बाईनं निर्भय, हिंमतवान व्हावं आणि पुरुषानं मृदू, न्याय्य!
अर्धेजग - कळीचे प्रश्न
सुमित्रा भावे
  • सुमित्रा भावे यांच्या भावमुद्रा
  • Tue , 15 August 2017
  • अर्धे जग कळीचे प्रश्न सुमित्रा भावे Sumitra Bhave सुनील सुकथनकर Sunil Sukhtankar

माझे आई-वडील दोघंही उदारमतवादी विचारसरणीचे होते. त्यांनी ना कधी धर्माची, ना जातीची भानगड आम्हाला सांगितली. धर्म-जात, स्त्री-पुरुष अशी कुठलीच असमानता त्यांनी आम्हाला शिकवली नाही. वाढत्या वयात आमच्या आवडीनुसार आमचे निर्णय घेण्याची मुभासुद्धा त्यांनी दिली. माझी आई तर कमी शिकलेली होती, पण ती अत्यंत विचारी बाई होती. स्त्री समानता, धर्म, जात निरपेक्षता याबाबत आग्रही होती. वडिलांचं वाचन दांडगं होतं. शिवाय घरातूनच चित्रकला, संगीत, वाङमयीन संस्कार मिळत गेले. यातून माझं असं एक व्यक्तिमत्त्व बनत होतं. कधीच कुठल्या गोष्टींची घरातून अडसर आली नाही. पण हे सर्वांसोबत होतं असं नाही.

आपल्या समाजात अजूनही बाईला दुय्यम स्थान आहे हे खरं आहे. मात्र त्याकडे समाज आणि व्यक्ती अशा दोन पातळ्यांवर भिन्नपणे पाहावे लागेल. काही वेळा तुम्हाला असे दोन भाग करावेच लागतात. स्त्रीचं दुय्यम स्थान दिसतं ते बहुतांश समाज म्हणून. समाजाच्या एकूण दृष्टीकोनामुळे तिला मागे ठेवले जाते. उलटपक्षी काही पुरुष असे ही दिसतात, ज्यांना बाईचं महत्त्व पटत असतं. ते समानता मानत असतात आणि बाईला समानता द्यायला तयारही असतात. देतातही. पण तो सन्मान समाजाकडून व्यवस्थितरित्या काढून घेतला जातो.

मी प्राध्यापक म्हणून काम केलं, संशोधक म्हणून काम केलं. इथं सगळ्यांना समान मोबदला आहे. असं कधी झालं नाही पुरुष प्राध्यापकाला जास्त पैसे आणि स्त्री प्राध्यापकला कमी. तसंच संशोधक म्हणून वावरत असतानाही झालं नाही. किंवा संस्थेची कामं केली, तिथंही स्त्री म्हणून कमी मोबदला मिळाला नाही. तिथं समानतेच्या न्यायानेच कामं चालायची. त्यामुळे असा अनुभव आला नाही.

चित्रपटाच्याबाबतीत मात्र महिला कलाकारांना असा अनुभव येतो असं इथं बोललं जातं. आम्ही तर चित्रपट निर्मात्याला साधारण खर्चाचा एक अंदाज सांगतो त्यानुसार रक्कम ठरते. "अमूक या रक्कमेत फिल्म होईल. तुम्ही आम्हाला पैसे द्या, आम्ही तुम्हाला फिल्म देतो.' या तत्त्वानं काम करतो. पण आम्ही जेव्हा चित्रपट बनवतो त्यावेळेस मोबदल्याच्या बाबत लिगंभेदाचा कधीच प्रश्न उद्भवत नाही. कामाच्या मोबदलत्यात पैसे, एवढंच तत्व असतं. ज्याचे काम जास्त त्याला त्याप्रमणात मोबदला.

एकदाच असाच एक अनुभव आला. मी एनएमडीसीसाठी एक शॉर्ट फिल्म करत होते. या फिल्ममध्ये पुरुष कलाकारापेक्षा स्त्री कलाकाराला जास्त काम होतं. पण तिथल्या सवयीनुसार, त्यांनी मला सांगितलं की, पुरुष कलाकाराला अधिकचा मोबदला द्या. स्त्री कलाकाराला कमी दिला तरी चालेल. मी म्हटलं, "नाही. बाईंचं काम जास्त आहे तर त्यांना जास्तच मोबदला दिला पाहिजे.' शेवटी मला तिथं ते लावून धरावं लागलं. काही वेळा अशा ही भानगडी कराव्या लागतात.

