रंगभूमीला नवा आयाम देणारे ‘अधांतर’ इतिहासाचे एक वेदनेचे पान आहे. काळाच्या तुकड्याचा ऐवज आहे. मूल्यपरिवर्तनाची आस असलेले एक जीवनदर्शन आहे...
ग्रंथनामा - झलक
राजू देसले
  • ‘अधांतर : भूमी व अवकाश’चे मुखपृष्ठ
  • Tue , 29 August 2023
  • ग्रंथनामा झलक जयंत पवार Jayant Pawar अधांतर Adhantar

प्रसिद्ध पत्रकार व नाटककार जयंत पवार यांच्या ‘अधांतर’ या नाटकाचा धांडोळा घेणारा ‘अधांतर : भूमी व अवकाश’ हा देखणा व भारदस्त ग्रंथ नुकताच प्रकाशित झाला आहे. नाट्यकर्मी राजू देसले यांनी त्याचे संपादन केले आहे. यात विजय तेंडुलकर, भालचंद्र नेमाडे, रत्नाकर मतकरी, वसंत आबाजी डहाके, शांता गोखले, संजय पवार, कमलाकर नाडकर्णी, अशोक राणे, रामू रामनाथन, मंगेश कदम, अनिरुद्ध खुटवड, किशोर कदम, ज्योती सुभाष, संजय नार्वेकर, भरत जाधव, अनिल गवस, राजन भिसे, गणेश मतकरी, संध्या नरे-पवार अशा विविध मान्यवरांनी ‘अधांतर’विषयी आपापल्या दृष्टीकोनांतून लिहिलेल्या लेखांचा समावेश आहे. लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित झालेल्या या ग्रंथाला संपादक राजू देसले यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेचा हा संपादित अंश…

..................................................................................................................................................................

नाटक रंगमंचावर येणे म्हणजे भवतालाला समजून घेऊन रंगभाषेतून आविष्कृत करणे. मग सादरीकरणातून इतर सर्व तांत्रिक बाजूचा संकर होऊन नाटक ‘एक होणे’पर्यंत येऊन पोहोचते. रंगभाषा, तिचे संवादाच्या भाषेतून आलेले प्रभावीपण, परिणामकारकता, सादरीकरण यातून नाटकाचा सशक्त अनुभव प्रेक्षकाला मिळतो. हे सारं ‘अधांतर’ला लागू होतं.

जयंतने गिरणगावातील कामगारांची व्यथा, तळमळ जवळून बघितली होती. त्यात त्याचे नातलग होते, जवळची माणसं होती. त्याचं संपानंतरचं जिणं त्यानं बघितलं होतं. त्यातील अनेक घटनांचा तो साक्षीदार होता. त्यांच्या जगण्याची दाहकता त्यानेही सोसली होती. हतबलपणा, असहायता याचं जिवंत चित्र जयंतने बघितलं होतं. ते सारं ठेचकाळलेपण, कामगारांच्या मनावरचे ओरखडे टिपले होते, तो विषण्ण होत होता. ते सारं त्याच्या बोलण्यातून जाणवत असे. संवेदनशील कलावंत असलेल्या जयंतला हे दुःख जगासमोर आणायचं होतं. त्यासाठी कुठलं माध्यम प्रभावीपणे परिणामकारकपणे भिडेल? या विचारातून ‘अधांतर’ जन्माला आलं.

‘अधांतर’ची लेखन प्रक्रिया खूप दमवणारी व त्रासदायक होती. तो काळ त्याच्यासाठी भयावहच होता. रंगभूमीवर त्या काळात सादर होणारी नाटके, त्यांचे आशय, विषय, प्रयोग वेगळेपण जोपासत होती. त्याच प्रवाहात ‘अधांतर’ने नव्या जाणिवेचे नाटक म्हणून रंगभूमीला हादरा दिला. मोलमजुरी वा रोजंदारीवर काम करण्याचं कुठलंही भविष्य नसलेल्या माणसांच्या, तोंडातला हक्काचा घास हिरावणाऱ्या व्यवस्थेला जयंतने जाब विचारला. दुःखाची लिपी जयंतने या नाटकाच्या माध्यमातून हलकेच उलगडून दाखवली. प्रयोग हाऊसफुल होत होते. आपलं नाटक, आपलं म्हणणं यात आहे, असं नाटक पाहणारा प्रेक्षक सांगू लागला.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

‘अधांतर’च्या निर्मितीच्या अनेक कथा, लिहितानाची तडफड बोलण्यातून तो व्यक्त करत असे. नाटककार आणि त्याच्या लेखन प्रक्रियेचा उलगडा करण्याचे कुतूहल जयंतने माझ्यात निर्माण केले. नाटक लिहिणं, करणं हा जिवाशी खेळ आहे हे त्याच्या बोलण्यातून जाणवत असे... ‘अधांतर’मधील घटना, प्रसंग यांची नाट्यमयता, जिवंतपणा मला कायमच प्रेक्षक, रसिक, वाचक म्हणून जवळची वाटत असे.

या साऱ्या चर्चेचा लसावि म्हणून जयंतने मला ‘अधांतर’च्या संहिता सादरीकरण याविषयी संपादन करण्यासाठी तू काही तरी आराखडा तयार कर आणि मला दाखव असं सांगितलं. दोन-तीन महिन्यांनंतर कागदावर काही लेखकांची नावे आणि त्यांचे विषय असे लिहून दिले आणि पुस्तक कसे असावे, याबाबत गोषवारा मांडला. ते वाचून जयंतने कामाला सुरुवात कर व लेखकांना कुठल्या विषयांवर लिहायला सांगायचे ते तूच ठरव, मी सोबत आहे, असे सांगितले.

यात मी १३- १४ वर्षे आरपार बुडून गेलो होतो. जयंत सोबत वारंवार चर्चा, मार्गदर्शन यातून मला काहीतरी नवं आणि मूलभूत गवसल्याचा आनंद होत असे. जयंतचं गंभीर चिंतन, बोलणं, समोरच्याला समजून घेणं, विश्वास टाकणं, यामुळे ‘अधांतर’ माझ्यासाठी मलाही घडवण्याचा प्रवास होता. जयंतशी होत असलेल्या साहित्यविषयीच्या चर्चा, नाटक फॉर्मविषयीच्या चर्चा, माझ्या आकलनाच्या कक्षा रुंदावणाऱ्या होत्या.

***

‘अधांतर’ लिहितानाचा काळ, त्यावेळची सामाजिक परिस्थिती, राजकीय, सांस्कृतिक संदर्भ यांचा वेध जयंत बोलण्यातून घेत असे. लिहितानाच्या खोलवर जखमा कित्येक वर्षे तो जोपासत होता. जगण्यातली विषमता त्याला कायमच त्रास देत असे. त्यामुळे त्याच्यातला लेखक कायम अस्वस्थ असे. स्वत:च्या नाट्य आणि कथालेखनाबरोबरच पत्रकार म्हणून समकालीन प्रश्नांवर तो पोटतिडकीने लिहीत असे. प्रश्न मांडत असे. जयंत याला ‘शतखंडित वास्तवात लेखकाच्या व्यक्तित्वाचेही असे तुकडे होत असतात’, असं म्हणत असे. आजूबाजूच्या स्वार्थी आत्मकेंद्री व्यक्तींवर त्याचा राग होता.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

जयंत पवार हा समकालीन मराठी साहित्यातला ‘अनन्यसाधारण’ आणि ‘जागल्या लेखक’ होता...

जयंत पवार यांनी मराठी कथेच्या धमन्या रुंदावण्याचे काम केले. दुय्यम, गौण म्हणून हिणवल्या गेलेल्या या वाङ्मयप्रकारास प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा मोठा हातभार आहे

मांजरेकरांना बनवायची होती, ज्युवेनाईल सेक्स क्राईम फिल्म... आणि त्यांनी आधार घेतला जयंत पवारांच्या कथेचा!

जयंत पवार गेले त्या वेळची गोष्ट 

..................................................................................................................................................................

काळ, अवकाश यांचा मेळ घालत काळाची नेमकी नस पकडणारा जयंत आजचे जग लेखनातून पकडतो आणि आपल्याला अनुत्तरित करतो. त्याच्या लेखनातील सारीच पात्रे ही परिस्थितीशी संघर्ष करणारी आणि नव्या सामर्थ्याने पुन्हा उभारी घेणारी आहेत. नाट्यतंत्र आणि नाटकाचा विचार यांची खोलवर जाणीव त्याला असल्याने नाट्यसंहिता सादरीकरण यांच्यातील संघर्ष तितक्याच ताकदीने आविष्कृत होतो. हा जयंतच्या नाट्यलेखनाचा सशक्त भाग आहे. नाटकातील पात्रे व समाजाची बदलती मानसिकता यांची थेट व भेदक जाणीव तो आपल्या लेखनातून व्यक्त करतो.

लेखन, कलावंताची जडण-घडण, त्याचा प्रवास यांचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनातून प्रखरपणे येते. तो उद्गार जीवनमूल्यांविषयी, जगरहाटीविषयी भाष्य करणारा असतो. एक प्रकारे ते ब्रह्मवाक्य असते. तो लेखकाचा आवाज असतो. त्याच्या लेखनात समष्टीविषयी करुणा आणि तितकीच आस्थाही आहे.

‘अधांतर’ची मराठीतील परिणामकारकता जितक्या तीव्रतेची होती, त्याहूनही जास्त तीव्रता हिंदी रंगभूमीवर होती, हे रसिक, समीक्षक आवर्जून सांगतात. एखाद्या नाटकाच्या भाषेच्या अवकाशापलीकडे इतका आशय घटनांना, विषयाला भिडणारा अनुभव क्वचितच येतो. आविष्काराचे वेगळेपण, पारंपरिक नाटकाचा बाज, भाषा यांचा अनोखा रंगखेळ या नाटकाने रंगभूमीला दिला. त्यातून ‘प्रोसेनियम आर्च’मध्ये घडणाऱ्या यातील घटना अंगावर येणाऱ्या होत्या.

‘अधांतर’ हे एक जीवनदर्शन आहे. समाजातल्या एका वर्गाचं, व्यवस्थेचं जीवनमूल्य काय, याचा वेध आहे. त्यात मूल्यपरिवर्तनाची आस आहे. समाजाच्या एका वर्गाची घुसमट होताना, ती बघत राहणे कितपत योग्य आहे? याविषयीचा कृतिशील उद्गार म्हणजे हे नाटक. जनतेच्या व्यक्तींच्या व्यथा वेदना इथे मांडल्या आहेत. कामगार वर्गाची, त्यांच्यातील उद्वेगाची जाणीव व्यक्त करत जयंतने पोटतिडकीने हे सत्य मांडले. या नाटकाने प्रेक्षकांना नाटक आणि वास्तवाचे सणसणीत भान, बघण्याची दृष्टी दिली. रंगभूमीवरील पारंपरिक साचेबंदपणाची मोडतोड केली. व्यावसायिक समकालीन, प्रायोगिक रंगभूमीवर जे घडत होतं, त्याला छेद देत नाटकाची नवी रंगभाषा जोरदारपणे येऊन आदळली. नाट्यविचार देण्याची रूढ चौकटही तितक्याच जोरकसपणे पुढे नेली. संवादाची प्रखर भाषा असूनही सादरीकरणात संयमितपणे तिचा परिणाम पोहोचला. नाटक या साहित्य प्रकाराला रूढार्थाने व्यापक भान देण्याचे महत्त्वपूर्ण काम या नाटकाने केले.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

रंगभूमीवर यापूर्वी क्रांतीप्रवण, युद्ध नाट्य सादर झाली होती. त्या पलीकडे मनातील सुप्त संवेदना, संघर्षाची अन्याय यांवर भाष्य करणारं 'अधांतर' वेगळं ठरलं. जयंतचे समकालीन नाटककार जे विषय मांडत होते, त्यातील प्रत्येकाचा व्यवस्थेकडे, जीवनव्यवहाराकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा. त्यातून समकालाला कवेत घेऊन नवी नाट्यजाणीव रुजत होती. त्याच परंपरेतील वेगळा बाज घेऊन हे नाटक आले. जयंत तळागाळात जाऊन त्यांच्याशी नातं जोडणारा, त्यांची दुःखं जाणून घेणारा लेखक होता. ती अस्वस्थपणाची धग लेखनात, डोक्यात घेऊन फिरणारा अस्सल कलावंत होता.

रंगभूमीवरील नवी येणारी नाटके जयंत बघत असे, त्यावर लेखनातून भाष्य करत असे. शहर ते महानगराच्या पातळीवरील घडणाऱ्या नाटक या खेळाची जाण त्याला होती. रसिकांची अभिरुची, तसेच प्रेक्षक कसा बदलत जातो, त्याची भूक काय, यावरही त्याचे लक्ष असे.

जयंतचे ‘नाट्यचिंतन’ म्हणजे नाटककार म्हणून मूलभूत विचार होता. खेड्यापाड्यातील नाटक करणाऱ्या कलावंतांना तो उभारी देत असे. त्यांच्या जगण्याला पूरक असलेल्या नव्या संहिता शोधायला सांगत असे. जयंतचं नाट्यलेखन मुळातच समाजाचा तळठाव घेणारं होतं. त्यात हिंसा होती, आवेग होता. त्या पलीकडे जाणारा जगण्याचा विचार होता. तो विचार प्रेक्षकांमध्ये निर्माण करण्याचे सामर्थ्य होतं.

अभिजात शोकांतिका म्हणून ‘अधांतर’ नाट्यपरंपरेतील ‘मैलाचा दगड’ आहे. रंगभूमी ही प्रवाही गोष्ट आहे. नव्या-जुन्याची सांगड घालत ‘परफॉर्मिंग आर्ट्स’ म्हणून रंगमंचावर घडणाऱ्या व अनेक घटनांना जगण्याच्या तळापर्यंत नेणारा हा अभिजात प्रवास आहे. जगण्यात विखुरलेले अनेकविध तुकडे एकत्र करून कोलाज रंगमंचीत होतो. आणि त्यातून येणारे विधान अनेकांच्या मनातला प्रकाशाचा किरण ठरत असतो.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

‘अधांतर’चा वेध संहितेच्या अंगाने व्हावा, हे मी आधी ठरवले होते व त्या दिशेने वाटचालही सुरू केली. परंतु नंतर मात्र चर्चेतून सर्वंकष कलाकृती म्हणून वेगळेपण समोर यावे, संहितेबरोबरच तांत्रिकता, सादरीकरण याचा एकत्रित विचार व्हावा, हा उद्देश समोर ठेवून विषयानुरूप संपादनाची दिशा ठरवली. रंगभूमीवर इतिहास घडवणाऱ्या ‘अधांतर’चे डॉक्युमेंटेशन (दस्तऐवजीकरण) व्हावे, या उद्देशाने, नाट्यलेखनातील परिणामांचा सर्व अंगांने विचार व्हावा, या जाणिवेतून जयंतशी बोलून लेखक, नाट्यकर्मी, त्यांना देण्यात येणारे विषय, यांविषयी सखोल चर्चेतून काही नावे पुढे आली. त्यातील काही नावे रंगभूमीशी निगडीत होती. त्यांनी ‘अधांतरच्या’ मंचीय पैलूंवर प्रकाश टाकावा, या अनुषंगाने विषय देण्यात आले. त्यातील काही लेखकांशी चर्चा करून त्या दिशेने ग्रंथप्रकल्पाला सुरुवात झाली.

नाटक समजून घेण्यासाठी गिरणी कामगारांचा संप, त्या वेळची एकंदर सर्व पातळ्यांवरची स्थिती समजून घेणे आवश्यक वाटले. म्हणून या साऱ्याचा शोध घेणारे, संदर्भमूल्य असलेले अभ्यासपूर्ण लेख लिहून घेतले.

‘अधांतर’चे लौकिकपण लेखकांनी मांडायला सुरुवात केली होती. वाचन, चर्चा व काही सूचना यातून परिपूर्ण लेखांचं समाधान आम्हाला येत होतं. नव्या पिढीतील लेखक ते ज्येष्ठ लेखक यांच्या दृष्टीकोनातून ‘अधांतर’चे वेगळेपण समोर यावे, ही मूलभूत धारणा यामागे होती आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत गेला. जयंतचे नाट्यलेखन, नाट्यतंत्र यावर असलेली पकड, अभ्यास लेखांतून समोर येत होता. नाटकाची भाषा, त्यातील नाट्य, संवाद, वास्तव यांचा परिणामकारक वेध या लेखांमध्ये प्रभावीपणे आला आहे.

बरेचसे लेखक रंगभूमीशी निगडीत होते. त्यांनी ‘अधांतर’मधील नाट्यमूल्यांविषयी आपली मते मांडली आहेत. जयंतच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना म्हणजे नाटककार विजय तेंडुलकर व भालचंद्र नेमाडे यांचे मार्गदर्शन, मित्रत्व. यामुळे संघर्षाच्या काळातही जयंतने लेखनाच्या अभिव्यक्त होण्यावर परिणाम होऊ दिला नाही. ती त्याच्यासाठी ऊर्जा होती. तेंडुलकर व नेमाडेंचे लेख जयंतच्या लेखनाची महत्ता, स्वभाव, थोरपण व्यक्त करणारे आहेत.

..................................................................................................................................................................

हेहीपाहावाचा -

जयंत पवार हा समकालीन मराठी साहित्यातला ‘अनन्यसाधारण’ आणि ‘जागल्या लेखक’ होता...

जयंत पवार यांनी मराठी कथेच्या धमन्या रुंदावण्याचे काम केले. दुय्यम, गौण म्हणून हिणवल्या गेलेल्या या वाङ्मयप्रकारास प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा मोठा हातभार आहे

मांजरेकरांना बनवायची होती, ज्युवेनाईल सेक्स क्राईम फिल्म... आणि त्यांनी आधार घेतला जयंत पवारांच्या कथेचा!

जयंत पवार गेले त्या वेळची गोष्ट 

..................................................................................................................................................................

जयंतचे माणूस, लेखक, कलावंत असणं व त्यापलीकडे त्याच्या महान कर्तृत्वाचा लक्षणीय वेध, या पुस्तकात पानोपानी घेतला आहे. अधांतरचा हिंदी, मराठी रंगभूमीवरचा आव्हानात्मक प्रवास दिग्दर्शक अनिरुद्ध खुटवड यांच्या लेखनातून आला आहे. अधांतरचे समकालीनत्व, भाषेपलीकडचा अनुभव याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. वसंत आबाजी डहाके यांनी अधांतरकडे अभिजात शोकांतिका म्हणून बघितले आहे. रत्नाकर मतकरी, डॉ. माया पंडित, रवींद्र लाखे, कमलाकर नाडकर्णी अशा सर्वच लेखकांनी पुस्तकाला संदर्भमूल्य प्राप्त करून दिले आहे आणि ‘अधांतर’चे अभिजातपण अधोरेखित केले आहे.

नाटककार विजय तेंडुलकरांनी ‘अधांतर’चा प्रयोग बघून डोके सुन्न करणारा परिणाम अनुभवला. यावरून या नाटकाची परिणामकारकता लक्षात येते. ‘अधांतर नाटकातील स्त्रिया’ हा अनिल फराकटे यांचा लेख तसेच संजय आर्वीकर यांचा ‘अधांतर तोलणारी आई’ हे लेख ‘अधांतर’मधल्या स्त्री-जाणिवांविषयीचे उदात्तपण तिची सोशिकता यांचे दर्शन घडवणारे आहेत.

डॉ. महेंद्र कदम, रामू रामनाथन, अशोक राणे, प्रवीण बांदेकर, किशोर कदम, प्राजक्त देशमुख या सर्वांच्या लेखणीतून ‘अधांतर’चे रंगमंचीय सामर्थ्य, मोठेपण उजागर झाले आहे. नाट्यतंत्र, रंगावकाश यांचे विलक्षण जग या नाटकाने दाखवले आहे, ते या ग्रंथातील लेखात मान्यवरांनी अभ्यासपूर्णपणे मांडले आहे. ‘अधांतर’ची ही रूढ अर्थाने समीक्षा नसून नाट्यमूल्यांची समाजशास्त्रीय चिकित्सा आहे..

संध्या नरे-पवार यांनी जयंतची पत्नी आणि ‘अधांतर’च्या लेखन प्रक्रियेच्या साक्षीदार म्हणून नाटककार जयंतची तडफड, अस्वस्थता अनुभवली आहे. या प्रवासात त्यांनी सारं सोसलं आहे. या नाटकाचा अद्भुत व तितकाच जीवघेणा प्रवास त्यांनी बघितला आहे. याची प्रचीती त्यांच्या लेखातून येते.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

अधांतर रंगमंचावर सादर होणे, हा नाट्य अवकाश, काळ यांचा अनोखा आविष्कार होता. आशय, विषय यांची भेदकता घेऊन अभिनीत करणे हे कलावंतांपुढे शिवधनुष्य होते. अधांतरच्या तालमींनाही जयंतची उपस्थिती असे. नाटककार, दिग्दर्शक, कलावंत यांच्या एकत्रित समन्वयातून नाटक उभं राहिलं आणि एक नाट्यप्रलयाचा झोत आला. एका काळाचा घटनांचा उद्गार यातून समोर आला. हे रंगभूमीला नवं होतं. रंगमंचीय सादरीकरणाचा अनुभव दिग्दर्शक मंगेश कदम, ज्योती सुभाष, संजय नार्वेकर, भरत जाधव, राजन भिसे आदी कलावंतांनी आतून मांडला आहे. एखाद्या नाटकाशी असलेली बांधीलकी, नाळ, तळमळ नाटक रसिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अभिमानास्पद आहे, याची जाणीव कलावंतांच्या मनोगतातून खोलपणे आली आहे.

रंगभूमीला नवा आयाम देणारे ‘अधांतर’ इतिहासाचे एक वेदनेचे पान आहे. काळाच्या तुकड्याचा ऐवज आहे.

‘अधांतर : भूमी व अवकाश’ : संपादक – राजू देसले

लोकवाङ्मय गृह, मुंबई । पाने – ४५२ (हार्डबाउंड) । मूल्य – ६०० रुपये

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......