परवा पृथ्वीतलावर ‘महाराष्ट्र’देशी ‘मराठी भाषा गौरव दिन’ उर्फ ‘मराठी भाषे’चं ‘वर्षश्राद्ध’ थाटामाटात, समारंभपूर्वक साजरं करण्यात आलं!
संकीर्ण - व्यंगनामा
एक अगतिक मराठी माणूस
  • प्रातिनिधिक चित्र
  • Thu , 29 February 2024
  • संकीर्ण व्यंगनामा मराठी भाषा गौरव दिन Marathi Bhasha Gaurav Din मराठी भाषा Marathi Bhasha

महाराष्ट्रदेशात अशी एक वदंता सांगितली जाते की, कविवर्य कुसुमाग्रजांनी फार वर्षांपूर्वी मराठी भाषा फाटकी वस्त्र लेवून मंत्रालयाच्या दारात उभी आहे, असं म्हटलं होतं म्हणे! कुसुमाग्रज हे मराठीतले मोठे कवी आणि नाटककार. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर तत्कालीन राज्य सरकारने त्यांच्या म्हणण्याची तातडीनं दखल घेऊन २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस दरवर्षी राज्य सरकारतर्फे ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जाईल, असा फतवा काढला. त्यानंतर तो काही दिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून सरकारी, निमसरकारी आणि बिगरसरकारी पातळीवरून साजराही झाला.

दरम्यानच्या काळात सोशल मीडिया नावाच्या गोष्टीचा जन्म झाला. हा मीडिया प्रस्थापित मीडियापेक्षा खूपच वेगळा असल्यानं आणि तिथं जन्मापासून मरणापर्यंत, वाढदिवसापासून वर्षश्राद्धापर्यंत, ढेकरापासून हागण्यापर्यंत, द्वेषापासून हत्येपर्यंत, ‘झोल’पासून ‘ट्रोल’पर्यंत प्रत्येक गोष्ट साजरी करता येते, याचा शोध जनसामान्यांना तसंच सरकारला लागला. ते लक्षात घेऊन तत्कालीन सरकारने ‘मराठी भाषा दिना’चा ‘मराठी भाषा गौरव दिन’ केला, असं सूत्रानं दिलेल्या माहितीवरून समजतं.

हल्ली सरकार कुणाचंही असो (खरं तर ते सगळ्याच राजकीय पक्षांचं असतं, विरोधी पक्षातले कधी सत्ताधारी पक्षात जातील, याचा महाराष्ट्रदेशी कुठलाही भरवसा राहिलेला नाही, असं एकंदरित बारकाईनं पाहिलं की, दिसतं), सगळा कारभार ‘सूत्रधारां’च्याच हातांत असतो. हे सूत्रधार सरकारात नेमके कुठल्या पदावर असतात, हे बराच शोध घेऊनही प्रस्तुत बातमीदाराला समजू शकलेलं नाही, पण सगळी ‘सूत्रं’ हे ‘सूत्रधार’च हलवतात, अशी विश्वसनीय बातमी ‘सूत्रधारां’नी दिली.

याच सूत्रधारांपैकी एकानं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर असंही सांगितलं की, कविवर्य कुसुमाग्रजांनी मंत्रालयाच्या दारात फाटकी वस्त्र लेवून उभ्या असलेल्या मराठी भाषेबद्दल सांगितलं होतं, ती अजून तिथंच उभी आहे. त्या मराठी भाषेच्या अंगावरील फाटक्या वस्त्राची आता अक्षरक्ष: लक्तरं झाली आहेत आणि त्यातून तिचं अंगप्रत्यंग जागोजागी दिसू लागलं आहे. ते झाकण्याचा प्रयत्न ही मराठी भाषा अजिबात करत नाही, त्यामुळे मंत्रालयात जाणाऱ्या-येणाऱ्यांचं लक्ष विचलित होतं आणि त्यांच्याकडून आगळीक घडते.

