स्त्री-मुक्ती असावी, पण त्यात आपली बायको, सून, मुलगी, बहीण नसावी!
अर्धेजग - कळीचे प्रश्न
भाग्येशा कुरणे
  • भाग्येशा कुरणे
  • Tue , 23 October 2018
  • अर्धेजग कळीचे प्रश्न भाग्येशा कुरणे Bhagyesha Kurane

माणसाचा जन्म कोणत्या कुटुंबात व्हावा, हे त्याच्या किंवा तिच्या हातात नसतं. माणूस विशिष्ट कुटुंबात अनवधानानं जन्म घेतो व त्याचा पुढील प्रवास सुरू होतो. माणूस ज्या कुटुंबामध्ये जन्म घेतो, त्या कुटुंबाला जातीचे-धर्माचे कंगोरे असतात. कुटुंब हा समाजाचा भाग असल्यानं समाजानुसार भौतिक प्रश्न बदलतात. स्वाभाविकपणे व्यक्तीची जडणघडण बदलते. माझा जन्म असाच पूर्वाश्रमीच्या दलित व सध्याच्या बौद्ध कुटुंबातील. कुटुंबाला चळवळीचा वारसा. आई-वडील शिक्षक. शिकलेली पहिली पिढी. आई-वडिलांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले ऐकत आम्ही मोठे झालो. दहा वर्षांची असल्यापासून आई-वडील बाबासाहेबांच्या जयंतीला व्याख्यानांना घेऊन जायचे. त्यामुळे एक वैचारिक दिशा मिळत गेली. सामाजिक जाणीव वाढीस लागली.

पुढे पुण्याला कॉलेजमध्ये आल्यानंतर वाचन वाढलं. नवे विचारप्रवाह समजले. अनेक परिवर्तनवादी चळवळींशी संपर्क येत गेला. त्यातून सामाजिक जाणीव पक्की होत गेली. समाजात परिवर्तन झालं पाहिजे आणि या सामजिक परिवर्तनाच्या लढ्यात आपला सहभाग असला पाहिजे, हे पक्कं झालं. इतर उच्चजातीय, उच्चवर्णीय मुलामुलींसारखं सामाजिक कार्य हे छंद, हौस नसून ती आपली एक जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे, ही समज यायला फारसा वेळ लागला नाही. कारण आजूबाजूचं वातावरण हे कास्ट मर्डर, दंगल, अॅट्रोसिटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या या घटनांनी भयांकित करून टाकणारं होतं. काम करायचं तर काय करायचं आणि कसं करायचं हा भला मोठा प्रश्न होता. यासाठी सुरुवातीला मी सिव्हिल सर्विसेसचा मार्ग स्वीकारला, पण त्या टिपिकल पाठांतरवादी परीक्षांशी माझा ताळमेळ बसेना.

मग एलएलबी करण्याचा निर्णय घेतला. वकील होऊन समाजाचे प्रश्न सोडवू शकतो, असं वाटत होतं. लॉ कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतली. त्याचबरोबर पुण्यातील पानमळा वस्तीवर शैक्षणिक काम करायला सुरुवात केली. यावेळी वय २४ च्या घरात असल्यानं आई-वडिलांची धाकधूक वाढू लागली. आई-वडिल आंतरजातीय अथवा लव्ह मॅरेजसाठी तयार होते, पण असं काही नसल्यानं तसं घरी सांगितलं.

......................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी क्लिक करा - 

https://tinyurl.com/y86lc3fq

......................................................................................................................................................

माझं शिक्षण सुरू असल्यानं मी साशंक असायचे. पण आई-वडिलांना कामाबद्द्ल, माझ्या विचारांबद्दल कल्पना होती. त्यामुळे पाठिंबा देणारा मुलगा व कुटुंब बघू असं आश्वासन त्यांनी दिलं. माझ्या नकळत विवाहस्थळांवर माझं नाव नोंदवलं. स्थळं येऊ लागली, पण माझं शिक्षण आर्टसमध्ये असल्यानं अनेकांनी नाकारायला सुरुवात केली. कारण बी.ए. केलं म्हणजे काहीतरी फालतू शिक्षण घेतलंय असं काहींना वाटत होतं. आजच्या बाजारू नवउदारमतवादी समाजात इंजिनियर, डॉक्टर, सीए, बँकर या नोकऱ्यांचा बोलबाला आहे. भलेही खूप मोठ्या पगाराची नोकरी मिळत नसली तरी या पदव्यांना ‘सामाजिक प्रतिष्ठा’ आहे. मुलीनं लग्नानंतर नोकरी केली नाही तरी चालेल, पण आमचा मुलगा इंजिनिअर आहे, तर त्याला इंजिनिअरच मुलगी पाहिजे, असा पालकांचा सूर असायचा.

खरं तर मला समाजशास्त्राची आवड. त्यामुळे मी पदवीसाठी हा विषय निवडलेला. इतर विद्यार्थ्यांइतकाच अभ्यासदेखील केलेला. त्यामुळे आर्टस ही विद्याशाखा निवडण्यामध्ये चुकीचं काय, हा प्रश्न मनात यायचा.

याचबरोबर लोकांना माझ्या सामाजिक कार्यातील सहभागाबद्द्ल शंका असायची.  ‘सामाजिक काम, मग घरचा स्वयंपाक कोण करेल?’ असे प्रश्न असायचे. मुलगा एवढा कमावतो, मग सामाजिक कामाची वगैरे काय गरज? सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल एक नकारात्मक सूर येथील मध्यमवर्गात आढळतो. ते म्हणजे कामधंदा नसणारे, मोर्चा-आंदोलनात दिसणारे, समाजाच्या जीवावर जगणारे, पैसा खाणारे; तर महिला या चारित्र्यहीन, घरदार सोडलेल्या... आणि अशा घटकांसोबत आपली बायको, सून राहणार म्हणजे काहीतरी भयंकर पाप घडणार, अशी समस्या लोकांच्या चेहऱ्यावर दिसायची.

सौंदर्याच्या पितृसत्ताक संकल्पनेत अडकलेला वर्ग दिसण्याला खूप महत्त्व देतो. ‘साडीवरचे फोटो पाठव.’, ‘हा तुझा व्हॉट्सअॅपचा डीपी जुना आहे की रिसेंट आहे?’, ‘सगळे फोटो जीन्सवरच का?  ट्रॅडीशनल घालत नाही का?’, ‘स्वयंपाक येतो का?’, ‘तुझे केस लहान म्हणजे तू मॉड, मग आईवडिलांना सांभाळणार का?’, ‘मुलं सांभाळणार का?’ अशी प्रश्नांची सरबत्ती व्हायची. काही जण तर ओळख नसतानादेखील व्हिडिओ कॉल करायचे.

याचसोबत अनेक जणांनी माझ्या वकिलीच्या शिक्षणावरून वाद निर्माण केला. मुलगी वकिलीचं शिक्षण घेते, तर ती उद्या घरात येऊन आम्हाला कायदा शिकवायला लागेल, असं एका पालकांनी तोंडावर बोलून दाखवलं. तर आम्हाला बी. कॉम, बी.ए. करणारी पण मुलगी चालेल, पण लॉ करणारी नको, असं एकानं फोनवर सांगितलं.

“काय हो तुमची मुलगी कशाला सामाजिक कार्यात भाग घेते? आधी तिनं स्वतःचं बघावं, स्वतःचं करियर करावं, लग्न करून सेटल व्हावं” असे टोमणेवजा सल्ले आई-वडिलांना सुनवायला सुरुवात झाली. काही लोक माझ्याशी बोलण्याआधी माझी फेसबुक प्रोफाईल चाळून चित्रविचित्र प्रश्न उभे करायचे. काही पालक इतकी वर्षं पुण्यात काय केलं याचा सालागणिक हिशोब मागायचे. काहींना मी स्वैर वाटायचे, तर काहींना उद्धट, काहींना आक्रमक... मध्यंतरी एकानं विचारलं, ‘पुण्यात कार्यकर्त्यांच्या धरपकडी (एल्गार परिषद) सुरू आहेत. त्यात तुझा सहभाग नाही ना? म्हणजे तुझ्यावर केसेस वगैरे नाहीत ना?’

सुरुवातीला हा प्रकार खूपच त्रासदायक होता. ज्या समाजासाठी आपण काम करायचा विचार करतो, त्या समाजातील एक घटक आपल्याला अशा प्रकारे झिडकारेल असं कधीच वाटलं नव्हतं. या काळात दोन प्रकारचे लोक भेटले. एक वर्ग असा होता, ज्यानं कामाला उचलून घेतलं. प्रशंसा केली, मदत केली, प्रोत्साहन दिलं. तर दुसऱ्या वर्गानं झिडकारलं. तुझं काम ठीक आहे ग, पण आमच्या घरात अशी मुलगी नको बाबा... याचा मानसिक त्रास आई-वडिलांना अधिक होऊ लागला. कारण पहिली बातचीत त्यांच्याशी व्हायची. मग ते त्यांचा राग माझ्यावर काढायचे - ‘तूपण डॉक्टर, इंजिनिअर झाली असतीस तर? तू हे केलं असतंस तर? तुझं सामाजिक काम थांबवलंस तर?.... ’ 

या काळात मानसिक स्वास्थ्य बिघडून जायचं. आपल्या विशिष्ट पदवीमुळे, आपले स्वतंत्र विचार, सामाजिक कामातील सहभाग यामुळे आपण नाकारले जातोय, ही भावना मनाला खाऊन टाकणारी होती. रात्र रात्र झोप लागत नसायची, तब्येत बिघडायची. पण समविचारी व्यक्तींच्या पाठिंब्यामुळे गाडी पुढे सरकत रहायची. आता मात्र या सगळ्यांची सवय झालीय. इतर मैत्रिणींचे अनुभवही फार काही वेगळे नाहीत.

खरं तर दोन व्यक्तींचं सहजीवन हे त्या दोघांमधील समजुतदारी, एकमेकांचे स्वभाव पूरक असणं यावर अवलंबून असतं. पदवी, पैसा, घरदार, गाडी, दिसणं या गोष्टी दुय्यम असतात. मात्र नामफेम, पैसा या भांडवली मूल्यांना कवटाळलेल्या वर्गाला विशिष्ट विद्याशाखेत शिक्षण घेतलला माणूस ‘ढ’ किंवा युसलेस वाटतो. येथील नव उदारमतवादी ब्राह्मणी व्यवस्थेचं प्रारूप असं आहे की, इथं विशिष्ट कामाला, शिक्षणाला किंमत आहे. कायद्याचं शिक्षण घेण्यामागे सामाजिक न्यायाचा विचार असतो, हे इथं पटवून द्यावं लागतं. मुलीची शिक्षण घेण्यामागची भूमिका ही स्वतःला व कुटुंबाला उदध्वस्त करून टाकण्यासाठी नसते, हेही समजावून सांगावं लागतं. मुळात व्यक्ती ज्या व्यवस्थेमध्ये वाढते, त्या व्यवस्थेच्या मूल्यांना कळत-नकळत आपलंसं करू लागते. यामुळे प्रतिगामीत्वाचा विरोध करत असताना आपल्याकडून या मूल्यांचं समर्थन होऊ नये, यासाठी सर्वांनी सजग असलं पाहिजे.

मुळात सामाजिक भान असलेले घटक समाजासाठी लढत असतात. जे आपल्या पूर्वजांच्या वाट्याला आलं, ते आपल्या समाज बांधवांच्या वा भगिनींच्या वाट्याला येऊ नये, असं त्यांना वाटत असतं. लोक स्वतःचा पैसा, इच्छा, मौजमजा यांचा त्याग करत सामाजिक कार्यात भाग घेत असतात. पराकोटीची गुलामी भोगलेल्या समाजातून आज आपण स्वमेहनतीनं, तसंच आपल्या पूर्वजांच्या कामानं उच्चपदावर पोहचलो आहोत. पण याच वेळी उर्वरित समाजाला सोबत घेऊन जाण्याची जबाबदारी आपल्यावर आहे, हे त्यांनी जाणलेलं असतं. आज आपण घेत असणारी स्कॉलरशिप, फ्रीशीप, आरक्षण व इतर योजनांचा लाभ हे टिकवून ठेवण्यामध्ये या व्यक्तींचा भला मोठा वाटा आहे. तेव्हा मदत नाही केली तरी ठीक, पण अशा व्यक्तींचा आपण सन्मान ठेवला पाहिजे. मुलगा व मुलगी दोघं समान आहेत, असं जर आपण मानत असू तर मुलींच्या सार्वजनिक जीवनातील कामावर आपण इतके निर्बंध का घालतोय, याचाही आपण विचार केला पाहिजे. बाबासाहेबांच्या चळवळीत महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता, तर आज आपल्याला आपल्या कुटुंबातील स्त्रियांचा सहभाग नकोसा का वाटतो? सामाजिक कार्य म्हणजे फक्त दंगे, मोर्चे, आंदोलन असतं का, असाही प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा -

https://www.booksnama.com/client/book_list_by_category

.............................................................................................................................................

आजची परिस्थिती पाहिली तर खाजगीकरण-उदारीकरणाच्या धोरणांमुळे शासकीय नोकऱ्या, शासकीय महाविद्यालयं कमी होत आहेत, शिक्षण महागडं होत आहे. ‘पैसा असेल तर शिका’ ही परिस्थिती बळावत चालली आहे. रोजगार घटत गेल्यानं कमीत कमी पगारावर राबवून घेतलं जात आहे. तुम्ही डॉक्टरेट (Ph.D) असलात तरी नोकरी मिळेल याची खात्री नाही. तुम्ही इंजिनिअर व्हाल, पण नोकरीची शाश्वती नाही. आंतरजातीय विवाह केला, तर तुमचा खून करण्यापर्यंत लोकांची मजल जाते.

तुम्ही काय खावं, काय खाऊ नये हे सरकार ठरवतं. अशा परिस्थितीत एक तर सरकारच्या भेदभावजनक धोरणांविरुद्ध लढा किंवा निमूटपणे सहन करा, असे दोनच पर्याय आपल्यासमोर आहेत. या परिस्थितीविरुद्ध आपण संघर्ष केला नाही, तर कदाचित आपल्या पुढच्या पिढीला शिक्षणापासून, रोजगारापासून, तसंच मूलभूत गरजांपासून वंचित राहावं लागेल. आणि भेदभाव इतका पराकोटीला जाईल की, रोहित वेमुला, नजीब, उना, भीमा कोरेगाव, अमृता-प्रणय सारख्या घटना रोज घडू लागतील. कदाचित यात आपलाही बळी जाईल.

तेव्हा समाजाचा एक घटक या नात्यानं आपला विकास हा सामाजिक विकासावर अवलंबून आहे. सावित्रीबाई, रमाई, फातिमाबाई यांचा वारसा आपल्यासमोर आहे. तसंच सामाजिक परिवर्तनाची जबाबदारी प्रत्येकाची आहे. तेव्हा ‘शिवाजी जन्मावा, पण तो शेजारच्या घरात’ किंवा ‘स्त्री-मुक्ती असावी, पण त्यात माझी बायको, सून, मुलगी, बहीण नसावी’, असा उपटसुंभ विचार करून कसं चालेल?

.............................................................................................................................................

लेखिका भाग्येशा कुरणे साऊ-रमाई शैक्षणिक प्रकल्पाच्या सह-संस्थापक आहेत आणि पुण्यातील ILS law College मध्ये शिक्षण घेत आहेत.

bhagyeshasnehal93@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

ADITYA KORDE

Tue , 23 October 2018

..इतर उच्चजातीय, उच्चवर्णीय मुलामुलींसारखं सामाजिक कार्य हे छंद, हौस नसून ती आपली एक जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे, ...हे काही पटलं नाही बाकी लेख छान पण सर्व जाती धर्म प्रांतातल्या स्त्रियांचे प्रश्न कुठेतरी एका समान धाग्याने जोडले गेले आहेत, पुरुष किन्वा पितृसत्ताक पद्धती जाती च्या सीमा ओलांडून स्त्रियांचे दमन करते हे सांगायचे आहे ते समजले, आणि मान्य सुद्धा