तब्बू सिर्फ एक नाम नहीं, एक सेंटिमेंट है!
संकीर्ण - पुनर्वाचन
अमोल उदगीरकर
  • तब्बू
  • Tue , 25 December 2018
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar तब्बू Tabu

पाहता पाहता २०१८ हे वर्ष संपत आले. बरोबर एका आठवड्यानंतर २०१९ सुरू होईल. नव्या वर्षांत पर्दापण करताना मागच्या वर्षाचा ताळेबंद मांडून पाहणं गरजेचं असतं. तसं या वर्षांत खूप काय काय घडलं. खूप विषय चर्चेत आले, खूप विषयांवर वाद झाले. काही विषय चर्चेयोग्य असूनही चर्चेत आले नाहीत आणि काही वादग्रस्त विषय असूनही ते पुरेसे पुढे आले नाहीत. तसा या वर्षाचा लसावि-मसावि काही फारसा समाधानकारक नाहीच. या वर्षांत चर्चेत आलेल्या आणि ‘अक्षरनामा’वर त्या त्या महिन्यात सर्वाधिक वाचल्या गेलेल्या जानेवारी ते डिसेंबर या महिन्यातल्या १२ लेखांचा हा ‘पुनर्भेट विशेषांक’. त्यातला हा सप्टेंबर २०१८मधला नववा लेख...

............................................................................................................................................

तबस्सुम फातिमा हाश्मीला सगळा देश ‘तब्बू’ या सुटसुटीत नावानx ओळखतो. पण इंडस्ट्रीमध्ये तिला अनेक टोपणनावांनी ओळखलं जातं. काही लोक तिला ‘टॅब्ज’ म्हणतात, काही ‘टबी’ म्हणतात, काही जवळचे लोक ‘Toblerone’ नावानं ओळखतात. तब्बूलाही हेच नाव सगळ्यात जास्त आवडत असावं. कारण तिच्या मेल आयडीमध्येही हा शब्द आहे. ‘Toblerone’ हा जगद्विख्यात स्वीस चॉकलेट ब्रँड आहे. चॉकलेटचे दर्दी या ब्रँडला ओळखतात, त्याच्या जिभेवर रेंगाळत राहणाऱ्या अवीट गोडीमुळे!

तब्बूचं रूढीप्रिय पारंपरिक भारतीय समाजात अभिनेत्री म्हणून कार्यरत असणं आणि आपल्या अटींवर आयुष्य जगणं हे अनेकांना फॅसिनेटिंग वाटतं. तब्बू अशा धर्मातून  आहे, जिथं स्त्रिया अनेक अन्यायकारक रूढी परंपरांचा सामना करतात. अर्थात भारतात बहुतेक जाती धर्मांमध्ये हीच परिस्थिती आहे.

एका फिल्मी पार्टीमध्ये एका प्रसिद्ध गायकानं (किस्सा ऐकीव आहे, त्यामुळे नाव घेणं योग्य नाही)  तब्बूला ‘तू बुरखा का घालत नाहीस?’ असा प्रश्न विचारला होता. तेव्हा तिनं त्याला पद्धतशीर चारचौघात अपमानित केलं होतं.

तब्बू ही बहुतेक अशी एकमेव भारतीय अभिनेत्री असावी, जिच्याबद्दल एकाच वेळेस मासेसमध्ये आणि बुद्धिजीवी वर्गामध्ये प्रचंड आकर्षण आहे. अनेक गंभीर आव्हानात्मक भूमिका करणारी तब्बू दक्षिणेतल्या मसाला सिनेमांमध्ये कॉमन पब्लिकला आवडतील अशा भूमिकाही करते. उत्तर चाळीशीमध्ये असून तब्बूनं अजूनही लग्न केलेलं नाही. प्रसारमाध्यमांना तब्बू चार हात अंतरावरच ठेवते. तब्बू कुठल्याही सोशल मीडियावर नाही. तब्बू कुठलंही वादग्रस्त विधान करण्याच्या फंदात पडत नाही. फिल्मी पार्ट्यांमध्ये रमत नाही. सेटवर पॅकअप झालं की, ती सरळ आपलं घर गाठते. आपल्या वैयक्तिक अवकाशाच्या दुलईमध्ये स्वतःला गुरफटून घेण्यासाठी. या शेहेचाळीस वर्षीय स्त्रीचं आयुष्यच बाई असण्यासंबंधीचे आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणाऱ्या अभिनेत्रींबद्दलचे  stereotypes फाट्यावर मारण्यात गेलं आहे. तब्बूचं आपल्या समाजात कार्यरत असणं महत्त्वाचं आहे ते यामुळं.

तब्बू जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आली, तेव्हा अजून एक घराणेशाहीमधून आलेली अभिनेत्री इतकंच आणि इतकंच तिच्याबद्दल लोकांचं मत होतं. तब्बूची आई स्वतः अभिनेत्री होती. तिची मोठी बहीण फराह काही काळ आघाडीची अभिनेत्री होती. पण फराह काही फार प्रयोगशील अभिनेत्री होती अशातला काही प्रकार नव्हता. ऐंशीचं दशक हे बॉलिवुडच्या इतिहासातलं सगळ्यात सुमार दशक मानलं जातं. फराहची फिल्मोग्राफी बघितली तरी याचा अंदाज येतो. घरात अशी अभिनयाची पार्श्वभूमी असल्यानं तब्बू अभिनयात येणार असं तिच्या आजूबाजूच्या लोकांनी गृहीत धरलेलं होतं.

बालकलाकार म्हणून तब्बूनं काही सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यापैकी एक होता देव आनंदचा ‘हम नौजवान’. तोपर्यंत देव आनंद यांच्या कारकिर्दीचा संध्याकाल सुरू झाला होता. एके काळी ‘क्लासिक’ सिनेमे देणारे देवसाहेब आता ट्रॅशी सिनेमे बनवायला लागले होते. ‘हम नौजवान’ हा असाच एक ट्रॅशी सिनेमा होता. सिनेमा म्हणून तो भयाण होताच, पण त्यात तब्बूवर चित्रित झालेले एक-दोन प्रसंग त्याहून भयाण होते. मी ‘भयाण’ हा शब्दप्रयोग का करत आहे, हे कळण्यासाठी तुम्हाला ते प्रसंग युट्युबवर जाऊन बघावे लागतील.

तब्बूनं मुख्य अभिनेत्री म्हणून साईन केलेला पहिला सिनेमा म्हणजे ‘प्रेम’. त्या काळी आघाडीचा दिग्दर्शक असणारा सतीश कौशिक ही फिल्म करत होता. नायक होता अनिल कपूरचा भाऊ संजय कपूर. पण हा सिनेमा इतका रखडला की, मागून सुरू झालेले तब्बूचे सिनेमे अगोदर प्रदर्शित झाले. तब्बूचा पहिला प्रदर्शित सिनेमा होता ऋषी कपूरसोबतचा ‘पहेला पहेला प्यार’. तो आपटला. ‘प्रेम’ रखडून रखडून प्रदर्शित झाला. तोही आपटला. अजय देवगणसोबतचा ‘विजयपथ’ बऱ्यापैकी चालला. पण नंतर सुमार सिनेमांची मालिकाच सुरू झाली. निर्माता दिग्दर्शक तिला अभिनेत्री म्हणून गांभीर्यानं घेत नव्हते आणि तब्बूही स्वतःला अभिनेत्री म्हणून कितपत गांभीर्यानं घेते असा प्रश्न पडावा अशी परिस्थिती होती. 

