चित्रे : आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासातले बीजकवी
ग्रंथनामा - आगामी
रणधीर शिंदे
  • ‘एकूण कविता’ या संग्रहाचं मुखपृष्ठ
  • Fri , 18 January 2019
  • ग्रंथनामा Granthnama झलक एकूण कविता Yekun Kavita दि. पु. चित्रे D. P. Chitre

दि. पु. चित्रे यांच्या समग्र कविता ‘एकूण कविता’ या नावाने पॉप्युलर प्रकाशनातर्फे लवकरच एकत्रित स्वरूपात प्रकाशित होत आहेत. या पुस्तकाला समीक्षक प्रा. रणधीर शिंदे यांनी लिहिलेल्या दीर्घ प्रस्तावनेचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

एकंदरीत १९६० नंतरच्या आधुनिक मराठी कविता-टप्प्यावरची चित्रे यांची कविता महत्त्वाची ठरते. या कवितेने मराठी कवितेला अनेकविध परिमाणे प्राप्त करून दिली आहेत. संवेदनांच्या व अभिव्यक्तीरूपाच्या पातळीवर या कवितेने विंदा करंदीकर यांनी म्हटल्याप्रमाणे चित्रे यांनी जी वाट निवडली आहे ती अनुकरणातीत अशी आहे. चित्रे यांच्या एकूण कविता स्वभावाची वैशिष्ट्ये पाहिली असता ती पुढील बाबींमध्ये दिसून येतात. पारंपरिक मराठी कवितेमध्ये प्रेमविषयक संवेदनेचा जो एक ठरीव स्टीरिओटाईप साचा होता तो चित्रे यांच्या कवितेने बदलविला. स्त्री-पुरुषातील प्रेमसंबंधाला कवितेतून नवी मिती प्राप्त करून दिली. आधुनिक मराठी कवितेत या संवेदनांच्या आविष्काराला थेट अशी अवकाशभूमी नव्हती. दैहिकता नाकारून कल्पित प्रेमाची संकेतबद्ध रूपे गिरविण्यात मराठी कवितेला धन्यता वाटत होती. या जाणिवेचा सांधा चित्रे यांनी आपल्या कवितेत बदलवून टाकला. स्त्री-पुरुषातील मीलनबंधाची वाट ज्या शारीर इंद्रियातून साक्षात होते, त्या इंद्रियानुभवाला, शारीरसंवेदनांना कमालीचे महत्त्व प्राप्त करून दिले. स्त्री-पुरुषातील या संबंधांना इथे आत्ताचा, लौकिकाचा संदर्भ दिला. त्यामुळे या प्रकारच्या कवितेला नवेपण प्राप्त करून नवी यत्ता प्राप्त करून दिली. तसेच या प्रीतसंवेदनेला भारतीय परंपरेतील दार्शनिक तत्त्वांची जोड दिली. ‘तियेविण भिकारी’ असणाऱ्या नरनारीच्या युगद्वंद्वाची, एकमेळीची सनातन जाणीव व्यक्त करून या जाणिवेला कालातीत जाणिवेचे परिमाण प्राप्त करून दिले.

चित्रे यांच्या कवितेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संवेदनात्मक अंगाचा केलेला वापर. मराठी कवितेत क्वचितच संवेदनात्मक अंगांना प्राधान्य देणारी कविता भेटते. ‘स्व’ या अस्तित्वजन्य संवेदनांचा जास्तीत जास्त आविष्कार करणे या कवितेचे महत्त्वाचे वेगळेपण आहे. त्या क्षणीचे संवेदन तत्काळ शब्दरूपातून मांडणे याला त्यांनी प्राधान्य दिले. मराठी कवितेत मोठ्या प्रमाणामध्ये भावनात्मक अंग प्रभावी होते. तर सत्तरनंतरच्या आधुनिक कवितेत बौद्धिकतेचे अंग प्रभावी ठरू पाहत आहे. त्यामुळे केवळ संवेदनाविष्काराला अग्रक्रम देणारी ही मराठीतील महत्त्वाची कविता आहे. चित्रे यांच्या कवितेत संवेदनांची कमालीची विविधता आढळते. मानवी संवेदनांच्या इतक्या अपरिमित छटा व्यक्त केल्या आहेत, ते पाहिल्यानंतर थक्क व्हावे असे हे काव्यरूप आहे. मानवी मनातील या संवेदनांच्या प्रभावी अक्षामुळे चित्रे यांच्या कवितेचे रूढार्थाने वर्गीकरण करता येत नाही.

