नातेसंबंध कसे जपावेत हे गुलज़ारांकडून शिकण्यासारखं आहे!
ग्रंथनामा - झलक
अरुण शेवते
  • ‘सगे सारे’ या गुलज़ारांच्या कवितासंग्रहाचं मुखपृष्ठ
  • Fri , 07 September 2018
  • ग्रंथनामा झलक गुलज़ार Gulzar सगे सारे Sage Sare अरुण शेवते Arun Shevate

‘सगे सारे’ हा गुलज़ार यांचा कवितासंग्रह १८ ऑगस्ट २०१८ रोजी, त्यांच्या ८५व्या वाढदिवशी ऋतुरंग प्रकाशनातर्फे प्रकाशित झाला आहे. उर्दू, हिंदीमध्ये पुस्तकं प्रकाशित होणाऱ्या आणि नंतरचा त्यांचा इंग्रजीमध्ये अनुवाद होणाऱ्या गुलज़ार यांचं हे पुस्तक मात्र पहिल्यांदा मराठीमध्ये प्रकाशित होत आहे. या संग्रहात बिरजू महाराज, आशा भोसले, टागोर, शेक्सपिअर, व्हॅन गॉग, ओम पुरी, जगजितसिंग, म. गांधी, प्रेमचंद, नामदेव ढसाळ, ग्रेस, कुसुमाग्रज अशा ५३ व्यक्तींविषयी गुलज़ारांनी लिहिलेल्या कविता आहेत. सोबत त्या त्या व्यक्तीविषयी त्यांची छोटीशी टिपणीही. या संग्रहाला प्रकाशक अरुण शेवते यांनी लिहिलेलं हे मनोगत.

.............................................................................................................................................

प्रिय गुलज़ारजी,

तुम्ही उर्दूमध्ये लिहिता. नंतर उर्दू आणि हिंदी भाषांत तुमचे कवितासंग्रह प्रसिद्ध होतात. तुमचा ‘सगे सारे’ हा कवितासंग्रह प्रथम मराठीत प्रकाशित होत आहे. यापूर्वी असं कधी घडलं नव्हतं. असं पहिल्यांदाच घडतंय. मराठी साहित्य, संस्कृती यांच्यावर तुमचं प्रेम आहे. ‘मी मराठीच आहे!’ असं तुम्ही नेहमी अभिमानानं सांगता. एवढंच नाही तर कुसुमाग्रज, दिलीप चित्रे, नामदेव ढसाळ, अरुण कोलटकर, विंदा करंदीकर यांच्यापासून नव्या मराठी कवींच्या कवितांचाही तुम्ही अनुवाद केला आहे. मराठीत तुमच्या ३५ पुस्तकांचा अनुवाद झाला आहे. हे ३६ वं पुस्तक तुमच्या ८५ व्या वाढदिवशी प्रकाशित झालं, याचा विशेष आनंद आहे.

तुमचा हा कवितासंग्रह अत्यंत वेगळा आहे. तुमच्या मनात ठाण मांडून बसलेल्या व्यक्तींवर तुम्ही कविता लिहिल्या आहेत. त्या नेहमीपेक्षा वेगळ्या आहेत, हे वाचताना लगेच लक्षात येतं.

अनेक वर्षांपूर्वी ग़ालिब, बिमल रॉय, सलील चौधरी यांच्यावर लिहिलेल्या कविता वाचल्या होत्या. त्याच वेळेस माझ्या मनात बीज पडलं. तुमच्या या कवितांचा एक वेगळा संग्रह काढावा. तुम्हीही त्याला प्रतिसाद दिलात आणि तेव्हापासून या कवितांचा प्रवास सुरू झाला. आज त्याला मूर्त स्वरूप आलं आहे.

