भाषा सर्वांचा सारखा हक्क मानणारी सामाजिक संस्था असते. भाषेइतकी लोकतांत्रिक संस्था दुसरी नाही. ह्यामुळेच राजकारणात तिचा सर्वाधिक वापर होतो!
ग्रंथनामा - झलक
भालचंद्र नेमाडे
  • ‘भाषेतून भाषेकडे आणि भाषांतराकडे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 21 September 2018
  • ग्रंथनामा झलक भालचंद्र नेमाडे Bhalchandra Nemdae भाषेतून भाषेकडे आणि भाषांतराकडे Bhashetun Bhashekede aani bhashantarakade प्र. ना. परांजपे P. N. Paranjapae

‘भाषा आणि जीवन’ या त्रैमासिकाचे माजी संपादक प्रा. प्र. ना. परांजपे यांचे ‘भाषेतून भाषेकडे आणि भाषांतराकडे’ हे पुस्तक प्रफुलता प्रकाशनाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाला प्रसिद्ध कादंबरीकार-समीक्षक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी सविस्तर प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

प्रस्तुत ग्रंथात आमचे मित्र राo प्रभाकर परांजपे यांनी वेळोवेळी लिहिलेले भाषा आणि भाषेच्या अनेक सांस्कृतिक अंगांविषयीचे लेख एकत्र येत आहेत, ही मराठीच्या भाषिक संस्कृतीचा विचार करणाऱ्या सर्वांसाठी उत्साहवर्धक घटना आहे. ह्या निमित्ताने मलाही येथे चार शब्द भाषाविषयक प्रश्नांवर मांडता येतील. राo परांजपे यांनी ‘भाषा आणि जीवन’ ह्या प्रतिष्ठित त्रैासिकाचे संपादक म्हणून वेळोवेळी लिहिलेली संपादकीये, नैमित्तिक वादविवाद, काही ग्रंथांची परीक्षणे आणि स्वतंत्र चिंतनपर लेख, तसेच प्रोo एस्o नागराजन् आणि प्रोo मo विo नाडकर्णी ह्या इंग्रजी भाषाशिक्षणातल्या मातब्बर विद्वानांनी लिहिलेल्या अत्यंत महत्त्वाच्या दीर्घलेखांची भाषांतरे ही राo परांजपे यांनी उत्तम केलेली प्रस्तुत लेखसंग्रहात समाविष्ट केल्याने प्रस्तुत ग्रंथाचे संदर्भमूल्य वाढले आहे. राo परांजपे यांनी अशोक केळकरांची उदारमतवादी व व्यासंगपूर्ण परंपरा उत्तमपणे चालवली आहे, याचा आनंद होतो.

त्याचप्रमाणे इंग्रजी भाषेसंबंधी अध्ययन, अध्यापन आणि नियोजन करू पाहणाऱ्या सर्वांना हा ग्रंथ मोलाचा वाटेल, यात शंका नाही. मराठी भाषकांचा इंग्रजी भाषेबद्दल सिद्ध झालेला विरोधाभास आपली भाषेसंबंधीची एकूण सांस्कृतिक जाण कमी पडत असल्याचे दर्शवतो. एकोणिसाव्या शतकातल्या मराठी लोकांनी ज्या आत्मविश्वासाने आणि धडाडीने परतंत्र वासाहतिक वातावरणातसुद्धा मराठीचा विकास घडवत आणला तो स्वातंत्र्योत्तर मराठी पिढ्यांना आपण कुठे कमी पडतो आहोत, हे पटवून देण्यास पुरेसा आहे. इंग्रजीला विरोध करून मराठीची उपेक्षा संपते काय? दुरभिमान, चुकीचे आकलन, भावनिकीकरण, चुकीची धोरणे, चुकीचे नियोजन इत्यादी अनेक मुद्यांना राo परांजपे यांनी स्पर्श करत मराठी भाषेच्या विकासात मातृभाषा आणि परभाषा यांच्या सहअस्तित्वासंबंधी मोलाचे विचार विखुरलेल्या स्वरूपात मांडले आहेत. अनेक मुद्यांचा परामर्श त्यांनी ठिकठिकाणी घेतलेला आहे. राo परांजपे यांची भाषेच्या सांस्कृतिक संदर्भांची जाण उत्तम असल्याने हे लेख अभ्यसनीय झाले आहेत. ह्या लेखांधील बराच भाग उपयोजित भाषाशास्त्रात मोडतो. अनेक अहवाल, शिफारशी, धोरणे, त्यांचे अनुशासन, भाषाशिक्षणाचे नियोजन यांचा वस्तुनिष्ठ परामर्श मराठी जीवनशैलीच्या पार्श्वभूमीवर राo परांजपे यांनी घेतलेला आहे. त्यांच्या ह्या सर्व आस्था आणि अपेक्षा एकत्रित करून भाषेच्या सांस्कृतिक संरचनेबद्दल काही विचार मी येथे ह्या प्रस्तावनेच्या निमित्ताने मांडू इच्छितो.

