“तुम्हारी फ़ाइलों में गाँव का मौसम गुलाबी हैं
मगर ये आँकड़ें झूठे हैं ये दावा किताबी हैं” - अमन गोंडवी
भारताची अर्थव्यवस्था प्रचंड वेगाने धावत आहे, वाढत आहे असे दावे केले जात होते. जीडीपी ६.५ टक्के वेगाने वाढत आहे, ७.८ टक्के वेगाने वाढत आहे, असे सांगितले जात होते. सगळी प्रजा सुखात आहे, फक्त नतद्रष्ट आणि देशद्रोही लोक, अर्थव्यवस्थेचे काही खरे नाही असे म्हणत आहेत, असे सांगितले जात होते. मोदीभक्त डोळे झाकून यावर विश्वास ठेवत होते, विरोधकांना ‘मूर्ख’ आणि ‘नतद्रष्ट’ म्हणत होते. त्याचबरोबर मोदीजी हे एक लोकप्रिय नेता आहेत. त्यामुळेच जनता त्यांना निवडणुकीमागून निवडणुकीत निवडून देत आहे, असे सांगितले जात होते. भक्त लोक हवेत होते. मोदीजी मोठे ‘द्रष्टे’, ‘व्हिजनरी’ आहेत, ते सतत काम करत असतात, या कामातून देशाचा प्रचंड विकास होत असतो आणि त्यामुळे मोदीजी सतत निवडून येत राहतात, असे हे यशाचे ‘गुजरात मॉडेल’ आहे, असे सांगितले जात होते.
भक्तांच्या या दोन्ही कल्पनांना २५ सालच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात सुरुंग लागले. एकतर राहुल गांधी यांनी देशभर ‘वोट चोरी’ कशी केली जात आहे, याचे पुरावे द्यायला सुरुवात केली. शहाण्या लोकांच्या डोळ्यापुढे काजवे चमकले. हे होते ना होते तोच भारतभरातून विद्यार्थी आंदोलनांच्या बातम्या येऊ लागल्या. ही होती विद्यार्थ्यांची बेरोजगारी विरुद्धची आंदोलने.
यातून दोन प्रश्न उभे राहिले. एक म्हणजे, जनता कुणावर आतोनात प्रेम करत असेल तर कुणाला ‘वोट चोरी’ करावीशी का वाटावी? आणि दुसरे म्हणजे, ज्या देशाची आर्थिक प्रगती अतोनात वेगाने होत आहे, त्या देशात बेरोजगारीविरुद्ध आंदोलने का व्हावीत?
राहुल गांधी म्हणू लागले होते की, देशाच्या विकासाचे ‘गुजरात मॉडेल’ असा कसलाही प्रकार अस्तित्वात नाहिये आणि तो कधीच नव्हता. एका बाजूला मीडियाला हाताशी धरून राष्ट्रभक्तीच्या आणि विकासाच्या बाता मारत राहायचे, दुसऱ्या बाजूला सत्तेचा उपयोग करून विरोधकांना चिरडत राहायचे आणि तिसऱ्या बाजूला ‘वोट चोरी’ करून निवडणुका जिंकत राहायचे, अशी नतद्रष्ट नीती म्हणजेच ‘गुजरात मॉडेल’!
शिरोजी आपल्या रोजनिशी मध्ये लिहितो - “राहुल गांधी म्हणत आहेत यावर अनेक लोकांचा विश्वास बसू लागला आहे. एक म्हणजे, राहुल गांधी यांनी १८ सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन मतदारयाद्यांमधून काँग्रेसचे मतदार गाळण्याचे षडयंत्र उघड पाडले. त्यावर निवडणूक आयोग काहीही उत्तर देऊ शकला नाही. कर्नाटकाच्या मतदारयाद्यांमधून हजारो मतदार गाळण्याविषयीचे अर्ज कर्नाटकमधील मतदारांच्या नावावर केले गेले, पण हे अर्ज ज्यांच्या नावावर केले गेले होते, त्यांच्या फोननंबरवरून केले गेलेच नव्हते. ते सगळे फोननंबर कर्नाटकच्या बाहेरचे होते. म्हणजे माझ्या नावावर जो अर्ज जातो आहे तो दुसऱ्या कुणाच्या तरी फोन नंबर वरून जातो आहे? म्हणजेच इथे एक ऑर्गनाइझ्ड षडयंत्र काम करते आहे? जे कोणी हे काम करत आहेत ते संविधानविरोधी आहेत, राष्ट्रद्रोही आहेत आणि सायबर गुन्हेगार आहेत.”
शिरोजी पुढे लिहितो - “हे सगळे बघता आपण काय निष्कर्ष काढायचा? यासाठी आपल्याला आपल्या कल्पनाशक्तीला वापर करावा लागेल. शेरलॉक होम्ससुद्धा एखादी केस सोडवताना कल्पनाशक्तीचा वापर करत असे. त्याने त्याच्या ‘हाऊंड ऑफ बॅस्करव्हिल्स्’ या कथेत कल्पनाशक्ती वापरताना काय पथ्य पाळायचे असते, हे लिहिले आहे. त्याचे एक वाक्य आहे - “The scientific use of imagination, but always founded upon solid fact.” (कल्पनाशक्तीचा इमला सॉलिड फॅक्टसच्या पायावर म्हणजे वस्तुस्थितीच्या पायावर उभारायचा असतो.)
एवढे लिहून झाल्यावर शिरोजी लिहितो - “इथे वस्तुस्थिती काय आहे? एक म्हणजे मतदारांना माहीत नसताना त्यांच्या नावावर अर्ज केले गेले आहेत. दुसरे म्हणजे गुन्हेगार लोकांना असे अर्ज वेगळ्याच फोनवरून करता आले आहेत. असे केले जात असताना निवडणूक आयोगाने त्यांना कुठलाही अटकाव केलेला नाहिये. तिसरे म्हणजे एवढे सगळे होऊनही निवडणूक आयोग या गुन्ह्याचा तपास करता येईल, यासाठी लागणारी माहिती तातडीने करून उपलब्ध करून देत नाहिये. चौथे म्हणजे हा गुन्हा सिद्धीस गेला असता, तर फायदा कुणाचा झाला असता, याचा विचार व्हायला पाहिजे? पाचवे म्हणजे निवडणूक आयोग तपासाला लागणारी माहिती देत नाहिये, म्हणजे गुन्हेगार फार मोठे असणार.”
आज शंभर वर्षांनंतर शिरोजीची रोजनिशी वाचत असताना फार मौज वाटते. आपल्या वाचकाला आपल्याला पाहिजे, त्या निष्कर्षाकडे ढकलण्याची शिरोजीची हातोटी विलक्षण होती. स्वतः कुठेही न अडकता तो हे काम अगदी निष्णातपणे करत असे. आपल्या वाचकाच्या बुद्धिमत्तेविषयी शिरोजीला विलक्षण विश्वास वाटत होता.
शिरोजी लिहितो - “आपण वाचकाला फक्त रस्ता दाखवावा. निष्कर्षाच्या गावाला वाचकाने स्वतः जावे. आपण स्वतः वाचकाबरोबर निष्कर्षाच्या गावाला कशाला चालत जायचे? घटनेने प्रत्येक नागरिकाला देशाचे सर्वोच्च नेतृत्व निवडण्याची जबाबदारी दिलेली आहे, त्याला आपल्या देशातील सर्वोच्च चोर कोण आहे, याबाबत निष्कर्ष काढता आले पाहिजेत.”
थोडक्यात, एका बाजूने विद्यार्थी आंदोलने आणि दुसऱ्या बाजूला ‘वोट चोरी’चे आरोप, असे हे राजकीय वादळ २०२५ सालच्या ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये घोंगावू लागले होते.
अर्थात या सगळ्यावर अंधभक्तांचा विश्वास बसणे अशक्य होते. अंधभक्त म्हणजे अंधभक्त! पण अशी भक्तसंख्या भारत देशात किती असणार होती? पाच टक्के, दहा टक्के, पंधरा टक्के! मूर्ख लोक समाजात असून असून किती असणार? बाकीचे लोक कधी ना कधी आपल्या खांद्यावर आपले डोके असल्यासारखे वागणारच होते. तो प्रकार २५ सालच्या ऑगस्ट आणि सप्टेंबरनंतर खऱ्या अर्थाने हळूहळू सुरू झाला.
ही सारी परिस्थिती कशी तयार झाली? याची कारणे नरेंद्र मोदी यांच्या अर्थनीतीमध्ये लपलेली आहेत, असे शिरोजीचे म्हणणे होते. शिरोजी स्वतः अर्थशास्त्रज्ञ नव्हता, परंतु तो सर्व प्रकारच्या अर्थतज्ज्ञांचे काय म्हणणे आहे ते समजून घेत होता.
भारतात त्या वेळी सगळ्या जगात सुरू असतो, तसाच वाद सुरू होता. एक बाजू म्हणत होती- मोठ्या उद्योगपतींना मोठे होऊ द्या. त्यांच्याकडे मोठी स्किल्स असतात, मोठी दृष्टी असते, त्यांना मदत करा. त्यांना कर्ज द्या, कर्ज माफी द्या, कर सवलती द्या. ते मोठे झाले की, नोकऱ्या तयार होतील. समाजात पैसा खेळू लागेल, डिमांड वाढेल आणि आर्थिक प्रगती होईल.
दुसरी बाजू म्हणत होती - समाजातल्या खालच्या स्तराकडे पैसा द्या, त्याला कर्जसुविधा द्या, कर्जमाफी द्या, त्याला आपल्या पायावर उभे राहू द्या. अशा प्रकारे डिमांड वाढली की, मोठे उद्योगसुद्धा अजून अजून मोठे होत जातील. हे लोक म्हणत होते की, मोठे उद्योगपती समाजाचा विचार करत नाहीत, ते आपल्या उद्योगाच्या हिताचा विचार करतात. त्यांना मदत करून अर्थव्यवस्थेचा फारसा फायदा होत नाही.