चित्रे यांच्या कवितेचे एक महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे तिने केलेला संवेदनांचा अपूर्व असा आविष्कार. जो मराठी कवितेत सर्वस्वी निराळा ठरतो. सर्वतऱ्हेचे भलेबुरे अनुभव चित्रे कवितेतून मांडत आले. कोणताही अनुभव वा संवेदना आविष्कारासाठी त्यांनी वर्ज्य मानला नाही. संवेदना आविष्कारातील हे सातत्य त्यांनी कायम जपलेले दिसते. संवेदना आविष्कारातील हे सातत्य त्यांनी कायम जपलेले दिसते. संवेदना हा एक ज्ञानव्यवहार आहे. व्यक्ती आणि जग समजून घेण्याची ती परिभाषा आहे, हा ठसा त्यांच्या कवितेत कायम आहे. त्यामुळे त्यांच्या कवितेत या संवेदनांना केंद्रवर्ती स्थान लाभलेले दिसते. ‘एरव्ही कविता म्हणजे काय तर जिभेला जशी लाळ/एक न उलगडणारी सवय किंवा वर्तनाचा नियम/मी शोधतोय शब्दातल्या शब्दात जे असतं कायम/मेंदूत अचानक पाकळ्या उघडणारं ब्रह्मकमळ’ (एकूण कविता-२ : ४१४) या मेंदूत असंख्य पातळ्यांवर उघडणाऱ्या ब्रह्मकमळरूपी संवेदनांची अनंतरूपे चित्रे यांच्या कवितेत आढळतात. चित्रे यांनी एका कवितेत अनुभव संवेदनांसाठी घागरीचे रूपक योजिले आहे. अनेक मैल उचलून आणलेल्या/घागरीतल्या पाण्यासारखं माझं सुख दु:ख/तान्हेल्या माणसांच्या फेऱ्यांसारखं/आता यात पार धुवा/हे प्या, ह्यात न्हा/किंवा घागरीच्या तोंडातच मावळून गेलेलं/स्वत:च प्रतिबिंब त्यात पाहा’ या दृष्टीनेही चित्रे यांच्या कवितेतील संवेदनविश्व समजून घेणे महत्त्वाचे ठरते.

चित्रे यांच्या या कवितेला चिंतनशीलतेचा खास असा पदर आहे. किंबहुना चित्रे यांच्या एकूण संवेदनशीलतेवर खास असा भारतीयत्वाचा ठसा आहे. त्यांची संज्ञा या परंपरेने घडलेली आहे. त्यांच्या अनुभव घेण्याच्या व अभिव्यक्तीरीतीवर भारतीयत्वाचा ठळक असा प्रभाव आहे. म्हणून त्यांच्या कवितेत आधिभौतिक संवेदनांना व त्याने घडविलेल्या चिन्हसृष्टीचा विपुल अढळ आहे. ‘स्व’ आणि ‘पर’ याचा विचार करत असताना चित्रे यांची संवेदनशीलता आधिभौतिकाचा डोळा धारण करते. अर्थात ही आधिभौतिकता रूढ वा पारंपरिक स्वरूपाची नाही. नेणिवेतील तिच्या असण्याचा, विचारांचा संदर्भ तीमध्ये अध्याहृत आहे. म्हणून त्यांच्या कवितेतील वातावरण आदिम, प्राचीनतम वाटावे असे असते. मंदिरे, गोपुरे, घंटानाद, नृत्य, युग्म अशा चिन्हांचे अस्तित्व त्यामध्ये आहे. त्यांच्या कवितेला चिंतनशीलतेचा मोठा पदर प्राप्त झाला आहे तो या आधिभौतिक सृष्टीतून. म्हणून ‘शहरांत राहिलो गेलो नाही लंघून’ असे त्यांनी म्हटले आहे. अस्तित्वाची जाणीव व्यक्त करीत असता प्राचीन परंपरेतील पुराणकथासृष्टी, प्रतीके व त्या काळाचे तपशील अनेकवार त्यांच्या कवितेत येतात. ‘फोफावती रेणुकेच्या/ योनिपठारावरती शिल्पे/हेचि दान देगा देवा/पृथ्वी अद्वैताचा खवा’ (एकूण कविता-२ : ४३८) असे एका कवितेत त्यांनी म्हटले आहे. चित्रे यांच्या या रीतीचे वेगळेपण म्हणजे वाचकांना ती केवळ आधिभौतिकाचा संवेदनसंदर्भ देत नाही तर त्याच्यातून व्यक्त होणाऱ्या चिंतनफलकाचा, पसाऱ्याचा व आपलेपणाचा प्रत्यय देते. ती आधिभौतिकाच्या गौरवप्रेमाची महती गात नाही. ती स्थिरस्वरूपाचे संवेदन देत नाही. तिच्यात एक प्रकारचे गतितत्व आहे. हे गतितत्व त्यांनी आत्ताशी जोडून घेतलेले आहे. त्यामुळे या आधिभौतिक तत्त्वाचे आत्ताच्या जगण्याशी नाते स्थापित होऊन त्याच्या कक्षा विस्तारतात. त्यामुळे आधिभौतिकातील मूळच्या परिमाणांना अधिक झळाळी मिळते.

दिलीप चित्रे यांच्या कविसंज्ञेचे एक महत्त्वाचे परिमाण म्हणजे परंपरा, संस्कृतीचे त्यांनी केलेले पुनर्वाचन. विठ्ठल आणि वारकरी परंपरेचे त्यांनी केलेले आस्थाभावाचे चित्रण हा एक वेगळा पैलू त्यांच्या कविदृष्टीत आहे. एका भू-प्रदेशातील सामूहिक परंपरेने जोपासलेल्या आणि पालवलेल्या जीवनधर्माबद्दलचा ममत्वभाव वर्तमानातील चिकित्सा आणि विश्वभानाकडे जाण्याची दिशा या परंपरेत असल्याची भावना चित्रे वारंवार व्यक्त करतात. विशेषतः ‘एकूण कविता-१’ पासून हा भाव सातत्याने व्यक्त झाला आहे. विठ्ठल, ज्ञानेश्वर, तुकाराम या प्रस्थानत्रयीतून परंपरेचे एक वेगळे भावसंवेदन चित्रे यांच्या कवितेत आहे. त्यामुळेच पंढरपूर, देहू, इंद्रायणी, कऱ्हेपठार, आळंदी, भंडारा, सह्याद्री या स्थळांची व्याप्ती वाढलेली आहे.

दिलीप चित्रे यांच्या कवितेत कलाविषयक साहचर्यबाबींमुळे तीस संदर्भबहुलता प्राप्त होते. चित्रकला, चित्रपट, संगीत असे कलाविषयक संदर्भ तिला विविध परिमाणे प्राप्त करून देतात. आधुनिक मराठी कवितेत या प्रकारचे उदाहरण विरळा म्हणावे लागेल. चित्रे यांच्या बहुमुखी कलासंवेदनेचा प्रत्यय त्यांच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरील कवितांमधून दिसतो. चित्रे यांच्या व्यक्तिमत्त्वातील या कलासंपन्नेतेची जाण कवितिक रूपामधूनही व्यक्त झाली आहे. भारतीय तसेच पाश्चात्य कलेचा खोलवरचा व्यासंग या कामी त्यांना उपयोगाला आला असावा. चित्रे यांच्या कवितेतील या प्रभाव वैशिष्ट्याचा तुलनेच्या अंगाने विचार होऊ शकतो. चित्रकला आणि चित्रपटकलेतील दृश्यपरिमाणाचा परिणाम त्यांच्या कवितेवर झालेला आहे. तर संगीतातील स्वर आणि व्यंजनातील सूक्ष्म स्पंदनाचं भान व्यक्त झाले आहे. दुसऱ्या बाजूला शब्द आणि वाक्य उच्चारातील लयींचा लक्षणीय वापर चित्रे यांनी घडवून आणला. चित्रे यांच्या कवितेतील या कलाविषयीच्या परिमाणामुळे या कवितेस संदर्भबहुलता प्राप्त झाली आहे.

चित्रे यांची कविता समजून घेत असताना त्या काळातील मराठी कवितापटही ध्यानात घेणे गरजेचे आहे. भरपूर असा सामाजिक तपशील मांडू पाहणारी कविता एका बाजूला लिहिली जात होती. तर दुसऱ्या बाजूला ग्रेस यांच्या दुर्बोध शब्दमोहिनीचे आवाहन मराठी वाङ्मयीरीन पर्यावरणाला होते. अशा दुहेरी वाङ्मयीन पर्यावरणातून चित्रे यांनी आपल्या कवितेचे स्वतंत्र रूप घडविले. स्थिर, स्थितीशील केंद्राची आवर्तनात्मक कवितेच्या रूपाला वळसा घातला. ‘कविता’ या संग्रहापासून त्यांच्या ‘एकूण कविता-४’ या संग्रहापर्यंत काव्यरूपातील बदल त्यांच्या कवितेत दिसतात. आरंभीच्या काळात त्यांची कविता अधिकाधिक बंदिस्त, चिरेबंद स्थापत्यशैलीसारखी होती. पुढे पुढे ती अधिकाधिक मोकळी झाली. तिचा कल मुक्ताविष्काराकडे वा दीर्घत्वाकडे झुकला. कवितेतील शब्दवापरांना व त्याच्या साहचर्यसंबंधांना नवी अर्थवत्ता प्राप्त करून दिली. ध्वनी, शब्द, वाक्यबंध व रचनाबंधाची सहेतूक मांडणी, मोडणी केली. या भाषाविनियोगात दडलेल्या ध्वन्यार्थ स्फोटांचे दर्शन घडविले. भाषा वापरामागे समाज, संस्कृती व स्थलावकाशाचे तसेच वैयक्तिक भानही कार्यरत असते याचा प्रत्यय दिला. वैयक्तिक शैली म्हणूनही या काव्यरूपास आधुनिक मराठी कवितेत अनन्यसाधारण असे महत्त्व आहे.      

चित्रे यांच्या एकूण कवी कामगिरीची फलश्रुती एका ऐतिहासिक अक्षावर शोधावी लागते. एका बाजूला मर्ढेकरोत्तर आधुनिकीकरणाचे प्रभावी असे वळण तिने धारण केले आहे. त्याचबरोबर अस्तित्वानुभवाची व संवेदनांची नवी नीती मराठी कवितेला प्राप्त करून दिली. चित्रेय संवेदनशीलतेचा रा. ग. जाधव यांनी मुळे आणि पारंब्या संभारित करणारी संज्ञा या प्रमेयातून दर्शन घेतले. तर चित्रे यांनी स्वतः विंदा करंदीकरांवरील एका लेखात म्हटले आहे की, ‘आधुनिकतावादाला ओलांडून मराठी वाङ्मयीन संस्कृतीच्या स्वतंत्र परंपरेचा शोध घेणाऱ्या नव्या पिढीत मी मोडतो.’ त्याप्रमाणे चित्रे यांची कविता एक स्वतंत्र अशा स्वरूपाचे काव्यरूप दर्शन घडविते.

