बाबूजी केवळ आडनावाने लोहिया नव्हते. खरंच लोहियावादी विचारांचे होते!
संकीर्ण - श्रद्धांजली
कपिल पाटील
  • डॉ. द्वारकादास लोहिया (७ सप्टेंबर १९३८-२३ नोव्हेंबर २०१८)
  • Wed , 28 November 2018
  • संकीर्ण श्रद्धांजली डॉ. द्वारकादास लोहिया Dwarkadasji Lohiya मानवलोक Manavlok

बाबूजी डॉ. द्वारकादास लोहिया गेले. वय ८१ होतं. आजाराशी ते झुंजत होते. जसे मराठवाड्यातल्या १९७२ च्या दुष्काळाशी ते झुंजले होते. १९७५ च्या आणीबाणीशी झुंजले होते. आणीबाणीत १८ महिने ते तुरुंगात होते. पण कधी हरले नव्हते. दुष्काळावरही त्यांनी मात केली. निसर्गाला नमवलं. पाणी साठवून दाखवलं. मृत्यूशी मात्र ते हरले. प्रत्येकालाच हरावं लागतं. तरीही प्रत्येक मृत्यू अस्वस्थ करतो. बाबूजींचं जाणं तर अधिकच अस्वस्थ करतं. बाबूजी काल रात्री उशिरा गेले. आज दुपारी त्यांच्या अंत्यसंस्काराला इच्छा असूनही पोचता आलं नाही. 

मराठवाड्यातले लोक अवघड क्षेत्रात राहतात. त्यात बाबूजींनी बीडमधलं आंबेजोगाई निवडलं. पाण्याची कायम नाराजी असलेला दुष्काळी जिल्हा. ऊसतोडणी कष्टकरी मजुरांचा जिल्हा. बाकी कोणतीही पिकं कापणं सोपं आहे, पण उसाचं पीक कापणं अवघड. प्रवासाची साधनं मराठवाड्यात अजून पोचताहेत. लातूरला ट्रेन तर आता आता पोचली. पाणी अजून पोचलेलं नाही. बाबूजींनी तोच ध्यास घेतला होता. सिंचनाचे त्यांनी अनेक प्रयोग केले. यशस्वी केले. पाणी साठवण्याचे व जिरवण्याचे हे प्रयोग बाबूजींच्या आणि ‘मानवलोक’च्या नावानेच ओळखले जातात. 

बाबूजी केवळ आडनावाने लोहिया नव्हते. खरंच लोहियावादी विचारांचे होते. पक्के समाजवादी. डॉ. राममनोहर लोहियांची त्रिसूत्री होती - मतपेटी, तुरुंग आणि फावडं. डॉ. द्वारकादास लोहियांनी तुरुंग आणि फावडं अधिक पसंत केलं. समाजवादी राजकारणातून ते कधीच दूर गेले नाहीत. पण निवडणुकीच्या प्रत्यक्ष रिंगणात उतरले नाहीत. सर्वपक्षात त्यांचे मित्र होते. गोपीनाथ मुंडेंशी त्यांचा खास दोस्ताना होता. अडचणीत दोघांनी परस्परांना खूप मदत केली. ऊसतोडणी मजुरांचे आणि ओबीसींचे नेते होते मुंडे. त्यात त्यांना बाबूजींच्या मदतीचा हात होता. मुंडेंच्या सहकाराच्या प्रयोगातही बाबूजींनी त्यांना साथ दिली. भाजपशी मात्र दुरुनही दोस्ताना केला नाही. दोस्ती आपल्या अजेंड्यावर त्यांनी ठेवली होती. 

.............................................................................................................................................

सविस्तर माहितीसाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

मजुरांच्या, दलितांच्या, शेतकऱ्यांच्या आणि कष्टकऱ्यांच्या प्रत्येक लढाईला बाबूजींची साथ होती. मराठवाडा विकास आंदोलनात तरुण लोहिया अग्रेसर होते. भ्रष्टाचारविरोधी मोहिमांमध्ये त्यांचा पुढाकार असे. वंचितांच्या प्रश्नावर तर ते रस्त्यावर उतरून संघर्ष करत.

बाबूजींचा पिंड रचनात्मक कामाचा अधिक होता. १९७२ च्या दुष्काळ विरोधी आंदोलनात उतरलेले बाबूजी दुष्काळ निवारणाच्या रचनात्मक कामात पुढे अधिक रमले. १ एप्रिल १९८२ ला ‘मानवलोक’ म्हणजे मराठवाडा नवनिर्माण लोकायत नावाची संस्था त्यांनी स्थापन केली. पाणी, शेती, आरोग्य, शिक्षण, स्त्रिया आणि गरीब हे त्यांचं कार्यक्षेत्रं होतं. संस्था पारदर्शी पद्धतीनं चालवली. संस्थेतल्या कार्यकर्त्यांना ताकद दिली. मोठं केलं. विकासाचे अनेक प्रयोग यशस्वी केले. छात्र भारती, राष्ट्र सेवा दल आणि शेतकरी संघटना या प्रत्येकाचं ‘मानवलोक’शी नातं आहे. पुरोगामी चळवळीतील अनेक संघटनांची शिबिरं ‘मानवलोक’नं चालवली. कार्यकर्ते घडवले. 

बाबूजींचं आमचं खास नातं आहे. छात्र भारतीच्या संस्थापक उपाध्यक्षा अणि आमच्या मार्गदर्शक डॉ. शैलाताई लोहिया यांचे ते पती. शैलाताई आणि डॉ. लोहिया यांची गाठ राष्ट्र सेवा दलात जमली. सेवा दलानं असंख्य धडपडणारे कार्यकर्ते दिले. लोहिया दाम्पत्य त्यापैकीच एक. शैलाताई धुळ्याच्या. न्यायमूर्ती प्रकाश परांजपेंच्या भगिनी. महिला चळवळीतील कार्यकर्त्या. मराठवाड्यात गेल्या आणि शेतकरी आणि मागासवर्गीय महिलांच्या दुःखाचा शोध घेत त्यांच्या जीवनात त्या आनंद फुलवत राहिल्या. त्यांची तिन्ही मुलं प्रा. अभिजीत, अनिकेत आणि प्रा. अरुंधती पाटील त्यांच्यासारखी निर्मळ, निरलस आणि निष्ठेनं काम करणारी. तिघंही माझे ‘छात्र भारती’तले दोस्त. छात्र भारतीच्या उभारणीत त्यांच्या अख्ख्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे. पण कोणताही बडेजाव या कुटुंबातील कोणत्याही सदस्यानं कधी केला नाही. 

शैलाताई आणि बाबूजी आता दोघंही नाहीत. म्हणून ‘मानवलोक’चं काम काही थांबणार नाही. त्यांची मुलं ते पुढे नेतील.

बाबूजी डॉ. द्वारकादास लोहिया यांना विनम्र अभिवादन!

.............................................................................................................................................

डॉ. द्वारकादास लोहिया यांच्या ‘मानवलोक’ या संस्थेविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा -

http://manavlok.org/

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......