बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”
संकीर्ण - मुलाखत
मुलाखतकार : डॉ. कुमार सप्तर्षी
  • ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव
  • Thu , 15 February 2024
  • संकीर्ण मुलाखत बाबा आढाव Baba Aadhav लोकशाही Democracy राज्यघटना Constitution

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांना ‘कर्मयोद्धा’ म्हणावं लागेल. वयाच्या ९२व्या वर्षीदेखील वर्तमान परिस्थितीबद्दल ते केवळ चिंतित नाहीत, तर देशात सुरू झालेल्या राज्यघटनेच्या पायमल्लीच्या विरोधात संघर्षाची तयारी करत आहेत. “आता वेळ केवळ मांडणी करणं किंवा चर्चा करत बसण्याची नाही, तर कृतीची आहे. प्रसंगी न्यायालयाचा दरवाजाही ठोठावण्याची तयारी करावी लागेल”, असं बाबा ठाम निर्धारानं बोलत आहेत. एवढंच नाही, तर देशाला पुन्हा एका ‘नव्या गांधी’ची गरज ते बोलून दाखवतात. ‘सत्याग्रही विचारधारा’ मासिकाच्या ‘वर्धापनदिन विशेषांका’साठी डॉ. कुमार सप्तर्षी यांनी घेतलेल्या सविस्तर मुलाखतीत त्यांनी देशातील सद्यःस्थितीबद्दल मनमोकळेपणानं मतप्रदर्शन केलं. यावेळी डॉ. कुमार सप्तर्षी यांच्यासमवेत ‘सत्याग्रही’ची टीम होती. त्यात अनंत बागाईतकर, अन्वर राजन, अभय देशपांडे, अ‍ॅड. राजेश तोंडे, शाम तोडकर व गणेश गाढवे यांचा समावेश होता.

बाबा आढाव यांच्या मुलाखतीची सुरुवात वर्तमान परिस्थितीबद्दलच्या त्यांच्या मतप्रदर्शनानं होणं अपरिहार्य होतं.

.................................................................................................................................................................

डॉ. कुमार सप्तर्षी : बाबा, सर्वप्रथम वर्तमान परिस्थितीबद्दल तुमचं भाष्य?

बाबा आढाव : भारतात सध्या एक कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः विचारशील जगाची कोंडी झाल्यासारखी ही स्थिती आहे. कोणतंही नीतीतत्त्व अस्तित्वात नसल्याचं दिसतं. प्रचंड असं सार्वत्रिक ढोंग चालू असताना विचारशील विचारवंत जग स्तब्ध आणि मूक आहे, हे धक्कादायक आहे. याला नुसती कोंडी म्हणता येणार नाही. यामध्ये भय हादेखील मोठा घटक आहे. हा ‘नव-नाझीवाद’ (निओ नाझीझम) आहे. मला आश्चर्य वाटतं ते रा. स्व. संघासारख्या शंभरी गाठलेल्या संघटनेचं. एक माणूस वैचारिक दादागिरी करतो व रा. स्व. संघ निमूटपणे ते सहन करतोय, हे आश्चर्यकारक आहे. अशा परिस्थितीत भारतातल्या विचारवंतांनी सत्याग्रहाचा मार्ग का अवलंबू नये?

मी स्वतः खूप अस्वस्थ आहे. या परिस्थितीबद्दल प्रसंगी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याचीही माझी तयारी आहे. माझ्या जीवनात आतापर्यंत ५२ वेळा जेलमध्ये गेलो आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांवर वेळोवेळी केलेल्या आंदोलनात मला तुरुंगात जावं लागलं. परंतु आताची परिस्थिती वेगळी आहे. मतभिन्नता किंवा विरोधी मत म्हणजेच प्रतिविचार (डिसेंट) व्यक्तच होताना दिसत नाही. पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही. निष्क्रिय बसण्याबद्दल ‘महाभारता’त द्रौपदीने पितामह भीष्माचार्यांना दूषणं दिली होती, हे लक्षात ठेवावं लागेल.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

...............................................................................................................................................................

बाबा, २०२३मधील परिस्थितीवर तुम्ही भाष्य केलं. परंतु सत्ताधारी मंडळी धर्म, धार्मिक प्रतीकं, एवढंच नव्हे, तर स्वातंत्र्यलढ्यातील प्रतीकांवरही हक्क सांगून ती हिसकावत आहेत. या परिस्थिताचा मुकाबला कसा करायचा?

- या परिस्थितीत पुन्हा ‘नव्या गांधीं’ची आवश्यकता निर्माण झाली आहे. केवळ महात्मा गांधीच नव्हे, तर त्यांनी ज्या प्रतीकांच्या माध्यमातून समाजाला एकजूट केलं, त्यांच्याकडे आकर्षित केलं, तो कित्ता गिरवावा लागेल. सत्ताधाऱ्यांनी ज्या प्रतीकांच्या आधारे जनसामान्यांना भुलवलं आहे, त्या प्रतीकांचा पर्यायी व नवा अर्थ जनतेसमोर सादर करावा लागेल. महात्मा गांधींनीदेखील ‘रामराज्या’ची संकल्पना मांडली होती. परंतु त्यांच्या ‘रामराज्या’त सर्वांना समान स्थान होतं. ‘रघुपति राघव राजाराम’ म्हणतानाच त्यांनी ‘ईश्वर अल्ला तेरो नाम, सब को सन्मती दे भगवान’ म्हणून लोकांना समानतेची शिकवण दिली होती.

राजकीय पर्यायाची चर्चा करायची झाल्यास सध्याचं चित्र कसं दिसतं?

- वर्तमान राजकीय स्थितीचा विचार करता काँग्रेसची जी दैना झालेली दिसते, त्यातून वर येण्यासाठी कसून प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. एकंदर परिस्थिती पाहता मला असं वाटतं की, डॉ. बाबासाहेबांनी देशाला दिलेली राज्यघटना, त्यातील मूल्यं ही ठामपणे प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जनतेसमोर राज्यघटना न मानणारा भाजप आणि राज्यघटना मानणारे व त्यानुसार आचरण करू पाहणारे राजकीय पक्ष, अशा पद्धतीनं लोकांपर्यंत पोहोचावं लागेल. राज्यघटना अंमलात आणण्यासाठी डॉ. बाबासाहेबांनी बुद्ध, कबीर आणि महात्मा फुले यांची नावं घेतली होती. त्यांच्या माध्यमातून राज्यघटनेची अंमलबजावणी करणं त्यांना अपेक्षित होतं. पण भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे.

डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे. निवडणुकीचं राजकारण आणि जनआंदोलन यांची सांगड कशी घालता येईल, हे पहावं लागेल. ‘लोकशाही समाजावादा’ची खरीखुरी व्याख्या जनतेपर्यंत पोहोचवावी लागेल. ‘लोकशाही समाजवादा’ला पर्याय नाही, या निष्कर्षापर्यंत मी आलो आहे. जर्मनीनं हिटलरला फेकून दिलं आणि देशाचं एकीकरण केलं, हा इतिहास विसरून चालणार नाही.

.................................................................................................................................................................

मी आजही भविष्याकडे आशेनं पाहतोय. आज तरुणांना काम नाही, पण ते कसं देता येईल, हे कोणी सांगत नाही. त्या संदर्भात एखादं धोरण समोर ठेवलं जात नाही. त्यामुळे तरुण वर्गात नैराश्य वाढत चाललं आहे. आजची तरुणाई बिथरून गेली आहे, असं म्हणता येईल. समाजात विषमता वाढत चालली आहे. वाढत्या महागाईनं सर्वसामान्यांचं जगणं अवघड झालं आहे.

.................................................................................................................................................................

वर्तमान परिस्थिती कोंडीची असल्याचं आपण म्हणालात आणि त्याच्याच जोडीला सबळ राजकीय पर्यायाच्या अभावाबद्दलही मतप्रदर्शन केलं. ही परिस्थिती कशातून निर्माण झाली, याबद्दल आपल्याला काय वाटतं?

- राजकीय पक्षांना ‘संसदीय राजकारण’ आणि ‘जनतेचं राजकारण’ यांचा योग्य मेळ घालता आलेला नाही. जनता पक्षाला मी विरोध केला होता. कारण समाजवादी पक्षानं जनता पक्षात विलीन होण्याचा निर्णय घेतला होता. पक्ष विलीनीकरणास माझा विरोध होता. १९५२मध्ये पहिल्या लोकसभेच्या निवडणुकीत समाजवाद्यांचा मोठा पराभव झाला. त्या पराभवामुळे समाजवाद्यांना वैफल्य व नैराश्यानं ग्रासलं. त्यातून ते तडजोडवाद, आघाडीचं राजकारण, मग मध्यमजातींचं राजकारण करत गेले. यामुळे तात्कालिक यश मिळालं, तरी कालांतराने या विचारसरणीकडे तरुण आकर्षित होताना दिसत नाहीत.

आणखी एक कारण, म्हणजे ‘लोकशाही समाजवाद’ या संकल्पनेची सुयोग्य मांडणी करण्यात आलेलं अपयश. परंतु लोकशाही समाजवादाखेरीज देशाला पर्याय नाही. त्यासाठीच फेरमांडणी, संविधानाच्या रक्षणासाठी लढा आणि प्रतीकांचा नवा अर्थ समाजाला सांगण्याची ही वेळ आहे. याच्याच जोडीला संघर्ष आणि सत्याग्रहाच्या मार्गालाही पर्याय नाही.

बाबा, समाजवादी चळवळीतील आपल्या दीर्घकालीन वाटचालीबद्दल बरंच जाणून घ्यायचं आहे. त्या संदर्भात माझा पहिला प्रश्न तुम्ही समाजवादी चळवळीकडे कसं वळलात?

- मी राष्ट्र सेवा दलामुळे समाजवादी चळवळीकडे आकर्षित झालो. माझ्या आईचे वडील ‘सत्यशोधक’ चळवळीतले. त्या वेळी ‘पुण्यात टिळकांऐवजी फुल्यांचे स्मारक व्हावे’ अशा प्रकारचा ठराव पुणे मनपात मांडण्यात आला होता. त्या ठरावाला माझ्या आईच्या वडिलांनी अनुमोदन दिलं होतं. आम्ही सुरुवातीस शनिवार पेठेत राहायला होतो. नंतर आम्ही नाना पेठेत आलो. या दोन्ही ठिकाणी एकीकडे निवडुंगा विठोबा मंदिरात संत तुकाराम महाराजांची पालखी येते, तर दुसरीकडे ज्ञानेश्वर महाराजांची पालखी येते. साहजिकच कीर्तनाला जाणं, वारकऱ्यांची सेवा करणं, अशा वातावरणात माझी जडणघडण झाली. तेव्हा ब्राह्मणेतर चळवळीचं वातावरण होतं. हा भाग ‘व्यापारी पेठ’ म्हणून ओळखला जायचा.

१९४१मध्ये स्वातंत्र्य चळवळीच्या काळात आमच्या भागातील दिवाणजी मंडळींनी खादी वापरण्यास सुरुवात केली. माझे मामा लक्ष्मण गायकवाड एका दुकानात दिवाणजी होते. तेव्हा सेवा दलाच्या प्रभात शाखा, सायं शाखा भरत. त्यात आम्ही रात्रशाखेस सुरुवात केली. लक्ष्मणमामा मला शाखेवर घेऊन जायचे. यातून माझ्यातील नेतृत्वगुणाचा विकास झाला. रात्रीच्या शाखा ९ वाजता रस्त्यावर भरायच्या. त्यात माझ्या बरोबर कामगार मंडळी असायची. हे चालू असताना शालेय शिक्षण सुरू होतं. पुढे महाविद्यालयीन आणि वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं.

१९५२च्या सत्याग्रहाचे नेते होते एस. एम. जोशी. त्या वेळी अन्नधान्य भाववाढ विरोधी सत्याग्रह करण्यात आला. त्यात आम्ही सहा जण सहभागी झालो होतो. वैद्यकीय शिक्षणानंतर वैयक्तिक प्रॅक्टिस सुरू करण्यापेक्षा सामाजिक दायित्वापोटी गरिबांसाठी एखादा दवाखाना सुरू करावा, असा विचार झाला. त्यानुसार आम्ही काही मंडळींनी एकत्र येऊन हडपसर इथं ‘साने गुरुजी रूग्णालय’ उभं केलं.

मी राहत होतो त्या नाना पेठेत हमाल वर्गाची वसाहत होती. त्यांची सोय व्हावी म्हणून नाना पेठेतही एक दवाखाना सुरू केला. या दोन्ही ठिकाणी उपचारांसाठी रुग्णांची गर्दी होऊ लागली. त्या वेळी हडपसर भागातील माणसं पेंगाळलेली असल्याचं, तसेच अनेकांना खाजेचा त्रास होत असल्याचं आढळलं. या संदर्भात आम्ही संशोधनात्मक अभ्यास सुरू केला. संबंधित रुग्णांच्या रक्ताचे नमुने घेतले. त्यांची ससूनमध्ये तपासणी करण्यात आली. या तपासणीअंती हडपसर भागात जंतांचं प्रमाण वाढल्याचं आढळून आलं.

अशात १९६१मध्ये पानशेतची दुर्घटना घडली. यातूनच दादा गुजर आदींनी काम सुरू केलं. पुढं श्रीरामपूरला अशाच पद्धतीनं रुग्णालयाची उभारणी झाली. पानशेत घटनेनंतर हडपसर भागातील चित्र बदललं.

.................................................................................................................................................................

हेडगेवार, गोळवलकर, देवरस हे रा. स्व. संघाचे सरसंघचालक कट्टरतावादी होते. त्यांच्याशी मतभेद होत. वादाचे प्रसंगही येत. पण त्या त्या वेळी विरोधकांना व्यक्त होण्याची संधी मिळत असे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी संवाद होत असे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, आज रा. स्व. संघाचे कोणीही अन्य विचारसरणीच्या व्यक्तींशी संवाद साधत नाहीत. उघडपणे सत्य बोलणसुद्धा दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. अशा या कोंडीतून भारताच्या विचारवंतांनी सत्याग्रहाला का तयार होऊ नये?

.................................................................................................................................................................

तुम्ही आजवर अनेक समाजवादी चळवळी पाहिल्या आहेत. या काळात कोणती आव्हानं समोर आली? समाजवादी चळवळ आकुंचन पावतेय असं वाटत होतं का? या वाटचालीत कोणत्या व्यक्ती भेटल्या आणि त्यांचा सहवास महत्त्वाचा कसा ठरला?

- तुमच्या मासिकाच्या नावातच ‘सत्याग्रही’ हा शब्द आहे आणि मी या शब्दाशी फारच जुळला गेलोय. १९१५ साली महात्मा गांधी विलायतेतील शिक्षण संपवून भारतात परतले. त्यांनी संपूर्ण देशाचा दौरा केला. ते जनमानसात मिसळले. लोकांचे प्रश्न समजून घेतले. त्यांना दिलासा दिला. यातूनच देशातील जनतेला गांधी आपले वाटू लागले. त्या वेळी टिळकांनी लिहिले होते की, ‘या व्यक्तीकडे शील आहे. तो लोकांना आपलासा वाटतोय. त्यामुळे हा माणूस पुढच्या काळातला नेता आहे’. मुख्यत्वे सामान्यांना चळवळीत आणण्याचं कसब गांधींकडे होतं.

स्वातंत्र्य चळवळीच्या काळात नेहरू, जीना, आंबेडकर यांनी आपला पोशाख बदलला नाही. परंतु या देशातील बहुतांश जनता अपुऱ्या कपड्यावर राहते, असे सांगत गांधींनी आपला पोशाख बदलला. जनतेच्या प्रश्नांवर लढा देण्यासाठी बॅरिस्टरकी सोडली.

गांधींची ‘विश्वस्त’ ही कल्पना जाणून घ्यायला हवी. आजच्या काळात गांधींचे विचार तितकेच प्रेरक आहेत. किंबहुना त्या विचारांची आज अधिक आवश्यकता आहे. याचं कारण आज सामान्य जनतेची कोंडी झाली आहे. पंतप्रधानपदावरील व्यक्ती आपली मनमानी करतेय. त्यांना कशाचंही काही देणं-घेणं नाही. त्यांना जगाचं नेतृत्व करायचंय. पण त्याआधी या देशातील जनतेनं त्यांना मनापासून स्वीकारायला हवं. त्यांना तशी व्यापक लोकमान्यता लाभायला हवी ना!

हेडगेवार, गोळवलकर, देवरस हे रा. स्व. संघाचे सरसंघचालक कट्टरतावादी होते. त्यांच्याशी मतभेद होत. वादाचे प्रसंगही येत. पण त्या त्या वेळी विरोधकांना व्यक्त होण्याची संधी मिळत असे. त्यामुळे दोन्ही बाजूंनी संवाद होत असे. आता तशी परिस्थिती राहिलेली नाही, आज रा. स्व. संघाचे कोणीही अन्य विचारसरणीच्या व्यक्तींशी संवाद साधत नाहीत. उघडपणे सत्य बोलणसुद्धा दिवसेंदिवस अवघड होत चाललं आहे. अशा या कोंडीतून भारताच्या विचारवंतांनी सत्याग्रहाला का तयार होऊ नये?

त्यादृष्टीने विचार करायचा तर आज सत्याग्रहाची भाषाच बदलली आहे. तरुण वर्ग सत्याग्रहाचा विचार करत नाही. आज देशात ‘अघोषित आणीबाणी’सारखी स्थिती आहे. प्रचलित व्यवस्थेच्या विरोधात तुम्ही काही बोललात, तर लगेच तो ‘देशद्रोह’ ठरतोय. इंदिरा गांधींनी पुकारलेल्या आणीबाणीच्या विरोधात विचारवंतांचा तोंडाला फडके लावून विराट मोर्चा निघाला होता. आज अशा आंदोलनाची नितांत आवश्यकता आहे.

अशा स्थितीत देशात काय निर्माण होईल, यापेक्षा काय निर्माण व्हायला हवं, याचा विचार करायला हवा. अनेक जण या परिस्थितीचं विश्लेषण करत असतील. ‘आम्ही परिस्थितीचं विश्लेषण करतोय’ अशाही प्रतिक्रिया समोर येतात. पण आपण परिस्थितीचं विश्लेषण किती दिवस करणार, हा खरा प्रश्न आहे. लोकशाहीचे इतके वाभाडे काढले जात असताना, त्या विरोधात व्यापक संघर्ष का निर्माण होत नाही? सत्याग्रहाचं अस्त्र का उचललं जात नाही? लोक आहे त्या परिस्थितीतही समाधान का मानतात? हे अस्वस्थ करणारे प्रश्न आहेत. अशा वेळी देशाला आणखी एका महात्मा गांधींची आवश्यकता आहे, असं वाटल्याशिवाय राहत नाही.

...........................................................................................................................................

लोकशाहीचे इतके वाभाडे काढले जात असताना, त्या विरोधात व्यापक संघर्ष का निर्माण होत नाही? सत्याग्रहाचं अस्त्र का उचललं जात नाही? लोक आहे त्या परिस्थितीतही समाधान का मानतात? हे अस्वस्थ करणारे प्रश्न आहेत. अशा वेळी देशाला आणखी एका महात्मा गांधींची आवश्यकता आहे, असं वाटल्याशिवाय राहत नाही.

...........................................................................................................................................

बाबा, समाजवादी चळवळ प्रभावी असती, तर हे चित्र दिसलं असतं का? या चळवळीचा प्रभाव कमी होण्यामागं काय कारणं आहेत?

- १९५२च्या चळवळीतील पराभवाने समाजवादी चळवळीला धक्का बसला. आता पक्षीय आघाड्यांसाठी वा संयुक्त सस्कारांसाठी प्रयत्न करावेत, असे विचार नेते व्यक्त करू लागले. पंढरपूर येथील साने गुरुजीच्या उपोषण आंदोलनापूर्वी ‘सरकारी माणसांच्या विरोधात तापी नदीत उडी मारीन’ असे गुरुजी म्हणाले होते. पण त्यांच्यातील संघर्षाची ही भावना त्यांनी केलेला संघर्ष या बाबी पुढे आल्या नाहीत. साने गुरुजी आणि ‘श्यामची आई’ हेच समीकरण जनमानसात दृढ झाले. साने गुरुजींनी रा. स्व. संघाबद्दल परखडपणे लिहिल आहे. संघाला हिटलरचं आकर्षण होतं. त्याचाच प्रत्यंतर आपल्याला आजच्या व्यवस्थेतून येत आहे.

१९६५ला समाजवादी पक्षात फूट पडली. डॉ. राम मनोहर लोहिया आघाड्यांवर बोलत असले, तरी त्यांचं आणि इतर समाजवादी नेत्यांचं फारसं जमत नव्हतं. लोकसभेतील लोहिया आणि लोकसभेबाहेरील लोहिया, यांत फरक होता. लोहियांना स्वीकारण्यास अनेक नेते तयार नव्हते. फुटीनंतर शेतकरी कामगार पक्ष डाव्यांसोबत जाऊ लागला. दरम्यान समाजवादी चळवळीला जेवढे बदनाम करता येईल, तेवढे करण्याचा प्रयत्न झाला.

वास्तविक संयुक्त महाराष्ट्र चळवळ, नामांतराचा लढा यांत समाजवादी चळवळीचं महत्त्वाचं योगदान राहिलं आहे. मात्र, ही जमेची बाजू फार काळ प्रभावीपणे त्यांना राखता आली नाही. त्यासाठी प्रयत्न केले गेले नाहीत, असं म्हणण्यास वाव आहे. जगाला ‘लोकशाही समाजवादा’शिवाय पर्याय नाही, हे लक्षात घ्यायला हवं.

कम्युनिस्ट पार्टीनं आपल्या विचारसरणीनुसार एका बाजूला चळवळी सुरू ठेवताना, दुसऱ्या बाजूला संस्थात्मक उभारणीवर भर दिला. मात्र, समाजवाद्यांचं तसं नव्हतं का?

- मी समाजवादी पक्षात असूनसुद्धा वेगळा राहिलो. सत्यशोधक चळवळ, आंबेडकरी चळवळ, मार्टिन ल्युथर किंग यांना मी मानले. कोणत्याही प्रवाहाला कितीही बांध घातला, तरी पाणी उतारानंच जातं. पण प्रवाह जागीच जिरला, तर पुढं त्याचं अस्तित्व उरत नाही. सामाजिक चळवळींचं स्वरूप राज्याराज्यांत वेगवेगळं राहिलं आहे.

महाराष्ट्रापुरतं सांगायचं, तर या राज्यात ब्राह्मणेतर चळवळीला समजून घेताना समाजवादी चळवळ अपयशी ठरली. आम्ही साने गुरुजी मानायचो. खरी चळवळ त्यांनीच पुढे नेली. मुंबई-पुण्यासारख्या शहरातील झोपडपट्ट्यातली माणसं समाजवादी चळवळीच्या पाठीशी होती. डाव्या चळवळीत असणाऱ्यांनी एस. एम. जोशी यांना ‘घडलेला नेता’ म्हणून स्वीकारलं होतं.

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

................................................................................................................................................................

बाबा, आताच्या परिस्थितीत कोणत्या चळवळी गरजेच्या आहेत वा या कुठले मार्ग आवश्यक आहेत, असं वाटतं?

- सध्याच्या स्थितीत सत्याग्रहाचा मार्ग अवलंबायला हवा, असं मला वाटतं. त्याचबरोबर केवळ आपल्या देशाचा विचार न करता, आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडी, राजकारण हेही अभ्यासलं जायला हवं. त्याच्याविषयी बोलायला हवं. कम्युनिस्ट चळवळ संपली असली, तरी ज्या जर्मनीनं हिटलरला डोक्यावर घेतलं, तिनंच त्याला खाली खेचलं, हे विसरता कामा नये.

एक मात्र खरं की, मी आजही भविष्याकडे आशेनं पाहतोय. आज तरुणांना काम नाही, पण ते कसं देता येईल, हे कोणी सांगत नाही. त्या संदर्भात एखादं धोरण समोर ठेवलं जात नाही. त्यामुळे तरुण वर्गात नैराश्य वाढत चाललं आहे. आजची तरुणाई बिथरून गेली आहे, असं म्हणता येईल. समाजात विषमता वाढत चालली आहे. वाढत्या महागाईनं सर्वसामान्यांचं जगणं अवघड झालं आहे.

दुसरीकडे या देशातील लोकशाही व्यवस्था धोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे लक्षात घेता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना, त्यातील मूल्यांची प्रतिष्ठापना यावर भर दिला जायला हवा. देशातील प्रत्येक घराघरात संविधान असायला हवं. संविधान न मानणारा भाजप आणि संविधान मानणारा एक वर्ग, अशी विभागणी व्हायला हवी. त्यादृष्टीनं देशात ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे.

आपल्या चुका आपण प्रामाणिकपणे कबूल केल्या पाहिजेत. तसं झालं, तर देशात खऱ्या अर्थानं लोकशाही व्यवस्था मानणारं, त्याचा आदर करणारं आणि त्याप्रमाणे वाटचाल करणारं धर्मनिरपेक्ष सरकार सत्तेत येईल. हा अंध:कार दूर होईल आणि साऱ्या देशवासीयांना नवा प्रकाश मिळेल. साऱ्या जगाला पुन्हा एकदा समर्थ लोकशाहीचं प्रत्यंतर येईल.

‘सत्याग्रही विचारधारा’ मासिकाच्या फेब्रुवारी २०२४च्या अंकातून साभार

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......