पहिल्यांदा तब्बूची दखल घेतली ती प्रियदर्शनच्या ‘सजा-ए-कालापानी’मध्ये. अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची कथा सांगणाऱ्या या सिनेमात तब्बू मोहनलाल, अमरीश पुरी आणि अन्नू कपूर यांच्यासारख्या दिग्गज अभिनेत्यांसमोर झाकोळून गेली नाही. आपली छोटी भूमिका या बड्या अभिनेत्याचं दडपण न घेता तिनं छान केली. त्याच वर्षी गुलज़ारचा ‘माचिस’ प्रदर्शित झाला आणि तब्बूकडे बघण्याचा सगळ्यांचा नजरियाच बदलून गेला. ‘माचिस’ हा आपल्याकडे जे तुरळक राजकीय सिनेमे बनले आहेत, त्यातल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. खलिस्तान चळवळीमुळे पंजाबमध्ये एक अख्खी पिढी उदध्वस्त झाली. त्याचं अस्वस्थ करणारं चित्रण ‘माचिस’मध्ये आहे. त्या अस्वस्थ कालखंडात पंजाबमध्ये लाखो स्त्रियांची ससेहोलपट झाली. तब्बूची वीरा या लाखो महिलांचं सिनेमात प्रतिनिधित्व करते. 

तब्बूच्या संवेदनशील अभिनयानं एका कसदार अभिनेत्रीचं आगमन झालं आहे याची नांदी झाली. तब्बूला या कामगिरीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तोपर्यंत शबाना आझमीची अभिनेत्री म्हणून कारकीर्द शेवटच्या टप्प्यात होती. अभिनयापेक्षा तिनं समाजसेवेमध्ये लक्ष केंद्रित केलं होतं. तब्बूच्या समकालीन असणाऱ्या करिष्मा कपूर, रवीना टंडन, ममता कुलकर्णी यांना आशयघन सिनेमा करण्यात रस नसावा. पडद्यावर कचकडयांच्या बाहुल्या साकारण्यातच त्यांना रस होता. तब्बूला स्पर्धा असलीच तर ती मनीषा कोईरालाकडून होती. पण अंगी गुणवत्ता असूनही वैयक्तिक आयुष्यातलं अस्थैर्य आणि प्रोफेशनलिझमचा अभाव यामुळे तिच्यावर प्रश्नचिन्ह होतं. नायिकांच्या या भाऊगर्दीत तब्बूनं आपला ठसा इतका खोलवर कसा उमटवला, याचं उत्तर तिच्या अपारंपरिक निवडींमध्ये आहे, तेवढंच तिच्या समकालीन अभिनेत्रींच्या अभिनेत्री म्हणून महत्त्वाकांक्षी नसण्यातही आहे. ऑस्कर वाईल्डला  ‘Why was I born with such contemporaries?’ असा विषाद वाटायचा. तब्बूला तसा विषाद कधी वाटला नसेल.

आजकाल वरुण धवन या अभिनेत्याचं व्यवसायिक सिनेमा आणि बॉक्स ऑफिसची गणित न पाळता बनवलेला सिनेमा यांची योग्य सांगड घालण्याबद्दल नेहमी कौतुक होतं. म्हणजे एखादा ‘जुडवा’ करताना वरुण एखादा ‘ऑक्टोबर’ही करतो. ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’ करताना तो ‘बदलापूर’ही करतो. असलंच काहीसं बिझनेस मॉडेल तब्बूनं त्या काळात विकसित केलं होतं. ज्या वर्षी तब्बूला ‘माचिस’साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला, त्याच वर्षी तिनं गोविंदा-डेव्हिड धवनसोबत ‘साजन चले ससुराल’सारखा मसाला चित्रपट केला होता. एकाच वर्षी ‘हुतुतू’ आणि ‘बीवी नंबर वन’सारखे दोन टोकांवरचे चित्रपट तिनं केले आहेत.

ज्या वर्षी ती अतिशय आशयघन हिंग्लिश सिनेमे करते, त्याच वर्षी ती वेंकटेश-नागार्जुन सोबत टिपिकल दाक्षिणात्य मारधाडपट करते. एकाच वेळेस मासेस आणि क्लासेसला सांभाळण्याचं तब्बूचं कौशल्य वादातीत आहे. तब्बूनं ज्या दिग्दर्शकांसोबत काम केलं आहे, त्याच्यातही थक्क करणारं वैविध्य आहे. गुलज़ार, विशाल भारद्वाज, एम. एफ. हुसेन यांच्यासारख्या दिग्दर्शकांसोबत प्रायोगिक सिनेमे करणाऱ्या तब्बूनं रोहित शेट्टी (गोलमाल अगेन), डेव्हिड धवन, गुड्डू धनोआ यांच्यासारख्या पूर्णपणे मसाला सिनेमे बनवणाऱ्या दिग्दर्शकांसोबतही काम केलं. त्याचबरोबर प्रियदर्शन, मधुर भांडारकर (चांदनी बार), आर. बाल्की (चिनीकम) यांच्यासारख्या मध्यममार्ग काढणाऱ्या दिग्दर्शकांसोबतही काम केलं आहे. प्रियदर्शन आणि डेव्हिड धवनसारख्या दिग्दर्शकांनी तब्बूसोबत अनेक चित्रपट केले आहेत. मीरा नायर (नेमसेक) आणि अंग ली (लाईफ ऑफ पी) सारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या दिग्दर्शकांनाही तब्बूसोबत काम करण्याचा मोह आवरलेला नाही.

तब्बू मला सगळ्यात जास्त आवडते विशाल भारद्वाजच्या सिनेमांमध्ये. ‘मकबूल’ हा विशाल भारद्वाजच्या कारकिर्दीतला आणि एकूणच भारतीय चित्रपटांच्या इतिहासातला एक फार महत्त्वाचा सिनेमा आहे. शेक्सपियरच्या कलाकृतीचं हे सर्वोत्कृष्ट ‘adoption’ असावं. मला व्यक्तिशः असं वाटत की, निम्मी, मकबूल, अब्बाजी ही पात्रं मूळ कलाकृतीपेक्षा या सिनेमात सरस उतरली आहेत. आयुष्याच्या काही शेवटच्या क्षणांमध्ये निम्मी मकबूलला आवेगानं विचारते, ‘हमारा इश्क तो पाक था ना मियाँ? पाक था ना हमारा इश्क? बोलो ना.’ तेव्हा प्रेक्षकांनाच त्या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असतं. ‘मकबूल’ ही जितकी मकबुलची ट्रॅजेडी आहे, तितकीच तब्बूनं साकारलेल्या निम्मीचीही आहे. तब्बूचा ‘मकबूल’मधला हा परफॉर्मन्स तिच्या आयुष्यातला सर्वोत्कृष्ट असावा.

‘हैदर’चं कथानक काश्मीरमध्ये नेऊन विशालनं वेगळाच मास्टरस्ट्रोक खेळला आहे. या सिनेमात विशालनं काश्मीरचा सिनेमाच्या सेटसारखा वापर केल्याचं दिसतं. ‘हॅम्लेट’मध्ये डेन्मार्कचे ‘rotten state of Denmark’चे उल्लेख आहेत. भारतीय परिप्रेक्ष्यात काश्मीरशिवाय अजून कुठलं राज्य याच्याशी साधर्म्य साधणारं नसेल. हॅम्लेटमध्ये पात्रांच्या संवादात ‘state of emergency’चे उल्लेख येतात. ‘हैदर’मध्ये ‘Armed forces special powers act’ आहे. गजाला या असुरक्षित वातावरणात टिकाव धरण्यासाठी स्वतःच्या नवऱ्याला बाजूला करून त्याच्या भावाशीच लग्न करते. स्वतःच्या काकाचा काटा काढण्यास आणि वडिलांचा शोध घेण्यास अपयशी ठरलेल्या हैदरची असहाय्य्यता अंगावर यायला लागते. त्याला ‘rotten state of Kashmir’ कारणीभूत आहेच. तब्बूनं साकारलेली गजाला ही अतिशय आकर्षक आहे. पुरुष तिच्याकडे आकर्षित होण्यापासून स्वतःला थांबवूच शकत नाहीत. अगदी हैदर आणि गजालाच्या नात्यातही आकर्षणाच्या छटा आहेत. ‘हैदर’ म्हणजे भारतीय सिनेमात इडिपस  कॉम्प्लेक्स इतका प्रत्यक्षपणे दाखवल्याचं पहिलंच उदाहरण. याचं श्रेय अर्थातच दिग्दर्शक विशाल भारद्वाजला. पण ते अतिशय तरलपणे दाखवण्याचं श्रेय शाहिद आणि तब्बूला.

एक प्रसंग आहे. हैदर घरात येतो तेव्हा गजाला आरशात बघत असते. हैदर म्हणतो, ‘क्या जहर खूबसूरत लग रही हो अम्मी आप.’ या गूढ आकर्षक आणि लोकांना उद्धवस्त करणाऱ्या गजालाचा रोल तब्बूचं करू शकते.

‘द नेमसेक’ हा तब्बूचा अजून एक अप्रतिम सिनेमा. या सिनेमात एक प्रसंग आहे. अशीमावर  अशोकच्या (इरफान) मृत्यूची बातमी आकस्मिकपणे आदळते, तेव्हा ती फोनवर असते. ती बातमी कानावर पडल्यावर तिला काय करावं ते सुचतच नाही. ती तशीच अनवाणी पळत पळत रस्त्यावर येते. थंडगार रस्त्यावर तशीच आभाळाकडे बघत बसते. तिच्या आयुष्यातला आभाळाचा एक तुकडा कायमचा तुटला आहे. तब्बू ही किती अप्रतिम अभिनेत्री आहे, हे या प्रसंगात कळतं.

‘चिनी कम’मध्ये काही प्रसंगांमध्ये चक्क बच्चनला भारी पडते. ‘विरासत’मध्ये अनिल कपूरला लग्नाच्या पहिल्या रात्री गाणं म्हणून दाखवते, तो प्रसंगही ‘दर्द’ आहे. तिच्या सगळ्याच चांगल्या भूमिकांचा आढावा घ्यायचा तर एक छोटा थिसिसच लिहावा लागेल.

कुठल्याही कलाकाराचं मूल्यमापन करताना त्याच्या वैयक्तिक आयुष्याची दखल घेणं आवश्यक आहे की नाही असा एक सनातन वाद आहे. मला वाटतं तशी ती दखल घ्यावी. कारण वैयक्तिक आयुष्यात कलाकार काय निवडी करतो, काय स्टँड घेतो यावर त्याची कलाकार म्हणून जडणघडण कशी होते, हे अवलंबून असते. तब्बूनं कधी लग्न केलं नसलं तरी तिच्या आयुष्यात काही पुरुष येऊन गेले. संजय कपूर, साजिद नाडियादवाला ही यातली काही ठळक नावं. पण नागार्जुन हा तब्बूच्या आयुष्यातला फार महत्त्वाचा टप्पा आहे. अर्थात या दोघांनी कधीही उघडपणे आपण रिलेशनशिपमध्ये आहोत याची कबुली दिलेली नाही. पण एका वर्तुळातलं हे उघड गुपित आहे. तब्बू नागार्जुनच्या परिवाराचा एक हिस्सा आहे. ती अनेकदा नागार्जुनच्या हैद्राबादच्या घरी दिसते. मुख्य म्हणजे अमला, नागार्जुनच्या पत्नीचाही याला काही आक्षेप नसावा. तब्बूला पण नागार्जुनसोबतच्या नात्याला काही नाव देण्याची गरज वाटत नाही. हे नातं तिला मुक्तपणे विहरण्याचं स्वातंत्र्य देत असावं आणि हेच तिच्यासाठी महत्त्वाचं असावं.

मीरा नायर तब्बूला भारताची ‘मेरील स्ट्रीप’ म्हणते. खरं तर मला हे भारतीय कलाकारांना हॉलिवूडच्या कलाकारांचं नामाभिमान देणं कधीच पटलं नाही. म्हणजे मला ते थोडं उथळ वाटतं. उदाहरणार्थ अनिल कपूरला भारताचा ‘टॉम क्रूझ’ म्हणणं असले उथळ आणि दोन्ही अभिनेत्यांवर अन्याय करणारे प्रकार त्यात घडतात. पण तब्बूच्या बाबतीत मीरा नायरचं विधान पटतं. फक्त मेरील स्ट्रीप उघड राजकीय भूमिका घेते. तब्बू तसं करत नाही हाच फरक. तब्बू ही मेरील इतकीच वैविध्य असणारी नटी आहे. अभिनेत्री म्हटलं की कुठल्या वयात काय करायला हवं, शरीरयष्टी कशी असावी, माध्यमांसमोर कस वागावं असे जे काही स्टिरीओटाइप्स तयार झाले आहेत, ते मेरील आणि तब्बूपाशी येऊन थांबतात.

आता नुकतंच श्रीराम राघवनच्या ‘अंधाधुन’चं ट्रेलर रिलीज झालं. सिनेमात आयुषमान खुराणा, राधिका आपटे हे नेहमीचे यशस्वी चेहरे आहेतच. पण पुन्हा त्यात तब्बू आहे म्हणजे सिनेमा चांगलाच असणार असं एक फिलिंग मनात दाटून आलं. सिनेमात तब्बू आहे म्हणजे तो चांगलाच असणार असं आपल्याला नेमकं कधीपासून वाटायला लागलं याचा धांडोळा घ्यायला लागलो तर लक्षात आलं की, याची मूळ खूप जुनी आहेत. बहुतेक आपल्याला सिनेमातल कळायला लागलं तिथपर्यंत हे जातं. नाहीतर मधुर भांडारकर नावाच्या तेव्हा अज्ञात असणाऱ्या आणि सकृतदर्शनी बी ग्रेडचा फील देणाऱ्या सिनेमाला आपण फर्स्ट डे फर्स्ट शो का गेलो असतो!

‘चिनी कम’ मी बच्चनपेक्षा तब्बूसाठी जास्त बघितला होता हे खूप नंतर जाणवलं. वर्षानुवर्षं शांतपणे चांगलं काम करणाऱ्या लोकांना दुर्लक्षाने मारणं हा असाही आपला राष्ट्रीय खेळ आहे. तब्बूला आपण असंच वर्षानुवर्षं गृहीत धरलं आहे. पण तिला पण कुणाच्या सर्टिफिकेटची गरज नसावी. पण ‘अंधाधुन’ बघायला थेटरात जाईल आणि तिथल्या मोहक अधांरात तब्बूची पडद्यावर एंट्री होईल, तेव्हा तिच्याविषयी अभिमान वाटण्याचं अजून एक कारण मिळेल हे नक्की!

.............................................................................................................................................

लेखक अमोल उदगीरकर फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.      

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Sumitra Shinde More

Sat , 05 January 2019

आपल्या आवडत्या महेश मांजरेकरानी दिग्दर्शित केलेला अस्तित्व या हिंदी सिनेमात पतीशी आयुष्यभर समर्पित भावनेने जीवन व्यतीत करणारी शांत व समंजस गृहिणी ,पण आपल्या चरित्र्याबद्दल प्रश्न विचारून चारचौघात अपमान करणाऱ्या पतीला उतार वयात सोडचिठ्ठी देऊन आत्मसन्मानाची निवड करते स्वाभिमानी व तडफदार स्त्री ची तब्बू या चित्रपटातील ही भूमिका चित्रपट क्षेत्रातील दुर्मिळ म्हणूनच कायम स्मरणात राहते..


shraddha Pednekar

Fri , 28 December 2018

मस्तच ,गेली अनेक वर्ष तब्बूबद्दल जे वाटत होतं त्याचा अभ्यासपूर्ण लेख


arun tingote

Thu , 27 December 2018

खूप सुंदर लिहिल आहे. खुद्द तब्बूलाही हे लिखाण प्रचंड आवडेल.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......