त्यालाच काही कर्मदरिद्री लोक मराठीची मंत्रालयाच्या दारात राजरोस ‘विटंबना’ होत असल्याची हाकाटी पिटतात. पण ही हाकाटी असली तरी ती फार क्षीण आवाजात आणि सरकारला कुठेही बोचणार नाही, अशा मुलामय, मधाळ स्वरूपातच केली जाते. कारण विद्यमान सरकारच्याच काळात मराठीची ‘विटंबना’ होतेय, असा पक्षपाती आरोप कुणी जाहीरपणे केला रे केला की, सरकारने त्याची दखल घेऊन प्रतिवाद करेपर्यंत सरकारसमर्थक फेसबुकवासीय, व्हॉटसअ‍ॅप विद्यापीठातील स्नातक आणि स्वयंघोषित सरकार-संस्कृतीसंरक्षक त्या टीकाकारांचा ‘निकाल’ लावतात म्हणे!

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

आणि ही दडपशाही असल्याचं समजायचं काही कारण नाही, कारण तशी मराठी जनतेचीही भावनाही नाही, असंही समजतं. कारण ही गोष्ट त्यांच्या इतकी अंगवळणी पडली आहे की, ही विद्यमान महाराष्ट्रदेशातली दैनंदिन स्वरूपाची एक ‘सामान्य’ घटना असल्याचं सांगितल जातं.

तर मुद्दा असा की, हे केवळ याच सरकारचं वैशिष्ट्य आहे असं नाही. या आधीच्या, त्या आधीच्या, त्याच्याही आधीच्या आणि त्याच्याही आधीच्या आधीच्या सरकारचंही हेच वैशिष्ट्य असल्याचं त्या सूत्रधाराचं म्हणणं पडलं. एकसमयावच्छेकरून जे सगळ्यांचं वैशिष्ट्य होतं, त्याला महाराष्ट्रदेशात ‘सरकारी संस्कृती’ म्हणतात, असाही एक मुद्दा या सूत्रधारांनी बोलण्याच्या ओघात शेवटी शेवटी सांगितला.

महाराष्ट्र-संस्कृतीच्या काही अभ्यासकांच्या मतानुसार ‘विटंबना’ हा ‘विडंबना’ या शब्दाचा प्रतिशब्द आहे. काळानुसार भाषाही बदलते असं गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रदेशातले भाषाशास्त्रज्ञ सांगत आले आहेत. महाराष्ट्रदेशात तर म्हणे दर पाच मैलावर मराठी भाषेचं एक नवीनच रूप पाहायला मिळतं. मराठीच्या विविध बोली असल्याचं संशोधन महाराष्ट्रदेशात अनेक संशोधकांनी केलेलं आहे. त्यांतून प्रमाण मराठी भाषेत बरीच देवघेव चालू असते. तसंच ती हिंदी, उर्दू, तमीळ, कन्नड, तेलुगु, गुजराती, पंजाबी, राजस्थानी अशाही भाषांतून चालू असते.

‘संस्कृत’नामक देवांची एक भाषा होती, असा ऐतिहासिक संशोधनानुसार दावा केला जातो. त्या भाषेतून तर मराठी भाषेनं खूपच उसनवारी केली असल्याचेही साधार पुराव्यानिशी सिद्ध झालेलं आहे. याशिवाय फार्शी, अरबी, इंग्रजी वगैरे परकीय भाषांचाही मराठीवर बराच प्रभाव असल्याचीही संशोधनं सिद्ध झालेली आहेत. त्यामुळे ‘विडंबना’ हा शब्द नेमका कुठल्या भाषेतून मराठीत आला आणि तो नेमका कधीपासून ‘विटंबना’ या शब्दाचा प्रतिशब्द म्हणून वापरला जाऊ लागला, याचं संशोधन अजून पुरेशा साधार पुराव्यानिशी झालेलं नाही. पण काही अभ्यासकांच्या मते हा शाब्दिक बदल उत्तर भारताने महाराष्ट्रदेशाला दिलेली एक अमूल्य अशी देणगी आहे.

कधी काळी महाराष्ट्रदेशी ‘पावित्र्य-विडंबना’विरोधात अश्लीलमार्तंड कृष्णराव मराठे यांनी चळवळ उभारली होती. नंतरच्या काळात नंतरच्या संस्कृतीधुरिणांनी त्या चळवळीला काळानुरूप वेगळं वळण देऊन ती ‘अश्लीलता विरोधी चळवळ’ केली. अलीकडच्या काळात या चळवळीचं रूपांतर ‘नव्या बाटतील जुनी दारू अर्थात शब्दच्छलाची चळवळ’ या नव्या वळणात झालेलं दिसून येतं, असं सांगितलं जातं. त्या चळवळीच्या प्रभावामुळेच ‘विडंबना’ या शब्दाऐवजी सरकारी पातळीवर ‘विटंबना’ हा शब्द वापरला जातो.

