सगळ्यांनी टाकली धाड । वर्णन करावे कोठवरी
ग्रंथनामा - आगामी
शंकर विभुते
  • ‘कंट्रोल युनिट’ या कादंबरीचं मुखपृष्ठ
  • Fri , 08 December 2017
  • ग्रंथनामा Granthanama आगामी कंट्रोल युनिट Control Unit शंकर विभुते Shankar Vibhute शब्दालय प्रकाशन Shabdalaya Prakashan

डॉ. शंकर विभुते यांची ‘कंट्रोल युनिट’ ही कादंबरी लवकरच शब्दालय प्रकाशनातर्फे प्रकाशित होत आहे. या कादंबरीमध्ये निवडणूक आणि मतदान प्रक्रियेची कहाणी सांगितली आहे. त्यातून आपल्या देशातल्या लोकशाहीची अंमलबजावणी कशा प्रकारे होते, निवडणुका कशा होतात, यावर प्रकाश पडतो. सध्या गुजरातमधील निवडणुकांच्या निमित्तानं देशभर त्याविषयीची चर्चा चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर या कादंबरीतील एका प्रकरणाचा हा संपादित अंश…

.............................................................................................................................................

सोळा मुद्यांचा अहवाल भरल्यानंतर मतदानाची अंतिम टक्केवारी भरण्याचा फॉर्म हातात घेतला. ते भरायला सुरुवात करणार तेवढ्यात झोनल ऑफिसर मतदान केंद्रात टपकले.

‘काय, भोसले सर, व्यवस्थित झाले ना? तुम्ही प्राध्यापक मंडळी फार टेन्शन घेता. तुम्हाला तर एका मतदान केंद्राचे टेन्शन असते, मला तर अशा सोळा मतदान केंद्रावर लक्ष ठेवावे लागते.’

‘येच्या मायला, याला कशाचं टेन्शन आलंय. आतापर्यंत कालपासून फक्त तीन वेळा आला असेल, काय बी इच्यारलं की, अ‍ॅडजेस्ट करून घ्या म्हणतो. आणि वरून काही अडचण आहे का? म्हणतो. याला सोळाच काय सोळाशे मतदान केंद्रं दिली तरी हा पट्टा सांभाळला असता.’ राठोड सर व वाघमारे सरांची कुजबुज ऐकून झोनल ऑफिसर म्हणाले.

‘बोला, तुमची काही अडचण आहे का? अरे हो, तुमचे मानधन घेऊन आलो आहे. खरे तर हे फार कमी आहे. पण यातील एक रुपयासुद्धा देशाप्रती तुम्ही केलेल्या सेवेची पावती आहे’ असे म्हणून त्यांनी आपली बॅग उघडली.’

प्रस्तावनेवरून रक्कम कमीच मिळणार लक्षात आले होते. ते तर्क खरे ठरले. मतदान अधिकारी क्रमांक एक-दोन-तीन यांना चौदाशे रुपये, सेवकास साडेचारशे रुपये व केंद्राध्यक्षास सोळाशे रुपये मानधन होते. होमगार्डला मानधन पोलिस खात्यातून मिळणार होते. सर्वांनाच या मानधनाविषयी नाराजी वाटली. यापूर्वीचे तीन ट्रेनिंग, जाण्यायेण्याचा खर्च व हे शेवटचे दोन दिवस सर्व मिळून चौदाशे रुपये म्हणजे अतिशय अल्प मानधन होते. भोसलेंना वाटले.

‘उपवास-तपास करीत, फॅन नसताना, टॉयलेट नसताना, पिण्याचे पाणी, जेवण्याची व्यवस्था काहीच नसताना प्रामाणिकपणे ड्युटी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे मानधन अतिशय त्रोटक आहे. यापेक्षा उमेदवार प्रतिनिधीचे काम अधिक चांगले. त्याला जेवण, नाष्टा मिळून एका दिवसाचे आठशे रुपये मिळाले. प्लॉटची सरकारी किंमत व खाजगी किंमत यात जशी तफावत असते, तशी आपली किंमत झाली होती.’ झोनल ऑफिसर निघून जाताच, सहकारी शोषणाची कैफियत भोसलेकडे मांडू लागले. ताकलोड म्हणाले,

‘साहेब, कुठेही आमची हीच गत आहे. शाळेची गुणवत्ता वाढवा, शिष्यवृत्ती परीक्षेत मुलांना यशस्वी करा, ‘ढ’ असणाऱ्या पोरांना सकाळी एक तास व शाळा सुटल्यावर एक तास अधिकच घ्या. यासोबतच जनगणना, साक्षरता अभियान, दारिद्रयरेषेखालील लोकांची यादी, निवडणुका अशी अनेक अशैक्षणिक कामे करा. काम करण्यासाठी कायद्याची व कलमाची भाषा. मानधन मात्र तुटपुंजे. वरून प्राथमिक वर्गाची गुणवत्ता ढासळत चालली. प्राथमिक शिक्षकांनी दारू महाग केली. मास्तर शिकवतच नाहीत, शाळांना डुम्मा मारतात, प्रार्थना घेत नाहीत, रजा न घेता शाळा सोडून जातात, असे टोले अधिकाऱ्यांकडून व समाजाकडून कानावर ऐकायला मिळणार. ज्यांना निवडून आणण्यासाठी आपण कष्ट उपसत असतो किंवा लोकशाही बळकट करण्याच्या नावाखाली जी हमाली करीत असतो, ते मादरचोद चौथी पास, सातवी पास, दहावी नापास असे आमचेच विद्यार्थी असतात. हेच निवडून आल्यावर गुणवत्तेची भाषा करतात. जेवढे अधिकारी आहेत ना त्यातील ऐंशी टक्के साहेब आमच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतूनच शिकून वर गेले. वरून आमच्या डोक्यावर मुततात. साहेब आमच्यापेक्षा धंदा करणारी रांड परवडली बघा. तिला तरी काही काळासाठी सन्मान मिळतो. तुम्ही प्राध्यापक मंडळी, लयी सुखी. ‘गाव जमले हनुमान बाहेर’. तुमचा या समाजाचा व अधिकाऱ्यांचा संबंध नसतो. मायला पहिल्या जन्माचं काही तरी पाप म्हणून जिल्हा परिषदेचा मास्तर झालो. माफ करा जास्त बोललो, पण पोटतिडकी होती साहेब. तुम्ही समजदार दिसलात म्हणून पोटातलं ओकलो साहेब. वाईट वाटून घेऊ नका.’

भोसलेही काही काळ सुन्न झाले. त्यांच्या चिडण्यात बरेच तथ्य होते. त्यांचे ऐकण्याशिवाय पर्यायच नव्हता. उपदेश म्हणून एवढेच म्हणाले, ‘जावू द्या सर, आपण प्रामाणिक काम करावे, तेवढीच देशसेवा व समाधान मानता येईल.’ यांनाही वाटले, ‘काम करतात बिचारे तर त्यांना तसं मानधनही द्यावं. बरं आपणही ऐकलं की, निवडणूक कामासाठी जो खर्च होतो, त्याचे ऑडिट होत नाही. त्यामुळे खर्च करणाऱ्या अधिकाऱ्याच्या प्रामाणिकपणावर सर्व काही अवलंबून आहे. जाऊ दे. आपण काय करू शकतो. आपल्याकडून जेवढे त्यांच्यासाठी करता येईल तेवढं केलं. त्यांना मिळालेल्या पैशातूनच ते कालपासून झालेल्या खर्चाची रक्कम म्हणून काही रक्कम आपणास देत होते. आपण घेतली नाही. घेण्यासाठी खर्च केलाच नव्हता. तेवढेच ते आपल्यावर खूश झाले.’

‘कामे खूप पडलेली होती. चर्चा करण्यात अर्थ नव्हता. बस येईपर्यंत जेवढे मोहेरबंद करता येईल तेवढे येथे करावे, बाकीचे केंद्रावर जाऊन करावे’ असं भोसलेंना वाटू लागलं.

बस येण्यास उशीर होता. कारण शेवटच्या मतदान केंद्राकडून कर्मचाऱ्यांना घेत-घेत शेवटी बस येणार होती. त्यामुळे बरीच कामं होण्यासारखी होती. म्हणून भोसलेंनी परत मतदानाची अंतिम टक्केवारी भरण्यासाठी फॉर्म हातात घेतला व भरायला सुरुवात केली.

यानंतर महत्त्वाचे लिफाफे भरून मोहोरबंद करावयाचे होते. भोसलेच्या मते अतिशय महत्त्वाचा लिफाफा म्हणजे सतरा सी. यातील बराच भाग कालच भरलेला होता. मतदान केंद्राचे क्रमांक, नाव, कंट्रोल युनिट क्रमांक, मतदान युनिट क्रमांक, एकूण मतदारांची संख्या, प्रदत्त मतपत्रिका क्रमांक, कागदी मोहरांचा हिशोब इ. दुसरा लिफाफा होता केंद्राध्यक्षांनी दिलेल्या घोषणापत्रांचा. मतदान सुरू करण्यापूर्वी, मतदान सुरू झाल्यावर व मतदान समाप्तीच्या वेळी घोषणा करावयाच्या होते. चौथं घोषणापत्र निरंक होता. यंत्रात काही बिघाड झाला आणि दुसरं नवीन मशीन मागविलं तर ते घोषणापत्र करावयाचं होतं. घोषणापत्रावर केंद्राध्यक्षांच्या व उमेदवार प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या ताकलोड सरांनी काल काही व सकाळी काही घेऊन टाकल्या होत्या. त्याचा एक वेगळा लिफाफा करण्यात आला. तिसरा लिफाफा होता दैनंदिनींचा. मतदान केंद्रात मतदान घेण्याच्या संबंधांतील कार्यवाहीसंबंधी, त्या प्रयोजनासाठी असलेल्या दैनंदिनीत भोसलेंनी वेळोवेळी नोंदी घेतलेल्या होत्या. त्याचा स्वतंत्र लिफाफा करण्यात आला. व्हिजीट बुक (भेटपत्र-निळे पॉकीट)मध्ये झोनल ऑफिसर सोडून कोणीही मतदान केंद्रास भेट न दिल्यानं त्यांची असलेली भेट नोंद वही व वरील सोळा मुद्यांचा कागद एकत्र करून त्या दोन्हीचा एक लिफाफा तयार करण्यात आला.

वैधानिक व अवैधानिक लिफाफे सीलबंद केल्यानंतर भोसलेंनी इतर साहित्य असलेला लिफाफा भरण्यास सुरुवात केली. ज्यामध्ये धातूची मोहोर, बाणफुलीचा रबरी शिक्का, साधी पेन्सिल, बॉलपेन, टाचण्या, लाख, मेणबत्ती, जाडदोरा, धातुची पट्टी, कार्बन पेपर, पक्या शाईची बाटली ठेवण्यासाठी दिलेला कप, आगपेटी, शाई असलेले पॅड इ. वस्तू एका मोठ्या कापडी पिशवीत टाकणं अपेक्षित होतं. त्यासोबतच साहित्याच्या यादीत नसलेले पण अपवादात्मक परिस्थितीत कर्मचारी व मतदारांना वैदिक सेवा म्हणून मिळालेली प्रथमोपचार पेटीही त्यात टाकणं आवश्यक होतं. वैधानिक व अवैधानिक लिफाफे मोहोरबंद करताना कोणीही काहीच बोललं नाही, पण इतर साहित्य पिशवीत टाकताना ताकलोड सर म्हणाले,

‘साहेब, यातील धातूची मोहोर व बाण फुलीचा रबरी शिक्का सोडलं तर तिथं साहित्य घेताना यातील दुसरं काहीच तपासत नाहीत.’ भोसले सरांना ताकलोड सरांची भाषा समजली नाही म्हणून ते सहज म्हणाले, ‘तपासो, न तपासो, आपल्याला काय? एकदा त्यांच्या हवाली केलं की आपण मोकळे.’

वाघमारे सरांच्या लक्षात आलं की, ताकलोड सरांना काय म्हणायचं आहे ते भोसले सरांना कळालं नसेल म्हणून ते स्पष्ट म्हणाले,

‘ताकलोड सर, तुम्हाला काय म्हणायचं आहे? तिथं तपासत नाहीत हे साहेबांना सोडून आपल्या सगळ्यांना माहीत आहे. यातील कोणती वस्तू पाहिजे असेल तर ठेवून घ्या. तिथं कचरापेटीतच जाणार आहे.’

‘खरंच, मला नक्की माहीत नाही. तसे तपासत नसतील तर ताकलोड सर, एखादी वस्तू ठेवून घ्या.’

भोसलेंची परवानगी मिळताच ताकलोड सरांनी झडप घालून शाई असलेलं पॅड व मेडिकल किटमधील डेटॉल बॉटल काढून घेतली. वाघमारे सरांनी पाठोपाठ त्याच किटमधील पेनकिलरच्या गोळ्या व ट्यूब आपल्या बॅगमध्ये टाकली. राठोड सरांनीही भीत-भीत मेडिकल किटमधील जखमांवर बांधावराची पट्टी व सेलोटॅप जवळ ठेवून घेतला. सेवकांनी त्याच्या पोरासाठी पेन्सिल व बॉलपेन मागवून घेतला. होमगार्डनी मेणबत्ती हातात घेतली. थोडक्यात सर्वांनी मिळून निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रासाठी दिलेलं साहित्य हडप केलं. भोसले मनातल्या मनात गुणगुणायला लागले...

राठोड वाघमारे ताकलोड । सेवक अधिकारी होमगार्ड ।

सगळ्यांनी टाकली धाड । वर्णन करावे कोठवरी ॥1॥

नशीब येथील मतदाराचे । अति खडतर होते साचे ।

लक्ष्य होते निकालाचे । काय मागावे यापरि ॥2॥

भ्रष्ट नेता निवडून येई । अफाट पैसा मिळविला जाई ।

परी ही प्रथा बरी नाही । समाज जाईल रसातळा ॥3॥

सर्व साहित्य व पेट्या आवरून भोसले आणि कंपनी बसची वाट पहात बसले होते. रात्रीचे साडेआठ वाजले होते.

बसचा पत्ता नव्हता. एक-दोन वेळा भोसलेंनी बसचालकास फोन केला. ‘जवळ-जवळ आलो आहोत’ असंच उत्तर मिळालं होतं. त्या परिसरातील इतर दोन मतदान केंद्रांची टीमही येऊन रांच्यात सामील झाली...

.............................................................................................................................................

कंट्रोल युनिट - शंकर विभुते, शब्दालय प्रकाशन

या पुस्तकाच्या ऑनलाइन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4298

.............................................................................................................................................

लेखक डॉ. शंकर विभुते नांदेडमधील यशवंत महाविद्यालयाच्या मराठी विभागात प्राध्यापक आहेत.

shankarnvibhute@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......