डॉ. बाबासाहेब आंबेडकर नसते, तर कालच्या शोषित आणि वंचित समाजाचे चित्र वेगळे असते. त्यांच्या उपकाराची जाणीव म्हणून घडलेली कलाकृती म्हणजे ‘महाबोधीवृक्ष युगानुयुगांचा’ हा कवितासंग्रह होय. याआधी महेंद्र ताजणे यांचे ‘अस्वस्थ वर्तमानाच्या कविता’ आणि ‘ग्लोबल महासत्तेचा इस्कोट’ हे दोन कवितासंग्रह प्रकाशित झालेले आहेत. हा तिसरा. हा संग्रह बाबासाहेबांना अभिवादन करतो, त्यांच्या विचारांचा जागर करतो. ‘आंबेडकरवादा’ची पेरणी करतो. बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारून बुद्धाला अभिवादन केले आहे, त्याचप्रमाणे कवीने बाबासाहेबांना कवितेतून अभिवादन करून बुद्धाच्या अष्टांगिक मार्गावर चालण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे हा संग्रह बुद्धाच्या ‘अष्टांग सौंदर्यमूल्यांना’ अर्पण केला आहे.
यामध्ये एकंदर २९ कविता आहेत. इथे बाबासाहेब महाबोधीवृक्ष आहेत. सुरुवातीलाच बाबासाहेबांनी साहित्यिकांना केलेला उपदेश वाचावयास मिळतो. ते म्हणतात, ‘जीवनमूल्य आणि सांस्कृतिक मूल्य आपल्या साहित्यातून मांडा. लोकांची दुःखं समजून घेऊन ती सोडवण्यासाठी साहित्याचा वापर करा.’
बाबासाहेबांच्या या उपदेशाला आदेश मानून कवी आपल्या कविता लिहीत आला आहे. पुढे आपल्या मनोगतातून कवी आपली भूमिका मांडतो. म्हणतो, ‘महाबोधीवृक्ष युगानुयुगांचा या संग्रहामुळे माझ्या कविता अधिक सजग होतील, असे वाटते.’ कवीचा हा प्रवास अपूर्णत्वाकडून थोड्याशा का होईना पूर्णत्वाकडे नेणारा आहे. पूर्णत्व कोणाच्याच वाट्याला न येवो, कारण त्यानंतर करण्यासारखे आयुष्यात काहीच नसते. यात कवी बाबासाहेबांच्या काव्यात्मक आयुष्याबद्दल सांगतो. बाबासाहेबांचा जीवनपट बघितला तर आपल्याला ते पटतेसुद्धा.
ताजणे यांच्या कविता समजून घ्यायच्या असतील, तर बाबासाहेबांचे जीवन आणि कार्य समजून घेणे आवश्यक ठरते. त्यानंतर आंबेडकरी चळवळ अभ्यासणे गरजेचे आहे, किमान चळवळीची पार्श्वभूमी माहिती असणे आवश्यक आहे. कवीने या संग्रहात वास्तविकता मांडण्याचा प्रयत्न केला आहे; जे वास्तव सध्या आंबेडकरी चळवळ हरवून बसली आहे.
या कवितेत गेयता नसली तरी प्रगल्भता आहे. (काही कवितांमध्ये गेयता आहे, पण कवीचा पिंड मुक्तछंदाचा आहे.) या सर्व कवितांना बाबासाहेबांची ऊर्जा मिळालेली आहे. या संग्रहामध्ये बुद्धांचे संदर्भ आहेत आणि समाजाविषयीची तळमळही आहे.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
‘बा’ या कवितेपासून संग्रह सुरू होतो. बा म्हणजे बाबासाहेब. ग्रामीण भागात वडिलांना ‘बा’ म्हणण्याचा प्रघात आहे. ही कविता चळवळीच्या अनुषंगाने आली आहे. चळवळीची सुरुवात, मध्य आणि शेवट या कवितेत रेखाटला आहे.
कवीला चळवळ सर्वांत मोठी संपत्ती वाटत आली आहे. चळवळीपुढे कवीने कसलीच परवा केली नाही. कवी सांगतो की, स्वतःची किळस जरी आली तरी, मागे हटलो नाही. जी वाट निवडली त्याच वाटेवर कवी आयुष्यभर चालत राहिला. या वाटेत चळवळीचे सोबती भेटले. त्यांनी कवीला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कवी दुःखीही झाला. या अडखळलेल्या वाटेवर बाबासाहेब मार्गदर्शकासारखे भेटले. त्यामुळे कवीला योग्य वाट सापडली.
बुद्धांनीसुद्धा मी ‘मार्गदाता आहे’ असेच सांगितले होते. त्यामुळे कवी बुद्ध आणि बाबासाहेब यांच्यातील साम्य शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतो. दोघांनीही प्रचंड प्रमाणात अनुयायी लाभले, तरीही त्यांनी स्वतःला देवत्व बहाल केले नाही. दोघेही मार्गदर्शकाच्या भूमिकेतच राहिले. हेच वेगळेपण कवीने या संग्रहातून मांडले आहे.
बाबासाहेबांच्या आयुष्याच्या उत्तरार्धातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे धम्मांतर. कवी ‘बावीस प्रतिज्ञा म्हणजे बुद्धाने बुद्धाला दिलेली केशरी सलामी’ या कवितेत बाबासाहेबांच्या धम्मांतराला विविध उपमा देतो, विविध प्रतीकांचा वापर करतो, त्याला ‘धम्मक्रांती’ म्हणतो. या कवितेची उकल होण्यासाठी आपल्याला त्या काळातील परिस्थितीचे जाणीव होणे गरजेचे आहे. तेव्हाच त्या कवितेचा आशयगर्भ कळू शकेल.
या कवितेत कवी सुरुवातीलाच म्हणतो की, बावीस प्रतिज्ञा म्हणजे मानवी मूल्यांचा चंद्रसोहळा. पुढे ‘केशरी बहर’, ‘नक्षत्रांची सौंदर्यगाणी श्रृंखला’, ‘सूर्योस्तवी ऐतिहासिक शुभारंभ’ ही प्रतीके या कवितेला अधिक बोलकं करतात. अंधारलेल्या जीवनाला बहर आणण्याचे काम धम्मांतराने केले आणि त्याला आवरण दिले ते बावीस प्रतिज्ञांनी. कवीला त्यात वैश्विक जाणीवा दिसतात.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
बाबासाहेबांच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट क्रांतिकारी ठरली. त्यांचे आयुष्य वाचताना याची अनुभूती आपल्याला वारंवार होते. कवी पुढे ‘बुद्धत्वाचे महालेणे : युगपुरुष, बाबासाहेब आंबेडकर’ या कवितेत बाबासाहेबांचे चरित्र उलगडून सांगतो. बाबासाहेबांच्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण गोष्टीचा परामर्श या कवितेत घेतला आहे. ‘चवदार तळे सत्याग्रह’ आणि ‘काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह’ या बाबासाहेबांच्या आयुष्यातील दोन महत्त्वाच्या आंदोलनाचा उल्लेख या कवितेत आहे. कवी म्हणतो-
‘आरंभलास सूर्य संग्राम चेतवूनी पाणी
खुले केलेस तळे चवदार तू’
चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला संग्रामाची उपमा देऊन पाण्याचा संघर्ष कसा जीवघेणा होता, हा संघर्ष मानवी मूल्यांसाठी कसा आवश्यक होता, हे कवी मांडतो. म्हणतो -
‘ग्रंथप्रामाण्याचे दुर्धर तट दिलेस झुगारून
बुद्धिप्रामाण्याच्या तळात शिरला आरपार तू’
बाबासाहेबांच्या आयुष्यातील सर्वच महत्त्वाच्या गोष्टी या कवितेत आल्या आहेत.
‘तुला अभिवादन करण्यासाठी’ या कवितेत कवी बाबासाहेबांना मानणाऱ्या समाजाचे जळीत सत्य मांडण्याचा प्रयत्न करतो. त्यांना डोक्यावर नाही, तर डोक्यात घ्या हा विचार या कवितेतून पुढे येतो. कवीला बाबासाहेबांचे विचार नीटसे कळलेले आहेत, पण जे लोक त्यांचा नुसता जयघोष करतात, पण विचार अंगीकारत नाहीत, अशा लोकांमुळे कवी दुःखी होतो. बाबासाहेबांची चळवळ ज्यांनी दिशाहीन केली, त्या व्यवस्थेला कवी ‘जहरी’ म्हणतो. याउलट आंबेडकरी विचारात मानवी मूल्यांचं सौंदर्य आहे, असे अप्रत्यक्षपणे सांगून जातो. दिशाहीन समाजबांधवांना उद्देशून कवी म्हणतो-
‘इथल्या जहरी चिवट व्यवस्थेने
बोन्साय केलेली नाजूक नि दिशाहीन
मोसमी झुडपंही असतात वर्षातून एकदा
तुझ्या जयंतीत निव्वळ नटून थटून
तोऱ्यात मदमस्त’
बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठीचा दिवस म्हणजे १४ एप्रिल, परंतु फक्त त्यांच्या जयंतीलाच येणाऱ्या लोकांना कवी ‘बोन्साय’ म्हणतो. ज्यांची वाढ खुंटवली जाते, असे दिशाहीन लोक फक्त गर्दीचा भाग होतात. याचा चळवळीवर विपरीत परिणाम होतो. अशा लोकांना त्या दिवसाव्यतिरिक्त बाबासाहेब आठवत नाहीत. कवी जेव्हा या लोकांसोबत चर्चा करतो, आपले विचार मांडतो आणि त्यांचे विचार ऐकतो, तेव्हा त्यातून काहीच निष्पन्न होत नाही.
बाबासाहेबांच्या आयुष्यात अनेक दुःखे आली, त्यांना खूप यातना सहन कराव्या लागल्या. त्या दुःखांच्या छाताडावर पाय देऊन बाबासाहेब पुढे गेले. दुःखाला घाबरून मागे हटतील, ते महामानव कसले? ‘भीमा तू जगलास’ या कवितेत कवीने बाबासाहेबांच्या त्रासाबद्दल आणि दुःखाबद्दल लिहिलं आहे. बाबासाहेबांवर देशद्रोहाचा आरोप झाला, त्यावर कवी म्हणतो-
‘देशद्रोहाच्या पिंजऱ्यातही केले तुला उभे
हिमालयापरी तू भीमा, तू नाहीस भंगलास’
कसल्याही आरोपांना घाबरून मागे सरणारे बाबासाहेब नव्हते, म्हणून ते ‘महामानव’ होऊ शकले.
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
‘मुक्त मानवी आभाळ’ या कवितेत कवी बाबासाहेबांसोबत एकरूप होण्याचा प्रयत्न करताना दिसतो. बाबासाहेबांची चळवळ कवीला आपलीशी वाटते. कवी इथे मानवतावादी दृष्टीकोन मांडतो. म्हणतो,
‘शिवावचीय (शिवायचीये) मला हरेकांच्या
यातनांची सलती नाळ
……………..
लाटांच्या पंखात भरायचंय मला
मुक्त मानवी आभाळ’
आंबेडकरी चळवळ मागे पडण्याचे कारण कवी आपल्या कवितेतून मांडतो. कवीला बाबासाहेबांच्या कार्याची जाणीव आहे. त्यांच्या विचारांना कवी जगण्याचे मूलतत्त्व मानतो. शिक्षण व्यवस्थेने इथल्या मागास आणि वंचित लोकांना बळ दिले आहे. हे शिक्षण त्यांनी प्रभावी शस्त्र म्हणून वापरायला लावले आहे. मात्र काही लोकांना बाबासाहेब कळलेच नाही. अशा वेळी कवी म्हणतो,
‘पण बाबासाहेब
आमच्यातल्याच काहींनी कृतज्ञता म्हणून
बांधले केवळ तुमचे पुतळे, स्मारक नि त्यातच मानली संपूर्ण धन्यता
नि केला उत्सव निर्लज्जपणे’
‘मूक देशाचे मूकनायक’ या कवितेतून कवी आपली भूमिका स्पष्ट करतो. सुरुवातीला कवी उद्ध्वस्त आयुष्याला ‘माळराना’ची उपमा देतो, मानवी मूल्यांना ‘सौंदर्यवर्धी बाग’ म्हणतो, बाबासाहेबांच्या कार्याला ‘ऐतिहासिक महालेणे’ संबोधतो.
हा कवितासंग्रह सध्याच्या सोयीस्कर राजकारण्यांची बाजू उघडी पाडतो. आज प्रत्येक राजकारण्याला मतासाठी बाबासाहेब लागतात. ‘महाराष्ट्र पुरोगामी आहे’, असे आपण म्हणतो, पण खरंच तो पुरोगामी आहे का, हा प्रश्न कवीला पडतो. ‘पुरोगामी होता येते’ या कवितेतून दुसरी बाजू कवी उघडी पाडतो. म्हणतो-
‘बाबासाहेब
आता
या देशात
फक्त तुमचे नाव
ओठावर खेळवले की
क्षणात
पुरोगामी होता येते
साळसूदपणाचा आव आणून हळूच गळा कापता येतो’
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणाची कल्पना करवत नाही, हे सत्य कवीने स्वीकारले आहे. यासाठी कवीने तीन कविता लिहिल्या आहेत- ‘महापरिनिर्वाण’, ‘महापरिनिर्वाणापासून’ आणि ‘६ डिसेंबर होऊ शकत नाही मृत्यूचे स्मारक’.
‘महापरिनिर्वाण’ या कवितेत कवी आपण दुःखाच्या दिवसाचा कसा सोहळा करतो, यावर बोलतो. तो बाह्यांगी कृतीचा परामर्श घेतो. बाबासाहेबांबद्दल लोकांची आस्था कशी आहे, याची मांडणी करतो. म्हणतो-
‘...मी होतोय अस्वस्थ तुमच्या दिशादर्शी
जखमी बोटाकडे पाहून
मी माझ्यातलं सडकं मदं
टाकतोय गाडून मुळांसगट’
कवीला बाबासाहेबांचं दिशादर्शी जखमी बोट दिसत आहे. बाबासाहेबांचे अनुयायी त्यांनी दाखवलेल्या वाटेवर जात नाहीत, म्हणून हे बोट जखमी असेल का? की समाजकंटकांनी आंबेडकरी अनुयायी चुकीच्या दिशेने जावे, म्हणून हे दिशादर्शक बोट जखमी केलं आहे? की सामाजिक सलोखा बिघडवावा, म्हणून जखमी केलं आहे?
बाबासाहेबांच्या आयुष्यातील त्रास बघून कवी त्याच्या आयुष्यातील त्रास विसरून जातो. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर शोषित समाजाला कोणत्या गोष्टीला सामोरे जावे लागले, याचा ऊहापोह ‘महापरिनिर्वाणापासून’ या कवितेत येतो. कवी म्हणतो, आम्ही आमच्या अस्तित्वासाठी संघर्ष पुकारला, तेव्हा इथल्या व्यवस्थेने आम्हाला दरोडेखोर, दंगलखोर ठरवलं. त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी आम्हाला तुरुंगात डांबलं, अत्याचार केला.
व्यवस्था कशी सत्ताकेंद्रित आणि जातीवादी असू शकते, याची मांडणी करतो. त्याचे समाजबांधव कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, याची जाणीव करून देतो. शेवटी म्हणतो-
‘उरला नाही कुणी आता
आमचा जामीनदार
महानिर्वाणापासून...’
..................................................................................................................................................................
या पुस्तकाविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पहा -
https://www.aksharnama.com/client/article_detail/6766
..................................................................................................................................................................
‘६ डिसेंबर होऊ शकत नाही मृत्यूचे स्मारक’ ही या संग्रहातील शेवटची कविता आहे. या कवितेत बाबासाहेबांना ‘लार्जर दॅन लाइफ’ दाखवण्यात आलं आहे. त्यांना समजून घेण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन वेगळा असेल. कवीने आपल्या परीने त्याचे विचार मांडले आहेत.
२६ जानेवारी १९५० रोजी संविधान लागू झाले, तेव्हापासून शूद्र आणि अस्पृश्य, तसेच आदिवासी, वंचित लोकांनासुद्धा स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, हक्क, न्याय, संधी, समान अधिकार इत्यादी गोष्टी मिळावयास सुरुवात झाली. याआधी त्यांना यातलं काहीच मिळत नव्हतं. त्या लोकांच्या विश्वाचे महानायक बाबासाहेब होते. त्यामुळे कवीने बाबासाहेबांसाठी ‘हे विश्वसृष्टीच्या युगंधरा’ ही उपमा वापरली असावी. शेवटच्या ओळीत कवी म्हणतो -
‘६ डिसेंबरचा दिवस उगवला की
मृत्यू मावळतो नि
मृत्यू मावळला की
६ डिसेंबरचा दिवस उगवतो’
यातील एक कविता रमाबाई यांच्यावर आहे. बाबासाहेबांना घडवण्यात जसा रमाबाईंचा हातभार होता, तसाच रमाबाईंना घडवण्यात बाबासाहेबांचाही हातभार होता. या संग्रहात आंबेडकरी चळवळीविषयी तळमळ आहे, बाबासाहेबांविषयी आस्था आहे, समाजभान आहे. समाजाची वास्तविकता आहे, विद्रोहाचे गाणं आहे, आंबेडकरी दृष्टीकोन आहे… आणि कोणाहीविषयी द्वेषभावना नाही. या कविता आपल्या अंतर्मनाला भिडतात आणि मेंदूला झिणझिण्या आणून विचार करायला भाग पाडतात.
.................................................................................................................................................................
‘महाबोधिवृक्ष युगानुयुगांचा’ : महेंद्र ताजणे
लोकवाङ्मय गृह, मुंबई | पाने : ६३ | मूल्य – १०० रुपये.
.................................................................................................................................................................
लेखक हेमंत दिनकर सावळे ‘कोण म्हणतं लोकशाही आहे?’ या नाटकाचे लेखक आहेत.
hemantsawale15@gmail.com
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’ला Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/
‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1
‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama
‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा - https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal
.................................................................................................................................................................
तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment