‘आम्ही हिजडे, आम्ही माणूस’ अर्थात तृतीयपंथीयांचे अनुभव
अर्धेजग - कळीचे प्रश्न
रेणुका कड
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 06 February 2018
  • अर्धेजग कळीचे प्रश्न तृतीयपंथीय Transgender लैंगिक अत्याचार Sexual Harassment

येत्या १० फेब्रुवारी रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई आणि विकास अध्ययन केंद्र, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र धोरणाची आवश्यकता’ या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र आयोजित करण्यात आलं आहे. या वेळी विकास अध्ययन केंद्राच्या ‘आम्ही हिजडे, आम्ही माणूस’ या अहवालाचं प्रकाशनही होणार आहे. या अहवालाच्या निमित्तानं तृतीयपंथीयांशी संवाद साधताना त्यांना समाजातून किती प्रकारच्या द्वेषाला, हेटाळणीला सामोरं जावं लागतं, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. प्रत्येक तृतीयपंथी व्यक्ती ही विशेष आहे. ‘सर्व कटू अनुभव पचवत आपण जे आहोत तसंच आपण राहिली पाहिजे. जन्म जरी पुरुषी शरीरात झाला असला तरी आम्ही स्वत:ला स्त्री समजतो, आम्ही स्त्री आहोत हीच आमची ओळख आहे’, हा विचार, ही भूमिका स्वत:शी ठाम करून तृतीयपंथी प्रत्येक व्यक्ती स्वत:च्या अस्तित्वासाठी झगडत असते. त्यांना कुटुंबाकडून, समाजाकडून येणारे अनुभव अंगावर शहारे आणणारे होते.

.............................................................................................................................................

आमचा तिरस्कार का?

रायपूर ते अकोला असा रेल्वे प्रवास करताना कांचन रेल्वेच्या डब्यात लोकांना पैसे मागताना भेटली. तिला नागपूरला उतरायचं होतं. ‘आपण बोलूया का, तुझ्या कामात अडचण येत नसेल तर...’  यावर कांचन हसली. म्हणाली, ‘क्या अडचण आयेगी? चलो किसी को तो लगा हिजडे के साथ बात करना चाहिये’. त्यामुळे आम्हाला संवादासाठी बराच वेळ मिळाला. कांचन सांगत होती- ‘हिजडे इन्सान नहीं है क्या?’ असं बोलून तिनं तिचा राग टाळी वाजून व्यक्त केला. तिच्या टाळीनं एका प्रवाशानं माझ्याशी वाद घातला. ‘आप लोक उधर जा के बैठो. इस डब्बे में नॉर्मल इन्सान सफर करते है’. शेवटी जास्त वाद न घालता ‘कांचन माझ्या आरक्षित असलेल्या सीटवर बसलेली आहे,’ असे सांगून त्याला शांत केलं. आम्ही बोलायला सुरुवात केली. ती सांगत होती, ‘हे असंच होत आमच्या बाबतीत. आम्हाला पुरुष चिडवतात, टाळतात. महिलासुद्धा आमचा तिरस्कार करतात. ज्या रिक्षातून त्या प्रवास करतात, त्यात तृतीयपंथीय व्यक्ती आली तर महिला सरळ उतरून जातात. पुरुष आम्हाला छेडतात. आम्हाला अशी वागणूक अजिबात अपेक्षित नाही. लोकांना आमचा स्पर्शसुद्धा नकोसा वाटतो. आम्ही नॉर्मलच आहोत, हे समाज कधी स्वीकार करणार की नाही?’

सामाजिक स्थान का नाही?

‘दिव्या’ तिचा अनुभव सांगत होती- ‘आमच्या राज्यात सरकारनं अनेक सुविधा देऊ केल्या आहेत. समाजातून आम्हाला स्वीकारलं जात नाही. केवळ स्त्रियांची छेडछाड होते असं नाही.  तृतीयपंथीयांचीही छेड काढली जाते. स्त्रियांचा एफआयआर नोंदवून घेतला जातो. आम्हाला तर तीही सोयही नाही. पोलीस आमची थट्टा करतात. मस्करी करतात. ‘हिजडे को कोन छेडेगा! तेरी इज्जत कैसे लूट जायेगी?’ असं म्हणतात. आम्हाला पोलीस स्टेशनमधून हाकलून दिलं जातं. गुन्हा नोंदवला जात नाही. अशाच एका घटनेत आमच्या तृतीयपंथीयांचा मृत्यू झाला. त्याबद्दल कुणाला काहीच वाटलं नाही. कोणत्याही प्रसारमाध्यमांनी त्याची बातमी केली नाही. समाज आमचा किती तिरस्कार करतो, हे तेव्हा अजून स्पष्टपणे समजलं. आम्ही माणूस आहोत. आम्हाला भावना आहेत. आम्हाला दुःख होतं. आमच्यात केवळ प्रजननक्षमता नाही, पण मातृत्वगुण आहेत. आम्ही या समाजाचा घटक आहोत आणि समाजानं हे स्वीकारायला हवं.

आमच्या क्षमतांवर विश्वासच ठेवला जात नाही!

‘श्रेया’ मूळ नागपूरची. वयाच्या दहाव्या वर्षी आपण चुकीच्या शरीरात जन्म घेतला असं तिला वाटू लागलं. ती पुढे सांगू लागली - “तेव्हापासूनच घरात चोरून लपून मुलींसारखं राहणं आवडू लागलं. सुरुवातीला घरच्यांनी गंमत म्हणून स्वीकारलं. जेव्हा वयाच्या १५ व्या वर्षी मी त्यांना सगळं सांगून टाकलं, त्यावेळी मला बेदम मारहाण झाली. मला मामाच्या गावी पाठवलं गेलं. मामा शिस्तीचा, अत्यंत कडक. त्यामुळे मला तिथं राहून माझ्या मनासारखं जगता येत नव्हतं. त्यावेळी मी तिथं एका पुरुषासारखं राहून माझं शिक्षण पूर्ण केलं. बी.कॉम.ची पदवी घेतल्यानंतर मात्र मी कायमचं घर सोडलं. बाहेर राहून एका सीएकडे पार्टटाईम काम करून एम. कॉम.पर्यंत शिक्षण पूर्ण केलं.   या काळात पैसे जमा केले. ऑपरेशन करून घेतलं. आता मी एकटी स्वतंत्र घर भाड्यानं घेऊन राहते. तिथंही मला मी पूर्ण स्त्रीच आहे हे सांगावं लागतं. माझ्या घरी माझ्या तृतीयपंथी मैत्रिणी येऊ शकत नाहीत. आल्या तर घरमालक घर रिकामं करण्याची सूचना देतो. या सगळ्या सामाजिक बदलासाठी शिक्षणव्यवस्थेत बदल हवा. तेव्हा मानसिकता बदलेल. तृतीयपंथीयांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल. आजही आमचा समाज रेल्वे स्टेशन, बसस्थानकावर भीक मागतो. कारण त्यांच्यासमोर कोणताच पर्याय नाही. एकदा आम्हाला संधी तर द्या. स्त्री-पुरुष यांच्यापेक्षाही जास्त क्षमतेनं आम्ही काम करू दाखवू.”

आम्हाला स्वीकारा....

‘देविका’ गुजरातमध्ये भेटली. रस्त्यावर बाजार मागत होती. तिच्या मित्रासोबत रस्त्यावरच भांडण झालं होतं. तो सोडून गेल्यामुळे दु:खी होती. त्या रागातच टपरीवर कडक चहा एकाच घोटात प्यायली. त्या ठिकाणी तिला मी पाहत होते. तिच्या सोबतच्या अजून एक-दोन जणी तिला समजावत होत्या. त्यांच्या मदतीनं मी तिच्याशी बोलू लागले. स्वत:ला सावरत उठली.  एक बिडी काढून पेटवली. ‘पाच मिनिट रुको’ म्हणत मला थांबायला सांगितलं. बिडी ओढून झाल्यावर तिनं बोलायला सुरुवात केली – “आम्हाला कुणीच स्वीकारत नाही. घरचे ओळख लपव असा सल्ला देतात. ‘तुझ्या भावना तुझ्यापुरतेच ठेव. बाहेर कशाला शोऑफ करते’ असं आई सांगते. कुणाशी काही शेअर केलं तर बोलणी बसतात. ही घुसमट आम्ही का सहन करायची?

घरी मुस्कटदाबी होते. बाहेर समाज आम्हाला हिणवतो. अश्लील बोलतो. आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन 'हीन' असतो. ‘आमचं ना कुटुंब आहे, ना, आम्हाला समाज स्वीकारतो. ज्याच्यावर प्रेम केलं, तोही मला फसवून निघून गेला. अशा परिस्थितीत जगणं आमच्यासाठी आव्हान आहे.” असं म्हणत चेहऱ्यावरची लिपस्टिक पुन्हा लावत ‘आता मी निघते’ म्हणून देविका बाजार मागण्यासाठी निघून गेली.

आमच्यासाठी न्याय का नाही ?

‘अवंतिका’ गुवाहाटीची. ती एका मुलावर प्रेम करते. त्यांचं नातं तीन-चार वर्षं टिकून होतं. त्या मुलानं तिला आपण लग्न करून म्हणून आश्वासन दिलं होतं. अवंतिका त्याच्या सोबत राहत होती. तो त्याचं काम करायचा आणि अवंतिका लग्नाच्या कार्यक्रमात नृत्याचा कार्यक्रम करून पैसे कमावयची. लग्नसराईच्या काळात तिला मिळणारं उत्पन्न चांगलं होतं. घर घेण्यासाठी म्हणून त्यातील काही रक्कम ती स्वत:जवळ जमा करत होती. जवळपास ८०००० रुपये जमा झाले. एक दिवस तिचा मित्र ते सगळे पैसे घेऊन पळून गेला. तिनं त्याला शोधून त्याविषयी विचारणा केली तर त्यानं ‘एक किन्नर कधी पत्नी होऊ शकत नाही’ असं सांगितलं. यावर ती जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यासाठी गेली. तेव्हा तिथल्या पोलिसांनी ‘किन्नरजवळ इतके पैसे कसे आले?’ म्हणून तिचीच उलटतपासणी केली. तक्रार नोंदवून न घेता तिला हाकलून दिलं.

आमच्यावरील अत्याचाराची नोंद का नाही?  

भाग्यलक्ष्मी मूळ कर्नाटकची. वयाच्या १३ व्या वर्षी घर सोडलं. “घर सोडलं तेव्हा रस्त्यावर राहावं लागलं. त्यावेळी एका माणसानं माझं शारीरिक शोषण केलं. त्यावेळी मी काहीच प्रतिकार करू शकले नाही. माझ्यासोबत हे असं का होतं, हाच प्रश्न माझ्या मनात सतत येत होता. दोन-तीन दिवसांनी आमच्या समुदायातील लोकांनी मला पाहिलं. सकाळची वेळ होती.  त्यांनी मला त्याच्यासोबत चहा आणि एक पाव खायला दिला. माझी चौकशी केली.  मला त्यांच्यासोबत घेऊन गेले. एक दिवस रात्री घरी परत येताना रस्त्यावरून जाणाऱ्या तीन पुरुषांनी मला अडवलं. माझ्यावर बलात्कार केला, ही बाब मी माझ्या गुरूला सांगितली. त्यांनी आपल्यासोबत असंच होतं असं सांगितलं. मी तेव्हा काही झालं तरी आपण तक्रार करायची ठरवलं होतं काहीजणींना सोबत घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. त्यावेळी माझं म्हणणंसुद्धा नीट ऐकून घेतलं गेलं नाही. उलट तिथं असलेले सगळे पोलीस ‘किन्नरवर कसा बलात्कार होऊ शकतो?’ म्हणून हसू लागले. तक्रार नोंदवून न घेताच आम्हाला तिथून हाकलून देण्यात आलं.”     

‘आम्हाला मनाप्रमाणे जगूच दिलं जात नाही…’

अक्षय मूळ महाराष्ट्राचा. त्याला जन्मजात कलेची देणगी मिळाली आहे. तो सुंदर मेहंदी, रांगोळी आणि टॅटूज काढतो. लग्नाच्या काळात त्याला नवरीच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी बोलावलं जातं. त्याच्यातील बदल त्यानं पहिल्यांदा जेव्हा घरी सांगितले तेव्हा त्याकडे कोणीच लक्ष दिलं नाही. उलट त्याला धमकी दिली की, नीट राहायचं. रिकामं खूळ डोक्यातून काढून टाकायचं.  मित्रांना सांगितलं तेव्हा त्यांनी त्याची खिल्ली उडवली. घरच्यांच्या धाकामुळे अक्षय घरी असताना पुरुष म्हणून वावरतो आणि बाहेर आल्यावर स्त्री म्हणून वावरतो. अक्षय सांगत होता, “मी आता जशी कुटुंबाची जबाबदारी घेतो, तशीच जबाबदारी नेहमी घेईल. माझं ते कर्तव्य आहे. घरचे समजूनच घेत नाहीत. मी घरातून निघून जाऊ शकत नाही. आईची काळजी असते.  त्यामुळे मनाप्रमाणे जगताच येत नाही.” 

शिक्षण हक्क का मिळत नाही?

‘काव्या’ सुंदर चित्र काढते. तिच्या दयारमध्ये तिनं काढलेली अनेक चित्रं फ्रेम करून लावली आहेत. काव्यानं फाईन आर्टमध्ये करिअर करायचं ठरवले होतं. पुढे ती सांगू लागली, “शाळेत असताना अनेक वेळा शिक्षकही माझ्याकडून त्यांचं चित्रकलेचं काम पूर्ण करून घेत. जेव्हा माझ्या वागण्यात बदल झाले, मी माझ्या मनासारखं जगू लागले, तेव्हा त्याच शिक्षकांनी माझी हेटाळणी सुरू केली. ‘बायल्यासारखा वागू नकोस’ म्हणून थट्टा केली. एक दिवस तर शाळेतच माझ्यावर जबरदस्ती झाली. ते मोठ्या मुलांनी पाहिलं. त्यांनीही मला त्रास द्यायला सुरुवात केली. शेवटी मी शाळा सोडून दिली. घरी सांगितलं तर मलाच मार मिळाला. शेवटी नववीत असतानाच घर सोडून दिलं...”     

माझं नाव पुरसं का नाही?

‘रजनी’ पुण्यात राहते. नृत्यकला तिच्या अंगात भिनलेली आहे. त्यामुळे नृत्य हेच जीवन जगण्याचं साधन म्हणून रजनी आपला उदरनिर्वाह चालवते. एका सार्वजनिक कार्यक्रमात तिला तिचं नाव विचारण्यात आलं. तिनं फक्त ‘रजनी’ एवढंच सांगितलं. तिला तिचं पूर्ण नाव सांगण्यासाठी पुन्हा विचारण्यात आलं. तरीही तिनं ‘रजनी, पुणे हेच माझं पूर्ण नाव आहे’ असं ठामपणे सांगितलं. त्यावेळी तिला ‘हिजड्यांना पूर्ण नाव कसं असेल?’ म्हणून अपमानित केलं गेलं. रजनी सांगत होती, “मी त्यांच्याशी खूप भांडले.  ज्या आई-वडिलांनी मला स्वीकारलं नाही,  त्यांचं नाव मी का सांगावं? माझी ओळख रजनीइतकीच आहे. ती पुरेशी आहे. समाजानं आम्हाला पूर्ण नाव सांगण्यासाठी का जबरदस्ती करावी? त्यासाठी आम्हाला का अपमानित करावं?”

असे अनेक प्रश्नांचा आणि अडचणींचा सामना करत तृतीयपंथी व्यक्ती जगत आहेत. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांगीण उपाययोजना आखून त्यांची अंमलबजावणी होणं नितांत गरजेचं आहे.  

.............................................................................................................................................

लेखिका रेणुका कड सामाजिक कार्यकर्त्या आहेत.

rkpatil3@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.