मोदीकालीन भारतात हे दोन्ही प्रकार केले गेले, नाही असे नाही. दोन्ही बाजूंना होईल तेवढी आर्थिक सवलत दिली गेली, नाही असे नाही, परंतु काही निर्णयांमुळे समाजाच्या खालच्या स्तराची आर्थिक अवनती होत राहिली. मोदींनी केलेल्या नोटबंदीमुळे खालच्या स्तराकडचा पैसा संपला. त्या काळामधील खूप सारे व्यवहार काळ्या पैशात होत असत. हा पैसा हातातून कमी झाल्यामुळे या वर्गाकडे भांडवलच उरले नाही. त्याचे हाल सुरू झाले.
या पार्श्वभूमीवर मोदीजींनी ‘जीएसटी सुधारणा’ आणले. मोदीकालीन भारतात करचुकवेगिरी फार होती. जीएसटीमुळे करचुकवेगिरी अवघड झाली. त्या काळी व्यापारी वर्गात इतकी स्पर्धा होती की, करचुकवेगिरी करणे हाच फायदा कमवण्याचा मार्ग होता. नोटबंदीमुळे भांडवल कमी झाले आणि जीएसटीमुळे फायदाही कमी झाला. त्यापाठोपाठ कोव्हिडची साथ आली. मोदीजींनी देशात फक्त पाचशे रुग्ण असताना कडक लॉकडाउन केला. तीन महिने संपूर्ण भारत बंद होता. आधीच भांडवल आणि फायदा कमी झाला होता, आता संपूर्ण व्यापारच ठप्प झाला. यातला एखादा फटका लोक सहन करू शकले असते, परंतु एकामागून एक असे तीन तीन फटके सहन होणे अशक्य होते. छोट्या लोकांची ‘बिझनेस सायकल्स’ मोडून पडली.
आज २१२५ साली आपल्याला ऐकायला विचित्र वाटते, परंतु त्या काळी ‘काळा पैसा’ हा अर्थकारणाचा कणा होता आणि चुकवलेला कर हा व्यापाऱ्यांच्या फायद्याचा एक प्रमुख भाग बनून राहिला होता. काळा पैसा हेच भांडवल आणि चुकवलेला कर हाच फायदा असा सगळा प्रकार होता. ही सगळी व्यवस्था मोडून पडली.
अगदी आजही बघायचे झाले, तर ‘बिझनेस सायकल’ खंडित झालेले कुणाला परवडणारे असते? कर्ज येत राहणे, व्यापार होत राहणे, फायदा होत राहणे, झालेल्या फायद्यामधून कर्जाचे हफ्ते आणि एकूण खर्च जात राहणे, हे आवश्यक असते. एकदम सगळे लॉकडाउनमध्ये गेले तर फायदा थांबतो, हफ्ते चालू राहतात, दुकानाची भाडी चालू राहतात, ‘बिझनेस सायकल’ मोडते. थोडक्यात, मोदीकालीन भारतात तीन-तीन झटके बसल्यामुळे छोटे व्यावसायिक गोत्यात आले. हेच क्षेत्र भारतातील रोजगारनिर्मिती करणारे होते. तेच गोत्यात आल्यामुळे बेरोजगारी अर्थातच वाढली आणि दर वर्षी वाढतच गेली.
धंदा कमी झाला, रोजगार कमी झाला, त्यामुळे समाजातला पैसा कमी झाला. मागणी घटली. अशा रीतीने समाजातील डिमांड घटल्यामुळे मोठ्या उद्योगांनीसुद्धा आपली गुंतवणूक कमी केली. त्यामुळे या सगळ्या दुष्टचक्राचा फास अजून घट्ट झाला. कॉर्पोरेट क्षेत्राला एक लाख कोटीची कर सवलत दिली होती, तिचा फारसा फायदा झाला नाही. ते पैसे धंद्यात गुंतवले जातील असे वाटले होते, ते काही झालेच नाही. करसवलतीमुळे हातात आलेला पैसा उद्योगपतींनी राखून ठेवला. गुंतवला नाही. मागणी घटली असताना धंद्यामध्ये कोण पैसे अडकवेल? गरीब गेले खड्ड्यात, त्यांना रोजगार मिळावा म्हणून कोणी धंदा करत असते का? धंदा फायद्यासाठी केला जात असतो.
मोठा गोंधळ माजला! या सगळ्या गोंधळात पैसेवाले तरून गेले. आदम गोंडवी यांनी लिहिलेच आहे -
‘लगी है होड़-सी देखो अमीरी और ग़रीबी में
ये पूँजीवाद के ढाँचे की बुनियादी ख़राबी हैं’
श्रीमंती आणि गरिबीमध्ये आपापल्या हितांचा हा असा संघर्ष सतत सुरू असतो! भांडवलशाही व्यवस्थेमधली ही सगळ्यात मोठी खराबी असते.
हा सगळा प्रकार सुरू असताना, बेरोजगारी वाढत आहे, असे प्रा. अरुण कुमार आणि प्रा. संतोष मेहरोत्रा यांच्यासारखे अनेक अर्थशास्त्रज्ञ सांगत राहिले, पण त्यांच्याकडे कुणी लक्ष दिले नाही.
