आम्ही दुसरा हमीद उभा करू शकलो नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे; पण आम्ही शेवटपर्यंत काम करू
ग्रंथनामा - झलक
मेहेरुन्निसा दलवाई
  • मेहेरुन्निसा दलवाई आणि त्यांचं आत्मचरित्र- ‘मी भरून पावले आहे’
  • Fri , 09 June 2017
  • ग्रंथनामा Granthnama झलक मी भरून पावले आहे Mi Bharun Pawale Ahe मेहेरुन्निसा दलवाई Meherunnisa Dalwai हमीद दलवाई Hamid Dalwai साधना प्रकाशन Sadhana Prakashan

हमीद दलवाई यांच्या पत्नी आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या माजी अध्यक्ष मेहेरुन्निसा दलवाई यांचं काल पुण्यात निधन झालं. त्यांचं ‘मी भरून पावले आहे’ हे आत्मचरित्र १९९५ साली प्रकाशित झालं. नुकतीच त्याची पाचवी आवृत्ती साधना प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केली आहे. त्यातील शेवटच्या प्रकरणाचा हा संपादित अंश.

.................................................................................................................................................................

आमच्या घरामध्ये फार धार्मिक वातावरण नव्हतं. सुरुवातीला मी कधी तरी म्हणजे ईदेबिदेला नमाज पढायची, शिरखुर्मा करायची. नवे कपडे वगैरे घालायची. ईद साजरी करारची. नंतर आमच्या मुली गेल्या होस्टेलमध्ये. हे नसायचे. हे दौऱ्यावर. मग एकट्याने कशी ईद करारची? म्हणून हळूहळू ईद पण बंद झाली. मुलींना होस्टेलवर ठेवल्यावर मलासुद्धा ईद करणं जड जायला लागलं. शिरखुर्मा खाताना आठवण यायची मुलींची. तेव्हा मी यांना सांगितलं का, “मुली घरात असतील तर शिरखुर्मा, ईद वगैरे; नाही तर नाही. काही करणार नाही मी.” हे म्हणाले, “ठीक. तुझा संसार आहे नं? तू म्हणशील तसं. मला काही नाही.” पण मुली आणल्यानंतर ते म्हणायचे, “चला, आता मुली आलेल्या आहेत. शिरखुर्मा खायचा.” मग आम्ही दोन-चार वेळेलासुद्धा खात असू. त्या वेळी ईद आमची. पण दलवाई गेल्रानंतर मी घरात ईद करायची नाही असं ठरवलं. का ठरवलं, सांगते. कारण प्रत्येक ईदला मुली घरात असतातच, असं नाही. पण महिलांमध्ये मी जेव्हा काम करायला लागले, तेव्हा ईदच्या दिवशी मी त्या महिलांच्या घरी जायची. कोणी आजारी असे त्यांच्याकडे जायची आणि त्यांनी शिरखुर्मा वगैरे केलेला असायचा. त्या म्हणारच्या, आपा आयी. अन् एका प्यालामध्ये चार चमचे ठेवारच्या आणि सगळ्या घरातल्या लोकांनी एकेक चमचा खायचा. त्यांच्याबरोबर मी खायची आणि अशा रीतीने त्या बायकांबरोबर मी ईद मनवून यायची. ही प्रथा मी अजून चालू ठेवलेली आहे. त्यामुळे काही घरांत काही केलेलं नसलं तरी ते लोक म्हणायचे, ‘नही, आपा आएगी. बोलेगी ना की, मेरे लिए शिरखुर्मा भी नहीं बनाया. आपा अपने घरमें कुछ नहीं करते.’ अशा रीतीनेसुद्धा त्या बायका माझी वाट बघतात.

आम्ही मंडळाचं काम करतो म्हणून त्यांना काही आम्ही असं सांगत नाही की- नमाज पढू नका, रोजे ठेवू नका, देवाची प्रार्थना करू नका! का, तर आम्ही काय करतो? धर्माचे दोन भाग करतो. एक इबादतचा. यात सगळ्या गोष्टी येतात; ज्या मला वाटतं की, पर्सनल आहेत. आपल्याला दुसऱ्याला बोलण्याचा काही अधिकार नाही आणि मलासुद्धा कोणाला विचारण्याचा अधिकार नाही की, मी नमाज पढते का नाही! हा माझा प्रश्न आहे. तो तुमचा प्रश्न. पण दुसरी बाजू आहे आदतची. समाजाबरोबर जायचं असेल, तर ती बदलायची का नाही बदलायची? बरं, एक गोष्ट आणखी आहे- हे आपल्या धर्माच्या विरुद्ध आहे, ते धर्माच्या विरुद्ध आहे, असं म्हणून कसं चालेल? एखादी गोष्ट जर मुसलमानांच्या धर्माच्या कल्पनेत बसत नसेल, म्हणजे विरुद्ध जात असेल; तर मग ती हाती घ्यायची की नाही घ्यायची? आणि जर ते बायकांवर अन्याय करणारं असेल, तर धर्माला बाजूला ठेवायचं की नाही ठेवायचं? मला वाटतं, धर्म हे क्षेत्र आमचं नाहीये. मुल्ला-मौलवींचं आहे, पंडितांचं आहे; तर त्यांनी त्याबद्दल बोलावं. त्यांना त्याच्यात काय करायचं आहे, ते ठरवावं त्यांनी. पण लोकांना प्रेशराईज करू नये. त्यांच्यावर लादू नये. त्यांनी धर्माच्या नावावर अन्याय करू नये. धर्माच्या नावावर आम्हाला न्यायसुद्धा नको. का, तर धर्माच्यामध्ये एकदा का आपण शिरलो तर इतकं खोलवर जाऊ- जसं चिखलात आपण रुतलो तर निघणं कठीण होईल, तसं होणार. म्हणून धर्म आपलं क्षेत्र नाही. त्याची बेअदबी जर करायची नसेल, तर धर्म बाजूला ठेवावा नि आपण सामाजिक न्याय मागावा. किंवा आपल्या घटनेत जे अधिकार आपल्याला दिलेले आहेत, ते का आपल्याला मिळू नयेत? आपण भारतीय आहोत की नाही? मग आपल्या धर्माच्या आधारावरच आपल्याला न्याय मागायची काय गरज आहे?

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं नवंकोरं पुस्तक 

‘मोदी महाभारत’ प्रकाशित झालं...

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

आता बाईवर अन्याय होतो. बाईवर का, तर हिंदूंची परंपरा १५० वर्षांची आहे. महात्मा फुल्यांपासून. त्या मानानं या १५० वर्षांत हिंदू महिला इतक्या पुढं गेलेल्या आहेत का, काळाच्या अनुषंगानं? मग आमच्या तर जास्त अडाणी असल्यामुळे, शिक्षण-पैसा नसल्यामुळे, गरिबीमुळे, घरच्या वातावरणामुळे २०० वर्षे घेतील. आणि मी नाही म्हणत का, मी मरायच्या आधी सगळं होईल. असं कोणी नाही म्हणत. परंपरा चालू करायला पाहिजे. आमच्याकडे परंपरा कुठे आहे? तर सर सय्यद अहमद खान होते शिक्षणक्षेत्रामध्ये, ज्यांनी अलिगढ युनिव्हर्सिटी काढली. पण ती ज्या हेतूनं काढली, तो काही साध्य झाला नाही. त्यांना असं वाटलं का- दुसऱ्या समाजाबरोबर आपला मुसलमान समाज जावा, त्यानं चांगलं शिक्षण घ्यावं. पण त्यांचा हेतू काही साध्य झालाच नाही. अलिगढला त्यांनी वुमेन्स कॉलेज काढलं. तिथं महिला आहेत. शिकतात. बड्या डिग्ऱ्या घेतात. पण तिथंसुद्धा त्या महिला चार भिंतींच्या आतच आहेत. तिथून बाहेर पडलेल्याच नाहीत. बाहेरचं जग त्यांना माहितीच नाहीरे. त्यांना गरज पण नाहीये. नसीमा अन्सारी- सोशल वर्कर. आम्ही तिला भेटलो होतो ना, तिनं हे सगळं सांगितलं. तिनं हे आम्हाला दाखवलं नेऊन. शिक्षण मिळालं तरी वृत्ती बदलली नाही.

आम्ही जे काम करतो ना, ते लोकांचे विचार बदलण्याचं काम करतो. आमची मुस्लिम सत्यशोधक संघटना ही विचारांवर चालणारी आहे; मेजॉरिटीवर, संख्येवर चालणारी नाही. त्यामुळे आमच्यामागे संख्या नसणारच. घरातली चार माणसं तरी एकाच विचाराची असतात का? आपली मुलं तरी आपल्या विचारांची असतात का? मग परक्याना जमा करायचं, त्यांचे विचार बदलायचे- हे सोपं काम नसतं. बरं, याच्यात त्यांना काही पैसा मिळणार आहे का? इलेक्शन आहे, ५-५ रुपये दिले, माझ्या नावावर व्होट टाक म्हणून - तसं नाहीय. त्यामुळे विचारांनी आपल्यामागं येणारी पाच माणसं जरी असली, तरी ती माणसं आपण शिकवू शकलो याचं समाधान आम्हाला आहे. त्यामुळे आमच्यामागे खूप संख्या नाही.

पण काम आम्ही केले आहे. एखाद्या वेळेस दलवाई असते, तर चित्र वेगळं असतं. त्यांच्या कामाची पद्धत वेगळी होती. आम्ही पुरे पडू शकलो नाही. का, तर त्यांच्यासारखं डोकं पण आमच्याजवळ नाही, हुशारी नाही. शिक्षण त्यांच्याजवळ खूप नव्हतं. फर्स्ट इयरपर्रंत शिकले होते. पण वाचन खूप होतं. माहिती खूप होती. मुसलमान लोक म्हणायचे, डिग्री होल्डर आहे का तो? तो ग्रॅज्रुएट आहे का? त्याला काय आहे ऑथॉरिटी आमच्यावर बोलायची? पण ते अपुरे पडायचे नाहीत. दलवाईंना धार्मिक शिक्षण पण खूप होतं. नमाज कसे पढायचे माहिती होतं. कुराण सगळं वाचलेलं होतं. कुराणामध्ये कुठल्या आयतीत काय आहे, हे दलवाई बोलत होते. गरवीबिरवी आमच्याकडे पढतात ना, ते काही आमच्याकडे सगळ्या लोकांना येत नाही. पण हे हॉस्पिटलमध्ये असताना आमचे नातेवाईक यायचे ना, तेव्हा हे टिंगल करून हसत-हसत डोळा इकडे मारायचे नि गरवी पढून दाखवायचे. असं किती वेळा झालेलं आहे. धर्माचा सगळा अभ्यास करून मग बोलायचे. मुल्ला-मौलवींपुढे बोलायची हिंमत होती. दोन-तीन गुप्त मीटिंगा झाल्या मुसलमानांच्या आणि त्याच्यात ते बोलले. इतर मुस्लिम त्यांच्याबरोबर ओपनली बोलायला, बसायला तयार नव्हते. आज जे आम्हाला लोक सांगतात ना, तुम्ही मुल्ला-मौलवींच्याबरोबर बसा; तर आम्ही काय म्हणतो, धर्म आमचं क्षेत्र नाही आणि आम्हाला त्याच्यात घुसायचं नाही. बोलायचं पण नाही. आम्हाला काही गरज पण नाहीये ते करारची. पण दलवाईंनी तसा प्रयत्न केला होता. मीटिंग घेतली तरी ते मुसलमान कोणी बोलायला तयार नव्हते. बोलायला तर हवं नं?

‘याला काय समजतंय? हा कोण बोलणारा?’ चर्चा अशा झाल्याच नाहीत. ह्या चर्चा त्या वेळी झाल्या पाहिजे होत्या की नाही? पण झाल्या नाहीत. म्हणजे दलवाईंनी या पद्धतीनं काम केलं असतं. पण आम्हाला ते जमत नाहीये. आमची ताकद कमी पडते, हे आम्हाला मान्य करायलाच पाहिजे. पण आमच्यात जिद्द आहे. आम्हाला वाटतेय आमच्या समाजाबद्दल आस्था. हे आम्ही का करतो? मुसलमानांचे शत्रू आहोत म्हणून करतो काय? मी मुसलमान आहे. मला अभिमान आहे का, माझा समाज माझा आहे. मला त्याची चिंता वाटते. समाजाला मदत करावी म्हणून मी काम करते, का मला त्याचा द्वेष वाटतो म्हणून मी काम करते? प्रेमापोटी करतेय. नि दुसरी गोष्ट अशी आहे का, समाजामध्ये मेजॉरिटी आहे ती गरिबांची आहे. त्यांचा धर्माशी काही संबंध नाही. धर्म किती पाळतात? नमाज पढणं, रोजे ठेवणं, जकात देणे, ईद आली का नवे कपडे शिवणं, शिरखुर्मा खाणं- एवढाच धर्म सगळ्यांचा.

मला काही लोक असं विचारतात की, हमीद दलवाईंनी दहन का करून घेतलं? दहन करून घेतलं म्हणून ते हिंदूच होते, असाही प्रचार केला जातो. दलवाईंनी दहन करून का घेतलं, हे त्यांनी आपल्या मृत्रुपत्रामध्ये लिहिलेलं आहे. ते नास्तिक होते. कोणत्याही धार्मिक संप्रदारावर त्यांचा विश्वास नव्हता. कुठलाही पारंपरिक धर्म ते पाळत नव्हते.

दहन केल्यामुळे ते हिंदू कसे होतात? दहनक्रियेच्या आधी किंवा नंतर कुठलाही धार्मिक विधी झाला नाही. शिवार दहन करवून घेणारा हिंदूच असतो, हे खरं नाही. बऱ्याच मुसलमानांची दहन करवून घेतल्याची उदाहरणं आहेत. जसे- छगलासाहेब, इस्मत चुगताईबाई, ए. आर. ए. बेगसाहेब, हिदारतुल्लासाहेब आदी.

दुसरी गोष्ट अशी- मेल्यानंतर दहन करायचं का दफन करारचं किंवा आपलं शरीर हॉस्पिटलला दान द्यायचं, हे ठरवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे आणि तो अधिकार आम्ही मानतो. मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे कार्यकर्ते नमाज पढणारे आहेत, रोजे ठेवणारे आहेत, कुराणाचे पठण करणारे आहेत, आस्तिक आहेत. आमच्या घटनेमध्ये मंडळाचा सभासद होण्याकरता नास्तिक असण्याची जरुरी नाही. शरीयत कायदा टाकाऊ म्हणणारे प्रा. फैजी हे धार्मिक होते. पण ते आपला धर्म आपल्या घरात आणि मशिदीत पाळीत.

तेव्हा हमीद दलवाईंनी दहन करून घेतलं, हे त्यांच्या वैयक्तिक मताप्रमाणे झालं. कारण त्यांच्या वैज्ञानिक दृष्टीमुळे सर्वच पारंपरिक धर्मांनी सांगितलेल्या स्वर्ग, नरक, पुनर्जन्म या कल्पना किंवा मरणोत्तर जीवन यावर दलवाईंनी कधीही विश्वास ठेवलेला नाही आणि ते स्वत:ला मुसलमानच म्हणवून घेत असल्यामुळे पारंपरिक इस्लाममधील दफन करण्यामागे असलेली भूमिका त्यांना नाकारायची होती. म्हणून त्यांनी त्या पद्धतीने आपलं शरीर कबरीमध्ये न पुरता त्याचं दहन करावं, असा निर्णय घेतला. मात्र मला असं वाटतं की- दलवाईंची मानवतावादी भूमिका पाहता, त्यांना अजून काही आयुष्य लाभलं असतं, तर त्यांनी आपलं शरीर दफन वा दहन न करता देहदानच केलं असतं. दुर्दैवानं त्यांना ती संधी मिळाली नाही.

दहन करून घ्यावं किंवा घेऊ नये, अशी मुस्लिम सत्यशोधक मंडळाची कोठलीच भूमिका नाही. या बाबतीत प्रत्येकाचा वैयक्तिक हक्क आम्ही मान्य करतो. दलवाईंच्या दहनाच्या मुद्याचा उपयोग आम्हाला बदनाम करण्याकरता केला जातो, म्हणून हा खुलासा.

दलवाई राजकारणी माणूस नव्हता, पण त्यांना राजकारण चांगलं समजत होतं. त्या क्षेत्रात गेले असते, तर त्यांनी उत्तम राजकारण केलं असतं. पण त्यांना समाजकार्याची आवड होती. त्याचं महत्त्व त्यांना कळत होतं. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यकर्त्यांना त्यांनी सांगितलं होतं की, मंडळाच्या कामामध्ये आपल राजकीय विचार आणता कामा नयेत. म्हणून ते राजकारणापासून स्वत:ही दूर राहिले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आम्ही मुसलमानांमध्ये प्रबोधनाचं काम करतो. मुस्लिम महिलांचे प्रश्न म्हणजे- त्यांच्या शिक्षणाचा, दत्तक घेण्याचा, वारसाहक्काचा, कुटुंब-नियोजनाचा, त्यांना पायावर उभे करण्याचा आणि विशेष म्हणजे तलाकपीडित महिलांच्या पुनर्वसनाचा. आम्ही लोकांचे विचार बदलण्याचं काम करतो. त्याकरता आम्ही वर्कशॉप, शिबिरं, परिषदा घेतो आणि वेगवेगळ्या तऱ्हेचे कार्यक्रम घेतो. साऱ्या महाराष्ट्रभर आमची मोफत सल्ला केंद्रे चालू आहेत. आमचं काम आता ऑल इंडिया लेव्हलवर चालतं. आम्ही लोकांना आमचे विचार पटविण्याचा प्रयत्न करतो. चौदाशे वर्षांपूर्वी जे कायदेकानून झाले, ते त्या काळाच्या अनुषंगाने बरोबर होते, यात वादच नाही. पण आता काळ बदलला आहे, रीतीरिवाज बदलले आहेत, समाज बदलत आहे, जग बदलत चाललं आहे आणि म्हणूनच आपल्या घटनेमध्ये जे लिहिलेलं आहे, त्याच्या आधारावर आम्ही मागण्रांचं समर्थन करीत आहोत. त्याचा आधार समता आणि न्याय ही मूल्यं आहेत. धर्माच्या आधारावर आम्हाला न्याय नको.

आम्हाला वाटतं, धर्माची चिकित्सा झाली पाहिजे. जे चांगलं आहे ते घेऊ या. पण जे वाईट आहे, जे अन्यायकारक आहे, ते टाकून देण्याची तयारी पाहिजे. आम्ही भारतात राहतो. इथे तर इतर धर्मांचेही लोक राहतात. त्यांना जे कायदेकानून आहेत, ते आम्हालाही असले पाहिजेत. म्हणजे कायद्याचं संरक्षण आम्हालाही मिळायला पाहिजे. वेगळी वागणूक आम्हाला नको. आम्ही हा देश आपला मानतो. त्याचा इतिहास, त्याचा निसर्ग, त्याचं ग्रंथभांडार, इथले नाना भाषिक लोक हे आमचे आहेत, असं आम्ही मानतो. भारतात राहणाऱ्या प्रत्येक धर्माच्या लोकांनी जर आपापला धर्म डोक्यावर घेतला, तर देशाचं काय होईल? म्हणूनच प्रत्येकानं आपला धर्म आपल्या घरात व मसजिद-मंदिरात ठेवला पाहिजे आणि ‘माणुसकी’ हा एकच धर्म मानला पाहिजे.

मंडळाची स्थापना १९७० मध्ये झाली. एप्रिल १९७५मध्ये दलवाई आजारी पडले. ३ मे १९७७ ला ते गेले. दलवाईंना काम करायला वेळच मिळाला नाही. पाच-सहा वर्षांच्या अवधीमध्ये जितकं जमेल तेवढंच त्यांनी केलं. कामाला गती यायला आणि आजारी पडायला एकच गाठ पडली. दलवाई गेल्यानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी जितकं जमेल तेवढं मंडळाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला आहे. पण आज जर दलवाई असते, तर ही परिस्थिती वेगळी असती. आम्ही दुसरा हमीद उभा करू शकलो नाही, ही दुर्दैवाची गोष्ट आहे; पण आम्ही शेवटपर्यंत काम करू याची खात्री देतो.

.................................................................................................................................................................

मी भरून पावले आहे - मेहेरुन्निसा दलवाई

साधना प्रकाशन, पुणे

पाने : २०४, मूल्य – २०० रुपये.

पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/3494

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......