‘चित्रे यांच्या कवितेतील आत्मपरता रूपांतरित होते. विश्व पसाऱ्यात विलीन होणारा हा स्वर प्रसरणशील आहे. मानवी अस्तित्वाचं, समस्यांचं, स्त्री-पुरुष संबंधांचं, स्थळकाळाचं, जन्ममृत्यूचं, वेदना आणि यातना यांचं जिव्हारी लागलेलं भान शब्दांच्या मंत्रबळानं व्यक्त करणारा असतो. तो स्वर आहे. चित्रे यांच्या दीर्घकवितेचा मनस्वी तंद्रेत रचलेला पल्ला पाहिला की, आधुनिक काळातील श्यामन (दृष्टा, प्रेषित) म्हणूनच त्यांचा अभ्यास करावा लागतो. एकूण मराठी भाषेची दीर्घ परंपरा, परभाषेतील उत्कृष्ट काव्यपरंपरा पचवून उधळमोकळ्या मनानं समकाळाला, इतिहासाला आणि सभोवतालच्या जड, चेतनदृष्टीला सामोऱ्या जाणाऱ्या कवीची एक संपूर्ण मिथकावलीच स्थापित करणारी ही कविता ठरते. मराठीत वैश्विक जाणिवेची एवढी अत्युत्कट कविता चित्रे यांच्याशिवाय इतर कोणी लिहिलेली नाही.’ (रवींद्र किंबहुने, २०१०, १९३) हे चित्रे यांच्या कविता थोरवीचे नोंदविलेले निरीक्षण रास्तच ठरते.

एकंदरीत चित्रे यांची कविता भारतीय कवितेचा मानबिंदू आहे. काव्यसंकल्पनेत मूलभूत स्वरूपाचे बदल घडवून आणण्यात चित्रे यांच्या कवितेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. अस्तित्वानुभवाची नवी नीती भारतीय कवितेला प्राप्त करून दिली. काव्यरूपात संवेदना आविष्काराला सर्वश्रेष्ठ व प्राणभूत असे स्थान दिले. इंद्रियनिष्ठ जाणिवांचा अधिक खुला व मोकळा आविष्कार केला. एकाच वेळी परंपरा आणि आधुनिकतेचे नवे भान दिले. आत्मभान आणि विश्वभान यांना जोडणारा दुवा म्हणून वारकरी परंपरा आणि खंडोबा प्रतीकांतून महाराष्ट्र संस्कृती संवेदनेचा घेतलेला आत्मसमूहशोध वैशिष्ट्यपूर्ण ठरतो. शिव-शक्ती व देवी आराधनेच्या तत्त्वरूपकांतून स्त्रीपुरुष अस्तित्वाचा घेतलेला आदिम वेध ‘आत्ता’च्या संदर्भात लक्षणीय ठरला. वास्तववादी सपाट कवितेला शह देणारे काव्यविश्व तिने घडविले. भाषेचा अत्यंत नवनिर्माणशील, अत्युच्च वापर कवितेत घडवून आणला. भाषेला सतत सार्वभौमत्वाचं स्थान देणारा भारतीय पातळीवरील चित्रे यांच्यासारखा कवी अपवादभूत म्हणावा लागेल. शब्दचिन्हांमध्ये असणाऱ्या मंत्रमोहिणींचे सामर्थ्य प्रत्ययाला आणून दिले. गेल्या अर्धशतकातील मराठी कवितेचे वैभव वृद्धिंगत करणारे काव्यरूप चित्रे यांनी घडविले. आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात बीजकवी म्हणून चित्रे यांच्या वाङ्मयीन कामगिरीला असाधारण असे महत्त्व आहे.

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................