धर्म, राष्ट्रीयता व बांधिलकी यांच्या सीमारेषा कुठे सुरू होतात आणि संपतात?
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
रवींद्र कुलकर्णी
  • ‘Killing the Messenger’ या  Herbert N. Foerstel यांच्या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 21 September 2018
  • ग्रंथनामा दखलपात्र किलिंग द मॅसेजंर Killing the Messenger हर्बर्ट एन. फोरस्टेल Herbert N. Foerstel

भाऊसाहेबाच्या बखरीला मराठीतील आद्य युद्धवार्तांकन म्हणावे तर त्याचा कर्ता प्रत्यक्ष पानिपताच्या युद्वभूमीवर उपस्थित होता का नाही हे कळायला मार्ग नाही. राजवाड्यांच्या मते ती १७६३ च्या आसपास म्हणजे युद्धानंतर दोन वर्षांच्या आत लिहिली आहे. गोडसे भटजींच्या ‘माझा प्रवास’ या पुस्तकात मात्र १८५७च्या बंडाच्या प्रत्यक्ष धामधुमीत सापडल्यावर त्यांना जे अनुभव आले आणि ज्या घटना त्यांनी प्रत्यक्ष पाहिल्या, त्याचे जिवंत चित्रण सापडते. राजपुतांच्या इतिहास लेखनाचेही दोन भाग मानले जातात. पहिला ‘ख्यात’, ज्यात मुख्य पात्राच्या शैार्याचे वर्णन असते, तर दुसरा भाग हा ‘बात’ असतो, ज्यात प्रत्यक्षात काय घडले याचे वर्णन असते. 

१७व्या शतकाच्या सुरुवातीला वृत्तपत्रांची सुरुवात झाल्यानंतर कालांतराने ‘ताजी बातमी’ हे बातमी मिळवणाऱ्यांचे व वाचणाऱ्यांचे व्यसन झाले. कोणतेही युद्ध घटनाबहुल असते. त्याच्या बातमीत जिवंतपणाला व ताजेपणाला महत्त्व असते. त्यात इतिहास, राजकारण व अर्थकारण गुंतलेले असते.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात बातमीची गती इलेक्ट्रॉनिक माध्यमांमुळे आणखी वाढली व कोठेतरी दूरवर चाललेले युद्ध घरांत आले. जीव धोक्यात घालून प्रत्यक्ष युद्धभूमीवरल्या घटनांचे वर्णन लिहिणारे, सांगणारे वा त्याचे चित्रीकरण करणारे वार्ताहर हेही प्रसिद्धीला आले. युद्धाचे स्वरूप बदलत गेले, तशा या वार्ताहरांच्या अडचणी बदलत गेल्या. त्यांचे काम जास्त धोकादायक  झाले. नंतर त्यांच्या सीमा वाढल्या व त्या युद्धक्षेत्रापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत.

या साऱ्याचा मागोवा घेण्याचे काम, ‘Killing the Messenger: Journalists at Risk in Modern Warfare’ या  Herbert N. Foerstel यांच्या पुस्तकाने केले आहे.

कॉर्नलिस रायन, इर्ने पयल, एडवर्ड म्युरो व काही काळ हेमिंग्वेची बायको असलेली मार्था गेलहॉर्न हे दुसऱ्या महायुद्धासारख्या परंपरिक युद्धात कीर्तिमान झालेले वार्ताहर होते. त्यांच्या कर्तृत्वाच्या आलेखाने पुस्तकाची सुरुवात होते.

.............................................................................................................................................

रविशकुमार या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

दुसऱ्या महायुद्धाची ललकारी देणारे स्पॅनिश यादवी युद्ध  टिपण्यासाठी हेमिंग्वेच्या आधी गेलहॉर्न पोचली होती. तोफांतून बाहेर पडणाऱ्या गोळ्यांचे आवाज तिने ऐकले, गजबजलेल्या बाजारात तोफगोळा पडल्यावर कडेवर असलेल्या मुलाचा गळा उडालेल्या लोखंडाच्या तुकड्याने क्षणात कापला गेल्यावर निश्चल झालेली स्त्री तिने पाहिली. दुसऱ्या महायुद्वात जर्मनीवर बॉम्ब फेकणाऱ्या विमानातूनही ती गेली. त्या मोहिमेत सात जण मरण पावले, पण परत आलेले सारे सैनिक गात होते. तिला मिळालेल्या ८९ वर्षांच्या आयुष्यात तिने सात मोठी युद्धे प्रत्यक्ष अनुभवली. तिने लिहिले, “मला जे युद्धाबद्दल म्हणायचे आहे, त्यापेक्षा ते भयंकर आहे.” तरीही वयाच्या ८६ व्या वर्षी तिला इराकचे युद्ध कव्हर करायचे होते.

सीबीएस रेडिओ नेटवर्कची एडवर्ड म्युरो ही वार्तांकनातील विलक्षण व्यक्ती होती. दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला रोज रात्री जर्मन विमाने लंडनवर आग ओकत असत आणि ब्रिटिश विमाने त्यांच्याशी झुंज घेण्याचा प्रयत्न करत, तेव्हा तो तिथल्या इमारतीच्या गच्चीवर उभे राहून त्या घटनेचे धावते वर्णन रेडिओवर करे. हे अतिशय धोकादायक  होते.  त्याच्या ‘लंडन आफ्टर द डार्क’  या कार्यक्रमाची सुरुवातच मुळी, “धिस्... इज लंडन!” या वाक्याने होई व शेवट केवळ ‘गुड नाइट’ने न होता, तो त्याला ‘गुड लक’ जोडे. कारण एवढ्या विध्वंसानंतर कशाचीच शाश्वती नसे. तो म्हणे, “तुम्हाला धोक्याबद्दल जर काही सांगायचे असेल तर तुम्ही तो अनुभवला पाहिजे.”

व्हिएटनाम युद्ध जंगलातले व गनिमी काव्याचे होते. जास्त धोकादायक होते. त्याच बरोबर वार्ताहरांमधली व्यावसायिक स्पर्धाही वाढलेली होती. लढणाऱ्या व गस्त घालणाऱ्या अमेरिकन सैनिकांच्या तुकडयांबरोबर वार्ताहरही असत. अशाच एका तुकडीबरोबर असलेल्या वार्ड जस्ट याने लिहिलेय- ‘कोणालाही अचानक अंगावर आलेली चकमक  नको असे, पण चकमक  घडली नाही तर बातमीही नाही. हा पेच असे. याला कुठलेही उत्तर नसे.’ अशा चकमकीत जखमी झालेल्या वार्ताहराऐवजी जखमी सैनिकांना उपचार आधी देण्यात येत. २० वर्षे चाललेल्या या युद्धात ६० पेक्षा जास्त वार्ताहरांनी आपला जीव गमावला.

पिटर अर्नेट १९९०च्या आखाती युद्धाआधी व्हिएटनाम, रशियाचे अफगाणिस्तानवरचे आक्रमण वगैरे संपवून आला हेाता. आखातातल्या युद्धात स्मार्ट बॉम्बने गाजवलेल्या प्रतापांचे बगदादमधून रिपोर्ट करणारा तो एकमेव वार्ताहर होता. तो ज्या हॉटेलातून काम करत होता, त्याच्या तळघरात इराकी लष्करी केंद्र असल्याचा दावा अमेरिकेने केला आणि त्याला तेथून गाशा गुंडाळण्यास सांगितले. अर्नेटने ते अमान्य करत तेथून हलण्यास नकार दिला व आपले काम चालू ठेवले. देशद्रोही बातम्या दिल्याबद्दल त्याच्यावर भरपूर टीकाही झाली.

युद्ध वार्ताहरांच्या स्वत:च्या युद्धाच्या सीमा बदलत चालल्याचा हा पहिला संकेत होता. तरीही अजून वार्ताहरांवर हल्ले होत नव्हते. विविक्षित राज्याचे धोरण व तिथल्या एखाद्या वर्तमानपत्राचे धोरण यात फरक असतो, याचे भान ठेवले जात होते. पॅलेस्टाइनमधल्या हमास या दहशतवादी संघटनेचा संस्थापक अबू निडालला स्वत:ची बाजू मुलाखतीत सांगायची होती. त्यासाठी टेरी अ‍ॅन्डरसन या वार्ताहराला निडालच्या दहशतवाद्यांनी पकडले आणि मुलाखत घ्यायला लावून सोडून दिले. एखाद्या वार्ताहराचे नागरिकत्व वा त्याचा धर्म त्याच्या कामाच्या आड येत नसे. जी काही लढाई असे ती राजकीय असे.

११ सप्टेंबर २००१ च्या हल्ल्याने हे सारे बदलले आणि २००३च्या इराकवरच्या अमेरिकी आक्रमणाने तर वार्ताहरांचे काम जन्म व मृत्त्यूच्या सीमा रेषेवर येऊन ठेपले.

२००४ सालच्या सुरुवातीला बगदादमध्ये सहा हजार वार्ताहर होते. ते अमेरिकन सैन्याने संरक्षित केलेल्या सीमेच्या आत असत. बाहेर जाऊन सत्य परिस्थिती टिपण्याचे धाडस फार कुणी केले नाही. कारण वार्ताहरांवरचे हल्ले व त्यांच्या अपहरणाचा धोका हे होते.

इराक, अफगाणिस्तान वा पाकिस्तानच्या सीमावर्ती प्रदेशासारख्या अनियंत्रित व युद्धमान प्रदेशातल्या मोकाट सुटलेल्या गुंड टोळ्यांना पैसे मिळवण्यासाठी अपहरणाचे नवीन शस्त्र सापडले. या गुंडांच्या टोळ्या वार्ताहराचे अपहरण करून त्याला एखाद्या दहशतवादी संघटनेला विकतात. एबीसी न्यूजच्या पीटर जेनिंगच्या माहितीनुसार वार्ताहराची किंमत २००० डॉलर्स होती. अपहरण झालेच तर विकले जाण्याच्या साखळीच्या कुठल्या टप्प्यावर अपहृत व्यक्ती असेल, त्यावर तिच्या सुटकेची शक्यता असते. प्राथमिक टप्प्यांवर प्रश्न पैशाचा असतो, तेव्हा सुटकेची शक्यता जास्त असते. वरच्या टप्प्यावर तो धार्मिक वा तत्त्वाचा झाला की गुंतागुंत वाढते.

वर उल्लेखलेल्या टेरी अ‍ॅन्डरसनचे नंतर एकदा अपहरण करून २४२४ दिवस ओलिस ठेवले होते. सुटकेनंतर त्याला अपहरणाचे कारण विचारले, तेव्हा तो म्हणाला, “मी अपहरणासाठी उपलब्ध होतो!" अशा अपहृत वार्ताहरांच्या कथा या पुस्तकात दिलेल्या आहेत.

वार्ताहरांसाठी ही संकटे केवळ अतिरेक्यांनीच निर्माण केली असे नव्हे, तर तो प्रदेश व्यापणाऱ्या फौजांनाही आपली जबाबदारी टाळता येणार नाही. पहिल्या दोन वर्षातच इराक युद्धात ८५ वार्ताहर व मीडियाचे लोक  मरण पावले. त्यातल्या १४ जणांच्या मृत्त्यूला अमेरिकी फौजा जबाबदार असल्याचा आरोप पत्रकारांच्या संघटनेने केला आहे. अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांनी अजून याला समाधानकारक उत्तर दिलेले नाही.

अल् झजीरा ही आखातातली स्वायत्त वृत्तसंस्था आहे. इराकमधल्या तिच्या केंद्रावरही अमेरिकी विमानांनी बॉम्बफेक केली. रॉयटर ही १८५१ साली स्थापन झालेली अंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था! त्यात काम करणारे तीन इराकी वार्ताहर अमेरिकी फौजांनी मारले. संस्थेच्या प्रमुखांनी याबद्दल  बोलताना विचारले, “आमच्याकडे १०० देशांच्या नागरिकत्वाचे २३०० वार्ताहर काम करतात. केवळ इराकी असणे हे संशयास्पद कसे असू शकते?”

अशांत प्रदेशात काम करणारे वार्ताहर बहुदा स्वयंप्रेरणेने तेथे आलेले असतात. वार्ताहरांनी शक्यतो सैन्याबरोबर असावे असाही सल्ला दिला गेला. पण मग प्रश्नाची एकच बाजू उजेडात येते. घटनेच्या सर्व बाजू उजेडात आणणे हा पत्रकारांचा प्रेरणास्त्रोत असतो. त्यासाठी त्यांना मदत करणाऱ्या स्थानिक लोकांची विश्वासार्हता तपासण्याचा मार्ग वार्ताहराकडे नसतो.

यात दिलेल्या व आपल्याला परिचित डॅनिअल पर्लच्या उदाहरणात हे ठळकपणे दिसते. २००२ साली त्याचे कराची जवळून अपहरण करून त्याला मारण्यात आले. खरे तर पर्ल हा खूप काळजी घेऊन काम करणारा पत्रकार होता. शेख अली गिलानी या इस्लामी नेत्याची मुलाखत त्याला हवी होती. त्यासाठी त्याने कोणा अरिफशी संपर्क साधला. याचे खरे नाव हशीम कादीर असे होते. तो हरकत उल मुजाहिदिन या अतिरेकी संघटनेचा सक्रीय सभासद होता. पण हे सारे समजण्याचा कुठलाही मार्ग डॅनिअल पर्लकडे नव्हता.

अशांत प्रदेशात काम करणाऱ्या वार्ताहर व पत्रकारांचे प्रशिक्षण होते. त्यांच्या संघटना आहेत. त्या संबंधीची माहितीही या पुस्तकात आली आहे. पण एकंदरच ज्याला संधी तो शेर अशी परिस्थिती आहे. पुस्तक वाचून संपवताना धर्म, राष्ट्रीयता व आपल्या कामाशी असलेली बांधिलकी यांच्या सीमारेषा कुठे सुरू होतात आणि संपतात हा प्रश्न मनात येतो.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

लेखक रवींद्र कुलकर्णी युद्धविषयक पुस्तकांचे संग्राहक आणि अभ्यासक आहेत.

kravindrar@gmail.com

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -

 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......