जेपींचे मन किती मोठे आहे, हे सर्वज्ञात होते; तरीही लोहियांविषयी इतकी अढी त्यांच्या मनात का होती? त्यांनी ती बाजूला ठेवून लोहियांना जवळ का केले नाही?
ग्रंथनामा - झलक
मधु लिमये
  • ‘जन्म बिगर-काँग्रेसवादाचा’ या द्विखंडी पुस्तकांची मुखपृष्ठे
  • Mon , 06 November 2023
  • ग्रंथनामा झलक जन्म बिगर-काँग्रेसवादाचा Birth of Non-Congressim मधु लिमये Madhu Limaye

मधू लिमये यांच्या ‘Birth of Non-Congressim’ या प्रसिद्ध पुस्तकाचा ‘जन्म बिगर-काँग्रेसवादाचा’ या नावाने सतीश कामत यांनी केलेला आणि साधना प्रकाशनाने प्रकाशित केलेला मराठी अनुवाद काल मुंबईत समारंभपूर्वक प्रकाशित झाला. या पुस्तकाविषयी मधु लिमये प्रस्तावनेत म्हणतात : “१९४७ ते १९७५ या कालखंडातील विरोधी पक्षांच्या राजकारणाचा पूर्ण पट या पुस्तकात मी उलगडून दाखवला आहे. या आधीही अनेक अभ्यास झाले आहेत, पण बव्हंशी ते विवक्षित राजकीय पक्ष वा विशिष्ट प्रादेशिक विभाग व त्यातील घडामोडी यांवर भर देणारे होते. एकूण विरोधी राजकारणाचा समग्र आढावा घेणारा अभ्यास उपलब्ध नव्हता. शिवाय त्यापैकी बहुतेकांचे लेखक हे एकतर अभ्यासक होते वा पत्रकार.

हे पुस्तक मात्र या राजकारणाची जडणघडण होत असतानाच्या प्रारंभिक काळापासूनच त्यात सक्रिय सहभाग असलेल्या लेखकाने लिहिले आहे. या सहभागातून लाभलेली समज आणि अंतर्दृष्टी, हे या पुस्तकाचे वेगळेपण.

या पुस्तकातील कथन पक्षपाती नाही, ना ते स्वसमर्थनार्थ केलेले आहे. हे चिकित्सक व वस्तुनिष्ठ विश्लेषण आहे. त्यातील प्रतिपादन आणि विधाने तत्कालीन कागदपत्रांची आणि दस्तावेजांची जोड देऊन केलेली आहेत. हा समकालीन इतिहासाचा प्रदीर्घ व वस्तुनिष्ठ आलेख असला, तरी एकापरीने त्याचे स्वरूप माझ्या व्यक्तिगत ‘राजकीय स्मरणगाथे’चे आहे.”

अशा या द्वि-खंडी पुस्तकातील लोहिया - जयप्रकाश संबंध या प्रकरणाचा हा संपादित अंश...

.................................................................................................................................................................

मला वाटते थोडे थांबून, जेपींच्या कारकीर्दीवर धावता दृष्टिक्षेप टाकणे उचित होईल. ना जेपींचे विचार, ना त्यांची राजकीय कारकीर्द कधी सरळ रेषेत पुढे गेली होती. पठारी प्रदेशातून वाहणाऱ्या मोठ्या नदीच्या प्रवाहाप्रमाणे दोन्ही सतत नागमोडी वळणे घेत पुढे गेले होते. काही वेळा ती आपले मार्ग बदलते आणि मागे फिरते, नंतर पुन्हा आपल्या मार्गक्रमणाला सुरुवात करते. पण या सगळ्या उलटसुलट प्रक्रियेत तिची दिशा सुस्पष्ट असते. जेपींच्या राजकीय कारकीर्दीचे असेच होते. जेपी सहज प्रभावित होत असत. काही वेळा तर फसवले जाण्याइतपत. त्यांच्या बुद्धीवर हृदयाचा अधिक ताबा होता. त्याने त्यांना अनेकदा चुकीच्या मार्गावर नेले.

अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात वावरूनही जेपी हळवेच राहिले. ते चटकन दुखावले जात. मात्र लगेच माफही करत. अनेकदा त्यांनी परस्परविसंगत आणि धक्कादायक घोषणा केल्या, मात्र ते अप्रामाणिक नव्हते. ना ते दुटप्पी वागत वा बोलत. विशिष्ट वेळी त्यांना जे तीव्रपणे आणि प्रामाणिकपणे वाटे, ते त्यांचे वैशिष्ट्य असलेल्या सुलभ आणि आग्रही शब्दांत व्यक्त करत. अंतिम उद्दिष्टांबाबत ते कधीच डळमळले नव्हते. साम्राज्यवादाचा अंत आणि देशाचे स्वातंत्र्य, समतावादी समाजाची स्थापना, सांप्रदायिक सलोखा आणि समान नागरिकत्व, जागतिक शांतता आणि वैश्विक बंधुभाव, ही ती उद्दिष्टे होती.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

त्या काळातील अनेक समर्पित डाव्या नेत्यांप्रमाणे, मार्क्सवाद आणि जाज्वल्य देशभक्ती, या दोहोंचा प्रभाव असलेले जेपीही हिंसक क्रांतीचे पुरस्कर्ते होते. नव्या समाजाकडील स्थित्यंतराच्या काळात कष्टकऱ्यांची हुकूमशाही हे आवश्यक अनिष्ट आहे, असे ते मानत होते. पण या पोथीनिष्ठ मार्क्सवादी श्रद्धांचा त्याग आणि अहिंसा, लोकशाही आणि राजकीय व आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण या तत्त्वांचा स्वीकार करण्याआधीपासूनच जेपींना गांधींविषयी तीव्र ओढ वाटू लागली होती.

ज्वलंत देशभक्ती आणि देशातून ब्रिटिशांची हकालपट्टी करण्याची तीव्र इच्छा, यामुळेच केवळ १९४० ते ४४ या काळात ते हिंसक मार्गांकडे वळले होते. या काळात साम्राज्यवादाविरोधातील प्रतिकाराचे जेपी हे प्रतीक बनले होते. असंख्य तरुणांना त्यांनी कार्यप्रवण केले होते. ‘ऑगस्ट क्रांतीची मशाल’ मानल्या गेलेल्या अरुणा असफ अलीही जेपींना ‘बंडाचे नायक’ मानत असत.

युद्धकाळात पोथीनिष्ठ मार्क्सवादाविषयी त्यांचा भ्रमनिरास झाला. लोकशाही आणि नागरिक स्वातंत्र्ये यांच्यावर त्यांचा दृढ विश्वास बसू लागला. हुकूमशाही आणि केंद्रीकरण या तत्त्वांना त्यांनी सोडचिठ्ठी दिली आणि एकपक्षीय शासनसंस्थेऐवजी ते बहुपक्षीय लोकशाहीचे भक्त झाले. पण इथेच ते थांबले नाहीत. हळूहळू प्रचलित पक्षीय राजकारण आणि निवडणुका यांच्यातील त्यांचा रस मावळत गेला. पक्षविरहित लोकशाहीचा पुरस्कार त्यांनी सुरू केला. पक्षरहित शासनसंस्था ही आजची नव्हे, तर दूरच्या भविष्यातील शक्यता आहे, असे आपल्याला त्या वेळी वाटत होते, असा खुलासा त्यांनी कालांतराने केला होता. नजीकच्या काळासाठी बहुपक्षीय लोकशाही नष्ट होणे, त्यांना स्वीकारार्ह वाटत नव्हते.

लोकशाही जिवंत राहायला हवी असेल, तर विरोधी पक्ष समर्थ असले पाहिजेत, यावर त्यांचा भर होता. पण नेहरूंच्या काँग्रेसबरोबर संघर्षाचे राजकारणही त्यांना पसंत नव्हते. राष्ट्रीय सहमतीच्या गरजेवरील त्यांचा विश्वास त्यांनी टिकवून धरला होता. दुसऱ्या शब्दांत सांगायचे, तर त्यांना स्पर्धात्मक राजकारणाचे क्षेत्र मर्यादित आणि निर्बंधित असावे, असे वाटत होते. पक्षीय संघर्ष मवाळ, सौम्य करणे, हे त्यांचे उद्दिष्ट होते. जमीन सुधारणा, श्रमाधारित अर्थव्यवस्था आणि ग्रामीण पुनरुत्थान याविषयीच्या त्यांच्या मतांचा १९४८नंतर जेपींनी कधीच फेरविचार केला नव्हता. जेपींना सर्वाधिक प्रिय होते ते नीतिमान समाज, भ्रष्टाचाररहित आणि स्वार्थमुक्त सार्वजनिक जीवन.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

लोकशाहीवरील सांप्रदायिक घाला रोखायचा असेल तर सर्व समंजस, समन्वयी आणि सहिष्णू शक्तींनी सामुदायिकरीत्या आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे

आज आपल्या सभोवताली घोर अंधार दाटला असताना, जे दीपस्तंभ आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतात, त्यापैकी एक मधू लिमये आहेत

..................................................................................................................................................................

आयुष्याच्या अंतिम पर्वात ते संघर्षाच्या राजकारणात ओढले गेले. त्यांनी त्यांची भूमिका नाखुशीनेच बजावली. त्यांच्या दृष्टीने तो कर्तव्याचा भाग होता.

जेपी खरोखरच अनिच्छेने ‘विरोधकांचे नेते’ झाले होते. सुडाच्या कोणत्याही भावना त्यांना शिवल्या नव्हत्या, याची नोंद घेतली पाहिजे. त्यांच्या शत्रूला ते उदारपणे माफ करत. इतरांच्या- मग ते व्यक्तीचे असो वा समूहाचे- दुःखाने त्यांचे हृदय द्रवत असे. ते ‘वज्रादपि कठोराणी’ निश्चितच नव्हते, पण ‘मृदूनी कुसुमादपि’ होते.

इंदिरा गांधी १९७७मध्ये निवडणुकीत पराभूत झाल्या, तेव्हा त्यांच्या ‘भावा’च्या पराभूत कन्येविषयीच्या सहानुभूतीने त्यांचे मन व्याकूळ झाले होते. त्यांच्यात सूडबुद्धीचा अंशही नसल्यामुळे त्यांना स्थानबद्धतेत टाकणाऱ्या इंदिरा गांधींना ते माफ करू शकले होते. या सहानुभूतीची पावती म्हणून त्यांची पत्नी प्रभावती आणि इंदिरा गांधींची आई कमला यांच्यातील पत्रव्यवहार जेपींनी इंदिरा गांधींकडे सुपूर्द केला होता.

जेपींचे मन किती मोठे आहे, हे सर्वज्ञात होते, तरीही लोहियांविषयी इतकी अढी त्यांच्या मनात का होती? त्यांनी ती बाजूला ठेवून लोहियांना जवळ का केले नाही? त्यांच्यात स्पर्धा होती का? पण लोहियांनी तर नेहमीच त्यांची नेतृत्व क्षमता मान्य केली होती. मग यामागील कारण काय होते? परस्परांना समजून घेण्यातील अपयश की, दुखावलेल्या भावना?

जेपी-लोहिया संबंध हे माझ्या दृष्टीने एक गूढ होते. १९५४मध्ये लोहियांच्या अनेक मतांवर जेपींनी टीका केली होती. ती मते बिघडलेल्या डोक्यातून निघाली आहेत, अशी टिप्पणी त्यांनी केली होती. वादविवादाच्या त्यांच्या पद्धतीविषयी ‘दुर्दैवी’ या शब्दांत जेपींनी नाराजी व्यक्त केली होती. लोहिया ‘विचारांवर नव्हे, तर व्यक्तींवर टीका करतात आणि हेत्वारोप करतात’, असेही जेपी म्हणाले होते. पक्ष फोडल्याचा आरोपही त्यांनी लोहियांवर केला होता. त्या वेळी जेपी काँग्रेस आणि कम्युनिस्ट यांच्यात पक्षपात करू पाहत होते. कम्युनिस्टांपेक्षा जेपींचा स्पष्ट कल काँग्रेसकडे झुकलेला होता, तर दोघांनाही सारखेच अप्रस्तुत मानावे, अशी लोहियांची मागणी होती.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

लोकशाहीवरील सांप्रदायिक घाला रोखायचा असेल तर सर्व समंजस, समन्वयी आणि सहिष्णू शक्तींनी सामुदायिकरीत्या आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे

आज आपल्या सभोवताली घोर अंधार दाटला असताना, जे दीपस्तंभ आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतात, त्यापैकी एक मधू लिमये आहेत

..................................................................................................................................................................

लोहियांच्या ‘अवास्तव दंभा’वर जेपींच्या टीकेचा विशेष रोख होता. राजकारणात मी परतण्याचा प्रश्नच उद्‌भवत नाही, असे जेपींनी सुरेंद्रनाथ द्विवेदी यांना लिहिलेल्या पत्राच्या उत्तरात म्हटले होते. जेपींनी संघटनात्मक जबाबदारी पुन्हा स्वीकारावी, अशी विनंती द्विवेदी यांनी पत्रात केली होती. पण त्यानंतर वर्षाच्या आतच पक्षांतर्गत वादात त्यांनी हस्तक्षेप केला होता आणि लोहिया व माझ्या विरोधात अशोक मेहतांना पाठिंबा दिला होता.

लोहिया या वादात नसते, तर माझ्या विरोधात जाऊन जेपींनी मेहता यांची बाजू घेतली असती, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. लोहियांच्या राजकीय भूमिकेला मी पाठिंबा देणे जेपींना अजिबात आवडले नव्हते. प्रसपमधून लोहियांना बडतर्फ करण्याचा ठराव २१ जुलै १९५५ रोजी जेपींनी स्वतःच मांडला होता. पण बरोबर दोन वर्षांनी जेपींचे मतपरिवर्तन झाले. धाडसाने त्यांनी लोहियांशी ऐक्याची बोलणी सुरू केली!

सहकार्याच्या नेहरूंच्या प्रस्तावाला जेपींनी दिलेल्या प्रतिसादावर लोहियांनी कडाडून टीका केली होती. भूदान चळवळीला वाहून घ्यायचा जेपींचा निर्णय त्यांना पसंत नव्हता. नेहरू आणि विनोबा यांचा जेपींवरील प्रभाव हानिकारक आहे, असे लोहियांना वाटत होते. ‘परिवर्तनाच्या राजकारणा’त जेपींनी परतावे म्हणून प्रयत्न करणे त्यांनी कधीच थांबवले नव्हते. ‘प्रजा समाजवादी पक्षातून माझी हकालपट्टी करण्यामागील मुख्य सूत्रधार जेपी होते, मात्र त्याचा सल माझ्या मनात नाही. जेपी हे प्रचंड भले करण्याची, तसेच प्रचंड हानी करण्याची क्षमता बाळगणारे लोकनेते आहेत, हे नक्की.’

जेपींचे वर्णन ‘सक्षम नाविक’ असे करून लोहिया म्हणाले होते - ‘निष्क्रिय जयप्रकाश हा देशासाठी धोका होता आणि पुढेही असेल, पण सक्रीय आणि परिवर्तनकारी जयप्रकाश हे देशाच्या पुनर्रचनेसाठी प्रभावशाली शक्ती ठरू शकतात.’

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

१९५७मधील जेपींबरोबरची बोलणी फिसकटली असली, तरी दोघांतील संभाषण पुन्हा सुरू झाले, याचा लोहियांना अतिशय आनंद झाला होता. लोहिया चिंतनशील होते आणि कृतीशीलही. त्यांच्याकडे असामान्य गुणवत्ता होती. तरीही आपल्यात काहीतरी कमतरता आहे, असे आतून त्यांना जाणवत होते. कदाचित करिष्म्याचे वलय वा इतरांना आकर्षित करण्याची चुंबकीय क्षमता, ज्याविना कोणीही यशस्वी नेता होऊ शकत नाही, ती  आपल्यात नाही, अशी लोहियांची भावना असावी.

लोहियांच्या मते जेपींमध्ये ही गुणवत्ता होती. ‘देश आणि तुम्ही भावनिक धाग्याने जोडले गेले आहात. केवळ तुम्हीच देशाचे नेतृत्व करू शकता आणि समाजवादाचे ध्येय सुकर करू शकता’, असे लोहियांनी ३० मार्च १९५४ रोजी जेपींना लिहिलेल्या पत्रात नमूद केले होते.

जेपींच्या नेतृत्व क्षमतेविषयीचे हे त्यांचे मत कधीच बदलले नव्हते. जेपींच्या भोवती नेतृत्वाचे वलय असले, तरी त्यांच्यात अनेक त्रुटी आणि कमतरता होत्या. धरसोडवृत्ती ही त्यातील सर्वांत मोठी, शिवाय नेहरूंपुढे स्वीकारलेली बौद्धिक आणि आत्मिक अधीनता, दुय्यम दर्जा. लोहियांनी नेहरूंशी असलेले धागे १९४७मध्येच, कदाचित १९४२मध्येच तोडले होते.

समाजवादी चळवळीचे नेतृत्व स्वीकारावे म्हणून जेपींचे मन वळवण्याचे प्रयत्न लोहियांनी केले नव्हते असे नाही, पण ते अपयशी ठरले होते. त्यापैकी एक प्रयत्न त्यांनी संसपच्या स्थापनेच्या वेळी केला होता. लोहिया १४ जुलै १९६४ रोजी जेपींना भेटले होते. नेहरूंच्या निधनानंतरच्या देशातील राजकीय परिस्थितीवर त्यांची चर्चा झाली होती. जेपी आणि माझ्यात ३० ते ४० वर्षांचे स्नेहसंबंध आहेत, असे लोहिया म्हणाले होते. ‘आमच्या विचारांत जरूर भिन्नता आहे, पण ही मतभिन्नता केवळ १०-१२ वर्षेच जुनी आहे.’ अशीही टिप्पणी त्यांनी केली होती.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

लोकशाहीवरील सांप्रदायिक घाला रोखायचा असेल तर सर्व समंजस, समन्वयी आणि सहिष्णू शक्तींनी सामुदायिकरीत्या आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे

आज आपल्या सभोवताली घोर अंधार दाटला असताना, जे दीपस्तंभ आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतात, त्यापैकी एक मधू लिमये आहेत

..................................................................................................................................................................

जेपींनी नव्याने स्थापन झालेल्या संसपमध्ये प्रवेश करावा, अशी लोहियांची इच्छा होती. ‘जयप्रकाश परंपरेत घडलेले अनेक जण येथे त्यांना भेटतील’, असे लोहिया म्हणाले होते. जेपी क्रांतिकारी राजकारणात परतले, तर मला आपल्या सर्व इच्छा पूर्ण झाल्यासारखे वाटेल, अशी लक्षणीय पुस्तीही लोहियांनी जोडली होती. ‘नव्या संसपचे स्वाभाविक नेते’, या शब्दांत त्यांनी जेपींचे वर्णन केले होते.

जेपींनी सक्रिय राजकारणात यावे, यासाठीचे आपले अपुरे राहिलेले प्रयत्न लोहियांनी त्यांच्या मृत्यूपूर्वी नव्याने सुरू केले होते. शेवटच्या चार-पाच वर्षांत ते जे करू पाहत होते, ते लोकमान्यता असल्यामुळे जेपी अधिक परिणामकारकपणे करू शकतील, असे लोहियांना वाटत होते. परंतु त्यांच्या मनातील इच्छेला (माझ्या मते व्यर्थ) वास्तवात आकार देण्यापूर्वीच काळाने लोहियांवर झडप घातली. अर्थातच, जेपींनी लोहियांना मन हेलावून टाकणारी आदरांजली वाहिली होती, पण लोहिया हयात असताना दोघे मिळून समाजवादाच्या ध्येयासाठी सहकार्य करू शकले नव्हते.

सूक्ष्म मानसशास्त्रीय कारणे आणि फुगलेले अहंकार, यामुळे हे शक्य झाले नव्हते. दोघांना परस्परांविषयी टाळता न येणारे आकर्षण होते, तरीही ते परस्परांना पूरक आणि पोषक बनून परिणामकारक राजकीय साथीदार होऊ शकले नाहीत. परिणामी देशाच्या पुनर्निर्माणासाठी प्रगतिशील राजकीय हत्यार अस्तित्वात येऊ शकले नाही. भारतातील भरडल्या जाणाऱ्या जनतेच्या हितासाठी या दोघा नेत्यांना एकवाक्यतेने काम करायला भाग पाडील, असा महान नेता अस्तित्वात नव्हता.

आचार्य नरेंद्र देव हे आदरणीय नेता होते, मात्र त्यांच्याकडे लोकांना आकर्षित करण्याची क्षमता नव्हती ना ते कृतिशील होते. नेहरू आणि पटेल यांच्याबाबतीत गांधींनी जे केले, ते देव (जेपी व लोहिया यांच्याबाबतीत) करू शकले नाहीत. लोहियांना अभिप्रेत असलेली समाजवादी धोरणे आणि कार्यक्रम यांचा रथ पुढे नेण्यासाठी जेपींसारख्या जुन्या, संघर्षातून तावून सुलाखून निघालेल्या नेत्याला तयार करणे, ही लोहियांची महत्त्वाकांक्षा होती.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

पण लोहियांची संकल्पना आणि मांडणी यांचे जसेच्या तसे अनुसरण करणे जेपींना कमीपणाचे वाटले होते. तिच्या योग्यायोग्यतेचा प्रश्न अप्रस्तुत होता. लोहियांनी असा प्रयत्न करावा, यामुळे कदाचित जेपी सुखावले असावेत. त्यांचा आत्मविश्वास टिकून राहिला असावा. परिणामी १९७४-७७ या काळात त्याचा देशाला उपयोग झाला.

बिहारमधून १९६४मध्ये माझी लोकसभेवर निवड झाल्यानंतर जेपींशी माझ्या भेटीगाठी वाढल्या आणि आमच्यातील जुने जिव्हाळ्याचे संबंध पुन्हा प्रस्थापित झाले. त्यांच्यातील ममत्व कायम होते. संसदेतील माझ्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले होते. विशेषतः मतदारसंघातील लोकांशी असलेल्या माझ्या नियमित संपर्काचे त्यांना अप्रूप वाटत असे. बिहारमध्ये हे अपवादात्मक होते. काँग्रेस तसेच इतर लोकप्रतिनिधी पाच वर्षांतून एकदा मतदारसंघात दर्शन देत असत.

मुंगेर-बांका भागात जेपींच्या सर्वोदयी केंद्रांचे मोठे जाळे होते. त्यामार्फत जेपींचे माझ्या कामांवर लक्ष असे. जेपींच्या व्यक्तिमत्त्वाची पूर्वीइतकीच भुरळ माझ्यावर होती. त्यांच्याकडून मला ऊर्जा मिळत असे. त्यांच्या सहवासात एक प्रकारची निवांत समाधानाची भावना माझ्या मनात वसत असे. समोरच्याच्या मनावरील दडपण दूर करण्याची, त्याचा आत्मसन्मान वा स्वाभिमान जागा करण्याची एक तरल कला त्यांच्याकडे होती. काहीही असो, त्यांच्या मनात मला स्थान आहे, हे त्यांनी मला दाखवून दिले होते.

मात्र राजकारणाविषयीच्या त्यांच्या मूलभूत दृष्टीकोनात काही बदल झालेला मला जाणवला नव्हता. लोहियांविषयी ते क्वचितच बोलत. संविद सरकारांविषयी ते उत्साही नव्हते. त्यांच्या मनातील संदेह मला कळत होता; कारण माझ्याही मनात तो होता. १९६७मध्ये राष्ट्रपतीपदाचे उमेदवार होण्यासाठी मी जेपींवर दबाव आणावा, अशी माझ्या अनेक सहकाऱ्यांची इच्छा होती. ही अपेक्षा व्यर्थ होती. ते याला तयार होणार नाहीत, हे मला माहीत होते.

..................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा : 

लोकशाहीवरील सांप्रदायिक घाला रोखायचा असेल तर सर्व समंजस, समन्वयी आणि सहिष्णू शक्तींनी सामुदायिकरीत्या आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे

आज आपल्या सभोवताली घोर अंधार दाटला असताना, जे दीपस्तंभ आपल्याला योग्य मार्ग दाखवू शकतात, त्यापैकी एक मधू लिमये आहेत

..................................................................................................................................................................

या संदर्भात काही मित्र त्यांना दोनदा भेटले होते. मीसुद्धा हा विषय त्यांच्याकडे काढला होता. पण त्यांनी उमेदवारीला नकार दिला होता. इतकेच नव्हे, तर त्यांनी झाकीर हुसेन यांच्या उमेदवारीचे समर्थन करणारी निवेदने आणि पत्रे प्रसिद्धीस दिली. त्यामुळे मतदानावर किती प्रभाव पडला, हे मी सांगू शकत नाही. मात्र लोहियांच्या भव्य नियोजनाला मात्र त्यामुळे सुरुंग लागला होता.

विरोधी पक्षांतील सहकार्याचा पुरस्कार नेहरूंच्या मृत्यूनंतर जेपींनी थांबवला असताना, या धोरणाचे सर्वांत प्रभावी मांडणीकार आणि पुरस्कर्ते म्हणून लोहिया पुढे आले होते. काँग्रेसची मनधरणी करणे वा काँग्रेसकडून करून घेणे, हे त्यांचे उद्दिष्ट नव्हते, तर पक्ष म्हणून काँग्रेसला उद्‌ध्वस्त करणे आणि त्याच्या अंतानंतर नवी पक्ष पद्धत अस्तित्वात आणणे, हे होते. जेपींपेक्षा त्यांचे अंतिम उद्दिष्ट पूर्णपणे भिन्न होते. काँग्रेसशी सहकार्याच्या शक्यता जेपींनी कधीच पूर्णतः नजरेआड केल्या नव्हत्या; अगदी काँग्रेसच्या विरोधात निवडणुका लढवत असतानाही!

लोहियांकडे विचारांची स्पष्टता, निर्धार आणि इतर गुण असतानाही ते परिणामकारक नेतृत्व का देऊ शकले नाहीत, हा प्रश्न स्वाभाविकपणे पडतो. समाजव्यवस्थेत लोहियांना मूलगामी बदल घडवून आणायचे होते. त्यांचे जातींविषयीचे धोरण उच्चवर्णीयांच्या तीन हजार वर्षांच्या मक्तेदारीला आव्हान देऊ पाहत होते. तरीही दडपलेल्या वर्गाचा प्रतिसाद ते मिळवू शकले नव्हते. ते प्रभावशाली डावपेच आखण्यात वाकबगार नव्हते. एकाच पण आकर्षक विषयावर ते लक्ष केंद्रित करू शकत नसत. ते एकाच वेळी अनेक आघाड्यांवर काम सुरू करण्याचा प्रयत्न करत. परिणामी अनेक जण त्यांच्यापासून दूर गेले, विशेषतः प्रभावशाली मध्यमवर्ग. सत्तेला कोणतेही आव्हान नसण्याच्या काळातील नेहरू हे या वर्गाचे सर्वोच्च प्रतीक होते.

लोहियांचे जातीविषयक धोरण म्हणजे राज्यघटनेतील विशेष संधी देण्याचे तत्त्व आणि पहिली घटना दुरुस्ती, यात ग्रथित सिद्धान्ताचा तार्किक विस्तार होता. त्यांना जातींचा उच्छेद हवा होता, जाती टिकवणे नव्हे. याउलट जातीचे प्रतिनिधित्व करणारा नेता स्वतःचे हितसंबंध जपण्यासाठी जातसमूहांचा वापर करतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

जातीयवादी नेत्यांपेक्षा लोहियांचा दृष्टीकोन वेगळा होता. मागासवर्गीयांकडून फार तर थोड्या सहानुभूतीची तेवढी लोहियांची अपेक्षा होती. त्यांच्याकडे सत्ता नव्हती. त्यामुळे हरिजन आणि इतर यांच्याशी जशी इंदिरा गांधींची ओळख जोडली गेली होती आणि त्यांच्या प्रतीच्या या वर्गाच्या निष्ठाही अगदी त्यांच्या मृत्यूनंतरही टिकून राहिल्या होत्या, तसे लोहियांच्या बाबतीत होऊ शकले नव्हते. मागासवर्गीयांतील आदिवासींच्या निष्ठा ते मिळवू शकले नाहीत, तसेच बिगरब्राह्मण जातींतील नेत्यांनी आपापल्या जातसमूहांच्या निष्ठा कमावल्या, तसेही लोहियांना शक्य झाले नव्हते (उदाहरणार्थ, डॉ. आंबेडकर, चरणसिंह, जगजीवनराम).

लोहियांच्या मनात गोंधळ नव्हता. उद्दिष्टावरही ते ठाम होते. याखेरीज सत्ता संपादनाकरता आवश्यक इच्छाशक्तीही (स्वतःकरता सत्तेची आकांक्षा नव्हे) त्यांच्याकडे होती. मात्र पक्षाच्या नेत्यांमध्ये ते विश्वास निर्माण करू शकले नाहीत.