आपल्या आयुष्यात आलेल्या व्यक्तीवर कविता लिहिणं तसं अवघड असतं. सगळा आठवणींचा पट डोळ्यांसमोर येतो. व्यक्तीवर कविता लिहीत असताना उदात्तीकरणाचा एक धोका असतो. आकाश, चंद्र, सूर्य, ईश्वर, समुद्र आणि अधिक काही तुझ्यात सामावलेलं आहे, अशा अर्थाच्या प्रतिमा लिहिल्या जातात. तुम्ही या सर्व गोष्टींना छेद दिला आहे. तो माणूस जसा जाणवला, जसा उलगडत गेला, त्याच पद्धतीनं या कविता लिहिल्या गेल्या. व्यक्तीबाबत, जगण्याविषयी तुमची स्वच्छ भूमिका असते. त्यामुळे या कवितांमध्ये पारदर्शीपणा ठायी ठायी आढळून येतो. तुम्ही स्वत:विषयी लिहिलेली ‘सेल्फ पोट्र्रेट’ कविताच पाहा ना! आज ८५ व्या वर्षी मागे वळून पाहताना तुम्ही आरशासमोर उभे राहता. ८५ व्या वर्षी माणसं भूतकाळासमोर उभी राहून स्वत:कडे हिशोब मागत असतात. तुम्ही कुठेच हिशोब मांडत नाही, तर आरशासमोर उभं राहून तुम्हाला वाटतं- आपण एक कोडंच बनलो नाही ना? स्वत:चा शोध घेत असताना कवीला असंच वाटत राहतं आणि त्याचं ते कोडं बनलेलं व्यक्तिमत्त्व त्याच्या कवितेतून एखाद्या निर्मळ झऱ्यासारखं वाहत राहतं. तुम्हीही असंच निर्मळपणे तुमच्या आयुष्यात आलेल्या माणसांकडे पाहत आला आहात.

अब्बू तुमचे वडील. प्रत्येक वडिलांना आपल्या मुलाच्या भवितव्याविषयी काळजी वाटते. अब्बूंना अशीच काळजी वाटायची तुमच्याविषयी. तुमचं कवितेत बुडून गेलेलं जगणं तुम्हाला आयुष्यात बुडवणार तर नाही ना? तुम्ही वडिलांसाठी ‘संपूर्णसिंह’ होता. पण तुम्ही ‘गुलज़ार’ या प्रतिभावंत कवीत स्वत:ला रूपांतर केलंत आणि तुमचं आयुष्यच बदलून गेलं. तुम्ही आयुष्यात खूप स्ट्रगल केलात. पण त्याविषयी काही बोललेलं, विचारलेलं तुम्हाला आवडत नाही. तुम्ही एकदा मला म्हणालात, ‘‘अरुण, जगात मी काही एकट्यानेच संघर्ष केला का? सर्वच संघर्ष करत असतात. त्यात माझ्या संघर्षाचं कौतुक कशासाठी?’’ पण स्ट्रगलच्या काळात मोटार गॅरेजमध्ये काम करणारा माणूस ‘ग्रॅमी’, ‘ऑस्कर’, ‘दादासाहेब फाळके’ पुरस्कार मिळवतो! आम्हाला तुमचा अभिमानच वाटणार. तुम्ही माझ्यावर रागावलात तरी तुमच्या संघर्षाच्या दिवसांविषयी मी तुम्हाला विचारत राहणारच. सकाळी आठ वाजता तुमच्याजवळ बसणाऱ्या माणसाच्या मनात तुमच्याविषयी विचार येत राहणारच.

या संग्रहात एकूण ६० कविता आहेत. प्रत्येक माणसाचं तुमच्याशी निगडित असलेलं व्यक्तिमत्त्व त्यात सामावलेलं आहे. तुम्हाला भेटताना तुम्ही म्हणायचात, ‘‘आज एक कविता ‘सगे सारे’त जमा झाली.’’ तुम्ही एक स्वतंत्र फाइलच तयार केली होती. या कविता वाचत असताना याचा लेआउट कसा असेल, या संभ्रमात मी पडायचो. तुम्ही मला या संभ्रमातून लगेच बाहेर काढलंत. तुम्ही म्हणालात, ‘‘अरुण, प्रत्येक व्यक्तीविषयी मी एक नोट लिहितो. म्हणजे त्या नोटमधून माझं त्या व्यक्तीविषयी असलेलं नातं स्पष्ट होईल आणि तूही तुझ्या संभ्रमातून बाहेर पडशील.’’ कधी कविता आधी लिहून होत होती, त्यानंतर तुम्ही नोट लिहून द्यायचात. खरं तर मी तुम्हाला खूप त्रास दिला. सर्व गोष्टींनी तुमच्यासमोर लहान असणारा माणूस तुम्हाला त्रास देणारच! मी तरी त्याला अपवाद कसा असणार?

जांभळाचे दिवस होते. असाच संध्याकाळी तुम्हाला भेटलो होतो. गप्पा झाल्यावर तुम्ही म्हणालात, ‘‘चल अरुण, आपण जांभळं खाऊ या.’’ तुमच्याबरोबर जांभळं खाता खाता मीही जांभळ्या रंगात रमून गेलो. अचानक मला आठवण झाली ‘सुवर्णा’ची! तुमची एक अप्रतिम कविता. अनुवादाला अतिशय अवघड. ‘व्हॅन गॉग’, ‘अंजना भाभी’ अशा कितीतरी कविता आठवत गेल्या. ती संध्याकाळ… रात्र कवितेची होती. कवितासंग्रहाचा प्रवास किती विलक्षण असतो याचा अनुभव तुमच्याबरोबर मला आला. तुम्ही म्हणालात, ‘‘कवितांचा अनुवाद कोण करणार?’’ मी म्हणालो, ‘‘किशोर मेढे. उत्तम अनुवादक आहेत. ‘तिबेटी’ कविता आणि इतर महत्त्वाच्या कवींच्या कवितांचा अनुवाद त्यांनी केला आहे.’’ तुम्ही म्हणालात, ‘‘अनुवाद झाला की आपण एकत्र बसलं पाहिजे.’’ तुम्ही भरपूर वेळ दिलात. सकाळी दहा वाजता आम्ही तुमच्याकडे यायचो व सर्व समजून घेईपर्यंत संध्याकाळचे पाच वाजायचे. प्रत्येक कविता तुम्ही समजून घेतलीत. वेळोवेळी मेढेंना दाद दिलीत. तुमच्याबरोबरचे ते दोन दिवस म्हणजे आमच्यासाठी अनुवादाची कार्यशाळाच होती. आम्ही दोघं कितीतरी गोष्टी शिकलो. काही प्रतिमा मराठीत तुम्हीच आम्हाला सुचवायचात. मेढे पूर्ण तयारीनिशी यायचे. तुमच्या प्रत्येक प्रश्नाला ते उत्तर तयार ठेवायचे. कधीतरी ते गप्पही बसायचे. तुमच्याकडून आल्यावर मी त्यांना विचारायचो, ‘‘तुमच्याकडे उत्तर असतानाही तुम्ही गप्प का बसलात?’’ ते तुम्हाला माझ्याशी खाजगीत बोलताना ‘बाबाजी’ म्हणतात. मेढे म्हणाले, ‘‘बाबाजींचं काम खूप अवघड आणि विलक्षण आहे. प्रत्येक शब्द न् शब्द आणि त्या शब्दामागचा अर्थ प्रतिमांमधून येतो. बाबाजींनी काही विचारलं की मी ब्लँक होऊन जातो.’’ ही फक्त त्यांचीच अवस्था नाही, तर माझ्यासारख्या अनेकांची तुमच्याशी बोलताना अशीच अवस्था होते.

व्हॅन गॉग तुमचा आवडता चित्रकार. व्हॅन गॉगवरील कवितेचा अनुवाद ऐकताना तुम्ही खुर्चीवरून चटकन् उठलात आणि भिंतीवरचं पूर्वीचं पेंटिंग बदलून व्हॅन गॉगचं पेंटिंग लावलंत. मी कधी व्हॅन गॉगच्या पेंटिंगकडे बघायचो, तर कधी तुमच्याकडे. पेंटिंगमधून व्हॅन गॉग तुमचा आवाज ऐकत असेल. त्याचं आणि तुमचं स्ट्रगलच्या काळातलं नातं!

तुम्ही कधी कोरडेपणानं कुणावर प्रेम केलं नाहीत, मैत्री केली नाहीत. साधा कुरिअरवाला जरी तुमच्या घरी आला तरी तुम्ही त्याला चहापाणी करून एखादं पुस्तकही भेट देता. कुसुमाग्रजांना तुम्ही अनेकदा भेटलात. पण नुसतं भेटीत प्रेम व्यक्त केलं नाहीत, तर त्यांच्या शंभर कवितांचा अनुवाद करून त्याचा संग्रहही प्रकाशित केलात.

मी हे लिहिलेलं तुम्हाला आवडणार नाही, पण मला मात्र लिहायलाच हवं. तुम्ही अनेकांना सहकार्य करता. परंतु त्याची वाच्यता कुठेच करत नाही. खरं सहकार्य या हाताचं त्या हाताला कळू न देण्यात असतं. लोकांना सहकार्य करून दोन्ही हातांनी टाळी वाजवायची सवय असते. तुम्ही मात्र या सगळ्यापासून दूर असता.

एकदा दुपारी मला तुमचा फोन आला. ‘‘तू कुठे आहेस? ऑफिसला येऊन जा. थोडं काम आहे.’’ मी लगेच तुम्हाला भेटलो. तुमच्या चेहऱ्यावर उदासीनतेची छाया होती. तुम्ही म्हणालात, ‘‘अरुण, नामदेव ढसाळ खूप सीरियस आहेत. आताच इंग्रजी वर्तमानपत्रात बातमी वाचली. त्यांना मदतीची गरज आहे. तू एवढा चेक हॉस्पिटलमध्ये नेऊन दे. कुणाला काही सांगू नकोस.’’ मी बॉम्बे हॉस्पिटलला जाऊन मलिका अमर शेखला चेक नेऊन दिला. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रांत मदत केलेल्यांची नावं होती. पण त्या बातमीत तुम्ही कुठे नव्हता.

नामदेव ढसाळ गेल्यानंतर तुमचा फोन आला. ‘‘अरुण, नामदेव गेला. आपण अंत्ययात्रेला जाऊ या.’’ आपण दोघं अंत्ययात्रेत सामील झालो. माणसांची प्रचंड गर्दी होती. त्या गर्दीत एक कवी दुसऱ्या कवीला निरोप द्यायला आला होता. तुम्ही एवढ्यावर थांबला नाहीत, तर नामदेव ढसाळांवर कविताही लिहिलीत.

तीच गोष्ट ग्रेसची. तुम्ही आणि ग्रेस दोघंही एकमेकांचे आवडते कवी. ग्रेस यांनी अनेक ठिकाणी मुलाखतीत, लेखांत तुमचा उल्लेख केला. ग्रेसनी अक्षयकुमार काळेंना मुलाखत देताना म्हटलं होतं- “गंगेच्या अतिव्याकूळ आठवणीनं तिच्या सलिल संभ्रमात जगन्नियंत्याला ‘साजण’ म्हणून हाक मारणारा एकच कवी भेटला मला. तो म्हणजे गुलज़ार!”

तुमचं ‘गंगा आये कहाँ से’ हे गाणं कुठल्याही अभ्यासक्रमात नसताना ग्रेसनी विद्यार्थ्यांना तासभर शिकवलं. त्यांना अखेरच्या प्रवासाला जाताना तुम्हाला भेटावंसं वाटलं. आपण त्यांना पुण्याच्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये जाऊन भेटलोही. ते गेल्यानंतर तुम्ही ग्रेसवर दोन कविता लिहिल्यात. नातेसंबंध कसे जपावेत हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे.

‘सगे सारे’मधील कोणतीही कविता वाचकांना कृत्रिम वाटणार नाही. कारण नातेसंबंधांचे रेशमी बंध तुम्ही जपले आहेत. प्रत्येकाविषयी पहिल्या नोटमध्ये तुम्ही किती सुंदर लिहिलं आहे! मोजक्याच आठवणींमधून त्या व्यक्तीची कविता वाचण्यापूर्वीच आपुलकीचे बंध निर्माण होतात. मुंबईच्या अंधेरी भागातील इंदूभाईंच्या म्युझिक सिस्टिम बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये पायलट राजीव गांधी तुम्हाला भेटले. ते गेल्यानंतर तुम्ही सहज लिहून गेलात-

‘उजेडाची एक सावली होती…’

चंद्राचं आणि तुमचं जवळचं नातं. चंद्राविषयीच्या कितीतरी प्रतिमा तुमच्या गाण्यांमध्ये, कवितेत आहेत. चंद्रावर ज्याने सर्वप्रथम पाऊल टाकलं तो नील आर्मस्ट्राँग तुमचा सखा, सगा. तो गेल्यानंतर कुणीही त्याची आठवण काढली नाही. काही लिहिलं नाही. तुम्ही त्याला कसे विसराल? तुम्ही त्याच्यावरील कवितेत लिहिलंत...

‘पहिलं पाऊल ज्यानं चंद्रावर ठेवलं होतं

दुसरं पाऊल आज जमिनीवरून त्यानं उचलून घेतलंय

आणि निघून गेलाय तो चंद्राच्याही पल्याड..’

विजया राजाध्यक्षांसोबत तुम्हाला भेटलो त्या वेळी तुम्ही समयच्या जन्माच्या वेळेस लिहिलेली ‘मेघना’ ही कविता वाचून दाखवलीत. तुमचं आईचं हृदय त्या कवितेतून व्यक्त झालं होतं. कविता ऐकताना विजयाबाई गहिवरल्या. त्यांनी ही कविता फ्रेम करून घरी लावली. एका आईनं तुम्हाला दिलेली ती दाद होती.

किती आणि काय लिहू मी तुमच्याविषयी? तुम्ही लेखनात डाव्या विचारसरणीचे आहात. पण डाव्या पक्षांचे वा कुठल्याही पक्षाचे सभासद नाहीत. कलबुर्गीची हत्या झाल्यावर तुम्ही अस्वस्थ झाला नाहीत तरच नवल!

राष्ट्रपिता बापूंची हत्या तर तुम्ही कोवळ्या वयात अनुभवलेली..

तुमचा स्वभाव मोकळा आहे; तसाच तो संकोचीही आहे.

