मी परत भानावर आले, तेव्हा माझ्या मनातील ताण-तणाव आणि खळबळ निमाली होती. माझ्या या आयुष्यातील तिसऱ्या व अखेरच्या पर्वाच्या नांदीचे सूर मनात झंकारू लागले
ग्रंथनामा - झलक
मीराबेन
  • ‘अंतरात्म्याची शोधयात्रा’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 13 October 2023
  • ग्रंथनामा झलक अंतरात्म्याची शोधयात्रा The Spirit’s Pilgrimage मीराबेन Miraben मॅडेलिन स्लेड Madeleine Slade महात्मा गांधी Mahatma Gandhi

महात्मा गांधी यांच्या जीवनकार्यामुळे त्यांच्या हयातीतच भारतातील आणि जगातीलही कितीतरी तरुण-तरुणी, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक आणि विचारवंत त्यांच्याकडे आकर्षित झाले होते. फ्रान्समधील मॅडेलिन स्लेड ही त्यापैकीच एक तरुणी. तिने नंतर आपलं सबंध आयुष्य गांधीविचारांच्या प्रसार-प्रसारासाठी वाहून घेतलं. पण त्याचबरोबर हिमालयातील पर्यावरण संरक्षणाची मोठी चळवळही उभारली. तिच्या ‘The Spirit’s Pilgrimage’ या तिच्या आत्मकथनाचा मराठी अनुवाद ‘अंतरात्म्याची शोधयात्रा’ या नावाने अनिल कारखानीस यांनी केला आहे. मॅजेस्टिक पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालेल्या या पुस्तकातील हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

.

जरी मी दूर हिमालयामध्ये स्वत:ला गाडून घेतलं होतं, तरी देशामध्ये चालू असलेल्या घडामोर्डीकडे माझं बारकाईने लक्ष असे. त्या घडामोंडींमुळे मी खूपच अस्वस्थ झाले होते. महाकाय औद्योगिक आणि इतर प्रकल्पांच्या योजना तयार होत होत्या. त्यासाठी दुसऱ्या देशांकडून कर्ज काढली जात होती किंवा देणग्यांच्या स्वरूपात पैसा घेतला जात होता. स्वतंत्र भारताचे जे चित्र रंगवलं गेलं होतं, त्याच्याशी या सर्व गोष्टी अगदीच विसंगत होत्या. या घटनांचा विचार करून माझी अस्वस्थता वाढत होती. अखेरीस मी स्वतःच्या हिंमतीवर ‘बापू राज पत्रिका’ नावाचं मासिक चालू केलं. अत्यंत सोप्या भाषेमध्ये भारतीय किसांनाना उद्देशून या मासिकातले लेख लिहिले जात होते. त्यांच्यासाठी बापूंना जी आत्मनिर्भर अर्थव्यवस्था अभिप्रेत होती, ती त्यांना समजावून सांगावी आणि त्यांनी साध्या विकेंद्रित समाजाची मागणी करण्यासाठी एकत्र यावं, हा माझा उद्देश होता.

हा प्रयोग तसा भन्नाटच होता. दूर हिमालयाच्या कुशीत वास्तव्य करत असताना, या मासिकातील सर्व लिखाण मी एकटीच करत असे. आर्थिक जबाबदारीही माझीच होती. या छोट्याशा पत्रिकेला काही वर्गणीदार मिळाले. इंग्लिश, हिंदी, गुजराती, तामिळ व तेलगु या पाच भाषांमध्ये ही पत्रिका छापली जात होती, परंतु पत्रिका तोट्यातच चालत होती. माझ्याकडचे पैसेही संपले.

नुसती पत्रिका काढून माझं समाधान झालं नाही. हिवाळ्यामध्ये हिमालयातून खाली उतरून घोड्यावरून गावांचा दौरा करावा असं मी ठरवलं या दौऱ्यामध्ये आलेल्या अनुभवावरून माझी खात्री झाली की, काँग्रेसची सरकार जनतेपासून दूर गेली आहेत. वाढती नोकरशाही व लाचलुचपत यांनी देश पोखरला गेला आहे. मी करत असलेल्या प्रयत्नांची अव्यवहार्यता आणि त्यात असलेले धोके यांचीदेखील मला जाणीव झाली. काँग्रेसच्या मंत्र्यांना देशातील वास्तव परिस्थितीची जाणीव करून द्यावी, त्यांनी बापूंनी आखलेल्या आर्थिक विचारसरणीवर अंमल करून भारतीय जनतेच्या समस्या सोडवाव्या आणि लाचलुचपतीवर कठोर कारवाई करावी, अशी माझी अपेक्षा होती. माझ्याबरोबर काम करू इच्छिणाऱ्या लोकांची योजना मात्र वेगळीच होती. जर गांधीजीच्या विचारसरणीनुसार चालणारं सरकार हवं असेल, तर काँग्रेसच्या सरकारविरुद्ध जोरदार आंदोलन करावं व त्या सरकारचा पाडाव करून सत्ता काबीज करावी, अशी त्यांची मनीषा होती. त्यांची विचारसरणी, लेखन व भाषाशैली माझ्यापेक्षा खूपच भिन्न होती. जर त्यांच्याशी हातमिळवणी केली असती, तर सरकारशी सहकार्य करणं अशक्यच झालं असतं. परंतु मी एकटीच ही कामगिरी करत असते, तर त्याचा कितपत परिणाम होणार होता, हाही प्रश्नच होता. मला दुसरा काहीतरी मार्ग शोधणं आवश्यक होतं.

सरकार ग्रामीण विकासासाठी ‘समुदाय विकासां’चा कार्यक्रम आखत होतं. त्याबद्दल विचार करताना माझ्या मनात असा विचार आला की, जर बापूंच्या विचारांशी सुसंगत असं वळण या कार्यक्रमाला देता आलं, तर लोकांपुढे एक आदर्श निर्माण करता येईल आणि त्याच धर्तीवर इतर पुढचं कार्य करता येईल. त्याच सुमारास वर्ध्याजवळील एका कार्यक्रमामध्ये जवाहरलाल नेहरूंशी भेट झाली. त्यांना मी माझे विचार समजावून सांगितले आणि गोपाळ आश्रम विभागामध्ये असा प्रकल्प राबवता येईल, असं सुचवलं. त्यांनी माझ्या सूचनेला तत्काळ मान्यता दिली. त्यांच्या अनुमतीच्या आधारावर मी दिल्लीला गेले. ‘समुदाय प्रकल्पा’संबंधी मध्यवर्ती संस्थेशी विचारविनिमय करून मी विचारपूर्वक एक योजना तयार केली. माझी योजना बापूंच्या विचारसरणीवर आधारित होती. त्यात स्थानिक सहभागाला अधिक महत्त्व दिलं होतं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

केंद्रीय सरकारची अनुमती मिळवून मी लखनौला गेले. समुदायप्रकल्प हे राज्य सरकारच्या अधिकारकक्षेत येत असल्यामुळे त्यांच्या अनुमतीची गरज होती. सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग कमी असल्यामुळे त्यांना अर्थातच ही योजना पसंत नव्हती. परंतु केंद्र सरकार १२ लाखांची मंजुरी देणार असल्यामुळे ही योजना नाकारणं अवघड होतं. बऱ्याच चर्चेनंतर मी तेहरीला परत जाऊन तपशीलवार योजना व अंदाजपत्रक तयार करावं, असं त्यांनी सुचवलं. तेहरी-गढवालमधील कार्यकर्त्यांना ही योजना खूपच आवडली आणि आम्ही कार्यकर्त्यांची समिती स्थापन केली. माझा उत्साह द्विगुणित झाला. कार्यक्रमाच्या उद्घाटनाची तारीख ठरली आणि आम्ही ‘गोपाळ आश्रम’मध्ये परतून कार्यक्रमाची आखणी करण्यास सुरुवात केली. दूरवर डोंगरांमध्ये वसलेल्या गावांतील लोकांनाही आमंत्रणं पाठवण्याचं आम्ही ठरवलं.

कार्यक्रमाच्या दिवशी दूरदूरच्या गावातील रहिवासी घरीच विणलेले लोकरीचे कपडे घालून, दुर्गम डोंगरातील खडतर रस्त्यावरून कित्येक मैलाची पायपीट करून हजर राहिले होते. सरकारी अधिकारी एकापाठोपाठ हजेरी लावत होते. त्यांचा जिल्हा योजना अधिकारी खेचरावरून पडल्यामुळे त्याला दवाखान्यात दाखल करावं लागलं. क्षेत्रीय जंगल खात्याचा अधिकारी घोड्यावरून येताना पडल्यामुळे डोक्याला बँडेज बांधूनच आला होता. जिल्हा न्यायाधीशास कार्यक्रमानंतर आठ दिवस बिछान्यात काढावे लागले. आमची योजना अर्थातच अधिकारीवर्गामध्ये अप्रिय ठरली.

लवकरच आम्हांला लखनौहून आदेश यायला सुरुवात झाली. नोकरशहा योजनेवरील त्यांची पकड सैल सोडण्यास तयार नव्हते हेच खरं. मी धावतपळतच लखनौला गेले आणि सर्व गोष्टींची विस्ताराने चर्चा केली. मला पुन्हा एकदा आश्वासन देण्यात आलं की, सर्व गोष्टी सुरळीत पार पडतील. परंतु मी ‘गोपाळ आश्रमा’त परत आल्यानंतर पुन्हा सरकारी हस्तक्षेप सुरू झाला.

मी योजलेल्या सुलभ व विकेंद्रित योजनेऐवजी सरकारला जर ही योजना त्यांच्या इतर योजनांसारखी चालावी, असं वाटत असेल तर संपूर्ण योजना त्यांच्या हवाली करणंच योग्य, असा विचार करून मी माझे अंग या योजनेतून काढून घेतलं.

माझ्या सर्व कल्पना आणि आशा जिथे धुळीस मिळाल्या आणि मला पसंत नसलेला सरकारी प्रकल्प जिथे साकार होणार होता, त्या ‘गोपाळ आश्रमा’मध्ये राहण्यास माझं मन तयार नव्हतं. त्यामुळे तो सोडण्याचं मी ठरवलं.

बरेचसे गांधीवादी कार्यकर्ते आचार्य विनोबांच्या ‘भूदान’ योजनेमध्ये सहभागी झाले होते. मलाही त्यांनी सहभागी होण्यासाठी आग्रह केला. पण त्या चळवळीबद्दल मला आकर्षण वाटलं नाही.

पुढे काय करावं, याबद्दल निर्णय घेण्याअगोदर मी दिल्लीला सल्लामसलत करण्यासाठी गेले. योगायोगाने माझी काश्मीरमधील लोकांशी गाठ पडली. पशुसंवर्धनासाठी काश्मीरमध्ये खूपच वाव होता असं आढळून आलं. ही कल्पना मला फारच आवडली. मंत्र्यांचीदेखील संमती होती. अखेर मी काश्मीरला जावं असं ठरलं. मी ‘गोपाळ आश्रमा’त परतले आणि दहा दिवसांत सर्व आवराआवर केली, जनावरं वाटून टाकली आणि निघाले. मनाचा निरोप घेणं मला फारच जड गेलं. त्याचंही वय वाढलं होतं. गेलं वर्षभर माझ्या कामासाठी मी दुसरा घोडा वापरत होते. ज्या गुजर लोकांकडून मी त्याला विकत घेतलं होतं, त्यांनाच मी तो परत केला. त्या लोकांना त्याच्याबद्दल माया होती. त्यांची जनावरं आणि घोडे यांच्याबरोबरच त्याला सांभाळण्याचं, तसंच त्याला काही काम न देण्याचं त्यांनी आश्वासन दिलं. त्याला सोडून जाणं फारच अवघड गेलं. इतका स्वामिभक्त आणि दोस्त असा घोडा मिळणं फारच कठीण.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

.

भिलनगंना प्रकल्पाच्या उभारणीसंबंधात मी दिल्लीला दुसऱ्यांदा गेले, त्या वेळेस एका संध्याकाळी मी खोलीत बसले असताना अचानक एक आनंदी आणि प्रफुल्लित चेहऱ्याची स्त्री आली. तिचा चेहरा टवटवीत होता. केस सोनेरी होते. चेहरा ओळखीचा वाटत होता. अचानक मला आठवले ही तर नीला. वर्ध्याच्या आश्रमामध्ये तिने अनेक फेऱ्या मारल्या होत्या. वाढत्या वयाखेरीज मला तिच्यामध्ये काहीच फरक जाणवला नाही. गेल्या २० वर्षांतील आमच्या अनुभवांबद्दल गप्पा मारण्यात आम्ही अनेक संध्याकाळी घालवल्या. तिने बरीच वर्षं मध्यपूर्वेतील देशांमध्ये घालवली होती. तिच्या कलेच्या माध्यमातून तिने जगातील भिन्न धर्म व संस्कृती ह्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे प्रयत्न करावेत, असा बापूंनी दिलेला सल्ला तिच्या अजूनही लक्षात होता. काश्मीरमधील कविता, ज्यात हिंदू व मुस्लीम तत्त्वज्ञानाचा मिलाफ झाला आहे, ती भाषांतर करण्याची कामगिरी तिने अंगावर घेतली होती. तिच्यामधील सुप्त गुणांची मला आता जाणीव होऊ लागली. बापूंनी मात्र तिची प्रतिभा पूर्वीच ओळखली होती. माझ्या दिल्ली वारीत आम्ही परत भेटलो. माझ्या काश्मीरच्या प्रकल्पाबद्दल तिला माहिती दिल्यावर तिने उत्साहाने पाठिंबा दिला.

गोपाळ आश्रमातील सहकाऱ्यांपैकी, जगदीश, त्याची पत्नी व ब्रह्मचारीजी माझ्याबरोबर होते. अत्यंत कष्टदायक अशा प्रवासानंतर जेव्हा आम्ही नऊ हजार फूट उंचीवर असलेल्या बनिहाल खिंडीच्या उत्तरेच्या बाजूला गेलो, तेव्हा लहान मुलांइतक्याच उत्साहाने बर्फामध्ये मनसोक्त खेळलो. आमच्यापैकी कोणीच काश्मीर अगोदर पाहिलं नव्हतं. त्यामुळे आमच्यासमोर चार हजार फूट खाली पसरलेल्या काश्मीरचे दर्शन हा एक अविस्मरणीय अनुभव होता. त्या वर्षी सभोवतालच्या सर्व बर्फाच्छादित पर्वतराजींचं दर्शन विलोभनीय होतं.

श्रीनगरला पोहचल्यानंतर आम्ही बक्षी गुलाम अहमद, तत्कालीन पंतप्रधानांच्या घरी गेलो. काश्मिरी आदरातिथ्याच्या प्रथेप्रमाणे त्या रात्रीची आमची राहण्याची सोय त्यांच्या निवासस्थानीच केली होती.

दुसऱ्या दिवशी आम्ही शेलटन या पाच मैलांच्या अंतरावरील सरकारी दुग्धसंस्थेमध्ये गेलो. अनेक घरांवर गोळीबाराच्या खुणा दिसत होत्या. त्यासंबंधी चौकशी केल्यावर रहिवाशांनी सांगितलं की, आक्रमक टोळीवाले तिथपर्यंत पोहचले होते.

आमची राहण्याची सोय चिनार वृक्षांनी वेढलेल्या एका आकर्षक घरामध्ये केली होती. मी कुतूहलाने आजूबाजूची झाडं, फुलं व गवत न्याहाळत होते. बनिहाल खिंडीच्या अलीकडील प्रदेशापेक्षा इथली वृक्षवल्लरी वेगळीच होती. उत्तरेकडील प्रदेशामधील वृक्षवल्लरींप्रमाणेच इथली झाडं व फळं होती. माझ्या परिचयाची काही फुलं पाहून मला माझ्या बालपणीचे दिवस आठवले.

गोसंवर्धनासाठी एक योजना राज्य सरकारला सादर करावी अशी माझ्याकडून अपेक्षा होती. त्या योजनेसाठी योग्य जागा शोधण्याची जबाबदारीपण माझ्यावरच सोपवली होती. सरकारी कार्यालयामध्ये वातावरण मोकळेपणाचं होतं आणि लालफितीच्या अडचणी सोडवणं दिल्ली किंवा लखनौपेक्षा फारच सुलभ होतं. त्यामुळे कामाला सुरुवात करणं सोपं होतं.

पशुसंवर्धन विभागामध्ये जर्सी जातीच्या गायींची आयात करण्याची योजना होती. त्यामुळे एखाद्या नवीन जातीच्या जनावरांचा उपयोग माझ्या योजनेमध्ये करावा, असं मला वाटलं. त्यामुळे काश्मीरमध्ये दोन व अधिक जातींच्या संकराचा प्रयोग करण्यास वाव होता. अधिक उंचावर असलेल्या प्रदेशामध्ये काम करण्याची माझी इच्छा होती. शक्य असल्यास याक जातीच्या जनावरांशी संकर करण्याचा प्रयोग मला करावयाचा होता. कारण हिमालयाच्या प्रदेशामध्ये अशा तऱ्हेच्या संकराला उत्कृष्ट मानतात, असं मी ऐकलं होतं. या प्रदेशामधील जनावरं काळपट रंगाची असल्यामुळे मी डेक्स्टर जातीची जनावरं आणण्याचं ठरवलं व त्याप्रमाणे माझी योजना तयार केली. एका महिन्याच्या आतच सरकारची अनुमती मिळाली. आता फक्त माझ्या प्रयोगासाठी योग्य जागा शोधणं बाकी होतं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

माझी मैत्रीण नीला, जी काश्मीरमधील कवितांचा अभ्यास करत होती, तिने खूपच मदत केली. तिच्या छोट्याशा मोटारीमधून तिने मला अनेक ठिकाणी नेले. सर्वच ठिकाणं सुंदर व निसर्ग सौंदर्याने नटलेली होती. परंतु माझ्या प्रयोगाच्या दृष्टीने योग्य ती जागा शोधणं गरजेचं होतं. त्यामुळे निर्णय घेण्यास वेळ लागत होता. अखेर एक छोटेसं खोरं, सिंद खोऱ्यापासून जिथून रस्ता पुढे गंगाबळकडे जातो, अशी जागा मी निवडली.

जमिनीचा ताबा मिळवणे आणि त्यावर इमारती बांधणं, हे काम फारच जिकिरीचं होतं. हिवाळा लवकरच सुरू होणार होता. हिवाळ्यात बर्फामुळे बनिहाल खिंडीतून येणारा रस्ता बंद होतो. त्या अगोदर मी मागवलेली जनावरं इकडे येणं आवश्यक होतं. भारतीय सैन्याची मला चांगलीच मदत झाली. बांधकामासाठी वापरात असणारा स्थानिक पत्थर फारच कठीण होता. सुरुंग वापरण्याची गरज होती. भारतीय सैन्याचे जवान सर्व साहित्य घेऊन आले आणि त्यांनी तीन महिन्याच्या आत सर्व बांधकाम पुरं केलं. त्यांची मदत मिळाली नसती, तर हे बांधकाम पूर्ण करण्यास सहा महिने तरी लागले असते. सर्व मजूर स्थानिक गावकऱ्यांपैकीच होते. बांधकाम पूर्ण झाल्यावर ते स्थानिक बांधकामासारखंच दिसत होतं. मी त्या जागेचे नाव ‘गौबाल’ असं ठेवलं.

ऑक्टोबर महिन्यामध्ये पहिला तबेला जवळजवळ पूर्ण होत असतानाच, मी मागवलेली डेक्स्टर जातीची जनावरं मुंबई बंदरामध्ये पोहचली. त्यांना आणण्यासाठी मी मुंबईस गेले. मी दिल्लीला थांबले व राष्ट्रपती राजेंद्रप्रसाद यांच्याकडे मुक्काम केला. ते जरी प्रासादतुल्य घरामध्ये राहत होते, तरी त्यांनी स्वतःसाठी वरच्या मजल्यावरील छोट्या खोल्या निवडल्या होत्या. त्यांचं खाणंपिणं आणि राहणी पूर्वीसारखीच साधी होती. मुंबईला जाण्याआधी त्यांच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने मी जनावरं दिल्लीमध्ये आल्यावर त्यांना हिरवा चारा मिळेल याची व्यवस्था आगाऊच करून ठेवली. परकीय हवामानामध्ये त्या जनावरांना अशा हिरव्या चाऱ्याची किती जरूर असेल याची मला कल्पना होती.

मुंबईमध्ये चांगलाच उष्मा होता. त्या मुक्या जनावरांना त्याचा चांगलाच त्रास होत होता, हे दिसतच होतं. प्रवासामध्ये एक लहान गाय दगावली होती. त्यांची परिस्थिती पाहून मी चांगलीच धास्तावले. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मदतीने मी त्यांच्या प्रवासासाठी घोड्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या वाघिणींचीही सोय केली होती. त्यामध्ये पंखे बसवून घेतले होते. त्यामुळे त्या वाघिणी प्रवासी गाडीला जोडण्याची सोय झाली होती. ती मुकी जनावरं जरी शब्दांनी आभार मानू शकत नव्हती, तरी ज्या तत्परतेने ती जनावरं आरामात खाली बसली त्यावरून त्यांची कृतज्ञता जाणवत होती.

मी विमानाने दिल्लीला गेले. पठाणकोटपासून उंचीवरील खिंडीतून त्यांच्या प्रवासासाठी ट्रक्सची सोय करणं जरुरीचं होतं. माझ्याबरोबर असलेल्या पशुवैद्यक अधिकाऱ्याने रेल्वेने प्रवास केला.

त्यांना दाटीवाटीने प्रवास करावा लागू नये म्हणून मी चार ट्रक्सची सोय केली होती. मी स्वतः एका गाभण असलेल्या गाईला घेऊन वेगळ्या ट्रकमधून प्रवास केला. पहिल्या रात्री आम्ही उधमपूरला मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी बनिहाल खिंड पार केली. दुसऱ्या रात्री श्रीनगरला मुक्काम करून तिसऱ्या दिवशी सर्व जनावरं त्यांच्या मुक्कामाला पोहचली. मी एक सुस्कारा टाकला. मला आता थकवाही खूप आला होता.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आमच्या डेक्स्टर जातीच्या वळूशी समागम करण्यासाठी स्थानिक गायी शोधणं जरुरीचं होतं. हे काम सोपं नव्हतं. कारण गावातील बऱ्याचशा गाई श्रीनगरमधील दुग्धशाळांमध्ये अगोदरच गेल्या होत्या. अखेर आम्ही सहा गाई मिळवल्या तसंच आजूबाजूच्या गावांनाही आमच्याकडे असलेल्या वळंबद्दल माहिती दिली.

या प्रकल्पाची प्रमुख मीच होते. त्यामुळे स्वत: काही न करता नुसतं हुकूम सोडण्याचा प्रश्न नव्हता. एक पशुसंवर्धनासाहाय्यक आणि जवळच्या गावांमधून घेतलेले काही कामगार एवढीच माझी फौज होती.

पर्वतीय प्रदेशामध्ये दुभत्या जनावरांना उन्हाळ्यामध्ये अधिक उंचीवरील प्रदेशामध्ये घेऊन जाणं आवश्यक असतं. तेदेखील एकदम न जाता दोन टप्प्यांमध्ये नेणं सोयीचे असतं. त्यामुळे डोंगरमाथ्यावरील बर्फ वितळायला लागताच मी आमच्या शेतापेक्षा उंचावरील चरण्यायोग्य जागा शोधू लागले. गौबाल सहा हजार फूट उंचीवर होतं. सात हजार फूट उंचीवरील जंगलाला लागूनच एक गुरांना चरण्यासाठी योग्य जागा होती. जंगल विभागाने आमच्या योजनेसाठी तीस एकर जागा मंजूर केली आणि आम्ही आणखी काहीं जमिनी खाजगी व्यवहाराने मिळवू शकलो. या ठिकाणी आम्ही गौपत्री बांधली आणि तिसऱ्या वर्षी आम्ही आठ हजार सहाशे फूट उंचीवर सोळा एकर जागेमध्ये गायींसाठी गोठे बांधले. ती जागा नितांत सुंदर होती. एका बाजूला सिंद खोरे होतं. दुसऱ्या बाजूस फर-पाईन वृक्षांनी आच्छादलेलं जंगल होतं.

आमच्या योजनेची चांगलीच प्रगती होत होती. पहिल्या वेळेस जन्मलेल्या वासरांच्या वेळेस आम्हांला काही अडचणी आल्या. परंतु दुसऱ्या वेळेस मात्र सर्व काही सुरळीत पार पडलं. डेक्स्टर जातीच्या वळूंखेरीज आमच्याकडे एक याक आणि गायीच्या संकरातून जन्मलेले दोन वळू आणि दोन गाईदेखील आमच्या गोठ्यात होत्या. ही पाच जनावरं लडाखची राजधानी लेहकडे जाण्याच्या वाटेवर दहा ते बारा हजार फूट उंचीवर असलेल्या कारगिल येथून मिळवली होती.

डेक्स्टर्स, काश्मिरी आणि याक यांच्या संकरास सुरुवात तर झाली होती. परंतु पशुसंवर्धन विभागाच्या धोरणामध्ये आमूलाग्र बदल झाला होता. परदेशीय जनावरांशी संकर न करता फक्त स्थानिक काश्मिरी जातीचींच जनावरं असावीत, असं नवं धोरण होतं. जर्सी जातीची जनावरं इंग्लंडहून आणण्याची माझी योजना रद्द करावी लागली. तसंच जर्सी आणि सेंद्रिय शेतीतील तज्ज्ञ श्री.न्यूमन टर्मर ज्यांना मी कोलंबो योजनेअंतर्गत बोलावलं होतं, त्यांचा कार्यक्रमदेखील रद्द करावा लागला.

केंद्र सरकारचं धोरण मात्र हिमालयीन प्रदेशासाठी परदेशीय जातीची जनावरं आणण्यास अनुकूल होतं कारण हिंदुस्थानातील उत्तम जातीची जनावरं उष्ण हवामानासाठीच योग्य होती. यामुळे मी दिल्लीला गेले आणि पशुसंवर्धन खात्यास असं सुचवलं की, परदेशी जनावरं आणण्यास त्यांचं धोरण अनुकूल आहे व काश्मीर सरकारचं धोरण वेगळं आहे, तेव्हा आमच्याकडचे डेक्स्टर त्यांना अनुकूल अशा हिमालयीन प्रदेशास पाठवावं आणि त्यांचा उपयोग करून घ्यावा. माझी सूचना त्यांना पसंत पडली व सर्व डेक्स्टरची रवानगी सिमल्याला झाली. मी आणि माझे सहकारी तेहरी गढ़वालला परत आलो.

परंतु पुढे काय करायचं हा प्रश्न उभा राहिला. मला राहायला जागा नव्हती. माझ्याकडचे पैसे अपुरे होते. ‘किसान आश्रम’, ‘पशुलोक’, ‘गोपाळ आश्रम’ व ‘गौबल’ हे सर्व प्रयोग स्वप्नवत् ठरले. ह्यापुढे सरकारी योजनांवर काम करायचं नाही, असं मी मनाशी ठरवलं.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

.

बापूंच्या निधनानंतरची गेली दहा वर्षं मी कामात व्यग्र राहिले. परंतु माझ्या अंतर्मनामध्ये सर्व काही थिजून गेल्यासारखी निःस्तब्ध शांतता अनुभवत होते. आता हळूहळू अंतर्मनाला जाग येऊ लागली होती. या अवस्थेतून विधाताच मार्ग दाखवील याची मला खात्री होती.

माझ्या मनातली अस्वस्थता हळूहळू वाढत चालली होती. या डोंगरांच्या सान्निध्यात राहून मी दुभंगलेल्या व नवनवीन शोधांमुळे भेदरलेल्या जगापासून पळून तर जात नव्हते ना? परत जीवनाला सामोरं जावं, असं वाटू लागलं. परंतु मला वाट दिसत नव्हती. मी स्वतःलाच अनोळखी झाले होते.

माझा दिनक्रम चालू ठेवला. मार्गदर्शनाची वाट पाहत राहिले. मला राहण्यासाठी घराची गरज भासू लागली. डोंगरदऱ्यांच्या सान्निध्यात शांतपणे राहता येईल, असं छोटंसं घर बांधण्यासाठी मी जागा शोधू लागले. मनाजोगी जागा शोधण्यासाठी मी खूप धडपड केली.

अचानक एक दिवस टपालामधून पॅरिसहून एक पत्र आलं. रोमा रोलाँच्या पत्नीने एक पुस्तक पाठवलं होतं. मला पुस्तक वाचण्याची तीव्र इच्छा होती. परंतु मी फ्रेंच भाषा तर विसरून गेले होते. काही दिवस पुस्तक टेबलावर पडून होते. एक दिवस माझ्या मनात विचार आला की, हळूहळू अक्षरं जुळवून काही वाचता येतं का ते पाहावं.

मी ते पुस्तक वाचायला सुरुवात केली. पहिल्याच बैठकीत तीन पत्रं वाचू शकले. आता मी ते पुस्तक दररोज वाचून पूर्ण केलं. इतकंच नव्हे तर मी ते पुस्तक पुन्हापुन्हा वाचत राहिले.

याच काळात माझ्या नकळत मी माझ्या आठवणी लिहिण्यास सुरुवात केली. आतापर्यंत मला खूप लोकांनी आठवणी लिहिण्याचा आग्रह केला होता. परंतु मी ठामपणे नकार देत राहिले. जेव्हा मनापासून इच्छा होईल, तेव्हाच मी तसा प्रयत्न करीन, असं मी ठरवलं होतं.

आणि अचानक मी माझ्या आठवणी लिहिण्यास सुरुवात केली. सुरुवातीला मी अडखळतच होते. पण दिवसागणिक माझ्या प्रयत्नाला गती प्राप्त झाली. परंतु जितक्या अचानकपणे मी सुरुवात केली होती, तितक्याच अचानकपणे माझ्या लिखाणाचा ओघ आटला. माझं लिहिणं थांबलं. मी कोण आहे? मी कुठे आहे? मी आयुष्यात काय साधलं? या प्रश्नांनी मी बेचैन झाले.

मी शांतपणे माझ्या गतआयुष्याबद्दल विचार करू लागल्यावर माझ्या लक्षात आलं की, मी बापूंना संपूर्ण समाधान कधीच देऊ शकले नाही. माझ्या अंतर्मनातल्या ऊर्मी दाबून ठेवल्यामुळे मी तणावपूर्ण जीवन जगत होते आणि बापूंना ही गोष्ट लक्षात आली होती व त्यांनी मला सावधानतेचा इशाराही अनेक वेळा दिला होता.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

माझ्या हेही लक्षात आलं की, गेल्या दहा वर्षांतल्या अविरत कामामुळे जरी अंतर्मनातल्या दबावाला मोकळी वाट करून देऊ शकले, तरी मनात खोल कुठे तरी अपूर्णतेची जाणीव सलत होती. या दुःखाने मला संपूर्ण ग्रासून टाकलं आणि अनेक महिने मी एकही अक्षर लिहिलं नाही.

बरीच भटकंती केल्यानंतर अखेर मला मनपसंत जागा मिळाली आणि मी त्या ठिकाणी राहायचं ठरवलं. मोकळी जागा असल्यामुळे मी जवळच जगदीश व ब्रह्मचारीजी यांच्या शेतावरील घरामध्ये राहू लागले. त्या जागेपासून माझ्या जागेवरील छोटंसं घर व गाईचा गोठा यांच्या बांधकामावर लक्ष ठेवण्यासाठी मला रोज जाणं सोपं होतं.

मी शोधून काढलेली जागा कल्पनातीत सुंदर होती. इतकी नयनरम्य जागा मिळेल असं मला स्वप्नातदेखील वाटलं नव्हतं. गवताळ जमीन होती. देवदार वृक्षांचं वन होतं. हिमालयाच्या पर्वतराजी दिसत होत्या.

संध्याकाळी कामगार घरी गेल्यावर मी त्या गवताळ जमिनीवर रेंगाळत असे. दृष्टिपथातील बंदरपंच, केदारनाथ, बद्रीनाथपासून नंदादेवी आणि त्रिशुळपर्यंत वीस ते पंचवीस हजार फूट उंचीच्या या पर्वतराजींचं मनसोक्त दर्शन घेत असे. सूर्यास्ताच्या वेळी काळोखामध्ये बुडण्याअगोदर या पर्वतराजींवरील बर्फाचा रंग सोनेरी, नारिंगी आणि लाल गुलाबी असा झरझर बदलत असे. आत्यंतिक शांत परंतु दृढतेचं प्रतीक, असं ते दृश्य डोळ्यांत साठवून मी स्वप्नात असल्याप्रमाणे शेतावरील घरी परतत असे. परंतु ते दृश्य माझ्या अंतर्मनांतील ऊर्मी चाळवत असे. कारण माझ्या मनातील खळबळ अजून निमाली नव्हती.

अशाच एका संध्याकाळी घरी परतल्यावर माझ्या मनात विचार आला की, रोमा रोलाँची पत्रं तर दोनदा वाचून झाली आहेत. आपल्याकडे रोमा रोलाँच आणखी एखादं पुस्तक असतं तर किती बरं झालं असतं. आणि अचानक मला आठवलं की, खूप दिवसांपूर्वी बापूंची पत्रं ज्या पेटाऱ्यामध्ये ठेवली होती, त्याच पेटाऱ्यामध्ये १९३१ साली जेव्हा बापू त्यांच्याकडे सात दिवस राहायला गेले होते, तेव्हा मला रोमा रोलाँ यांनी दिलेलं बीथोवेनवरील ‘Beethoven - The great creative eras’ हा ग्रंथदेखील ठेवला होता. त्या दिवसांमधील गडबड व अशांततेमुळे तो ग्रंथ वाचण्यासाठी लागणारी शांतता मला मिळाली नव्हती. त्यानंतर माझ्या मनाची अशी समजूत झाली होती की, मी माझं फ्रेंच भाषेचं सर्व ज्ञान विसरले आहे. त्यामुळे तो ग्रंथ न वाचताच पडून राहिला होता.

मी तो ग्रंथ पेटाऱ्यातून काढून वाचण्यास सुरुवात केली. वाचतावाचता माझ्या अंतर्मनामध्ये काही तरी मूलभूत चेतना जागृत होऊ लागली. मी डोळे मिटून स्वस्थ बसले. मला जाणीव झाली की, ज्या बीथोवेनच्या संगीतापासून मी गेली ३० वर्षं दूर गेले होते, तेच संगीत माझ्या मनामध्ये पुन्हा झंकारू लागलं होतं. परंतु या वेळेस ते संगीत एक नवा दृष्टीकोन आणि स्फूर्ती घेऊन नव्या स्वरूपात साकार होऊ पाहत होतं..

मला माझ्या मूळ अंतरंगाची जाणीव होऊ लागली. काही काळ मी स्वतःला हरवून बसले. मी परत भानावर आले, तेव्हा माझ्या मनातील ताण-तणाव आणि खळबळ निमाली होती. माझ्या या आयुष्यातील तिसऱ्या व अखेरच्या पर्वाच्या नांदीचे सूर मनात झंकारू लागले आणि माझी पावलं त्या दिशेने पडू लागली.

‘अंतरात्म्याची शोधयात्रा’ – मीराबेन (मॅडेलिन स्लेड)

मराठी अनुवाद – अनिल कारखानीस । मॅजेस्टिक पब्लिकेशन, मुंबई । पाने - ३२० । मूल्य – ५५० रुपये (हार्ड कव्हर)

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......