मी परत भानावर आले, तेव्हा माझ्या मनातील ताण-तणाव आणि खळबळ निमाली होती. माझ्या या आयुष्यातील तिसऱ्या व अखेरच्या पर्वाच्या नांदीचे सूर मनात झंकारू लागले

बापूंच्या निधनानंतरची गेली दहा वर्षं मी कामात व्यग्र राहिले. परंतु माझ्या अंतर्मनामध्ये सर्व काही थिजून गेल्यासारखी निःस्तब्ध शांतता अनुभवत होते. आता हळूहळू अंतर्मनाला जाग येऊ लागली होती. या अवस्थेतून विधाताच मार्ग दाखवील याची मला खात्री होती. माझ्या मनातली अस्वस्थता हळूहळू वाढत चालली होती. या डोंगरांच्या सान्निध्यात राहून मी दुभंगलेल्या व नवनवीन शोधांमुळे भेदरलेल्या जगापासून पळून तर जात नव्हते ना?.......