱ्या ऑनर किलिंगनी दाखवून दिलं आहे. 

दोन वर्षांपूर्वी हिंदू महासभेनं सज्जड दम भरला होता... ‘ ‘व्हॅलेंटार्इन डे’ला मॉल, पब, रेस्तराँ आणि इतर सार्वजनिक ठिकाणी प्रणयी युगुलं दिसल्यास त्यांचं तिथल्या तिथं आर्यसमाज पद्धतीनं लग्न लावून दिलं जार्इल. हिंदू नसाल तर लग्न लावून देण्यापूर्वी तुमचं शुद्धीकरण केले जार्इल.’

व्हॅलेंटार्इन डे साठी प्रेमीयुगुलं तयारी करतात, तसंच हे प्रेमजिहादीही आपली आयुधं साफसूफ करतात!

लवजिहादचे वेगवेगळे अवतार देशभरात इथंतिथं धुमाकूळ घालत असले तरी मँगलोर शहरात मात्र हा प्रयोग गेली अनेक वर्षं सातत्यानं राबवला जातोय. कधी भूमिगत तर कधी उघड हल्लाबोल. भगवेकरणाची प्रयोगशाळा म्हणून मँगलोर का निवडण्यात आलं असेल? त्यासाठी लोकसंख्येची आकडेमोड समजून घ्यायला हवी. मँगलोरमध्ये ख्रिश्चन आणि मुस्लिमधर्मीय अनुक्रमे १४ आणि १८ टक्के आहेत. ख्रिश्चन आणि मुस्लिमांची राष्ट्रीय लोकसंख्येतील टक्केवारी अनुक्रमे ३ आणि १३ टक्के आहे. मँगलोरात हिंदू आहेत ६९ टक्के… म्हणजे हिंदूंच्या राष्ट्रीय टक्केवारीपेक्षा दहा टक्क्यांनी कमी. ही आकडेवारी उजव्या हिंदुत्ववादी गटांना नेहमी त्रास देणारी. (संदर्भ- सेन्सस २०११)

मँगलोरधील हमरस्ते, चौक, मॉल, कॉलेज कट्टे, पब्ज अशा साऱ्या स्थळांवर समाजविघातक गटांनी कब्जा केला आहे. मॉलमधून समजा एक मुलगा-मुलगी अभावितपणे एकत्र बाहेर पडले तरी क्षणार्धात त्यांना वास्तवाचं भान येतं. ते कावरेबावरे होऊन चोहीकडे नजर फिरवू लागतात. काही दिवसांपूर्वी मुलामुलींच्या घोळक्याला या मॉलमध्येच हटकण्यात आलं होतं. त्या प्रत्येक मुलामुलीच्या धर्माची विचारपूस करून सोडून देण्यात आलं, मात्र त्याआधी मुलींनी मुस्लिम मुलांना चार हात लांब का ठेवावं याविषयी प्रबोधनही करण्यात आलं.

त्याआधी २०१३ साली मँगलोर पोलिसांनी एका रात्रीच्या पार्टीवर धाड टाकून तरुण मुलामुलींना ताब्यात घेतलं होतं. बजरंग दलाच्या सांगण्यावरून ही कारवार्इ करण्यात आली, असा आरोप करण्यात आला. पोलिसांनी हा आरोप फेटाळला असला तरी ‘अपरिचित पुरुषांसमोर स्त्रियांनी नाचणं भारतीय संस्कृतीच्या मूल्यांत बसत नाही, कारवार्इ दरम्यान आम्ही पोलिसांसोबत होतो,’ असं बजरंग दलाच्या प्रदेशाध्यक्षांनी आपल्या मुलाखतीत सांगून पोलिसांची नाचक्की केली होती.

मँगलोरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तब्बल ४०,००० शाखा आहेत, शिवाय संघपरिवारातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू जागरण वेदिके आणि श्रीराम सेना यांच्या शाखांचं जाळंही आहेच. लवजिहाद, गोरक्षा आणि हिंदू संस्कृतीरक्षणासारख्या मोहिमा या संस्थाच्या कार्यांच्या केंद्रस्थानी असतात. मँगलोरची लोकसंख्या ४,८८,९६८ इतकी आहे. म्हणजे बारा माणसांमागे संघाची एक शाखा!

खजुराहो शिल्पं जिथं घडवली जातात, ‘कामसूत्र’ जिथं लिहिलं जातं, त्या संस्कृतीत ‘धर्मशास्त्र’ही लिहिलं जातं, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पुरुषानं पत्नीसोबत तिच्या प्रजननक्षम कालावधीतच शरीरसंबंध ठेवावेत, असं मनूने नमूद करून ठेवलं आहे. कायदे आणि नेमनियमांनी भरलेली ‘धर्मशास्त्र’ अनेकांनी लिहिली. त्यातील मनू, आपस्तंभ आणि वसिष्ठ ही प्रमुख नावं.

अंदाजे २००० वर्षांपूर्वी ‘कामसूत्र’ची निर्मिती केली गेली असं मानलं जातं. प्रतिगामी विचारांचा सामना वात्स्यायनालाही करावा लागला. तरीही अगदी सतराव्या-अठराव्या शतकापर्यंत ‘कामसूत्र’ लोकप्रिय होतं, चलनात होतं. आठव्या शतकातील भवभूतीच्या ‘मालतीमाधव’ या नाटकात ‘कामसूत्र’चा उल्लेख येतो. ‘पुरुषांचा आपल्या पत्नीसोबतचा प्रणयव्यवहार अती कोमल असावा, अन्यथा स्त्रियांना संभोगाचा तिटकारा वाटू लागतो, असं वात्स्यायनानं लिहून ठेवलं आहे’ असं एक स्त्री आपल्या मैत्रिणींना सांगत असते. लैंगिक जीवनात समाधान मिळत नसल्याने काडीमोड घेणाऱ्या स्त्रियांच्या संख्येत दुपटीनं वाढ झाल्याचं कुटुंब न्यायालयातील वकील सांगतात. हे का होतं आहे, हे सुज्ञांस सांगणं नलगे.

त्यानंतर मुघल काळातही ‘कामसूत्र’चा अभ्यास केला गेला याचे दाखले आहेत. औरंगजेबाच्या कवीमनाच्या दारा शुकोह या भावानं ‘कामसूत्र’वर एक टिपणी लिहिली होती. बाबर व जहांगीर यांनी या ग्रंथाचं पर्शियन भाषेतील रूपांतर सिद्ध केलं आणि त्याची सचित्र आवृत्ती तयार करण्याचं कामही कलाकारांना दिलं होतं. खजुराहो, कोणार्कचं सूर्यमंदिर, हंपीच्या विरुपाक्ष मंदिरांतील देवतेपेक्षा त्यांतील प्रणयशिल्पंच अधिक प्रसिद्ध आहेत. अकराव्या शतकापर्यंत बांधल्या गेलेल्या या मंदिरांत सेक्स रेखाटावासा वाटला, हे लक्षणीय आहे.

वात्स्यायनाने मनूच्या विचाराचं थेट खंडन केलं आहे. प्रजोत्पादनासाठी मैथून हा विचार त्याने मोडीत काढला. ‘कामसूत्र’संबंधी अनेक गैरसमज पसरले आहेत. त्यात संभोगासनांचं विवरण आहे हा गैरसमज खुद्द भारतातच आहे. विवाहपूर्व वा बाह्य प्रेम-प्रणयाला विरोध करण्याची आणि या भावनांचं विकृतीकरण करण्याची परंपरा आपल्याला लाभली आहे. फार तर लग्नाच्या चौकटीतच या भावनांचा विचार व्हावा, असा खुळचट विचार इथं पक्का रुजला आहे.

प्राचीन भारतातही प्रणय आणि कामुकतेसंबंधीचे दोन विचार प्रवाह दिसतात. मागास विचारप्रवाहाचं नेतृत्व मनूकडे जातं. प्रगत विचारप्रवाहाचं सुकाणू वात्स्यायनाच्या हाती होतं. 

वात्स्यायनाने काय सांगून ठेवलेय? केवळ प्रणयासाठी नव्हे तर माणूस म्हणून आपली जीवनदृष्टी, विचार आणि भावनाही उत्क्रांत करण्यावर त्याचा भर होता. लैंगिकतेमधील हिंसेवर त्याने बोट ठेवलं होतं आणि सुसंस्कृतता जोपासण्याचे अनेक मार्ग सुचवले आहेत. मैथुनात स्त्रीची केवळ संमती पुरेशी नाही, याचंही सूचन त्याने अनेकवार केलं आहे. स्त्री-पुरुषांच्या अनेकांशी असणाऱ्या संबंधांबद्दल, समलिंगी संबंधांबद्दल ‘कामसूत्रा’त ताशेरे ओढलेले नाहीत. संभोगाचं मुख्य उद्दिष्ट्य आनंद हेच आहे, याचा वारंवार उच्चार करत मनूचा ‘प्रजननासाठी मैथून’ हा विचार ‘कामसूत्रा’नं मोडीत काढला.

लवजिहादच्या सध्याच्या काळात वात्स्यायनाच्या ‘कामसूत्रा’बद्दल बोलणं अत्यंत निकडीचं झालं आहे. फक्त विवाह चौकटीतील स्त्रीरूपं ठसवण्यासाठी अनेक यंत्रणा कार्यरत आहेत. फक्त लग्नबंधनातील संबंध मान्य असल्यामुळे मुलींच्या डेटिंग आणि लिव्ह इन यांना लवजिहादी आणि समाजही विरोध करताना दिसतो. स्त्रियांच्या लैंगिकतेला वेसण घालणं, हेच या विरोधाचं प्रमुख उद्दिष्ट्य आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही.

मोठ्या शहरांतील बगिचे, चौपाट्या, जॉगिंग पार्कमधून आपसांत मश्गुल असलेली प्रेमीयुगुलं दिसणं आता नवलाचं राहिलेलं नाही. सांप्रतकाळ काहीअंशी प्रणयाच्या अभिव्यक्तीचा काळ असला तरी तेवढ्यावर समाधान न मानता लग्न आणि डेटिंगमधील लैंगिक हिंसेचीही चर्चा या निमित्तानं व्हायला हवी. वात्स्यायनानं २००० वर्षांपूर्वीच यांसंबंधी चिंतन केलं आहे!

 

लेखिका मुंबईस्थित सेंट झेविअर महाविद्यालयाच्या झेविअर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन्समध्ये अध्यापन करतात.

alkagadgil@gmail.com