लोहिया हे करकरमुन्डे, भांडखोर आहेत, प्रतिमाभंजक आहेत, बंडखोर आहेत, संघटनात्मक कामाचा त्यांचा पिंड नाही, असे या नेत्यांना वाटत होते. लोहियांकडे व्यक्तिगत वलय जरूर होते, पण नेतृत्वासाठीच जन्माला आलेल्याचे आकर्षण नव्हते. जेपींकडे ते पुरेपूर होते. सुरुवातीला समाजवादी पक्षाच्या राज्यशाखांचे नेते आणि नंतर अन्य विरोधी पक्षांचे नेते यांना लोहियांच्या सानिध्यात असुरक्षित वाटत असे.

नवी दिल्लीतील विलिंग्डन हॉस्पिटलमधील (नंतर या हॉस्पिटलचे नाव डॉ. राममनोहर लोहिया हॉस्पिटल ठेवण्यात आले) डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे लोहियांचा मृत्यू झाल्यानंतर दिल्लीतील दहनभूमीवर श्रद्धांजली सभा झाली होती. लोकसभेचे अध्यक्ष संजीव रेड्डी अध्यक्षस्थानी होते. जेपींनी अतिशय हृदयस्पर्शी भाषण केले. त्यांना शोक अनावर झाला होता. लोहियांच्या मृत्यूनंतर मतभेदांचा विसर पडला आणि केवळ मैत्रीच्या आठवणी उफाळून आल्या.

लोकांच्या दृष्टीने पाहिले, तर मृत्यूनंतरच्या सहानुभूतीपेक्षा हयात असताना एकमेकांच्या साथीने काम केले असते, तर ते अधिक उपयुक्त ठरले असते. पण प्राचीन काळापासून भारतीय मनाची ठेवण, अशीच चमत्कारिक राहिली आहे.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

राजकीय पटावरून लोहिया अंतर्धान पावल्यानंतर, अनेक मुद्द्यांवर आपण चुकीचे होतो आणि लोहिया बरोबर होते, हे जेपींनी मान्य केले होते. नेहरूंविषयीचे लोहियांचे मूल्यमापन अधिक योग्य होते, हे जेपींनी जाहीरपणे सांगितले होते. कुरुक्षेत्र विद्यापीठाला १९७४मध्ये जेपींनी भेट दिली, तेव्हा मी त्यांच्यासमवेत होतो. प्रवासात भूतकाळातील घटनांविषयी आमच्यात संभाषण झाले होते. मी त्यांना विनोबा भावे यांच्याविषयी विचारणा केली होती. विनोबांविषयी लोहिया आणि मी जे म्हणत होतो, ते खरे होते. विनोबा हे महात्मा गांधींच्या परंपरेतील क्रांतिकारक नव्हते, असे जेपींनी मनमोकळेपणाने मान्य केले होते.

१९७२नंतर देशाची वाटचाल एकाधिकारशाहीकडे होऊ लागली होती. लोहियांची उणीव तीव्रपणे जाणवत होती. या कसोटीच्या क्षणी जेपींनी ही पोकळी भरून काढली. आचार्य कृपलानी वृद्ध झाले होते. ते लोकांचे नेतृत्व करण्याच्या स्थितीत नव्हते. शिवाय दादा कृपलानींचे व्यक्तिमत्त्व काटेरी, बोचरे होते, त्यामुळे नेतृत्वगुणात, लोकांना बरोबर घेण्यात ते कमी पडत. अशा वेळी लोकांचे नेतृत्व करायला जेपी उभे राहिले. लोहिया नेहमी म्हणत, जेपी जनतेचे नेतृत्व समर्थपणे करू शकतात. आणि १९४२नंतर जेपींनी पुन्हा एकदा आपल्या दृढ नेतृत्वगुणांची प्रचीती दिली.

देशात लोकशाही पुनर्प्रस्थापित झाली, याचे बव्हंशी श्रेय जेपींच्या प्रयत्नांना जाते. जेपींचे या देशावर मोजता येणार नाही इतके ऋण आहे...

‘जन्म बिगर-काँग्रेसवादाचा’ (भाग १ व २) - मधु लिमये

मराठी अनुवाद - सतीश कामत, साधना प्रकाशन, पुणे मूल्य - ७०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......