तो दिवस ६ ऑगस्ट, १९४५ हा होता
ग्रंथनामा - झलक
क्रेग कोली
  • ‘नागासाकी’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 19 October 2018
  • ग्रंथनामा झलक नागासाकी Nagasaki क्रेग कोली Craig Kohli

जपानवरील पहिल्या अणुबॉम्ब हल्ल्याची कहाणी ही मानवतेला लाजवणाऱ्या भयाण परिणामांची कहाणी आहे. त्याविषयीचे ‘नागासाकी’ हे क्रेग कोली यांचे पुस्तक नुकतेच मेहता पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केले आहे. जयश्री गोडसे यांनी अनुवादित केलेल्या या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

हिरोशिमा, सोमवार, ६ ऑगस्ट १९४५, सकाळ

नशीब हे आकाशात विमानाच्या उंचीवर असते. कधी कधी ते येताना आपल्याला कळते, कधी कधी नाही. कधी कधी आपल्याला त्या आवाजाचे महत्त्व लक्षात येते, कधी कधी ते हुशारीने निसटून जाते. खूप दूरवरून येणाऱ्या विमानाचा आवाज आपल्याला आपल्या धुंदीत स्पष्टपणे कळत नाही. पण नशीब म्हणजेसुद्धा शेवटी जुगार आहे. घटना घडून गेल्यावर मग आपण विचार करतो की, अरे! असे केले असते तर बरे झाले असते; खूप वेळा बऱ्याच आधी ते करणे आवश्यक असते. बऱ्याच वेळा आपण आपल्या या जवळ येणाऱ्या नशिबाचा आवाज ऐकून काही करण्याआधीच सगळे घडून जाते. आपण ते टाळू शकत नाही.

ही गोष्ट आहे त्या दिवसाची, ज्या दिवशी माणसाच्या तंत्रज्ञानविषयक बुद्धिमत्तेतून निर्माण झालेले एक संहारक उत्पादन मुक्त होत होते... अति उंचावर विमानाच्या आवाजाच्या रूपाने लागलेली ही भविष्याची चाहूल, युद्धामुळे खिळखिळ्या झालेल्या त्या शहराला लागलीच नाही! उन्हाळ्याच्या तलखीने ते शहर अधिकच सुस्त झाले होते. रोजच्यासारख्या दिसणाऱ्या त्या दिवसावर नशिबाचा घाला येऊ घातला होता...

…..…..…..…..…..

कंपनीच्या घरांपासून बस मित्सुबिशी शिपयार्डच्या अगदी जवळपर्यंत, म्हणजे चालत जाता येईल अशा अंतरापर्यंत जात असे. बसमध्ये बसल्यावर त्सुतोमू यामागुचीच्या लक्षात आले की, त्याचा वैयक्तिक शिक्का- ‘इनकान’ तो घरीच विसरला आहे. सही म्हणून लाल रंगात शिक्का बुडवून सर्व कागदपत्रांवर मारला जात असे. त्या शिक्क्याशिवाय बाहेर पाठवण्यात येणाऱ्या कागदावर सही होत नसे. त्याने त्याच्याबरोबरच्या दोघा सहकाऱ्यांना पुढे जायला आणि नंतर शिपयार्डमध्ये आपण भेटू, असे सांगितले. त्याने परत घराकडे जाणारी बस पकडली. बसच्या मागच्या बाजूला लाकडे जाळण्यासाठी जी जागा होती, तेथून धुराचे लोट बाहेर पडत होते. अनेक वर्षे चाललेल्या युद्धाचे हे परिणाम होते. जे काही उपलब्ध असेल त्याने काम भागवणे गरजेचे होते.

मित्सुबिशी नागासाकी शिपयार्ड कंपनीमधून त्यांच्या हिरोशिमा येथील विस्तारित कामाकरता यामागुची आणि त्याचे दोन सहकारी इवानागा आणि सातो यांची टेक्निकल ड्राफ्ट्समन म्हणून तात्पुरती बदली झाली होती. पाच हजार टन ऑइल टँकरवर ते काम करत होते. काम झाल्यावर ते परत घरी जाऊ शकणार होते. तिघांनी सकाळीच आपले सामान बांधून ठेवले होते. उन्हाळ्यातील एक स्वच्छ प्रकाशाचा दिवस उजाडलेला होता. कामाच्या ठिकाणी जाऊन गेल्या तीन महिन्यांपासून बरोबर काम करणार्‍या तेथील कर्मचार्‍यांचा निरोप घ्यायचा त्यांनी ठरविले. दुसऱ्या दिवशी दक्षिणेकडच्या क्युशू बेटावरच्या नागासाकीकडे ते प्रयाण करणार होते. तेथे त्यांची कुटुंबे आणि मित्रमंडळी होती.

तो दिवस ६ ऑगस्ट, १९४५ हा होता. १९४१ च्या डिसेंबरमध्ये पर्ल हार्बरवर हल्ला केल्यापासून जपान विरुद्ध अमेरिका आणि मित्रराष्ट्रे यांच्यात युद्ध सुरू होते. पहिल्या सहा महिन्यांतच ज्या गतीने जपानने दक्षिण-पूर्व आशिया ते डच पूर्व इंडीजपर्यंत (आताचा इंडोनेशिया) मुसंडी मारली होती, याचे त्यांनाच आश्चर्य वाटत होते. पण गेल्या तीन वर्षांत मात्र हे यश हळूहळू खच्ची केले गेले. यात शत्रुराष्ट्रांनी चांगलीच कामगिरी केली होती. ओकिनावाच्या रक्तपातात आणि महागड्या युद्धात अमेरिकेने चांगलेच यश मिळवले आणि त्यांनी आता आपला मोर्चा जपानच्या भूमीकडे वळवला होता. जपानच्या, सार्वभौम राष्ट्राच्या स्वप्नांचा अतिशय दुःखद शेवट करायचा होता.

युद्धाच्या या टप्प्यावर सगळ्याच वस्तूंची टंचाई होती. सर्वसामान्य जपानी माणसासाठी आयुष्य म्हणजे जगण्यासाठी चाललेला दुःखद संघर्ष होता. अशक्य वाटणाऱ्या विजयाच्या क्षीण तंतूचा काय तो आधार होता आणि विजयाच्या स्वप्नाचा हा बुडबुडाही जपानी अधिकाऱ्यांनी फुगवला होता. लोकांचे नीतिधैर्य टिकवण्यासाठीची ती युक्ती होती. १९४५ पर्यंत तर अंडी, दूध, कॉफी यांपैकी काहीच दुकानांत मिळत नसे आणि चहासुद्धा खूप कमी प्रमाणात उपलब्ध असे. सोयाबीन भाजून त्यापासून कडवट, कॉफीसारखा अर्क बनवता येत असे. मागच्या अंगणात किंवा वस्त्यांमधील मोकळ्या जागेत उगवलेल्या भाज्या उपलब्ध असत. बऱ्याचशा सार्वजनिक जागा, शाळांची मैदाने, बागा यांमध्ये या भाज्या उगवल्या जात होत्या. सर्वसामान्य माणसांसाठी पेट्रोल कुठेही उपलब्ध नसे. खासगी गाड्या चालवायच्या नाहीत, असा नियम होता. बस आणि टॅक्सीसुद्धा ज्वलनासाठी लाकडाचा वापर करत, तर ट्रेनसारख्या गाड्या अनेक शहरांत विजेवर चालवल्या जात होत्या. याशिवाय रस्त्यांवर सायकली, पायी जाणारे लोक आणि काही लष्करी वाहनांची फक्त गर्दी असे.

या काळात शत्रुपक्षांची विमाने जपानच्या इतक्या जवळ पोचली की मार्चपर्यंत विमानांच्या ताफ्यांचे जपानी शहरांवर मोठ्या प्रमाणात बॉम्बहल्ले सातत्याने सुरू झाले होते. लाकडी इमारतींचे प्रमाण जास्त असल्याने या हल्ल्यांमुळे जबरदस्त नुकसान होत असे. आपले सार्वभौम राज्य स्थापता येणार नाही, या वास्तवाची जाणीव झाल्यामुळे जपानी लोक दुःख वाटत असूनही, तक्रार न करण्याचा लवचीकपणा वागण्यात ठेवत. अन्नाची कमतरता असली तरी सर्वसामान्य माणसे आणि लष्करातील लोकांनी आपली नैतिकता हट्टाने, निठाहाने टिकवली होती.

बर्माच्या पपेट सरकारचे पंतप्रधान यू बा मॉ यांनी जेव्हा टोकियोला दुसऱ्यांदा भेट दिली, तेव्हा लोकांमधील हा बदल त्यांच्या लक्षात आला. घडणाऱ्या घटनांमुळे ते कमालीचे शांत झाले होते आणि त्यांचा भ्रमनिरास झाला होता, असे मॉ यांनी म्हटले तरीही अनेक जण निर्धाराने युद्धास तयार होते. अमेरिकेने जेव्हा बॉम्बहल्ले करून शहरांत विध्वंस केला होता, तेव्हा बा मॉ तेथे होते. जपानी लोकांची सहनशीलता बघून ते चकित झाले होते. अक्षरशः हजारोंची हत्या आणि दाट लोकवस्तीत धडाडून पेटलेल्या आगी त्यांनी बघितल्या. दुसऱ्या दिवशी प्रचंड पडझड आणि विध्वंस बघितला. तरीदेखील कुठेही घबराट, स्वतःचीच कीव करणे नव्हते किंवा या सगळ्याचे जे बळी होते ते कुठेही तक्रार करताना दिसत नव्हते. उलट त्यांपैकी काही जण आनंद व्यक्त करत होते, ‘राजाचा राजवाडा’ वाचल्याबद्दल!

संपूर्ण जपानमधील शाळकरी विद्यार्थी आणि ज्यांची गरज नव्हती असे सामान्य नागरिक ग्रामीण भागाकडे पाठवले गेले होते. पण त्याचे नियोजन योग्य पद्धतीने केलेले नव्हते. जे मागे राहिले त्यांचे योग्य नियोजन करून, आगी विझवण्यासाठी, राहण्यासाठी घरे बनवण्यासाठी किंवा कारखान्यांमध्ये व शेतात काम करण्यासाठी उपयोग करून घेतला जात होता.

या ढेपाळलेल्या नेतृत्वामुळे आणि प्रत्यक्ष लढण्यात अपयशी ठरणाऱ्या लष्करामुळे जे सतत हवाईहल्ले होत होते, त्यावर काहीच परिणाम होत नव्हता. पूर्ण राष्ट्रात हवाईहल्ल्यांची सूचना देणारी आणि हल्ला झाल्यावर जमिनीखाली खंदकात जाण्याची सोय करून घेण्यात आली होती. हवाईहल्ल्याची सूचना जवळजवळ दररोज सगळीकडे दिली जात असे; पण इतक्या दिवसांत हिरोशिमावर अजून तरी हवाईहल्ले झाले नव्हते.

६ ऑगस्टला सकाळी सात वाजता जपानच्या रडारवर अमेरिकेचे विमान दक्षिणेकडून येताना दिसले. त्याबरोबर धोक्याची सूचना दिली गेली. रेडिओवरचे कार्यक्रम बंद केले गेले, बऱ्याच शहरांत आणि हिरोशिमातसुद्धा! विमाने खूप उंचीवरून उडत होती. ती संख्येनेही कमी आणि विखुरलेली होती. आठ वाजेपर्यंत हिरोशिमातील रडार यंत्रणेवर अधिकाऱ्याला फक्त तीन विमाने दिसत होती. त्यामुळे त्याने धोका संपल्याची सूचना दिली. रेडिओचे कार्यक्रम पुन्हा सुरू झाले. फक्त प्रत्यक्षात अमेरिकेचे बी-२९ हे बॉम्बर विमान जर दिसले तर पुन्हा खंदकाकडे जा, असे सांगण्यात आले. येणारी विमाने ही प्रदेशाची माहिती घेणारी, टेहळणी करणारी आहेत असे वाटले. पेट्रोल इतके कमी होते की अशा वेळी पूर्वीसारखी जपानी लढाऊ विमाने येणाऱ्या विमानांवर हल्ला करण्यासाठी उड्डाणे घेत नसत. ही विमानेसुद्धा फक्त तीनच होती.

यामागुची दक्षिण-पूर्वेकडील शहराच्या राहण्याच्या ठिकाणी परत आला. एकतर विमाने दिसल्यावर वाजवण्यात आलेली धोक्याची घंटा त्याने ऐकली नाही किंवा तिच्याकडे दुर्लक्ष केले. त्याने त्याचे बूट काढले. गेल्या तीन महिन्यांपासून तेथे राहत असलेल्या या पाहुण्याला तेथील वयस्क व्यवस्थापकाने चहा प्यायला बोलावले. गप्पाटप्पांमध्ये २५ वर्षांच्या यामागुचीने त्याला सांगितले की, आता आपण कुटुंबाला भेटायला खूप उत्सुक आहोत. तो हिरोशिमाला आला तेव्हा नुकताच त्याचा मुलगा जन्माला आला होता. त्याने त्याचे नवे घरही अजून बघितले नव्हते. घरी परतल्यावर अनेक गोष्टी उत्साहाने करण्याजोग्या होत्या.

.............................................................................................................................................

अधिक माहितीसाठी कीलक करा -

https://tinyurl.com/y86lc3fq

.............................................................................................................................................

नागासाकीत राहणारा आणखी एक जण व्यवसायासाठी आला होता. तोपण याच गाडीने घरी जाणार होता. ‘मिनयु’ (झदज्त) या नागासाकीत दररोज प्रकाशित होणाऱ्या वृत्तपत्राचा हा प्रकाशक बुटका, लठ्ठ आणि छोट्या मिश्या ठेवणारा होता. पन्नाशीच्या जवळ असणाऱ्या या इसमाचे नाव ताकेजिरो निशिओका असे होते. अमेरिकेकडून केल्या जात असलेल्या बॉम्बहल्ल्यांमुळे होणार्‍या हानीमुळे जपानच्या उत्तरेकडील या वृत्तपत्राच्या संपादकांना विशेष खबरदारी घेणे आवश्यक होते; कारण त्यांच्या प्रिंटिंग प्रेसचे जर बॉम्बमुळे नुकसान झाले, तर तातडीने काही निर्णय घेणे आवश्यक ठरले असते. या समूहाची नागासाकीमध्ये जागा अजून निश्‍चित झाली नव्हती, एका गुहेत रोटरी प्रेसेस बसवायचे असे ठरवले होते. महिन्याच्या आत असा जमिनीखाली एक प्लांट उभारण्याचे या संपादकांनी ठरवले होते. खरे म्हणजे साहित्य आणि कामगार दोघांचीही कमतरता होती. जे कैदी होते त्यांनाच कामगार म्हणून घेणे फायद्याचे होते. कारण त्यातील काही कदाचित कोळसा खाणीत काम करणारे अनुभवी असू शकत होते; परंतु त्यासाठी न्याय प्राधिकरण अधिकारी आणि प्रीफेक्चर गव्हर्नर यांची परवानगी मिळवणे आवश्यक होते. गृहमंत्रालयाकडून जर आदेश मिळाला, तर गव्हर्नरचे सहकार्य मिळू शकले असते.

या समूहाने चांगला जनसंपर्क असणारे आणि स्पष्टवक्ते निशिओका यांना या कामासाठी निवडले होते. टोकियोला जाऊन दोघा संबंधित मंत्र्यांची परवानगी मिळवणे हे काम त्यांच्यावर सोपवले गेले होते. दोन्ही मंत्र्यांचा होकार मिळवला तेव्हा टोकियोला गेलेल्या निशिओका यांच्या लक्षात आले की, लष्करामधील कामगारांचीसुद्धा गरज आहे. क्युशूमधील लष्कराचे कमांडर जनरल योकोयामा यांच्याकडून त्याची परवानगी काढणे आवश्यक होते. जगात इतरत्र असते तसेच जपानमध्येही होते. तुम्ही कुणाला ओळखता, हे तुम्हाला काय माहीत आहे यासाठी उपयुक्त ठरते. निशिओका योकोयामांना ओळखत नव्हते; पण दक्षिण-पश्चिम जपानचे आर्मी कमांडर मार्शल शुनरोकू हाता हे योकोयामांचे नातेवाईक, तर निशिओकांचे मित्र होते. हातांचे मुख्य कार्यालय हिरोशिमा येथे होते. टोकियोहून नागासाकीला जाताना या दूरच्या प्रवासात त्यांनी हिरोशिमाला उतरायचे ठरविले.

५ ऑगस्टला हिरोशिमाकडे जाणाऱ्या गाडीत जागा नव्हती; पण ताकेजिरो निशिओका यांच्या खूप ओळखी होत्या. त्या वापरून एका रात्री जाणार्‍या लष्करी गाडीत त्यांनी जागा मिळविली. ठीक सकाळी आठ वाजता हिरोशिमात पोचणे अभिप्रेतही होते; पण विमानाच्या हल्ल्याची सूचना मिळाल्यामुळे गाडी थांबवावी लागली आणि २५ मिनिटे उशिराने ती पोचली. हिरोशिमा शहराच्या मध्यवस्तीपासून आठ किलोमीटर दूर असणार्‍या कैडायची या स्टेशनवर ८.१५ वाजता गाडी पोचली.

शहराच्या त्याच भागात, बंदराच्या जवळ यामागुची याने आपला चहा संपवला आणि आपला शिक्का ताब्यात घेतला. बूट घालून पुन्हा एकदा तो शिपयार्डकडे निघाला. या वेळेला त्याने ट्राम वापरली. बसपेक्षा ती थोडी लांबच्या रस्त्याने जाऊन आधी शहराच्या मध्यभागी गेली आणि मग परत वळली. यामागुचीला कसलीच घाई नव्हती. उरलेले अंतर त्याने चालत पार केले आणि तो मित्सुबिशी जहाजबांधणी कंपनीत पोचला. त्याच्या खोलीतील सहकारी अकिरा इवानागा आणि कुनियोशी सातो तेथे आधीच पोचले होते आणि तेथील कर्मचाऱ्यांशी मोठ्या ऑफिसच्या इमारतीत गप्पा मारत होते. यामागुचीने आपले जाकीट काढले आणि शर्टाच्या बाह्या वर दुमडल्या. छोट्या झर्‍यावरचा पूल त्यांनी ओलांडला. नुकतीच बटाट्याची लागवड केलेल्या एका शेताजवळून जाताना त्यांनी एका काळी पॅन्ट घातलेल्या स्त्रीला त्यांच्याकडे येताना बघितले. तिने जी पॅन्ट घातली होती ती गणवेश म्हणून अगदीच अघळपघळ होती. म्हणजे या सगळ्या सुरकुतलेल्या पॅन्टच बहुतांश जपानी बायका घालत असत. त्याच क्षणी त्यांना आकाशात उंचावर विमानाची घरघर ऐकू आली. दोघेही थबकले आणि विमान दिसतेय का हे बघण्याचा प्रयत्न करू लागले.

…..…..…..…..…..

सकाळी ८.०९ - ३० वर्षांचा कर्नल पॉल टिब्बेट्स हे अमेरिकन लष्कराचे वैमानिक आपले बी-२९ हे विमान जपानच्या होन्शू बेटावरील हिरोशिमा शहराच्या दिशेने उडवू लागले. आदल्या दुपारीच त्यांनी विमानाला आपल्या आईचे नाव दिले होते, ‘इनोला गे’. इंटरकॉमवर त्यांनी सांगितले, ‘आता आपण बॉम्बहल्ला सुरू करणार आहोत. आपले गॉगल्स काढा आणि ते कपाळावर ठेवा. जेव्हा मी उलटी गिनती सुरू करेन तेव्हा ते डोळ्यांवर लावा आणि बॉम्ब टाकल्यावर जो मोठा प्रकाशाचा लोळ येईल तो जाईपर्यंत ते काढू नका.’ - बॉम्ब टाकल्यावर निर्माण होणाऱ्या तीव्र प्रकाशापासून डोळ्यांचे रक्षण व्हावे यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना वेल्डर वापरतात तसे गॉगल्स दिले गेले होते.

कुठलाच आवाज येत नव्हता. कुठेही शत्रूच्या विमानांची चाहूल नव्हती. सहवैमानिक कॅप्टन रॉबर्ट लुइसने आपल्या फ्लाइट लॉग (डायरी)मध्ये लिहिले, ’आम्ही बॉम्ब आमच्या लक्ष्यावर टाकण्यादरम्यान थोडे मध्यांतर असेल.’

त्या विमानाच्या अवाढव्य पोटात अगदी सेंट बर्नार्डच्या कुटुंबासारखा चार टनी निळा-काळा ‘लिटल बॉय’ नावाचा बॉम्ब होता. हे नाव काही विसंगती म्हणून ठेवले नव्हते. तो इतर लांबलचक प्रोटोटाइप बॉम्बपेक्षा लांबीला थोडा कमी होता, म्हणून अमेरिकन लष्कराने त्याला हे नाव ठेवले होते. अर्थात, तरीही ही ३.५ मीटर एवढी लांबी म्हणजे काही कमी नव्हती!

न्यू मेक्सिकोमधील मॅनहॅटन मोहीम या अति गुप्त मोहिमेअंतर्गत हा अणुबॉम्ब लॉस अलमॉसच्या प्रयोगशाळेत तयार करण्यात आला होता. नॉर्थन मरियनास समूहाच्या बेटावर, टिनियनवर त्याची जोडणी करण्यात आली. ही बेटे पॅसिफिक महासागरातून हल्ला करून जपानकडून या शत्रुपक्षांनी जिंकली होती. मॅनहॅटन मोहीम ही इतकी गुप्त ठेवण्यात आली होती की, अमेरिकेचे उपाध्यक्ष असलेले फ्रँकलीन रुझवेल्ट यांच्या निधनानंतर अध्यक्ष झालेले हॅरी एस. ट्रुमन यांना त्यांची अध्यक्षपदासाठी निवड होईपर्यंत याच्या अस्तित्वाबद्दल कल्पना नव्हती. टिनियनहून तीन विमानांनी उड्डाण केले होते. यात एका विमानात हा युरेनिअम-कोअर असलेला बॉम्ब होत, ज्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात संहार करणे शक्य होणार होते. या प्रकारच्या बॉम्बची यापूर्वी कधीही चाचणी घेण्यात आली नव्हती.

‘इनोला गे’च्या मागे उजव्या बाजूच्या पंखाकडे दहा मीटर अंतर ठेवून ‘द ग्रेट आर्टिस्टे’ होते, ते नंतर एक किलोमीटर अंतर ठेवून उडत होते. तिसरे विमान ज्याला नाव नव्हते (नंबर ९१) - जॉर्ज मार्क्वार्डट हा वैमानिक ते चालवत होता आणि तो आता घडणार्‍या घटनेचे फोटो काढण्यासाठी आपल्या स्थितीत बदल करत होता. बॉम्ब टाकणाऱ्या ‘इनोला गे’वरील मेजर थॉमस फेरेबी याने डाव्या डोळ्याने नॉर्डन बॉम्बसाइटवर दाब टाकला. ८.१३ + ३० सेकंदांनी टिब्बेट्स त्याला म्हणाले, “चल, घे आता ताबा.’’ आणि इंटरकॉमवर त्यांनी सूचना दिली, ‘डोळ्यावर गॉगल्स चढवा.’ फेरेबीच्या बॉम्बलाइटमुळे ऑटोपायलटमध्ये थोडा बदल झाला. संपूर्ण हिरोशिमाभर पसरलेले ओटा नदीचे जे खोरे होते त्यातील एका भागात असलेला आयओई पूल हे त्याचे लक्ष्य होते.

“मला सापडले,’’ फेरेबी म्हणाला.

बॉम्ब ठेवला होता त्या भागाचे दरवाजे खालून उघडले गेले. त्याचा एक दबका आवाज सतत इंटरकॉममधून येत होता. त्याबरोबर पायलट आणि फेरेबी यांच्याशिवाय सगळ्यांनी आपले काळेकुट्ट वेल्डरचे गॉगल्स डोळ्यांवर लावले. हा आवाज इतर विमानांनाही पाठवण्यात आला. यात फक्त १५ सेकंदांची बॉम्ब खाली टाकण्याआधी सूचना दिली गेली.

८.१५ + १७ सेकंद हा रेडिओचा आवाज अचानक थांबला आणि उघडलेल्या झडपांमधून आत घुसणार्‍या हवेचा आवाज येऊ लागला. ‘लिटल बॉय’ पाठीमागच्या बाजूने आधी बाहेर आला. मग उलटा झाला आणि नाकाचा भाग खाली करून हिरोशिमाच्या दिशेने झेपावला.

.............................................................................................................................................

'नागासाकी' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................