माध्यमांचं अधोविश्व | मीडिया का अंडरवर्ल्ड | Underworld of Media
दिवाळी २०१७ - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Tue , 17 October 2017
  • दिवाळी २०१७ भारतीय प्रसारमाध्यमं सोशल मीडिया ऑनलाईन मीडिया मुद्रित माध्यमं इलेक्ट्रॉनिक माध्यमं

गेल्या २५ वर्षांत, म्हणजे जागतिकीकरणाच्या काळात भारतीय प्रसारमाध्यमांविषयीची उलटसुलट चर्चा सातत्यानं ऐकायला मिळते आहे. प्रसारमाध्यमांना लोकशाहीचा चौथा स्तंभ मानलं जातं, पत्रकारिता हा व्यवसाय नसून तो पेशा मानला जातो, अभिव्यक्तीचं सर्वोत्तम व्यासपीठ म्हणूनही पत्रकारितेकडे पाहिलं जातं. मात्र गेल्या २५ वर्षांत भारतीय पत्रकारितेविषयी सातत्यानं प्रश्नचिन्हं उपस्थित केली जाताहेत. सोशल मीडिया, ऑनलाईन मीडियाच्या उदयापासून तर या चर्चेनं विशेष जोर धरला आहे. गेल्या तीनेक ‌वर्षांत, म्हणजे नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यापासून तर माध्यमांविषयीच्या चर्चेनं आणखीनच जोर पकडला आहे. माध्यमांवरील दबावतंत्र, माध्यमांची मुस्कटदाबी, माध्यमांचं कॉर्पोरेटीकरण, माध्यमांतील भ्रष्टाचार यांविषयी विशेषत्वानं चर्चा होते आहे. पत्रकारांच्या हत्येपासून पत्रकारांना आपल्या अंकित करण्यापर्यंत राजकीय पक्षांची मजल अलीकडच्या काही वर्षांत जाऊ लागली आहे. (तो काही के‌वळ मोदी सरकारचाच कार्यक्रम नाही.) त्यामुळे भारतीय पत्रकारिता काहीशी संकटात सापडली आहे. पण केंद्र व राज्य सरकार यांच्या सेन्सॉरशिप वा मुस्कटदाबीमुळेच भारतीय पत्रकारिता धोक्यात आली आहे असं नाही. भारतीय पत्रकारितेनं जे मॉडेल जागितिकीकरणाच्या काळात स्वीकारलं आहे, त्यामुळेही तिचा ऱ्हास सुरू झाल्याची चर्चा तावातावानं केली जाते आहे.

‘भारतीय पत्रकारितेचं काय करायचं?’, ‘भारतीय पत्रकारिता कुठे जाणार?’, ‘हा भारतीय पत्रकारितेच्या ऱ्हासाचा काळ आहे’ अशी अनेक विधानं अभ्यासकांपासून सर्वसामान्यांपर्यंत केली जात आहेत. सोशल मीडियावरील माध्यमांविषयीची चर्चा ही अवास्तव, हेतूपुरस्सर आणि बरीचशी द्वेषमूलक पद्धतीनं होते. त्याची कारणं उघड आहेत. तो या माध्यमाचा तोटा नसून ते हाताळणाऱ्यांच्या वकुबाचा आणि क्षमतेचा प्रश्न आहे. कुठलंही माध्यम हे दुधारी शस्त्रासारखं असतं. त्यामुळे त्याचा तुम्ही कसा वापर करता यावर त्याचं स्वरूप आणि भवितव्य अवलंबून असतं.

जे आपल्या वा आपल्या विचारसरणीच्या विरोधात, त्याविषयी द्वेषमूलक स्वरूपात व्यक्त होणं ही खास भारतीय परंपरा असल्याचं सोशल मीडियामधून दिसून येतं. या चर्चेत अजिबातच तथ्य नाही असं नाही. पण ही चर्चा मुद्द्यापासून, मूलभूत प्रश्नांपासून, समस्यांच्या गाभ्यापासून आणि विवेकी तारतम्यापासून फारकत घेणारी असल्यानं त्याची फारशी दखल घेण्याचं कारण नाही. मात्र हेही तितकंच खरं की, सोशल मीडियावरील या द्वेषमूलक चर्चेमुळे भारतीय माध्यमांविषयी जनमानस काहीसं कलुषित होऊ लागलं आहे.

भारतीय माध्यमं नीतिमत्ता, मूल्य, परंपरा, प्रेरणा आणि आदर्श यांच्यापासून खरोखरच फारकत घेऊ लागली आहेत, या आरोपात काही प्रमाणात नक्कीच तथ्य आहे. पण हेही तितकंच खरं आहे की, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील भारतीय पत्रकारिता आणि जागतिकीकरणोत्तर पत्रकारिता यात जमीन-अस्मानाचं अंतर आहे. चळवळीचं, प्रसार-प्रसार माध्यमांचं साधन म्हणून एकेकाळी पत्रकारितेकडे पाहिलं जात असे. जागतिकीरणोत्तर काळात त्याकडे एक ‘प्रॉडक्ट’ म्हणून पाहिलं जात आहे. मुद्रित आणि इलेक्ट्रानिक माध्यमांची संख्या आणि त्यांचा वाचकवर्ग यांमध्ये सातत्यानं भर पडत असतानाच भारतीय पत्रकारिता मात्र आपल्या परंपरेपासून बरीचशी फटकून आपली वाटचाल करत आहे.

मात्र एकीकडे मुद्रित-इलेक्ट्रानिक माध्यमांना काहीशी मरगळ आलेली असताना दुसरीकडे ऑनलाईन मीडियाचा उदय आणि या माध्यमातील पत्रकारिता मात्र नवी परंपरा निर्माण करू पाहत आहे. सोशल मीडियामुळे पत्रकारितेपुढे जशी काही आव्हानं निर्माण झाली आहेत, तशा अनेक संधीही निर्माण झाल्या आहेत.

भारतीय माध्यमांच्या या नव्या स्वरूपाची चिकित्सा मराठीमध्ये मात्र पुरेशा प्रमाणात होताना दिसत नाही. हिंदी-इंग्रजीमध्ये मात्र माध्यम-चिकित्सा मोठ्या प्रमाणावर होते आहे. मराठीमध्ये प्राध्यापक-पत्रकार जयदेव डोळे यांचा अपवाद वगळता माध्यम-चिकित्सा पुस्तकरूपानं फारशी झालेली नाही. हिंदी-इंग्रजीमध्ये ती लेख, पुस्तकं, ब्लॉग, पोर्टल अशा विविध स्वरूपांत आणि विविध पातळ्यांवर होते आहे. मराठीमध्येही माध्यमांविषयीची चर्चा दिशाहीन न होता, मूळ समस्येपासून न भरकटता शक्य तितक्या तटस्थपणे करता यावी, या विचारानं या वर्षीचा ‘अक्षरनामा दिवाळी अंक’ माध्यम-चिकित्सा करणारा आहे. अर्थात ही चिकित्सा सामग्ऱ्यानं होणार नाही, कारण या विषयाची व्याप्ती खूप मोठी आणि चौफेर आहे. पण शक्य तितक्या बाजूंचा, प्रश्नांचा आढावा या दिवाळी अंकातून घेण्याचा प्रयत्न केला आहे.

.............................................................................................................................................

क्लिक करा - http://www.booksnama.com

.............................................................................................................................................

या अंकाला ‘माध्यमांचं अधोविश्व | मीडिया का अंडरवर्ल्ड | Underworld of Media’ असं लांबलचक नाव दिलं आहे. ते दिलीप मंडल या हिंदीतील मान्यवर पत्रकाराच्या ‘मीडिया का अंडरवर्ल्ड’ या पुस्तकावरून घेतलं आहे. मराठीतील ज्येष्ठ, मान्यवर आणि तरुण पत्रकार-संपादकांनी वेगवेगळ्या बाजूंवर प्रकाश टाकणारे लेख या अंकात लिहिले आहेत. काही लेख हिंदी-इंग्रजीतून अनुवादित केले आहेत, तर काही पूर्वप्रकाशित लेखांचंही पुनर्मुद्रण केलं आहे. संपूर्णपणे नव्यानं लेख लिहून घेणं हा सर्वोत्तम पर्याय असला तरी अभ्यास, लेखन, वेळ यांचा मेळ घालणं तीन-चार महिन्यांच्या कालावधीत शक्य नाही. भारतीय माध्यमांच्या नेमक्या समस्यांचं भान असणारे लेखकही मराठीमध्ये पुरेशा प्रमाणात नाहीत आणि जे आहेत त्यांच्यापर्यंत पोहचणं, त्यांच्याकडून वेळेत लेख लिहून घेणं, ही वाटते तेवढी सहजसाध्ये गोष्ट नाही. त्यामुळे अनुवाद आणि पुनर्मुद्रण यांचा आधार घ्यावा लागला आहे. पत्रकारितेशी संबंधित नसलेल्या व्यक्तींचे मात्र लेख कटाक्षानं टाळलेले आहेत. त्याचं मुख्य कारण हेच आहे की, या माध्यमाची नीट माहिती नसताना त्याविषयी अधिकारवाणीनं भाष्य करण्याला अनेक मर्यादा असतात. सोशल मीडियावरची भारतीय माध्यमांविषयीची चर्चा हे याचं उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल.

आणि अशी चर्चा बाहेरच्यांनी करण्यापेक्षा माध्यमातल्यांनीच करणं केव्हाही श्रेयस्कर असतं. ती अधिक विश्वासार्ह असू शकते आणि सामग्ऱ्यानं विचार करणारीही.

‘अक्षरनामा’चा हा दिवाळी अंक या विषयावरचा मराठीतला निदान या वर्षीचा तरी एकमेव दिवाळी अंक असेल. ऑनलाईन मीडियामध्ये प्रवेश करून ‘अक्षरनामा’ला याच महिन्यात एक वर्ष होईल. वर्षभरात ‘अक्षरनामा’चं वाचकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केलं आहे. तसंच याही दिवाळी अंकाचं स्वागत केलं जाईल ही अपेक्षा आहे.

‘अक्षरनामा’ची पत्रकारिता हा भारतीय पत्रकारितेची परंपरा, प्रेरणा आणि आदर्श यांचा उत्तम संगम आहे, असा आमचा अजिबात दावा नाही. मात्र त्या दिशेनं टाकलेलं एक छोटंसं पाऊल आहे, हे सार्थ अभिमानानं आम्ही नक्की म्हणू शकतो. आपल्याविषयीची टीकात्मक चर्चा आपणच सुरू करणं हे भारतीय लोकशाहीच्या, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आणि भारतीय पत्रकारितेच्या निकोप वाढीसाठी पोषकच असतं, याच हेतूनं हा दिवाळी अंक तयार केला आहे. कारण अशा टीकात्मक चर्चेमुळे हेत्वारोप होण्याची, ते करण्याची संधी इतरांना फारशी मिळत नाही. ती मिळू नये या दिशेनं भारतीय माध्यमांची वाटचाल व्हायला हवी, अशी अपेक्षाही या अंकाच्या निर्मितीमागे आहे.

आजपासून ‘अक्षरनामा’चा हा दिवाळी अंक आठवडाभर रोज टप्प्याटप्प्यानं प्रकाशित होईल.

वाचकांनी आपल्या प्रतिक्रिया प्रत्येक लेखाच्या शेवटी द्याव्यात, स्वतंत्रपणे आम्हाला कळवाव्यात. त्यातून ‘अक्षरनामा’च्या पत्रकारितेलाही बळकटी मिळेल.

editor@aksharnama.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

Bhagyashree Bhagwat

Sat , 21 October 2017

Aaglya Weglya Vishayasathi Abhinandan ani Shubhechchha!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख