सावित्रीने दाखवून दिले आहे की, खरी तपस्या मृत्यूला परतवून लावू शकते. हा एक प्रकारे ‘अमृता’ला शापच आहे...
ग्रंथनामा - वाचणारा लिहितो
श्रीनिवास जोशी
  • रॉय किणीकर आणि त्यांच्या ‘उत्तररात्र’ या कवितासंग्रहाचे मुखपृष्ठ
  • Fri , 19 April 2024
  • ग्रंथनामा वाचणारा लिहितो रॉय किणीकर Roy Kinikar उत्तररात्र Uttarratra रुबाया Rubaiya उमर खय्याम Omar Khayyam

१२०)

‘चालला पहा माडीवर मोडुनि पाय

गेल्यावर त्याचे सरते उरते काय

दिसतात पाऊले वाळुवरती दोन

अन् पुसून गेली फुटता लाट वरून।।

माणसे, सुखासीन, अनैतिक आयुष्य जगतात. त्याला पापाचे आयुष्य म्हटले गेले आहे. ह्या रुबाईतील माणूस माडी चढून नाच-गाणे ऐकायला चालला आहे. वेश्येकडे चालला आहे. समाजात ही काही फार चांगली गोष्ट समजत नाहीत. हे आयुष्य काही फार चांगले आयुष्य मानले जात नाही.

पण मृत्यूनंतर मानवी समाजात वाईट असे ज्याला म्हटले जाते, त्यातले मागे काय उरणार असते? आपण समुद्रकिनाऱ्यावरून चालत असतो. आपल्या पावलांचे ठसे वाळूत उमटतात. थोडावेळाने एक लाट येते आणि ते ठसे पुसले जातात. आपल्या शरीराचेही तसेच आहे. कालाच्या लाटेने ते पुसून टाकले जाते. आपल्या वर्तनाचे तरी दुसरे काय असते? तेसुद्धा कालच्या ओघात विसरले जाते.

‘दिसतात पाऊले वाळुवरती दोन

अन् पुसून गेली फुटता लाट वरून।।

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

१२१)

‘तू अमूर्त चिन्मय चिरंजीव वैदेही

देहात असुनही देहातिल मी नाही

प्रस्थान ठेविले यात्रा ही शेवटची

का वाट अडविशी अरे जाणाऱ्यांची।।

तू एक आत्मा म्हणून अमूर्त आहेस. तू शुद्ध ज्ञानरूप आहेस. तू वैदेही आहेस, म्हणजे तू खरं तर देहात राहणारा नाही आहेस. तू देहात राहतोस, पण ह्या देहात असताना तुला आपण जे आहोत असे वाटत असते, तो तू नसतोस. तुझे शरीर म्हणजे तू नसतोस. तुझे मन, तुझे व्यक्तिमत्त्व म्हणजे तू नसतोस, तुझे नाव म्हणजे तू नसतोस. ज्या ‘मी’च्या आधाराने तू मी मी करून नाचतोस, ती ‘मी’ची संकल्पनासुद्धा खोटी असते.

पण तू गेल्यावर तुझी मोठी अंत्ययात्रा निघाली आहे, तुला निरोप द्यायला खूप लोक आलेले आहेत, ही कल्पना तुला आत कुठेतरी आवडत असते. तुला स्वतःच्या मृत्यूची कल्पनाही करवत नसली, तरी तुला मोठी अंत्ययात्रा मात्र आवडत असते. हासुद्धा ‘मी’पणाचा एक खेळच! खरं तर कामातल्या लोकांची वाट आडवण्यावाचून अंत्ययात्रेने काहीही साधले जात नाही.

१२२)

‘का कुणी पाहिले सत्याचे ते रूप

कुणी सांगितले रे असत्य म्हणजे पाप

सत्यार्थ जन्मते असत्य व्यभिचाराचे

फुलतात अग्निकण त्यातुन संघर्षाचे ।।

ही रुबाई समजून घेण्यासाठी अध्यात्मात सत्य आणि असत्य कशाला म्हणतात ते समजून घेतले पाहिजे.

सतत असणारे ते सत्य. ज्याच्या ज्याच्या अस्तित्वाचा लय होतो ते असत्य. सत्य हा शब्द ‘अस्’ ह्या धातूवरून आलेला आहे.  सतत अस्तित्वात असते ते सत्य. ज्याचा ज्याचा लय होतो ते असत्य. ह्या व्याखेमुळे चिरंजीव, शुद्ध, आणि ज्ञानस्वरूप असा आत्माच केवळ सत्य ठरतो. बाकी सगळे असत्य.

हे सर्व विश्व लय पावणारे आहे म्हणून ते असत्य आहे. ती माया आहे. इथे सत्य आणि खरे ह्यातील फरक समजून घ्यायला हवा. हे विश्व आपल्या अनुभवास येते म्हणजे ते खरे आहे. खोटे नाही. पण ते लय पावणार आहे, म्हणून असत्य आहे. आपण, आपल्या भावना, वासना, इच्छा सगळे सगळे असत्य आहे. हे सर्व आपल्याला जन्म-मृत्यूच्या फेऱ्यात अडकवते म्हणून त्याला पाप म्हटले गेले आहे.

किणीकर म्हणतात – अरे, कशाला बिचाऱ्या भावनांना आणि वासनांना ‘पापमय’ म्हणता? सगळ्या जगाचा उगम जर सत्यातून झाला असेल, तर हे सर्व पाप त्याच्याच संमतीने जन्मले आहे. आणि, भावना आणि वासनांची निर्मिती कशासाठी झाली आहे? मनुष्याच्या जन्मासाठी. मनुष्याचे शुद्ध स्वरूप आत्मा असतो. म्हणजेच सत्य असते. पापाची निर्मिती सत्याला त्याचा खेळ मांडता यावा म्हणून झालेली आहे.

‘सत्यार्थ जन्मते असत्य व्यभिचाराचे’

भावनांच्या आहारी जाणे, वासनांच्या आहारी जाणे, हा एक प्रकारचा व्यभिचारच आहे. सत्याशी केला गेलेला व्यभिचार, असे अनेक योगी मानतात. पण ह्या भूमिकेतून फक्त पाप-पुण्य असा संघर्ष माजतो.

‘फुलतात अग्निकण त्यातुन संघर्षाचे ।।’

ह्या संघर्षातून ज्याला कोणाला बाहेर पडायचे असेल, त्याला हा संघर्ष समजून घेऊन त्याच्या पलीकडे जावे लागते. सत्य आणि असत्य ह्यांचा खेळ, ह्यांची लीला समजून घ्यावी लागते. त्यांच्या खेळामुळे मनात संभ्रम तयार होतो. त्यात अडकून पडले की, तुम्ही असत्यात अडकला, असाच त्याचा अर्थ होतो.

१२३)

‘रंगमंच सजला स्वर्ग जणू हा दुसरा

दिसला न कुठे दुःखाचा कणभर कचरा

सौंदर्य सुखाचा पडदा खाली पडला

दे लिहून नाटक, घे भरला आहे पेला।।’

एक असते खरे नाटक. एक असते धंदेवाईक नाटक. खरे नाटक जीवनाशी प्रामाणिक असते. धंदेवाईक नाटक धंद्याशी प्रामाणिक असते. बहुतेक लोक करमणूक करून घेण्यासाठी नाटक बघायला येतात. ह्यात दुःख वगैरे कोणाला बघायला आवडेल? ह्या रुबाईमध्ये एक धंदेवाईक नाटकवाला एका लेखकाला नाटक लिहून मागतो आहे. हे नाटक कसे असावे, हेसुद्धा सांगतो आहे.

रंगमंच स्वर्गासारखा सजलेला हवा आहे. स्वर्गासारखे सुंदर वातावरण त्यावर पाहिजे. स्वर्गात प्रसन्न रंगांची सर्वत्र उधळण असते, असे सांगितले जाते. नाटकाचे नेपथ्य त्याप्रमाणे प्रसन्न असावे. प्रेम, वात्सल्य, कृतज्ञता, वगैरे स्वर्गीय भावना त्या नाटकात असाव्यात, अशी अपेक्षा तो करतो आहे.

‘रंगमंच सजला स्वर्ग जणू हा दुसरा’

अजून एक महत्त्वाची अपेक्षा म्हणजे नाटकात अजिबात दुःख नको. लोकांना ते अजिबात आवडत नाही! दिसला न कुठे दुःखाचा कणभर कचरा सगळे कसे सुंदर, मुलायम, सुखावणारे असावे. त्यात लोकांनी रंगून जावे आणि नाटकाचा अंत सुखातच व्हावा. सुंदरतेच्या आणि सुखाच्या वातावरणातच पडदा खाली पडावा.

‘सौंदर्य सुखाचा पडदा खाली पडला’

तो धंदेवाईक नाटकवाला अशा सुंदर नाटकाची ऑर्डर देतो आहे. असे नाटक लेखक लिहून देणार असेल तर तो नाटककाराचे लाडदेखील करायला तयार आहे. त्याला दारू वगैरे पाजायला तयार आहे.

‘दे लिहून नाटक, घे भरला आहे पेला।।’

ही अशी खोटी, जीवनापासून फारकत घेतलेली नाटके लोकांना हवी असतात. जीवनाशी प्रामाणिक असणारी, जीवनाचे प्रामाणिक चित्रण करणारी नाटके कुणाला हवी असतात? साहित्य कुणालाही फारसे नको असते. लोकांना हवे असते खोटे मनोरंजन!

१२४)

‘हा ऋषी काढतो का वाऱ्याची साल

का माकड म्हणते माझी आहे लाल

फुंकतो कवी का शब्दांचे नळकांडे

अरवता सूर्य का रात्र घालते अंडे।।

ह्या जगात भिन्न भिन्न प्रकारे लोक जगत असतात. आपापल्या बुद्धी प्रमाणे, आपापल्या कुवतीप्रमाणे लोक काही ना काहीतरी करत असतात. एखादा ऋषी ह्या विश्वाचा अर्थ लावण्यात मग्न असतो. वाऱ्याची साल काढण्याइतकेच हे अवघड काम आहे. पण तरीही तो ते काम करत असतो. एखादा उल्लू गृहस्थ आपण कसे शहाणे आहोत, हे सर्व जगाला सतत सांगत असतो.

एखादा कवी शब्दांचे खेळ करून आशयाला, तत्त्वज्ञानाला कवेत घ्यायचा प्रयत्न करत असतो. हे भिन्न प्रकृतीचे लोक वेगवेगळी कामे करत असतात. का? ही कर्ममग्नता कुठून येते. का असते ही माणसात? ह्या पृथ्वी वरचे सर्व जीव काहीतरी कार्य का करत असतात? ह्या कार्यामागची प्रेरणा काय? कोण रचते ही प्रेरणा ह्या सर्व जिवांमध्ये.

बरे, जिवांचे राहू द्या. ह्या विश्वातील सृष्टी, निसर्ग सगळे एका कार्याच्या चक्रात अडकलेले आहेत. सूर्य वर आला की, रात्र दूर होऊन दिवसाला जागा करून देते. प्रकाशाला जागा करून देते. प्रकाश सृजनाला जन्म देतो. का हे सगळे?

‘अरवता सूर्य का रात्र घालते अंडे।।’

१२५)

‘मी ध्वनी ऐकतो प्रतिध्वनीही मीच

का ज्योत जळे का प्रकाश, जळते काय

गारूड - मंत्र टाकता नाग का डोले

बघणारा बघतो विसरून आपुले डोळे।।

मी ध्वनी ऐकतो. त्या ध्वनीचा प्रतिध्वनीसुद्धा मीच ऐकतो. हा वरवरचा अर्थ. मी ध्वनी ऐकतो, आणि त्या ध्वनीचा प्रतिध्वनी मी स्वतःच होतो, हा खोलातला अर्थ. आपण आवाज ऐकतो, त्याला काहीतरी प्रतिक्रिया आपल्या मनात उमटते. ही प्रतिक्रिया हा एक प्रकारचा प्रतिध्वनीच! आपण एखादी ज्योत जळताना पाहतो. तिथे नक्की काय जळत असते? ज्योत जळत असते की, प्रकाश जळत असतो?

कुणाच्या मंत्राने हे जग सुरू चालले आहे? गारुड्याने मंत्र टाकताच नाग डोलू लागावा, तसे कुणीतरी मंत्र टाकल्यागत हे जग डोलत असते.

‘गारूड - मंत्र टाकता नाग का डोले

बघणारा बघतो विसरून आपुले डोळे।।

गारुड्याने टाकलेले गारूड नागावर पडते. तो डोलू लागतो. आणि आपण पाहणारेसुद्धा भान हरपून ते गारूड पाहात राहतो. का ते सगळे गारूड आपल्यावरच पडलेले असते? येथे अजून काही प्रश्न उभे राहतात. ध्वनी आणि प्रतिध्वनी वेगळे असतात का? प्रकाश आणि जळणे वेगळे असते का? गारूड आणि डोलणे वेगळे असते का? बघणे आणि दृष्टी वेगळे असते का?

इथे एक सांगावेसे वाटते की, ज्योत आणि प्रकाश ह्यांच्या जळण्याचा मामला जरा गोंधळाचा वाटतो. तसे बघायला गेलं तर ज्योतही जळत नाही आणि प्रकाशही जळत नाही. जळत असते वात! ही प्रतिमा चुकीची योजली गेली असे मला वाटते आहे. आयुष्याच्या अखेरच्या काळात किणीकरांनी कविता लिहून ठेवल्या. त्यांच्यावर शांतपणे संस्कार करण्याइतका वेळ त्यांना मिळाला नाही.

१२६)

‘मी पैज लाविली अमृत विकणाऱ्याशी

अन वैर साधले जाणुनी यमधर्माशी

सत्यवान मेला नाही चाऊनि साप

अमृतास होता सावित्रीचा शाप।।

किणीकरांच्या स्वभावात आणि अभिव्यक्तीत एक विक्षिप्तपणा दिसतो. अमृत विकणारे म्हणजे कर्मकांडी भोंदू. हा जप करा, मृत्यू दूर राहील, ही अंगठी घाला शतायुशी व्हाल - असे सांगणारे अमृताचे कंत्राटदार. ह्या लोकांशी किणीकरांनी पैज घेतली. म्हणजे जणू काही साक्षात मृत्यूशीच पंगा घेतला. पुढे किणीकर सांगतात -

‘सत्यवान मेला नाही चाऊनि साप

अमृतास होता सावित्रीचा शाप।।

सावित्री-सत्यावान कथेतील सत्यवान साप चावून मरतो. पण सावित्री त्याला न्यायला आलेल्या यमाच्या पाठोपाठ जाऊन त्याला परत जिवंत करून आणते. ह्या अर्थी साप चावूनही सत्यवान मेला नाही. कारण सावित्रीची तपस्या. तिची खरी तपस्या हाच ह्या अमृत विकणाऱ्यांना शाप आहे.

अजून एक अर्थ येथे शक्य होतो. अमृताशिवाय कुणी अमर होत नाही. येथे सावित्रीने दाखवून दिले आहे की, खरी तपस्या मृत्यूला परतवून लावू शकते. हा एक प्रकारे ‘अमृता’ला शापच आहे.

.................................................................................................................................................................

या लेखमालिकेतले आधीचे लेख

रॉय किणीकर रुबाईची परंपरागत ताकद आणि भारतीय आध्यात्मिक जीवनदृष्टी ह्यांच्या मिलाफातून एक वेगळेच जादूभरले रसायन तयार करतात…

रॉय किणीकर आध्यात्मिक होते की नाही, मानवी बुद्धीच्या पलीकडे ते गेले होते की नाही, हे कळायला मार्ग नाही, पण त्यांना अध्यात्म बुद्धीच्या पातळीवर तरी चांगलेच उमगले होते, ह्यात शंका नाही!

रॉय किणीकर ‘आधुनिक काळा’तील बंडखोर प्रवृत्तीचे कवी होते. म्हणून त्यांनी शारिरिक प्रेमाच्या रुबाया लिहिल्या...

रॉय किणीकर मोठे ठरतात ते त्यांच्या जीवनदृष्टीमुळे. त्यांच्या जाणीवेला एकाच वेळी मानवी जीवनातले आदर्श आणि पाशवीपणासुद्धा दिसतो!

किणीकरांच्या कवितेतील आशयघनता पचवायची असेल, तर खूप विचार करायला लागतो. ह्या अर्थाने ते मर्ढेकरांच्या खूप जवळचे आहेत

किणीकरांना सगळी दर्शने कळत होती आणि अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती काव्यात उतरवता येत होती. आणि अजून मोठी गोष्ट म्हणजे ते काव्य चार ओळींपुरते सुटसुटीत ठेवता येत होते

.................................................................................................................................................................

१२६)

‘जा, बंद करा धर्माच्या पोकळ गप्पा

ओरडते पंगत, ‘धर्म करा हो बाप्पा'

देवाचे भंजन हाच तुझा रे धर्म

दैवाचे भंजन धर्मातिल हे मर्म।।

एक अख्खी भिकाऱ्यांची पंगत जर धर्माच्या ठिकाणी भीक मागत असेल, तर त्या धर्माला अर्थ काय राहिला? इतक्या लोकांना जर भीक मागावी लागत असेल तर तो धर्म नसून धर्माच्या पोकळ गप्पाच आहेत. देवाच्या नावाच्या आधाराने जर धर्माच्या पोकळ गप्पा मारल्या जात असतील, तर अशा देवाला नकार दिलाच पाहिजे.

इतका सामाजिक आशय लिहून झाल्यावर किणीकर एकदम आध्यात्मिक झेप घेतात. आणि लिहितात -

‘देवाचे भंजन धर्मातिल हे मर्म’

देवाच्या संकल्पनेच्या पार जाणे हे धर्माचे खरे मर्म आहे. खऱ्या अध्यात्माचे हे खरे ध्येय आहे. देव हे एक रूप आहे. त्यात अडकून पडले तर ब्रह्मस्थिती प्राप्त होत नाही.

रामकृष्ण परमहंस ह्यांना कालीमाता दिसत असे. त्यांच्याशी बोलत असे. पण त्यांना ब्रह्मस्थिती प्राप्त होत नव्हती. त्यांना भेटायला आसामचे तोतापुरी महाराज आले. त्यांनी त्यांना ब्रह्मस्थिती प्राप्त करून दिली. तोतापुरी महाराज म्हणाले की, आता कालीमाता समोर आली की, मनाच्या तलवारीने तिचे दोन तुकडे कर. तसे केल्यानंतर मातेच्या प्रेमाचा आणि रूपाचा मोह सोडल्यावर त्यांना ब्रह्मत्व प्राप्त झाले. त्यांच्यासाठी आता देव आणि दैव असे काहीच उरले नाही! ह्या अर्थाने किणीकर लिहितात -

‘दैवाचे भंजन धर्मातिल हे मर्म’

.................................................................................................................................................................

या लेखमालिकेतले आधीचे लेख

रॉय किणीकरांना कवी म्हणून जी प्रतिष्ठा मिळायला पाहिजे होती, ती त्यांच्या आयुष्यात आणि नंतरही मिळाली नाही…

या दुनियेत प्रेषित म्हणून आलेले, बुद्ध म्हणून आलेले, अवतार म्हणून आलेले सगळे मृत्यू पावलेले आहेत. प्रेषित असो, बुद्ध असो, अवतार असो, देव असो, कुणालाही मरण चुकत नाही

शब्दांना मानवी मनातील विचार पूर्णत्वाने सापडत नाहीत. मनाच्या पलीकडचे काय सापडावे?

ह्या दुनियेची रीतच उफराटी आहे. खरं तर देव माणसातच लपलेला आहे, असे अध्यात्म ओरडून ओरडून सांगते आहे. तरीही माणूस दगडाच्या मूर्तीत ‘देव’ शोधायला जातो

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

‘हे राम’ म्हणून गांधीजी फक्त एकटे कोसळले नाहीत. त्यांच्याबरोबर संपूर्ण पृथ्वीचे पृथ्वी म्हणून असणेसुद्धा ‘हे राम’ म्हणून कोसळले आहे

.................................................................................................................................................................

१२८)

‘अणु फुटला गोलार्धावर पृथ्वी हसते

पण श्वासाचा कण फोडशील का म्हणते

अणुहुनि धाकुटा वीर्याचा हा थेंब

आकाश निरंतर पृथ्वीपासून लांब।।

अणुस्फोट झाला की, प्रचंड संहार होतो. पण तो फक्त जडाचा. चैत्यन्य कसे नाहीसे होईल? त्यामुळे अणुस्फोटाच्या ताकदीला पृथ्वी हसते आहे. ती अणुस्फोटाला श्वासाचा कण फोडून दाखवायचे आव्हान देते आहे. आध्यात्मिक जगतात असे सांगितले जाते की, श्वास प्रणावर आरूढ झालेला असतो. प्राणावर मन आरूढ झालेले असते. मन हे चैतन्याचेच एक रूप असते. हे कसे नष्ट होईल? किणीकर पुढे लिहितात-

‘अणुहुनि धाकुटा वीर्याचा हा थेंब’

अणुमध्ये प्रचंड संहारक शक्ती दडलेली असते हे खरे आहे. ह्या अर्थाने वीर्याचा थेंब अणुहून छोटा आहे. पण वीर्यात सृजनाची केवढी शक्ती असते. ह्या अर्थाने वरील ओळ किणीकरांनी उपरोधाने लिहिली असावी असे वाटते. ह्या नंतर किणीकर पुढची औपरोधिक ओळ लिहितात -

‘आकाश निरंतर पृथ्वीपासून लांब’

वीर्यातून व्यक्ती तयार होते. व्यक्तीच्या केंद्रस्थानी आत्मतत्त्व असते. ह्याला ‘आकाशतत्त्व’ म्हटले जाते. वीर्याच्या थेंबाद्वारे आकाशतत्त्व पृथ्वीवर राहायला येते. म्हणून किणीकर उपरोधाने म्हणतात - आकाश आणि पृथ्वी एकमेकांपासून किती लांब आहेत नाही! आकाश आणि पृथ्वी ह्यांचे हे एकत्त्व लक्षात घेतले, तर अणुस्फोट ही एक क्षुल्लक गोष्ट बनून जाते. म्हणून पृथ्वी अणुस्फोटाला हसते आहे.

‘अणु फुटला गोलार्धावर पृथ्वी हसते

पण श्वासाचा कण फोडशील का म्हणते

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

१२९)

‘गेलीस समोरून अडवी वाट करून

गर्दीतुन बघशी पुन्हा पुन्हा का वळून

ठेवून उरी पिचलेली हिरवी काच

भिरभिरली स्वप्ने सप्तपदीवर पाच।।

ही सरळ सरळ प्रेमभंगावरची रुबाई आहे. ती अचानक रस्त्यात भेटली. दृष्टादृष्ट झाली. ती पुढे निघून गेली, पण मागे मागे वळून बघते आहे. ह्याला ती मागे मागे वळून बघते आहे, हे दिसते आहे, म्हणजे हासुद्धा मागे मागे वळून बघतो आहे.

तो म्हणतो आहे की, तू मागे वळून बघते आहेस कारण -  तुझ्या उरात तू मला सोडून भरलेल्या हिरव्या चुड्याची काच रुतून राहिलेली आहे. तू हिरवा चुडा भरत होतीस, तेव्हा माझ्या आठवणीमुळे त्यातली एक बांगडी पिचली. ती का पिचली, हे तुझ्या लक्षात राहिलेले आहे. ती पिचलेली काच तुझ्या उरात अजून रुतून आहे. तू सप्तपदी चालत होती, तेव्हा माझ्याबरोबर आयुष्य काढण्याच्या स्वप्नांचे चार-पाच पक्षी तुझ्या मनात चिवचिवत अस्वस्थपणे फिरत होते.

..................................................................................................................................................................

लेखक श्रीनिवास जोशी नाटककार आहेत. त्यांची ‘आमदार सौभाग्यवती’, ‘गाठीभेटी’, ‘दोष चांदण्याचा’ अशी काही नाटके रंगभूमीवर आलेली आहेत. ‘टॉलस्टॉयचे कन्फेशन’ आणि ‘घरट्यात फडफडे गडद निळे आभाळ’ अशी दोन पुस्तकेही आहेत.

sjshriniwasjoshi@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......