‘न उतले-मातले’ले दोन राज्यपाल!
पडघम - सांस्कृतिक
प्रवीण बर्दापूरकर
  • आसामचे राज्यपाल बनवारीलालजी पुरोहित आणि सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवासराव पाटील यांच्यासोबतची लेखकाची छायाचित्रं
  • Sat , 28 January 2017
  • सांस्कृतिक बनवारीलाल पुरोहित Banwarilal Purohit श्रीनिवासराव पाटील Shrinivasrao Patil

देशाच्या उत्तरपूर्व भागात भटकंती करायला जायची विमानाची तिकिटं हातात आल्यावर आसामचे राज्यपाल बनवारीलालजी पुरोहित आणि सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवासराव पाटील यांची साहजिकच आठवण झाली. पत्रकारांच्या आमच्या पिढीपेक्षा जगण्याचे दहा-बारा उन्हाळे-पावसाळे जास्त पाहिलेली आणि कर्तृत्वानं ज्येष्ठ असणारी ही कर्ती माणसं, पत्रकारिता करताना अगदी सुरुवातीच्या काळातच भेटली. नंतरच्या काळात पत्रकारीतेपलीकडे जाऊन त्यांच्याशी स्नेह जडला. आता ते दोघंही अत्यंत मानाच्या आणि बड्या पदावर विराजमान आहेत. एकदा का मानाचं असं बडं पद प्राप्त झालं की, माणसं झपाट्यानं बदलतात हा असा अनुभव गाठीशी असल्यानं, या दोघांनाही जरा साशंक मनानं एसेमेस टाकले आणि जो अनुभव आला तो जरा आत्मपर असला तरी शेअर करायला हवा. कारण या दोघा राज्यपालांचा एक माणूस म्हणून मिळालेला प्रतिसाद आणि त्यांचं वागणं प्रसन्न करणारं होतं. बनवारीलालजी पुरोहित आणि श्रीनिवासराव पाटील हे दोघेही मानाच्या मोठ्या पदानं मुळीच उतलेले-मातलेले नाहीत, हे त्यांच्यावर मनलुब्ध व्हावं असंच होतं.

१.

एसएमएस मिळाल्यावर बनवारीलालजी यांच्या एडीसी संजयकुमार मणी यांचा फोन आला. त्यांनी सांगितलं की, मा. राज्यपालांनी आपल्याला डिनरसाठी आमंत्रित केलंय. या भटकंतीत आम्ही दोघं पती-पत्नीच नाही तर आणखी दोन दोस्तयार आणि त्यांच्या पत्नी असे एकूण सहाजण आहोत’, असं सांगितल्यावर तो अधिकारी म्हणला , ‘नो इश्यू. वुईल इनफॉर्म ऑनरेबल गव्हर्नर’. मनातल्या म्हटलं, आता काही आपल्याला बनवारीलालजी बोलवत नाहीत. याचं एक कारण म्हणजे राज्यपालपदाचा दर्जा, रुबाब आणि शिष्टाचार फार वेगळा असतो. नेहमी अनुभवायला येणाऱ्या राजकारण्यासारखा ‘आव-जाव घर तुम्हारा’ असा खाक्या तिथं मुळीच नसतो. राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री अशा मोजक्या काही पदावरील व्यक्तींनाच राज्यपाल उठून सामोरे जातात. राज्य सरकारांचा सर्व कारभार ज्यांच्या नावे चालतो, असं राज्यपालपद हे संवैधानिक दर्जा असलेलं पद असतं. राज्यपालांच्यासोबत साधं चहापान हाही एक आदबशीर आणि शिस्तशीर शिष्टाचार असतो. कपबशीवरसुद्धा तीन सिंह असलेलं राजचिन्ह कोरलेलं असतं. ते राजचिन्ह कायम वरच्या बाजूला राहील याची खबरदारी घ्यावी, असा संकेत कटाक्षानं पाळण्याच्या सूचना असतात... हे सगळं आणि या संदर्भात आणखी बरंच काही ठाऊक असल्यानं आता काही राज्यपालांचा ‘बुलावा’ येणार नाही याची खात्री होती. तरी सोबत असणाऱ्या दोस्तयारांची माहिती असलेला मेल राज्यपालांच्या कार्यालयाला पाठवून दिला आणि विसरून गेलो! दोन दिवसांनी बनवारीलालजी यांचे स्वीय सहायक भौमिक यांचा फोन आला आणि त्यांनी आमंत्रण कन्फर्म असल्याचं सांगितलं. तिकडे निवास, प्रवासाची काही सोय करायची आहे का, अशी अगत्यानं विचारणा केली, पण आम्हाला आशा कोणत्याही सवलती नको होत्या.

एक पत्रकार म्हणून बनवारीलाल पुरोहित यांना आमदार, राज्यात मंत्री, खासदार म्हणून पाहिलेलं आहे. काँग्रेस ते भाजप हा त्यांचा राजकीय प्रवासही चांगला ठाऊक आहे. राम मंदिराच्या प्रश्नावर अनुकूल आणि उघड भूमिका घेणारे काँग्रेस पक्षातील ते एकमेव तत्कालीन खासदार होते. त्याबद्दल पक्षानं नोटीस दिल्यावर पक्ष सोडून राम मंदिर आंदोलनात ते सहभागी झाले. नंतर कारागृहात गेले. याच प्रश्नावर तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक यांची भेट घडवून आणणारे काँग्रेसचे खासदार बनवारीलालजीच होते. हा माणूस खानदानी श्रीमंत आहे तरी वागायला आणि बोलायला अत्यंत साधा आहे. त्यांचा आवाज प्रसंगी कणखर होतो, पण तो वरच्या पट्टीत जात नाही. मांसाहार आणि मद्य कायमचं वर्ज्य तरी, नागपुरात वाचक आणि खपाच्या बाबतीत प्रथम स्थानावर असलेल्या (सर्व्हंट्स सोसायटी ऑफ इंडियाने १०० वर्षापूर्वी सुरू केलेल्या) ‘हितवाद’ या दैनिकाचे ते व्यवस्थापकीय संपादक/ संचालक होते. पांढरा हाफ शर्ट, पांढरी पॅन्ट, पायात अगदी साध्याशा चपला असा त्यांचा पेहराव नागपूरकरांच्या परिचयाचा आहे. विनावातानुकुलित जीप चालवत नागपूरभर भटकंती करणारे आणि कोणीही हात दाखवला तरी थांबून त्याला जीपमध्ये जागा देणारे बनवारीलालजी अनेक दशकं नागपूरकरांनी पाहिलेले आहेत. सुमारे तीस वर्षापूर्वीची एक आठवण अशी- राज्यात मंत्री झाल्यावर बनवारीलालजी यांनी नागपूरकर मित्र आणि पत्रकारांना एक पार्टी दिली. ती कुठे तर धरमपेठेतील त्यांच्या आणि शेजारच्या बंगल्यामध्ये असणाऱ्या मोकळ्या जागेत. हे घर आणि धंतोलीतील ‘हितवाद’ या इंग्रजी दैनिकाच्या कार्यालयातील बनवारीलालजी यांची केबिन साधेपणाचा कळस, तरीही त्यात एक आदबशीर धाक आहे. पत्रकारिता आणि परिवारात ‘बाबूजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बनवारीलालजी यांची आणखी ठोस ओळख म्हणजे ते कट्टर विदर्भवादी आहेत आणि हाच आमच्यातला मतभेदाचा मुद्दा कायम आहे.  आम्ही एका व्यासपीठावर आलो किंवा मी श्रोत्यात असलो तरी बनवारीलालजी पुरोहित, दत्ता मेघे, रणजीत देशमुख, गिरीश गांधी यांच्याशी या मुद्द्यावर एक तरी ‘चकमक’ घडतच असे. हे सर्व ज्येष्ठ असल्याने त्यांचा भाषणाचा क्रम माझ्यानंतर असे आणि मी भाषणाचा शेवट ‘जयहिंद , जय महाराष्ट्र’ने करणार तर ही मंडळी उत्तर देणार ‘जय हिंद, जय विदर्भ’ असं. कधी कृतकोपाने या मंडळींनी ‘विदर्भाची कन्या पत्नी म्हणून चालते, पण विदर्भ नाही हा कृतघ्नपणा आहे,’ अशीही टीका माझ्यावर केलेली आहे, पण त्यामुळे आमच्यात मनभेद मात्र निर्माण झालेले नाहीत.

आसामच्या राजभवनात घेतलेल्या छायाचित्रात डावीकडून डॉ. रवींद्र जोशी, मंगला आणि प्रवीण बर्दापूरकर, बनवारीलालजी पुरोहित, पुष्पा जोशी, डॉ . अंजली आणि डॉ. मिलिंद देशपांडे

गौहत्तीला पोहोचल्यावर राज्यपालांच्या स्वीय सहायकाला संदेश टाकला. संजयकुमार मणी यांनी लगेच प्रत्युत्तरादाखल साडेसात वाजता पोहोचावं असं सुचवलं. आम्ही सुरक्षा यंत्रणेच्या कोणत्याही झाडाझडतीत न सापडता; अगदी फ्रीस्किंगही न होता सव्वासात वाजता राज्यपालांच्या घराच्या दरवाजात पोहोचलो. राज्यपालांकडे कोणत्याही झाडाझडतीशिवाय पोहोचण्याचा पावणेचार दशकाच्या पत्रकारितेतील हा पहिलाच प्रसंग होता. भारतीय वायुसेनेतील स्क्वाड्रन लीडर दर्जाचे असलेले संजयकुमार मणी हे मोठे बोलघेवडे निघाले. त्या पंधरा मिनिटात बऱ्याच गप्पा झाल्या. आम्ही राज्यपालांच्या बैठकीत प्रवेश केला न केला तोच बनवारीलालजी उठून सामोरे आले... हा त्यांच्या स्टाफ आणि आम्हालाही एक सुखद धक्काच होता! त्यांच्या पेहेरावात कोणताही बदल झालेला नव्हता. फक्त एक बदल म्हणजे त्यांनी मॉन्टे कार्लोचं हाफ स्वेटर घातलेलं होतं. आम्हा सहाही जणांचं आसामचं महावस्त्र देऊन बनवारीलालजी यांनी स्वागत केलं. नंतर बनवारीलालजी पुरोहित यांच्या साधेपणाच्या, राजकारणात असूनही आलेल्या त्यांच्या निर्मळ चारित्र्याच्या काही कथा मी दोस्तयारांना ऐकवल्या. (आत्मस्तुतीचा दोष पत्करून सांगतो. बनवारीलालजी माझ्याकडे निर्देश करून इतरांना म्हणाले- ‘इनकी कलम बहोत तेज हैं. लेकीन दुष्मनी किसी के साथ नही. सबके साथ घर तक अच्छे संबंध बनाये रखे हैं प्रवीणजीने.’ हे प्रमाणपत्र मिळाल्यावर दांभिकपणा अंगी नसल्यानं आस्मादिक मनोमन सुखावले नसते तर, अर्थातच नवलच होतं!) मग नागपूरच्या आठवणी निघाल्या. नितीन गडकरी, गिरीश गांधी यांची सय अपरिहार्यच होती. महाराष्ट्रात काय चाललंय याची आवर्जून चौकशी झाली.

राज्यपाल म्हणून गेल्या चार महिन्यांत २२ जिल्ह्यांना भेटी कशा दिल्या आहेत, नागपूरच्या सवयीनं वेळेवर कार्यालयात कसा येतो... अशा अनेक गप्पा जेवतांना झाल्या. ‘मी आल्यापासून राजभवनावरचं ‘नॉनव्हेज’ बंद केलंय आणि मद्यही’, असं डोळे मिचकावून मिश्किलपणे सांगत, बनवारीलालजी यांनी त्यामुळे कोणाची त्यामुळे गैरसोय होत असेल तर दिलगिरी व्यक्त केली. प्रत्येकाच्या ताटातला कोणता पदार्थ संपला याची आवर्जून नोंद घेत, तो पदार्थ सर्व्ह करण्याच्या सूचना घरातला कर्ता देतो तशी प्रत्येकाची काळजी बनवारीलालजी घेत होते. आमच्यातील ‘पुष्पा जोशीचा आज वाढदिवस आहे’, हे मी जेवताना सहज बोलून गेलो तर, जेवण सोहोळा संपल्यावर स्वत: उठून बेडरूममध्ये जाऊन आसामच्या परंपरेतील शुभ समजलं जाणारं एक पितळी पात्र आणून बनवारीलालाजी यांनी वडिलधाऱ्या ममत्वानं पुष्पाला भेट म्हणून दिलं. तेव्हा आम्ही सर्वचजण भारावून जाणं स्वाभाविक होतं.

मग आम्ही निघालो तर ते पोर्चपर्यंत सोडायला यायला निघाले. तेव्हा त्यांच्या स्टाफची धावपळ उडाली. ते ओळखून ‘बाबूजी आप मत आईये हमे’, अशी विनंती चार-पाचदा केल्यावर आम्हाला कारपर्यंत सोडण्याची जबाबदारी त्यांनी संजयकुमार मणी यांच्यावर सोपवली. आसामच्या राज्यपालांच्या राजभवनावरून हॉटेलवर परतताना बनवारीलालजी पुरोहित यांच्यावर राज्यपालपदानं गारुड केलेलं नाही; ते पूर्वीसारखेच, अगदी तस्सेच आमचे ‘बाबूजी’ आहेत याची खात्री पटली. त्यामुळेच त्यांच्याविषयी पूर्वीपासून असणाऱ्या आदरात वाढ झाली...

२. 

श्रीनिवासराव पाटील हे अस्सल मोकळंढाकळं व्यक्तिमत्त्व असल्याचा अनुभव त्यांच्या सहवासात आलेल्या बहुतेक सर्वांचा; म्हणजे सार्वत्रिक आहे. श्रीनिवास पाटील म्हणजे चैतन्याचा खळाळता धबधबा. देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी महाविद्यालयीन जीवनापासून असणारं त्यांचं मैत्र त्यांच्या या प्रतिमेची खुमारी वाढवणारं आहे; मात्र या मैत्रीचा त्यांनी कधी लाभासाठी उच्चारव केलेला नाही. ग्रामीण पार्श्वभूमी, त्यात भरपूर वाचन, यामुळे माणूस एकदम गोष्टीवेल्हाळ. त्यांचं बोलणं आणि भाषणही खुमासदार. केव्हाही कंटाळवाणं न होणारं वागणं-बोलणं, हे त्यांचं वैशिष्ट्य आणि जनमाणसाशी असणारी त्यांची आपुलकीची नाळ थक्क करणारी. त्यांच्या केबिनचे दरवाजे सताड उघडे असत आणि कुणीही गरजू त्यांना कार्यालयीन वेळेत विनाअपॉईन्टमेंट भेटू शकत असे! बीडला जिल्हाधिकारी असताना त्यांनी केबिनला असणारा दरवाजा काढून टाकायला लावला आणि जनतेशी थेट संवाद सुरू केला. बीड जिल्ह्यात असणारी ‘फरशी मुजरा’ ही सरंजामशाहीचं प्रतीक असलेली आणि गुलामगिरीसदृश्य पद्धत बंद करण्याचं श्रेय श्रीनिवासराव यांचंच. आज औरंगाबादची जी औद्योगिक वाढ दिसते, त्यासाठी थेट जनतेला विश्वासात घेऊन नेहमीच अवघड समजली जाणारी (वाळूजची) जमीन संपादन करण्याची कामगिरी श्रीनिवासराव यांनीच लीलया पार पडलेली आहे, हे अनेक औरंगाबादकरांना ठाऊकही नसेल. नागपूरच्या सुधार प्रन्यासचे अध्यक्ष असताना सनदी सेवेचा राजीनामा देऊन श्रीनिवासराव राजकारणात आले. कराड लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून त्यांनी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. नंतर ते राज्यपाल झाले. निरागसता आणि रांगडेपणा याचं अफलातून मिश्रण असलेली ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या, स्वभावानं दिलखुलास असणाऱ्या आणि एका सश्रद्ध अजातशत्रू माणसाचा अधिकारी-सनदी अधिकारी-खासदार आणि आता राज्यपाल हा प्रवास आचंबित करणारा आहे.

एसेमएस मिळताच सगळा शिष्टाचार बाजूला ठेऊन स्वत: श्रीनिवासराव पाटील यांनीच सक्काळी-सक्काळी फोन केला आणि थेट राजभवनावर मुक्कामाला यायचं आवतन दिलं, हे त्यांच्या उमद्या स्वभावाला शोभणारं होतं. ‘काय आणू महाराष्ट्रातून’, असं विचारलं तर ते म्हणाले, तुमचं ‘आई’ पुस्तक नाही मिळालं अजून. मला आणा’. आमच्या एका डॉक्टर मित्राला एक दिवस आधीच परतावं लागणार असल्यानं आमच्या दौऱ्यात किंचित बदल झाला. तिघांच्याही पत्नींना दार्जिलिंगला पाठवून आम्ही बागडोगरा विमानतळावरून थेट सिक्कीमची राजधानी असलेलं ​​गॅंगटोक गाठायचं आणि श्रीनिवासराव यांची भेट घेऊन टाकोटाक दार्जिलिंगला परतायचं ठरवलं. या दरम्यान इरफान सय्यद हा नितांत सुंदर मराठी बोलणारा श्रीनिवासराव यांचा सहायक आमच्या संपर्कात होत. नंतर गप्पांच्या ओघात श्रीनिवासराव यांनीच सांगितलं की, इरफान कराडचा आहे आणि त्याची दुसरी पिढी त्यांच्यासोबत आहे.

सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवासराव पाटील यांच्या कार्यालयात घेतलेल्या छायाचित्रात डावीकडून डॉ. रवींद्र जोशी, डॉ. मिलिंद देशपांडे, श्रीनिवासराव पाटील आणि प्रवीण बर्दापूरकर 

गंगटोकच्या राजभवनापासून दहा-एक किलोमीटर अंतरावर आम्ही असताना सूर्य मावळतीला आला; तसा श्रीनिवासराव यांचा फोन आला आणि आधी फ्रेश वगैरे न होता थेट राजभवनावर पोहोचण्याचा ‘आदेश’ झाला. साक्षात मुख्यमंत्र्यालाही अपॉईन्टमेंटशिवाय ज्यांची भेट मिळत नाही ते राज्यपाल आमची चक्क वाट पाहत होते हे लक्षात आलं. आमची कार थांबते न थांबते तोच राज्यपालपदाचा सारा प्रोटोकॉल खुंटीला टांगत, देहावर वार्धक्याच्या पसरलेल्या खुणांना न जुमानता श्रीनिवासराव लगबगीनं सामोरे आले आणि आम्ही स्तंभितच झालो! लगेच समोरच्या चबुतऱ्यावर नेत त्यांनी आम्हाला समोरच्या कांचनजंगा पर्वताआड होणारा सूर्यास्त दाखवला; त्यासाठीच ही सर्व घाई होती. दुसऱ्या दिवशी ते दृष्य पाहण्यासाठी आम्ही थांबणार नसल्यानं श्रीनिवासराव यांची ती धडपड चाललेली होती. पर्वताआड जाणारं सूर्याचं ते रूपडं मोठं गोंडस दिसत होतं. मग राजभवनावरचा राष्ट्रध्वज उतरवण्याचा साग्रसंगीत तालबद्ध कवायतीचा कार्यक्रम झाला. दरम्यान, अंगावर काटा आणणारी थंडी दाटून आलेली होती तरी त्याच चबुतऱ्यावर चहापान झालं. ‘महाराष्ट्रातून येणारा प्रत्येक माणूस तुमच्या आतिथ्याचं गुणगान करत फिरतो. तुम्ही सिक्कीमचे राज्यपाल असण्यापेक्षा महाराष्ट्राचे इकडचे राजदूत झाला आहात’, असं म्हटल्यावर नेहमीच्या परिचित शैलीत श्रीनिवासराव गडगडाटी हसले आणि आम्ही एकमेकाला परिचित टाळी दिल्यावर त्यांच्या स्टाफच्या चेहऱ्यावर आश्चर्य दाटून आलं. दीर्घपरिचित ‘आपले’ दिलखुलास श्रीनिवासराव मुळीच बदललेले नाहीत; याची सुखद खातरजमा झाली.

मग, त्या १८९० साली बांधलेल्या राज्यपालांच्या कार्यालयात श्रीनिवासराव आम्हाला ओढून घेऊन गेले. जाताना अब्दुल कलम, प्रतिभाताई पाटील आणि शरद पवार यांनी राजभवनाच्या परिसरात लावलेली झाडं आणि राजभवनाचं संचित असलेली काही अत्यंत मोहक फुलं दाखवली. त्यांच्या प्रशस्त दालनात शिवाजी महाराज, पंढरपुरचा विठोबा यांच्या मूर्ती, पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचा फोटो आणि टेबलावरच्या डेस्कखाली त्यांचे आई-वडील, मोठे भाऊ आणि वाहिनी यांच्या तसबिरी होत्या. अधिकारी असतानाही ही ‘मालमत्ता’ ही त्यांच्या केबिनची खासीयत असायची. सिक्कीमचं वैशिष्ट्य असलेलं महावस्त्र आणि झळाळी असलेली भगवान गौतम बुद्ध यांची सुवर्णझळाळी असलेली विलक्षण रेखीव मूर्ती देऊन श्रीनिवासराव यांनी आमचा सत्कार केला. मला Biodiversity of Raj Bhavan हे पुस्तक दिलं. ‘आई’ हे पुस्तक दिल्यावर याच विषयावर लिहिण्यासाठी आलेलं पत्र त्यांनी आवर्जून दाखवलं. या काळात त्यांच्या जीभेला उसंत नव्हती. अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. पंडित नेहरु, इंदिरा गांधी यांची त्या राजभवनाशी असलेली नाळ दर्शवणारी छायाचित्रं दाखवली. नागपूरच्या गिरीश गांधी, मनोहर म्हैसाळकर आणि औरंगाबादच्या उल्हास गवळी, राम भोगले यांच्या सलगीला त्यांनी उजाळा दिला.

नितीन गडकरी यांचा उल्लेख निघाल्यावर; लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मी शासकीय सेवेचा राजीनामा दिलाय हे कळल्यावर नितीन गडकरी भाजपकडे असलेल्या मतांचा हिशेब देत म्हणाले, ‘कशाला जाता कराडला? नागपुरातून लढा भाजपचे उमेदवार म्हणून. आम्ही तुम्हाला निवडून आणतो’, असा गौप्यस्फोट श्रीनिवासराव यांनी केला. खूप आग्रह करूनही राज्यपालाच्या खुर्चीत न बसून राहता उभं राहून त्यांनी आम्हा तिघांसोबत फोटो काढून घेतला. वेळ भराभरा जात होता. आम्हाला दार्जिलिंगला जायचं होतं आणि अंधार वाढलेला आणि गारठा अधिक झोंबरा होऊ लागला होता. श्रीनिवासराव मात्र आठवणीच्या प्रदेशात रंगून गेलेले होते.

सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवासराव पाटील यांनी सप्रेम भेट दिलेली भगवान बुध्द यांची विलक्षण रेखीव मूर्ती आणि पारंपारिक शुभ चिन्हं कोरलेला राजभवनातील दरवाजा

आम्ही निघण्याची आग्रही तयारी दर्शवली तर, सहायकाला पाठवून श्रीनिवासराव यांनी आमच्या चालकाला रस्ता नीट माहिती आहे याची वडीलधारी खात्री करुन घेतली. वारंवार केलेल्या आमच्या विनंतीला न जुमानता आम्हाला सोडायला श्रीनिवासराव पाटील नावाचा जिंदादिल माणूस आमच्या कारपर्यंत आला, तेव्हा विलक्षण संकोच दाटून आला. आमच्या कारचालकाला जेवून घेण्याचा आग्रह त्यांनी केला तेव्हा, राज्यपालपदाच्या कोणत्याही शिस्त, शिष्टाचार, संकेत आणि तोऱ्यानं श्रीनिवासराव यांना फितवलेलं नाही, ही स्तिमित करणारी खात्री गडद झाली. फ्रेश होऊन नवीन राजभवनातून निघण्याआधीच राज्यपालांच्या छायाचित्रकाराने काढलेल्या आमच्या छायाचित्रांचा, श्रीनिवासराव पाटील यांनी शाईच्या पेननं फर्डी स्वाक्षरी केलेला अल्बम आमच्या हातात पोहोचता झाला! तिथला प्रत्येक जण श्रीनिवासराव यांच्याविषयी भरभरून बोलत होता. प्रत्येकाची आस्थेनं काळजी घेणारा असा राज्यपाल या राजभवनानं याआधी पाहिलेलाच नव्हता, असं राजभवनातील अनेकांनी आवर्जून सांगितलं, तेव्हा श्रीनिवासराव यांच्या तिथल्या लोकप्रियतेची साक्ष पटली.     

मोठ्या आणि मानाच्या पदावर जाऊनही कायम अस्सल माणसासारखी वागणारी, पाय कायम जमिनीवर असणारी बनवारीलालजी पुरोहित तसंच श्रीनिवासराव पाटील यांच्यासारखी काही साधी तर, काही जिंदादिल आणि लुब्ध करणारी माणसं पत्रकारिता करताना भेटली आणि आमचंही जगणं उजळून निघालं. आयुष्यात आणखी काय हवं असतं?

 

लेखक दै. लोकसत्ताच्या नागपूर आवृत्तीचे माजी संपादक आहेत.

praveen.bardapurkar@gmail.com

भेट द्या - www.praveenbardapurkar.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

आठवलेसाहेब, तुमच्या मोदींनी गेल्या दहा वर्षांत ‘किती वेळा’ राज्यघटनेचे ‘पालन’ केले आहे? आणि ‘किती वेळा’ अनुसूचित जातींना ‘न्याय’ दिला आहे?

मुळात संविधान बदलाच्या चर्चेची सुरुवात भाजप आणि संघाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच केलेली आहे. ‘संविधान बदलासाठी चारशेपेक्षा जास्त जागा द्या’ अशी मागणी भाजपच्या एका वरिष्ठ खासदाराने केली होती. गेल्या वर्षी मोदीचे आर्थिक सल्लागार बिबेक देबरॉय यांनी एक लेख लिहून संविधान बदलण्याची गरज असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे विरोधक बाबासाहेबांचा अपमान करताहेत, हा आठवलेंचा आरोप म्हणजे शुद्ध लबाडी आहे.......

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......