जयंत पवार यांनी मराठी कथेच्या धमन्या रुंदावण्याचे काम केले. दुय्यम, गौण म्हणून हिणवल्या गेलेल्या या वाङ्मयप्रकारास प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा मोठा हातभार आहे
ग्रंथनामा - झलक
संदीप दळवी
  • ‘हा ऋतू वेगळा आहे’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Wed , 24 August 2022
  • ग्रंथनामा झलक हा ऋतू वेगळा आहे ha Rutu Vegla Aahe जयंत पवार Jayant Pawar ललित पब्लिकेशन Lalit Publication

प्रसिद्ध कथाकार (कै) जयंत पवार यांच्या चार कथासंग्रहांविषयीच्या समीक्षा\आस्वादपर लेखांचे ‘हा ऋतू वेगळा आहे’ हे पुस्तक संदीप दळवी यांनी संपादित केले आहे. नुकत्याच प्रकाशित झालेल्या या पुस्तकाचे प्रकाशन ललित पब्लिकेशनने केले आहे. दळवी यांनी या पुस्तकाला सविस्तर, दीर्घ अशी प्रस्तावना लिहिली आहे. तिचा हा संपादित अंश…

.................................................................................................................................................................

१.

जयंत पवार यांच्या ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ ते ‘मोरी नींद नसानी होय’पर्यंतच्या चारही कथासंग्रहातील काही ठळक सूत्रे समोर ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. जयंत पवार यांच्या कथेत महानगरीय संवेदनशीलतेचे फार प्रभावी चित्रण पाहायला मिळते. भाऊ पाध्ये, बाबुराव बागुल, नामदेव ढसाळ यांनी महानगरीय अधोविश्वाची संवेदनचित्रे फार प्रभावीपणे साकारली. जयंत पवार यांची कथा या मजबूत स्तंभावर उभी राहून पुढच्या शक्यता धुंडाळते. त्यांच्या जीवनदृष्टीमध्ये सामान्य माणूस केंद्रस्थानी आहे. मुख्यतः काळाच्या उदरात गडप झालेल्या कष्टकऱ्यांच्या गोष्टींचे उत्खनन करण्याचे काम त्यांची कथा करते. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथेत तीन पिढ्यांचा गिरणी कामगारांच्या लढ्याचा इतिहास, त्यातील प्रखरता आणि काळाच्या प्रत्येक टप्प्यावर लढ्याचे पातळ होत जाणे विलक्षण पद्धतीने रेखाटले आहे. १९३९चा लढा श्याम हडकरच्या पणजीने लढला. मालकाला नमते घ्यायला लावत सर्वांना कामावर घ्यायला ती भाग पाडते. हिकमतीने लढलेल्या पणजीचा वारसा आजोबा पंढरी पुढे चालवतात. मात्र मालकाच्या धूर्तनीतीसमोर त्यांचा निभाव लागत नाही. श्याम तर फिनिक्स मिलच्या जागेवर उभा राहिलेल्या मॉलचा बळी ठरतो. या झगमगीत, नवभांडवलशाही दुनियेत कष्टकरी पिढी कोणत्या टोकावर उभी आहे, हे या उदाहरणावरून लक्षात येते. नवभांडवली व्यवस्थेच्या रीतीभाती, कायदेकानून स्वीकारतच त्यांना जगावे लागते. महानगराचा हा बदलता अवकाश आणि त्याच्या अक्राळविक्राळ पसरलेपणात कष्टकरी माणसाचे काय होते, याचा अतिशय तपशिलाने वेध ही कथा घेते.

‘साशे भात्तर रुपयाचा सवाल अर्थात युद्ध आमचे सुरू’ ही महानगरातील वर्गीय अस्मितांची तीव्रता अधोरेखित करणारी कथा आहे. चित्रपटसदृश्य शैलीतून झोपडपट्टीविरुद्ध अपार्टमेंट हा संघर्ष, त्यातील ताण साकारले आहेत. त्यास पुरक अशा अवकाशवर्णनातून आणि संवादातून घटना-प्रसंग दृश्यमान होतात. ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन’ ही कथा महानगरीय जगण्यातील असुरक्षितता, भयावहता, हतबलतेचे चित्रण करते. महानगरातील व्यक्तींना अशा गोष्टींनी वेढले आहे. टेंगशेला याचा प्रत्यय अधिक तीव्रतेने येतो. त्याच्या जाणीव-नेणिवेच्या पातळीवर गतकालीन घटनांचा ओरखडा आहे. त्याविषयीचा अपराधभाव आहे. आपल्या मनातील कोलाहल रिता करण्यासाठी लेखणीचा आधार घेत तो भूमिका घेण्याचा प्रयत्न करतो. पुढे तेही खुंटते. तीन बहिणींचा आत्महत्येचा प्रसंग, ट्रेनमधील बलात्काराच्या प्रसंगी उपस्थिती, या गोष्टी त्याला आतून पोखरून टाकतात. दुःस्वप्नाची ही धडाडती ट्रेन त्याच्या अंगावर कोसळत राहते. सर्वत्र एकप्रकारचे अंधःकारभय दाटून येत आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर चालली आहे, या गर्तेत तो मिटत जातो. एकूणच भविष्यात ही पडझड कोणत्या टोकाला जाईल, याविषयांचे संसूचनही ही कथा करते. या गोष्टींना आता सार्वत्रिकतेचे परिमाण प्राप्त होत आहे. अशा गर्तेमध्ये सामान्य माणूस आपसूकपणे फसत जातो. यापासून स्वतःला दूर ठेवणे या काळात अशक्यतेच्या पातळीवर गेले आहे. महानगरीय माणसाला मनःस्थितीचा नेमकेपणाने वेध जयंत पवारांनी घेतला आहे.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा’ या कथेतून झोपडपट्टीतील अधोविश्व समोर येते. ऐंशीनंतरच्या काळात महानगरातील पालटलेल्या स्थितीगतीचे चित्रण या कथेत आहे. या काळात बिल्डरलॉबीचा उदय झाला. या व्यवसायात गुंडगिरी आणि राजकीय लोकांचा हस्तक्षेप वाढला. झोपडपट्ट्यांच्या जागी गगनचुंबी इमारती उभ्या राहिल्या. या विकासाच्या झंझावाताखाली अनेकांची आयुष्ये भरडली गेली. या बाहुबली व्यवस्थेसमोर बय, डिग्या, बाबी, धनू यांचा निभाव लागत नाही. या नव्याने निर्माण झालेल्या मोहमयी दुनियेत त्यांना जागा नाही. ते एकतर नामशेष होतात अन्यथा आखीव-रेखीव कक्षेच्या बाहेर फेकले जातात. ‘तुझीच सेवा करू काय जाणे’ या कथेत गिरणी कामगारांच्या जीवनाचे प्रातिनिधिक चित्र येते. गिरण्या कशा बंद पाडल्या जातात, याचा साद्यंत इतिहास येतो. चार पिढ्यांच्या दुःसह जगण्याची गाथा या कथेत आहे. विघ्नहर्ता गजाननावर असलेली अपार श्रद्धाही त्यांना काळोख्या अधोविश्वातून बाहेर काढू शकत नाही. तरीही नव्याने तग धरून उभं राहण्यासाठी हा आध्यात्मिक अनुबंधच त्यांना पोषक ठरतो.

‘मोरी नींद नसानी होय’ या कथेत महानगरातील रेल्वे स्टेशनवरचे अलक्षित जग येते. नंदकिशोर, बिरजी, राधेश्याम, माई, बडवानी, नन्हे, बडकी, शबो अशा व्यक्तिरेखांनी व्यापलेले हे कथन बिहार ते मुंबई असा व्यापक अवकाश कवेत घेते. स्टेशनवरचे भिकारी, वेश्या, भंगार गोळा करणाऱ्यांचे हे जग आहे. तिथल्या जगाचे स्तर खरवडून लेखकाने पृष्ठस्तरावर आणले आहेत. असंही एक जग आपल्या अवतीभवती आहे, याने आपल्याला गरगरायला होते. मुंबईसारख्या शहरात नंदकिशोर हा किशोरवयीन मुलगा आपल्या कुटुंबाला कर्जाच्या दलदलीतून बाहर काढण्यासाठी येतो. राधेश्यामच्या चहा-नाष्ट्याच्या गाड्यावर काम करतो. आपल्या निरागसतेने तिथला अवकाश भारून टाकतो. बिरजी त्याला उभारी देतो, विश्वास देतो. पुढे बिरजीच आध्यात्मिक गुरूच्या नादाने त्याच्या मृत्यूस कारण ठरतो. अंतासमयी किशोरच्या डोळ्यांसमोर माई, बडकी, नन्हे यांचे चेहरे तरळून जातात. शहर माणसाला एकटं करून खुडून टाकतं, तेच त्याचं भागधेय ठरतं. जयंत पवार यांनी अतिशय बारकाव्यानिशी हे जग रेखाटले आहे. बंबया बोली आणि उत्तर प्रदेशातील भोजपुरी बोलीच्या मिलाफातून हा कथनऐवज त्यांनी सजीवरित्या साकारला आहे.

‘रमाकांत.... एक खोल विवर’ ही कथा महानगरातील तळाशी असलेल्या सफाई कामगारांचे जग पृष्ठस्तरावर आणते. रमाकांत साठे या शिकलेल्या तरुणाला या घाणीत काम करायचे नसते. बापाच्या अॅक्सिडेंटमुळे नाईलाजास्तव सफाई कामगाराची नोकरी स्वीकारतो. प्रेयसी मेघनास परिस्थिती समजल्यावर त्यास नाकारते. रमाकांत या घटनेने स्वतःभोवतीच्या खोल विवरात रूतत जातो. कुठल्या दुःखाच्या फेऱ्यात लपेटलो जातोय, हे कळत नाही. नियतीनेच नियत केल्यासारखेच त्याचे आयुष्य घाणीच्या साम्राज्यात लोटले जाते. तो या व्यवस्थेविषयी अतिशय तिखटपणे भाष्य करतो. मेघनालाही ‘यास जबाबदार कोण?’ या आशयाचा संदेश पाठवतो. एकूणच काळ कितीही पुढे सरकला तरी परंपरागत ढाचे निखळून पडत नाहीत. जन्मतःच शिक्का कपाळी बसतो. महानगरातील हे मॅनहोलमधले जग हेलावून टाकणारे आहे. त्यातील दृश्यसंवेदना जीवघेणी आहे. अभावानेच कोणीतरी या चक्रातून बाहेर पडतो.

जयंत पवार यांनी गेल्या चारेक दशकांमध्ये महानगरातील स्थित्यंतरे विविध दृष्टीबिंदूंतून न्याहाळली आहेत. जागतिकीकरणाने प्रभावित झालेल्या काळबदलाचा सामान्य माणसाच्या जगण्यावर काय परिणाम झाला, त्याचा हा शोध आहे. काळाचा पैस विस्तारूनही त्यांनी या गोष्टी पाहिल्या आहेत. महानगरातील विविध स्तरातील जग अगदी बारकाव्यानिशी त्यांच्या कथेत येते. गिरणी कामगार, झोपडपट्टी, स्वच्छता कर्मचारी, फूटपाथ, रेल्वे स्टेशन, रेड लाईट एरिया, कामगार चाळ, साहित्यव्यवहार असे विलक्षण स्वरूपाचे जग त्यांच्या कथेत आहे. या जगातील अंतःस्तरावरील घडामोडींचे बारकावे या कथेत आहेत. नैतिक-अनैतिक, झोपडपट्टी-अपार्टमेंट, भांडवलदार-कामगार, स्त्री-पुरुष असे दोन ध्रुवांवरचे विश्व, त्यातील अंतर्विरोध, ताण मांडणारी ही कथा आहे.

२.

जयंत पवार यांचा स्त्रीविषयक दृष्टीकोन अधिक उन्नत आहे. त्यास कारुण्याची, कृतज्ञतेची झालर आहे. त्यांच्या कथासंग्रहाच्या अर्पणपत्रिकेतूनही याची प्रचिती येते. ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ हा कथासंग्रह ‘कधीही न पाहिलेल्या आईस’ अर्पण केला आहे. त्यामध्ये आईला उद्देशून ते म्हणतात, “तू असतीस तर आशयासाठी इतकी वणवण झाली नसती.” आईशिवायचे आयुष्य जगताना होणारी तगमग, येणारे कोरडेपण, रखरखीतपणाचा प्रत्यय यातून येतो. सतीश काळसेकर यांच्या कवितेच्या ओळी उद्धृत करत आईला, तुझ्या गर्भाशयाचे कर्ज आयुष्यभर डोक्यावर वागवून जगावं लागत असल्याचे सांगतात. ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा’ची अर्पणपत्रिका पत्नी संध्याला उद्देशून लिहिली आहे. त्यामध्ये ते म्हणतात, ‘जगावसं वाटण्याजोगी अनेकांपाशी अनेक कारणं असतात. माझ्यापाशी ती नेहमीच मोजकी होती. त्यातल्या प्रमुख कारणांपैकी एक तू असत आली आहेस...’. पत्नीविषयीचा लोभस भावबंध, जगणं अर्थपूर्ण करण्यातील तिचा सहभाग, साथसोबत त्यांना महत्त्वाची वाटते. ‘लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ या संग्रहाच्या अर्पणपत्रिकेमध्ये आपली मुलगी सईला सांगतात, ‘माझ्यातून उगवलेले हे शब्द तुझी सख्खी भावंडं आहेत. त्यांना जप, त्यांच्यावर माया कर.’ मृत्यूची जाणीव गडद होत असताना मुलीला अक्षरपरंपरेशी भावंडंभावनेनं जोडून घ्यायला सांगतात. खरं तर उगवणं हे अधिक नैसर्गिक, मनाला उभारी देणारं असतं. शब्दांना जपण्याच्या आवाहनातून हे शब्द तुझ्यात, झिरपून देत... तेच तुला खऱ्या अर्थाने साथसोबत करतील. आपली उणीव भासू देणार नाहीत, असंच काहीसं त्यांना सांगायचं असावं. आई, पत्नी आणि मुलीविषयीचा त्यांच्या मनातील हा भाव फार प्रांजळ आहे. त्याच्या असण्या-नसण्याच्या जाणिवेचे ठसे त्यांच्या मनःपटलावर कायम होते.

त्यांच्या कथांमधून स्त्रीत्वाची विविध रूपे प्रकटली आहेत. त्यामध्ये कारुण्य आहे. भारतीय समाजमानसिकतेचा स्त्रीकडे पाहण्याच्या सनातून दृष्टीचाही प्रत्यय त्यांच्या कथांमधून येतो. महानगरातील स्त्रीचं जगणं कोणत्या अस्तित्वसंघर्षातून जात आहे, याच्या अनेक मिती त्यांच्या कथेत आहेत.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

३.

साहित्यव्यवहारासंबंधी काहीएक विचार जयंत पवार यांच्या कथांमधून प्रकटला आहे. त्यादृष्टीने त्यांचे कथालेखन समीक्षेचेही कार्य करते. मराठीमध्ये कथासमीक्षा काही अपवादात्मक प्रयत्न वगळता पुरेशा गांभीर्याने झालेली दिसत नाही. कथेकडे पाहण्याच्या आक्रस दृष्टीमुळेही कथासमीक्षेकडे दुर्लक्ष झाले. या पार्श्वभूमीवर जयंत पवारांनी कथेविषयी घेतलेली वैचारिक भूमिका आणि प्रत्यक्ष कथालेखन यातून या वाङ्मयप्रकाराच्या विस्तारवाढीच्या अनेक शक्यता दिग्दर्शित केल्या आहेत. परंपरेने चालत आलेले संचित, कल्पितता, अदभुततेचा सर्जक उपयोग करून वास्तव रेखाटायला हवे, अशी अपेक्षा ते करतात. तसेच वास्तवाचे एकरेषीय आरेखन नाकारतात, ते म्हणतात, “आपण जे डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, नाकाने हुंगतो, जिव्हेने आस्वादतो, त्वचेने स्पर्शतो तेच वास्तव असतं असं मानायला मी तयार नाही. मला असं वाटतं की, मला जे जाणवतं तेही वास्तव आहे आणि जाणवल्यासारखं वाटतं तेही वास्तव आहे.” वास्तवाकडे वेगवेगळ्या कोनातून पाहत त्याचे बहुमुखीपण अधोरेखित करणे, त्यामागील कार्यरत व्यवस्था, जातीय-वर्गीय जाणिवांचा शोध घेणे गरजेचे असते. त्यासाठी कथाकाराला कथेच्या रूपबंधांच्या बाबतीत दक्ष आणि लवचीक राहावे लागते. त्यांची ही भूमिका त्यांच्या कथालेखनातूनही प्रतिबिंबित झाली आहे. अरुण खोपकर यांनी ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य’ या कथेविषयी केलेले विधान या अनुषंगाने महत्त्वाचे वाटते- ‘एका साहित्यप्रकाराचा वापर त्याच प्रकारच्या बेरकी समीक्षेकरता केल्याने समांतर आरशांकडे आणि त्यातल्या प्रतिबिंबाच्या न संपणाऱ्या मालिकांकडे पाहिल्याचा आनंद मिळाल्याने फारच मौज उडाली.’

रहस्यकथा कशी लिहावी, याचा नमुनादर्श म्हणजे ही कथा आहे. कथा कशी आकारावी, याविषयीचा नवा व्यूहच त्यांनी मराठी कथेला दिला. खुंटित, खुरट्या झालेल्या या वाङ्मयप्रकाराला नवसंजीवनी देण्याचे काम त्यांनी केले. तिची वाढ होत राहील अशी पोषक भूमी तयार केली. पुढच्या लेखकांसाठी नवी मळवाट निर्माण केली. त्यामुळे एक दिशादर्शक कथाकार म्हणूनही त्यांच्या या कामगिरीकडे पाहावे लागते.

जयंत पवार यांच्या कथांमधून त्यांचा साहित्यविषयक विचार प्रतिबिंबित झाला आहे. ‘सर निघाले स्वप्तपाताळाकडे’ या कथेतील नायक पात्र असणारे ‘सर’ हे मोठे साहित्यिक आहेत. साहित्यजगतातील त्यांचा दबदबा, सर्वदूर पसरलेला शिष्यवर्ग, साहित्यसंमेलनाविषयी नाराजी, पुस्तक प्रकाशन आणि पुरस्काराविषयी अनास्था या वैशिष्ट्यांमधून त्यांची ओळख होते. देशी गोष्टीविषयी त्यांना आत्मीयता आहे. आधुनिक संवादमाध्यमाच्या उत्क्रांतीच्या काळातही त्यांना पत्रव्यवहार महत्त्वाचा वाटतो. पोस्ट ऑफिसमध्ये स्वतःच्या पत्रांचा शोध घेताना पत्रसृष्टीच्या तळाशी दडून राहिलेलं अनोखं विश्व त्यांच्यासमोर येते. त्या सृष्टीत ते गढून जातात, गायब होतात. त्याच वेळी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर होतो. गोष्टीच्या अशा सांधेजोडणीमुळे साहित्यव्यवहाराशी निगडीत अनेक गोष्टी पृष्ठस्तरावर आणणे त्यांना शक्य झाले आहे.

४.

जयंत पवार यांनी रहस्यकथेच्या रूपबंधाचा फार प्रभावी वापर केला आहे. ते वास्तवाचे अनेक कंगोरे दिग्दर्शित करण्यासाठी रहस्यकथेचा फार चांगला उपयोग करतात. रहस्याच्या व्यापक पटावरून मानवी जगण्यातील विसंगती अधोरेखित करतात. रहस्यकथेविषयी साहित्यव्यवहारामध्ये नकारात्मकता निर्माण होण्यामागे अशा साहित्यात गांभीर्याचा अभाव आणि लोकप्रियतेचा सोस असतो, असा समज कारणीभूत आहे. रंजनपरता हेच अशा स्वरूपाच्या साहित्याचे मुख्यसूत्र मानले जाते. जयंत पवार यांनी या धारणा चुकीच्या ठरवल्या. रहस्यकथा कशी लिहावी, याचे नवे प्रारूपच समोर ठेवले. खरं तर रहस्यकथा ही भारतीय समाजाला मिळालेली एक देणगी आहे. जयंत पवार तोच धागा सांधत गोष्टी रचतात. या अनुषंगाने त्यांच्या ‘छटाकभर रात्र तुकडा तुकडा चंद्र’ आणि ‘तर्काच्या खुंटीवरून निसटलेले रहस्य’ या कथा महत्त्वाच्या आहेत. तसेच अन्य काही कथांमध्येही रहस्याचा अभिनव असा वापर त्यांनी केला आहे. रहस्यकथांमध्ये फॅन्टसीचा उपयोग करत असताना त्यांनी वास्तवाची बाजूही तितक्याच समर्थपणे सांभाळली आहे. मुख्यतः वास्तवाचे थेट आरेखन करण्यापेक्षा ते अदभुतामध्ये मिसळून सांगितले, तर त्यातून वास्तवाचे अनेक कोन मुखर होतात, याचा प्रत्यय या कथा वाचताना येतो.

याबरोबरच ‘लेखकाचा मृत्यू आणि इतर गोष्टी’ या संग्रहातील काही गोष्टी, तसेच ‘सर निघाले सप्तपाताळाकडे’, ‘बाबू भंगारवाल्याच्या आयुष्यातील दुपार’, ‘प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर’ अशा काही कथामध्येही रहस्यकथेची तंत्रे उपयोजली आहेत.

५.

जयंत पवार यांच्या कथेतील मिथकसृष्टी अभिनव स्वरूपाची आहे. पारंपरिक मिथकांना त्यांनी नवा अन्वयार्थ दिला आहे. सनातनी परंपरेने रुजवलेली ही मिथके शोषणाची द्वारे होती. ही परंपरा, धर्मसंचित आणि व्यवस्था सर्वांनी मान्य केली पाहिजे, असा सूर त्यामागे होता. त्या दृष्टीनेच मिथके उभारण्यात आली. यामुळे शोषणाची शृंखला अविरत स्वरूपात कार्यरत राहिली. भारतीय समाजमनात रुजवण्यात आलेल्या या मिथकांची पुनर्मांडणी करण्याचे काम जयंत पवार करतात. सत्यशोधनाची नवी भूमी उपलब्ध करून देतात. जातीय परिप्रेक्ष्यातून मिथकांची नव्याने तपासणी करतात. त्यांचा वर्तमानाशी असलेला अनुबंध तपासतात. देवांच्या अवतारकार्याची आणि सृष्टीच्या उत्क्रांतीची मीमांसा करतात. त्यातील सूक्ष्म पदर उलगडत पौराणिक ढाचा ढिला करतात. नवी तथ्ये समोर आणतात. सत्ताकेंद्रे खालच्या वर्गाकडे झुकू लागताच तथाकथित उच्चवर्णियांच्या होणाऱ्या प्रक्षोभांचाही ते शोध घेतात. या वर्गाने धर्मसत्तेच्या जोरावर राजसत्तेवर अंकूश ठेवत, हवा तसा इतिहास रचला. पुढे संस्कृतीरक्षकांनी हा डोलारा टिकवण्याचे काम अतिशय निष्ठेने केले. हा इतिहास वाहता कसा राहील, याची काळजी घेतली. त्यावर नैतिकतेचे, पाप-पुण्याचे पुट्टे चढवले. यामुळे शोषितांना आपल्या अस्मिता दडपून हे सर्व मान्य करावे लागले. जयंत पवार प्रबोधन चळवळीने दिलेल्या आत्मभानाच्या प्रकाशात दडपलेला इतिहास शोधण्याचा प्रयत्न करतात. यातून आपल्याला आपला इतिहास दिसेल. शोषणाच्या वाटा कशा विस्तारत गेल्या, याचा प्रत्यय येईल. मिथकांच्या पुनर्मांडणीमागचा जयंत पवार यांचा हाच हेतू आहे. मराठीमध्ये असे प्रयत्न अभावानेच झालेले दिसतात.

६.

प्रस्तुत संपादनामध्ये एकूण तेरा लेख आणि नागनाथ बळते यांनी ‘खेळ’ या नियतकालिकासाठी जयंत पवार यांच्या घेतलेल्या मुलाखतीचा समावेश केला आहे. चार विभाग आणि परिशिष्ट अशी लेखांची विभागणी केली आहे. कथासंग्रहांच्या प्रकाशन कालावधीनुसार विभागांचा हा क्रम केला आहे. यामध्ये अगोदर प्रसिद्ध झालेल्या लेखांबरोबर नव्यानेही काही लेखांचा समावेश केला आहे. या लेखामधून जयंत पवार यांच्या कथालेखनाची गुणवैशिष्ट्ये उजागर होण्यास मदत होणार आहे.

.................................................................................................................................................................

ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांचं ‘‘मोदी महाभारत - वेध मोदी पर्वातल्या राजकीय घडामोडींचा”

हे नवंकोरं पुस्तक ७ सप्टेंबर २०२२ रोजी प्रकाशित होत आहे...

पूर्वनोंदणी करण्यासासाठी पहा -

https://dpbooks.in/collections/new-releases/products/modi-mahabharat

.................................................................................................................................................................

जयंत पवार यांची नागनाथ बळते यांनी ‘खेळ’ नियतकालिकात घेतलेली मुलाखत परिशिष्टामध्ये समाविष्ट केली आहे. या मुलाखतीतून त्यांनी आपली साहित्याविषयीची, त्यातही कथेविषयीची भूमिका विस्ताराने कथन केली आहे. कथेचा भारतीय कथनपरंपरेशी असलेला अनुबंध अधोरेखित केला आहे. जागतिक कथासाहित्याच्या परिप्रेक्ष्यातूनही ते कथेकडे पाहतात. मात्र आपल्या कथेतील अद्भुतता ही वाचलेल्या, ऐकलेल्या गोष्टींमधून अधिक झिरपल्याचे सांगतात. भाऊ पाध्ये, विजय तेंडुलकर, भालचंद्र नेमाडे, विलास सारंग, नामदेव ढसाळ या लेखकांच्या प्रभावासंबंधीचे केलेले विवेचन महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या संवेदनदृष्टीच्या लेखकांच्या प्रभावामुळे आपली आस्वादक दृष्टी विस्तारल्याचे सांगतात. महानगरीय संवेदनशीलता म्हणजे काय, याविषयीची वेगळी अशी निरीक्षणे त्यांनी नोंदवली आहेत. आपल्या कथानिवेदनामागची प्रयोगशीलता आणि अपरिहार्यता त्यांनी सांगितली आहे. तसेच काळाचे वाचन कशा रीतीने करायला हवे, याविषयीही सांगतात. जयंत पवारांची कथा समजून घेण्यासाठी ही मुलाखत फार उपयोगी ठरते.

एकंदरीत जयंत पवार यांनी मराठी कथेला दिलेले योगदान अनन्यसाधारण आहे. मराठी कथेचा आशयाविष्कारात्मक विस्तार करण्यात त्यांचा वाटा महत्त्वाचा आहे. मराठी कथेच्या धमण्या रुंदावण्याचे काम त्यांनी केले. दुय्यम, गौण म्हणून हिणवल्या गेलेल्या या वाङ्मयप्रकारास प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा मोठा हातभार आहे. कथेची बलस्थाने त्यांनी समोर आणली. शोषित, वंचितांच्या जीवनानुभवाला आवाज दिला. गेल्या चारेक दशकामध्ये नवभांडवली व्यवस्थेच्या आक्रमणाचा जनसामान्यांच्या जगण्यावर काय परिणाम झाला, याचा तळा-मुळातून शोध घेण्याचे काम केले. प्राचीन मिथकीय सृष्टीचा नवा अन्वयार्थ लावत पुढील लेखकांना नवा परिप्रेक्ष्य उपलब्ध करून दिला. इतिहासाभ्यासाची नवी बहुजनवादी दृष्टी दिली. वास्तव आणि फॅन्टसीच्या माध्यमातून नवे कथारचित साकारले. रहस्यकथेच्या रूपबंधाच्या सामर्थ्यशक्यता धुंडाळल्या. त्यांनी कथा या वाङ्मयप्रकाराला दिलेल्या असाधारण योगदानाचा परामर्श घेण्याचा प्रयत्न प्रस्तुत संपादनात केला आहे.

‘हा ऋतू वेगळा आहे’ : संपादक - संदीप दळवी

ललित पब्लिकेशन, मुंबई

पाने : २४०

मूल्य : ३५० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......