ब्रेन टीझर कादंबरी
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
प्रमोद मुनघाटे
  • ‘खेळघर’चं मुखपृष्ठ आणि कादंबरीकार रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ
  • Sat , 22 October 2016
  • प्रमोद मुनघाटे रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ खेळघर Pramod Munghate Ravindra Rukmini Pandharinath Khelghar

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ यांच्या ‘खेळघर’ या कादंबरीची रचना काहीशी रुबिक्स क्यूबसारख्या खेळासारखी आहे. या खेळात वेगवेगळ्या रंगांचे चौकोन असतात. ते वेगवेगळ्या ठिकाणी असतात. एकाच रंगाचे चौकोन क्यूबच्या एकाच बाजूला आणले की, खेळ पूर्ण होतो.

‘खेळघर’ या कादंबरीत वेगवेगळ्या माणसांचे चौकोन आहेत. त्या त्या माणसांचा पूर्वेतिहास, त्यांचे स्वभाव, त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्यांनी वेगवेगळ्या काळांमध्ये वेगवेगळ्या चळवळींमध्ये केलेलं काम वेगवेगळ्या रंगाचं आहे. कादंबरीतील ही विविध रंगांची माणसं एका समान पातळीवर एकत्र आणणं, हे आव्हान लेखकानं स्वीकारलेलं आहे. लेखक त्यात बऱ्याच प्रमाणात यशस्वीही झाला आहे, असं म्हणता येईल.

या कादंबरीतील माणसांना स्वत:चं वैयक्तिक जीवन आहेच. स्वत:चे रागलोभ-आवडीनिवडीही आहेत, पण तरीही ते स्वतंत्र नाहीत. त्यांनी स्वत:हून कोणत्या तरी तत्त्वज्ञानाला, विचाराला, त्या विचारांच्या चळवळीला बांधून घेतलं आहे. त्या बांधीलकीतून त्यांची झालेली ससेहोलपट हाही या कादंबरीचा एक मुख्य विषय आहे. किंबहुना तोच खरा विषय आहे. या माणसांचं खासगी जीवन, त्यांनी निवडलेल्या चळवळींशी त्यांची तात्त्विक बांधीलकी, त्यातून निर्माण झालेले अनेक प्रश्न हे अर्थातच वेगवेगळ्या रंगांचे आहेत. ही माणसंही एकमेकात गुंतलेली आहेत. या वेगवेगळ्या रंगांचा गुंता सोडवण्यासाठी या कादंबरीत ‘खेळघर’ अस्तित्वात आलं आहे.

खेळाला नियम असतात. खेळ जिंकता येतो आणि हरताही येतं. नियम असतात म्हणून खेळाला गांभीर्य आहे, पण दुसऱ्या बाजूला जिंकायची सक्ती नाही, म्हणून तो खेळ आहे, युद्ध नाही. ‘खेळघर’मधील माणसं जीवनाच्या हेतूगांभीर्यानं खेळघरात एकत्र आलेली आहेत, पण तो अखेर खेळच आहे, याची त्यांना जाणीव आहे. अर्थात ही जाणीव लेखकाचीच आहे. म्हणून तो वेगवेगळ्या प्रवृत्तीची माणसं आणि वेगवेगळ्या चळवळी यांचे चौकोन एकत्र आणण्यासाठी त्यांची अदलाबदल करून ‘खेळघरा’च्या अनेक शक्यता आपल्यासमोर मांडतो.

‘खेळघर’ ही मुक्त स्त्री-पुरुषांच्या सहजीवनाची प्रत्यक्षात अवतरलेली एक प्रयोगशाळा आहे असं म्हणता येईल. सर्व प्रकारच्या कौटुंबिक, सामाजिक व सांस्कृतिक बंधनांनी काचलेल्या ‘स्व’ला एक मुक्तांगण हवं असतं. विवाहसंस्था आणि कृत्रिम अवांछित नातेसंबंधातून स्वत:ची मुक्ती आणि त्याच वेळी जगाला आपल्या विवेकी चळवळीतून बदलवण्याची घाई नसलेल्या समविचारी माणसांची ही छोटीशी वसाहत असते. परिवर्तन हीच आपल्या आयुष्याची इतिकर्तव्यता मानणाऱ्या या स्त्री-पुरुषांजवळ निखळ प्रेम आणि विवेकनिष्ठ जीवनशैली हेच भांडवल असतं.    

या कादंबरीच्या केंद्रस्थानी मैत्रेयी आहे. ती आपल्या आई-वडिलांपासून दूर गेलेली एक गुणवान व अतिशय मनस्वी स्वभावाची नटी आहे. तिच्या ‘खेळघरा’तील प्रवेशानं कादंबरीला प्रारंभ होतो. कॉम्रेड माधव कऱ्हाडकर हा तिचा बाबा तिला कायमचा सोडून गेलेला असतो. मागच्या पंधरा वर्षांत ती आपल्या बापाला भेटलेली नसते. त्यानं तिला कितीतरी पत्रं पाठवलेली असतात. आता मैत्रेयीसाठी त्याच्या काही डायऱ्या उपलब्ध असतात, ज्यातून तिला माधवच्या खेळघरापर्यंतचा प्रवास उलगडणार असतो.

माधव हा साम्यवादी चळवळीतील सक्रिय विचारवंत कार्यकर्ता असतो. लोकविज्ञान, आरोग्य, स्त्रीमुक्ती, पर्यावरण या चळवळीत माधवनं आपलं उमेदीतलं आयुष्य घालवलेलं असतं. मैत्रेयीच्या आईशी, शशीशी वेगळं होऊन स्त्रग्धरा या आपल्या चळवळीतील मैत्रिणीसह माधवनं ‘खेळघर’ची निर्मिती केली असते. माधवनं आपल्या डायरीत लिहिलेलं असतं, ‘‘नवरा-बायको किंवा अन्य नात्यांमधील पडझड ही एका व्यापक वसाहतीचा भाग आहे. माणूस-समाज, माणूस-निसर्ग ही सर्व नाती आता कोसळू लागली आहेत. स्वार्थ, वखवख, व्यक्तिगत अहंकार यांनी सर्व नात्यांना पोखरलं आहे. ही प्रक्रिया इतकी वैश्विक, सार्वत्रिक आहे की ‘माझ्या घरट्यात मी सुखी राहीन’ अशी अपेक्षा कुणालाच धरता येणार नाही.’’

या पार्श्वभूमीवर माधवनं सातपुड्याच्या डोंगरावर आपल्या पंधरा सहकाऱ्यांसह ‘खेळघर’ या वसाहतीची निर्मिती केलेली असते. मानवी नातेसंबंध (कुजू घातलेल्या कुटुबसंस्थेला पर्याय शोधणं) व पर्यावरण संवर्धन (परस्परपूरक जीवनशैलीचा विकास) या ध्येयानं ‘खेळघर’ ही प्रतिसृष्टी अस्तित्वात आलेली असते. माधवसोबत खेळघरात आलेली माणसं नातेसंबंधाच्या किंवा जोडीदाराच्या व्यावहारिक महत्त्वाकांक्षेच्या हव्यासापोटी खासगी आयुष्यात पोळलेली आहेत. मुक्त जीवन आणि विधायक परिवर्तनाच्या ध्यासानं झपाटलेली आहेत. सेवाग्रामच्या आश्रमात बालपण घालवलेल्या पटवर्धन काकापासून विविध महानगरांतील उच्चशिक्षित व्यावसायिक आहेत. नातेसंबंधांमध्ये निरागसपणे काही प्रयोग करण्याची त्यांची इच्छा आहे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांना व्यक्तिगत जीवनापासून सार्वजनिक जीवनात कसं नेता येईल, याचेही प्रयोग त्यांना करायचे आहेत. सामूहिक जीवनपद्धती व पर्यावरणपूरक जीवनशैली ही त्यांची साधनं आहेत. या प्रयोगात हवसे-नवसे येऊ नयेत यासाठी खेळघरमध्ये राहणाऱ्यांना काही नियम लागू केलेले आहेत. उदा. खेळघरमधील जमीन आणि अन्य सर्व संसाधनांवर सामूहिक मालकी राहील. मुलांचं संगोपन ही सामूहिक जबाबदारी असेल इत्यादी. अशा अटींमुळे केवळ हौस म्हणून आलेले लोक लगेच सोडून जातात.

ही कादंबरी एकाच वेळी रोमँटिक आहे, वास्तववादी आहे, स्वप्नरंजक आहे, सामाजिक आहे आणि तात्त्विक किंवा विचारप्रधान आहे. नेमकं वर्गीकरण करता येत नाही, हेच या कादंबरीचं खरं सामर्थ्य आणि यश आहे.

वस्तुत: कादंबरी म्हणजे जीवनाच्या वास्तव अनुभवावर रचलेलं दुसरं एक स्वतंत्र वास्तव असतं. त्यात लेखकानं कादंबरीच्या कथानकातून आणखी एक प्रतिसृष्टी साकार केली आहे. कादंबरीत वास्तवाचं चित्रण नसतं, तर कादंबरीकार वास्तवाची सर्जक रचना करत असतो, असं म्हणतात. त्याचा प्रत्यय इथं येतो. समकालीन जीवनाचा आवाका पेलण्याची आणि समग्र वास्तव कवेत घेण्याची क्षमता फक्त कादंबरीत कशी असते, तेही या कादंबरीत वेगवेगळ्या रूपात मांडलेल्या नोंदी सिद्ध करतात.

डायऱ्या, पत्रं, वर्तमानपत्रातील बातम्या, अग्रलेख आणि ‘खेळघर’च्या व्यवस्थापनाचा एक भाग म्हणून केलेल्या प्रत्येक घटना, प्रसंगांच्या नोंदी हा या कादंबरीच्या एकूणच निवेदनाचा मुख्य भाग आहे. कथानकाचा तो कणाच आहे. खेळघरातील घटना किवा उद्भवलेल्या पेचप्रसंगांबाबतची चर्चा, निर्णय आणि त्यावरील सर्व सदस्यांची मतं यांची नोंद अत्याधुनिक पद्धतीनं ठेवलेली असते. ज्यातून मैत्रेयीला (आणि वाचकांनाही) खेळघराच्या जडणघडणीचा आणि माणसांचा पूर्वेतिहास कळतो.

हा इतिहास जसा खेळघरमधील माणसांचा व त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचा आहे, तसाच तो साधारणत: १९६० नंतरच्या देशातील आणि महाराष्ट्रातील चळवळींचाही आहे. स्वातंत्र्यानंतर अनेकांचा अपेक्षाभंग या देशात झाला. जात, धर्म, वर्ण व वर्ग या प्रमाणेच भाषा, समूह, समाज, प्रदेश या पातळीवर अनेक प्रकारच्या विषमतांना तोंड द्यावं लागत आहे. लोकशाही-समाजवाद आणि विकास यांचा ताळमेळ जुळत नाहीये. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं तर दूरच राहिली, पण अनेक जातीजमाती, भटके आदिवासी पाणी, निवास, शिक्षण आणि आरोग्यापासून आजही वंचित आहेत. धरणं, कारखाने, औद्योगिक वसाहती यातून देशाचा महासत्तेकडे चाललेला प्रवास एका बाजूला तर दुसरीकडे भांडवलशाहीमुळे विस्थापित आदिवासी, आत्महत्याग्रस्त शेतकरी, बेरोजगार तरुण, प्रदूषित बकाल झोपडपटट्या आणि भग्नावस्थेत असलेली खेडी हे चित्र आहे. अशा विसंगत पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी फुटिरतावादी गट, दहशतवादी, नक्षलवादी व माओवादी उदयास न आले तरच नवल.

या देशातच नव्हे तर जगाच्या पाठीवर विचारांच्या व कृतीच्याच पातळीवर नव्हे, तर अस्तित्वाच्या पातळीवर उजवे आणि डावे अशी दुफळी निर्माण झालेली दिसते. साम्राज्यवादी, भांडवलवादी, मूलतत्त्ववादी एकीकडे आणि समाजवादी, साम्यवादी व उदारमतवादी लोकशाही दुसरीकडे. काहींना परिवर्तन हवं आहे, तर काहींना ते नको आहे. परिवर्तनासाठी प्रयोगशाळा आणि गृहितकं हवी आहेत. भारतात आणि महाराष्ट्राच्या प्रयोगशाळांमध्ये ही गृहितकं जशी मार्क्स-लेनिन यांनी पुरवली, तशी कधी महात्मा गांधी, विनोबा, जयप्रकाश नारायण यांनीही पुरवली. त्यातून स्त्रिया, भटके, दलित व अदिवासी यांच्या शोषणाविरोधात वेगवेगळ्या पातळींवर काम करणाऱ्या चळवळी निर्माण झाल्या. लेखक, पत्रकार व डॉक्टर, इंजिनिअर्स प्राध्यापकांपासून तर विद्यार्थ्यांनी केलेल्या चळवळी महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनाचा एक भाग झाल्या होत्या. चळवळींच्या उद्दिष्टांबरोबरच चळवळींच्या कार्यप्रणालीचा प्रभाव कार्यकर्त्यांच्या वैयक्तिक जीवनावरही झाला. त्यातून उदभवलेले ताणतणाव हेही स्त्री-पुरुषसंबंधाच्या व नातेसंबंधाच्या परंपरांना आव्हान देणारे ठरले.

१९९० नंतरचं खाउजा आणि बाबरी मशीदचं प्रकरण, त्यानंतरच्या धार्मिक दंगली व बॉम्बस्फोट यामुळे मूळ प्रश्न आहे तिथंच राहिले. राजकारणाला नवी पार्श्वभूमी मिळाली. त्यातून पुढे आलेल्या नव्या समस्या जुन्या चळवळींपुढे आव्हान म्हणून उभ्या राहिल्या.  हे सगळं ‘खेळघर’मध्ये वेगवेगळ्या रूपात येतं. कधी डायरीमध्ये, कधी बातम्यांमध्ये, पण ते पात्रांच्या आयुष्याशी एकजीव होऊनच येतं. चळवळीतील मतभेद, भ्रमनिरास किंवा राजकारणाला बळी पडलेली माणसं आहेत ती. काळाच्या आव्हानांमुळे चळवळीतील कार्यकर्त्यांचाही अपेक्षाभंग होतो. त्यात दोष कुणाचाच नसतो. विशेषत: मार्क्सवाद आणि साम्यवादाचं तत्त्वज्ञान व स्थानिक प्रश्न यात विसंवाद निर्माण होणं, हे एक महत्त्वाचं कारण. देशातील धार्मिक दंगली, बेरोजगारी, स्थानिक उद्योग व स्थानिक सामाजिक-सांस्कृतिक पर्यावरण, जातिसंस्था व स्त्री-पुरुष संबंध यांचा मेळ क्रांतीच्या पारंपरिक तत्त्वज्ञानाशी होत नाही. त्यामुळे नैराश्याने ग्रासलेले कार्यकर्ते व्यक्तिगत आयुष्यातही निराधार झाल्याचा अनुभव घेत असतात.

 ‘खेळघर’च्या आश्रयाला आलेली माणसं किंवा नवा जोडीदार घेऊन आलेली जोडपी बहुधा अशीच आहेत. ‘खेळघर’मध्ये कोणत्याच पारंपरिक तत्त्वज्ञानाची चौकट नाही. नातेसंबंधाचा पारंपरिक ताण नाही. पुरुषप्रधानता किंवा योनिशुचिता यांचा काच नाही. पण पर्यावरणस्नेही नैतिक मूल्यांचं अधिष्ठान आहे. अशा खेळघराच्या आश्रयाला सगळे येतात असं नव्हे, तर ते त्या रूपात आपल्या नव्या जगाची उभारणी करतात. ती फँटसी मुळीच नाही. उदात्त जीवनमूल्यांच्या प्रेरणेनं शक्यतेच्याच कोटीतील वास्तवाची केलेली सर्जनशील निर्मिती आहे.

खेळघर -  रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, मनोविकास प्रकाशन, पुणे, पाने – २८६, मूल्य – २९० रुपये.

 

लेखक नागपूर विद्यापीठात प्राध्यापक आहेत.

pramodmunghate304@gmail.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......