शिरोजीच्या आधीच्या दोन बखरींवर वाचक थोडे रागावले होते. या दोन्ही बखरींमध्ये शिरोजीने भारताच्या निवडणूक आयोगावर विश्वास दर्शवला होता. ते काही वाचकांना आवडले नव्हते. २५ सालच्या ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता खूप कमी झाली होती, हे ‘CSDS-लोकनीती’ आणि ‘C-Voter’ या सर्व्हेंमध्ये दिसून आले होते. या दोन्ही सर्व्हेंचा उल्लेख शिरोजीने त्या बखरींमध्ये केला होता. भारतीय लोकांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे, हे निरीक्षणही त्याने नोंदवले होते. असे असतानाही वाचक रागावलेले होते. ‘निवडणूक आयोग चोर आहे’ असे त्याने स्पष्टपणे सांगितलेले लोकांना हवे होते की, काय नकळे!
शिरोजी असे काही सांगणार नव्हता. त्याने आपल्या रोजनिशीमध्ये लिहिले आहे - “कुठल्याही घटनात्मक यंत्रणेवर मी स्वतः तोंड सोडणार नाही. कुठलीही यंत्रणा भ्रष्ट होऊ शकते, हे मला माहिती आहे, परंतु ती सर्टिफिकेटे मी का फाडू? जोपर्यंत न्यायालयात सिद्ध होत नाही, तोपर्यंत मी विश्वास ठेवणार. परंतु त्याच वेळी त्या यंत्रणेबद्दल समाजात जे काही बोलले जाते आहे, ते सगळेच्या सगळे मी जसेच्या तसे लिहिणार! ही माझी लेखननीती आहे. त्यामुळे मी सरकारबद्दल मृदू झालो आहे, असे काही वाचकांना वाटत असेल तर वाटो!”
शिरोजी असे लिहीत होता, त्याचे कारण काय असावे, याची आमच्या संपादक मंडळात खूप चर्चा झाली. खरं तर, मोदीकालीन भारतातील निवडणूक आयोग पूर्णपणे बदनाम झाला होता, असे आज १०० वर्षांनी नक्कीच म्हणता येईल. असे असताना शिरोजी म्हणत होता की, ‘निवडणूक आयोगावर माझा विश्वास आहे’. अशी वाक्ये लिहून तो स्वतःला बदनामीच्या आणि इतर खटल्यांपासून सुरक्षित ठेवत होता, असे काही सदस्यांचे म्हणणे पडले. काही सदस्यांचे मत पडले की, शिरोजी भित्रा नव्हता. तो लेखनाची शिस्त पाळणारा इतिहासकार होता. त्यामुळे संपूर्ण पुरावा हातात आल्याशिवाय कुठलाही निष्कर्षापर्यंत तो पोहोचणार नव्हता. एकूण परिस्थिती काय आहे, ती आपण मांडावी आणि बाकी सगळे वाचकांना विचार करून ठरवू द्यावे, अशी भूमिका शिरोजीची होती.
संपादक मंडळातील अजून काही सदस्यांचे म्हणणे पडले की, शिरोजी इतिहासकार म्हणून प्रामाणिक असला, तरी त्याच्या मनाचा गाभा लबाड होता. तो उपहासाने म्हणत होता की, ‘माझा निवडणूक आयोगावर विश्वास आहे’. उगीच काहीतरी विचित्र लिहून वाचकांना आपल्या लिखाणात अडकवून ठेवायचे, अशी शिरोजीची नीती होती. वरील तीन मतांपैकी आम्ही स्वतः व्यक्तिशः दुसऱ्या मताचे आहोत. अर्थात आमचा काही आग्रह नाही. वाचकांनी शिरोजीच्या नीतीबाबत आपापले मत ठरवायचे आहे.
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शिरोजी ‘शेरलॉक होम्स’च्या कथांचे पुनर्वाचन करत होता. तो शेरलॉकचा फॅन होता. कारण शेरलॉकची तार्किक विचारांवरची पकड! शेरलॉकला तीन व्यसने होती- एक कोकेन, दुसरे धूम्रपान आणि तिसरे डेटा! या तिन्ही गोष्टी त्याची मानवी आयुष्यामधील ‘बोअरडम’ घालवायची साधने होती. समोर कुठली केस नसेल, तर होम्स पाईप, सिगारेट आणि कोकेनची इंजेक्शन्स यांच्या सान्निध्यात असायचा. मात्र एकदा का एखादी अवघड केस समोर आली की, या सगळ्या गोष्टी सोडून तो त्या केसचा डेटा डोक्यात घोळवत तासन् तासच काय, तर दिवसेंदिवसही एकाग्र बसत असे!
ज्या व्यक्तीचा खून झाला आहे, तिच्या रक्ताचा एखादा थेंब, बाहेरच्या चिखलातला पावलाचा एखादा ठसा, आजुबाजूला झुडुपात पडलेले सिगारेटचे एखादे थोटूक, असा सगळा छोटा छोटा डेटा घेऊन शेरलॉक होम्स बसत असे. या छोट्या गोष्टी काय सांगत आहेत, याचा विचार करून आणि अनुमान बांधून तो गुन्हेगारापर्यंत पोहोचत असे. याला शेरलॉक होम्स ‘डिडक्टिव्ह मेथड’ म्हणत असे! त्याचे मराठीमध्ये ‘अनुमानशास्त्रावर आधारलेली विचार-पद्धती’ असे भाषांतर करता येईल. या पद्धतीमध्ये डेटा अत्यंत महत्त्वाचा असतो!
२०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर या लोकांनी नेमका हाच प्रकार सुरू केला होता. योगेंद्र यादव मोदीकालीन भारतातील एक प्रसिद्ध सेफॉलॉजिस्ट होते. परकला प्रभाकर हे प्रख्यात अर्थशास्त्री होते.
योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांचे पेशेच असे होते की, डेटा हेच त्यांचे जन्मभराचे साधन बनून गेले होते. विविध प्रकारचा डेटा गोळा करणे, त्याला स्टॅटिस्टिकल मेथडसमध्ये ढाळणे आणि त्यातून निष्कर्ष काढणे, हाच त्यांच्या पेशांचा गाभा होता. गेल्या बखरीमध्ये शिरोजीने योगेंद्र यादव यांचे म्हणणे मांडले होते. आता या बखरीचे स्टार परकला प्रभाकर आहेत.
राहुल गांधी यांनीसुद्धा ‘डेटा मायनिंग’ करणाऱ्या कंपन्यांची मदत घेतली होती. त्याचे ‘हिंदी यू ट्यूबर्स’मध्ये ‘डेटा खंगालना’ असे भाषांतर केले गेले होते. मराठीत ‘डेटा-शोध’ किंवा ‘डेटा-अन्वेषण’ असे भाषांतर करता येईल. ‘डेटा मायनिंग’ करणाऱ्या कंपन्यांना हाताशी धरून २०२४ची लोकसभा निवडणूक आणि त्या सुमारास झालेल्या विधानसभा निवडणुकीमधील प्रत्येक संशयास्पद निकालाचे विश्लेषण राहुल गांधी यांनी हाती घेतले होते. त्यासाठी मोठ्या मोठ्या टीम्स बनवल्या होत्या. त्या विश्लेषणामधून येणारे निष्कर्ष राहुल गांधी पत्रकार परिषदा घेऊन देशाच्या समोर ठेवत होते.
परकला प्रभाकर हे शेरलॉक होम्ससारखे एकट्याने काम करत होते. ते निवडणूक आयोगानेच जाहीर केलेला डेटा घेऊन, त्याचे विश्लेषण करून प्रश्न विचारत होते.
शेरलॉक होम्सचे एक वाक्य प्रसिद्ध आहे- Data, data, data! I cannot make bricks without clay! डेटा सगळ्यात महत्त्वाचा. त्याची मृत्तिका नसेल तर निष्कर्षांच्या विटा कशा तयार करायच्या? डेटा वापरायचा असेल, तर माणसाने पराकोटीची वस्तुनिष्ठता अंगी बाणवायला लागते. या क्षेत्रात भावनांना स्थान नाही. डेटा जिकडे बोट दाखवत असेल ते सत्य. डेटा म्हणत असेल की, निवडणुकीत चोरी झाली तर आपल्याला मान्य करावे लागते की, चोरी झाली!
‘द साईन ऑफ फोर’ या कथेत शेरलॉक होम्स एक फार महत्त्वाचे वाक्य बोलला आहे- “When you have eliminated the impossible, whatever remains, however improbable, must be the truth.” डेटा घेऊन बसायचे, त्याच्या आधाराने अशक्य ठरणारी एक एक गोष्ट वगळत जायचे. शेवटी जे उरते ते कितीही असंभाव्य वाटले तरी तेच सत्य असते.
तत्त्वज्ञानाच्या क्षेत्रात या वाक्याबद्दल वाद आहेत, कारण सत्य म्हणजे काय असे प्रश्न तत्त्वज्ञान उपस्थित करत राहते. असे असले तरी ‘क्राईम डिटेक्शन’च्या क्षेत्रात या वाक्याबद्दल फार वाद असायचे काही कारण नाही. कारण गुन्हा झाला आहे की नाही, हा एकच मुद्दा इथे समोर असतो. डेटा म्हणत असेल की, गुन्हा झाला आहे, तर झाला आहे.
आपण निवडणुकीचा विचार करत आहोत, म्हणून त्यातलेच एक उदाहरण बघू. उदाहरणार्थ, मतदानाच्या एखाद्या बूथवर शेवटच्या तासात चारशे मते पडली असतील, तर डेटा घेऊन बसायचे. ईव्हीएममध्ये एक मत टाकायला एक मिनिट लागते, हा इथला सगळ्यात महत्त्वाचा डेटा. यावरून आपल्या लक्षात येते की, इथे साठ मिनिटांत चारशे वैध मते पडणे अशक्य आहे. तशी मते पडली असतील, तर आपल्याला मान्य करायला लागते की, एकतर मतदानाच्या वेळेपेक्षा मतदान आठ तास जास्त झाले असले पाहिजे किंवा ईव्हीएममध्ये तरी गडबड असली पाहिजे. मग पुढे आठ तास मतदान सुरू होते, हे सिद्ध करा किंवा ईव्हीएममध्ये एका तासात एवढी मते पुन्हा टाकून दाखवा, अशा आव्हानांच्या आहारी जायचे नाही.
लॉजिक हा अभेद्य किल्ला असतो, असे शेरलॉक होम्सचे म्हणणे होते. ही ताकद सामान्य माणसांना माहीत नसते. त्यामुळे बदमाश लोक दिवसाढवळ्या गुन्हे करून मोकळे होतात आणि सामान्य लोक फक्त संशय घेण्याच्या पायरीपर्यंतच जातात. संशयावर विचार करून त्यावर निष्कर्षाची मोहर आत्मविश्वासपूर्वक उठवू शकत नाहीत.
परकला प्रभाकर नेमके हेच म्हणत होते. त्यांच्या मते २०१९नंतरच्या जवळ जवळ प्रत्येक निवडणुकीत दिवसाढवळ्या अशी चोरी झाली आहे. अगदी ‘जाग्या’ असलेल्या भारताच्या नागरिकांच्या डोळ्यादेखत हे झालंय. गंमत म्हणजे यावर फक्त संशय व्यक्त केला गेला आहे.
२०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतर परकला प्रभाकर यांनी एकंदर प्रकाराबद्दल संशय व्यक्त करायला सुरुवात केली. त्यांनी एक फार महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला. निवडणूक आयोग मतदान सुरू झाल्यावर दर दोन तासांनी प्रत्येक मतदार संघात किती मतदान झाले, याची टक्केवारी घोषित करत असतो. कारण, असा डेटा सातत्याने जाहीर होत राहिला तर मतदानात एकदम काहीतरी मोठा घपला करणे अशक्य होऊन बसते.
भारतात पूर्वीपासून मतदानाच्या शेवटी बूथ ताब्यात घेऊन एकदम मतदान करण्याची पद्धत होती. मतदानाच्या शेवटी घपला करायचे कारण असे की, त्या वेळी बहुतांश सामान्य मतदार मतदान करून घरी गेलेले असतात. अशा परिस्थितीत शेवटी एकदम जास्त मतदान झाले, म्हणजे काहीतरी घोळ झाला आहे, असे समजले जात असे. अशा केंद्रांवर फेर-मतदानाचे आदेश देण्यात येत असत. अशा फेर-मतदानाच्या वेळी वाढीव सुरक्षा दिली जात असे. असो.
तर सांगायची गोष्ट अशी की, त्या काळी दर दोन तासांनी किती मतदान झाले, याची टक्केवारी जाहीर केली जात असे. त्यानंतर एकदा मतदान संपले की, एकूण मतदान किती झाले, याची ‘प्रोव्हिजनल’ टक्केवारी जाहीर केली जात असे. हे झाल्यानंतर मध्यरात्रीपर्यंत किंवा फार तर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत ‘फायनल’ टक्केवारी जाहीर केली जात असे. ती जाहीर करायला थोडा उशीर लागत असे, कारण पुन्हा एकदा सगळे आकडे तपासून बघणे, कुठल्या बूथवरचे आकडे राहिले तर नाहीत ना, हे चेक करणे, अशी शेवटची कामे असत. हा सगळा धांडोळा घेऊन फायनल टक्केवारी जाहीर होत असे.
१९५२ साली स्वतंत्र भारतातली पहिली निवडणूक झाली, तेव्हापासून हीच पद्धत पाळली जात होती. परकला प्रभाकर यांचे म्हणणे असे की, तेव्हापासूनचा डेटा बघितला तर ‘प्रोव्हिजनल टक्केवारी’ आणि ‘फायनल टक्केवारी’ यात सुमारे अर्धा ते सव्वा टक्क्याचा फरक असे.
‘मोदीकालीन भारता’त हा फरक नाट्यमय पद्धतीने वाढला. काही मतदारसंघांत तो १२ ते १४ टक्क्यांपर्यंत वाढला. ३ ते ७ टक्क्यांपर्यंतचा फरक तर कित्येक मतदारसंघांत होता. आजसुद्धा आपल्याला हा सगळा डेटा चेक करता येतो. परकला प्रभाकर यांचे पुढचे म्हणणे असे की, जिथे जिथे हा फरक जास्त तिथे तिथे भाजप जिंकलेला आपल्याला दिसून येते. जिथे फरक पूर्वीप्रमाणेच होता, तिथे तिथे विरोधक जिंकल्याचे दिसून येते.
यात ‘फायनल’ टक्केवारी घोषित व्हायला ‘मोदीकालीन भारता’त खूप दिवस घेतले जाऊ लागले. पूर्वी दुसऱ्या दिवशी सांगितली जाणारी गोष्ट दहा-दहा दिवसांनी सांगितली जाऊ लागली. परकला प्रभाकर यांचे आरोप फारच गंभीर होते. शिरोजीने आपल्या रोजनिशीमध्ये लिहिले आहे - “परकला प्रभाकर यांचे आरोप राहुल गांधी आणि योगेंद्र यादव यांनी केलेल्या आरोपांप्रमाणेच गंभीर आहेत. या जगातला दुसरा कुठलाही निवडणूक आयोग असता, तर त्याने चौकशी आयोग नेमला असता आणि ‘पॉइंट बाय पॉइंट’ आरोप खोडून काढले असते. कुठला स्वाभिमानी अधिकारी आपल्यावर गंभीर आरोप झालेले असताना काहीतरी थातूरमातूर बोलून वेळ मारून न्यायचा प्रयत्न करेल?
चौकशी आयोग नेमणे ही लोकशाही जगातली अगदी जगन्मान्य पद्धत आहे. सत्य हुडकून काढण्यासाठी, वेळ मारून नेण्यासाठी आणि अगदी जनक्षोभ शांत करण्यासाठीही चौकशी आयोग नेमले जात. परंतु श्रीमान मोदी यांची कार्यपद्धतीच वेगळी होती. आरोप झाले की, काहीतरी थातूरमातूर बोलायचे आणि आरोप करणाऱ्या लोकांवर ट्रोल आर्मी सोडायची, असे उद्योग केले जात. असे करून बाजी पलटवायचा प्रयत्न केला जायचा.”
शिरोजीचे निरीक्षण बरोबर होते. परकला प्रभाकर म्हणत होते की, ‘प्रोव्हिजनल’ ते ‘फायनल’ टक्केवारीमधील फरक महत्त्वाचा होता. महाराष्ट्रात यामुळे ७५ लाख मते वाढल्याचे दिसत होते. २०२४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या प्रकाराने साडेपाच कोटी मते वाढल्याचे दिसत होते.
शिरोजी लिहितो - “परकला प्रभाकर म्हणत आहेत की, या प्रकाराला आळा घातला गेला नाही, तर २०२९च्या निवडणुकीपर्यंत सुमारे दहा कोटी मतांचा घोळ होईल आणि त्या पुढच्या निवडणुकीपर्यंत वीस कोटी मतांचा घोळ घातला जाईल. म्हणजे पंचवीस टक्के स्विंग! चार-पाच टक्के स्विंग आला की, अनेक राजकीय पक्ष होत्याचे नव्हते होतात. पंचवीस टक्के स्विंगमध्ये कुठला विरोधी पक्ष शिल्लक राहील?”
राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांना भारतीय लोकशाहीचा अंत समोर दिसत होता. या तिघांच्याही आरोपांवर चर्चा व्हायला हवी होती. शिरोजी बिचारा पडला एक इतिहासकार! तो त्याच्या परीने बखरी लिहीत होता. त्यातून चर्चा घडवत होता. सगळ्या अरोपांविषयी सगळे नीट समजून घेण्याचा प्रयत्न करत होता.
भारतीय लोकशाच्या इतिहासामधील एक अत्यंत महत्त्वाचा काळ शिरोजी एक साक्षीदार म्हणून अक्षरबद्ध करत होता.
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
.................................................................................................................................................................
पांडेजी अस्वस्थ होते. हा शांतचित्त माणूस अस्वस्थ व्हावा अशीच स्थिती होती. त्यांनी परकला प्रभाकर यांची मुलाखत पाहिली होती. राघव, भास्कर आणि समरला फॉरवर्डसुद्धा केली होती. राघव स्वतः परकला प्रभाकर काय बोलत आहेत, याचा ट्रॅक ठेवून होता. २०२४च्या निवडणुकीनंतरही परकला प्रभाकर बोलले होते, परंतु तेव्हा त्यांच्याकडे म्हणावे तसे लक्ष दिले गेले नव्हते. आता राहुल गांधी यांनी केलेल्या आरोपांनंतर परकला प्रभाकर यांच्या पुन्हा एकदा मुलखाती घेतल्या जाऊ लागल्या होत्या. ते काय म्हणत होते, याच्याकडे पुन्हा एकदा नीट लक्ष दिले जाऊ लागले होते.
पांडेजींच्या ठेल्यावर नाना, अविनाश आणि अच्युत आले तेव्हा पांडेजी भजीच तळत होते. भज्यांच्या प्रसन्न वासात चर्चा सुरू झाली.
नाना - आप कुछ भी कहिये पांडेजी, ये जॉर्ज सोरोस बहुत हलकट व्यक्ती हैं.
अविनाश - त्याला मोदी सरकार पाडायचे आहे. बघवत नाहिये त्याला भारत ‘सुपरपॉवर’ झालेला.
नानांचे हिंदी आणि अविनाशचे मुद्दे ही पांडेजींच्या करमणुकीची साधने होती. त्यामुळे पांडेजी नानांचे हिंदी सुधरवण्याच्या आणि अविनाशचे मुद्दे खोडून काढायच्या भानगडीत पडत नसत.
(जॉर्ज सोरोस हा अमेरिकेतील अब्जाधीश होता. तो जगभरामधील लोकशाहीवादी संघटनांना मदत करत असे. त्यामुळे जगभरचे हुकूमशाहा आणि हुकूमशाही वृत्तीचे नेते त्याच्या नावाने शंख करत असत. काहीही अप्रिय घडले की, ‘सोरोसने रचलेला कट’ असे म्हणायची पद्धत सगळ्या हुकूमशाही जगतात पडून गेली होती. हंगेरीचे व्हिक्तोर ओर्बान, ब्राझीलचे बोल्सोनॅरो, तुर्कस्तानचे एर्दोगन असे सगळे हुकूमशाहा सोरोस यांच्या नावावर अनेक गोष्टी खपवत असत. मोदीकालीन भारतातसुद्धा सोरोस यांच्या नावावर ‘वोट-चोरी’च्या आरोपांचे तिकीट फाडण्याचे प्रयत्न सुरू होते. - संपादक)
नाना - वो सोरोस को क्या लगता हैं? उसको लगता हैं की, राहुल को पैसे दे के मोदीजीपर आरोप लगाये तो मोदी निवडणूक में पडेगा!
अविनाश - मोदीजी कभीभी पडेंगे नहीं.
(तेवढ्यात राघव, भास्कर आणि समर येतात)
नाना - मोदीजी कभीभी नहीं पडेंगे.
भास्कर - माणूस वोट चोरी करत राहिला तर कसा पडेल?
नाना – अरे, क्यूँ आरोप कर रहें हो उस महात्मेपर!
समर - नाना, आम्ही काहीच म्हणत नाहिये. तो परकला प्रभाकर काय म्हणतो आहे त्याबद्दल बोला की!
नाना - त्याच्याबद्दल काय बोलायचं? फ्रस्ट्रेटेड माणूस आहे.
अविनाश - याची बायको अर्थमंत्री आहे भारताची आणि याला कोण काळं कुत्रंसुद्धा विचारत नाहिये म्हणून बोलतोय!
नाना - शिवाय हा माणूस हैदराबादचा. याच्या पूर्वीच्या पिढ्यांमध्ये मुसलमान लोकांचा डीएनए आलेला आहे. म्हणून तो असं बोलतोय.
भास्कर - पण सरसंघचालक म्हणाले आहेत की, हिंदू आणि भारतीय मुसलमान यांचा डीएनए एकच आहे म्हणून!
नाना - (गालातल्या गालात हसत) ते तसं का म्हणाले हे कळायचे नाही तुम्हाला कधी. त्याला फार मोठी राजकीय मॅच्युरिटी लागते.
अविनाश - (हु हु हु)
भास्कर - म्हणजे डीएनए एक नाहिये का?
नाना - सध्या फक्त तुम्ही परकला प्रभाकरचे पूर्वज मुसलमान होते एवढंच लक्षात घ्या.
राघव - त्यापेक्षा आपण त्यांचे मुद्दे लक्षात घेऊ की! (हसतो).
अविनाश - पूर्वजांचा मुद्दा सगळ्यात मोठा आहे. (हु हु हु)
(विरोधकाला मुसलमान म्हटले की, आपण चर्चा जिंकली असे सर्व अंधभक्तांना वाटत असे. - संपादक)
नाना - (गालातल्या गालात हसत) आणि तो फ्रस्ट्रेटेड आहे, हेसुद्धा लक्षात घ्या!
(गालातल्या गालात हसत बोलू शकणे हे राजकारण कळत असण्याचे एकच लक्षण आहे, असे त्या काळी अनेक उजव्या लोकांना वाटत असे. - संपादक)
भास्कर - परकला प्रभाकर म्हणतायत की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये ‘प्रोव्हिजनल व्होटिंग’ जाहीर झाल्यानंतर मतदानाचा टक्का भयंकर वाढला.
अविनाश - वाढला तर वाढला. रिझल्ट जाहीर झाले, संपला विषय.
राघव – अरे, संध्याकाळी पाचनंतर ७५ लाख मतं पडली, असा अर्थ होतो आहे त्याचा!
अविनाश - पडली असतील. परकला प्रभाकर म्हणतायत की, एवढी मतं पडणं शक्य नाही.
अच्युत - एक मिनिट, एक मिनिट. मला नीट सांगा विषय काय आहे तो.
अविनाश - तुला काय करायच्यात नसत्या चौकश्या?
अच्युत - मला नीट सांग राघव नक्की काय म्हणतायत परकला प्रभाकर?
राघव - हे बघ, निवडणुकीच्या दिवशी जसं जसं मतदान होतं, तशी तशी दर दोन तासांनी मतदानाची टक्केवारी जाहीर होते.
अच्युत - मग?
राघव - शेवटी मतदानाची वेळ संपली की, संध्याकाळी ५ ते ६च्या दरम्यान प्रोव्हिजनल टक्केवारी जाहीर होते.
अच्युत - मग?
राघव - मग रात्री सगळे आकडे परत चेक करून फायनल टक्केवारी जाहीर होते. त्यात साधारणपणे एक ते सव्वा टक्क्याची भर पडते.
अच्युत - का पडते भर?
राघव - मतदानाची वेळ संपताना काही लोक रांगेत उभे असतात. त्यांची मतं जोडली जातात.
अच्युत - ओह!
राघव - वेळ संपली की, त्या रांगेत अजून कुणाला उभं राहता येत नाही. या सगळ्यांना नंबर टाकून चिठ्ठ्या देण्यात येतात. या रांगेतल्या प्रत्येक माणसानं मतदान केलं की, त्याची चिठ्ठी परत घेतली जाते आणि त्या सगळ्या चिठ्ठ्य्या जपून ठेवल्या जातात.
भास्कर - आणि या रांगेमधल्या लोकांच्या मतदानाचे व्हिडिओ केले जातात. त्यांचे चेहरे दिसतील असे व्हिडिओ करावे लागतात.
अच्युत - मग?
राघव - मग ही नंतर पडलेली मतं जोडून फायनल टक्का जाहीर केला जातो.
अच्युत - म्हणजे परकला प्रभाकर म्हणतायत की, ७५ लाख मतं शेवटच्या टप्प्यात वाढणं शक्य नाही.
राघव - मॅथेमॅटिकल इम्पॉसिबिलीटी!
अच्युत - मग चिठ्ठ्या मोजा! व्हिडीओ बघा!
राघव - निवडणूक अयोग म्हणतो आहे की, चिठ्ठ्या दाखवणार नाही. व्हिडिओ दाखवणार नाही.
अच्युत - याला काय अर्थ आहे? न्यायालयात जायला पाहिजे कुणीतरी.
राघव - गेले होते लोक कोर्टात. सर्वोच्च न्यायालयाचे एक वकील आहेत महमूद प्राचा. त्यांनी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाकडून आदेश आणला व्हिडिओ दाखवा म्हणून.
अच्युत - मग?
राघव - निवडणूक आयोगाने एक ऑर्डर काढली त्यावर की, व्हिडिओ दाखवणे गरजेचे नाही म्हणून.
अच्युत - च्यायला कमाल झाली.
राघव - म्हणजे आता आयोगाच्या त्या ऑर्डरविरुद्ध कोर्टात जायचं.
अच्युत - हे काही बरोबर नाही.
नाना - काय बरोबर नाही? अराजक माजवायचं आहे का भारतात?
अविनाश - अॅनार्की! महमूद प्राचाची अॅनार्की! महमूद प्राचाचे पूर्वज मुसलमान होते.
राघव - (जोरात हसत) अरे त्याच्या पूर्वजांपर्यंत कशाला जातो आहेस? तो स्वतःच मुसलमान आहे.
अच्युत – अरे, व्हिडिओ दाखवण्यात कसली आली आहे अॅनार्की?
समर - दाखवायचे नसतील तर काय फक्त डीलीट करायला काढले आहेत का ते व्हिडिओ?
अविनाश - ते प्रोसीजर म्हणून काढले आहेत, प्रोसीजरप्रमाणे डिलीट केले जातील.
भास्कर - मतदान फेअर झाले आहे याचा पुरावा म्हणून काढलेले असतात ते व्हिडिओ. संशय आला आहे तर पुरावा म्हणून दाखवून टाका ना!
नाना - तुम्ही बसा कोर्ट कोर्ट खेळत. व्हिडिओ कधीही मिळणार नाहीत.
अच्युत - महाराष्ट्रात ७५ लाख मतं वाढली आहेत ‘व्होटिंग परसेंटेज रिव्हिजन’मध्ये. त्यांचा हिशोब द्यायला लागणार आहे तुम्हाला.
नाना - महाराष्ट्रात एक लाख बूथ आहेत. प्रत्येक बूथवर शेवटच्या तासात ७५ मतं पडली, असं समजा आणि गप्प बसा.
अविनाश - व्हॉट अ शॉट नाना!
नाना - (गालातल्या गालात हसत) आता गप्प बसा. तुम्हाला अत्यंत संयुक्तिक उत्तर दिलं आहे.
(भास्कर आणि समर गडबडतात)
राघव - एवढं क्लीन आहे सगळं तर व्हिडिओ दाखवा, चिठ्ठ्या दाखवा. कर नाही त्याला डर कशाला?
भास्कर - (सावरत) आणि महाराष्ट्रामधल्या ज्या ज्या मतदारसंघांत ३ टक्क्यांपेक्षा जास्त रिव्हिजन आहे तिथेच भाजपवाले जिंकले आहेत का हे पण दाखवा.
नाना – अरे, काय अराजक माजवायचं आहे का?
अविनाश - काय अॅनार्की माजवायची आहे का?
राघव - महाराष्ट्रात ७५ लाख मतं वाढली, तशी लोकसभेला साडेपाच कोटी मतं वाढली आहेत.
अच्युत - बाप रे!
समर - त्यांचेही व्हिडिओ देत नाहियेत.
अविनाश - न्यायालयात जा.
नाना – मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले आहेत ना की, काय करणार आहात इतके व्हिडिओ घेऊन? पस्तीस हजार तासांचं रेकॉर्डिंग आहे.
अविनाश - कधी बघणार इतके व्हिडिओ.
राघव - तुम्ही रिलीज करा व्हिडिओ, आम्ही ३५ हजार कार्यकर्ते बसवून एका तासात चेक करू.
अच्युत - ग्रेट आयडिया राघव!
अविनाश - ए गप्प बस! मूर्ख माणूस!
अच्युत - तू लॉजिकली बोल. उगीच शिव्या देऊ नकोस. अंधभक्त कुठला!
अविनाश - मी शिवी दिली नाहिये.
अच्युत - तू मूर्ख म्हणालास मला.
अविनाश - मूर्ख ही शिवी नाहिये. तो अपशब्द आहे.
समर - प्रत्येक शिवी हा अपशब्दच असतो.
राघव - तुम्ही भरकटू नका रे प्लीज! परकला प्रभाकर म्हणतायत की, भाजपने जिंकलेल्या किमान ७९ जागा अशा आहेत की, जिथे ‘विनिंग मार्जिन’ वाढीव मतांपेक्षा कमी होतं.
अविनाश - म्हणजे?
राघव - म्हणजे मतं वाढली नसती तर ७९ जागांवर ‘इंडिया’ आघाडी जिंकली असती. म्हणजे एनडीए आघाडी २९३वरून २१४वर आली असती.
भास्कर - आणि इंडिया आघाडी २३४वरून ३१३वर गेली असती.
समर - मोदींऐवजी खरगेजी पंतप्रधान झाले असते.
राघव - देशाला पहिला दलित पंतप्रधान मिळाला असता.
नाना – अरे, काय अराजक माजवायचं आहे का?
अविनाश - अॅनार्की माजवायची आहे का?
भास्कर - अविनाश, नाना अराजक म्हणाले की, तू लगेच अॅनार्की म्हणतो आहेस सारखा सारखा. अराजकाला इंग्रजीत ‘अॅनार्की’ म्हणतात हे तुला माहीत आहे, हे कळलंय आम्हाला.
अविनाश - तू गप्प बस चोंग्या.
(मोदीकालीन अंधभक्तांचा दलितत-विरोध असा अचानक उघडा पडत असे. - संपादक)
राघव – अरे, चर्चा डायव्हर्ट करू नका रे!
समर - अगदी थोडक्यात बोलायचं तर ‘वोट चोरी’ करून आणि एका दलिताचा हक्क डावलून मोदीजी पंतप्रधान बनलेले आहेत.
अविनाश - यू शटाप यू इडियट!
समर - हे परकला प्रभाकर म्हणत आहेत.
अविनाश - मग त्यालाही सांग शटाप म्हणून!
राघव - ते म्हणतील की, व्हिडिओ दाखवा, चिठ्ठ्या दाखवा. सगळी मतं योग्य पद्धतीने पडलेली आहेत, हे सिद्ध करा, मग मी शटाप होतो. (जोरात हसतो)
नाना - या लोकांना तुरुंगात टाकले पाहिजे. अराजक माजवतायत हे.
समर - (अविनाशला) अराजक म्हणजे अॅनार्की अविनाश!
(सगळे हसतात, अविनाश चिडतो)
नाना - तुम्ही मला एक सांगा जेव्हा तुम्ही कर्नाटक जिंकलात, तेलंगणा जिंकलात आणि झारखंड जिंकलात तेव्हा सगळी सिस्टीम ओके होती का?
अविनाश - आता बोला की, आता बोला!
राघव - परकला प्रभाकर यांना हा प्रश्न विचारला की लोकांनी.
अविनाश - मग काय बोलला तो चोंगा?
राघव - तू जरा शब्द जपून वापर त्यांच्याबद्दल. ‘लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’चे पीएच.डी. आहेत ते.
अविनाश - असतील!
राघव - ते म्हणाले की, कॅसिनोमध्ये तुम्ही गेलात की, तुम्ही सगळे डाव हरत नाही. काही जिंकतासुद्धा. कारण तुम्ही सगळे डाव हरायला लागलात तर तुम्ही जाणारच नाही कॅसिनोमध्ये. म्हणून मग तुम्ही काही डाव जिंकाल अशी व्यवस्था केलेली असते, पण शेवटी कॅसिनोचा मालकच जिंकत असतो!
अविनाश - काहीतरी बोलू नकोस.
भास्कर - परकला प्रभाकर म्हणत आहेत की, भाजप म्हणत आहे की, तुम्ही कर्नाटक जिंका, झारखंड जिंका, हिमाचल जिंका, आम्ही महत्त्वाच्या निवडणुका जिंकतो.
राघव - आम्ही २११वरून २९३ला जाऊन लोकसभा जिंकतो, धारावी अदानीला द्यायची आहे म्हणून आम्ही महाराष्ट्र जिंकतो.
समर - पंजाबातल्या शेतकऱ्याला दिल्लीत घुसता येऊ नये,, म्हणून आम्हाला मध्ये हरियाणाची गरज आहे म्हणून आम्ही हरियाणा जिंकतो!
अविनाश - विकृत लोक आहात तुम्ही. अॅनार्की हवी आहे तुम्हाला!
राघव – अरे, अॅनार्की अॅनार्की काय करतो आहेस मघापासून! आम्ही फक्त व्हिडिओ आणि चिठ्ठ्या मागतो आहे. तेसुद्धा लोकशाही मार्गानं.
(‘मोदीकालीन भारता’त ‘लोकशाहीवादा’ला ‘अराजकतावाद’ आणि प्रकृतीला ‘विकृती’ म्हणायचा प्रघात पडला होता! - संपादक)
नाना - (गालातल्या गालात हसत) आम्हाला चोरीच करायची होती, तर आम्ही २४०वर कशाला थांबलो असतो? ‘चारसो पार’ नसतो का गेलो?
अविनाश - व्हॉट अ शॉट नाना!
राघव - परकला प्रभाकर यांना हासुद्धा प्रश्न विचारला की, लोकांनी!
भास्कर - मग?
राघव - ते म्हणाले की, समजा तुमच्या घरी चोरी झाली, तर तुम्ही काय कराल? काय अविनाश काय करशील तू?
अविनाश - पोलीस स्टेशनला जाईन.
राघव - करेक्ट. तिथं पोलीस तुला काय विचारतील?
अविनाश - काय काय गेलं?
राघव - मग तू काय सांगशील?
अविनाश - मी सांगेन काय काय गेलं ते.
राघव - तेव्हा तुला पोलिसांनी विचारलं की, घरातलं सगळं गेलं काय, तर तू काय उत्तर देशील?
अविनाश - मी सांगेन की नाही. काही गोष्टी आहेत म्हणून.
राघव - त्यावर जर पोलीस म्हणाले की, ज्या अर्थी चोरांनी सगळं नेलं नाही त्या अर्थी तुमच्याकडं चोरी झाली नाही तर?
अविनाश - असं कसं म्हणता येईल?
राघव - नाना असंच म्हणत आहेत. ज्या अर्थी चारशे जागा नाहीत, त्याअर्थी चोरी झाली नाही.
समर - व्हॉट अ शॉट राघव! (जोरात हसतो)
अविनाश - ए गप बस! तू बावळट आहेस राघव, आणि तो परकला प्रभाकरसुद्धा बावळट आहे.
अच्युत - असा आरडाओरडा करण्यापेक्षा तू थोडा विचार कर ना.
अविनाश - कसला करायचा विचार?
अच्युत - का नसतील देत हे लोक व्हिडिओ आणि चिठ्ठ्या?
अविनाश - तो निवडणूक आयुक्त एवढा मोठा माणूस आहे, त्याच्यावर जरा विश्वास ठेवा की जरा! तोसुद्धा देशभक्तच आहे.
नाना - आणि मोदीजीसुद्धा देशभक्तच आहेत.
राघव - मोदीजी देशभक्त नसून सत्ताभक्त असले तर काय करायचे, असा विषय आहे.
अविनाश - तू फार बोलला आहेस राघव. आता एक शब्द बोललास तर हे भजं फेकून मारीन मी.
अच्युत - त्यापेक्षा विचार कर की थोडासा!
भास्कर - सगळा देश ‘वोट चोर गद्दी छोड’ म्हणू लागला आहे.
अविनाश - अरे सोड, फक्त काही भुरटे बोंबलतायत.
भास्कर - हा नाद सोड तू अविनाश. जरा विचार करायाला सुरुवात कर.
राघव - परकला प्रभाकर यांचे बाकीचे मुद्दे तर आपण बघितलेच नाहियेत.
अच्युत - काय आहेत?
राघव - लोकसभा निवडणुकीत अनेक फेऱ्यांमध्ये मतदान घेतलं.
नाना - राज्य मोठं असेल तर अनेक फेऱ्या नकोत का?
राघव - तामिळनाडूमध्ये ३९ जागा आहेत, लोकसभेच्या तिथे एक फेरी घेतली. ओरिसामध्ये २१ जागा आहेत तिथे चार फेऱ्या. बिहारमध्ये ४० जागा आहेत तर तिथे सात फेऱ्या.
भास्कर - काही लॉजिक दिसत नाही याच्यात.
नाना - तुम्हाला कसं दिसेल? तुमचा जन्मच मोदीला विरोध करायला झाला आहे.
राघव - आम्ही एवढंच म्हणतो आहे की, कुठल्या राज्यात किती फेऱ्या का घेतल्या, याची जी काही कारणं असतील तर जाहीर करा. लोकांनी आरटीआय करून मागितली आहेत कारणं!
नाना - कशाला? उपद्रवी लोक. तुम्हाला कशाला पाहिजेत या उचापती?
राघव - बिहार, महाराष्ट्र, बंगाल, काश्मीर, मध्य प्रदेश अशी जी जी राज्यं भाजपला महत्त्वाची होती, तिथं तिथं अनेक फेऱ्यांमध्ये मतदान झालं, असं परकला प्रभाकर याचं म्हणणं आहे.
अच्युत - मी मोदीजींना दोनदा मत दिलं आहे, पण मला आता ही माहिती मिळाल्याशिवाय मी परत मत देणार नाही.
अविनाश - मागतंय कोण तुझं मत! फालतू माणूस.
(मोदी सरकार आणि विशेषतः निवडणूक आयोग यांच्या अडेलतट्टूपणा मुळे अनेक मतदार दुरावत चालले होते. - संपादक)
भास्कर - बोल तुला वाटेल ते, पण या सगळ्या प्रकरणामुळे लोक तुटत चालले आहेत, हे कळत नाहिये तुम्हा लोकांना.
राघव - आता १७ सप्टेंबरला राहुल गांधी मोठा आरोप करणार आहेत.
भास्कर - मोदीजींच्या वाढदिवसाच्या दिवशी.
अविनाश - कर म्हणावं तुला करायचं ते.
नाना - सगळा भारत मोदीजींच्या वाढदिवसाच्या मूडमध्ये असेल, तुझ्याकडं कुणी लक्षच देणार नाही.
अविनाश - खरंच नाना, तुमच्या लक्षात कशा येतात या गोष्टी?
(नाना गालातल्या गालात हसतात)
राघव - मला तर वाटतं आहे की, वाराणसीची सीट मोदीजी घपला करून निवडून आले, याविषयीचे पुरावे देणार आहे राहुल.
अविनाश - गप बस!
भास्कर - फार खोलवर घाव असेल तो!
अविनाश - गप बस!
समर - पावसाळी सत्राच्या शेवटच्या दिवशी मोदी लोकसभेत आले, तर ‘वोट चोर गद्दी छोड’चे नारे दिले विरोधकांनी!
भास्कर - भारताच्या कुठल्याही पंतप्रधानाचा असा अपमान झाला नव्हता!
राघव - मोदी हैं तो मुमकिन हैं.
अविनाश - तुम्हाला तुरुंगात टाकले पाहिजे. अॅनार्किस्ट!
नाना - तुम्ही काहीही म्हणा, तो माणूस तुम्हाला पुरून उरणार आहे.
समर - खरं सांगू का, आता तुमचे सगळे रस्ते बंद झाले आहेत. जनतेच्या मनात संशय तयार झाला आहे. त्यात तुम्हाला अर्थव्यवस्था सांभाळता करता आलेली नाहिये. बेरोजगारी वाढली आहे.
राघव - मोदीपेक्षा मनमोहन सिंग बेष्ट होता, असं लोक म्हणू लागले आहेत.
नाना - तुम्ही फक्त स्वप्न बघत बसा.
अविनाश - लक्षात ठेवा, वो मोदी हैं, तुम्हाला काही कळायच्या आत सत्ता पुन्हा गेलेली असेल तुमच्या हातून!
राघव - आता सत्ता परत पाहिजे असेल, तर आणीबाणीसारखं लोकशाहीविरोधी काहीतरी करायला लागणार आहे तुम्हाला, नाहीतर मार खायचा निवडणुकीत.
समर - आणि तुम्हीही लक्षात ठेवा एक गोष्ट. तिकडे मोदी असेल, तर इकडेही राहुल आहे. राहुल बँड बजा के रखने वाला हैं तुम्हारा!
.................................................................................................................................................................
Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/
Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1
Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama
Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4
Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6
.................................................................................................................................................................
या नंतर त्या दिवसाच्या चर्चेत फार काही घडले नाही. एक गोष्ट नक्की होती की, राहुल गांधी, परकला प्रभाकर, योगेंद्र यादव आणि इतर लोकशाहीवादी कार्यकर्ते यांनी संशयाचे वादळ तयार केले होते. सगळे लोक राहुल गांधी आता पुढचे पुरावे काय देत आहेत, याची वाट बघत होते. सगळे वातावरण ढवळून निघाले होते. शिरोजीमधला ‘राजकीय’ शेरलॉक होम्स कान टवकारून सतर्क झाला होता. त्याने पाच-सहा महिने बखर लिहिली नव्हती, आता तो प्रत्येक आठवड्याला एक बखर लिहीत होता. परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी ‘डेटा मायनिंग’ करून नक्की ‘खिलवाड’ कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता. त्या वेळी ‘मोदीवादी’ लोक ‘अराजकता, अराजकता’ एवढंच फक्त ओरडू शकत होते.
एकूण काय, तर भारतीय लोकशाहीचा रथ आता इतिहासाच्या खडकाळ रस्त्यावरून वेगाने धावू लागला होता. आता तो कुठले वळण घेतो, ते शिरोजी आतुरतेने पाहत होता. भारतीय मतदाराच्या मनामधला ‘शेरलॉक होम्स’ या पुराव्यांचे अर्थ कसे लावतो आहे, यावर सर्व अवलंबून होते.
- श्रीमान जोशी, संपादक, शिरोजीची बखर
..................................................................................................................................................................
लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.
sjshriniwasjoshi@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2026 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment