शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!
संकीर्ण - व्यंगनामा
श्रीनिवास जोशी
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 14 January 2026
  • संकीर्ण व्यंगनामा वोट चोरी Vote Chori भाजप BJP काँग्रेस Congress

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

विरोधी पक्ष निवडणूक लढवत का आहेत, असे परकला प्रभाकर यांचे म्हणणे होते! सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय होत नसतील, तर तुम्ही गांधीवादी पद्धतीने असहकाराचे तत्त्व वापरून जनतेच्या लक्षात हा सगळा मुद्दा का आणत नाही? सर्वोच्च न्यायालयाच्या वर जनतेचे कोर्ट नाही का, असे प्रभाकर म्हणत होते. असे सगळे होते तरीही विरोधकांनी ही निवडणूक लढवली. या मागे नक्की काही विचार होता का? ही निवडणूक आपण थोड्या तरी फरकाने जिंकू आणि बाजी उलटवू असे विरोधकांना वाटत होते का?

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

बिहारमधील निवडणुकीबाबत शिरोजीने फार काही लिहिले नव्हते. या निवडणुकीत काही अर्थ नाही, असे प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर म्हणत होते. त्यावर शिरोजी विचार करत होता. या निवडणुकीवर विरोधकांनी बहिष्कार टाकावा, असे मत परकला प्रभाकर यांनी अनेक वेळा व्यक्त केले होते. ‘वोट चोरी’, मतदार याद्यांमध्ये घातले गेलेले घोळ आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर बिहारमधील महिलांना दिले गेलेले १० हजार रुपये, असे सगळ्या प्रकारचे गोंधळ होत असतील, तर विरोधक निवडणूक लढवत तरी का आहेत, असा प्रश्न परकला प्रभाकर विचारत होते.

राहुल गांधी यांनी मुख्यत्वेकरून चार आरोप केले होते. एक म्हणजे, आमचे मतदार ‘डिलीट’ केले जात आहेत, दुसरे म्हणजे भाजप स्वतःचे डुप्लिकेट मतदार मतदार याद्यांमध्ये घुसडत आहे, तिसरे म्हणजे प्रत्येक निवडणुकीच्या आधी महिलांना कित्येक हजार रुपयांची लाच सरकारी पैसे वापरून दिली जात आहे, आणि चौथे म्हणजे निवडणूक आयोग भाजपला विकला गेला आहे. या सगळ्यावर उतारा म्हणजे सर्वोच्च न्यायालयाकडे जाणे. त्याबाबतीतही राहुल गांधी म्हणत होते की, सर्वोच्च न्यायालय कुठल्याही बाबतीत काहीही करणार नाही.

त्रयस्थपणे बघणाऱ्या माणसाला या सगळ्याच आरोपांमध्ये काहीतरी तथ्य आहे, असे जाणवत होते. एका एका पत्त्यावर दोन दोनशे मतदार कसे नोंदवले गेले आहेत, याचे पुरावे राहुल गांधी यांनीच दिले होते. विरोधकांचे मतदार राज्याबाहेरचे फोन वापरून ‘डिलीट’ कसे केले गेले आहेत, याचेही पुरावे त्यांनी दिले होते. ऐन निवडणुकीच्या तोंडावर काहीतरी योजना काढून महिलांच्या खात्यात पैसे टाकायची पद्धतच पडून गेली होती. ते तर सर्वांनाच दिसत होते. मतदार याद्या रिव्हाइज करायच्या म्हणजे बिहारमधील आठ कोटी मतदारांची तपासणी त्यांच्या घरोघरी जाऊन करायची. हे साधारणपणे आठ महिन्यांचे काम असते. हे सगळे काम निवडणूक आयोगाने केवळ अडीच महिन्यांत करायचा घाट घातला. तोही ऐन पावसाळ्यात! या कामामधल्या घिसाडघाईमुळे काय काय गोंधळ होत आहेत, हे पत्रकार अजित अंजूम, योगेंद्र यादव आणि इतर पत्रकारांनी सर्वोच्च न्यायालयापुढे मांडले होते. त्यावरून निवडणूक आयोग योग्य प्रकारे काम करत नाहिये, हेही सिद्ध होत होते.

राहुल गांधी म्हणत होते की, सर्वोच्च न्यायालयाकडून कुठल्याही बाबतीत काही आशा नाही. झालेही तसेच! मतदार याद्यांच्या पुनर्तपासणीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने काहीच निर्णय दिला नाही. याद्या योग्य आहेत असाही निर्णय नाही आणि याद्या अयोग्य आहेत असाही निर्णय नाही. या याद्या वापरून बिहारची निवडणूक झाली, तरीही निर्णय नाही. त्याची काही कारणे असतीलही, परंतु वेळेत निर्णय आला नाही, ही गोष्ट आपण त्रयस्थ निरक्षक म्हणून नाकारू शकत नाही.

महाराष्ट्रातसुद्धा २०२२ साली शिवसेना फुटली आणि उद्धव ठाकरे सरकार पडले. त्या वेळी पक्षांतरबंदी कायद्याचे पालन नीट झाले नाही म्हणून सर्वोच्च न्यायालयात खटला दाखल झाला होता. त्याबाबतसुद्धा निर्णय अजूनही लागलेला नाही. ती विधानसभा भंग होऊन पुढची विधानसभा निवडून आली, तरीही निर्णय नाही!

या सगळ्या गोष्टी अशा आहेत तर तुम्ही निवडणूक लढवताच का आहात, असे परकला प्रभाकर यांचे म्हणणे होते! सर्वोच्च न्यायालयाकडून निर्णय होत नसतील, तर तुम्ही गांधीवादी पद्धतीने असहकाराचे तत्त्व वापरून जनतेच्या लक्षात हा सगळा मुद्दा का आणत नाही? सर्वोच्च न्यायालयाच्या वर जनतेचे कोर्ट नाही का, असे प्रभाकर म्हणत होते.

असे सगळे होते तरीही विरोधकांनी ही निवडणूक लढवली. या मागे नक्की काही विचार होता का? ही निवडणूक आपण थोड्या तरी फरकाने जिंकू आणि बाजी उलटवू असे विरोधकांना वाटत होते का? सगळी महत्त्वाची राज्ये भाजप जिंकणार आणि कुणाला फारसा संशय येऊ नये, म्हणून एखाद दुसरे राज्य विरोधकांना जिंकू देणार, असे परकला प्रभाकर म्हणत होते. या पद्धतीने एखादी निवडणूक जिंकण्यापेक्षा निवडणुकांवर बहिष्कार टाकून हा मुद्दा ऐरणीवर आणणे महत्त्वाचे नाही का, असा प्रश्न परकला प्रभाकर विचारत होते.

त्यांच्या म्हणण्यात नक्कीच अर्थ होता. तरीही काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांनी बिहार निवडणूक का लढवली? याबाबतचा आपला विचार शिरोजीने आपल्या रोजनिशीमध्ये लिहून ठेवला आहे. तो लिहितो -

“निवडणुकींवर सत्याग्रह म्हणून बहिष्कार टाकणे, हा विचारच आजच्या राजकीय वातावरणात अशक्य वाटतो. याचे कारण असे की, असा सत्याग्रह करण्यावर आजच्या कुठल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वासच असू शकत नाही. राजकारण आज एक धंदा झाला आहे.”

शिरोजीचे खरे होते. मोदीकालीन भारतात राजकारणाकडे एक प्रचंड पैसे मिळवण्याचा धंदा म्हणूनच बघितले जात होते. काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल निवडणुकीच्या रिंगणात उतरले नसते, तर आमदार व्हायला हपापलेले आणि आसुसलेले लोक प्रशांत किशोर यांनी नव्याने स्थापन केलेल्या जनसुराज पार्टीकडे गेले असते. या शिवाय, अनेक छोट्या छोट्या पक्षांचा प्रभाव वाढला असता. बिहार निवडणुकीत विरोधी पक्षांना ज्या काही चाळीस जागा मिळाल्या त्याही मिळाल्या नसत्या. राजकारणात बाजूला फेकले जाण्याची भीती प्रचंड असते. त्यामुळे इच्छा नसूनही राहुल गांधी यांना निवडणूक लढवण्याचा निर्णय घ्यावा लागला असावा, हा शिरोजीचा विचार आज योग्य वाटतो.

तसं बघायला गेलं, तर एक महात्मा गांधी यांचा काळ सोडला, तर भारतात बाकी सर्व काळात सत्तेचा बाजारच मांडला गेला होता, हे शिरोजीला एक इतिहासकार म्हणून माहीत होते. शिवाजीमहाराज किंवा राणा प्रताप असे काही आदर्श राजे सोडले, तर बाकी सगळा सत्तेचा बाजारच! आर्थिक हितसंबंध आणि राजकारण यांचे साटे-लोटे हा प्रकार सार्वकालिक असतो. सत्तेमधून श्रीमंती येत असते. त्यामुळे सत्ताकारण मुळात पैशासाठीच केले जात असते. पैसा हाच सत्तेचा आधार असतो आणि सत्ता हाच पैशाचा फार मोठा स्रोत असतो, हे आपण कधीही विसरू शकत नाही. निष्पक्षपणे इतिहास लिहायचा असेल, तर हे भान असायलाच लागते.

महात्मा गांधी यांचा काल असा होता की, लोक आपल्या घरांवर, शिक्षणावर, स्वप्नांवर आणि संसारांवर तुळशीपत्र ठेवून चळवळीत उतरले होते. ते खरे कार्यकर्ते होते. त्यांचा त्याग ही गांधीजींच्या सत्याग्रहामागची खरी शक्ती होती. आज सगळे बाजारबुणगे स्वतःला ‘कार्यकर्ता’ म्हणवत होते. त्यांची कसली शक्ती आणि त्यांचा कसला सत्याग्रह!

शिरोजीने आपल्या रोजनिशीमध्ये लिहिले आहे – “तसे बघायला गेले तर, महात्मा गांधी आणि नेहरू यांच्या नंतरच्या काळात सत्तेचा बाजार पुन्हा एकदा यथास्थितपणे मांडला गेला होता. आधुनिक भारतात कॉंग्रेसनेच या प्रकाराचा पाया घातला होता आणि नरेंद्र मोदी यांनी त्यावर कळस चढवला होता. पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे चक्र अव्याहतपणे चालवण्याचा प्रयत्न म्हणजे १९८० सालानंतरच्या भारतातील राजकारण!”

अशा परिस्थितीत राहुल गांधी सत्याग्रह कसा करणार होते? पैशासाठी लाज सोडलेले राजकारण! टुच्च्या लोकांचे राजकारण! इथे शिरोजीने आदम गोंडवी यांचा शेर लिहून ठेवला आहे -

‘ग़ैरत मरी तो वाक़ई इंसान मर गया,

जीने की सिर्फ़ रस्म निभाए हुए हैं लोग ।’

(एखाद्या माणसाची लाज-लज्जा मरून गेली असेल तर समजावे की, खरं तर तो माणूसच मरून गेला आहे. आज सगळे लोक मानवी जीवन म्हणजे एक व्यवहार आहे, असे समजून जगताना दिसत आहेत.) खरेच होते! एखाद्याची लाज-लज्जा मरून गेली असेल, तर तो माणूस मेलेलाच असतो! इथे तर सगळे हपापलेले लोक! जो सत्तेवर आहे त्यालाच सूर्य मानून अर्घ्य देणारे लोक! एक व्यवहार म्हणून राजकारण करणारे लोक! मुर्दाड मनाचे लोक! 

इथेही आदम गोंडवी यांचा एक शेर शिरोजीने आपल्या रोजनिशीमध्ये लिहून ठेवला आहे  -

‘आँख पर पट्टी रहे और अक़्ल पर ताला रहे,

अपने शाहे-वक़्त का यूँ मर्तबा आला रहे ।’

(डोळ्यावर पट्टी राहू द्या, अकलेवर कुलूप राहू द्या,

जो सत्तेवर आहे त्याचा दबदबा कायम राहू द्या!)

लाज मरून गेलेली आणि न्याय मरून गेलेला! कायद्याने आखून दिलेल्या प्रक्रिया पाळल्या गेल्या, तरच न्याय नावाची गोष्ट समाजात सिद्ध होत असते. या प्रक्रियांनाच सुरूंग लावला जात होता. प्रकिया उदध्वस्त होत चालल्या होत्या. जी एसआयआर (स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन) करायला साधारण आठ दहा महिन्यांचा कालावधी लागतो, ती जर अडीच महिन्यांत केली गेली, तर प्रक्रियेचे गांभीर्य कुठे राहिले? प्रक्रिया मेली तर कायदा कुठे राहिला आणि कायदा मरून गेला, तर न्याय तरी कसा जिवंत राहणार? आपण कायद्याच्या कक्षेत वागत आहोत असे दाखवायचे, परंतु त्याच वेळी त्या कायद्यांच्या मागे असलेला प्रक्रिया मारून टाकायच्या! प्रक्रिया मारल्या गेल्या की, कायद्यामागचा न्यायाचा आत्मा मरून जातो! कसलीच लाज बाळगायची नाही, कसलाच विधिनिषेध बाळगायचा नाही.

जी गोष्ट एसआयआरची तीच गोष्ट पक्षांतर बंदी कायद्याची आणि तीच गोष्ट बाकी सगळ्या बाबतीत! सगळ्या बाजूंनी घेराबंदी झालेली आहे आणि तरीही लढत राहावे लागते आहे, अशी राहुल गांधी यांची अवस्था झाली होती.

राजकारणाची अशी अवस्था असताना अर्थव्यवस्थाही गोत्यात येत चालली होती. २५ सालच्या नोव्हेंबर डिसेंबरमध्ये रुपया कोसळू लागला. आयात वाढत चालली होती आणि निर्यात पाहिजे त्या प्रमाणात वाढत नव्हती. २५ ते २९च्या वयोगटातल्या युवकांमध्ये बेरोजगारी १४ टक्क्यांवर पोहोचली आहे, असे ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’ या संस्थेने सांगितले होते. भारतातली परदेशी गुंतवणूक कमी होत चालली होती. अशा अवस्थेत भारतीय अर्थव्यवथा ८.२ टक्क्यांनी वाढते आहे, असे भारतीय सरकार बिनदिक्कतपणे सांगत होते. भारतीय सरकारचे आकडे योग्य नाहीत, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजे आयएमएफने जाहीर केले होते. या संस्थेने भारताच्या आकडे संकलनाला ‘सी-ग्रेड’ दिली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर शिरोजीने आपली सत्ताविसावी बखर लिहिली होती!

शिरोजी आपल्या रोजनिशीमध्ये या काळाबाबत थोडा अस्वस्थ वाटतो. त्याने आपल्या रोजनिशीमधल्या एका कोऱ्या पानावर आदम गोंडवींचा एक शेर काहीही संदर्भ न देता लिहिला आहे -

‘जितने हरामख़ोर थे क़ुर्बो-जवार में

परधान बनके आ गए अगली कतार में!’

(आसमंतात जेवढे म्हणून हरामखोर होते, ते सगळे अगदी पहिल्या रांगेत येऊन बसले आहेत नेते म्हणून!)

काळ जसा जसा जास्त जास्त अस्वस्थ होत गेला, तशी तशी शिरोजीची बखर जास्त जास्त गहिरी होत गेलेली आपल्याला दिसते. आणि शिरोजीची बखर जशी जशी गहिरी होत जात आहे, तसा तसा आम्हाला मोठे संपादकीय लिहिण्याचा मोह होत चालला आहे. मोठे संपादकीय लिहिणे हा आमचा प्रमुख दोष आहे असे काही वाचक म्हणत असतात, पण आमचाही नाईलाज आहे. हे वाचक शिरोजीचे जेवढे मोठे ‘फॅन’ आहेत, तेवढेच मोठे फॅन आम्हीही आहोत, हे आम्ही नम्रपणे वाचकांच्या लक्षात आणून देतो आहोत आणि शिरोजीची सत्ताविसावी बखर वाचकांच्या स्वाधीन करत आहोत!

- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

पांडेजींच्या ठेल्यावर राघव, समर आणि भास्कर गेले, तेव्हा राजू तिथे आधीच येऊन बसला होता. त्याला बघून समर आणि भास्कर यांच्या पोटात गोळा आला. राजूचा आत्मा डावा होता, परंतु आधुनिक लिबरल लोक त्याला सहन होत नव्हते. फार काही वाचन न करता लिबरल झालेले हे लोक उजव्यांएवढेच भुरटे आहेत, असे त्याचे मत होते. एक गोष्ट खरी होती. लिबरल असणे हे माणूस इन्टलेक्च्युअल असल्याचे लक्षण आहे, असे मोदीकालीन भारतातील लिबरल मानत असत. तुम्ही लिबरल झालात की, इन्टलेक्च्युअल झालात असा साधा हिशोब होता. राजूला हे सहन होत नसे. इन्टलेक्च्युअल म्हणजे वाचन हवे आणि चिंतनक्षमताही हवी, असे त्याचे म्हणणे होते. तो उजव्या लोकांना प्रश्न विचारून हैराण करत असे आणि डाव्यांनाही प्रश्न विचारून तोंडावर पाडत असे. त्यामुळे राजूला ठेल्यावर येऊ द्यायचे नाही, असे दोन्ही बाजूंनी ठरवले होते. पांडेजींच्या ‘नो नॉनसेन्स’ जीवनदृष्टीचा राजू चाहता होता. पांडेजींनाही त्याचा बेबाकपणा आवडत होता. राजू पांडेजींना भेटायला येत असे. असा तो आलेला असतानाच राघव, समर आणि भास्कर आले. त्यामागोमाग राघवने मेसेज करून ठेवलेला असल्यामुळे नाना, अविनाश आणि अच्युतही आले.

