माणसांना (आणि त्यातही आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या लोकांना) स्वतःशी जोडणं, मग आपल्या मित्रांना एकमेकांशी जोडणं हा जणू त्यांचा छंदच होता
संकीर्ण - श्रद्धांजली
निमिष साने
  • साहित्यिक नंदा खरे आणि त्यांची निवडक ग्रंथसंपदा
  • Mon , 25 July 2022
  • संकीर्ण श्रद्धांजली नंदा खरे Nanda Khare अंताजीची बखर Antajichi Bakhar बखर अंतकाळाची Bakhar Antkalachi

मराठीतील विचक्षण कादंबरीकार, अनुवादक आणि संपादक नंदा (अनंत यशवंत) खरे यांचं शुक्रवार, २२ जुलै २०२२ रोजी पुण्यात वयाच्या ७६व्या वर्षी दीर्घ आजारानं निधन झालं. त्यांच्याविषयी त्यांच्या एका तरुण मित्रानं लिहिलेला हा लेख...

.................................................................................................................................................................

नंदा खरे गेले. अजून एक मित्र ऐन तारुण्यात गेला. ज्याचं आपल्या आयुष्यात नुसतं असणंही आश्वासक असतं, असा मित्र गेला. काकांच्या अनेक विषयांवरील लेखनाबद्दल आणि अनेक क्षेत्रांतल्या भरीव कामाबद्दल लिहिण्याचा माझा वकुब नाही, त्यामुळे मी माझ्या मैत्रीबद्दलच लिहितो.

मी मुदलात वाचक नाही, फिक्शन तर दूरच. मात्र २०१२च्या सुमारास एका मैत्रिणीनं ‘अंताजीची बखर’ माझ्या गळी उतरवली. ऐतिहासिक कादंबरी नावाचा जो एक अनैतिहासिक प्रकार मराठीत रूढ आहे, त्या प्रकारच्या कादंबऱ्या तर मला चार पानांच्या पुढे कधी झेपल्याच नाहीत. तरीही मी हिय्या करून पुस्तक हातात घेतलं आणि अंताजीने माझ्या मनाचा ठावच घेतला. मग ‘बखर अंतकाळाची’ मिळवून, वाचून संपेस्तो मला चैन पडली नाही. तिथंच मी त्यांचा फॅन झालो. मात्र आमची ओळख झाली ती फार नंतर - २०१५-१६च्या सुमारास - आणि मैत्रीचं निमित्त होतं फैज़ अहमद फैज़!

मी फैज़ या माझ्या लाडक्या कवीवर एक दीर्घ लेख ‘ए सेन मॅन’ या नावानं ‘रेषेवरची अक्षरे’च्या अंकाकरता लिहिला होता. तो काकांपर्यंत पोचला आणि त्यांनी याच मैत्रिणीला ‘मला हा लेख लिहिणाऱ्याशी जुळवून दे’ म्हणून आग्रह केला. माणसांना (आणि त्यातही आपल्यापेक्षा अर्ध्या वयाच्या लोकांना) स्वतःशी जोडणं, मग आपल्या मित्रांना एकमेकांशी जोडणं हा जणू त्यांचा छंदच होता. तीच त्यांची श्रीमंती होती आणि त्यामुळेच ते आमरण तरुण राहिले असावेत.

एकदा ओळख झाल्यावर काका त्यांना जे रोचक, महत्त्वाचं वाटेल, ते इमेल चेनमध्ये मित्रमैत्रिणींना गुंफून धाडत असत. हे अगदी अगदी दोन आठवड्यापूर्वीपर्यंत चालू होतं. त्यांनी सुरुवातीला ‘सोनी सोरी’च्या लढ्याबद्दल काही पाठवलं होतं. ते मला माहीतच होतं. मग त्यांनी एक कांचा इलय्या यांचा लेख धाडला. त्यावरून कांचा इलय्यांच्या इतर लेखांविषयी काही इमेलाइमेली झाली. मग त्यांचा एक दिवस इमेल आला – ‘तू कोण आहेस?’ त्यात त्यांनी लिहिलं होतं – “My curiosity comes from your ‘knowing’ Soni Sori, now reinforced by your knowing Kancha Ilaiah. That's very very rare in an NRI.” मग मी जवळपास माझं आत्मवृत्तच लिहून पाठवलं त्यांना. त्यात मी असं लिहिलं होतं की, ‘रूढार्थानं हुशार असणाऱ्यांना चळवळीत घेत नाहीत, म्हणून मी तसा थेट चळवळींत नव्हतो’. काकांना ते वाक्य इतकं भावलं असावं की, पुढे अनेकदा बोलताना ते त्या वाक्याची आठवण काढून आपलं खास मिश्कील हसू त्यात पेरत असत.

ऑनलाईन मैत्रीपर्यंत ठीक होतं, पण पुढे नागपुरात त्यांनी दोन दिवस राहायला बोलावलं, तेव्हा मला जरा दडपणच आलं. इतका व्यासंगी, तीक्ष्ण बुद्धिमत्तेचा, अनेकानेक विषयांवर अधिकारवाणीनं बोलू शकणारा हा माणूस आणि आपण काय बोलणार त्याच्याशी? त्यात मी त्यांचं सगळंच लेखन काही वाचलेलं नव्हतं. काका म्हणाले, “माझा एक जवळचा मित्र आहे, ज्यानं मी लिहिलेलं एकही अक्षर वाचलेलं नाही. संबंधच काय मैत्रीशी त्याचा?” तरीसुद्धा मी नागपुरात उतरताना जरा गांगरलोच होतो. तर काका स्वतः विमानतळावर गाडी घेऊन मला घ्यायला आले होते. उत्पल दत्तचा वावर कसा असेल (किंवा माझ्या मनात जसा मी बहुदा कल्पिला असेल!), तसा त्यांचा साधारण वावर होता. दोन-तीन मिनिटं ऑकवर्ड शांततेत गेल्यावर मी एका खांबाकडे पाहून म्हटलं, “नागपुरात मेट्रो? इथं आहे गरज?” तर काका मिश्कील हसून म्हणाले, “तसं नागपूर छान शहर होतं, पण आता ‘विकास’ झाला.” मग मीही खूप हसलो. काका पुढे म्हणाले, “कुणाला शिवी द्यायची असेल, तर ‘थांब मी तुझ्या गावचा विकास करतो’ असं म्हणावंसं वाटतं हल्ली.” इथपासून जी हसायला सुरुवात झाली, ते पुढचे दोन दिवस कसे गेले कळले नाहीत.

या आणि पुढच्या नागपूर भेटी म्हणजे चैन होती. खरे-तारकुंडे कंपनी, त्यांनी बांधलेली धरणं, कालवे, इमारती, नागपूरचा इतिहास, नागपुरातली गुंडगिरी, विदर्भाची भूगर्भशास्त्रीय ओळख, त्यांचा लाडका थर्मोडायनॅमिक्सचा दुसरा नियम, हिंदी सिनेमांची गाणी, साहित्य, अनेक ग्रंथांचे वाक्यावाक्याला येणारे संदर्भ, मार्क्सवाद, बाजारकेंद्री अर्थकारण, समाजवाद्यांना होणारी शाब्दिक मारझोड, ‘निर्माण’, गॉसिप, वाह्यात चेष्टामस्कऱ्या, निरनिराळे प्रयोग, ते करणारे त्यांचे नवेजुने, तरुण-म्हातारे मित्रमैत्रिणी वगैरे वगैरे अशा अंतहीन आणि स्वैर गप्पा.

सोबत त्यांनी आणि काकूंनी सगळा जामानिमा करून तयार केलेला रुचकर स्वयंपाक आणि त्यांचा नागपुरातला तितकाच प्रेमळ, आपलंसं करणारा गोतवळा. या नागपूर भेटींतून काकांच्या सहवासाशिवाय मला दोन महत्त्वाचे फायदे झाले. पहिला म्हणजे माझी विद्याकाकूंशीही मैत्री झाली. दोन स्वतंत्रपणे सुंदर आणि सुंदरपणे स्वतंत्र माणसं जोडीदार असली की, त्यांच्या आसपास आपल्यालाही किती मोकळं आणि आश्वस्त वाटतं, याची प्रचीती त्यांच्या सहवासात येते.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

या भेटीचा दुसरा फायदा म्हणजे काकांच्या अनेक तरुण, सर्जनशील, प्रयोगशील, कृतिशील मित्रांशी माझी ओळख झाली. किंबहुना मी अमेरिकेतून भारतात परतल्यावर काकांनी मला अनेकांशी जोडून देण्याचा चंगच बांधला होता. मी इतकी वर्षं अमेरिकेत राहून भारतात का परतलो, याबद्दल जराही चर्चा किंवा ridicule न करता ज्यांनी मला इथं पुन्हा रुळायला आपणहून मदत केली, त्या मोजक्या लोकांपैकी काका एक होते. कसं माहीत नाही, पण जणू त्यांना कळलंच असावं की, मी हा निर्णय का घेतला! आणि पुढे सतत लिहितं राहण्याला प्रोत्साहन देत राहिले. माझं कुठे काही छापून आलं, तर आवर्जून फोन करून, चर्चा करून प्रोत्साहन देत राहिले.

त्यांचा फार मोठा आधार वाटे. त्यांनी कित्ती लोकांना प्रेरित आणि प्रोत्साहित केलं असेल, याची काही मोजदादच नाही. किंबहुना काकांना गेली अनेक वर्षं ओळखणारे त्यांचे मित्र त्यांच्या इतक्या आठवणी सांगत असतात की, एकेकदा त्यांचा हेवाच वाटतो. त्या सगळ्यांच्यात काका झिरपलेले दिसतात. अंश अंश गोळा केला, तर त्यांच्यातून थोडेसे काका यापुढेही भेटत राहतील.

अलीकडे मात्र त्यांच्या बोलण्यात ‘डिस्टोपिया’ जास्त रेंगाळताना जाणवत असे. गेल्या वर्षी त्यांनी ‘अवकाळाचे आर्त’ या सदराचं दै. ‘लोकसत्ता’साठी संयोजन केलं होतं. त्याबद्दलही बोलणं झालं होतं. “आहे ते काय कमी डिस्टोपिक आहे की, मी अजून वर डिस्टोपिक काहीतरी वाचून त्यावर लिहावं? मला नाही झेपणार” असं मी त्यांना सरळ म्हटलं. त्यांनी हसून सोडून दिलं. लॉकडाऊनमुळे भेटी कमी झाल्या. पहिल्या लॉकडाऊननंतर फोन झाला, तेव्हा म्हणाले होते, “या लॉकडाऊनमुळे सिगरेट सुटली!”

काकांची शेवटची भेट पुण्यात झाली, तेव्हा त्यांना सतत ऑक्सिजन लागत होता. मला म्हणाले, “इतकी वर्षं शरीराला त्रास दिलाय, तर काहीतरी होणारच आता!” पण त्यामुळे बोलण्यात, कामात, वाचनात काहीही फरक पडला नव्हता. त्यांना त्रास होऊ नये, म्हणून भेटायला येणारे फार वेळ न थांबण्याचा नियम पाळत होते, तर काकाच आम्हाला म्हणाले, “असं काय लगेच एका तासात निघायची गरज नसते!”

काका पुण्यात आहेत, तर आता वरचेवर भेटी होतील असं वाटलं होतं. आता अजून जास्त वरचेवर भेटायला हवं होतं, ही रूखरूख राहील. आता त्यांना ‘तुम्हांला काहीही वाटो, ‘अंताजी’च तुमचं बेस्ट पुस्तक आहे’ असं अतिपरिचयानं झालेल्या अवज्ञेतून तोंड वर करून सांगता येणार नाही. त्यांच्या प्रकाशित झालेल्या नव्या पुस्तकाची त्यांनी आवर्जून राखून ठेवलेली प्रत त्यांच्या ‘प्रिय निमिष…’ या हस्तलिखित संदेशासह आता मिळणार नाही.

 काकांना अगदी सुरुवातीला लिहिलेल्या इमेलमध्ये मी ‘अंताजीच्या बखरी’बद्दल त्यांना लिहिलं होतं – “फिक्शन या प्रकाराकडे न फिरकणारा मी अंताजीच्या आहारी गेलो, कारण मला पॉलिटिकल इकॉनॉमीच्या भक्कम पायावर उभं असणारं, तत्कालीन जात-वर्ग-लिंगभाववास्तव त्याच्या भाषिक आविष्कारांसह चिमटीत पकडणारं, इतिहासाच्या पॉप्युलर साहित्यानं काहीही चित्तथरारक नसल्यानं अडगळीत ठेवलेल्या काळाबद्दल काहीतरी रोचक माहिती सांगणारं आणि मुख्य म्हणजे इतिहासाच्या जितजेत्यांच्या व स्वामिनिष्ठेच्या नजरेपेक्षा एका सामान्य, कुतूहल जपणाऱ्या नजरेतून लिहिलेलं फिक्शन फार थोर वाटलं!”

असा लेखक मराठीत झाला, याकरता आपण स्वतःला नशीबवान समजलं पाहिजे!

.................................................................................................................................................................

हेही पाहा\वाचा :

येवढं बोलावं, लिहावं का, स्वतःच्या भूमिकेबद्दल?... तर जरा तपशीलानं उत्तर दिलं, झालं...

सोशल मीडियावर मराठी मजकुराचं इंग्लिश भाषांतर येतं, ते फार चुकीचं असतं, पण त्यात नंदा खरे यांचं भाषांतर ‘Nanda is True’ असं येतं…. अन् ते सत्य आहे!

.................................................................................................................................................................

लेखक निमिष साने सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत. नंदा खरे यांच्याशी त्यांची गेल्या सहा-सात वर्षांपासून मैत्री होती.

nimishsane@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......