केवळ आधुनिकतेच्या अंगाने झालेली प्रगतीची संकल्पना नेहमीच संस्कृतीला पोषक नसते, हे आता लुडविग विटगेनस्टाइनपासून मिशेल फूकॉ- पर्यंतच्या जगातल्या सर्व जबाबदार विचारवंतांनी सिद्ध केले आहे. बेंजामिन ली व्हॉर्फपासून आपल्या नाo गोo कालेलकर, अशोक केळकर अशा सर्व भाषाशास्त्रज्ञांनी भाषेचे सांस्कृतिक, जैविक आकलनक्रियेशी सेंद्रियपणे जुडलेले स्वरूप स्पष्टपणे मान्य केले आहे. भाषेचा आणि संस्कृतीचा किती अतूट संबंध असतो, हेही अनेक विद्याशाखांमधल्या शास्त्रीय संशोधनाधारे स्पष्ट झाले आहे. त्यातील काही प्रमुख सिद्धांतांचा आपण क्रमाने विचार करू.

भाषा हे केवळ वापरून वेगळे करता येण्यासारखे साधन नसते, हे भाषेबद्दल विचार करताना सर्वप्रथम लक्षात घ्यावे लागते. आपण वापरत नसतानाही भाषा आपल्याला सोडून जात नाही, इतकी ती आपल्या अस्तित्वाचा भाग झालेली असते. फार काय भाषेशिवाय आपल्याला विचारसुद्धा करता येत नाही आणि संकल्पनांचा बोधही होत नाही, असे मानसशास्त्रज्ञ मानतात. निदान जागृतावस्थेत तरी ती आपल्या सर्व विचारशक्तीवर हुकमत गाजवताना उघड दिसते. पूर्व आफ्रिकेतील उत्खननांनुसार सुमारे साठ लक्ष वर्षांपूर्वी मानवाचा पूर्वज अस्तित्वात आल्यापासून मानवी उत्क्रांतीबरोबर भाषा ही एक जैविक गरज आणि पुढे उत्तर अश्मयुगात सामाजिक गरज म्हणून मानवाच्या मेंदूबरोबर वाढत आली आहे. आपल्या परमजातबंधु वानरांसकट इतर सर्व प्राण्यांच्या मेंदूच्या कवट्या लाखो वर्षे लहानच राहिल्या, परंतु मानवी मेंदू भाषेुळे ह्या साठ लाख वर्षांत जवळजवळ तिप्पट मोठा झाल्याचे उत्खननांमध्ये सर्वत्र सापडलेल्या अवशेषांनी सिद्ध होते. आपल्या मेंदूचा संपूर्ण डावा अर्ध हा भाषेच्या दृश्य आणि श्राव्य प्रतीकांसंबंधी परस्परसंयोगी आणि अत्यंत व्यामिश्र अशा बहुकार्यप्रवण केंद्रांनी व्यापलेला आहे. याचा संबंध आपला उजवा हात अधिक सक्षम होण्याशी दिसतो. ह्या मेंदूतील भाषिक विकासक्रमाशी संपूर्ण मानवी अस्तित्व निगडित झाल्याने भाषेचा आणि जगण्याचा अतूट असा परस्परसंबंध आहे.

.............................................................................................................................................

‘ब्रह्मेघोटाळा’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा - 

.............................................................................................................................................

ह्यामुळेच पृथ्वीवरील इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा मानवप्राण्याला वेगवेगळे ध्वनी उच्चारता येतात आणि त्यांना पदिमांच्या व शब्दांच्या अगणित रूपांनी जोडून प्रत्येकाचा स्वतंत्र अर्थघटकासारखा उपयोग करता येतो. विश्वातील आकलन झालेल्या प्रत्येक मूर्त वा अमूर्त वस्तूला व घटनेला, तसेच केवळ कल्पनेतल्या वस्तूंना व घटनांना शब्दांच्या, वाक्यांच्या आणि कथनप्रकारांच्या नानाविध रचनांनी बांधून स्मरणात दृढ ठेवण्याची अद्भुत प्रक्रिया भाषेमुळे शक्य झाली आहे. मानवाचा आपल्या जन्मत:च बरोबर आलेल्या भाषेशी असलेला हा जैविक संबंध आजच्या परभाषांशी येणाऱ्या उपऱ्या वाढत्या संपर्काच्या संदर्भात प्राथमिक व पायाभूत ठरतो.

भाषा ही विश्वाच्या आणि आपल्या मधली सरळ मध्यस्थ म्हणून अखंडपणे कार्य करत असते. ह्यायोगे आपण जे अनुभवले, पाहिले, ऐकले, स्पर्शले, सुंगले किंवा चाखले त्या सर्व ज्ञानेंद्रियांद्वारे जाणवलेल्या प्रत्येक गोष्टीला शब्दांच्या रूपाने ‘काहीतरी’ एक नाव कायमचे देऊन आपण निर्धास्त होतो. ज्या वस्तूचे अथवा घटनेचे नाव आपल्याला माहीत नसते किंवा जी वस्तू पूर्णत: नवी असते, ती पाहिल्याबरोबर आपण गोंधळून जातो. याचे कारण आपल्या जवळील भाषिक भांडारात तिचे शब्दरूप लेबल नसते. शब्दांच्या म्हणजे ध्वनिसमुच्चयाच्या विशिष्ट प्रतिकाशिवाय कोणतीच वस्तू किंवा घटना आपल्या मेंदूच्या विश्वासार्ह आकलनात बसत नाही. त्यामुळे अगदी अमूर्त वस्तूलासुद्धा नाव दिल्याने माणूस अर्थाच्या स्तरावर आपली निर्मितिशीलता कायम राखतो. प्रत्येक शब्द असा विश्वातील घटनांशी आपले आकलन चिरंतन करत जातो. किंबहुना कोणत्याही विषयाचे ज्ञान म्हणजे त्या त्या विषयातील संकल्पना दर्शवणारे शब्द अचूक स्मरणात ठेवणे, असाही ज्ञानाचा अर्थ आहे. ह्यामुळे मातृभाषा हीच खरी ज्ञानभाषा असते. अमुक परकी भाषा ‘ज्ञानभाषा’ आहे, हे विधान अशास्त्रीय आहे. विश्वाच्या आकलनाची एक अमोघ व्यवस्थाच आपली भाषा आपल्याला प्राप्त करून देते. म्हणून मानवी संस्कृतीच्या इतिहासात भाषा हा सर्वांत आश्चर्यकारक शोध मानला जातो. भाषेशिवाय माणूस अस्तित्वात नसतो, इतकी जैविक गरज ठरावी इतक्या घनिष्टपणे मानवी मेंदू भाषा अवगत करण्याची करामत घेऊन जन्मतो. भाषेविना माणसाच्या पिल्लांची मानसिक वाढ खुंटते, हे मूकबधिर किंवा मतिमंद मुलांच्या तोकड्या भाषिक व्यक्तिमत्त्वावरून सिद्ध होते.

ज्याप्रमाणे विश्वाच्या आकलनाची मदार केवळ अनुभूतीवर अवलंबून असते, त्याचप्रमाणे आपली संपूर्ण अनुभूतीसुद्धा जन्मल्यापासून आपापल्या भाषिक संस्कृतीच्या प्रभावाखाली विकसित होत जाते. अशा रीतीने विश्वाकडे पाहण्याची विशिष्ट दृष्टी भाषाच आपल्याला प्राप्त करून देते. खरे तर प्रत्येकाची भाषाच तिच्या भाषिकाला विचार करण्याचा घाट आखून देते आणि शास्त्रीय सत्यसुद्धा इथे दुय्यम ठरते. उदाहरणार्थ, आर्यभट्ट आणि गॅलिलिओ यांच्यानंतरही आपण सर्वत्र ‘सूर्य मावळतो’ आणि ‘चंद्र उगवतो’ असेच ठासून म्हणत असतो आणि तेच सर्वांना कळतेही. आपापल्यापुरता प्रत्येक जण ह्या कित्त्यानुसार थोडाफार फरक करून आपले विचार त्यात गिरवून भाषेचा वापर करत राहतो. भाषेने आखून, ठरवून दिलेल्या ह्या घाटात व्यक्तीलाच काय, परंतु समाजालासुद्धा ठरावीक मर्यादेपलीकडे जाणे शक्य नसते. अमेरिकेच्या इंग्रजी राज्यघटनेतसुद्धा ‘ऑल मेन आर ईक्वल’ असेच लिखित आहे, तिथे ‘विमेन’ किंवा ‘तृतीयपंथी’ वगैरे आजही शक्य नाही. मराठी भाषा भविष्यकाळाबद्दल बोलताना क्रियापदांचे दोन ठरावीक साचे पुरवते, तर इंग्रजीत भविष्यकाळाचे वेगळेच चार साचे असतात. हिंदीत दोन लिंगे असतात - पुल्लिंग आणि स्त्रीलिंग, तर मराठीत तीन लिंगे - नपुंसकलिंग धरून - आहेत. किंवा रंगांचे उदाहरण घ्या : प्रत्यक्षात अगणित रंग असतात, परंतु मराठी माणसांना सातेक रंग, ‘अनुभवता’ येतात, म्हणजे मराठी माणूस सात रंगांतच सृष्टी ‘अनुभवतो’. ह्याउलट काही भाषांमध्ये तीनच रंग अनुभवता येतात. याचा अर्थ भाषिकांचे वास्तवाचे आकलन ती ती भाषा आपापल्या पद्धतीने करून देत असते. काही भाषांमध्ये ह्यात साम्य आढळेल, तर काहींमध्ये वेगळेपणा. ह्या विविध प्रकारांचा किंवा कमी-अधिकतेचा भाषेच्या समृद्धीशी किंवा लहान-मोठेपणाशी संबंध नसतो. सगळ्याच भाषा सारख्याच सामर्थ्यशील असतात, आपापल्या परिस्थितीनुसार विकसित झालेल्या असतात. उदाहरणार्थ, मराठीत “तो येऊन बसता बसता हसत म्हणाला”, अशी चार-पाच क्रिया एकत्र व्यक्त करणारी वाक्यरचना इंग्रजीत दाखवता येत नाही. एकूण भाषेची ही अदृश्य हुकूमशाही प्रत्येक भाषकाला मान्य करूनच विश्वाशी संवाद साधणे शक्य असते.

हे जितके खरे आहे, तितकेच हेही खरे आहे की, प्रत्येक व्यक्तीची- सुद्धा स्वत:ची विशिष्ट अशी धाटणीची व्यक्तिभाषा असते. प्रत्येक भाषकाला आपल्या विशाल सामूहिक भाषेमध्येच भरपूर भाषावापराचे स्वातंत्र्यही असते. त्या त्या भाषिक समूहामध्ये जन्मलेल्या मुलाचे सामाजीकरण होत असतानाच आपले स्वत:चे व्यक्तित्व जपण्याची सोय त्याच्या भाषाव्यवहारात असते. याचेच विशिष्टीकरण होत जाऊन वक्ते, पुढारी, लेखक, रंगमंचकलाकार आपापल्या भाषिक लकबा जोपासतात. याला त्या त्या भाषिक समूहात केवळ ह्यासाठी दादही दिली जाते. सामाजिक जडणघडण, वागणूक, नेतृत्व, प्रसंगानुरूप बोलणे-चालणे, रीतिरिवाज, चांगले-वाईट - ह्या सर्व प्रकारच्या सामाजीकरणाचे धडे मुलांना स्वभाषेतूनच मिळतात. शिक्षणव्यवस्थेत व्यक्तिमत्त्वाची प्राथमिक पायाभरणी स्वभाषेतच व्हावी, अशीच सुसंस्कृत समाजाकडून अपेक्षा असते. चिनी, जपानी, रशियन, फ्रेंच, जर्मन इत्यादी सर्व प्रगत सुसंस्कृत समाज भाषेच्या ह्या कार्यप्रवणतेला सांभाळत आहेत, असे दिसेल. अशा देशांमध्ये आपल्यासारख्या ‘भाषिक समस्या’ही फार नाहीत, हेही आपण डोळ्यासमोर ठेवले पाहिजे.