अब्बू, आई, सोनू, बोस्की, तुमचा मुलासारखा जावई गोविंद, तुमचा लाडका नातू समय, बॉस्कर पाली यांच्याविषयी तुम्ही कविता लिहिल्यात. पण संग्रहात समाविष्ट करायला संकोच वाटत होता. खरं तर या कविता प्रारंभीच हव्या होत्या. कारण तुमच्या या प्रवासात हे सर्वजण तुमच्याबरोबर जगत आहेत आणि तुम्हीही त्यांच्याबरोबर. पण या कविता तुम्ही संग्रहाच्या मध्यभागी समाविष्ट करायला सांगितल्यात. या सगळ्या कविता वाचताना तुमच्यातला संवेदनशील माणूस, बाप, कवी, कलावंत जागोजागी आढळतो.

खरं तर एका अर्थानं मला हे तुमचं कवितेतून मांडलेलं काही अंशी आत्मचरित्रच वाटतं. एका पत्रकारानं तुम्हाला विचारलं, ‘‘तुम्ही आत्मचरित्र का लिहीत नाही?’’ त्यावर तुम्ही म्हणालात, ‘‘माझं सगळंच आयुष्य तुम्हाला माहीत आहे!’’ पण प्रत्यक्षात तसं कुठे आहे? या कवितांमधून तुमचं मन, तुमची प्रतिभा, तुमच्यातला माणूस, तुमच्यातला कलावंत पानोपानी पाहायला मिळतो. तो सच्चा आहे. कारण तुम्ही स्वत:च हा नातेसंबंध उलगडून दाखवला आहे.

मनाशी, भावनेशी, विचारांशी ज्यांचं नातं जुळलेलं आहे अशाच माणसांशी तुमचा संवाद या कवितांमधून झाला आहे. मुन्शी प्रेमचंद यांच्याविषयी लिहिताना त्यांच्या साहित्यातील पात्रांमधून तुम्हाला जाणवलेले प्रेमचंद तुम्ही उभे केले आहेत. घर, घराणी बदलत गेली, पण आशा भोसले कशा ठामपणे आयुष्यात उभ्या आहेत, हे किती साध्या, सरळ प्रतिमांमधून तुम्ही व्यक्त केलं आहे. अनेकांना न भेटताही तुमचं त्यांच्याशी असलेलं नातं उत्कटपणे जाणवतं. खरं तर यातील सर्वच कवितांविषयी लिहिण्याचा मोह होतो. पण एका लेखात कसं लिहिणार? त्यासाठी स्वतंत्रपणेच लिहायला हवं. अनेकांना न भेटताही तुमचं त्यांच्याशी असलेलं नातं उत्कटपणे जाणवतं. शेक्सपिअर तुम्हाला तुमचा वाटतो.

संग्रह प्रकाशित व्हायला जवळजवळ दोन वर्ष लागली. कविता परिपूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही. तुम्हीच म्हणता,

‘अक्सर पेडों की शाखा पर रख देता हूं,

नज्मों को पकाने के लिए!’

झाडांच्या फांद्यांवर तुमच्या कविता परिपक्व होतात. तुमच्या मनातल्या हजारो फांद्या तुमच्या कवितेतल्या ओळी-ओळींतून दिसतात. ‘सगे सारे’तल्या फांद्या बहरताना, फुलताना तर माझ्यासारख्यालाही तुम्ही जवळ घेतलंत. हा तुमच्या मनाचा मोठेपणा.

कधी कधी मात्र तुम्ही मला खूप लाजवता. अशा वेळी काय करावं सुचत नाही. आपण पुण्याला एका कार्यक्रमाला चाललो होतो. लोणावळा आणि पुण्याच्या आसपास आपण होतो. तुम्ही बोलता बोलता काहीतरी लिहायला लागलात. लिहून झाल्यावर मला म्हणालात, ‘‘अरुण, तुझ्यावर कविता लिहिली आहे. तुला वाचून दाखवतो.’’ कविता वाचून दाखवल्यावर मला वाटलं, गाडीतून बाहेर पडावं आणि माळरानावर आनंदानं पळत सुटावं. पण यापैकी काहीच करणं शक्य नव्हतं. मी तुमच्याजवळ होतो. ‘सगे सारे’त मीही सामावून गेलो. एवढंच नाही तर ‘ऋतुरंग’ला प्रकाशनासाठी कवितासंग्रह दिलात. मी काय म्हणणार? तुमच्या ऋणात राहणंच चांगलं!

.............................................................................................................................................

‘सगे सारे’ या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा आणि विशेष सवलत मिळवा -

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’चे अँड्राईड अॅप डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा -