मानव जात ही ‘सत्या’पेक्षा ‘भावनां’नीच वाहून जाणारी प्रजाती आहे!
ग्रंथनामा - आगामी
युव्हाल नोआ हरारी
  • युव्हाल नोआ हरारी यांनी ‘21 Lessons for the 21st Century’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Wed , 15 August 2018
  • ग्रंथनामा Granthnama आगामी युव्हाल नोआ हरारी Yuval Noah Harari एकविसाव्या शतकासाठी २१ धडे 21 Lessons for the 21st Century सेपिअन्स Sapiens होमो डेउस Homo Deus

आजच्या घडीला आपण ज्या समस्यांना तोंड देत आहोत, त्या समस्यांना उद्देशून ‘सेपिअन्स’, ‘होमो डेउस’ या लोकप्रिय पुस्तकांचे लेखक युव्हाल नोआ हरारी यांनी ‘21 Lessons for the 21st Century’ हे नवं पुस्तक लिहिलं आहे. त्यात ते म्हणतात की ‘फेकुगिरी’ अथवा ‘बनावट बातम्या’ या फेसबुकच्या आधीपासूनच अस्तित्वात होत्या. युवल नोहा हरारी लिखित ‘21 Lessons for the 21st Century’ हे पुस्तक ३० ऑगस्ट रोजी प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील एका प्रकरणाचा हा संपादित अंश...

.............................................................................................................................................

आपण एका नव्या, ‘पोस्ट-ट्रूथ’ (‘सत्य दडवून भावनांशी खेळणाऱ्या’) भीतीदायक जगात जगत आहोत, असं आजकाल आपल्याला वारंवार सांगितलं जातं. आपल्याभोवती सगळीकडे खोटेपणा आणि कपोलकल्पित कहाण्यांचं जाळं पसरलेलं आहे. पुन्हा त्याची उदाहरणं शोधणंही फार कठीण नाही. उदाहरणार्थ, फेब्रुवारी, २०१४ च्या अखेरीस गणवेष किंवा कसलंही चिन्हं परिधान न केलेली रशियन सेनापथकं युक्रेनमध्ये घुसली आणि त्यांनी  क्रिमिया येथील सर्व महत्त्वाच्या आस्थापनांवर कबजा केला. रशियन सरकार आणि व्यक्तिशः अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हे लोक रशियन सैन्यातले पगारी सैनिक आहेत, हा मुद्दा वारंवार खोडून काढला. ते उत्स्फुर्तपणे उभे राहिलेले ‘स्वसंरक्षक गट’ आहेत, असंच त्यांनी ठासून सांगितलं. आता त्यांच्याकडे रशियन बनावटीची शस्त्रं आली कुठून? असं विचारता त्यांनी कदाचित स्थानिक दुकानांतून तशी दिसणारी हत्यारं खरेदी केली असतील असं त्यांचं म्हणणं होतं. हा  हास्यास्पद दावा करताना पुतीन आणि सहकाऱ्यांना पक्कं माहिती होतं की, आपण धडधडीत खोटं बोलत आहोत.  

उच्चतम सत्य साधण्यासाठी थोडंफार असत्य समर्थनीयच आहे, अशी सबब रशियन ‘राष्ट्रवादी’ लोक देतीलही. त्यांच्या मते रशिया एका न्याय्य लढ्यात उतरला आहे, जर न्याय्य कारणासाठी हत्या करणे योग्य असते तर न्याय्य कारणासाठी खोटे बोलणे हेसुद्धा योग्यच ठरते. म्हणजेच ‘पवित्र रशियन राष्ट्राचे जतन’ या उच्चतम ध्येयापोटी केलेली युक्रेनमधली ‘विवादास्पद’ घुसखोरी न्याय्य ठरत होती. रशियन राष्ट्रवादी मिथकांनुसार रशिया हे एक पवित्र अस्तित्व आहे. त्या भूमीवर घुसखोरी करून तिचे तुकडे तुकडे करण्यासाठी दुष्ट शत्रूंनी हजारो वर्षं आक्रमणं केली, ती सगळी या राष्ट्रानं सहन केली. मंगोल, त्यांच्यामागोमाग पोलंडवासी, स्वीडनवासी, नेपोलियनची महासेना आणि हिटलरची सेना यांनी केलेल्या हल्ल्यांनतर १९९० च्या दशकात नाटो, अमेरिका आणि युरोपियन युनियन या सर्वांनी रशियाचे लचके तोडायचा प्रयत्न केला आणि युक्रेनसारख्या ‘बनावट’ राष्ट्रांची निर्मिती केली. बऱ्याच रशियन राष्ट्रवाद्यांच्या दृष्टीनं युक्रेन हा रशियाहून वेगळा देश आहे, हे म्हणणे हाच खूप मोठा खोटारडेपणा आहे. त्यामुळे रशियन राष्ट्राची पुनर्जोडणी करण्याच्या पवित्र कार्यात अध्यक्ष पुतीन जे काही खोटं बोलले, ते त्यापुढे क्षुल्लकच म्हणावे लागेल.

युक्रेनी नागरिक, परदेशी निरीक्षक आणि इतिहासकार या स्पष्टीकरणामुळे नक्कीच संतापतील. रशियन खोटारडेपणाच्या कोठारातील ‘अॅटम बॉम्ब’ अशी उपाधीही त्यास देतील. युक्रेनला राष्ट्र  आणि स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वच नाही, हा दावा करणारे लोक ऐतिहासिक सत्य पुराव्यांच्या लांबलचक यादीकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात. उदाहरणार्थ, हजारो वर्षांची तथाकथित रशियन एकता होती असं म्हणताना किव आणि मॉस्को  हे भाग फक्त मागचे ३०० वर्षंच त्या देशाचा भाग होते हे विसरलं जातं. त्याशिवाय स्वतंत्र युक्रेनच्या सार्वभौमत्वासाठी आणि सीमारक्षणासाठीचे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय कायदे आणि करार जे पूर्वी रशियानं मान्य केले होते, तेच आता त्यानं मोडलेले आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाखो युक्रेनी लोक स्वतःबद्दल काय विचार करतात, याकडे रशिया पूर्णपणे दुर्लक्ष करतो आहे. आपण कोण आहोत हे सांगण्याचं स्वातंत्र्य त्यांना नसावं का?

काही बनावटी देश या भूमीवर निर्माण झालेत याबाबत युक्रेनी राष्ट्रवाद्यांचं रशियन राष्ट्रवाद्यांशी एकमत होईल. मात्र युक्रेनी राष्ट्रवादी म्हणतील की, त्या बनावटी देशांत युक्रेनची गणना नक्कीच होत नाही. उलट युक्रेनमधील घुसखोरीवर पांघरूण घालण्यासाठी रशियानं तिथंच लुहान्क्स आणि डोनेस्क म्हणून दोन देश निर्माण केलेत. हे दोन देशच बनावट आहेत.

कुठल्याही बाजूला समर्थन दिलं तरी आपण एका भीतीदायक ‘पोस्ट ट्रूथ’ युगात जगतो आहोत, ही गोष्ट मात्र सत्य आहे. कारण केवळ काही लष्करी घटनाच नव्हेत तर संपूर्ण इतिहास आणि राष्ट्रंही बनावट असण्याची शक्यता खूप वाढलेली आहे. पण समजा, हे युग पोस्ट-ट्रूथचं युग आहे असं आपलं म्हणणं असलं तर मग खरोखरच्या सत्याचं सुखी युग केव्हा अस्तित्वात होतं? १९८० च्या दशकात? १९५० च्या दशकात? की १९३० च्या दशकांत? मग तिथून पोस्ट-ट्रूथ युगापर्यंत आपला प्रवास होण्याची कळ दाबली तरी कुणी? इंटरनेटनं? समाजमाध्यमांनी? की पुतीन-ट्रम्पच्या उदयानं?

इतिहास नुसता वरवर चाळला तरी लक्षात येतं की, प्रचार आणि चुकीची माहिती देणं यात काहीच नवं नाहीये. एवढंच नव्हे तर संपूर्ण राष्ट्राचं अस्तित्व नाकारायचं, बनावट देश उभारायचे याचीही बरीच मोठी परंपरा आहे. चीनवर १९३१ साली केलेलं आक्रमण न्याय्य ठरावं म्हणून जपानी सैन्यानं स्वतःवर खोटे हल्ले झाल्याचं नाटक रचलं होतं. त्यानंतर आपल्या विजयास वैधता देण्यासाठी मांचुकुओ नावाचा एक बनावट देशही निर्माण केला होता. तिबेट हा स्वतंत्र देश म्हणून केव्हातरी अस्तित्वात होता, हे स्वतः चीननेही सदैव नाकारलेलं आहे. ऑस्ट्रेलियातील ब्रिटिश वसाहतीच्या समर्थनासाठी ‘टेरा नल्लियस’ (म्हणजे ‘ही भूमी अगोदर कुणाचीच नव्हती’) या कायद्याचा आधार घेतला गेला आणि त्यायोगे तेथील आदिवासींचा ५०,००० वर्षांचा इतिहास पद्धतशीरपणे पुसून टाकण्यात आला. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झायनवादी लोकांचीही एक लोकप्रिय घोषणा होती, त्यात ‘भूमीहीन लोकांचं (ज्यूंचं) लोकहीन भूमीत (पॅलेस्टाईनमध्ये) पुनरागमन होत आहे, असा उल्लेख होता. तो करताना स्थानिक अरब लोकसंख्येकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आलं होतं.

१९६९ मध्ये इस्त्रायली पंतप्रधान गोल्डा मेयर ते प्रसिद्ध वाक्य बोलल्या होत्या की, पॅलेस्टिनी म्हणून ओळखले जाणारे लोक सध्याही आणि पूर्वीही कधीच अस्तित्वात नव्हते. म्हणजे ज्या पॅलेस्टाईनविरुद्ध कित्येक दशकं सशस्त्र झगडे होऊनही ‘ते अस्तित्वातच नाही’ असं म्हणण्याची पद्धत आजही इस्त्रायलमध्ये सर्रास आढळून येते. उदाहरणार्थ, फेब्रुवारी, २०१६ मध्ये अनॅट बर्को यांनी इस्त्रायली संसदेत भाषण केलं. त्यात त्यांनी पॅलेस्टिनी लोकांच्या खरेपणाबद्दल आणि इतिहासाबद्दल शंका घेतली होती. त्यावर त्यांच्याकडे काय पुरावा होता? तर अरबी भाषेत ‘प’ हे अक्षरच नाही, तर मग पॅलेस्टिनी लोक असतीलच कसे? (अरबी भाषेत ‘फ’चा उच्चार ‘प’सारखा होतो आणि पॅलेस्टाईनचं अरबीतलं नाव आहे फलस्तिन.)

खरं सांगायचं तर माणसं सदैव ‘पोस्ट-ट्रूथ’च्याच जगात जगत आलेली आहेत. होमो सेपियन्स ही उत्क्रांत झालेली मानवी प्रजाती ‘पोस्ट-ट्रूथ’ प्रजातीच आहे. कल्पनारम्य कथा रचण्यात आणि त्यावर विश्वास ठेवण्यातच तिची ताकद अवलंबून आहे.

अगदी पाषाणयुगापासून मानवी समूहांना एकत्र आणण्याचं कार्य ‘आपलं महत्त्व ठासून सांगणाऱ्या’ मिथकांनी केलं आहे. होमो सेपियन्स या पृथ्वीचे विजेते ठरले, त्यामागे कल्पनारम्य कथा निर्माण करण्याची आणि त्यांच्या प्रसार करण्याची एकमेवाद्वितीयम् अशी त्यांची शक्तीच कारणीभूत आहे. अगणित अपरिचितांसोबत सहकार्य करू शकणारे असे आपण एकमेव सस्तन प्राणी आहोत, या मागचं एकमेव कारण म्हणजे फक्त आपणच काल्पनिक कहाण्या रचू शकतो, त्यांचा सर्वत्र प्रसार शकतो आणि अन्य लाखो व्यक्तींनी त्यावर विश्वास ठेवावा म्हणून त्यांना पटवूही शकतो. जोपर्यंत सगळेजण समान दंतकथांवर विश्वास ठेवत असतात, तोवर आपण समान कायद्याचं पालन करू शकतो आणि त्याद्वारे एकमेकांशी प्रभावी सहकार्य करू शकतो.

त्यामुळेच, ‘पोस्ट-ट्रूथ’चं भीतीदायक युग आणल्याबद्दल आपण फेसबुक, ट्रम्प किंवा पुतिनला दोष देत असू, तर स्वतःला आठवण करून द्या की, कित्येक शतकांपूर्वी हजारो ख्रिश्चन लोकांनी एका पौराणिक बुडबुड्यात स्वतःला कसं अडकवून घेतलं होतं? बायबलमध्ये सांगितलेल्या घटनांची सत्यता काय आहे, हे विचारण्याचं त्यांना धैर्यही होत नव्हतं. तसंच लाखो मुसलमानही कसलाही प्रश्न न विचारता आपली अढळ श्रद्धा कुराणाप्रती ठेवत आले आहेत. हजारो वर्षं ‘वास्तव माहिती’ म्हणून ज्या गोष्टी मानवी समाजातून पुढल्या पिढ्यांपर्यंत पाठवल्या गेल्या, त्या सगळ्या कहाण्या चमत्काराच्या, देवदूतांच्या, राक्षसांच्या आणि चेटकिणींच्या होत्या. जणू धाडसी वार्ताहर पार पाताळातल्या खोल खड्ड्यांतून त्या बातम्यांचं चक्षुर्वेसत्यं वर्णन करत होते. इव्हला सर्पानं मोहात पाडलं का याबद्दलचा वैज्ञानिक पुरावा शून्य आहे. अमुकतमुक धर्म न मानणाऱ्या सर्व पाखंड्यांचे आत्मे मरणानंतर नरकात जळतात किंवा ब्राह्मणानं अस्पृश्याशी विवाह केला तर ते या विश्वनिर्मात्याला आवडत नाही या कशाकशालाही पुरावा नाही. तरीही लाखो लोक या कहाण्यांवर हजारो वर्षांपासून विश्वास ठेवत आले आहेत. खरोखरच काही बनावट बातम्या तर शाश्वत काळ टिकतात.

धर्माचं समीकरण मी बनावट बातम्यांशी जोडल्यामुळे बरेच लोक अस्वस्थ होतील, याची मला कल्पना आहे, पण तोच तर खरा मुद्दा आहे. हजारभर माणसं कुठल्यातरी रचून सांगितलेल्या कहाणीवर महिनाभर विश्वास ठेवतात, तेव्हा ती बनावट बातमीच असते. परंतु अब्जावधी लोक हजारभर वर्षं त्यावर विश्वास ठेवतात, तेव्हा तो धर्म असतो. असं म्हटलं तर आपल्याला तंबी दिली जाते की, तसं बोलू नका. कारण त्यामुळे धार्मिकांच्या भावना दुखावतील (किंवा त्यांचा तुमच्यावर रोष होईल.). या ठिकाणी लक्षात घ्या की धर्मातील सत्प्रवृत्त उदारपणाचा प्रभाव मी इथं नाकारत नाहीये.

मला म्हणायचंय की भल्यासाठी असो की वाईटासाठी असो, कल्पनारंजन हे मानवतेच्या भात्यातील परिणामकारक साधना आहे. त्याद्वारे धार्मिक गटांना लोकांना एकत्र आणून मोठ्या प्रमाणावरचं मानवी सहकार्य उभं करता येतं. सैन्ये आणि तुरुंग उभारण्यासोबतच रुग्णालयं, शाळा आणि पूल उभारण्यासाठीही ते लोकांना प्रेरित करतात. अॅडम आणि इव्ह कधीही अस्तित्वात नव्हते, परंतु ‘चार्टर्स कॅथेड्रल’ अजूनही सुंदर आहे. बायबल बरंचसं काल्पनिक असलं तरीही ‘डॉन क्विझॉट’, ‘वॉर अँण्ड पीस’ आणि ‘हॅरी पॉटर’सारख्या अन्य कल्पनारंजनपर कहाण्यांसारखंच तेही अब्जावधी लोकांना आनंद देतं, त्यांना करुणामय, धाडसी आणि निर्मितिक्षम बनवतं.

आता ‘बायबल’ची तुलना ‘हॅरी पॉटर’शी केली म्हणून काही लोकांना राग येईल, याची मला कल्पना आहे. तुम्ही विज्ञाननिष्ठ ख्रिश्चन असाल तर ‘बायबल’मधील सर्व चुका, मिथकं आणि विरोधाभासांचं स्पष्टीकरण देताना म्हणाल की, या पवित्र ग्रंथाचं वाचन सत्यकथा म्हणून करायचं नाहीच मुळी. त्याच्याकडे आपण सखोल शहाणपण साठवलेल्या रूपकात्मक कथा या दृष्टीनं पाहायला हवं. पण मग ‘हॅरी पॉटर’लाही तेच लागू नाही का?  

तुम्ही मूलतत्त्ववादी कट्टर ख्रिश्चन असलात तर ‘बायबल’मध्ये लिहिलेला प्रत्येक शब्द खरा आहे, म्हणून हटून बसण्याची शक्यता आहे. आपण क्षणभरासाठी गृहीत धरू की, ‘बायबल’ म्हणजे एकाच खऱ्या देवानं उच्चारलेली अमोघ वाणी आहे. पण तसं असेल तर मग कुराण, तालमुद, बुक ऑफ मॉरमॉन (नंतरच्या संत चळवळीतील पवित्र ग्रंथ), वेद, अवेस्ता आणि इजिप्तमधील ‘बुक ऑफ द डेड’ यांच्याबद्दल काय म्हणाल? हे सर्व ग्रंथ हाडामांसाच्या माणसांनी (कदाचित सैतानांनी) लिहिलेल्या काल्पनिक कथा आहेत असं म्हणण्याचा मोह तुम्हाला होणार नाही का?

सहकार्य मजबूत होण्यासाठी दंतकथांचा वापर फक्त पुरातन काळातील धर्मांनीच केलेला नाही. अगदी हल्लीच्या काळात पाहिलं तर प्रत्येक राष्ट्रानं आपापली पुराणं निर्माण केलेली आहेत, तर साम्यवाद, आक्रमक राष्ट्रवाद (फॅसिझम) आणि उदारमतवाद या चळवळींनीही आपापले तपशीलवार जाहीरनामे काढलेले आहेतच. नाझी प्रचाराचा सर्वेसर्वा आणि आधुनिकयुगीन माध्यमांवर हुकमी पकड असणारा माध्यम-जादुगार जोसेफ गोबेल्स यांनं आपलं तंत्र थोडक्यात सांगताना म्हटलं होतं, “एकदाच सांगितलं तर खोटं हे खोटंच राहतं. परंतु हजार वेळा सांगितलं तर त्याच खोट्याला खऱ्याचं स्वरूप येतं. ‘माईन काम्फ’ या आत्मचरित्रात हिटलरनं लिहिलंय की, “प्रचाराच्या अत्यंत डोकेबाज तंत्रालाही यश मिळायचं असेल तर एक मूलभूत तत्त्व कायम बाळगलं पाहिजे. मुद्दे अगदी थोडे असावेत आणि तेच तेच मुद्दे पुन्हा पुन्हा रेटून सांगावेत.’’ विद्यमान काळातील कुठलाही बनावट बातम्यांचा ठेकेदार या वाक्यात काही सुधारणा शकतो का?

जोसेफ स्टालिनच्या आधिपत्याखालची सोव्हिएत प्रचार यंत्रणा सत्य लपवण्यात एवढी चपळ होती, एवढी कार्यक्षम होती की स्वतःच्या भूमीवर केलेल्या सैतानी अत्याचारांची माहिती जगापासून दडवण्याची, त्याच वेळेस बाह्य जगात आपली आदर्श प्रतिमा निर्माण करण्याची व्यवस्था त्यांना बिनबोभाट करता येत होती. आजचे युक्रेनवासी तक्रार करतात की, क्रिमिया आणि डॉनबासमध्ये रशियानं प्रत्यक्षात काय केलंय. त्याबद्दल पाश्चात्य माध्यमांना फसवण्यात पुतीन बऱ्यापैकी यशस्वी झालेले आहेत. एवढं होऊनही फसवण्याच्या कलेत स्टालिनपुढे पुतीन म्हणजे ‘किस झाड की पत्ती’ असंच म्हणावं लागेल. १९३० च्या दशकाच्या सुरुवातीस डाव्या विचारसरणीचे पाश्चात्य पत्रकार- विचारवंत सोव्हिएत रशियाचं गुणगान ‘एक आदर्श समाज’ म्हणून करत होते. त्याच वेळेस युक्रेनवासी आणि अन्य सोव्हिएत नागरिक स्टालिनपुरस्कृत दुष्काळात मृत्युमुखी पडत होते. तसं पाहिलं तर आजच्या फेसबुक-ट्विटरच्या युगात कधीकधी घटनांची कुठली साखळी खरी आणि कुठली खोटी हे ठरवणं अवघड होऊन बसलं तरी एखाद्या राजवटीला आपल्या येथील लाखो लोकांची जगाला काहीच न कळता हत्या घडवून आणणं हे निदान यापुढे शक्य नाही.

धर्म आणि वेगवेगळ्यां विचारसरणींसोबत व्यापारी आस्थापनंही काल्पनिक कथा आणि फेकुगिरीवर अवलंबून असतात. ब्रॅंडिग करताना एकच काल्पनिक कथा पुन्हा पुन्हा सांगण्याचा भाग असतोच, वारंवार सांगितल्यामुळेच तर ते खरं आहे हे लोकांना पटू लागतं. सांगा,  ‘कोकाकोला’ म्हटल्यावर तुमच्या नजरेसमोर कुठली प्रतिमा येते? तरुण, निरोगी लोक एकत्र जमून खेळाचा आनंद लुटत आहेत, ही प्रतिमा येते की इस्पितळातील खाटेवर पडलेले लठ्ठ, मधुमेही रुग्ण ही प्रतिमा येते? भरपूर कोकाकोला प्यायल्यानं तुम्ही ना तरुण होणार असता ना निरोगी. त्यामुळे तुमचं शरीरही कसरतपटूसारखं पीळदार होणार नसतं- उलट तुमचं वजन वाढून जाडेपणा आणि मधुमेह होण्याची शक्यताच वाढणार असते. हे वास्तव असूनही तारुण्य, आरोग्य आणि क्रीडा यांच्याशी स्वतःला जोडून घेण्याकरता कोकाकोला कित्येक दशकांपासून अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करत आहे आणि अब्जावधी माणसं नकळतपणे या खोट्या जोडणीवर विश्वासही ठेवत आली आहेत. म्हणजेच होमो सेपियन्सच्या अजेंड्यावर सत्याचं स्थान फार काही वरचं नसतं, हेच शेवटी सत्य आहे. बरेच लोक गृहीत धरतात की एखादा धर्म किंवा विशिष्ट विचारसरणी वास्तवाला योग्य तऱ्हेनं समोर ठेवत नसेल तर त्यांचे पालन करणाऱ्या अनुयायांना कधी ना कधी ते समजणारच कारण अधिक स्पष्ट दृष्टीच्या स्पर्धकांसोबत स्पर्धा करणं त्यांना शक्य होणार नाही. हीसुद्धा एक दंतकथाच म्हणावी लागेल.

प्रत्यक्षात मानवी सहकार्याची ताकद ही सत्य आणि कपोलकल्पिताच्या अत्यंत नाजूक समतोलावरच अवलंबून असते. कुणी वास्तवाचा फारच अपलाप करू पाहिला तर त्यामुळे त्यांनाच अवास्तव वागणं भाग पडतं आणि उलट दुबळेपणा येतो. उदाहरणार्थ, १९०५ साली पूर्व आफ्रिकेतील एक मांत्रिक किंजिकितिले नग्वाले यांनं दावा केला की, माझ्यात होंगो नामक सर्पाचा आत्मा शिरलाय. त्या आत्म्यानं पूर्व आफ्रिकेच्या जर्मन वसाहतीतल्या गुलामांना एकच संदेश दिला : एकजूट करा आणि जर्मनांना हाकलून लावा. हा संदेश अधिक प्रभावी वाटावा म्हणून नग्वालेनं आपल्या अनुयायांना जादुई औषध दिलं. ज्यामुळे जर्मनांच्या बंदुकीच्या गोळ्यांचं पाणी होणार होतं... (स्वाहिलीत पाण्याला ‘माजी’ म्हणतात.) अशा तऱ्हेनं ‘माजी माजी’ बंड सुरू झालं. ते अर्थातच अपयशी ठरलं कारण लढाईच्या वेळी जर्मन बंदुकांच्या गोळ्यांचं पाणी झालंच नाही. उलट कामचलाऊ शस्त्रं असलेल्या बंडखोराच्या शरीरांच्या त्यांनी चिंधड्या चिंधड्या उडवल्या.

परंतु हेही खरंय की, कुठल्यातरी दंतकथेवर अवलंबून राहिल्याखेरीज तुम्ही सर्वसामान्य जनतेला एकत्र आणू शकत नाही. कसलीही भेसळ नसलेल्या वास्तवाला चिकटून राहिलात तर खूपच थोडे लोक तुमच्या मागून येतील.

स्पष्ट सांगायचं तर लोकांना एकत्र आणायचं असेल तर भाकडकथांचं पारडं सत्यापेक्षा काकणभर वरचढच ठरतं. एखाद्या समाजगटाच्या निष्ठेची पारख करायची असेल तर त्यातल्या सदस्यांना ‘सत्यावर विश्वास ठेवा’ सांगण्याऐवजी कुठल्यातरी असंबद्धतेवर विश्वास ठेवायला सांगणं अधिक सोपं ठरतं. समजा एखादा मोठा नेता म्हणाला की, “सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो,’’ तर टाळ्या वाजवून अनुमोदन देण्यासाठी त्या नेत्याबद्दल निष्ठा असण्याची काहीच गरज नाही. परंतु नेता जर म्हणाला की, “सूर्य पश्चिमेला उगवतो आणि पूर्वेला मावळतो,’’ तर फक्त खरे निष्ठावंतच टाळ्या वाजवून अनुमोदन देतील. त्याचप्रमाणे तुमचे सर्व शेजारी एखाद्या धक्कादायक, अतिशयोक्त कहाणीवर विश्वास ठेवणारे असतील तर संकटप्रसंगी ते एकजुटीनं उभे राहातील असं तुम्ही खात्रीनं म्हणू शकता. समजा, ते फक्त पुराव्यानं शाबीत गोष्टींवरच विश्वास ठेवायला राजी असतील तर त्यामुळे सिद्ध काय होतं?

तुम्ही म्हणाल की निदान काही बाबतीत तरी काल्पनिक कहाण्या आणि दंतकथांऐवजी सहमतीनं लोकांना एकत्र आणून आपण त्यांचं अधिक प्रभावी संघटन करू शकतो. उदाहरणार्थ अर्थक्षेत्रात कुठल्याही देवापेक्षा, पवित्र ग्रंथापेक्षा पैसा आणि मोठमोठ्या कंपन्या अधिक प्रभावीपणे लोकांना एकत्र आणतात. त्या ठिकाणी अर्थव्यवहार ही मानवी प्रथा आहे हे माहिती असलं तरी लोक एकत्र येतात. पवित्र ग्रंथाबाबत म्हणायचं तर खरा श्रद्धाळू म्हणेल की, “हा ग्रंथ पवित्र आहे अशी माझी श्रद्धा आहे.’’ तर डॉलरच्या बाबतीत खरा श्रद्धाळू एवढंच म्हणेल की, “डॉलर मौल्यवान आहे अशी बाकीच्या लोकांची श्रद्धा आहे, म्हणूनच मीही त्यावर श्रद्धा ठेवतो.’’  या ठिकाणी डॉलर ही मानवी निर्मिती आहे हे तर उघडच आहे, तरीही जगातील सर्व लोक त्याचा आदर ठेवतात. पण मग माणसं सगळ्या दंतकथा-मिथकांचा त्याग करून डॉलरसारख्या सर्वसंमत प्रथेच्या आधारावर व्यवस्था का उभारत नाहीत?

तथापि, पैसा आणि काल्पनिक कथा यात स्पष्ट वेगळेपणा नसतो. उदाहरणार्थ, पवित्र ग्रंथ आणि पैसा यातील फरक सुरुवातीला जेवढा दिसेल त्यापेक्षा प्रत्यक्षात खूपच कमी असतो. बरेच लोक डॉलरची नोट पाहतात, तेव्हा ही केवळ एक मानवी निर्मिती आहे हे विसरूनच जातात. मृत गोऱ्या माणसाचं चित्र असलेला, हिरव्या रंगाचा तो कागदाचा तुकडा दिसला की, त्यांना त्यात काहीतरी मौल्यवान आहे असं वाटतं. ती नोटच खूप महत्त्वाची वाटू लागते. म्हणजेच एखादी वस्तू ही मानवी प्रथा आहे हे माहिती असणं आणि दुसरी वस्तू ही दैवी दृष्टीनं मौल्यवान आहे असं समजणं यातला फरक प्रत्यक्ष व्यवहारात दिसत नाही.  

बऱ्याच वेळा या फरकाबद्दल लोकांच्या मनात संदेह असतो किंवा ते तो विसरूनसुद्धा जातात. खरोखरच, एकाच वेळी माहिती असण्याची आणि माहिती नसण्याची लक्षणीय खुबी मानवांना अवगत असते.

बऱ्याच हेतूंनी प्रेरित होऊन सत्य आणि वास्तवातील सीमारेषेत गल्लत केली जाते. म्हणजे ‘गंमत करणे’ या हेतूपासून ‘तग धरून राहाणे’ इथपर्यंत त्या हेतूंची व्याप्त असते. अविश्वास काही काळ खुंटीला टांगून ठेवला नाही तर तुम्हाला कुठलाही खेळ खेळता येणार नाही किंवा कादंबरीही वाचता येणार नाही. फुटबॉलचा आनंद लुटायचा असेल तर त्या खेळाचे नियम मान्य करावेच लागतात आणि हा खेळ मानवनिर्मित आहे असं निदान नव्वद मिनिटांसाठी तरी विसरावं लागतं. ते केलं नाही तर एका चेंडूमागे बावीस लोक वेडगळासारखे काय धावताहेत असंच वाटेल. गंमत म्हणून फुटबॉल खेळायला सुरुवात केली तरी नंतर त्यात खूपच गांभीर्य येऊ शकतं. हल्लागुल्ला करणारा इंग्रज किंवा अर्जेटिनातील राष्ट्रवादी त्यास साक्ष म्हणून उभे राहातील. फुटबॉलमुळे वैयक्तिक ओळख निर्माण होते, खूप मोठ्या प्रमाणावर चाहत्यांचे गट लाभतात. म्हणजे अगदी हिंसा करण्यासाठीचं कारणसुद्धा फुटबॉल पुरवू शकतो. खरोखरच ‘राष्ट्रे’ आणि ‘धर्म’ म्हणजे स्टिरॉईडचं सेवन करणारे फुटबॉल क्लबच तर असतात.

सत्य आणि सत्ता फारच थोडा काळ एकत्र प्रवास करू शकतात. केव्हा ना केव्हा तरी त्यांना आपापला स्वतंत्र रस्ता धरावाच लागतो. सत्ता हवी असेल तर केव्हा ना केव्हा कपोलकल्पित कहाण्या सांगाव्याच लागतात. जगाविषयी सत्य जाणून घेण्याची इच्छा असेल तर मात्र सत्ता सोडून द्यायची वेळ येईल. मग बऱ्याच गोष्टी मान्य कराव्या लागतील. उदाहरणार्थ, तुमच्या स्वतःच्या सत्तेचा किंवा सामर्थ्याचा स्त्रोत काय आहे? ते सांगावं लागेल. तसं केल्यामुळे तुमच्या दोस्तांना राग येईल, अनुयायी हिरमुसतील, सामाजिक सलोख्यात बिघाडही निर्माण होईल. आपण सत्तेची तळी उचलून धरायची की सत्याची उचलून धरायची? एकच कहाणी पढवून सर्वांना एकत्र आणायचं की लोकांची एकजूट न होण्याचा धोका पत्करूनही त्यांना सत्य सांगायचं? याच द्विधा मन:स्थितीनं इतिहासकाळापासून विद्वानांना त्रस्त करून सोडलं आहे. सर्वांत शक्तिमान विद्वत्पीठे मग ती ख्रिश्चन धर्मोपदेशकांची असोत, कन्फुशियस मंदारिनची असोत की, साम्यवादी विचारवंतांची असोत, त्यांनी सत्यापेक्षाही वरचं स्थान एकजुटीला दिलं म्हणूनच तर त्यांची ताकद एवढी वाढली.

एक प्रजाती म्हणून मानवांना सत्यापेक्षा ताकद किंवा सत्ता महत्त्वाची वाटते. जगाला समजून घेण्यात वेळ घालवण्याऐवजी आपण जगावर नियंत्रण लादण्याचा प्रयत्न करतो. अगदी आपण जगाला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हाही आपल्याला असंच वाटत असतं की, जगाला समजून घेतलं की त्यावर ताबा मिळवणं सोपं जाईल. म्हणूनच जिथं सत्याला सर्वश्रेष्ठ मानलं जाईल, दंतकथांकडे दुर्लक्ष केलं जाईल अशा समाजाचं स्वप्न तुम्ही पाहात असाल तर होमो सेपियन्स तुम्हाला निराश करतील. त्याऐवजी तुम्ही आपले चिंपांझींसोबत नशीब आजमावून पाहा कसे!

‘बनावट बातम्या ही गंभीर समस्या नाही’ किंवा ‘राजकारण्यांना आणि धार्मिक नेत्यांना धडधडीतपणे खोटं बोलण्याचा परवानाच मिळालेला  असतो’, असं म्हणण्याचा इथं अजिबात उद्देश नाही. पण त्याच वेळी सगळ्या बातम्या बनावटच असतात असा निष्कर्ष काढणं, सत्यशोधनाच्या प्रयत्नात अपयशच येणार असं समजणं, गंभीर पत्रकारिता आणि प्रचार यांच्यात काहीच फरक नाही असा निष्कर्ष काढणं हेसुद्धा चुकीचंच आहे की! सर्व बनावट बातम्यांच्या बुडाशी प्रत्यक्ष वास्तव आणि खऱ्या यातना दडपलेल्या असतात. उदाहरणार्थ, युक्रेनमध्ये रशियन सैनिक खरोखरच लढत आहेत, हजारो माणसं खरोखरच मेलेली आहेत आणि लाखो लोकांनी त्यांची घरं खरोखरच गमावलेली आहेत.

म्हणूनच ‘फेकुगिरी’ हेच सध्याचं चलनी नाणं आहे असं न म्हणता  समजून घ्यायला हवंय की, ही समस्या वाटते तेवढी साधीसुधी नसून खूप कठीण आहे. तसंच काल्पनिक काय आणि सत्यपरिस्थिती काय हे जाणून घेण्यासाठी अधिक कष्ट घ्यायला हवेत.

सगळं कसं अगदी योग्य त्याच प्रमाणात असेल, अशी अपेक्षाच मुळात करू नये. जग खूप गुंतागुंतीचं बनलेलं असतं हेच नाकारून, केवळ अत्यंत शुद्ध, पवित्र अशी सत्प्रवृत्ती विरुद्ध सैतानी खलप्रवृत्ती या दोनच बाजूंत ते विभागलेलं आहे असा विचार करणं हीच सर्वात मोठी ‘दंतकथा’ असते. कुठलाही राजकारणी पूर्ण सत्य सांगत नसतो. सत्य सोडून मी दुसरं काही सांगणार नाही, असं तो फक्त म्हणत असतो. तरीही काही राजकारणी इतरांपेक्षा बरेच बरे म्हणावे असे असतात. ब्रिटिश पंतप्रधान चर्चिल हेही सत्याचे फार खंदे पुरस्कर्ते नसले तरी निवडीचा पर्याय असेल तर मी स्टालिनपेक्षा चर्चिलवर अधिक विश्वास ठेवेन.

त्याचप्रमाणे पूर्वग्रह आणि चुका नसतातच असं एकही वृत्तपत्र जगात नसलं, तरी काही वृत्तपत्रं सत्य शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात तर बाकीची फक्त ‘ब्रेनवॉशिंग’ करणारी यंत्रं असतात हेही तितकंच खरं आहे. मी १९३०च्या दशकात असतो तर रशियन ‘प्रावदा’ किंवा जर्मन ‘स्ट्युर्मर’पेक्षा ‘न्यूयॉर्क टाईम्स’वर अधिक भरोसा करण्याची अक्कल मला असती असं मी आशा करतो.

आपल्या मनातील पूर्वग्रह दूर करणं, माहितीस्त्रोताची सत्यता तपासणं यासाठी वेळ आणि कष्ट दोन्ही देणं ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.

सगळ्यात पहिलं म्हणजे विश्वासार्ह माहितीसाठी पैसेही चांगले मोजायला हवेत. तुम्हाला कुठलीही माहिती फुकट मिळत असेल तर कदाचित तिचं लक्ष्य तुम्हीच असू शकता. समजा, एखाद्या लबाड अब्जाधीशानं तुम्हाला ऑफर दिली की, ‘मी तुम्हाला महिन्याला तीस डॉलर्स देतो आणि त्या बदल्यात तुम्ही दररोज एक तास तुमचा ‘ब्रेनवॉश’ करण्याची संधी मला द्यायची. त्यावेळेस मला हवे ते राजकीय आणि व्यावसायिक पूर्वग्रह मी तुमच्या मनात भरीन.’ तुम्ही ही ऑफर स्वीकाराल का? कुठलाच शहाणा माणूस स्वीकारणार नाही. मग हा धूर्त अब्जाधीश थोडीशी वेगळी ऑफर देईल – ‘रोज एक तास तुमचा ब्रेनवॉश करण्याची परवनागी तुम्ही मला द्याल आणि या सेवेच्या बदल्यात माझी फी म्हणून कसलेच पैसे मी लावणार नाही.’ आता अचानकपणे हा व्यवहार लाखो लोकांना मोहात पाडणारा ठरतो. परंतु  तुम्ही त्यांचं अनुकरण करू नका.

दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे समजा एखादा मुद्दा तुम्हाला प्रचंड महत्त्वाचा वाटतोय तर त्यासंबंधीचे शास्त्रीय साहित्य वाचण्याचे कष्ट घ्या. शास्त्रीय साहित्य याचा अर्थ  त्या विषयातील तज्ज्ञ संपादक मंडळाने निवडलेले लेख, सुप्रसिद्ध प्रकाशकांनी प्रकाशित केलेली पुस्तके आणि प्रतिष्ठित संस्थांमधील प्राध्यापकांनी केलेलं लेखन. शास्त्रांनाही मर्यादा असतात हे तर उघडच आहे. त्यांनी भूतकाळात काही गोष्टी चुकीच्या सांगितलेल्याही आहेत. तरीही शास्त्रज्ञमंडळी हाच कित्येक शतकांपासून आपला विश्वासार्ह ज्ञानस्त्रोत राहिला आहे. समजा, तुम्हाला वाटत असलं की शास्त्रज्ञ मंडळींचं कुठल्यातरी बाबतीत चुकतंय, तर तेही असू शकतं. परंतु जे शास्त्रीय सिद्धान्त तुम्ही नाकारत आहात, ते समजून घ्या आणि तुमच्या दाव्याच्या पुष्ट्यर्थ प्रयोगिक तत्त्वावरील पुरावा द्या.

शास्त्रज्ञांनी आणि अभ्यासकांनी वर्तमानकाळातील सार्वजनिक वादविवादांत सहभाग घेण्याची गरज आहे. जेव्हा वादविवादाचा रोख त्यांच्या ज्ञानप्रांतात जातो, मग तो प्रांत वैद्यकीय असो की इतिहासाचा असो, तेव्हा आपले म्हणणे मांडण्यास त्यांनी अजिबात कचरू नये. काहीच न बोलणे म्हणजे तटस्थता नसते तर ‘आहे त्या परिस्थिती’ला समर्थन देणे असते.

.............................................................................................................................................

मराठी अनुवाद- सविता दामले

savitadamle@rediffmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......