‘लेकमात’ : ऊसतोडणी कामगारांचा अनेक पातळ्यांवरचा जीवनसंघर्ष, त्यांची जीवनाला सामोरे जाण्याची उत्कट धडपड आणि बालाघाटातील डोंगररांगांच्या लोकजीवनाचा गंध असलेली कादंबरी

‘लेकमात’ या शब्दाचा अर्थ लग्नाची मुलगी असा होतो. या कादंबरीतील सर्वच व्यक्तिरेखांचा आपापल्या पातळीवर संघर्ष सुरू असतो. कुटुंबांची, त्यातल्या व्यक्तिरेखांची काही स्वप्ने आहेत आणि ती डोळ्यात घेऊन ही माणसे परिस्थितीशी झगडत राहतात. काही स्वप्ने पूर्ण होतात, काहींचा पाठलाग सातत्याने करावा लागतो. डोळ्यातली स्वप्नं आणि पुढ्यातले रखरखीत वास्तव यांचा लपंडाव या कादंबरीत पाहायला मिळतो, तो अंतहीन आहे; त्याला शेवट नाही.......

संवेदनशीलतेचे अपार करुणेत रूपांतर करण्याचे सामर्थ्य फार कमी लेखकांमध्ये आढळते. अशा मोजक्या आणि श्रेष्ठ लेखकांत भास्कर चंदनशिव यांची गणना आपल्याला करावी लागते!

भास्कर चंदनशिव यांच्या कथालेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे, ज्या जीवनाविषयी ते लिहितात त्या जीवनाबद्दल त्यांना जिवंत आस्था आहे. म्हणूनच कथेच्या नावाखाली ते केवळ किस्से सांगत नाहीत, थेट अनुभवाच्या गाभ्याला भेटतात. एखादा पट्टीचा पोहणारा जसा तळापर्यंत बुडी घेऊन वस्तू वर घेऊन येतो, तसे ते तळपातळीच्या वास्तवाला नेमकेपणाने आपल्या मुठीत पकडतात. त्यांच्या कथांना गवसलेले आकार हे चिंतनातून आले आहेत.......