गोविंद तळवळकर : संपादक आणि इतिहासकारही!
ग्रंथनामा - झलक
आर. एच. कांबळे
  • ‘ऐतिहासिक शोधनिबंध’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 25 January 2019
  • ग्रंथनामा झलक ऐतिहासिक शोधनिबंध Yetihasik Shodhnibandh आर. एच. कांबळे R. H. Kamble

‘ऐतिहासिक शोधनिबंध’ या पुस्तकात डॉ. आर. एच. कांबळे यांनी ‘प्राचीन ते अर्वाचीन काळ, स्थळ आणि व्यक्ती विचारांचा वेध’ घेतला आहे. हे पुस्तकच नुकतेच डायमंड पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित झाले आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

२१ मार्च २०१७ रोजी पत्रकार गोविंद तळवलकर यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ वृत्तपत्रसृष्टीचेच नुकसान झाले असे नसून इतिहासाच्या अभ्यासकांनाही इतिहासावरील नवनवीन भाष्ये वाचायला मुकावे लागणार आहे. तब्बल २७ वर्षे सातत्याने ‘महाराष्ट्र टाईम्स’ या दैनिकाची धुरा संपादक या नात्याने तळवलकरांनी सांभाळली आणि त्या पत्राला एक लौकिक मिळवून दिला हे खरेच! एक सव्यसाची, चिकित्सक, निर्भीड पत्रकार म्हणून तळवलकरांनी आपली प्रतिमा जनमानसात तयार केली होती. ज्यांचे अग्रलेख मुद्दाम वाचावेत असे संपादक तळवलकर होते. १९६७ मध्ये ‘महाराष्ट्र टाईम्स’च्या संपादक पदावर येण्याअगोदर त्यांची संपादक पदाची तपश्चर्या चालू होती. प्रत्यक्ष लेखनाचा दीर्घ अनुभव त्यांनी मिळवला होता. त्याला अखंड वाचनाच्या व्यासंगाची जोड आवडीने दिली होती. त्यामुळे संपादक पदाच्या जबाबदारीने ते कधी वाकून अथवा गडबडून गेले नाहीत. उलट ‘महाराष्ट्र टाइम्स’ला त्यांनी अधिक उठावदारपणा मिळवून दिला.

मानवेंद्रनाथ रॉय यांच्याबद्दल त्यांना आदर असल्याने प्रत्येक गोष्ट बुद्धीवर घासून पाहण्याची त्यांची पद्धत होती. त्यामुळे विद्वत्तेचे ते भोक्ते होते. ढोंगीपणा आणि भोंगळपणा याचा त्यांना विलक्षण तिटकारा होता. कोणाचे अनुकरण करण्याची वृत्ती नसल्याने रॉय यांच्याविषयी आदर असला तरी त्यांच्या विचारांचे ते अनुकरण करत नसत. विविध विषयांचा सातत्याने व्यासंग करणे व विरोधकांचीही मते समजावून घेण्याची तयारी दाखवणे याबाबत ते तत्पर असत. पण एकदा सर्व बाजूंनी चौकशी केल्यावर अग्रलेखातून हल्ला करताना ते कोणालाही दयामाया दाखवत नसत. याबाबतीत ते लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते असे म्हणण्यास हरकत नाही.

सयुक्तिक विवेचन व तर्कशुद्ध मांडणी ही तळवलकरांच्या लेखनात दिसत असे. उगाच फापटपसारा घालण्याचा त्यांचा स्वभाव नसल्याने नेमक्या शब्दांत, पाल्हाळ न लावता ते आपला मुद्दा स्पष्ट करत असत. विस्तृत वाचनाचा व अभ्यासाचा प्रत्यय त्यातून येत असे. तळवलकरांच्या लिखाणात तर्कशुद्ध मांडणी, व्यासंगाचा प्रत्यय, रोखठोकपणा, इत्यादी गुणांबरोबर त्यांच्या लेखनाला एक साहित्यिक शैली असल्याने त्यांचे अग्रलेख वाचनीय होत असत.

केवळ प्रहार आणि तर्कशुद्ध विवेचन हेच तळवलकरांचे वैशिष्ट्य नव्हते. एखाद्या व्यक्तीविषयी तळवलकर लिहीत, तेव्हा त्यात त्यांचा जिव्हाळा विशेष जाणवतो. त्यादृष्टीने त्यांचे मृत्युलेख उल्लेखनीय ठरतात. आचार्य अत्रे, पु. भा. भावे, ग. दि. माडगूळकर, ना. सी. फडके यांच्या मृत्यूनंतर तळवलकरांनी लिहिलेले मृत्युलेख चिरंतन स्वरूपाचे झाले आहेत. ‘लोकनायकाचे निर्वाण’ हा जयप्रकाश नारायण यांच्या निधनानंतर लिहिलेला मृत्युलेख आजही मनाचा ठाव घेतो. तळवलकरांनी लिहिले होते- ‘मरणोन्मुख जयप्रकाश हेही एक मानसिक आधार होते. समाजात एक शक्ती वावरत असल्याचा दिलासा लोकांना मिळत होता.’

तळवलकरांचा या बाबतीतील आवाका केवळ महाराष्ट्र आणि भारतापुरताच मर्यादित नव्हता. फ्रेंच विचारवंत आंद्रे मालरो, अमेरिकन इतिहासकार विल ड्युरांट, जर्मन लेखक स्टिफन झ्वांइग, रशियन लेखक डोस्टोव्हस्की, कार्ल मार्क्स, जॉन मेनॉर्ड केन्स, आर्थर कोस्लर यांच्यावरील अग्रलेखांचा या संदर्भात विचार करता येईल.

विशेष प्रसंगी आपल्या अग्रलेखावर एखादे अवतरण देण्याची आवड तळवलकरांना होती. पण हे अवतरण सहसा संस्कृत नसे; तर ते रामदास स्वामींसारख्या रोखठोक लिहिणाऱ्या संतांचे असे. समर्पक व वेधक मथळे देण्याबाबतही तळवलकर चोखंदळपणा दाखवत. त्यातही टिळकांची थोडीफार छाप दिसतेच. ‘समाजवाद की माजवाद?’, ‘गवई आणि त्यांचे साजिंदे’, ‘सूक्ष्मातील विनोबा व स्थुलातील आपण’, अत्र्यांच्या निधनानंतरचा त्यांचा अग्रलेख होता ‘कडा कोसळला’, तर इतिहासकार महामहोपाध्याय द. वा. पोतदारांच्या मृत्यूनंतर तळवलकरांच्या अग्रलेखाचे नाव होते- ‘पुण्यातील पुराणपुरुष’. एका अग्रलेखाचे नाव होते- ‘सचिवालयातील जिवाजी कलमदाने’ तर दुसऱ्या एका अग्रलेखाचे नाव होते- ‘सचिवालयातील मेहूण’.

दैनिकाचा अग्रलेख म्हणजे वाचकांशी संपादकाने केलेला पाच-दहा मिनिटांचा संवाद असतो, असे काकासाहेब खाडिलकर म्हणत. त्यामुळे अग्रलेखाला एक आकृतीबंध हवा असतो. तळवलकरांच्या अग्रलेखात तो आढळताना दिसत असे. आकर्षक वा स्फोटक मथळा, थेट प्रारंभ, सुस्पष्ट शेवट आणि त्यात उपहासगर्भता असा त्यांच्या अग्रलेखांचा थाट असे.

उदारमतवादी व ‘लीडर’ या अलाहाबादच्या पत्राचे संपादक वाय. सी. चिंतामणी यांच्या जन्मशताब्दीप्रसंगी तळवलकरांनी अग्रलेखात जे उद्गार काढले होते, ते खुद्द तळवलकरांनाही बहुतांश लागू पडतात. ते उद्गार असे- ‘‘चिंतामणी यांचा काळ व आजचा काळ यात साहजिकच फरक आहे. पण वृत्तपत्रीय नीती, कार्य व समता यांचे निकर्ष बदलण्याची गरज नाही. अभ्यास, मेहनत, स्वमतावरील श्रद्धा आणि आपली मते डौलदार भाषेत मांडण्याची हातोटी हे चिंतामणींचे गुण तेव्हाही आवश्यक होते व आजही आहेत. पैसा, अधिकार, प्रशंसा व टीका यांपैकी कशालाही चिंतामणी बधणारे नव्हते. लोकप्रिय राजकारणाचा पाठपुरावा न करताही चिंतामणी हे लोकप्रिय संपादक होते.”

अशा प्रकारे गोविंदराव तळवलकर हे सर्वमान्य पत्रकार आणि संपादक म्हणून ओळखले जातात. पण ही झाली त्यांची एक ओळख. त्यांच्यामध्ये एक इतिहास संशोधक आणि इतिहासकारही दडलेला होता. ही त्यांनी दुसरी ओळख, ‘नवरोजी ते नेहरू’ हा इतिहासावरील त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ १९६९ मध्ये प्रकाशित झाला. तर याच ग्रंथाची दुसरी आवृत्ती १९८० मध्ये प्रकाशित झाली. दुसऱ्या आवृत्तीत त्यांनी मधल्या १०/११ वर्षांत विषयाच्या अंगाने जी भर पडली, त्याचा उपयोग करून इतिहास तसा रचला. याबाबतीत ते ‘रियासत’कार सरदेसाईंचे वारसदार शोभतात. ‘रियासत’कारांच्या मराठी रियासतींना त्यांच्याच हयातीत दोन-दोन आवृत्त्यांचे भाग्य लाभले होते. तेव्हा त्यांनी दोन आवृत्त्यांमधल्या काळात जी साधने हाती आली, त्यांचा साक्षेपाने उपयोग करून घेऊन पुढच्या आवृत्तीमध्ये आवश्यक ती भर टाकली.

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीवरील पुष्कळशा लेखनात भावनात्मकता पुष्कळ आढळते. परंतु तळवलकरांनी ब्रिटिश राज्य स्थापनेने एक नवे युग कसे सुरू झाले व त्यातून भारतीय समाजाचे राजकीय, सामाजिक, आर्थिक परिवर्तन कसे घडून आले, याचा तौलनिक आढावा घेतला. त्याचबरोबर स्वातंत्र्योत्तर काळात आपण अपेक्षित प्रगती करू शकलो नाही, ही मांडणी त्यांनी कुणाचीही भीडभाड न ठेवता केली. भारतीय स्वातंत्र्याच्या संदर्भात तळवलकरांचा आणखी एक महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ‘सत्तांतर’. या त्रिखंडी ग्रंथात तळवलकरांनी देशाच्या स्वातंत्र्याच्या दिशेने घटनात्मक बाजूने काय-काय व कसे प्रयत्न झाले याचे विवेचन केले.

याशिवाय त्यांचे महत्त्वाचे ऐतिहासिक लेखन म्हणजे ‘सोविएत साम्राज्याचा उदय आणि अस्त’ हा चार खंडी ग्रंथ. प्राचीन काळापासून ते १९९६ पर्यंतचा रशियाचा राजकीय इतिहास या ग्रंथात त्यांनी ग्रथित केला आहे. या इतिहासाचा अभ्यास चालू असतानाच त्यांना भारताच्या परराष्ट्र धोरणाबद्दल अभ्यास करावासा वाटला आणि त्यातूनच त्यांचा ‘भारत आणि जग’ हा ग्रंथ साकारला. अनेक इंग्रजी जुन्या-नव्या साधनांचा अतिशय सार्थपणे अभ्यास करून नेहरूंनी आखून दिलेल्या परराष्ट्रीय धोरणानुसारच नंतरच्या सर्व पंतप्रधानांनी ते धोरण कसे अंमलात आणले, हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिले.

यशवंतराव चव्हाणांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी यशवंतरावांचे चरित्र प्रकाशित केले. यशवंतरावांची अलीकडच्या काळात काही मराठी लहान-मोठी चरित्रे प्रकाशित झाली आहेत. तथापि मराठीतील हे सर्वांत मोठे आणि विश्वसनीय चरित्र म्हणावयास हवे.

लोकमान्यांवर त्यांनी त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त १९५६ मध्ये एक छोटेखानी चरित्र प्रकाशित केले होते. न्यायमूर्ती रानडे यांच्यावर ‘विराटज्ञानी न्यायमूर्ती रानडे’ नावान तर ‘नेक नामदार गोखले’ हे नामदार गोखल्यांवरील चरित्र त्यांना प्रकाशित केले.

‘महाराष्ट्र टाईम्स’मधून त्यांनी जी नवनवी सदरे सुरू केली होती, त्यातून त्यांची काही पुस्तके तयार झाली. ‘अग्निकांड’, ‘पुष्पांजली’, ‘वाचता-वाचता’, ‘इराक दहन’, ‘बदलता युरोप’ इत्यादी पुस्तके म्हणजे देखील इतिहासविषयक लेखनच होते. म्हणूनच ते केवळ पत्रकार न ठरता इतिहासकार किंवा इतिहासाचे भाष्यकारही ठरतात!

तळवळकरांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात एकंदर ४३ पुस्तके लिहिली, तर त्यांच्यावर अलीकडेच ‘ज्ञानमूर्ती गोविंदराव तळवळकर’ हे पुस्तक प्रकाशित झाले असून त्याप्रसंगी पत्रकार आणि इतिहासकार यापेक्षाही त्यांचे अनेक पैलू प्रकाशात आले आहेत.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4715/Aitihasik-Shodhnibandh

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................