सह्याद्री हा एक अनादी, अनंत आणि अवीट असा मोह आहे! एकदा का त्याची गोडी लागली की, ती कायम घोळतच राहते…
ग्रंथनामा - झलक
हृषीकेश यादव
  • ‘वॉकिंग ऑन द एज्’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Tue , 22 August 2023
  • ग्रंथनामा झलक वॉकिंग ऑन द एज् WALKING ON THE EDGE प्रसाद निक्ते Prasad Nikte सह्याद्री Sahyadri

प्रसाद निक्ते या अवलियानं सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून सलग ७५ दिवसांची भटकंती करून त्यावर ‘वॉकिंग ऑन द एज्’ हे पुस्तक लिहिलं आहे. यात सातपुडा ते चोर्ला व्हाया सह्याद्री या प्रवासाचं एक तंगडतोड पण रसाळ अनुभवकथन वाचायला मिळतं. समकालीन प्रकाशनातर्फे नुकत्याच प्रकाशित झालेल्या या पुस्तकाला एव्हरेस्टवरील पहिल्या यशस्वी भारतीय नागरी मोहिमेचे (१९९८) नेते आणि अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाचे कार्याध्यक्ष हृषीकेश यादव यांनी लिहिलेली ही प्रस्तावना…

.................................................................................................................................................................

सह्याद्री!  महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवणारं अनन्यसाधारण असं भौगोलिक वैशिष्ट्य. पुरातन काळापासून सह्याद्री डोंगररांगेने महाराष्ट्रातील जनजीवन साकारण्यात आणि इथली संस्कृती समृद्ध करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. भारतात हिमालय पर्वतरांगेला जे महत्त्व आहे, तेच महत्त्व, तोच आदर मराठी माणसांच्या मनात सह्याद्री पर्वतरांगेबाबत आहे. 

सुमारे ४५० कोटी वर्षांपूर्वी सूर्यमालेत पृथ्वीचा जन्म झाला. नंतर सुमारे ३०० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचं तापमान पुरेसं कमी झाल्यावर बाह्यकवच तयार होऊन प्लेट टेक्टॉनिक्स किंवा भूपट्ट हालचालींचा प्रारंभ झाला. पायाचं नख ज्या गतीनं वाढतं, अंदाजे त्या गतीनं या ‘प्लेट’ हलू लागल्या आणि आजही हलत असतात. काही कोट्यवधी वर्षांची पार्श्वभूमी पाहता याचा प्रचंड परिणाम होताना दिसतो. या टेक्टॉनिक प्लेट्सवर असलेले खंड कालौघात कधी एकमेकांना भिडतात आणि त्यांचे महाखंड (सुपरकॉन्टिनन्ट) तयार होतात, तर कधी त्यांचं विभाजन होऊन नवे खंड तयार होतात. 

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

सुमारे एक कोटी वर्षांपूर्वी भारतीय खंड त्याच्या उत्तरेला असणाऱ्या आशियायी खंडाला भिडण्यास सुरुवात झाली आणि त्यांच्या मध्ये असणारा समुद्र- ‘टॅथीस’- लुप्त होऊन आता दिसणारे अरबी समुद्र व बंगालचा उपसागर हे तयार झाले. या महाकाय भूभागांतील प्रचंड रेट्यामुळे मधली जमीन उचलली गेली. हाच हिमालय! उंची एवढी की, जगातील सर्वांत उंच शिखरं इथेच आहेत. आजसुद्धा ही प्रक्रिया सुरू आहे. हिमालयाची उंची आजही वाढत आहे. ती भूस्खलन, धूप वगैरेंनी कमी होत असते, हा भाग निराळा.

हिमालय ही जगातील एक तरुण पर्वतरांग आहे. सह्याद्री त्यापेक्षा कितीतरी जुना. सुमारे ६.६ कोटी वर्षांपूर्वी, जेव्हा भारतीय भूभाग आशियापासून आणखी बराच लांब होता, तेव्हा सह्याद्री व दख्खनच्या पठाराची निर्मिती सुरू झाली.

हिमालयाशी तुलना करता सह्याद्रीच्या निर्मितीची सुरुवात फार जलदगतीनं आणि नाट्यमयरीत्या झाली! सध्या जेथे सह्याद्री आहे, तेथील जमिनीच्या पोटातून प्रचंड प्रमाणात लाव्हा बाहेर पडू लागला. तो दूरवर वाहत जाऊन दख्खनचे पठार तयार झाले. ज्वालामुखीजन्य खडकांचे थरावर थर जमा झाले. एवढ्या उत्पाती कालखंडानंतर तुलनेनं, मंदगती पण महत्त्वाच्या भौगोलिक घडामोडी सुरू झाल्या. उदा. जमिनीची खच, धूप, कडे ढासळणं, दख्खनच्या पठाराचं पूर्वेकडे कलणं इत्यादी.

आज दिसणारं सह्याद्रीचं रूप हे या सर्व घडामोडींचा परिणाम आहे. आजही सह्याद्रीच्या रांगा न्याहाळताना आपल्याला दख्खनच्या पठाराचे ज्वालामुखीजन्य थर सलग आडव्या पट्ट्यांच्या स्वरूपात दिसतात. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

सह्याद्री पर्वतरांग (पश्चिम घाट म्हणूनही ओळखली जाते) ही सुमारे १६०० कि.मी. लांब आहे. धुळ्याजवळील तापी नदीच्या खोऱ्यापासून सुरू होऊन कन्याकुमारीपर्यंत उत्तर-दक्षिण पसरलेली. तसेच ती पश्चिमेकडील अरबी समुद्राच्या किनारपट्टीला समांतर अशी गेलेली आहे. महाराष्ट्रामध्ये किनारपट्टी आणि सह्यपर्वत या दोहोंमध्ये जो तुलनेनं अरुंद भूभाग तयार झाला तो म्हणजे कोकण, तर सह्याद्रीच्या माथ्यावर घाटमाथा आणि पूर्वेला सपाट पठारी प्रदेश तयार झाला. सह्याद्रीच्या उत्तर-दक्षिण मुख्य रांगेच्या अनेक लहान- मोठ्या उपरांगा पश्चिमेकडून पूर्वेकडेदेखील पसरत गेलेल्या आहेत.

सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पर्यावरणाची एक उत्तम व वैविध्यपूर्ण अशी साखळी तयार झाली आहे. असंख्य प्रकारच्या वनस्पती, विविध रूपांतील पशुपक्षी यांनी सह्याद्री समृद्ध आहे. इथली संस्कृती, जनजीवन, समाज घडवण्यात, या पर्वतरांगेनं मोलाचं योगदान दिलं आहे. इथल्या मानवाच्या प्रगतीनुसार सह्याद्रीच्या

अंगा-खांद्यावर विविध बदल होत गेले. या पर्वतरांगेत अनेक पायवाटा तयार झाल्या, घाटमार्ग झाले, लेणी खोदली गेली, किल्ले बांधले गेले, गावं वसली. अशा अनेक मानवनिर्मित कलाकृतींनी सह्याद्रीचं रूप काहीसं बदलत गेलं. 

सह्याद्रीचं आणखी एक वैशिष्ट्यं, म्हणजे याला लाभलेली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी इतिहासाची पार्श्वभूमी. शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या डोंगररांगा, घाटवाटा, किल्ले, जंगल यांचा खुबीनं वापर करून बलशाली परकीय आक्रमकांना नामोहरम केलं आणि स्वराज्याची निर्मिती केली. त्यामुळे देदीप्यमान इतिहास व भूगोल अशी दुहेरी विशेषणं लाभलेली सह्याद्री ही जगातील महत्त्वाची डोंगररांग आहे.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

अशा या सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावरून एखाद्यानं एकदा का भटकंती केली की, तो फार काळ सह्याद्रीपासून दूर राहू शकत नाही. सह्याद्रीचं आकर्षण हे एखाद्या व्यसनासारखं आहे. एकदा का त्याची गोडी लागली की, ती मनातल्या मनात कायम घोळतच राहते.

सह्याद्री हा एक अनादी, अनंत आणि अवीट असा मोह आहे!

सह्याद्रीच्या मोहात पडलेला असाच एक डोंगर भटका, किल्लेप्रेमी प्रसाद निक्ते. सुमारे २०-२५ वर्षांच्या सह्याद्रीतील भटकंतीच्या अनुभवाची शिदोरी गाठीला जमा झाल्यावर त्याला वाटायला लागलं, की सह्याद्रीचं सर्वांगीण दर्शन एकाच सलग पायी भटकंतीत घ्यायचं. सुमारे ६५० कि.मी. लांबीच्या (सरळ रेषेत मोजलं तर) महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या मुख्य धारेच्या अंगाखांद्यावरून चालत त्याची अनुभूती घ्यायची.

ट्रान्स सह्याद्रीचे काही प्रयत्न यापूर्वी झाले होते, तर सह्याद्री बचाव (पश्चिम घाट बचाव) आंदोलनात काही गटांनी स्वतंत्रपणे सह्याद्रीच्या दऱ्या-डोंगरांत टप्प्याटप्प्यांत भटकंती केली होती. पण सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून उत्तरेपासून गोव्याच्या हद्दीपर्यंत सलग भटकायचं, कधी एकटा तर कधी जोडीदारासह, वाटाड्या मिळाला तर ठीक, नाही तर ‘एकला चलो रे’ भटकंती सुरू ठेवायची, असं उदाहरण आपल्याकडे नाही.

सह्याद्रीच्या कितीही प्रेमात असलात तरी १०-१२ दिवसांनी शरीर व मन बोलायला लागतं. डोंगर, परिसर बदलत असले, तरी रोजच्या पायपीटीनं कधी ना कधी एकटेपणाची जाणीव व्हायला लागते. सोबत मिळेलच याची खात्री नाही, तरी चालतच राहायचं. घाटमाथ्यावर म्हणजे अगदीच सपाटी नाही. कुठे एखादा डोंगर चढायचा, तर मध्येच एखादी छोटी दरी आली, तर उतरून परत वाटेवर यायचं. एकूण, दमछाक सुरूच. प्रदेश, भाषा, खाणंपिणं बदलत राहतं. मग मध्येच परत फिरण्याचा मोह अनावर होऊ लागतो. त्यामुळेच प्रसादचा हा सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून चालण्याचा विचार खूपच धाडसी होता. 

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

प्रसादने आपल्या काही मित्रांच्या सहकार्यानं या भ्रमंतीची पूर्वतयारी केली. सुरुवात जाणीवपूर्वकच सह्याद्रीच्या थोडं उत्तरेला जाऊन सातपुड्याच्या रांगेत नर्मदेच्या किनाऱ्यावरून मार्च २०१७च्या अखेरीस केली. सुरुवातीचे चार-आठ दिवस सातपुड्यात काढून मग तो सह्यपर्वतावर आला.

पाठीवर सॅक. त्यात अगदी आवश्यक तेवढेच कपडे, जुजबी औषधं, थोडासाच सुका खाऊ, पाण्याची बाटली, कॅमेरा इत्यादी कमीत कमी सामान आणि हातात दणकट मोठी काठी म्हणजे सोटा. रोजचा दिनक्रम ठरलेला. सकाळी मुक्कामाच्या गावात भरपेट नाष्टा करून भ्रमंती सुरू करायची. दुपारी वाटेतील गावात एखाद्या घरात पोटपूजा करायची. थोडी विश्रांती घ्यायची आणि पुन्हा वाटचाल पुढे सुरू ठेवायची. अंधार पडायच्या आत पोहोचण्याच्या अंतरावर असलेल्या गावाची आधी माहिती घेऊन वाटचाल सुरू ठेवायची. सूर्य अस्ताला जाण्यापूर्वी मुक्कामाच्या गावात एखाद्या गावकऱ्याच्या घरात आसरा घ्यायचा. वाटेत गरजेनुसार वाटाड्या घ्यायचा. कधी डोंगरभटके मित्र पण असायचे, पण सुरुवातीपासून अखेरच्या ठिकाणापर्यंत पोहोचणारा प्रसाद तेवढा एकटाच.

मोठंच धाडसाचं होतं हे सारं. सह्याद्रीच्या एखाद्या किल्ल्यावर कधी तरी एकट्याने जाणं, हे काही फार विशेष नाही, कारण वाट वहिवाटीची असते, किल्ल्याची माहिती असते, किल्ल्याबाबत एक आपलेपणाची भावना असते. पण प्रसादची ही घाटमाथ्यावरून होणारी संपूर्ण वाट तशी डोंगर भटक्यांसाठी पूर्णपणे परिचित अशी नव्हती. अनेक ठिकाणी फक्त गावकऱ्यांचा वावर होता. त्यात गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी रस्ते विकसित झाल्यामुळे, त्यातील अनेक पायवाटांवरचा हा वावरदेखील कमी झालेला. त्यात वन्य प्राणी, हानिकारक जीव यांचीदेखील भीती होतीच. अशा सर्व विपरीत परिस्थितीवर मात करत,

स्वतःचा आत्मविश्वास कायम ठेवत तब्बल ७५ दिवस सलग वाटचाल करणं, म्हणजे मोठं दिव्यच होतं. हे अत्यंत धाडसाचं व कोणत्याही हिमालयीन मोहिमेइतकंच धाडसी होतं.

..................................................................................................................................................................

या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा - 

https://www.aksharnama.com/client/article_detail/6766

..................................................................................................................................................................

प्रसादच्या या मोहिमेत काही दिवस सहभागी होण्याचा योग मला आला. मी आणि स्वप्नालीने भोर ते महाबळेश्वर या टप्प्यात प्रसादबरोबर भ्रमंती केली. त्या टप्प्यात त्याच्या नियोजनाचा, वागणुकीचा, निर्णयप्रक्रियेचा अनुभव घेता आला. सायंकाळी गावात गेल्यावर मुक्कामाचं घर निवडणं, त्या घरातील परिवाराला मोहिमेची माहिती देणं, त्यांची माहिती घेणं, गावाची व परिसराची माहिती घेणं, पुढील मार्गाची त्यांच्याकडून खातरजमा करून घेणं, अशा सर्व संवादातून त्या ग्रामस्थांशी आपुलकीचं नातं तयार करून घेणं, हे प्रसाद लीलया करायचा.

त्याचा पोशाख, रापलेलं शरीर आणि भारदस्तपणे सावकाश बोलण्याची त्याची पद्धत, यामुळे तो त्या ग्रामस्थांपैकीच एक होऊन जायचा. सकाळी निघताना त्या परिवारानं केलेल्या निवास व भोजन सोयीबद्दल योग्य मोबदलादेखील इतक्या खुबीनं द्यायचा की, त्यांनादेखील ते घेताना अवघडल्यासारखं व्हायचं नाही. दिवसभराच्या वाटचालीतदेखील योग्य वाट शोधणं, दुपारच्या भोजनाची एखाद्या गावकऱ्याकडे विनंती करून सोय करून घेणं, वेळेचं नियोजन करणं आणि हे करत असताना वाटेत फोटोग्राफी करणं आणि भेटणाऱ्या गावकऱ्यांशी संवाद साधणं, हे सर्व तो इतक्या सराईतपणे करत होता… जणू रोजच या वाटेवरून पायपीट करत होता.

आम्ही प्रसादाला जेव्हा पहिल्यांदा भेटलो, तेव्हा त्याची जवळजवळ निम्मी वाटचाल झाली होती, पण त्या वेळीदेखील त्याचा उत्साह व शारीरिक क्षमता उत्तम होती. चालताना त्याचा वेग आमच्यापेक्षा जास्त होता. तो इतक्या लांबचा टप्पा चालत पार करत आला आहे, असं कधीही जाणवलंच नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

ट्रान्स सह्याद्रीचे दिव्य पार करून प्रसादने ७५व्या दिवशी महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक राज्यांच्या सीमेवरील चोर्ला घाटात आपली मोहीम पूर्ण केली. त्याच्या आदल्या दिवशी घाटाच्या जवळील एका गावात त्याचा मुक्काम होता. त्या गावात सकाळी आम्ही त्याला भेटलो, तेव्हा त्याचा चेहरा प्रसन्न होता. शरीरावर इतक्या दिवसांच्या सह्याद्रीतील भटकंतीमुळे त्वचा रापल्याची चिन्हं दिसत होती, पण त्याव्यतिरिक्त शरीर व मनाने प्रसाद एकदम तंदुरुस्त होता.

हेच प्रसादच्या मोहिमेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य होतं. कारण अशी मोहीम ही शरीरापेक्षा मानसिक खच्चीकरण करणारी असते. मानसिक संतुलन बिघडवणारे अनेक क्षण अशा मोहिमेत अनेकदा येतातच. त्यावर एकट्यानेच मात करायची असते. ते फार अवघड व परीक्षा पाहणारे क्षण असतात. प्रसादचं मानसिक बळ, हे या त्याच्या मोहिमेच्या यशाचं मोठं कारण आहे.

प्रसादने ही मोहीम फक्त पूर्ण केली नाही, तर सह्याद्रीच्या अंगा-खांद्यावरील भ्रमंतीचा, तिथल्या पर्यावरणाचा, ग्रामीण जीवनाचा, ग्रामस्थांचा, त्यांच्या संस्कृतीचा पुरेपूर अनुभव घेत, त्यातून आनंद घेत पूर्ण केली होती. त्यामुळे प्रसादने ही मोहीम सफल संपूर्ण केली, त्या दिवशी त्याने पूर्ण केलेल्या सुमारे ६५० कि.मी. लांबीच्या ट्रान्स सह्याद्री मोहिमेच्या खडतर, धाडसी मोहिमेच्या त्याच्या शरीर व मनावर झालेल्या परिणामांच्या खुणा दिसल्या नाहीत. त्याऐवजी त्याच्या चेहऱ्यावर व देहबोलीत मोहीम पूर्णतेचा, अनुभवसंपन्न होण्याचा, सह्याद्रीच्या अवीट गोडीच्या अनुभूतीने परिपूर्ण झाल्यासारखा भाव वाटत होता.

त्याच्या जिद्दीला, चिकाटीला, धाडसाला सलाम! त्याची ही अनुभवगाथा त्याने शब्दबद्ध करून पुस्तकरूपात सर्व डोंगर भटक्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे सह्याद्रीच्या या अनोख्या वाटेवरचा दस्तावेज तयार झाला आहे.

‘वॉकिंग ऑन द एज्’ - प्रसाद निक्ते

समकालीन प्रकाशन, पुणे | मूल्य – ५०० रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......