माणसं काय, नोटांच्या रांगेतही मरतात!
संपादकीय - संपादकीय
संपादक अक्षरनामा
  • पाचशेच्या नोटा
  • Wed , 16 November 2016
  • केशवकुमार आचार्य अत्रे झेंडुची फुले मोड Currency नोटा Notes नेहरू Nehru

दे रे हरि, दोन आण्याची मोड!

मोडीसाठीं भटकुनि आले तळपायाला फोड || धृ.||

काडि मिळेना, विडी मिळेना, इतर गोष्ट तर सोड!

मीठहि नाहीं, पीठहि नाहीं, मिळे न कांहीं गोड!

पै पैशाचे धंदे बसले, झाली कुतरेओढ!

‘मोड नाहिं,’चे जेथें तेथें दुकानावरी बोर्ड!

ट्रॅम गाडिंतहि मोड न म्हणुनी, करितों तंगडतोड!

कुणी ‘कूपनें’ घेउनि काढी नोटांवरती तोड!

मोडीवांचुनि ‘धर्म’ थांबला, भिकारि झाले रोड!

दिडकि कशी तुज देऊं देवा, प्रश्न पडे बिनतोड!

श्रीमंतांचें कोड पुरवुनी मोडिशि अमुची खोड!

पाड दयाळा, खुर्द्याची रे आतां पाऊसझोड!

केशवकुमार उर्फ प्रल्हाद केशव अत्रे यांच्या ‘झेंडुचीं फुलें’ या संग्रहातली ही ‘मोडीसाठीं धांव’ नावाची विडंबनपर कविता. या संग्रहातील कविता १९५० ते ५६ या काळातील आहेत. कविता केशवकुमारांनी कधी लिहिली आहे, याचा त्यांनी उल्लेख केला असला तरी बऱ्याच कवितांच्या खाली तो केलेला नाही. पण बहुधा ही कविताही याच कालखंडात किंवा थोडीफार आगेमागे लिहिली गेली असावी. केशवकुमारांच्या या संग्रहातील बहुतांश कविता या इतर कवींच्या कवितांची खिल्ली उडवण्यासाठी लिहिलेल्या आहेत. मात्र काही कविता या त्यांनी तत्कालीन समाजजीवनातील प्रसंगांवर स्वतंत्रपणेही लिहिल्या आहेत. ‘मोडीसाठीं धांव’ ही कविताही त्यांपैकीच एक आहे. या कवितेची पार्श्वभूमी सांगताना केशवकुमारांनी म्हटलं आहे की, “मोड मिळण्याची हल्लीं भयंकर मुष्किल झाल्यामुळें पै-पैशाचा व्यवहार करणाऱ्या गरिबांची रोजच्या जीवनांत जी कुतरओढ चालली आहे तिला तोड नाही! मोडीच्या दुष्काळानें गांजलेली गरीब जनता मनांतल्या मनांत परमेश्वराला असेंच गाऱ्हाणे आळवीत असेल काय?”

ही कविता जर साठच्या दशकातच लिहिली गेली असेल तर तेव्हा भारत स्वतंत्र होऊन काही वर्षं झाली होती. म्हणजे देशात लोकशाही पद्धतीनं स्थापन झालेलं पं. जवाहरलाल नेहरू यांचं बहुमतातलं सरकार होतं. मग त्या वेळच्या जनतेनं पं. नेहरू यांच्यासारख्या लोकविलक्षण पंतप्रधानांकडे आपलं गाऱ्हाणं मांडण्याऐवजी ते देवाला साकडं का घालत बसले? कदाचित अशीपण शक्यता आहे की, केशवकुमार ऊर्फ आचार्य अत्रे यांची पं. नेहरू यांच्यावर विलक्षण भक्ती होती. त्यामुळे चलन तुटवड्यामुळे सर्वसामान्य जनतेची होणारी कुतरओढ त्यांना दिसत असली आणि पाहवत नसली तरी, कदाचित त्यांना तेवढ्यावरून पं. नेहरूंवर टीका करणं प्रशस्त वाटलं नसावं.

तिसरी गोष्ट अशी आहे की, आज जशी पं. नेहरूंना शिव्या देण्याची, कुचकामी ठरवण्याची फॅशन बोकाळली आहे, तशी त्या काळी नव्हती. नक्कीच नव्हती. उलट देश स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या पहिल्या पंतप्रधानपदी देशातील तमाम जनतेनं पं. नेहरू यांची निवड केली होती. नुसती निवड नाही, तर त्यांचा पं. नेहरूंवर १०० टक्के विश्वास होता. नेहरूंकडेही कदाचित आजच्या परिप्रेक्ष्यात पाहताना नसेल, पण त्या काळाच्या तुलनेत देश घडवण्याची दृष्टी होती. देशाचं सारथ्य करण्याचं सामर्थ्य त्यांच्यामध्ये होतं, तसं देशाला पुढे नेण्याचंही होतं. त्या भरवशाबाबत तत्कालीन जनतेचा भ्रमनिरास झालेला नव्हता.