 चित्रपट क्षेत्रात स्त्री कलाकार किंवा स्त्री तंत्रज्ञ यांना पुरुषांच्या तुलनेत कमी वेतन, मोबदला मिळतो असं बोललं जातं, मात्र आम्ही कधीही आमच्या चित्रपटांमध्ये अशा प्रकारे भेद केला नाही. लिंग समभाव हा आमच्या डोक्यातलाच भाग असल्याने आमच्याकडून आम्ही कधीही असं केलं नाही. पण स्त्री पुरुषांच्याबाबत भेदाभेद होत राहतात हे खरंय.

आता, आपण कितीतरी वेळा पाहतो, स्टेजवर पाच पुरुष आणि एक स्त्री असते. का बरं असं असतं? स्टेजवर समप्रमाणात स्त्री-पुरुष का नसतात? हेच चित्र अनेक समित्यांमध्ये, परीक्षण व्यवस्थेत, ज्युरीजमध्ये दिसतं. हा माझा सगळीकडचा अनुभव आहे. इतकंच नव्हे तर काही वेळा तुमच्या कामाची दखल घेताना डावललं जाण्याचा प्रसंग घडतो. पुरुषाला एखाद्या विषयातील माहिती किंवा गती कमी आहे, असं दिसत असतानाही तुम्ही स्त्री आहात म्हणून केवळ डावललं जातं. बाईकडे जास्तीचं शहाणपणं असूनही तिची दखल घेतली जात नाही, तर काही वेळा हे बायकांकडूनही होतं. बायकांना पुरुष दिग्दर्शक किंवा सहकलाकार हा अगदी भारी वाटतो, पण बाई दिग्दर्शक म्हणजे काय नाही असं खूप वेळा लक्षात येतं.

आता साधं उदाहरण म्हणजे मी घरातून काम करते. घरात कुणी भेटायला आल्यानंतर मी सहजपणे पाणी घेणार का? चहा घेणार का? विचारते. माझ्याकडे काय पूर्णवेळ काम करणारं माणूस नाही. त्यामुळे काही वेळा मी स्वत: उठून चहा करून आणते. माझ्यातील बाईपण असं सतत जागं असतं. पण एखाद्या पुरुष दिग्दर्शकाच्या घरी गेलो, तर त्याच्याकडून असा अनुभव येणार नाही. चहा विचारला तरी तो करून आणणार नाही. एकूण बाईमध्ये असा डबलरोल सुरू असतो. एक तिच्या कौशल्यपूर्णतेचा आणि दुसरा आदरातिथ्याचा. ती ते दोन्ही रोल सांभाळत काम करत राहते.

दुसरं उदारहण द्यायचं म्हणजे, मी आणि सुनील सुखटणकर एकत्रितरीत्या चित्रपटाचं दिग्दर्शन करतो. मग आम्ही जेव्हा असं सांगायचो की, आम्ही दोघांनी मिळून दिग्दर्शन केलंय, शिवाय त्याची कथा-पटकथा माझी, ‘सुमित्रा भावें'ची आहे. तर लोक पटकन म्हणायचे, "अच्छा दिग्दर्शन सुनील यांनी केलंय आणि तुम्ही लेखन केलंय.' लोकांना माझं लेखनासह दिग्दर्शनाचं हे अधिकचं कौशल्य आहे, हे मान्य नसायचं. असा अनुभव परदेशात ही यायचा. त्याचं एक कारण असंही की माझं त्या क्षेत्रातील प्रशिक्षण नाहीये पण सुनीलचं आहे. त्यामुळे लोकं म्हणायची अच्छा, "म्हणजे तांत्रिक बाजू सुनील पाहतो.' हे काही अंशी खरं होतं. पूर्वी तो असा तांत्रिक भाग बघायचा. कारण मी काही त्या तांत्रिक भाषेत बोलायचे नाही. मी त्या तांत्रिक शब्दांत अडकलेली नाही. पण मला व्यवस्थित कळतं. इथं कुठला लेन्स घ्यायचा. कोणचं मॅग्निफिकेशन पाहिजे, किती अंतर पाहिजे. मी त्या शब्दांत न अडकताही ही सर्व कामे करवून घेऊ शकते. पण कित्येक वर्षं लोकांचा असाच समज असायचा की, सुनील तांत्रिक बाजू पाहतो आणि मी कथाबिथा पाहते. बाईला या विषयात नेमकेपणाने कळतं याबाबत पटकन विश्वास ठेवला जात नाही.

मात्र कलाकाराकडून कधीही मला मी बाई दिग्दर्शक आहे, म्हणून कमीपणाचा अनुभव आला नाही. आणि मी सतत ठामपणे आपलं काम वाजवून घेते. सदाशिव अमरापूरकर, विक्रम गोखले असे अगदी दिग्गज कलाकारांनीही कामाबाबत कमी लेखलं नाही. मला माझ्या कामाविषयी ही सगळी मंडळी पुरेसा मान देतात. एखादा शॉट मनाजोगता होईतो मीही तो मान्य करत नाही. हे खरंय की आपल्याला थोडं आग्रही रहावं लागतं, पण कधी कुठल्या कलाकारांनी त्या अर्थानं अवज्ञा केली नाही. निर्मात्यांनीही कधी त्यापद्धतीने कामात उगीच नाक खुपसलं नाही.

आता अगदी अलिकडचे जे दोन चित्रपट आहेत, त्याचे निर्माते मोहन आगाशे आहेत. ‘कासव’ या चित्रपटात तर त्यांची भूमिकाही आहे. आगाशे हे स्वत: उत्तम कलाकार आहेत. पण त्यांनीही कधी माझ्या कामात लक्ष घातलं नाही. त्यांना देखील माहीत आहे की, अशी ढवळाढवळ मी खपवून घेणार नाही. उगीच दुसऱ्याच्या कामात मध्ये मध्ये करावं असा त्यांचाही स्वभाव नाही. उलट ते त्यांच्या शॉट व्यतिरिक्त उगाच शुटिंगच्या जागी रेंगाळलेसुद्धा नाहीत. त्यामुळे कलाकारांकडून अवज्ञा झाली नाही.

आमचं हे क्षेत्र तसं करमणुकीचं क्षेत्र आहे. त्यामुळे इथं सुंदर, आकर्षक दिसणं हा भाग असतो. पण अलिकडच्या काळातल्या तरुणी प्रसिद्धीत राहण्यासाठी त्यांचा अशा प्रकारचा चार्म वापरतात, ते मला थोडंसं दुर्देवी वाटतं. म्हणजे आजही अनेक अशा सशक्त अभिनेत्री आहेत की, ज्या कधीही त्यांचा असा चार्म वापरत नाहीत आणि खरोखर व्यक्तिरेखा उभी करतात. त्यांचं कौतुक आहे मात्र स्वत:ला वस्तुरूपात सादर करणं हे जरा खटकतं.

अलिकडे पुरस्काराचे सोहळे होतात. असे सोहळे म्हटले की, त्यात हमखास नृत्याचे कार्यक्रम असतात. त्यात ज्या तऱ्हेची नृत्यं असतात त्यात स्त्री म्हणून असा वापर करणं, वस्तूसारखं सादर करणं हे मला प्रत्येक वेळी खटकतं. पण अलिकडे मनोरंजन हे मान्य केल्यानं आणि तेही स्त्रीयांनी, मुलींनी करायचं हे मान्य केल्यानं भडक मेकअप, पाश्चात्य पोशाख वापरण्याकडे कल असतो. काहींना असे पोशाख चांगले दिसतात, काहींना दिसत नाहीत. तुमचे पाश्चात्य पोशाखही तुम्हाला पेलावे लागतात. ते सर्वांनाच जमतं असं नाही. आम्ही आमच्या चित्रपटात कधीही मेकअप करत नाही. तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वातूनच सौंदर्य खुलणार असतं. तुम्ही उभी करणारी व्यक्तिरेखा महत्त्वाची असते. त्यासाठी तुम्हाला वेगळ्या मेकअपची आवश्यकता असते, असं आम्हाला नाही वाटतं.

अजूनही बऱ्या जणी अभिनयाकडे केवळ आपण पडद्यावर दिसू या भावनेनेच येतात. सगळ्याच नव्हे. अनेक जणी खूप ताकदीनं कामंही करतात. मात्र आता अनेक तरुणी चित्रपटनिर्मितीच्या इतर तांत्रिक बाजूही हाताळायला लागल्या आहेत. कॅमेरावूमन असेल, चित्रपटाचं संकलन करणं असेल, ध्वनीसंयोजन करणाऱ्या मुली आहेत. खूप चांगल्या पद्धतीनं करतात. त्यांची संख्या कमी आहे हे खरं आहे. अजूनही स्त्री दिग्दर्शिका फार दिसत नाही. हे काम तितकंस सोपं नाही. तुम्हाला खूप व्याप सांभाळावे लागतात. अष्टावधानी असावं लागतं. खूप गोष्टींची जमवाजमवी करावी लागते. त्यामुळे कदाचित बायका या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात उतरत नसाव्यात. शिवाय बाईच्या दिग्दर्शनावर विश्वास टाकून त्यांच्या पाठिशी उभे राहणारे निर्माते तरी कुठं आहेत. निर्माता मिळवण्यासाठी पुन्हा एक वेगळी दगदग करावी लागते. त्यामुळे बायका याबाबत तितक्या उत्साही दिसत नाहीत. परंतु जर बाई दिग्दर्शिका असेल तर त्या वेगळं सूक्ष्म दृष्टीकोनातून मांडायचा प्रयत्न करतात. बायकांना मुळातच सुख, दु:ख, जबाबदारी, नीती यात पुरुषापेक्षा वेगळं काहीतरी दिसत असतं. अर्थात याचा अर्थ सर्वच बायकांत हे असतं असंही नाही. काही जणी पुरुषीपणा आणण्यात धन्यता मानतात. पुन्हा तिथं समानतेच्या नावावर गफलत केली जाते.

तरीही मुली आता असे वेगवेगळे तांत्रिक टप्पेही हाताळू पाहत आहेत. दिग्दर्शनाबाबत आपल्या आवाक्यातील गोष्ट म्हणत बऱ्याच मुली शॉर्ट फिल्म बनवत आहेत. चांगले विषय घेऊन, चांगल्या दर्जाचे बनवत आहेत. या बाबत बर्यापैकी समानता दिसते. माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवांनी असं लक्षात आलंय की, इथं स्त्रियांना स्वत:विषयी आणि स्वत:च्या कामाविषयी अधिकच ठाम असावं लागतं. आपलं कौशल्य नेमकेपणानं मांडता यावं लागतं. त्याची इतरांना आग्रहीपणाने जाणिव करुन देता आली पाहिजे. मांडावं लागतं. किती तरी स्त्रिया खूप महत्त्वाचं काम करत असतात, पण जर त्यांना ते नेमकेपणानं मांडता आलं नाही तर त्यांच्या महत्त्वाच्या कामगिरीकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. आपलं काम चोखपणे मांडणं हा काहींच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असतो, पण प्रत्येकाला ते जमतंच असं नाही.

मुळात आपल्या समाज मानसिकतेत बदल घडण्यास खूप वाव आहे. एकूण पुरुषाची मानसिकता बदलायला अजूनही खूप काळ जावा लागेल असं वाटतं. जेव्हापासून स्त्रीमुक्ती चळवळ सुरू झाली अगदी तेव्हासुद्धा पुरुष म्हणायचे आम्ही स्त्रीमुक्ती मानतो. पण अगदी त्यांच्याही नकळत, सूक्ष्मपणे ते स्त्रियांवर अन्याय अत्याचार करतात.

सध्या पुरुष रॅशनलाईज ही खूप करताना दिसतात. पुरुषांना न्याय तर द्यायचा आहे, पण तो देववत तर नाही. मग बायका ते आग्रहीपणे मागतात तेव्हा पुन्हा पुरुष उफाळून उठतो की, का बरं द्यावं म्हणत तेही सरसावतात. त्यामुळे दोघांत संघर्ष खूप आहे. हो पण आपल्या देशात सूक्ष्मपद्धतीनं अन्याय होतो. सरसकट पुरुष बाईवर उठसुट अन्याय अत्याचार करतो असं वाटत नाही मला. खूप चांगली वागणारी पुरुष ही आहेत. आता अनेकदा मी एकटीनं फिरते. तर अनेकदा प्रवासात मला माझी बॅग उचलून ठेवता येत नाही, पण कुणीतरी उंचापुरा पुरुष पटकन मदत करतो. पटकन तो बॅग उचलून ठेवतो. निघताना कुणीतरी काढून देतो. अशा छोट्या छोट्या गोष्टींतून स्त्री दाक्षिण्य दाखवणारे पुरुष असतात की! माणसाच्या माणूसपणाच्या खाणाखूणा अजून ही जागा आहे. त्या माणूसपणाच्या भूमिकेतून खूप जण चांगले वागतात एकमेकांशी. 

पण एकूणच स्त्री-पुरुषांचा संघर्ष अधिक ठळक असल्यानं आजच्या काळात स्त्री-पुरुषांची चांगली मैत्री होताना दिसत नाही. त्याऐवजी दोघांचा एकटेपणा वाढला आहे. ताणही वाढले आहेत. मैत्रीची स्थिती येण्यासाठी समानतेचं मूल्य मान्य असावं लागतं. मैत्रीसाठी समानतेचं, स्वातंत्र्याचं, न्यायाचं जे मूल्य आहे, त्याबाबत योग्य ताल साधून ती स्त्री-पुरुषांच्या मनात उतरायला हवीत. तो अजूनही साधला जात नाही असं मला वाटतंय. त्यामुळेच कुटुंब मोडतायेत. नैराश्य वाढलंय. एकटेपणा आहे.

कितीतरी कुटुंबात बायका नैराश्यात असतात. त्यांना त्यांचं योग्य स्थान मिळत नसतं. पुरुषांच्या कमाईचं मूल्य असतं, पण स्त्रियांचं घरचं स्त्री म्हणून, आई म्हणून, होममेकर म्हणून त्या जे काही करत आहे त्याचं मूल्य रोखीत कसं करणार?

मुळातच कामाच्या बाबतीत लिंगभेद बाळगळण्याची गरजच नाही. यासाठी बाईंनी निर्भय आणि हिंमतवान व्हायला हवं आणि पुरुषांनी मृदू आणि न्याय्य होण्याची गरज आहे. आपल्याकडे मुळातच पुरुष निर्भरता अधिक आहे. स्त्री-पुरुषांच्या नात्यात निर्भरता किती आणि मैत्री किती हे बाईला ओळखता आलं पाहिजे. यासाठी बाईनं निर्भय होण्याची खूप गरज आहे. पुरुषांनी मार्दवता-माया दाखवली तर त्यांनाही परत ती बाईकडून मिळणार आहे आणि स्त्रियाही निर्भय झाल्यानंतर त्यांना तशा तऱ्हेचा सन्मान मिळणार आहे.

सुमित्रा भावे प्रसिद्ध दिग्दर्शिका आहेत.

शब्दांकन : हिनाकौसर खान-पिंजार 

greenheena@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘लव जिहाद’ असो की ‘समान नागरी कायदा’, यांचा मूळ हेतू स्त्रियांना दुय्यम ठेवण्याचा आहे. त्यामुळेच त्यांना राजकारणात महत्त्व प्राप्त होते. स्त्रियांनी हे सत्य जाणून भानावर यायला हवे

हे दोन्ही कायदे स्त्री-स्वातंत्र्य मर्यादित करणारे आणि स्त्रियांवर पुरुषसत्ताक गुलामी कायम ठेवणारे आहेत. ‘लवजिहाद’चा कायदा स्त्रियांना आपला जीवनसाथी निवडण्याचा मूलभूत अधिकार नाकारतो; ‘समान नागरी कायदा’ लग्न, घटस्फोट, पोटगी, दत्तक आणि वारसा याबाबतीत भरवसा देऊन स्त्रीला ‘पत्नी’ म्हणून मर्यादित करतो. आपली गुलामी आणि दुय्यम स्थान संपवणारे राजकारण स्त्रियांना ओळखता आले पाहिजे.......