राजू - पांडेजी तुमचा ठेल्याला युद्धभूमीचा स्टेटस द्यायला पाहिजे.

अविनाश - नाही ही विजयभूमी आहे, मोदीजींच्या विजयाचे उत्सव मनवले जातात येथे. तेसुद्धा डाव्यांच्या छातीवर नाचून!

राजू - आत्ता कुठला विजय मनवायला आला आहात!

अविनाश - अर्थातच बिहारचा! २४३पैकी २०२ जागा!

राजू - यात मोदीजींचा विजय नक्की कुठे झाला?

अविनाश - सगळीकडे! सगळ्या २०२ जागांवर!

राजू - नीतीशकुमार २०१५ साली जेव्हा काँग्रेस आणि राजदबरोबर गेले होते, तेव्हा मोदीजींना बिहारमध्ये किती जागा मिळाल्या होत्या माहीत आहे का?

अविनाश - किती?

राजू - तेव्हा लालू, नीतीश आणि काँग्रेस मिळून १७७ जागा मिळाल्या होत्या.

राघव - आणि भाजपला ५४.

राजू - आता सांग अविनाश, विजय मोदीकाकामुळे झाला की, नीतीशबाबूमुळे?

अविनाश - विजय मोदीजींचाच. त्यांनीच नीतीशला डरा-धमका के आणले आहे आपल्या बाजूला.

नाना - योग्य अलायन्स केला मोदीजींनी! चाणक्यनीती!

राजू - या अलायन्समध्ये तुम्ही ड्रायव्हर्स सीटवर आहात. नीतीशकुमारांना मुख्यमंत्रीपद का द्यावं लागलं तुम्हाला?

अविनाश - मोदीजी नीतीशकुमारपेक्षा जास्त लोकप्रिय आहेत.

समर - हो का? मग १० हजार रुपये का द्यावे लागले बायकांची मतं मिळवायला?

भास्कर - आणि डुप्लिकेट वोटर्स का आणावे लागतात तुम्हाला?

नाना - काय प्रूफ आहे तुमच्याकडे?

राजू - डुप्लिकेट वोटर्स नव्हते, तर फायनल मतदार याद्या मतदानाच्या आदल्या रात्री का जाहीर केल्या तुम्ही? आधी जाहीर करायच्या होत्या!

भास्कर - आधी जाहीर केल्या असत्या, तर विरोधी पक्षांनी ज्या पत्त्यांवर अनेक मतदार नोंदलेले आहेत ते शोधून काढले असते.

नाना - मोदी कुणाला घाबरत नाही. ‘हिंदूराष्ट्र’ येणार म्हणजे येणारच!

अविनाश - आता पुढच्या निवडणुकीत नीतीशकुमार ८० वर्षांचे असतील. त्यांना कोण विचारतंय तेव्हा? बिहार मग आमचाच. मग लगेच ‘हिंदू राष्ट्र’!

राजू - नीतीशकुमारांच्या मागे ज्या जाती आहेत, त्या त्यांच्या पोराच्या मागे उभ्या राहिल्या तर काय करायचं?

अविनाश - त्या कशाला त्यांच्या पोराला भाव देतील?

राजू - लालूच्या पोरामागे नाही का उभे राहिले यादव आणि मुसलमान?

अविनाश - तू गप रे!

राजू - आणि नीतीशकुमार ८० वर्षांचे होतील, तेव्हा मोदीजी काय ३५ वर्षांचे होणार का? ते दोघे एकाच वयाचे आहेत ना?

नाना - आपण हरलो आहोत, हे तुम्ही लिबरल लोकांनी मान्य करायला पाहिजे आता! 

भास्कर - मोदीजींनी बायकांना पैसे न देता आणि कुठल्याही पक्षाशी आघाडी न करता जिंकून दाखवावं, आम्ही मान्य करू!

नाना - नीतीशकुमारांचे आमदार पळवले जातील.

राजू – अरे, तुम्ही ७०-७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकांचे आमदार फोडून दाखवा पहिल्यांदा. मग नीतीशकुमरांच्या गोष्टी करा!

अविनाश - मोदीजींना अशक्य असे काही नाही, पण मोदीजी शक्यतो प्रेमानं काम घेतात!

राजू - म्हणून असे आरोप असलेल्या लोकांना उपमुख्यमंत्री केलं आहे का त्यांनी?

भास्कर - उपमुख्यमंत्री आणि आणि अर्थमंत्री पण! (जोरात हसतो)

अविनाश - हे बघ, माणसं घडवायला लागतात राजकारणात! समजून घ्यावं लागतं त्यांना!

राजू - मग त्या चांगल्या सोनम वांगचुकला का नाही समजून घेत?

अविनाश - तो ‘टेररिस्ट’ आहे!

राजू - तो ‘टेररिस्ट’ आहे म्हणून ३० आतंरराष्ट्रीय पुरस्कार दिले आहेत का जगभरच्या लोकांनी त्याला?

समर - आणि आठ डॉक्टरेट्स!

अविनाश - चोर लोक आहेत सगळे! मोदीजींना विरोध करणाऱ्या माणसाला उचलून धरायचं. सहन होत नाहिये भारताचा उत्कर्ष या लोकांना!

राजू - भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या लोकांना उपमुख्यमंत्रीपद आणि सोनम वांगचुकला जेल!

राघव - जो तुमच्या विरोधात जाईल तो ‘टेररिस्ट’ आणि जो तुम्हाला सत्ता मिळवून देईल त्याला तुम्ही ‘घडवायला’ जाणार!

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

लाज मरून गेलेली आणि न्याय मरून गेलेला! कायद्याने आखून दिलेल्या प्रक्रिया पाळल्या गेल्या, तरच न्याय नावाची गोष्ट समाजात सिद्ध होत असते. या प्रक्रियांनाच सुरूंग लावला जात होता. प्रकिया उदध्वस्त होत चालल्या होत्या. जी एसआयआर (स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन) करायला साधारण आठ दहा महिन्यांचा कालावधी लागतो, ती जर अडीच महिन्यांत केली गेली, तर प्रक्रियेचे गांभीर्य कुठे राहिले? प्रक्रिया मेली तर कायदा कुठे राहिला आणि कायदा मरून गेला, तर न्याय तरी कसा जिवंत राहणार? आपण कायद्याच्या कक्षेत वागत आहोत असे दाखवायचे, परंतु त्याच वेळी त्या कायद्यांच्या मागे असलेला प्रक्रिया मारून टाकायच्या! प्रक्रिया मारल्या गेल्या की, कायद्यामागचा न्यायाचा आत्मा मरून जातो! कसलीच लाज बाळगायची नाही, कसलाच विधिनिषेध बाळगायचा नाही.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

भास्कर - काय साली वेळ आली आहे भारतावर!

राजू - (अचानक) तुम्हा लिबरल लोकांमुळे आली आहे ही वेळ!

समर - (हसत) आमच्यामुळे? ती कशी बाबा?

राजू - आम्ही लिबरल आहोत, आम्ही लिबरल आहोत, असं म्हणत तुम्ही ‘डर्टी पॉलिटिक्स’ करत बसला ३० वर्षं! १९८० ते २०१४ असं ‘डर्टी पॉलिटिक्स’ केलं तुम्ही! तुमच्या xxx तुमच्या!

राघव – अरे, शिव्या का देतो आहेस?

राजू - या xxxना पहिल्यांदा जोड्यानं मारलं पाहिजे.

राघव - (हसत) असं का म्हणतो आहेस?

राजू - लिबरल राजकारणानं या काँग्रेसवाल्यांना सत्ता दिली, पण राजकारण लिबरल ठेवलं नाही यांनी!

राघव - बरोबर आहे तुझं!

राजू - त्या इंदिरा गांधींनी भ्रष्टाचारी लोकांना स्थान दिलं राजकारणात पहिल्यांदा! तिथून ही पैशाच्या राजकारणाची सगळी घाण राजकारणाच्या नदीत उतरली! त्या बाईंनी आणीबाणी लावली सत्तेसाठी, दबाव टाकला सर्वोच्च न्यायालयावर सत्तेसाठी! तेव्हा तसे वागलात तुम्ही आणि आता दुसऱ्या कुणी दबाब टाकला सर्वोच्च न्यायालयावर तर तुम्हाला वाईट वाटतं का? तुम्ही दबाव टाकला सर्वोच्च न्यायालयावर तेव्हा गळा घोटाला जात नव्हता का लोकशाहीचा?

राघव - बरोबर बोलतो आहेस तू राजू!

राजू - यांच्या xxx यांच्या! त्या राजीव गांधींनी शाहबानो प्रकरणात शेण खाल्लं!

(शाहबानो म्हणून एक मुसलमान तलाक पीडिता होती. तिला आधुनिक कायद्याप्रमाणे पोटगी द्यावी, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने १९८५ साली दिला. त्यावर मौलवी लोकांनी हलकल्लोळ केला. राजीव गांधी सरकारकडे तेव्हा तीन चतुर्थांश बहुमत होतं. त्याचा उपयोग करून त्यांच्या सरकारनं संसदेत कायदा करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय रद्दबातल ठरवला. त्यांच्या या कृतीवर त्या काळी मोठी टीका केली गेली होती. - संपादक

पांडेजी - राजीव गांधी सरकार का वो बहुत गलत निर्णय था!

राजू – त्या वेळी हिंदू मतदारच्या मनात पहिल्यांदा खोलवर रुतलं की, हे साले मुसलमान लोकांचा अनुनय करणारे आहेत. तिथं भारतातल्या लिबरल वातावरणावर पहिला घाव बसला!

राघव - खरं आहे.

राजू - त्यानंतर भाजपला खरा सपोर्ट मिळायला लागला! नाहीतर भाजपची औकात काय होती? दोन सीट्स मिळाल्या होत्या लोकसभेच्या यांना १९८४ साली.

राघव - काँग्रेसी लोकांनी भ्रष्टाचार वाढवला! काँग्रेसी लोकांनी मुल्ला-मौलवी लोकांचा अनुनय केला! सामान्य मुसलमानाचा अनुनय केला असता, तरी चाललं असतं एकवेळ! पण तुम्ही धर्मांध लोकांचा अनुनय केला! मग घ्या आता!  खूप साऱ्या हिंदूंचा विश्वास गमावून बसला आहात तुम्ही आता. 

राजू - तुमच्याकडे सत्ता होती, तेव्हा सगळ्याच प्रकारच्या हिंसक करवाया तुम्ही थंडपणे घेतल्या. कारण तुम्हाला सगळ्यांचीच मतं हवी होती. भिंद्रानवालेला सुरुवातीला तुम्हीच चुचकारलं, तो डोईजड झाल्यावर सुवर्णमंदिरात लष्कर घुसवलंत! त्या नंतर इंदिरा गांधींची हत्या झाली! त्यांच्या हत्येनंतर हजारो शीख मारले गेले! त्या दंगलीत भाग घेणाऱ्या काँग्रेसच्या कुणा नेत्याला शिक्षा झाली का? त्यानंतर बाबरी! बाबरी मस्जिद पाडण्याच्या केसमध्ये भाजपच्या कुणा नेत्याला शिक्षा झाली का? त्यानंतर गोध्रा केसमध्ये कुणा नेत्याला शिक्षा झाली का?

अविनाश - तुमचा बाप उतरायला पाहिजे गोध्रा केसमध्ये कुणाला शिक्षा करायची असेल तर!

राजू - भडक बोलू नकोस.

राघव - मुद्दा एवढाच आहे की, काँग्रेसने लिबरल वातावरणाला खतपाणी घातलं नाही. तत्त्व पाळण्यासाठी कष्ट घ्यायचे असतात, नुकसान सहन करून तत्त्वांना महत्त्व द्यायचं असतं, तेव्हा प्रत्येक वेळी तुम्ही मतपेटीला प्रेफरन्स दिला. तत्त्वांपेक्षा सत्ता गोड लागली प्रत्येक वेळी तुम्हाला!

राजू - आता ती शाहबानो शाप देते आहे तुम्हाला! बसा आता बोंबलत! प्रत्येक निवडणुकीत २००पैकी २५ जागासुद्धा मिळत नाहियेत तुम्हाला!

नाना - काँग्रेसने फार बोटचेपेपणा केला! पाकिस्तानी बॉम्बस्फोट काय, ताज हल्ला काय! काय केलं तुम्ही?

राघव - नाना, उरी, पठाणकोट, पुलवामा आणि पहलगाम नंतर प्रत्येक वेळी मोदीजींनी ‘घर में घुस के मारेंगे’ वगैरे घोषणा दिल्या.

नाना - दिल्याच! वो मोदी हैं!

राघव - एकदोन दिवसाच्या चकमकीसुद्धा केल्या प्रत्येक वेळी!

अविनाश - हो केल्या! मोदी हैं तो मुमकिन हैं!

राजू - मग थांबले नंतर हल्ले?

राघव - केवळ चकमकींवर का थांबला तुम्ही?

अविनाश - जरब बसली आहे पाकिस्तानला!

राजू - आता दिल्लीमध्ये हल्ला झाला नोव्हेंबरमध्ये. त्यानंतर तुम्ही काय केलं?

राघव - या वेळी ‘घर में घुस के मारेंगे’ वगैरे ऐकू नाही आलं.

राजू – ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये आपली विमानं पाडली गेली म्हणून का?

अविनाश - आपण ते युद्ध जिंकलं आहे.

राघव - मग आपण घेतलेली २६च्या २६ राफेल विमानं ओळीनं मांडून का दाखवत नाहिये आपण जगाला?

नाना - (चिडत) मोदीजी आहेत म्हणजे सगळं सुरक्षित आहे.

राजू - आम्हाला मान्य आहे ते. फक्त दिल्ली स्फोटांनंतर ‘घर में घुस के मारेंगे’ वगैरे ऐकू आलं नाही म्हणून आमच्या मनात प्रश्न आला एवढंच! 

राघव – ‘ऑपरेशन सिंदूर’चा अनुभव आणि सध्याचं हे शांततेविषयीचं प्रेम यांचा काही संबंध नाहिये ना?

अविनाश - तोंड सांभाळून बोल! मोदीजी आहेत तिथं समर्थ सगळं बघून घ्यायला!

राजू - प्रश्नच नाही, पण जनता फार बारीक नजरेनं बघत असते म्हणून चेक करून घेतो आहे. आपली विमानं पाडण्याची पाकिस्तानची औकात नाही हे मान्य! पण सगळं जग चर्चा करतंय तर विमानं दाखवून विषयावर पडदा टाकायला हवा आपण एकदा!

राघव - परत एकदा ‘घर में घुस के मारेंगे’ वगैरे ऐकू यायला हवं!

अविनाश - तुम्हाला तुरुंगात टाकायला हवं एकदा!

राजू - एकदा काय दहादा टाका! पण मग त्या आधी एकदा विमानं दाखवा की प्लीज! आम्ही अगदी आनंदानं तुरुंगात जाऊ!

भास्कर - ए, पाडली असतील का रे आपली विमानं?

राजू - शक्यच नाही! माझा अजिबात विश्वास नाही, पण चर्चा सुरू आहे, तर आपण जगाला विमानं दाखवून टाकायला हवीत एकदाची.

अविनाश - काही गरज नाही. तुमच्यासारखे चोंगे सोडले तर सगळ्या भारतीय जनतेला नक्की माहिती आहे की, मोदी ये क्या चीज हैं!

राजू - बायकांना पैसे न वाटता निवडून या म्हणावं एकदा मोदीजींना!

अविनाश - कसला हलकट माणूस आहे हा! ए भास्कर याला बंदी करा आपल्या ग्रूपमध्ये यायला! देशद्रोही!

भास्कर - नाही त्याला बोलू दे!

अविनाश - हा देशद्रोही तुमचीसुद्धा चेष्टा करतोय मघापासनं !

भास्कर - करू दे त्याला!

नाना - हा माणूस चांगला नाहिये. फार प्रश्न विचारतो आहे तो!

अविनाश - नॉनसेन्स!

समर - लोकशाहीमध्ये प्रश्न विचारले जाणार! राजूचे विचार पटले नाहीत, तरी ऐकून घ्यावे लागणार!

भास्कर - शाहबानो प्रकरणात काँग्रेसवाले चुकले हे मान्य करून पुढे जावे लागणार आपल्याला! राजूचे बरोबर आहे. काँग्रेसने अतिरेकी वृत्तीकडे क्षमाशील वृत्तीने बघितले, हेसुद्धा मान्य करावे लागणार आपल्याला!

राघव - लोक बघत असतात आणि विचार करत असतात, हेसुद्धा लक्षात ठेवावे लागणार आपल्याला!

राजू - विमाने पाडली गेली आहेत यावर आपला विश्वास नसला, तरी ती विमाने एकदा दाखवा, असे स्पष्टपणे म्हणावे लागणार आपल्याला!

राघव - आणि त्यासाठी तुरुंगात जावे लागले तरी चालेल, असे मनापासून म्हणावे लागणार आपल्याला!

समर - हे लोकशाहीचे व्रत आहे.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

मोदीकालीन भारतामध्ये लिबरल तत्त्वज्ञानावर गंभीर प्रसंग ओढवला होता. उजव्या पक्षांचा मतदार बौद्धिकदृष्ट्या अपरिपक्व असतो, ही गोष्ट नाकारता येत नाही. याचा फायदा घेऊन लिबरल लोक प्रत्येक चर्चा जिंकत राहतात, ही गोष्ट जगभर दिसून येते. मोदीकालीन भारतातसुद्धा तेच होत होते. लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले! लिबरल लोकांनी आत्मचिंतन करणे आवश्यक होते… आणि राहुल गांधी यांनी कार्यकर्ते कसे तयार होतील, हे पाहायला हवे होते.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

राजू - आणि अजून एक करा! कोणीतरी त्या राहुल गांधींना सांगा माझ्यातर्फे की बाबा, बाजारबुणगे हाताशी घेऊन निवडणुका नाही जिंकता येणार! खरे कार्यकर्ते तयार करायला लागणार! चोर, उच्चक्के, बदमाश असे लोक नेते म्हणून बसले आहेत, त्यांना हटवायला लागणार. आणि तुला नसेल हे जमणार तर गप्प बस तू! आम्हीही गप्प बसू दुसरा कोणी महात्मा गांधी येईपर्यंत!

भास्कर - हे तुझं जरा जास्तच होत आहे राजू!

समर – अरे, इतकी काही वाईट परिस्थिती नाहिये.

राजू - बदमाश लोक सत्तेवर येतात, तेव्हा ते काही चांगलं लक्षण नसतं.

राघव - काँग्रेसने शाहबानो प्रकरण केले, तेव्हा लोकांनी लक्षात ठेवले सगळं. आता ७० हजार कोटीवाल्यांना भाजपवाले मंत्री करतायत हे नाही का लोक लक्षात ठेवणार? ‘घर में घुस के मारेंगे’ म्हणणारे मोदीजी दिल्ली बॉम्बस्फोटानंतर एकदम गप्प झाले आहेत, हे का नाही लोकांच्या लक्षात आलेलं असणार?

समर - चोर, गुंड आणि मवाली लोकांना नेते बनवल्यामुळे काँग्रेस बुडाली हे तू सांगतो आहेस राजू आणि आज बघायला गेलास तर हेच चोर, गुंड आणि मवाली लोक भाजपमध्ये गेले आहेत. भाजपचीही काँग्रेसच झाली आहे. काँग्रेसचं जे झालं तेच भाजपचं होणार राजू!

भास्कर - लोक सगळं बघतायत राजू!

राजू - आता हे लोक बेसुमार पैसा वाटून निवडणुका जिंकायला लागले आहेत.

भास्कर - इतके पैसे किती दिवस वाटता येणार? कुठून येतो हा पैसा हे माहीत आहे का तुला?

राजू - छापत असणार बेजबाबदारपणे!

भास्कर - (हसतो) नाही अजून तेवढी लाज बाळगली जाते आहे या देशात. नाहीतर रुपया ३००वर गेला असता. हे लोक सरकारी बाँड विकून कर्ज घेतात आणि ते पैसे बायकांना देतात.

भास्कर - आता या कर्जाचे व्याज भरावं लागणार आपल्याला!

राजू - कधी?

भास्कर - पुढच्या १५ वर्षांत!

समर - म्हणजे ही व्याज भरण्याची डोकेदुखी त्या वेळच्या सरकारांची आहे!

राजू - पण यांची निवडणूक जिंकून झाली ना!

राघव – अरे, पण असे लाख लाख कोटी किती दिवस देऊ शकणार आहेत हे लोक ?

राजू  - त्यावर एक नवीन आयडिया काढली आहे या लोकांनी! ही नवीन आयडिया लक्षात आली नाहिये फार कुणाच्या. महाराष्ट्रात दर महिन्याला ‘लाडक्या बहिणीं’ना दीड हजार रुपये द्यायचा खर्च किती?

भास्कर - किती?

राजू - पाच वर्षात ७२ हजार कोटी रुपये. मध्य प्रदेशात ‘लाडली बहनां’ना दोन हजार रुपये द्यायचा खर्च किती?

भास्कर - किती?

राजू - पाच वर्षांत एक लाख कोटी रुपये.

समर - बाप रे!

राजू - आता बिहारमध्ये ही दर महिन्याची भानगड या लोकांनी रद्द केली. आता एकदाच १० हजार रुपये द्यायचे. बायकांनी म्हणे या पैशातून उद्योग सुरू करायचे! (जोरात हसतो) हे दहा हजार द्यायचा खर्च किती? दहा हजार कोटी रुपये!

भास्कर - दोन दोन हजार रुपये पाच वर्षं देऊन लाख कोटी घालवण्यापेक्षा एकदाच एकदम दहा हजार द्यायचे! म्हणजे दहा हजार कोटीमध्ये निवडणूक निघाली.

राजू - हा पैसा सरकारी! कर्ज काढून तयार केलेला. याचं व्याज भरलं जाणार आपण दिलेल्या करांमधून! आणि भाजपवाले बायकांना सांगतायत काय - मोदीने पैसा दिलाय, आता त्याला मत नाही दिलं तर तुमच्या अंगावर कोड उठणार!

अविनाश - काय मास्टरस्ट्रोक आहे मोदीजींचा!

नाना - तुम्ही कितीही चर्चा करा, तो माणूस ऐकणार नाही तुम्हाला!

राजू – अरे, हा मास्टरस्ट्रोक नाहिये, नतद्रष्टपणा म्हणतात याला!

अविनाश – ‘हिंदूराष्ट्र ’के लिए कुछ भी! यड्या बायकांना पैसे द्यायचे आणि सांगायचं की, मत नाही दिलं तर तुमच्या अंगावर कोड उठेल! (हु हु हु!)

नाना - (गालातल्या गालात हसत) मोदी हैं तो मुमकिन हैं!

राजू – अरे, यात हिंदू धर्माला अभिमान वाटावं असं काही नाहिये.

नाना - याला ‘चाणक्य नीती’मध्ये ‘शठे शाठ्यं समाचरेत’ असं म्हणतात! ठकासी असावे महाठक!

अविनाश - व्हॉट शॉट नाना! इतका वेळ या लोकांनी चर्चा केली, पण तुम्ही एका शॉटमध्ये सगळा खेळ खलास केला यांचा.

नाना - या लोकांना कळत नाहिये, पण आता लोकशाहीचे दिवस भरले आहेत. आता एकदा लोकसभेत आणि राज्यसभेत दोन तृतीयांश बहुमत आलं की, घटना बदल नक्की!

अविनाश - वो दिन अब दूर नही! ‘हिंदू राष्ट्र’ आ चुका हैं!

राजू - खरं आहे तुमचं. पुन्हा एकदा महात्मा गांधी येईपर्यंत करा मजा!

राघव – अरे, काय बोलतो आहेस राजू? या देशात ३० टक्के दलित आहेत. म्हणजे झाले किमान ४० कोटी लोक. त्यांच्या महामानवानं दिलेली घटना हे भाजपचे हे चिमूटभर लोक बदलू शकणार आहेत का?

भास्कर - हे चाणक्य वगैरे बोलायला ठीक आहे, पण सत्तेसाठी पंजाबच्या शेतकऱ्यांसमोर लोटांगण घालणाऱ्या मोदीकाकाला ४० कोटी दलितांचा राग सहन होणार आहे का?

राघव – अरे, हे एवढे भारी असते तर बायकांची मतं मिळवयाला दहा दहा हजार कोटी रुपये यांना खर्च करावे नसते लागले यांना!

अविनाश - दोन तृतीयांश बहुमत आलं की, डोळे उघडतील तुमचे!

समर - कसलं दोन तृतीयांश बहुमत घेऊन बसला आहेस अविनाश, एक साधा बिहार एकट्याने जिंकून दाखवा म्हणावे!

राजू - माझा तुला पाठिंबा आहे अविनाश! या लोकांना मोठं बहुमत मिळू शकतं. अगदी दलितसुद्धा काही करू शकणार नाहीत.

राघव - (मोठ्यानं हसतो) तिकडे रुपया कोसळायला लागला आहे बघा म्हणावे! नव्वदच्या पार गेला आहे! रुपया असाच कोसळत राहिला ना, तर जे बाँड विकून पैसा उभा करताय निवडणूक जिंकायला तोच नाही उभा करता येणार! आता पैसे घेऊन मतं द्यायची सवय लावली आहे तुम्ही बायकांना! आता जर पैसे संपले तर ५०सुद्धा जागा नाही जिंकू शकणार आपले मोदीकाका!

भास्कर - (जोरात हसतो)

राजू - (अजून गंभीरच) बायकांना पैसे वाटण्याच्या या प्रकरणात एक गोष्ट मात्र चांगली झाली आहे.

भास्कर - कोणती?

राजू - इतके दिवस समाजाचे बहुतेक स्तर सरकारी पैशावर हात मारत होते. बायकाच मागेच राहिल्या होत्या. त्यांचाही स्टेक तयार झाला आहे सरकारी पैशांवर हात मारण्यात आता! फार चांगली गोष्ट झाली! बायकांना डावलून कुणाला निवडणूक नाही जिंकता येणार आता भारत देशात!

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! राजू नावाचे पात्र बखरीमध्ये विराजमान झाले! ते आणि त्याची भूमिका शिरोजीच्या मनात खूप महिने रेंगाळत होती. या पूर्वी त्याने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. ते पात्र आता शिरोजीच्या मनामध्ये पूर्णपणे तयार झाले होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा… मोदीकालीन भारतात सर्वदूर तयार झालेल्या व्यवहारवादामुळे नैराश्याच्या गर्तेत गेलेला… आणि ‘महात्मा गांधीना पुन्हा एकदा यावे लागणार’, असे म्हणणारा हळवा राजू! त्याचे दुःख त्याच्या जिभेला धार देत राहते!

मोदीकालीन भारतामध्ये लिबरल तत्त्वज्ञानावर गंभीर प्रसंग ओढवला होता. उजव्या पक्षांच्या मतदारांकडे शहाणपण कमी असते, ही गोष्ट नाकारता येत नाही. याचा फायदा घेऊन लिबरल लोक प्रत्येक चर्चा जिंकत राहतात, ही गोष्ट जगभर दिसून येते. मोदीकालीन भारतातसुद्धा तेच होत होते. लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले! लिबरल लोकांनी आत्मचिंतन करणे आवश्यक होते… आणि राहुल गांधी यांनी कार्यकर्ते कसे तयार होतील, हे पाहायला हवे होते. असो!

पुन्हा एकदा असो! या बखरीत अनेक विषय अपूर्ण राहिले आहेत. विशेषतः मोदी सरकार किती दिवस लाखो-कोटी रुपये खर्च करून निवडणुका जिंकू शकणार होते हा प्रश्न! भारताची अर्थव्यवस्था तेवढी सक्षम होती का? या सगळ्याची चर्चा शिरोजीने पुढच्या बखरीत केलेली आहे. ते सगळे आपण वाचणारच आहोत! तोपर्यंत आम्हाला आणि शिरोजीला रजा द्यावी, ही विनंती!

- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......