ज्या सामाजिक सामान्य भाषेचा व्यक्तीच्या भाषेवर आणि अंतत: तिच्या मानसावर प्राथमिक अवस्थेत मोठा परिणाम घडत असतो, ती सर्वांसाठी समान दात्री व्यवस्था असावी, ह्यासाठी अनेक बोलीभाषा, पोटभाषा, प्रादेशिक भाषा या सर्वांमधून सोयीसाठी स्थलकालनिरपेक्ष अशी प्रमाणभाषा विकसित व्हावी लागते. आपली तेराव्या शतकातली वाङमयीन भाषा ही अशी विविध प्रांतांमधली ज्ञानदेवापासून चोखामेळा, जनाबाई, सेना, गोरा, नामदेव, मुक्ताबाई - सर्वांची आपोआप उत्क्रान्त होत आलेली मराठी होती. दुर्दैवाने एकोणिसाव्या शतकातील प्रमाण मराठी भाषा अशी उत्क्रान्त झालेली नव्हती, ती वासाहतिक अंमलासाठी सर्वांवर लादलेली एका मराठी समूहाची भाषा होती; त्यामुळे गेली दोनशे वर्षे आपल्याकडे भाषेच्या प्रमाण स्वरूपाबद्दल, तिच्या योग्य लेखनाबद्दल सर्व मराठी भाषकांत आजही मतैक्य नाही. सारांश, सामाजीकरणाचे सर्वांत प्रबळ माध्यम भाषा हीच असते आणि ते भाषेमुळेच विनासायास, झपाट्याने होत राहते.

आपण आजच्या परिस्थितीत हेही लक्ष्रात घेतले पाहिजे की, माणूस केवळ वस्तुनिष्ठ वास्तवात किंवा सामाजिक वास्तवातच पूर्ण वेळ जगतो, असे नाही. आपल्या जगण्याला आणखी काही खास आंतरिक अशा स्थलकालास भेदून जाणाऱ्या दिशा असतात. कधी भविष्यातल्या घडामोडींचे वैचारिक संशोधन, कधी ऐतिहासिक भूतकालीन अवलोकन किंवा सौंदर्यशील घटकांचे प्रकटीकरण अशा आंतरिक दृष्टिक्षेपांना मुक्त वाव देणाऱ्या, खास भाषिक आधारावर विकसित होणाऱ्या कितीतरी गोष्टी सांस्कृतिक व्यवहारात अनिवार्य असतात. यातील एक महत्त्वाची बाब म्हणजे माणसाला आविष्कार करण्याची मूलभूत हौस, गरज असते, आणि ही गरजसुद्धा केवळ साधन म्हणून नव्हे तर एक माध्यम म्हणून भाषा सर्व मानवी समूहांमध्ये अत्यंत समृद्धीने इतर कलाविष्कारांबरोबर पार पाडत आली आहे. पाषाण, रंग, सूर आदि अनेक माध्यमांमधून मानवजात आपला आविष्कार करत आली आहेच; परंतु मानवी संस्कृतीत सर्वांत जास्त महत्त्व भाषेच्या माध्यमातून सौंदर्य- निर्मितीसाठी होत आलेल्या आविष्काराला, म्हणजे साहित्यकलेला प्राप्त झालेले दिसते. याचे कारण असे की पाषाण किंवा रंग वगैरे माध्यमांची व्याप्ती त्या त्या कलेच्या क्षेत्राबाहेरच्या मानवी अस्तित्वाशी भाषेइतकी सार्वत्रिक, स्थल आणि काल यांना छेदून संपूर्ण संस्कृती व्यापून टाकणारी नसते. भाषेला मात्र केंद्रीय प्रभुत्वाची भूमिका साहित्यामुळे प्राप्त झालेली दिसते, हे व्यास, वाल्मिकी, होमर, शेक्स्पीअर, म्हाइंभट, ज्ञानदेव, तुकाराम इत्यादीकांच्या उदाहरणांवरून स्पष्ट होते. भाषेवर दर युगात अनेक प्रतिभावंतांचे नानाविध प्रयोग होत असतात व ती अधिकाधिक अर्थवाही, सार्वत्रिक मान्यताप्राप्त आणि सत्ताधारी संस्था म्हणून कार्य करू लागते. ह्या उत्क्रांती प्रक्रियेतून कोणताही मानवी समाज सुटलेला नाही.

भाषेच्या प्रत्येक व्यवहारावर दुसऱ्या सर्वस्वी भिन्न अशा संदर्भांमध्ये वापरता येतील, असे रूपकीय किंवा लाक्षणिक प्रयोग सतत होत राहिल्याने, तिच्या कोणत्याही घटकाला व्यंजनेने साहित्यिक शैलीचे गुण प्राप्त होऊ शकतात. तिचे असंख्य क्षेत्रांमधील, अगणित वापर अनेकविध अर्थछटा, उपमा उत्प्रेक्षादि अलंकार, प्रतिमाप्रतीकादि आकृतिबंध, तर्कबद्ध सूत्ररचना, सारांश-विस्तार, इतर भाषांमधून भाषांतर करण्याची समनिर्देशक इत्यादी विविध आविष्कारपद्धतींमुळे आशयलक्ष्यी बदल घडवून आणतात. जितका भाषेचा अधिक क्षेत्रांमध्ये वापर होईल, तितकी तिची अर्थवाहकता विस्तारते. ह्यामुळेच इंग्रजीसारख्या भाषा अधिक समृद्ध झालेल्या आहेत, आणि मराठीसारख्या भाषा खंगत गेल्या आणि परावलंबी झाल्या, असे म्हणता येते. भाजीबाजारातल्या सर्वसामान्यांच्या साध्या संदेशवहनासारख्या अत्यंत प्राथमिक वापरापासून तर सहस्त्रावधी वर्षांपासून बोलल्या, ऐकल्या, वाचल्या जाणाऱ्या साहित्यकृतींपर्यंतच्या अनेक सांस्कृतिक प्रक्रियांना भाषेचे अनुशासन सुप्तपणे ऊर्जा पुरवीत असते. अशा ऊर्जेच्या अभावी भाषा मरू लागतात.

ह्यामुळेच भाषेचे ऐतिहासिक असे मूल्यसंवर्धनाचे बहुमोल कार्य सहज पार पडत असते. एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला, आईकडून मुलाला, गुरुजनांकडून शिष्यगणांना, नेत्यांकडून अनुयायांना त्या त्या काळाच्या गरजेनुसार अर्थाचे संक्रमण भाषेद्वारे आपोआप होत राहाते. त्यामुळे अनेक अनामिक प्रज्ञावंत व्यक्तींच्या ज्ञानाचा, शहाणपणाचा, विवेकाचा आणि सौंदर्याभिवृद्धीचा संचय पिढ्यानपिढ्या भाषेच्या अदृश्य भांडारात सुरक्षितपणे जपलेला असतो. ह्यात अनेक लहानमोठ्या समूहांचा कलाशाखादि वारसा प्राय: मौखिकतेतून साचत राहतो. ही ऐतिहासिक ज्ञानसंवर्धनाची जबाबदारी प्रत्येक भाषिक परंपरा कळत-नकळत पार पाडत राहाते. प्रागैतिहासिक काळापासून आदिमानवाने शोधलेले पशुपालन, शेती, धातुविद्या इत्यादी हजारो मूर्त-अमूर्त सांस्कृतिक संचित केवळ मौखिक भाषेद्वारे, नंतर लिखित आणि मुद्रित स्वरूपात पृथ्वीवर टिकून राहिले आहे, म्हणून भाषेला संस्कृतीची रक्षणकर्ती मानले जाते.

विशेषत: गेल्या दहा हजार वर्षांपासून भाषेची संस्कृतिधारणेची क्षमता अत्यंत विराट झाल्याचे दिसते. गेल्या चार हजार वर्षांपासून लिपीचाही ठिकठिकाणी वापर होत आल्याने समाजाचे सामूहिक ज्ञान लिखित स्वरूपात टिकवून ठेवण्याचे एक तंत्र भाषेच्या ह्या कार्याला उपयुक्त ठरले. त्यामुळे मानवी मेंदूवरचे स्मरणाचे ओझे कमी होत गेले. नंतर गेल्या चारशे वर्षांपासून मुद्रणाच्या तंत्रज्ञानामुळे मानवी संस्कृतीमध्ये अनपेक्षित बदल होत गेले आणि आता आपल्या पिढीत तर इलेक्ट्रॉनिक माध्यमे भाषेच्या कार्यक्षमतेचा आश्चर्यकारक विस्तार घडवत आहेत. तरीही ह्या सर्व विकासक्रमात भाषेचे मूलतत्त्व म्हणून मौखिकतेला असाधारण महत्त्व आहेच. नवीन नवीन तंत्रज्ञाने कितीही प्रभावी ठरली तरी भाषेचे पायाभूत मौखिकत्व अबाधित आहे. मानवाची भाषिक क्षमता मौखिक स्वरूपातच जैविक प्रजातिविशिष्ट लक्षण मूळ म्हणून मानली जाते.

ह्याच तर्काने कोणतीही भाषा ही तिच्या अनेक बोलींमध्येच अस्तित्वात असते, असे समाजशास्त्रीय अभ्यासक मानतात. महाराष्ट्रातच मराठीच्या पस्तीस वेगवेगळ्या बोली आज जिवंत आहेत, ह्या बोलींना दुय्यम किंवा अशुद्ध समजणे, अज्ञानाचे द्योतक आहे. ह्याच तत्त्वाने समाजातल्या नाना स्तरांवरच्या लोकांच्या आपसातल्या बोली - जातिविशिष्ट-लिंगविशिष्ट-वयविशिष्ट-व्यवसाय- विशिष्ट - अशा अनेक भेदांना नैसर्गिक स्थान, प्रतिष्ठा मिळाली पाहिजे. सहजीवनाचे हे समाजशास्त्रीय अंग ठरते. ह्या सर्व वर्गभेदांची मिळून झालेली भाषा ही प्रत्येक व्यक्तीची राष्ट्रीय ओळख ठरते.

वर्तमानकालीन तसेच भूतकालीन अशा दोन्ही दिशांनी भाषा ही समाज मानसावर अधिकार गाजवून विविध सामाजिक समूहांना-जातिजमातींना सुसंघटित ठेवण्याचे राष्ट्रीय कार्य करत असते. ह्यामुळे भाषेचा राष्ट्रीयतेशी घनिष्ठ संबंध आहे. हिंदुस्थानासारख्या बहुभाषिक देशात एकूण १६५२ स्वतंत्र भाषा अजून टिकून आहेत. हा उपखंड ह्यामुळेच भाषाशास्त्रीय संशोधनाला सतत आव्हान देत आला आहे.

बहुभाषिक समाजाचा एकजिनसीपणा कायम ठेवणारे हे राष्ट्रसंघीय तत्त्व हिंदुस्थानासारख्या प्राचीन महाव्यवस्थेत विकसित होत आलेल्या भाषिक समूहांना आपल्या विशाल अस्मितेचे प्रतीक वाटणे स्वाभाविक आहे. भाषिक बंधुभाव हा सर्वात आवश्यक असा सांस्कृतिक दुवा समजला जातो. भाषेद्वारे तिच्या भाषकांना जे स्वाभाविक व्यक्तिमत्त्व प्राप्त होते, त्याची ही खूण आहे. भाषा ही कोण्या एका आजच्या किंवा पूर्वीच्या, कोण्या एका वंशाची, जातीची, अभिजनांची मालमत्ता नसून लहानांपासून थोरांपर्यंत, गरीब-श्रीमंत, अडाणी-विद्वान, सर्वांचा सारखा हक्क मानणारी एक सामाजिक संस्था असते. भाषेइतकी लोकतांत्रिक संस्था दुसरी नाही. ह्यामुळेच राजकारणात तिचा सर्वाधिक वापर होताना दिसतो.

.............................................................................................................................................

‘भाषेतून भाषेकडे आणि भाषांतराकडे’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -