‘आम्हाला तुम्ही काय समजता, आम्ही काय शेड्युल्ड कास्ट आहोत?’
ग्रंथनामा - झलक
प्रा. संजयकुमार कांबळे
  • ‘जातिअंताचे समाजशास्त्र’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 05 October 2018
  • ग्रंथनामा झलक जातिअंताचे समाजशास्त्र Jatiantache Samajshastra संजयकुमार कांबळे Sanjaykumar Kamble

‘जातिअंताचे समाजशास्त्र’ हे प्रा. संजयकुमार कांबळे यांचे आजच्या जातप्रश्नांचा वेचक आढावा घेणारे पुस्तक नुकतेच डायमंड पब्लिकेशन्सच्या वतीने प्रकाशित झाले आहे. त्यातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश.

.............................................................................................................................................

शहरी मध्यमवर्गीय संदर्भामध्ये ‘जात’ ही गोष्ट जवळ-जवळ अदृश्यच का असते? यामागील सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे, हे संदर्भ मोठ्या प्रमाणात उच्च जातीयांच्या वर्चस्वाखाली दडपले गेले होते. या तऱ्हेच्या एकसाचीकरणामुळे सामाजिक दृश्यतेच्या उंबरठ्याखाली ‘जात’ गळून पडलेली दिसते; कारण जर जवळजवळ प्रत्येक माणूस भोवती असणारा उच्च जातीतला असेल तर मग, जातीची अस्मिता ही गोष्ट प्रश्न म्हणून उभी ठाकणे शक्य नव्हते; म्हणजे आपण जेव्हा परदेशी जातो, तेव्हा आपली ‘भारतीय’ म्हणून असणारी अस्मिता महत्त्वाची ठरते. परंतु, जेव्हा आपण भारतातच वावरत असतो, तेव्हा तिची नोंदही घेण्याची आवश्यकता वाटत नाही; असे येथे झाले. आणखी असे, की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काही दशके ‘जात’ या प्रश्नाची सार्वजनिक चर्चा करण्यावर जी अधिकृत आणि सामाजिक भौतिक बंदी होती, तिला उच्च जातीय गटांशी पाठिंबा दिला असता तर आश्चर्य नाही. या विषयावर त्यांची व्यक्तिगत मते काहीही असोत, तरी आपण लक्षात घेतले पाहिजे, की एक सामाजिक गट म्हणून त्यांना या व्यवस्थेपासून होणारा फायदा पाहता, ‘वर’ या जातीतील मंडळींचा ‘जात’ या विषयावर सार्वजनिक विवाद होत नाही. या विरोधात भूमिका घ्यावी असे वाटणे साहजिकच होते.

प्रा. सतीश देशपांडे यांनी ‘आजच्या भारतामधील जातविषयक विषमता’ या लेखात त्यांनी पाहिलेला एक अनुभव सांगितला आहे. सिकंदराबाद येथे एका चिनी रेस्टॉरंटमध्ये जेथे उच्च मध्यमवर्गीय जातीची गर्दी असते, तेथे मला ही अस्वस्थता प्रथम ओळखता आली. हे रेस्टॉरंट वेस्ट इंडिज बेटावरील लोकप्रिय संगीत वाजविण्याइतपत ‘वरच्या’ स्तरावरचे होते आणि जेवायला येणाऱ्यांना त्यांचे टेबल दाखवण्यासाठी व्यवस्थापकीय सोयही होती. परंतु, त्या वेळी ते पुरेसे मध्यमस्तरीय होते; कारण बील देताना बिलाबरोबर बडीशेप आणि साखरही देत होते. एक स्थूल मध्यम वयाचा माणूस, सफारी सूट घालून रेस्टॉरंटमधील व्यवस्थापकाच्या अंगावर अधिकारवाणीने आपल्या भारतीय इंग्रजीमध्ये खेकसत होता. त्याला वाटत होते, की त्याला डावलून इतरांना पुढे जाऊ दिले जात आहे. आपल्या उत्तर भारतीय उच्चारपद्धतीमधून तो किंचाळत होता आणि विचारत होता, की ‘आम्हाला तुम्ही काय समजता, आम्ही काय शेड्युल्ड कास्ट आहोत?’

प्रा. सतीश देशपांडे म्हणतात, ‘या प्रसंगाचा अन्वयार्थ लावण्यास माझ्या समाजशास्त्रीय शाखेने मला एक पांगळेपणा दिला होता, अशी अस्वस्थ जाणीव मला झाली. माझ्या ज्ञानशाखेचे मला मोठ्या शहरातील चिनी रेस्टॉरंटसारख्या ठिकाणी ‘जात’ म्हणजे नेमके काय असते याविषयीचे आकलन दिले नव्हते किंवा जे लोक सफारी सुट घालतात, त्यांनाही जात कशी जाणवते हेसुद्धा माझ्या ज्ञानशाखेतून मला समजत नव्हते, त्याऐवजी ‘जात’ म्हणले, की माझ्या मनात खेडी, शुद्धता आणि स्पर्शातून येणारे प्रदूषण अन्न आणि विवाह याविषयी असणाऱ्या मार्मिक श्रद्धा, व्रतवैकल्यात्मक धार्मिक चालीरीती... मला असे म्हणायचे आहे, की या दिशा चुकीच्या आहेत. खरेतर मला यापेक्षा फारच वेगळे म्हणायचे आहे ते असे, की फक्त या गोष्टी आणखीन कदाचित कळीच्या असतात. स्वतंत्र भारतात जातीचे रुजणे या ठिकाणी होते, ती ठिकाणे पाहता ५० वर्षांपूर्वी जातींचा प्रश्न दूर सारून जातविषयक भावना फोफावत आहे.

भारतीय समाजशास्त्र आपल्याला खेडी व्रतवैकल्ये, विधी इत्यादींमध्ये ‘जात पाहा’ असे आमंत्रण देते. हे म्हणजे एखाद्या जाहिरातींमध्ये जेव्हा एखादा रंग पाहिल्यावर ती जाहिरात आपल्याला सांगते, की तुम्हाला विशिष्ट अशा रंगकंपाचीच आठवण झाली पाहिजे, तसे झाले. हा दृष्टिकोन खरा परंतु अर्धवट स्वरूपाचा आहे. म्हणूनच त्यात असा धोका आहे, की त्यामुळे हा दृष्टिकोन खोटा ठरू शकतो; कारण त्याला आपल्या अर्धवटपणाची जाणीव नाही (किंवा अपुरी जाणीव आहे) म्हणजे सफारी पोशाख केलेला सभ्य गृहस्थ आपल्याला आठवण करून देतो, की ‘जात’ अजूनही शहरी मध्यमवर्गीय पर्यावरणात जीवंत आणि तितक्या विषारी स्वरूपात अस्तित्वात आहे आणि संपूर्णत: आधुनिक पेहराव घालून ती वावरते आहे. या माणसाला कधीही जातीची नावे आठवणार नाहीत किंवा रेस्टॉरंटमध्ये अन्न शिजवणाऱ्या व्यक्तींची जात कोणती असा प्रश्न यात येणार नाही किंवा हा माणूस खेड्यामध्ये कधीही पाऊल टाकणार नाही. परंतु, या श्रीयुत सफारी सुटवाल्यांना माहीत आहे, की ‘शेड्युल्ड कास्ट’ कोण असते, त्यांना कसे वागविले जाते आणि त्याच्यासारखी माणसे नि:संशयपणे का श्रेष्ठ असतात. थोडक्यात सांगायचे तर, या माणसाला जातीबद्दल, ‘वापर करण्याच्या दृष्टीने’ जे माहिती करून हवे, ते सर्व माहिती होते.

तुझी जात कोणती आहे? तुझा धर्म कोणता आहे?    

पी.व्ही. सिंधुने ऑलिंपिक पदक मिळवल्यानंतर भारतात तिची जात शोधण्याची स्पर्धा सुरू झाली होती. इंटरनेटवर त्याची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली होती. ‘सैराट’ चित्रपट प्रसिद्ध झाल्यानंतर काही जातीय गटांत अस्वस्थता निर्माण झाली होती. त्यानंतर कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणानंतर मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन, त्यातील ‘एक मराठा-लाख मराठा’ घोषणा, प्रकरण बलात्काराचे आणि मागण्या अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा नष्ट करण्यासंदर्भातील स्वयंघोषित पुरोगामी महाराष्ट्रातील जातीयवादाचा प्रश्न गंभीर आहे असे असूनही नोकऱ्यांमधील बढतीत आरक्षणाला बंदी घालण्याचा न्यायालयाचा निर्णय यांसारख्या बाबी दलित-आदिवासींना मागे खेचणाऱ्या आहेत.

बसपा अध्यक्ष मायावतींबद्दल उत्तर प्रदेशातील भाजपा नेते दयाशंकर यांनी केलेली भयानक शेरेबाजी, बलात्काराची दिलेली धमकी, मायावतींचा राज्यसभेतील आवाज बंद करणे, रोहित वेमुलाचा शोकात्म अंत, हिंदू धर्माचे रक्षण करण्यासाठी चार-चार मुले जन्माला घालण्याचे खासदार साक्षीमहाराज यांचे आवाहन आणि गोहत्या करणाऱ्यांचे हात-पाय तोडू ही भाजपाचे उत्तर प्रदेशातील आमदार विक्रम सैनी यांची दमबाजी या सगळ्यावरून देश कोणत्या दिशेला जात आहे याचे संकेत मिळतात. उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनधिकृत कत्तलखान्यांवर घातलेल्या बंदीनंतर, गोरक्षणाच्या नावाखाली हैदोस घालणाऱ्या टोळ्यांना चेव चढला आहे. भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी शिवसेनेकडून सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव पुढे केले गेले होते. पुढारलेल्या जातींकडून आरक्षणासाठी येत असलेला संघटित दबाव, हिंदू धर्मवाद्यांचा धिंगाणा आणि धर्मरक्षकांची घटनात्मक पदावरच नेमणूक करण्यासाठी चाललेला आटापिटा हे वर्तमान विदारक चित्र आहे. भारताचा पाकिस्तान, अफगणिस्तान वा सौदी अरेबिया करण्याच्या ईर्ष्येतूनच हे घडत असावे. यामुळे स्वातंत्र्य, लोकशाही, समता, बंधुता या तत्त्वांवर विश्वास असणारे अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे.

समरसता मंचातील व्यक्ती जातिव्यवस्था ही निसर्गदत्त विषमतेवर आधारित असल्याचे सांगत आहेत. गटार तर गटार असते आणि समुद्र तर समुद्र असतो. समुद्रातील पाणी गटारात टाकल्याने गटार शुद्ध होत नसते. गटारातील पाणी नदीत मिसळून ते अंतिमतः ते समुद्रात मिसळले पाहिजे अशी मांडणी लक्ष्मीकांत तांबोळी यांनी ‘पुण्यनगरी’तील एका लेखात केली आहे. स्वतःला समुद्र समजून इतरांना नद्या आणि गटार संबोधणारी प्रवृत्ती ही नीच मानसिकतेची आहे.

दुसरे उदाहरण म्हणजे ब्राह्मण आणि सुवासिनी असल्याचे खोटे सांगून ब्राह्मण कुटुंबामध्ये सोवळ्याचा स्वयंपाक केल्याप्रकरणी पुण्यात एका स्त्रीवर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अशा विचित्र प्रकारात गुन्हा दाखल होऊ नये यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला; मात्र, फिर्यादी त्यांच्या मतावर ठाम राहिल्याने हा विरळात विरळ गुन्हा दाखल करण्यात आला. हवामान विभागाच्या माजी संचालिका डॉ. मेधा खोले यांनी याबाबत फिर्याद दिली होती. डॉ. खोले यांच्याघरी दरवर्षी गौरी-गणपती बसतात. त्याचप्रमाणे आई-वडिलांचे श्राद्धही असते. त्यासाठी त्यांना सोवळ्यामध्ये स्वयंपाक करणारी ब्राह्मण स्त्री हवी होती. २०१६ मधील मे महिन्यात त्यांच्याकडे एक स्त्री आली. तिने तिचे नाव निर्मला कुलकर्णी असे सांगितले. त्यानंतर संबंधित स्त्रीच्या घरीही खोले यांनी जाऊन चौकशी केली. तेथेही तिने आपण ब्राह्मण असल्याचे सांगितले. या स्त्रीने खोले यांच्या घरी २०१६ बरोबरच यंदाही गौरी-गणपती आणि आई-वडिलांच्या श्राद्धाच्या विधीचा सोवळ्यात स्वयंपाक केला. मागील दोन वर्षांमध्ये संबंधित स्त्रीने सहा वेळा अशा प्रकारे खोले यांच्याकडे स्वयंपाक केला. खोले यांच्याकडे पूजेसाठी येणाऱ्या गुरुजींनी संबंधित स्त्री ब्राह्मण नसल्याचे खोले यांना सांगितले. त्यामुळे पुन्हा खोले यांनी स्त्रीच्या घरी जाऊन चौकशी केली, त्या वेळी ती ब्राह्मण आणि सुवासिनी नसल्याचे समजले. आमच्या घरी सोवळ्यासाठी सुवासिनी ब्राह्मण स्त्रीच आवश्यक असते असे असताना तुम्ही खोटे का सांगितले अशी विचारणा खोले यांनी त्या महिलेकडे केली. त्यामुळे काय होते, असे प्रश्न संबधित स्त्रीने विचारले. खोले यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी संबंधित भारतीय दंडविधान संहिता कलम ४१९ (फसवणूक), कलम ३५२ (हल्ला करणे) आणि कलम ५०४ (धमकी) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (लोकसत्ता, पुणे), शुक्रवार, ८ सप्टेंबर २०१७.

जातीयवादाला प्रोत्साहन देणारे सोवळेओवळे पाळणे, यातून स्वतःच्या श्रेष्ठत्वाचा दावा केला जात असल्यामुळे याला प्रतिक्रियादेखील येत आहेत. या प्रकरणाच्या काहीच दिवस अगोदर निर्मला सीतारामन यांनी संरक्षणमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा त्यांनी हे सर्व ग्रहताऱ्यांचा योग जुळून असल्यामुळे घडले असे म्हटले होते.

मेधा खोले यांनी तक्रार मागे घेतली पण प्रश्न त्या तक्रारीपेक्षा जातीयता पाळण्याचा होता. इथून पुढे त्यांचा हा विकृत दृष्टिकोन बदलेल असे त्यांनी मान्य केले आहे का, हा आहे.

डॉ. खोले आणि यादव या दोन स्त्रियांमधील असले, तरी ते केवळ त्यांच्यापुरते मर्यादित नाही. धर्म, त्यातील प्रथा-परंपरा, जातिभेद, पितृसत्ताक समाज, विज्ञानाभिमुख दृष्टिकोन, शास्त्रज्ञांचे किंवा एकूणच उच्चशिक्षितांचे सार्वजनिक आचरण काहींशी संबंधित अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. मात्र, हे प्रश्न आजचे नाहीत. शेकडो वर्षांपासून संत आणि समाजसुधारक ते मांडत आले आहेत आणि जातीभेद करू नये, असे सांगत ते समतेचा संदेश देत आले आहेत. तरीही आज, ज्ञानयुग मानल्या जाणाऱ्या एकविसाव्या शतकात, जात आणि जातिभेद टिकून आहे. स्वातंत्र्याच्या पूर्वी जितक्या उघडपणे जातिभेद केला जायचा, उच्च-नीचता पाळली जायची तितके आता होत नसले, तरी जातवर्चस्वाच्या अहंगंडाने पछाडलेली मंडळी अधूनमधून त्याचे दर्शन घडवत असतात. विवाह जुळवताना अनेकांचा हा अहंगड उफाळून येत असतो. जातीच्या संदर्भात आमच्याकडील रीत आणि तुमच्याकडील रीत असे सांगून दोहोंची तुलना करण्याचा प्रकारही जातीभेदातच मोडणारा आहे.

अलीकडे जात सोडल्याचा दावा करणाऱ्यांची आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची संख्या अलीकडे वाढत आहे, हे खरे! मात्र जन्मापासून मरेपर्यंत आणि खाण्या-पिण्याच्या सवयीपासून वेशभूषेच्या पद्धतीपर्यंत जातीचे संस्कार घडत असल्याने त्याच्या खुणा कळत-नकळत मिरवल्या जातातच. त्या मिटवण्याचा प्रयत्न करण्याची, जातीचा अहंगड दूर करण्याची आणि स्वतःच्या धर्माकडे आणि जातीकडे तटस्थतेने पाहण्याची गरज आहे, तसे किती जण करतात, हा खरा प्रश्न आहे. डॉ. मेधा खोले यांची कृती निषेधार्ह असल्याने त्यांच्या कृतीवर टीका करण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र, त्यांना ‘प्रतिगामी’ म्हटल्याने कोणी आपोआप ‘पुरोगामी’ होत नाही. जातपात मानणारे, जात पाहून नोकरी देणारे, आपल्या जातीचे श्रेष्ठत्व मिरवणारे केवळ स्वजातीत महापुरुषांचाच अभिमान बाळगणारे, धर्माच्या नावाखाली लिंगभाव पाळणारे, मासिक पाळीत स्त्रियांना बाहेर बसवणारे, सोवळेओवळे पाळणारे, अन्य जातींच्या सहकार्यांच्या डब्यातील पदार्थ न खाणारे, शाकाहारी-मांसाहारी असा भेद करणारे, अंधश्रद्धा पाळणारे असे काही कमी नाहीत. या सर्व मंडळींचे प्रतिगामीत्व डॉ. खोले यांच्याप्रमाणे अजून उघडे पडलेले नाही इतकेच. जातिअंतासाठी जातिविहीन समाजरचनेसाठी काही कमी चळवळी झालेल्या नाहीत. मात्र, प्रतिगामी वृत्तीच्या जडत्वामुळे त्या पुढे जाऊ शकल्या नाहीत.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................