गंमत म्हणजे या काळातल्या बेरोजगारीचे सरकारी आकडे अत्यंत आशादायक होते. जून २०२५मधील बेरोजगारी केवळ ५.६ टक्के आहे, असे सरकार सांगत होते. याचा अर्थ असा की, भारतातील ५५ कोटी कामगारांपैकी तीन कोटी लोकांकडे काम नव्हते. अर्थातच मोदी सरकारने दिलेल्या या आकड्यांवर अर्थशास्त्रज्ञांचा विश्वास बसला नाही. ‘रॉयटर’ या वृत्तसंस्थेने अर्थशास्त्रज्ञांमध्ये याबद्दल ‘ओपिनियन पोल’ घेतला. त्यात ७० टक्के अर्थशास्त्रज्ञांचे मत पडले की, भारतातला बेरोजगारीचा दर किमान ११ टक्के तरी आहे. म्हणजे ५५ कोटी कामगारांपैकी ६ कोटी लोकांकडे काम नाही.
हे झाले किमान कामाबद्दल. २५ साली भारतात १८ ते २८ वयोगटात सुमारे २० कोटी तरुण होते. यांना अधिकारी व्हायचे होते, मोठी मोठी कामे करायची होती. या सगळ्या प्रकारामध्ये या मुलांना त्यांच्या महत्त्वाकांक्षेला अनुसरून कामे मिळेनात. सगळ्यांच्या आशा सरकारी नोकऱ्यांवर केंद्रित झाल्या. सरकार तरी किती नोकऱ्या देणार? असा दबाब वाढल्यामुळे स्टाफ सिलेक्शन कमिशन, पब्लिक सर्व्हिस कमिशन वगैरे परीक्षांमध्ये भ्रष्टाचार वाढला. एकामागून एक पेपर ‘लीक’ होऊ लागले. काही ठिकाणी तर सलग चार-चार वेळा पेपर लीक झाले. वर्षानुवर्षे भरतीशिवाय जाऊ लागली. या परीक्षांसाठी वयोमर्यादा असत. एकही परीक्षा न देता विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपू लागली! प्रचंड असंतोष माजला!
अशा रीतीने पंचवीस ते तीस कोटी अस्वस्थ लोकांचा समूह मोदीकालीन भारतात तयार झाला. ही सगळी अस्वस्थता रस्त्यावर उतरू लागली होती.
आज शंभर वर्षांनंतर हे सारे वाचताना त्या काळामधील तरुणाईविषयी मन भरून येते. बिहार, लडाख, उत्तराखंड, कर्नाटक अशा ठिकाणी तरुणाई रस्त्यावर उतरू लागली. अशा गोष्टी कशा हाताळायच्या याविषयी मोदी सरकारचे ‘टूल-किट’ तयार होते. या आंदोलनांकडे दुर्लक्ष करणे, लाठीचार्ज करणे, विद्यार्थी नेत्यांना तुरुंगात टाकणे, त्यांना देशद्रोही म्हणणे, असे सगळे प्रकार सुरू झाले.
शिरोजीने आपल्या बखरीचे सव्विसावे प्रकरण याविषयी लिहिले आहे. प्रस्तावना थोडी लांबली आहे, परंतु या वेळी पार्श्वपटाचा विस्तार फार मोठा असल्याने आमचाही इलाज नव्हता! तरीही आम्ही वाचकांची क्षमा मागत आहोत आणि बखर वाचकाच्या हाती सुपूर्द करत आहोत.
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
.................................................................................................................................................................

वर्गणी भरण्यासाठी क्लिक करा - Pay Now
.................................................................................................................................................................
सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात लडाखमधील तरुणाईने रस्त्यावर उतरून जाळपोळ केली. लेहमधील भाजपचे ऑफीस जाळले. लडाखचे गांधीवादी नेते सोनम वांगचुक हे लडाखला राज्याचा दर्जा मिळावा म्हणून उपोषणाला बसले होते. त्यांच्याबरोबर इतरही कार्यकर्ते उपोषणाला बसले होते. त्यातल्या दोघांची तब्येत बिघडली आणि हिंसा सुरू झाली. सरकार म्हणू लागले, हा हिंसाचार सोनम वांगचुक यांनी फैलावाला आहे. विरोधक म्हणू लागले की, मूलतः अमन-पसंद लदाखी लोकांच्या मागण्यांकडे आणि बेरोजगारीकडे सरकारने पाच वर्षे दुर्लक्ष केल्यामुळे हा हिंसाचार झाला.
पांडेजींच्या ठेल्यावर भास्कर, समर, राघव बसले होते. अचानक अविनाश मोबाईल फडकवत आला.
अविनाश - त्या हरामखोर सोनम वांगचुकला मोदीजींनी अटक केली.
(त्याच्या मागोमाग येत आणि खुर्चीवर बसत)
नाना - राष्ट्रीय सुरक्षा कायद्याखाली अटक केली आहे, म्हणजे आता बेल पण मिळणार नाही लवकर! (हु हु हु)
अविनाश - आता किती वेळ आत बसेल म्हातारा?
नाना - किमान वर्षभर. (हु हु हु)
भास्कर - अरे तो गांधीवादी कार्यकर्ता म्हणून जगभर प्रसिद्ध आहे, जगातल्या प्रतिष्ठित पर्यावरणवाद्यांमधला एक आहे. त्याला अशी अटक करून आपल्याच तोंडाला काळं काय लावून घेताय?
अविनाश - शटाप! तो ‘देशद्रोही’ आहे!
नाना - आणि मोदीजींच्या प्रतिष्ठेची तुम्ही नका काळजी करू.
अविनाश - सगळे राष्ट्रप्रमुख त्यांना फोन करतात एखादी समस्या निर्माण झाली की! आज जगात अशी एकही गोष्ट नाहिये की, जी मोदीजींना विचारून केली जात नाही.
समर - ट्रम्पने मोदीजींना विचारूनच भारतीय मालावर १०० टक्के टॅरिफ लावलंय का?
अविनाश - ए तू गप रे! फालतू माणूस!
भास्कर - ट्रम्पने पाकिस्तानवर किती टॅरिफ लावलंय माहिती आहे का?
अविनाश - २०० टक्के असेल.
समर - १९ टक्के आहे.
अविनाश - फालतू माणूस आहे ट्रम्प!
नाना - त्याला भीती वाटतीय भारताची!
अविनाश - मोदीजी चीनकडे झुकले तर काय अशी भीती वाटतीय त्याला, म्हणून आक्रस्ताळेपणा चालला आहे.
नाना - भारताने आपल्याकडे यावे म्हणून चीन मोदीजींचे पाय चाटतोय.
भास्कर - मोदीजींचे पाय चाटण्यासाठीच चीनने ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये पाकिस्तानला मदत केली का?
अविनाश - काहीतरी बोलू नकोस.
भास्कर - (फोनमध्ये बातमी सर्च करत) हे बघ, लेफ्टनंट जनरल राहुल सिंग म्हणाले आहेत की, युद्ध चालू असताना चीनने ‘रिअल टाईम इंटेलिजन्स’ दिला पाकिस्तानला.
नाना - पाकड्यांना इंटेलिजन्स नसल्यामुळे सल्ला द्यावाच लागतो.
राघव – अहो, युद्धाच्या भाषेत ‘इंटेलिजन्स’ म्हणजे ‘हेरगिरी’.
(मोदीभक्त यांच्यात लॉजिक आणि भाषा या दोन्हींचे पराकोटीचे दौर्बल्य दिसून येत असे. या दोन्ही गोष्टींचा अभाव हे मोदीभक्तीचे प्रमुख क्वालिफिकेशन होते. - संपादक)
नाना - ते तुम्हाला नाही कळायचे. खूप गहन गोष्टी आहेत या.
(चर्चेत दांडके उडाले की, विरोधकांना बौद्धिकदृष्टया कमी प्रतीचे लेखून आपल्या मांडीखाली घ्यायचा प्रयत्न हिंदुत्ववादी दुढ्ढाचार्य करत असत. असे करणे अत्यंत बावळटपणाचे लक्षण आहे, हे त्यांच्या लक्षात येत नसे. - संपादक)
भास्कर - कसल्या केळाच्या गहन गोष्टी?
नाना - तुम्हाला नाही कळायच्या त्या!
राघव - ते सगळे बाजूला राहू दे. चीनने पाकिस्तानला मदत केली, असं तुमचा लेफ्टनंट जनरल म्हणतो आहे आणि मोदीजी नंतर चीनला जाऊन त्या शी जिन पिंगला मिठ्या मारतायत हा काय प्रकार आहे? आणि ‘मोदी इज माय क्लोज फ्रेंड’ असं म्हणून तो ट्रम्प भारतावर १०० टक्के टॅरिफ लावतो आहे, हाही नक्की काय प्रकार आहे?
नाना - खूप गहन गोष्टी आहेत या. एकदा बोलू आपण. इथं रस्त्यावर या गोष्टी नकोत, शांतपणे बोलू आपण. तूर्तास देशाची सगळी सूत्र एका अत्यंत स्ट्राँग माणसाच्या हातात नियतीने दिली आहेत, एवढंच तुम्ही लक्षात ठेवा आणि शांत राहा.
समर – अहो, तो ट्रम्प बेचाळीस वेळा म्हणाला आहे की, मी ‘युद्ध थांबवा’ असा दम दिला म्हणून युद्ध थांबलं.
अविनाश - खोटं आहे हे!
समर - मग तसं सांगा ट्रम्पला.
नाना - मोदीजींनी लोकसभेमध्ये सांगितलं की, कुणाच्याही सांगण्यावरून युद्धबंदी झालेली नाही म्हणून.
भास्कर - ट्रम्पचं नाव घेऊन का नाही सांगितलं?
नाना - त्या गहन गोष्टी आहेत. मोदीजी गोष्टी शांततेने घेतात.
भास्कर - मग तेच तत्त्व सोनम वांगचुकना अटक करताना का नाही अनुसरलं?
नाना - त्या गहन गोष्टी आहेत तुम्हाला नाही कळायच्या?
राघव - सोनम वांगचुक ट्रम्पसारखं तुमचं काही वाकडं करू शकत नाही, म्हणून तुम्ही त्याला पटकन अटक केली का?
अविनाश - तोंड आवर राघव. तू आदरणीय नानांशी बोलतो आहेस, हे लक्षात ठेव.
(आदरणीय लोकांना प्रश्न विचारायचे नसतात, असा समज अंधभक्तांमध्ये होता. कुणीही कितीही आदरणीय असला, तरी तो काही बाबतीत मूर्खपणा करू शकत असतो, हे भक्तांच्या लक्षात येत नसे. भक्त ही एक प्रकारची बौद्धिक मेंढरे होती. मेंढरांचे हे खास वाण ‘व्हॉटसअॅप युनिव्हर्सिटी’मध्ये अनेक प्रकारचे संशोधन करून तयार केले गेले होते! - संपादक)
राघव – अरे, त्या सोनम वांगचुकला मेगॅसेसे अवॉर्ड मिळालंय, रोलेक्स अवॉर्ड मिळालंय, अशी ३० अवॉर्ड मिळाली आहेत जगभरातून.
समर - त्याला जगातल्या आठ विद्यापीठांनी सन्माननीय डॉक्टरेटस् दिल्या आहेत.
नाना - या असल्या बुद्धिजीवी लोकांचा काही उपयोग नसतो!
राघव - तुम्हाला पाहिजे ते म्हणा तुम्ही, वांगचुकला अटक केल्यामुळे मोदी राजवट काय आहे, ते आज सगळ्या जगाला कळून चुकले आहे.
भास्कर - तुमच्या नाकर्तेपणामुळे लडाखच्या मुलामुलींना नोकऱ्या नाहीत. त्यामुळे ते रस्त्यावर उतरले आहेत. आणि हे लपवण्यासाठी तुम्ही वांगचुकने हा हिंसाचार पसरवला आहे, असं पसरवायचा प्रयत्न करताय.
समर - त्याला पाकिस्तानी एजंट म्हणताय, चीनी एजंट म्हणताय, सीआयएचा एजंट म्हणताय.
अविनाश - आहेच तो!
राघव - कशावरून?
नाना - राहील तो जेलमध्ये वर्षं दोन वर्षं, त्याच्या बरोबर रस्त्यावर उतरलेल्या विद्यार्थ्यांचे नेतेसुद्धा राहतील जेलमध्ये. त्यांची सगळी मस्ती उतरली की, बघू आपण कोण कोणाचे एजंट आहे ते!
(अविनाश हु हु हु करून हसतो)
राघव - सत्तेचा उन्माद! सगळं कसं पारंपरिक पद्धतीनं चाललंय. मला नहुषाच्या उन्मादाची आठवण येते आहे.
अविनाश - कसला नहुष?
राघव - महाभारतातलं आख्यान आहे. नहुष तप करून इंद्रपद घेतो. नंतर तो मस्तवाल होतो. उन्माद करू लागतो. ऋषींचे अपमान करू लागतो. शेवटी तर तो आज्ञा देतो की, आता माझी पालखी ऋषी वाहून नेतील. ऋषी त्यालाही होकार देतात. ऋषी त्याची पालखी आपल्या खांद्यावर वाहून नेऊ लागतात. मग तो एक दिवशी पालखी हळू चालली आहे, म्हणून अगस्ती ऋषीला लाथ मारतो. अगस्ती ऋषीच्या रागात त्याचे इंद्रपद नष्ट होते आणि तो तीन हजार वर्षांसाठी अजगर बनून पडून राहतो.
भास्कर - म्हणजे सोनम वांगचुकला अटक करून ऋषीला लाथ मारली आहे मोदीजींनी.
अविनाश – अरे, वेड्या ऋषी व्हायला माणूस हिंदू असायला लागतो, वांगचुक बौद्ध आहे. (हु हु हु)
(अंधभक्तांचे धर्म आणि जातीचे ऑब्सेशन बघण्यासारखे होते. - संपादक)
समर - माणूस धर्माने नाही कर्माने ऋषी बनतो. मारायच्या आहेत लाथा तुम्हाला वांगचुकला तर जरूर मारा!
नाना - पण आमचे मोदीजी इंद्र नाहीच आहेत मुळी! ते अवतार आहेत विष्णूचा!
अविनाश - व्हॉट अ शॉट नाना!
भास्कर - मग तुमचा हा अवतार नहुषासारखा का वागतो आहे?
समर - व्हॉट अ शॉट भास्कर!
नाना - वांगचुक कंस आहे.
अविनाश - व्हॉट अ शॉट नाना!
पांडेजी - एक बात समझिए नानाजी, सोनम वांगचुक को अरेस्ट कर मोदीजीने अच्छा काम नहीं किया हैं!
अविनाश - उस कंस मामा को अटकानाही चाहिए था!
पांडेजी - मोदीजीको समझना चाहिए की, आपके होते हुए, उरी हुआ, पुलवामा हुआ, पहलगाम हुआ, मणिपूर हुआ, किसान आंदोलन हुआ, लडाख आंदोलन हो रहा हैं. कभी तो जिम्मेदारी उठानी चाहिए. हर बार बाहर की साजिश, बाहर की साजिश? ऐसे कैसे चलेगा?
अविनाश - हर बार बाहरी साजिश होती हैं. हमारे मोदीजी क्या क्या करेंगे? एकटा मोदीजी काय काय करेगा?
समर - त्यांना म्हणावे ११ वर्षे झाली. बाहेरची कारस्थाने थांबवता येत नसतील, तर दुसऱ्या कुणाला तरी प्रयत्न करू द्या.
अविनाश – अरे, झटतो आहे तो महात्मा देशासाठी झटू द्या त्याला. देशाचं भाग्य आहे आपल्या.
समर – अरे, सगळे इतके छान चालू आहे, तर सोनम वांगचुकसारख्या इतर महात्म्यांना अटक करायची वेळ का येते आहे तुमच्या महात्म्यावर?
पांडेजी - मैं फिर एक बार कहता हूँ, सोनम वांगचुकजी को अरेस्ट करना बहुत गलत बात हैं. आंदोलन हिंसक हो जाते हैं कभी कभार, अपने नेता के मना करने के बावजूद भी हिंसा हो जाती हैं!
नाना - हे बघा, तुम्ही तुमच्या अकला चालवू नका. आहेत ना मोदीजी तिथं? बघून घेतील ते!
अविनाश - व्हॉट अ शॉट नाना!
राघव - हे बघा, स्टूडंट प्रोटेस्ट हाताळायची ही पद्धत नाहिये. फार संवेदनशीलतेने हाताळाव्या लागतात या प्रोटेस्टेस!
अविनाश - xxxना तुरुंगात टाकले की, सगळी संवेदनशीलता येईल बाहेर यांची!
राघव - हे बघा, त्यांना नोकऱ्या नाहियेत. तो राग आहे मूळचा!
नाना - अभ्यास करायचा नाही, बोंबलत फिरायचं, पोरी फिरवायच्या बाईकवरून, नेटवर फालतूपणा करायचा आणि मग मोदीकडे नोकरी मागायची. असं कसं चालेल? तो एकटा मोदी काय करणार आहे?
(आपल्या विरोधकांचे दानवीकरण ही मोदीभक्तांची मोठी नादान खोड होती. मोदीभक्तच नव्हे, पण एकूण मोदीप्रणित ‘इकोसिस्टीम’चीच ही खोड होती. नंतर ही खोडच या लोकांना महागात पडली, हे इतिहासाने आपल्याला दाखवून दिले आहे. - संपादक)
भास्कर – अहो, अभ्यास करणारे मुलं-मुली असतात की!
समर - परवा उत्तराखंडमध्ये सर्व्हिस कमिशनचे पेपर फुटले पंधरा-पंधरा लाख रुपयांत. विद्यार्थी रस्त्यावर आले. एक विद्यार्थी म्हणत होता की, आम्ही पंधरा पंधरा तास अभ्यास करायचा आणि हे लोक पंधरा-पंधरा लाखांत पेपर फोडणार!
अविनाश - आक्रस्ताळा xxवा!
नाना - तो ‘नकल जिहाद’ होता.
अविनाश - मुसलमान लोकांना पकडलं आहे पेपर फोडले म्हणून.
नाना - मुसलमान लोक पेपर फोडत आहेत.
राघव - मग मोदीजी काय करत होते तेव्हा?
पांडेजी - (गालातल्या गालात हसत) वांगचुक को और मुसलमानों को गिरफ्दार किया हैं ना, सब होने के बाद!
भास्कर - सब होने के बाद! (जोरात हसतो)
अविनाश - (दात-ओठ चावत) तो ‘नकल-जिहाद’ होता!
(मोदीकालात कट्टरातल्या कट्टर मुसलमानालाही माहीत नसतील, एवढे जिहाद ‘मोदी-इकोसिस्टीम’ने शोधून काढले होते. पेपर लीक झाले की, ‘पेपर-लीक जिहाद’; मुसलमानाने भज्यांची गाडी टाकली की, ‘भजी-जिहाद’; मुसलमान पाठीवर बांगड्यांचे गाठोडे टाकून बांगड्या विकू लागला की, ‘बांगडी-जिहाद’ असे असंख्य प्रकार! मुसलमान लोकांना समाजसेवा करायचीसुद्धा सोय उरली नव्हती. मुसलमानाने पाणपोय टाकली की, ‘पानी-जिहाद’, समाजसेवा संस्था काढली की, ‘समाजसेवा-जिहाद’! कुठल्याही बुद्धी असलेल्या माणसाच्या डोक्यात बसणारा हा प्रकार नव्हता. हिंदीमध्ये जेवढी नामे आणि क्रियापदे होती, तेवढे जिहाद मुसलमान लोकांनी छेडले आहेत, असे भक्तांचे म्हणणे होते. पुढे काँग्रेसचे राज्य आले तेव्हा कपटी मुसलमान लोकांनी हे सर्व ‘जिहाद’ बंद करून टाकले. - संपादक)
राघव - तो ‘नकल जिहाद’ होता, तर झाल्यावर कळला का तुम्हाला? पोरांनी नोकऱ्यांशिवाय किती दिवस थांबायचं! त्यांच्या नैराश्याचं काय?
नाना - तुम्हाला सुचवायचं काय आहे? या देशाचं करायचं काय आहे तुम्हाला?
राघव - आक्रस्ताळेपणा करू नका नाना, आम्ही काहीच करणार नाही आहोत. पोरं निराश झाली आहेत एवढंच म्हणत आहोत.
भास्कर - गेली अकरा वर्षं तुमचं सरकार आहे. आज युवक रोजगार मागत असेल, तर त्याला उत्तर द्यायची तुमची जबाबदारी आहे.
नाना - कशाला उत्तरं द्यायची? भारताला ‘आर्थिक सुपरपॉवर’ केलं आहे मोदीजींनी.
भास्कर - आर्थिक महासत्तेमध्ये रोजगारासाठी आंदोलने होत नाहीत. अमेरिकेमध्ये बेरोजगार लोकांचं शेवटचं आंदोलन १९३२ साली झालं होतं.
समर - इथं रोज ३२ आंदोलनं होतायत.
अविनाश - तुम्हाला सगळ्यांना तुरुंगात टाकलं पाहिजे. युवकांच्या असंतोषाचे जनक.
राघव - (हसत) अरे, आम्ही गप्पा मारणारे लोक आहोत. आम्हाला एकदम टिळकांच्या पदाला का नेतो आहेस? युवकांच्या ‘असंतोषाचे जनक’ म्हणे!
अविनाश - पाकिस्तानी, खलिस्तानी, चीनचे एजंट, सीआयएचे हस्तक.
समर - पंजाबच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं की, खलिस्तानी, कामगारांनी आंदोलन केलं की, ‘अर्बन नक्षल’; महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं की, ‘रूरल नक्षल’; लदाखने आंदोलन केलं की, चीनी हस्तक; विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं की, अभ्यास नको असलेले चरसुंडे… च्यायला तुम्ही लोक दमत कसे नाही?
भास्कर - सरकारमध्ये तुम्ही आहात कधीतरी जबाबदारी घ्या जनतेच्या दुःखांची!
पांडेजी - आपका ये सब टूल-किट पुराना हुआ हैं! बहुत घिसापीटा! अब जिम्मेदारी उठानी पड़ेगी.
भास्कर - नाहीतर गुजरात मॉडेलला काहीतरी नवीन ट्रिक काढायला सांगा. ट्रिका तरी किती दिवस चालणार म्हणा!
राघव - ट्रिका परमनंट चालत नाहीत म्हणून मग नवीन मॉडेल आणली आहेत ना ‘वोट-चोरी’ची!
समर – ‘वोट चोरी’ करून निवडून यायचं, मग कसली जनता, कसली तिची दुःख, कसली आंदोलनं, कसल्या जबाबदाऱ्या उचलणं, कसलं उत्तरदायित्व आणि कसली लोकाभिमुखता!
अविनाश - कशावरून म्हणतोय राहुल गांधी हे सगळं? त्याला आणि तुम्हाला उत्तरं द्यायला लागणार आहेत.
समर - आयला हे मोदीकाका पंतप्रधान झाल्यापासून सगळं उलटंच झालं आहे. लोकशाहीमध्ये विरोधक प्रश्न विचारतात आणि सरकार उत्तरं देतं. इथं सरकार प्रश्न विचारतंय आणि विरोधकांनी म्हणे उत्तरं द्यायची! (जोरात हसतो)
भास्कर - एवढीच हौस असेल प्रश्न विचारायची तर खुर्ची खाली करा आणि विरोधी पक्षात बसा.
अच्युत - (एकदम) ही लोकशाही आहे, सरकारात बसायचं असेल, तर जबाबदारी घ्यावीच लागणार आणि उत्तरं द्यावीच लागणार.
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
अच्युत एकदम एक वाक्य बोलला होता. संपूर्ण चर्चेमध्ये तो शांत होता. २०१४ साली अच्युत ‘मोदीभक्त’ होता, आता तो ‘मोदी-विरोधक’ बनला होता. ‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका. ‘गोदी मीडिया’ची ‘झूठ की फॅक्टरी’ जोरात सुरू होती.
शिरोजीला तरुणाईबद्दल वाईट वाटत होते. अभ्यास करायच्या काळात त्यांना आंदोलने करायला लागत होती. आपण ‘अर्बन नक्षल’ आहोत, ‘पाकिस्तानी’ आहोत, अशी दूषणे ऐकायला लागत होती. यातून काही वेडेवाकडे होऊ नये, अशी शिरोजीची इच्छा होती. आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, या गोष्टींना लोकशाहीने एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ म्हणून स्थान दिलेले असते, परंतु मोदीशासनाला याची जाणीव आहे, असे शिरोजीला वाटत नव्हते. मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते.
युवकांची स्वप्ने आणि सत्तेचा गर्व एकमेकांसमोर उभे होते. शिरोजीने अदम गोंडवी यांच्या ओळी आपल्या रोजनिशीमध्ये लिहिल्या आहेत-
‘उधर जम्हूरियत ढोल पीटे जा रहे हैं वो
इधर पर्दे के पीछे बर्बरीयत है नवाबी हैं’
तिकडे जनता ढोल पिटून आंदोलन करत आहे आणि सत्ता इकडे रासवटपणात आणि पैशांच्या अय्याशीत मग्न आहे.
युवक शक्ती आणि सत्तेचा गर्व या दोन्हीही शक्ती अंध असतात. यांच्या संघर्षातून काय होऊ शकते, हे इतिहासाच्या अभ्यासक असलेल्या शिरोजीला चांगलेच माहीत होते. तसे काही घडू नये म्हणून अज्ञेयवादी असलेला शिरोजी इतिहास घडवणाऱ्या शक्तींची प्रार्थना करत होता.
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment