मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे
ग्रंथनामा - आगामी
सुनील कर्णिक
  • सुनील कर्णिक आणि त्यांची सहा पुस्तके
  • Fri , 02 February 2018
  • ग्रंथनामा Granthnama आगामी सुनील कर्णिक Sunil Karnik डिंपल पब्लिकेशन्स Dimple Publication

ज्येष्ठ पत्रकार सुनील कर्णिक यांची सहा पुस्तके ९ फेब्रुवारी रोजी डिंपल पब्लिकेशन्सतर्फे प्रकाशित होत आहेत. हा प्रकाशन सोहळा मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, दादर, मुंबई इथे होत आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ही पुस्तके प्रकाशित होत आहेत, ही विशेष आनंदाची बाब आहे. यातील ‘न छापण्याजोग्या गोष्टी’ या पुस्तकाची दुसरी आवृत्ती असून बाकीच्या ‘‘महानगर’चे दिवस, ‘सोनं आणि माती : म्हणजे गुणवंतांच्या गोष्टी’, ‘मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे’, ‘महाराष्ट्रातील साहित्यिक संस्थानं’, ‘म्हाताऱ्या बायका काय कामाच्या’ या पाच पुस्तकांची पहिली आवृत्ती आहे. या सर्व पुस्तकातील लेख वेळोवेळी वेगवेगळ्या नियतकालिकांमध्ये प्रकाशित झालेले आहेत. या पुस्तकांपैकी ‘मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे’ या पुस्तकातील हे एक प्रकरण.

.............................................................................................................................................

मराठी साम्राज्याचा कर्ता शहाजी किंवा शिवाजी नव्हे, तर मलिक अंबर आहे, असा भालचंद्र नेमाडे यांचा दावा आहे. ‘साहित्य, संस्कृती आणि जागतिकीकरण’ या नावाची त्यांची एक पुस्तिका लोकवाङ्मय गृहाने नुकतीच प्रकाशित केली आहे, त्यात ते लिहितात -

‘आपण जर अस्मिताच शोधायला गेलो तर आपली अस्मिता इंग्रजांच्या आधीसुद्धा शुलर्श्रीीर्ळींश, वेगळी हिंदू अशी नव्हती. म्हणजे त्याच्या आधी आपण हिंदूंना मेनस्ट्रीम समजतो ते खरं नाही. आपले सर्वात मोठे दोन सम्राट - अशोक आणि अकबर - दोघेही हिंदू नव्हते. खरा इतिहास पाहिला तर मराठा साम्राज्राची स्थापना कुणी केली असेल तर फार तर आपण शहाजीपर्यंत जातो. शहाजीच्या मागे जाणं आपल्याला परवडत नाही. कारण शहाजीच्या आधी मराठी साम्राज्याचा कर्ता मलिक अंबर असतो. मलिक अंबरने प्रथम मराठ्यांना राष्ट्रीयत्वाचं भान आणून दिलं. उत्तरेकडच्या ‘हिंदुस्थानी’ मोगलांविरुद्ध दखनी मराठे संघटित केले, गनिमी कावा पहिल्यांदा यशस्वी रीतीने शोधून वापरला. शहाजीसारखे सरदार तयार केले. खंडागळे विरुद्ध जाधव, जाधव विरुद्ध भोसले, दरोडेखोर, लुटारू आणि पुंड असे परस्परांशी लढणारे सगळे दखनी मराठे एकत्र करणारा मलिक अंबर महाराष्ट्राच्या आपल्या मध्यवर्ती संस्कृतीत धरायचा नाही? एवढे कृतघ्न जर ‘हिंदू’ या कोटीमुळे लोक झाले तर ही कोटीच आपल्याला नको. कारण इथे सत्याच्या आग्रहाचा प्रश्न येतो.’

नेमाडे यांच्या लेखनाची नेहमीची वैशिष्ट्यं (अत्यंत वाचनीयता, सुस्पष्ट आणि रोखठोक मुद्दे, नव्या माहितीची रेलचेल, वेगळा दृष्टिकोन आदी) तर या पुस्तिकेत आहेतच, पण विशेष म्हणजे जागतिकीकरणाच्या मुद्द्याला मराठी लेखक सहसा हात लावत नाहीत. त्याचं विच्छेदन नेमाड्यांनी इतक्या सुरेख रीतीने केलं आहे की त्यांना दाद दिल्याखेरीज राहवत नाही.

जागतिकीकरणाबद्दलची आपली भूमिका नेमाड्यांनी आरंभीच अगदी सोप्या शब्दांत मांडली आहे -

‘जगातल्या सगळ्या लहान-मोठ्या समाजांना स्पर्श करणाऱ्या जागतिकीकरणासारख्या राक्षसी प्रक्रियांमधून काही उपयुक्त गोष्टीही आपोआप होऊन जातात. विशेषत: परंपरेतून चालत आलेल्या कुचकामी गोष्टी या निमित्ताने आपण तत्परतेने फेकून देतो आणि याला केवळ निमित्त झालेल्या बाह्य -परक्या- शक्तींना याचं श्रेय इतिहासकार देतात! दुष्ट प्रवृत्तींवर मात करण्याची आंतरिक शक्ती सगळ्या परंपरांच्या गाभ्यात असतेच. ती फक्त काही तरी निमित्ताची वाट पाहत असते. इंग्रजी संस्कृतीतून आपल्या सुधारणा घडल्या नाहीत, तर इंग्रजी वसाहतवादामुळे आपल्या पोटातून सुधारणा निर्माण झाल्या, हे महाराष्ट्रात प्रकर्षाने घडल्याचं आपण पाहत आलो. अधिक मोठ्या प्रमाणावर आता जागतिकीकरण याच प्रकारे कार्य करील. मात्र आपण आपल्या देशी भूमिकेवरून इंग्रजी प्रभाव पचवला, तीच देशी भूमिका जागतिकीकरणातही लावून धरली पाहिजे. कारण अशा परक्या प्रभावांच्या रणधुमाळीत आपली भाषा आणि संस्कृती टिकवून धरण्याचं देशीयतेशिवाय दुसरं कोणतंही शस्त्र मानवी इतिहासात सापडत नाही.’

या जागतिकीकरणाची दोन गाजलेली उदाहरणं नेमाड्यांनी दिली आहेत. पहिलं आहे सालमन रश्दी या प्रसिद्ध लेखकाचं. ‘रश्दींचं डोकं उडवणाऱ्याला लाखो डॉलरांचं जे बक्षीस इराणी धर्मवेड्यांनी ठेवलं आहे... त्यामुळे बिचाऱ्याला पेपरांशिवाय आणखी कुठे तोंड दाखवण्याची सोय राहिलेली नाही. म्हणजे लेखकाच्या अस्तित्वावरच जागतिकीकरणाचा किती भयंकर परिणाम होऊ शकतो हे यावरून दिसतं.’ असं नेमाड्यांनी म्हटलं आहे.

त्यांनी दिलेलं दुसरं उदाहरण आहे गुजरात दंगलींचं. ‘जगभर व्यापारी जाळं असलेले हे गुजराती लोक कुठल्याही अर्थाने हिंदू किंवा मुसलमान नाहीत. पयंतु गेल्या काही वर्षांत जुनाट धार्मिक संघटनांनी जागतिक पातळीवर हे लोक बांधून त्यांना स्थानिक पातळीवर सुटं सुटं करून टाकलं. परदेशातून कोट्यवधी रुपये गुजरातकडे पोहोचतात, हे जसं कच्छच्या भूकंपात उघड दिसलं, तसं दंगे घडवणाऱ्या धार्मिक संघटनांना आर्थिक पाठबळही नक्कीच पोहोचलं असणार. सतत नमतं घेणारा हा समाज एकदम इतका हिंसक होऊ शकतो, याचं मूळ या स्थानिक एकोप्याची केंद्रं नाहीशी करून टाकणाऱ्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत आहे. जागतिकीकरणामुळे दूरदूरचे समाज जवळ येतात, हे अगदी खरंआहे. यामुळे अर्थात जवळजवळ नांदणारे समाज मात्र एकमेकांना दुरावतात. टीव्ही, इंटरनेट, कॉम्प्युटरांवर अमेरिका आणि आफ्रिका मला जास्त जवळ आली. पण शेजारच्या वस्तीचा माझा संबंध पूर्वी होता तितकाही राहू नये अशी ही अवस्था आली. यातून प्रचंड नरसंहाराची शक्यता निर्माण होते. गुजरातच्या दंगली या पूर्वीसारख्या तात्पुरत्या नक्कीच नसणार. त्या लवकर संपतील असं समजायलाही काही तार्किक पाठबळ नाही. फार काय, हा नरसंहार उद्या मुंबईत, कोल्हापुरातसुद्धा केव्हाही सुरू करता येईल. अशी परिस्थिती वाढत जाईल. बहुसांस्कृतिक समूहांनी एकत्र नांदण्याचं काव्य नव्या जागतिक लोंढामाध्यमांमुळे संपुष्टात आलं आहे.’

आजच्या प्रसारमाध्यमांमुळे प्रचंड फोफावलेल्या माहितीच्या कचऱ्याविषयी नेमाड्यांनी लिहिलंय, ‘तिकडे दूर काय चाललं आहे हे आपल्याला माहिती होणं, याच्याइतकी ज्ञानक्षेत्रातली दुसरी विकृती नाही... जागतिकीकरणाच्या गरजेतून येणाऱ्या या माहितीच्या कचऱ्यामुळे आपल्या जवळच्या गोष्टींचं ज्ञान असायची गरज उरली नाही. तिकडच्या विशेषत: अमेरिकेतल्या फॅशन्स, फॅड, सवयी, संगीत, रीतिरिवाज या गोष्टी कशासाठी माहिती हव्यात? उदाहरणार्थ, युरोडॉलरची माहिती अशासाठी हवी की, आपल्या रुपयाचं या नाण्याशी काय मोल आहे एवढ्यासाठीच. आपल्या गोष्टींच्या संदर्भातच तिकडच्या गोष्टी माहिती असणं जास्त आवश्यक आहे. सारांश, या सगळ्या माहितीच्या कचऱ्याने आपण आपल्याच भूमीतून परागंदा होतो, असं काही तरी घडतं. यातूनच मग खोटी राष्ट्रीयता जास्त मिरवण्याचे प्रकार सुरू होतात. आपण सोडून दुसरे समाज राष्ट्रप्रेमात कमी पडतात, असा भ्रम वारंवार निर्माण करणं भाग पडतं. मी माझ्या मुलाला कॉम्प्युटरच्या क्लासला घालायचं आणि गरीब दुष्काळी प्रदेशातल्या लोकांनी त्यांची अर्धशिक्षित मुलं लष्करात जवान म्हणून भरती करारची. मी फक्त राष्ट्रगीत मोठ्याने म्हटलं की माझी राष्ट्रीयता पक्की सिद्ध झाली. गरीब सैनिक तिकडे चकमकीत मारले गेले की ‘जरा आंख में भर लो पानी’ म्हणून मी गदगदून मोकळं व्हायचं.

राष्ट्रीयतेचं असं कॅथार्सिस करवून देणाऱ्या मोठमोठ्या समारंभांचं आयोजन, ढोंगी पद्धतीचे रिवाज आपल्यात वाढत चालले आहेत. आपल्या स्वार्थी वृत्तीवर राष्ट्रीयतेच्या कल्हया अधूनमधून देणं आवश्यक झालं आहे.’

आपले मुद्दे पटवण्यासाठी नेमाड्यांनी इतक्या छोट्यामोठ्या मर्मभेदक हकिगती सांगितल्या आहेत की त्या मुळातूनच वाचायला हव्यात. उदाहरणार्थ, ही एक करुण कहाणी वाचा -

‘दोन महिन्यांपूर्वी अहमदनगरहून भंडारदरा धरणाकडे आम्ही सुमती लांडे, रंगनाथ पठारे वगैरे एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. आणि त्या धरणाच्या पलिकडे काय आहे ते पाहावं असं आम्हाला वाटलं. आपण नेहमी समोरून धरण पाहतो. डोंगर वगैरे तिकडून दिसतात. लांबून आतपर्यंत पाहायला गेलो तर तिथे पायथ्याशी रतनगड किल्ल्याखाली एक वस्ती आहे. तिथे शंकराचं मोठं सुंदर देऊळ आहे. एके काळी ते शक्तिपीठसुद्धा असेल. तिथे आमची गाडी गेल्याबरोबर गावातले पाच-दहा लोक जमा झाले. एकाच्या अंगावर तापाने फणफणलेलं लेकरू होतं. तो त्या लेकराचा बाप आम्हाला काकुळतीने विचारत राहिला की, ‘तुमच्याकडे काही गोळ्या आहेत का?’ आम्ही विचारलं, ‘कसल्या गोळ्या? कशाकरता?’ तर ‘मुलाला ताप आलाय. इथे डॉक्टर नाही. सरकारी डॉक्टर कधी तरी येतो.’ घरी पुन्हा दुसरा मुलगा आजारी पडला होताच. औषधी नसल्या तरी समाधान म्हणून कसल्याही गोळ्या चालतील. आम्हाला अत्यंत लाज वाटली. सुमतीबाईंकडे चॉकलेटं होती तीच त्याने घेतली. आजारी मुलांसाठी. त्या गावात आजही डॉक्टर जात नाही. आणि हे कशामुळे झालं, तर नगर जिल्ह्यातले हे सगळे माजलेले साखर शेतकरी कारखानदार आहेत, त्यांना उसासाठी भरपूर पाणी पाहिजे होतं. त्यांच्यासाठी त्यांनी इथली संपन्न खेडी डोंगरात हटवून धरणाला जागा केली. मग तिथली शेती, जमिनी, कुरणं, सगळं धरणाखाली गेलं. विहिरी गेल्या. आता तिथे ना शेती, ना पिण्याचं पाणी, ना नळ, ना रस्ते, ना डॉक्टर, अशा गरीब लोकांच्या जिवावर आपलं आधुनिकीकरण करारला निघाले साखर कारखानदार. आपल्या दिखाऊ प्रगतीमागे अशी, आजारी मुलांना औषधं नसलेली अशी खेडी असतात.’

नेमाड्यांचं हे सुबोध, सुरेख पुस्तक हिंदी-इंग्रजीसह सर्व भाषांमध्ये अवश्य अनुवादित व्हावं इतकं मोलाचं आहे.

.............................................................................................................................................

मलिक अंबर, माहितीचा कचरा आणि नेमाडे - सुनील कर्णिक, डिंपल पब्लिकेशन्स, मुंबई, मूल्य - १८० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4352

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

Post Comment

mahesh jore

Mon , 05 February 2018

या लेखात नेमाड्यांच्या पुस्तिकेतला मजकूरच ९५ टक्क्यांहून अधिक आहे. मग हे कर्णिकांच्या पुस्तकातले प्रकरण म्हणण्यापेक्षा नेमाड्यांच्या पुस्तिकेतले अंश म्हणायला काय हरकत आहे? कर्णिकांच्या अपुऱ्या समजेचे दर्शन घडवणारी पाच-सहा वाक्ये तेवढी मधे त्यांनी लिहिलेली आहे. अन्यथा नेमाड्यांचाच मजकूर जास्त.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......