हा नवा शब्द वापरण्यामागचं एक कारण असं सांगितलं जातं की, ‘महाभारत’ हे महाकाव्य भारतीय संस्कृतीचा एक अविभाज्य भाग आहे, पर्यायानं महाराष्ट्रदेशातल्या महाराष्ट्र-संस्कृतीचाही. या महाभारतात पांडवांची धर्मपत्नी द्रौपदीचं वस्त्रहरण, कौरवांची राजधानी हस्तिनापूरच्या राजदरबारात जाहीरपणे केलं गेलं. ते पांडवांना कौरवांनी द्युतात हरवल्यामुळे झालं. त्यामुळे द्रौपदीला नेसत्या वस्त्रांनिशी दरबारात फरपटत आणून तिचं वस्त्रहरण केलं गेलं. हा प्रकार तसा न्यायाला धरून झाला. (काही खुसपटखोर लोक या द्युताचे डाव शकुनीमानाने कपटीपणाने खेळून पांडवांना हरवलं असंही सांगतात! पण तो प्रक्षेप आहे, असं काही अभ्यासक म्हणतात!!) तर या धर्मकृत्यासाठी ‘विटंबना’ असा उचित शब्दप्रयोग केला असल्याचं आढळतं. त्यामुळे तो संदर्भ लक्षात घेऊन सरकारी पातळीवर जे काही केलं जातं, त्यासाठी ‘विटंबना’ हाच शब्दप्रयोग उचित उर्फ यथायोग्य उर्फ सार्थ असल्याचा अलिखित वटहुकूम महाराष्ट्रदेशी विद्यमान सरकारनं काढला असल्याचं सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून दिसतं.

ही ‘विटंबना’ कशाकशाची आहे, असं प्रस्तुत बातमीदारानं सूत्रधाराला विचारलं, तेव्हा असं उत्तर मिळालं की, लोकशाहीची, कल्याणकारी धोरणांची, न्यायाची, स्वातंत्र्याची, सत्याची, समतेची, बंधुतेची, स्त्रियांची… जी गोष्ट प्रसंगोपात सरकारसाठी अडचणीची ठरेल त्या प्रत्येकाचं दृश्य व परिणाम रूप ‘विटंबना’ याच शब्दात केलं जातं.

इथं एक खुलासा करणं गरजेचं आहे. फार पूर्वीच्या काळी ‘विटंबना’ हा शब्द ‘नकारात्मक’ अर्थानं वापरला जायचा, परंतु प्रस्तुत सरकारच्या सत्ताकाळापासून तो ‘सकारात्मक’ अर्थानं वापरला जातो आहे. ही या सरकारने मराठी भाषेला दिलेला एक देणगीच आहे, असं सूत्राचं म्हणणं पडलं. त्यांनी तर असाही दावा केला की, लवकरच ‘मराठी भाषा गौरव दिन’ यातला ‘गौरव’ हा शब्द काढून टाकून त्याजागी ‘विटंबना’ या शब्दाची समारंभपूर्वक प्राणप्रतिष्ठा करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधिन आहे. तो लवकरच विधानसभा व विधानपरिषद या राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत बहुमतानं पारित होईल आणि कदाचित पुढच्या २७ फेब्रुवारीपासून ‘मराठी भाषा विटंबना दिन’ही महाराष्ट्रदेशी पूर्वीसारख्याच थाटामाटात, समारंभपूर्वक साजरा केला जाईल. 

…तर मुद्दा असा की, कालच्या २७ फेब्रुवारी रोजी सरकारी सोपस्काराप्रमाणे तूर्तास ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा झाला. त्यानिमित्तानं काही मनोरंजनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले होते.

खरं तर हल्ली सरकारी आणि बिगर सरकारी असा काही फरक महाराष्ट्रदेशी राहिलेला नाही. आहे तो केवळ प्रत्यक्ष सरकारी आणि अप्रत्यक्ष सरकारी एवढाच सूक्ष्म फरक. त्यामुळे मुंबईतल्या एका नामचिन वर्तमानपत्रानेही आपल्या कार्यालयात असाच ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला. त्याची निमंत्रणंही सोशल मीडियावरून मराठी भाषिकांना देण्यात आली. सरकारचा कार्यक्रम तो आपला कार्यक्रम आणि आपला कार्यक्रम तो सरकारी कार्यक्रम या नव्या उक्तीनुसार हा सोहळा पार पडला असल्याचं सांगितलं जातं.

याशिवाय महाराष्ट्रदेशातल्यातल्या सरकारी-बिगर सरकारी शाळा-महाविद्यालयांमध्ये, साहित्यसंस्थांमध्ये आणि इतरही काही ठिकाणी हा गौरव दिन प्रेक्षकांची फारशी उपस्थिती नसतानाही मोठ्या थाटामाट्यात समारंभपूर्वक पार पडल्याच्या ‘वार्ता’ कर्णापकर्णी केल्या गेल्या असल्याचं समजतं.

हल्ली मराठी साहित्याला आणि महाराष्ट्र-संस्कृतीला सरकारी पातळीवर फार चांगले दिवस आले आहेत. नुकतेच महाराष्ट्रदेशाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीनं २७ ते २९ जानेवारी २०२४ दरम्यान नवी मुंबईत दुसरं ‘विश्व मराठी संमेलन’ पार पडलं. त्याचं घोषवाक्य होतं – ‘मराठी तितुका मेळवावा’. महाविद्यालयीन पातळीवर युजीसीच्या कृपेनं एकेकाळी राष्ट्रीय चर्चासत्रं होत असत. महाराष्ट्राबाहेरचा एखाद-दुसरा वक्ता बोलवला की, चर्चासत्रं आपोआप ‘राष्ट्रीय’ होई\होतं. त्याच धर्तीवर या दुसऱ्या विश्व मराठी ‘संमेलना’त युरोप-अमेरिकेतील काही हौशी मराठी लेखक-लेखिकांना बोलावण्यात आलं होतं, अशी माहिती मिळाली. भरपूर पैसे खर्च करून या संमेलनातून ‘मराठी तितुका मेळवावा’ याचा जोरदार गजर करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.

काहींनी मराठी भाषकांनी या संमेलनावर सोशल मीडियावर टीकाही केली होती. पण ज्यांना निमंत्रणं मिळत नाहीत, तेच टीका करतात, असा खुलासा सरकारी पातळीवरून केल्या गेल्याची माहिती सूत्रांनी दिली.

याशिवाय अजून एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम महाराष्ट्रदेशातल्या सरकारकडून केला जात आहे. का कुणास ठाऊक पण त्याची मात्र फार वाच्यता होणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. लोकसभा निवडणूक जवळ आलेली असल्यानं सध्या राज्य सरकार व केंद्र सरकार रोज मराठी वर्तमानपत्रांत मोठमोठ्या जाहिराती देऊन अमूकतमूकची ‘गॅरंटी’ देत असतात. पण हा नावीन्यपूर्ण उपक्रम त्या ‘गॅरंटी’त येत नसावा बहुधा.

…तर हा उपक्रम असा आहे की, महाराष्ट्रदेशाच्या विद्यमान मुख्यमंत्र्यांनी सर्व शाळांतल्या मुलांना एक दोन पानी पत्र लिहून सरकार तुमच्या सर्वांगीण विकासासाठी कसे नवनवीन उपक्रम राबवत आहे, याची माहिती दिली आहे. त्यातले उपक्रम खरोखर इतके स्तुत्य आहेत की, हे मुख्यमंत्र्यांनी शालेय मुलांना लिहिलेलं पत्र अब्राहम लिंकन यांनी हेडमास्तरला लिहिलेल्या पत्रासारखं फ्रेम करून महाराष्ट्रदेशातल्या यच्चयावत शाळांमध्ये, घरांमध्ये, सार्वजनिक ठिकाणी, संस्था-संघटनांमध्ये, बस-रिक्षा यांच्या पाठीमागे लावायला पाहिजे.

निदानपक्षी सरकारची अघोषित मुखपत्रं झालेल्या मराठी वर्तमानपत्रांनी तर ‘हेडलाइन्स’ करून या पत्राला प्रसिद्धी द्यायला हवी होती. पण आपलीच आपण काय पाठ थोपटून घ्यायची, असा सूज्ञ विचार करून, शाळांना फक्त असं सांगितलं गेलं की, हे पत्र मुलांना हातात धरायला सांगून त्यांच्या आईबाबांसोबत छायाचित्र काढून अमूक अमूक पोर्टलवर अमूक वेळेत अपलोड करायला सांगा. शिवाय ‘माझी शाळा’ या विषयावर दहा ओळी लिहून तेही अमूक अमूक पोर्टलवर अमूक वेळेत अपलोड करायला सांगा. त्यानुसार शाळांनी तशा सूचना पालकांना दिल्या आणि आपलं सरकार कसं आपल्याला प्रत्येक उपक्रमात सामावून घेतंय, हे पाहून त्यांनी भारावलेल्या आणि साश्रू नयनांनी या दोन्ही गोष्टी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

खरं तर सरकारच्या उपक्रमात शाळांसोबत पाल्याच्या पालकांनाही सहभागी करून घेण्याचा हा उपक्रम अतिशय अभिनव म्हटला पाहिजे. कारण अशा उपक्रमांतूनच महाराष्ट्रदेशांतली महाराष्ट्र-संस्कृती, साहित्य-संस्कृती, भाषा-संस्कृती वृद्धिंगत होईल, वाढीस लागेल… मुख्यमंत्र्यांच्याच शब्दांत सांगायचं तर असे ‘करेक्ट कार्यक्रम’ वरच्यावर झाले, तर महाराष्ट्रदेशातून भविष्यात नक्कीच सोन्याचा धूर निघू शकेल. ‘कोकणचा कॅलिफोर्निया’ किंवा ‘मुंबईचं शांघाय’ करायचं काय घेऊन बसलात, अख्ख्या महाराष्ट्रदेशाची ‘सिलिकॉन व्हॅली’ व्हायला वेळ लागणार नाही!

तर ते एक असोच. आता पुढच्या मुद्द्याकडे वळायची वेळ झाली आहे.

‘महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ’ नावाची एक सरकारी संस्था आहे. हल्ली हे मंडळ २७ फेब्रुवारी म्हणजे ‘मराठी भाषा गौरव दिनी’ तब्बल ३०-४० पुस्तकं एकदमच प्रकाशित करू लागलं आहे. काही कुश्चित लोक ५० वा १०० का नाही, अशी शंका घेतात. पण संस्कृती-संवर्धनाचं काम ‘रेकॉर्डब्रेक’ आकड्यांनी होत नाही, तर ‘रेकॉर्डब्रेक’ नसलेल्या आकड्यांनीच होतं, अशी या मंडळाची धारणा असल्याचं समजतं.

या मंडळाच्या नावात ‘संस्कृती’ हा शब्द आहे. या शब्दाचा मराठी शब्दकोशांतला अर्थ वेगळा असला तरी, इथं तो ‘निराळ्या’च अर्थानं वापरलेला असल्याचं समजतं. कारण या मंडळाची अशी धारणा आहे की, मंडळ जी पुस्तकं प्रकाशित करतं, ती महाराष्ट्रातल्या सामान्य तर सोडाच, पण जाणकार वाचकांपर्यंतही पोहचत नसली, तरी या पुस्तकांमुळे महाराष्ट्र-संस्कृतीचं जतन-संवर्धनच होतं. ते आणखी वेगानं व्हावं, म्हणून हे मंडळ हल्ली रेकॉर्डब्रेक आणि ‘गोदामभर’ पुस्तकं प्रकाशित करतं, असं समजतं.

शिवाय ‘मराठी भाषा गौरव दिन’ येतो नेमका २७ फेब्रुवारीला. याच आठवड्यात अर्थसंकल्प विधिमंडळात सादर केला जातो. आणि मार्च महिन्यात त्या त्या वर्षाचा ताळेबंद द्यावा लागतो. मंडळाला राज्य सरकारकडून दरवर्षी तिला मिळालेला निधी त्या त्या वर्षातच खर्च करायचा, या ध्येयानं प्रेरित होऊन या मंडळाकडून मराठी पुस्तकांचे मोठे मोठे प्रकल्प हाती घेतले जातात आणि त्यातून सहसा सर्वसामान्य मराठी माणसं वाचणार नाहीत, अशी पुस्तकं प्रकाशित करते.

हल्ली या संस्थेची कर्तव्यपराणता विशेषत्वानं उल्लेख करावा अशा प्रकारे उजागर झालेली दिसते. कारण हे मंडळ जी पुस्तकं प्रकाशित करतं, त्यांच्या पीडीएफ फाईल्स ते मोफत ऑनलाईनदेखील उपलब्ध करून देतं. म्हणजे मंडळाने प्रकाशित केलेली पुस्तकं महाराष्ट्रदेशातले लोक विकत घेऊन वाचत नसतील, तर किमान त्यांनी त्यांच्या पीडीएफ फाईल्स मोफत डाऊनलोड करून तरी संग्रही ठेवाव्यात, असा कल्याणकारी हेतू असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. लाखो रुपये खर्च करून सिद्ध झालेल्या पुस्तक-प्रकल्पातील किती पुस्तकं महाराष्ट्रदेशातले वाचक-नागरिक मोफत डाऊनलोड करतात, याचं सर्वेक्षण लवकरच राज्य सरकार हाती घेणार असून घरोघरी जाऊन माहिती गोळा करणार असल्याचीही माहिती सांगोवांगी गोटातून मिळते.

‘महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ’ हे असंच दुसरं एक सरकारी मंडळ. हे हल्ली नेमकं काय काम करतं, याचा बराच तपास प्रस्तुत बातमीदारानं करून पाहिला, पण खात्रीलायक अशी माहिती कुठल्याही ज्ञात-अज्ञात सूत्रांनी दिली नाही.

‘राज्य मराठी विकास संस्था’ ही अशीच अजून एक संस्था. ती मात्र निमसरकारी असल्याने हल्ली तिचं काम चांगलं चाललं आहे असं समजतं. नुकतेच या संस्थेने वाईच्या प्राज्ञ पाठशाळेतर्फे गेली ७५ वर्षं नियमितपणे प्रकाशित होत असलेल्या ‘नवभारत’ या मासिकाचं डिजिटलायजेशन करून ते ऑनलाईन पीडीएफ स्वरूपात उपलब्ध करून दिले आहे. हा अतिशय मोलाचा आणि महत्त्वाचा प्रकल्प पूर्ण केल्याबद्दल या संस्थेचं अभिनंदन करायला हवं.

एवढंच नाही, तर या संस्थेनं या आधीही मराठीतल्या ‘विविधज्ञानविस्तार’, ‘ज्ञानोदय’, ‘ज्ञानप्रकाश’, ‘दिनबंधू’, ‘इतिहासिक आणि ऐतिहासिक’, ‘काव्येतिहास’, ‘निबंधमाला’ या दुर्मीळ नियतकालिकांचे अंक आणि काही दुर्मीळ पुस्तकं पीडीएफ स्वरूपात मोफत उपलब्ध करून दिलेली आहेत. तेही अतिशय मोलाचं आणि महत्त्वाचं आहे. यावरून असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो की, संस्था सरकारच्या पूर्ण अधिपत्याखाली असण्यापेक्षा ती निमसरकारी असेल तर जास्त चांगलं काम करते.

हे झालं सरकारी-निमसरकारी पातळीवरचं. आता महाराष्ट्रदेशातल्या तमाम स्मार्टफोनधारक मराठी भाषक जनतेनं ‘मराठी भाषा गौरव दिन’ कसा साजरा केला, त्याचा संक्षिप्त वृत्तान्त.

प्रत्यक्षात रचनात्मक-संस्थात्मक स्वरूपाचं कुठलंही काम न करता फक्त ‘उदो उदो’ करणं, हे महाराष्ट्रदेशी मोठं नामी काम मानलं जातं हल्ली. कारण त्यासाठी श्रम, मूल्य, वेळ असं कुठलंही भांडवल खर्च करावं लागत नाही. हा पूर्णपणे बिनभांडवली आणि भरघोस प्रसिद्धी देणारा धंदा आहे. शिवाय त्याची जाहिरातही फुकटात होते. हल्ली स्मार्टफोन असतोच सगळ्यांकडे. आणि त्या फेसबुक व व्हॉटसअ‍ॅपही असतंच असतं.

.................................................................................................................................................................

हेहीपाहावाचाअनुभवा

आपल्या ‘जगण्याच्या भाषे’वर ‘बाजारपेठे’ने कब्जा केलाय आणि ‘जाणून घेण्याच्या भाषे’वर ‘सोशल मीडिया’ने…

एखादी झुंडभाषा अनैसर्गिकरित्या ‘राष्ट्रीय’ ठरवून तिचा ‘अडाण्याचा गाडा’ अन्य भाषांवर फिरवून त्या भुईसपाट करणे, हे ‘भाषिक माफियागिरी’पेक्षा काय वेगळे आहे?

व्यवस्थाच मातृभाषेच्या अभ्यासाला दुय्यम स्थान देत असेल तर तो दोष भाषा शिकणाऱ्यांचा नाही, भाषा शिकवणाऱ्याचा आहे!

मराठीची ट्रॅजेडी

भाषेचे राजकारण संकुचित आणि धर्माचे व्यापक व उदारमतवादी आहे?

.................................................................................................................................................................

‘मराठी भाषा गौरव दिना’चंच उदाहरण घ्या. काहींनी चक्क पहाटे पाचपासूनच व्हॉटसअ‍ॅपवरून आपल्या लिस्टीतल्यांना ‘मराठी भाषा गौरव दिना’च्या शुभेच्छा पाठवल्या. पण मराठी माणसांच्या प्रतिभेला खरा बहर दिसला तो फेसबुकवर. अतिशय कल्पकतेनं तिथं मराठी भाषेविषयी उमाळे-उसासे काढत काहीबाही लिहिलं. ते अजून जास्त कल्पक होते, ते मराठीचं स्तोत्र, भारुड, भंग, ओव्या, खंडकाव्य, चारोळ्या, गद्यमय पद्य असं काय काय निर्माण करून मायमराठीचे पांग आपापल्या परीनं फेडायचे प्रयत्न करतात.

काही वात्रट अगदी क्षीण स्वरूपातल्या आवाजांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मराठीवर होणाऱ्या इंग्रजी-हिंदीच्या आक्रमणाविषयी बोलण्याचा प्रयत्न केला. काही चिंतातूर जंतू नेहमीप्रमाणे सरकारवर टीका करण्याची आणखी एक संधी साधत ठरल्याप्रमाणे तोंडसुख घेण्याचा आनंद घेतला. काहींनी व्याकरणाचे नियम सांगण्याचा प्रयत्न केला, तर काहींनी मराठीच्या शब्दसंपत्तीचे गोडवे गायले. एकूण मराठी माणसं तशी अल्पसंतुष्टच मानली जातात. थोड्याथोडक्या गोष्टींमध्ये ते स्वत:च सुख शोधतात!

आणि या सगळ्या साहित्याचा ‘अक्शन रि-प्ले’ व्हॉटसअ‍ॅपवरूनही प्रवाहित केला जातो.

थोडक्यात, महाराष्ट्रदेशी मराठी भाषकांनी अक्षरक्ष: अतिशय मनोभावे फेसबुकवर आणि व्हॉटसअ‍ॅपवर ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला. त्यांच्या भाषाप्रेमाला आणि भाषिक-कौशल्याला शब्दश: उधाण आलं होतं. त्यांच्या प्रतिभेचे एकेक आविष्कार पाहून स्तिमित व्हायला होत होतं. काय काय मराठी माणसं करतात म्हणून सांगायचं! बाप रे बाप!! त्यासाठी एकच उदाहरण दिलं म्हणजे पुरे. २७ फेब्रुवारीला महाराष्ट्रदेशी ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा होतो आणि २८ फेब्रुवारीला म्हणजे दुसऱ्याच दिवशी ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ देशभर साजरा केला जातो. महाराष्ट्रदेशीही तो साजरा केला जातोच. पण या दिवशी फेसबुक व व्हॉटसअ‍ॅपवर मराठी माणसांच्या विज्ञानप्रेमाला आणि वैज्ञानिक-कौशल्याला अजिबात म्हणजे अजिबात स्फूर्ती येत नाही. यावरून मराठी माणसांचं भाषाप्रेम किती थोर्थोर कोटीचं आहे, याची ‘गॅरंटी’ मिळते.

खरं तर २७ फेब्रुवारी रोजी ‘मराठी भाषा गौरव दिन’ ज्या पद्धतीनं आणि रितीनं साजरा केला जातो, त्यावरून मराठी भाषा मेलीबिली की काय, असाच प्रश्न पडतो. कारण जिवंतपणी कुणाचंही तोंडावर कौतुक, सन्मान करण्याची महाराष्ट्रदेशाची परंपरा नाही, असं काही जुनेजाणते धुरीण सांगतात. एखादा बरं काम केलेला माणूस मरतो, तेव्हा त्याच्याबद्दल ज्या पद्धतीनं आणि रितीनं बोललं जातं की यंव रे यंव! असले-नसलेले सगळे गुण त्याला लावले जातात. त्याच्यावर गौरवग्रंथ निघतात, त्याच्या नावे पुरस्कार ठेवले जातात, दरवर्षी स्मृतिव्याख्यान आयोजित केलं जातं. त्याच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्तानं वर्तमानपत्रांतून लेख लिहिले जातात.

जसं माणसांचं तसंच भाषेचं. त्यामुळे महाराष्ट्रदेशी मराठी भाषा बहुधा मेलीबिली तरी असावी किंवा त्या मार्गावर तरी असावी. त्यामुळेच तिला तिथून मागे खेचण्यासाठी २७ फेब्रुवारी हा दिवस एवढ्या मोठ्या प्रमाणात, जोशाजल्लोषात साजरा केला जात असावा, अशी वदंता असल्याचं ऐकिवात येतं.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

‘रावण अँड एडी’ या किरण नगरकर यांच्या कादंबरीतली राम नावाच्या एका नायकाची आई नाही का, तो मरता मरता वाचतो, तेव्हा त्याचं नाव बदलून ‘रावण’ ठेवते. त्याचं स्पष्टीकरण नवऱ्याला देताना ती म्हणते-

“आजपासून त्याचं नाव रावण.” पार्वतीच्या खंबीर आवाजावरून शंकरने ओळखलं की आपल्या मुलाच्या आयुष्यातील एक न-परतीचा क्षण आलाय...

“तो राम म्हणून जन्माला आला, आणि मरेपर्यंत रामच राहील.”

“काल मरता मरता वाचला ते पुरे झालं नाही का तुम्हाला? सोन्यासारखा लेक माझा. किती ग बाई गोड आणि निरागस! आणि त्यातून ‘राम’ नाव! दृष्ट लागेल नाही तर काय? ते काही नाही. इडापीडा टाळायची असेल, तर आजपासून त्याला ‘रावण’च म्हणायचं.”

हे नवं बारसं झाल्यानंतर ‘रावण’ थेट म्हातारा होऊन मरतो बहुधा. ते कादंबरीकारानं थेट सांगितलेलं नाही, पण त्यांना तसं सुचवायचं असावं बहुधा, असा निष्कर्ष काही थोर मराठी समीक्षकांनी काढला असल्याचं सांगितलं जातं.

असाच दुसरा बळकट पुरावा म्हणजे पूर्वीच्या काळी महाराष्ट्रदेशी बहुतेक मुलं जन्मताच मरत. त्यामुळे अनेकदा आई-बाप मूल जन्माला आलं की, आधी त्याचं नाव ‘धोंड्या’, ‘दगड्या’ वा ‘धोंडी’, ‘दगडी’ असं ठेवत म्हणे! ही नावं ठेवलेली मुलं वाचत.

याच धर्तीवर २७ फेब्रुवारीला मराठी भाषेचं ‘वर्षश्राद्ध’ साजरं करत राहिलो, तर आपली मराठी नक्की वाचेल, अशी महाराष्ट्रदेशातल्या सरकारची आणि जनतेची श्रद्धा असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आलं. जेव्हापासून या ‘वर्षश्राद्धा’ला सुरुवात झाली आहे, तेव्हापासून मराठी भाषा ‘बाळसेदार’ होत चालली आहे, असं सरकारी आकडेवारीवरून स्पष्ट होत असल्याचे दाखलेही सरकारी सूत्रांकडून दिले गेले.

त्यामुळे खरंच असणार ते. आणि महत्त्वाचं आणि मोलाचं तर नक्कीच आहे. कवी दासू वैद्य यांच्या शब्दांत म्हणायचं तर -

“संस्कृती म्हतारी झाली म्हणून

तिला खाटकाला इकणार का?

बसू दे बिचारीला कोपऱ्यात

लई दिवसाची सोबती नाही

कव्हा-बव्हा चापाणी देत जा तिला.” (तूर्तास, २००३)

‘मराठी भाषा’ नावाच्या ‘संस्कृती’ला कव्हा-बव्हा चापाणी देण्याचा २७ फेब्रुवारी हा दिवस मराठीवरच्या सरकारी व बिगरसरकारी प्रेमापोटीच ‘वर्षश्राद्ध’ म्हणून साजरा केला जात असेल, तर त्यात काय चुकीचं आहे? काहीच नाही. त्याचं स्वागतच केलं पाहिजे, नाही का?

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......