'जनरिक'ची सक्ती आधी औषध-कंपन्यांवर करा
पडघम - देशकारण
डॉ. अनंत फडके, डॉ. अभिजित मोरे
  • प्रातिनिधिक छायाचित्र
  • Wed , 26 April 2017
  • पडघम देशकारण जनरिक औषधं Generic Medicine ब्रँडेड औषधं Branded Medicine ड्रग-इन्स्पेक्टर Drug Inspector

डॉक्टरांनी जनरिक नावांनी औषधं लिहून देणं कायदेशीररित्या बंधनकारक करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्तुत्य असला तरी अर्धवट आहे. कारण अजून काही पावलं उचलली नाहीत, तर जनतेला दर्जेदार औषधं रास्त भावात मिळण्याच्या दृष्टीने या निर्णयाचा काहीही फायदा होणार नाही.

एक म्हणजे जनरिक नावांनी औषधं विकणं औषध-कंपन्यांना बंधनकारक केलं पाहिजे. कारण अपवाद वगळता आज कोणतीच कंपनी असं करत नाही. त्यासाठी १९७५ साली हाथी-समितीने शिफारस केल्याप्रमाणे आधी टप्प्याटप्प्यानं ब्रँड-नावं रद्द करायला हवीत. सुरुवातीला निदान जनरिक नावं ब्रँड-नावांपेक्षा मोठ्या व ठळक आकारात छापायाचं बंधन तरी घालायला हवं. असं न करता डॉक्टरांना जनरिक औषध लिहायचं बंधन घातलं तरी रुग्णांना ती मिळणार नाहीत. कारण औषध-कंपन्यांनी दुकानांमध्ये अपवाद वगळता जनरिक नावानं औषधं उपलब्धच केलेली नाहीत. डॉक्टरांनी  जनरिक नाव लिहून दिलं तरी दुकानदार जनरिक-औषधं देऊ शकणार नाहीत. ते ‘ब्रँडेड जनरिक’ म्हणजे कमी प्रसिद्ध असलेली औषधं देतील; तेही ज्यात त्यांना जास्त नफा मिळतो अशी! रुग्णाचा लाभ हे दुय्यम असेल.

दुसरं म्हणजे फक्त दर्जेदार औषधंच बाजारात येतील याची खात्री द्यायला हवी. तशी खात्री असल्याने अमेरिकेत जनरिक प्रिस्क्रिप्शन्सचं प्रमाण ८० टक्के आहे! भारतात बहुतांश उत्पादक दर्जेदार औषधं बनवत असले तरी जनरिक किंवा ‘ब्रँडेड जनरिक’ औषध दर्जेदार असेलच याची खात्री नाही. कारण माशेलकर समितीने २००३ मध्ये केलेल्या शिफारसींची पूर्णपणे व कडक अंमलबजावणी अजून झालेली नाही. उदा. दर २०० दुकानांमागे व दर ५० कारखान्यांमागे एक ड्रग-इन्स्पेक्टर हवा, अशी त्यांची शिफारस होती. त्यानुसार २०१४ मध्ये महाराष्ट्रात ४३२ ड्रग-इन्स्पेक्टर्सची गरज असताना फक्त १६१ ड्रग-इन्स्पेक्टर्सच्या जागा होत्या. त्यापैकी फक्त १२४ नेमणुका झाल्या होत्या.

तिसरं म्हणजे एखादं औषध कमी दर्जाचं आढळलं तर त्या बॅचची सर्व औषधं देशभर रद्द करून परत बोलावली जाण्याचं बंधन व पद्धत नाही. कारण प्रत्येक राज्यातील ड्रग कंट्रोलर स्वतंत्र आहे. अनेक कंपन्या याचा गैरफायदा घेऊन एफडीएने नाकारलेली औषधं दुसऱ्या राज्यात विकतात! तसंच कमी दर्जाचं औषध सापडलं तरी उत्पादकावर पोलिस केस केलीच जाते असं नाही. शिवाय कायद्यात तुरुंगवासाची शिक्षा असली तरी अनेकदा न्यायालयाचं कामकाज संपेपर्यंत कैद अशी शिक्षा होते. ही सर्व ढिलाई आणि अंमलबजावणीतील भ्रष्टाचार थांबला पाहिजे.

चौथं म्हणजे भारतातील बहुसंख्य औषधांवर पेटंट नसून आणि त्यांचा उत्पादन-खर्च अतिशय कमी असूनही केवळ अनिर्बंध नफेखोरीमुळे ती महाग आहेत. औषधांच्या किमती उतरवायच्या असतील तर सध्याचं किंमत-नियंत्रणाचं धोरण बदलायला हवं. सर्व आवश्यक औषधं व त्यांची रासायनिक भावंडं किंमत-नियंत्रणाखाली आणली पाहिजेत. त्यांच्या उत्पादन-खर्चावर १०० टक्के मार्जिन ठेवून कमाल किमती ठरवल्या पाहिजेत. १९७९ पासून ज्या थोड्या औषधांच्या किमतींवर नियंत्रण होतं, त्यांच्या कमाल किमती ठरवण्यासाठी ‘उत्पादन-खर्चावर मार्जिन’ अशी पद्धत वापरली जायची. पण सरकारने २०१३ पासून ‘बाजार-भावावर आधारित किंमत नियंत्रण’ ही नवी पद्धत आणली. त्यामुळे किंमत नियंत्रणाखाली असलेल्या औषधांच्या किमती सरासरीने फक्त १०-२०टक्क्यांनी उतरल्या. कमाल किमती ठरवण्यासाठी ‘उत्पादन-खर्चावर मार्जिन’ ही पद्धत वापरल्यास औषधांच्या किमती आजच्या किमतीपेक्षा एक चतुर्थांश होतील.

थोडक्यात, डॉक्टरांवर जनरिक नावं लिहायची सक्ती करण्यासोबत वरील चार पावलं उचलली तरच जनतेला दर्जेदार औषधं रास्त भावात मिळतील.

 

दोन्ही लेखक पेशाने डॉक्टर असून पुणेस्थित जन आरोग्य अभियान या संस्थेशी निगडित आहेत.

……………………………………………………………………………………………

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......