करण जोहरनं या पुस्तकात जे सांगितलंय, ते खरं सांगितलंय! जे नाही, ते नाही!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
आसावरी चिपळूणकर
  • खरं सांगायचं तर’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 08 June 2018
  • ग्रंथनामा Granthnama शिफारस खरं सांगायचं तर Khara Sangaycha Tar अ‍ॅन अनसुटेबल बॉय An Unsuitable Boy करण जोहर Karan Johar

‘अ‍ॅन अनसूटेबल बॉय’ हे करण जोहरचं पुस्तक सध्या चांगलंच चर्चेत आहे. केवळ तो स्वत: ग्लॅमरस जगतातला बहुचर्चित दिग्दर्शक आहे; म्हणून नव्हे, तर त्याच्या व्यक्तिमत्त्वाविषयी उत्सुकता निर्माण करण्यात तो यशस्वी झाला आहे म्हणून. ‘खरं सांगायचं तर’ हा त्याच्या पुस्तकाचा अनुवादही अप्रतिम असून, तो आवर्जून संग्रही ठेवावा, असाच झाला आहे.

बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतील एखाद्यानं समजा असं म्हटलं की, मी जवळपास एक वर्ष करिना कपूरशी बोलत नव्हतो. तेही तिनं जास्त मानधन मागितल्यामुळे किंवा कुणी म्हटलं, की मी अमिताभ व जया बच्चन, शाहरूख खान, काजोल, हृतिक रोशन आणि करिना यांना एका दिवसात स्वत:च्या सिनेमासाठी ‘साइन’ केलं, तर या गोष्टी आता अशक्यप्राय वाटाव्या अशाच आहेत. एक तर आता करिनानं लग्न आणि मूल झाल्यानंतरही तिचं जे ‘स्टेटस’ सांभाळलं आहे, त्यामुळे तिच्याशी न बोलण्याची कुणी हिंमत करणार नाही आणि बॉलिवूडमधील गेल्या काही वर्षांतील बदललेल्या समीकरणांनुसार या सहा ‘बिग स्टार्स’ना एकत्र एका सिनेमासाठी करारबद्ध करणं ही गोष्ट स्वप्नवत वाटेल. मात्र, ही करामत एके काळी फिल्म इंडस्ट्रीत नव्यानं जम बसवू पाहणाऱ्या एका दिग्दर्शकानं केली आणि तो आहे ‘धर्मा प्रॉडक्शन्स’चा सर्वेसर्वा आणि खऱ्या अर्थानं ‘बोलका’ दिग्दर्शक करण जोहर!

स्वत:बद्दल पुस्तक लिहायला घेतल्यानंतर एखाद्यानं स्वत:विषयी किती सांगावं, याला काही मर्यादा राहत नाही; पण पडद्यावर साकारणारी प्रत्येक कथा स्वत: लिहिणारा हा माणूस फक्त दिग्दर्शक आणि लेखकच नाही, तर उत्तम ‘कथाकथनकार’ही आहे. फिल्म इंडस्ट्रीत हीच गोष्ट सगळ्यात महत्त्वाची असल्याचं आता ‘सुपरस्टार्स’नाही चांगलंच उमगू लागलं आहे. करणनं मात्र कुठेही वाहवत न जाता ‘द अनसूटेबल बॉय’ हे पुस्तक पूनम सक्सेना या पत्रकार-लेखिकेसह लिहिलं आहे. यात सगळ्यांत जास्त भावणारी गोष्ट म्हणजे करणचा प्रत्येक शब्दाशब्दातून जाणवणारा प्रांजळपणा!

ज्याला शाळेत ग्रुपमध्ये जायची आणि कुणाशी बोलायचीही भीती वाटायची, जो एकटा एकटा राहायचा, स्वत:च्या ‘बायल्या’ असण्याचा सतत संकोच बाळगायचा, कुणी ते जाणवून दिल्यावर आणखीच कोषात जायचा, अशा मुलाचा प्रत्येक शब्द ऐकण्यासाठी आता फक्त सर्वसामान्य लोकच नाहीत, तर इंडस्ट्रीतील कलाकारांचेही कान आसुसलेले असतात. ज्याच्या आईनं आपल्या मुलाच्या चांगल्या भवितव्यासाठी त्याला बोर्डिंग स्कूलमध्ये घालण्याचा हट्ट धरला, ज्याला एकटेपणामुळे आणि नैराश्यामुळे सतत भूकेची जाणीव व्हायची आणि त्यामुळे प्रचंड खात राहून ज्यानं वजन वाढवून घेतलं, तो आई-बाबांच्या प्रेमाचा भुकेला आणि आईपासून दूर राहण्याची कल्पना सहन न होऊन बोर्डिंगमधून पळून जाणारा हाच मुलगा आता उत्तम वक्ता आणि एका भल्या मोठ्या प्रॉडक्शन हाऊसचा सर्वेसर्वा म्हणून ओळखला जातो. बोर्डिंग स्कूलच्या दिवसांचा संदर्भ देऊन करणनं ‘तारे जमीं पर’मधल्या मुलाचं काम पाहून रडू आल्याचंही म्हटलंय. आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर परिस्थिती बिनसल्याचं जाणवलं, तर मी आजही रडून मोकळा होतो, हे त्याचे उदगार रडणं ही भावनाच अमान्य करणाऱ्या आजच्या समाजाला अंतर्मुख करणारी आहे.

करण जोहरनं या पुस्तकात फक्त दिग्दर्शक होण्यापर्यंतचा किंवा इंडस्ट्रीतील कारकिर्दीविषयीचाच आलेख मांडला आहे, असं नाही, तर लहानपणी तो कसा होता, शाळेत ‘इंटरॅक्ट क्लब’ नावाच्या एका क्लबमधील मित्र डॉरिसच्या प्रोत्साहनामुळे त्याच्यातील उत्तम बोलण्याचा गुण त्याला कसा उमगला, आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा त्याच्या आयुष्याला वळण देणारी कशी ठरली, आपण काहीच करू शकत नाही, या विचारानं खिन्नता आलेल्या या मुलाला आयुष्यात पहिल्यांदा स्पर्धेत विजेतेपद मिळाल्यावर तो संपूर्ण शाळेच्या चर्चेचा विषय कसा ठरला; तरीही त्याला लोकांनी ‘बायल्या’ असं चिडवल्यानंतर त्याचा आत्मविश्वास कसा डळमळायचा आणि ते हातवारे किंवा हावभाव वागण्यातून काढून टाकण्यासाठी त्यानं डिसूझा या दाम्पत्याशी कशी मदत घेतली, असे अनेक आयुष्यातले अनेक संवेदनशील टप्पे करणनं सविस्तरपणे या पुस्तकात मांडले आहेत.

सिनेमे पाहण्याच्या त्याच्या आवडीमुळे तो उत्तम आस्वादक झाला, त्याचा मित्र आदित्य चोप्रानं त्याला त्याच्यात दडलेल्या सिनेमाच्या सच्च्या चाहत्याची जाणीव करून दिली आणि तो पॅरिसला पुढचं शिक्षण घ्यायला निघाला असताना ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या सिनेमासाठी असिस्टंट म्हणून काम करण्याची ऑफर दिली. परदेशी जाण्यासाठी खर्च केलेले जवळपास १० लाख रुपये केवळ मुलाच्या आनंदासाठी विसरून जाण्याचा त्याच्या वडिलांनी अर्थात यश जोहर यांनी दाखवलेला मोठेपणा, या गोष्टी करणनं फार अप्रतिम पद्धतीनं लिहिल्या आहेत.

एखाद्या विषयात अनुत्तीर्ण होऊ, या केवळ विचारानंच थेट आत्महत्या करणाऱ्या हल्लीच्या मुलांना तर करणच्या बालपणातून खूप काही शिकण्यासारखं आहे. आपल्या मुलाला एखाद्या विषयात गती नसेल, तर त्याला त्याच्या आवडीचं काही करून पाहू देण्याची मुभा देणारे पालक करणच्या घरात असल्यामुळे तो कुठल्याच अर्थानं ‘वाया’ गेला नाही. आई-वडिलांनी आपल्यासाठी केलेल्या कष्टांची जाणीव सदैव मनात जागी ठेवणारा करण आपल्याला पुस्तकाच्या पानापानांतून हेलावल्याशिवाय राहत नाही. दिग्दर्शक म्हणून त्याच्या धडपडीचा प्रयत्नही त्याला बरंच काही शिकवणारा ठरला, हे सांगताना त्याच्या अनुभवातून वाचक म्हणून आपल्यालाही स्फूर्ती मिळते.

त्याच्या वडिलांचं चटका लावून जाणारं निधन, शाहरूख खान म्हणजे त्याचं असलेलं दुसरं कुटुंब, त्याच्या खांद्यावरची ‘धर्मा’ची जबाबदारी, ‘कॉफी’बरोबरचा त्याचा आयुष्यातील रंगतदार प्रवास आणि त्याचे प्रेम, सेक्स आणि नातं याविषयीचे मोकळे विचार, असं सर्व काही या पुस्तकातून करणनं जीव ओतून लिहिलं आहे. सांगायला घेतलेली एकही गोष्ट लपवाछपवी न करता मांडत गेल्यामुळे त्याचं हे सांगणं अगदी कट्ट्यावर बसून एखाद्या मित्रानं गप्पा मारताना सहजपणे सांगावं, तसं झालं आहे आणि म्हणूनच ते सगळ्या वयोगटातील लोकांना तितक्याच मित्रत्वाच्या नात्यानं आपलंसंही वाटेल.

आज ‘नेपोटिझम’सारख्या त्याच्या एखाद्या पवित्र्यामुळे (स्टँड घेण्यामुळे) तो काहीसा टीकेचा धनी झाला असला, तरी पुस्तकातून डोकावणारा त्याचा प्रामाणिकपणा कुणीच नाकारू शकत नाही. कुठे काय बोलायचं नाही, हेही त्याला चांगलंच कळतं. ती कला त्यानं पुस्तकातही अर्थातच जपली आहे. त्यामुळे जे सांगितलंय, ते खरं सांगितलंय; पण म्हणून स्वत:बद्दल सगळं काही सांगितल्याचा दावा स्वत: करणचाही नाही. त्यानं स्वत:चं काही जणांसह असलेलं नातं थेट उघड केलेलं नाही. पण ते होतं, हे लपवलेलंही नाही. ‘कल हो ना हो’सारखा सिनेमा स्वत: लिहूनही दुसऱ्या व्यक्तीला त्याचं दिग्दर्शन करायला दिल्यावर दिग्दर्शक म्हणून तो स्वत:चं अंग त्यातून काढून घेऊ शकला नाही. त्यामुळे निखिल अडवाणीबरोबर त्याचे झालेले सेटवरील मतभेद खरं तर कायमस्वरूपी भांडणात रूपांतरित होऊ शकले असते; पण तसं झालं नाही. करिनाच्या करिअरच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यात तिनं शाहरूख खानएवढं मागितलेलं मानधन न देण्यामुळे करण आणि करिनात निर्माण झालेला अबोलाही पुढे टिकला नाही. पण म्हणून ‘पाण्यात राहायचं, तर माशाशी वैर धरून चालत नाही,’ या न्यायानंच करण वागला किंवा वागत आहे, असं कुणी म्हणेल, तर ते फारसं योग्य नाही. त्याच्या वडिलांच्या चांगुलपणातला काही भाग तरी मुलगा म्हणून नक्कीच त्याच्यापर्यंत आला आहे आणि त्याचा हाच चांगुलपणा त्याला आजही तारून नेत आहे. इंडस्ट्रीत येण्याचं कुठलंही रुढार्थानं स्वप्न पाहिलेलं नसताना जो मुलगा एकदा पाण्यात पडल्यानंतर जीव तोडून पोहतो आणि याचसाठी आपला जन्म झाल्याचं त्याचं त्यालाच जाणवतं, तसा काहीसा करण जोहरचा प्रवास आहे. तो अतिशय आकर्षक आहे, लक्षवेधी आहे आणि अविस्मरणीयसुद्धा!

रोहन प्रकाशनतर्फे प्रकाशित झालेला आणि नीता कुलकर्णी यांनी केलेला ‘खरं सांगायचं तर’ हा अनुवाद उत्तम जमून आला आहे. अनुवादातही करणचा प्रांजळपणा पुरेपूर उतरला आहे.

.............................................................................................................................................

करण जोहर यांच्या या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4370

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

ranjit p

Sat , 09 June 2018

पुस्तकाचे नाव 'द सुटेबल बॉय' असे नसून 'अॅन अनसुटेबल बॉय' असे आहे. असो.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......