चौथी शक्यता अशी आहे की, मोड नसल्यामुळे तत्कालीन जनतेच्या होणाऱ्या कुतरओढीनं केशवकुमार खूप व्यथित झाले असावेत. दु:खानं गदगदलेला कुणीही माणूस इतरांना दोष देत नाही; तो स्वत:ला, स्वत:च्या नशिबाला, प्रारब्धालाच दोष देतो; देवाचा धावा करतो. केशवकुमार जसे सरकारधार्जिणे कवी नसावेत, तसे सरकारविरोधक कवीही नसावेत. त्यामुळे जनसामान्यांच्या दु:खाचं भांडवल करून त्यांनी सरकारला आपल्या कवितेतून ‘चार खडे बोल’ सुनावण्याची संधी घेतली नाही.

पाचवी शक्यता अशीही आहे की, या कवितेत जनसामान्यांचं दु:खच तेवढं केशवकुमारांना सांगायचं असावं. त्या पलीकडे त्यांचा इतर कुठला उद्देश नसावा. म्हणजे त्यांच्या या दु:खाला जबाबदार कोण, कोणामुळे हा प्रश्न निर्माण झाला? त्यावर उपाय काय? या प्रश्नांना त्यांना कदाचित भिडायचंच नसावं. त्यामुळे ते त्या वाटेला गेलेच नाहीत.

सहावी शक्यता अशीही असू शकते की, ही कविता केशवकुमारांनी ‘ड्रॅमॅटिक मोनोलॉग’ म्हणजे ‘नाट्यमय स्वगत’ या पद्धतीनं लिहिली आहे. मोडीपायी ‘मोड’कुटीस आलेला एक सामान्य माणूस आपलं मनोगत या कवितेत व्यक्त करतो आहे. सामान्य माणूस तेव्हाचा असो की आजचा, तो त्याच्या वाट्याला आलेल्या आयुष्यासाठी, हाल-अपेष्टांसाठी कधीच कुठल्याच सरकारला दोष देत नाही. तो त्याच्या नशिबालाच दोष देतो आणि देवाचा धावा करतो. केशवकुमार यांनी सामान्य माणसाच्या पातळीवर जाऊन तो कसा विचार करेल, बोलेल हे समजून घेऊन ही कविता लिहिली असल्यामुळे इतर कुणावर ठपका ठेवण्याचा प्रश्नच उदभवला नसावा.

अजून अशाच काही शक्यता वर्तवता येतील. कुणी कदाचित असाही प्रश्न उपस्थित करेल की, ‘पाड दयाळा, खुर्द्याची रे आतां पाऊसझोड!’ या ओळीतील ‘दयाळा’ हा शब्द देवासाठीच वापरलेला आहे कशावरून? तो पं. नेहरू यांच्यासाठीही वापरलेला असू शकतो. ते तेव्हा देशातील तमाम नागरिकांसाठी परमेश्वरासमानच होते की! ही शक्यतासुद्धा नाकारता येत नाही. त्यामुळे तिचा स्वीकारही करायला फारशी अडचण येण्याचं कारण नव्हतं. पण याच ओळीत ‘पाऊसझोड’ असा शब्द आहे. खुर्द्याचा पाऊस पाडण्याचं तंत्र तेव्हा भारत सरकारनं विकसित केलेलं नव्हतं आणि पं. नेहरू यांनीही. त्यामुळे त्यांच्याकडे ही मागणी करता येणं शक्य नव्हतं. दुसरी गोष्ट अशी आहे की, ही कविता एका तत्कालिन गरीब सामान्य माणसाचं मनोगत आहे. त्याला तेव्हा आपला देश स्वतंत्र झाला आहे, त्याच्या पंतप्रधानपदी पं. नेहरू यांच्यासारखा द्रष्टा नेता आहे याची गंधवार्ताही नसावी. मग तो नेहरूंना साकडं घालणार कसं?

पण सध्याचा काळ केवळ भूतकाळातच रमण्याचा नाही. त्यामुळे ‘मोडीसाठीं धांव’ या कवितेचं तत्कालीन परिस्थितीनुसार कितीही रसग्रहण करण्याचा प्रयत्न केला, तरी आत तिचं काय महत्त्व आहे? ती आजही प्रस्तुत ठरते का? असे काही प्रश्न निर्माण होतातच. इतरांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येतं, तसंच आपल्याच मनात निर्माण झालेले प्रश्न जागच्या जागी दाबून टाकता येतात. तरीही आजचे केशवकुमार या कवितेतील ‘मोड’ या शब्दाच्या जागी ‘नोट’ (५०० किंवा २०००ची) हा शब्द टाकून ही कविता आजच्या परिस्थितीलाही कशी तंतोतंत लागू पडते, याविषयी ठाम प्रतिपादन करू शकतात. वर असंही म्हणू शकतात की, तेव्हा जनसामान्य मोडीपायी मेटाकुटीला आले ही गोष्ट खरी आहे, पण तेव्हा त्यांतल्या काहींवर तासनतास रांगेत उभं राहून स्वतःचा जीवच गमवण्याची वेळ आली नव्हती! या आक्षेपाचाही प्रतिवाद करणं फारसं कठीण नाही. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांनी म्हटलंच आहे की, ‘माणसं काय, रेशनच्या रांगेतही मरतात!’ आता ती जर रेशनच्या रांगेत मरू शकतात, तर नोटांसाठीच्या रांगेतही मरू शकतातच की!

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख