सोशल मीडियावर मराठी मजकुराचं इंग्लिश भाषांतर येतं, ते फार चुकीचं असतं, पण त्यात नंदा खरे यांचं भाषांतर ‘Nanda is True’ असं येतं…. अन् ते सत्य आहे!
संकीर्ण - श्रद्धांजली
प्रसाद कुमठेकर
  • लेखक, संपादक, अनुवादक आणि कादंबरीकार नंदा खरे
  • Mon , 25 July 2022
  • संकीर्ण श्रद्धांजली नंदा खरे Nanda Khate ज्ञाताच्या कुंपणावरून अंताजीची बखर Antajichi Bakhar बाजार ‌Bajar

ऐक मानवप्राण्या, तुझी कहाणी

तू घडलास कसा?

मूठभर होतास संख्येनं.

लाखभर वर्षांमध्ये सातेक अब्ज झालास

दोनशे देश, हजारो भाषा, शेकडो लिप्या,

अगणित तंत्र आणि शास्त्र

हे ‘एका’चं ‘अनेक’ होणं - हीच तुझी कहाणी

प्रश्न सोडवत इथपर्यंत आलास.

दर पावलाला नवे प्रश्न उत्पन्न केलेस.

‘माणुसकी’ म्हणजे काय?

‘अमानुषता’ कशात असते?

पदोपदी या प्रश्नांना सामोरा जातो आहेस-

कधी कधी जाणीवपूर्वक, फारदा अजाणताच.

(‘कहाणी मानवप्राण्याची’ – नंदा खरे)

विज्ञान, गणित, इतिहास, भूगोल, भाषा, माणसं, दगड धोंडे, माती, पाणी, स्थापत्य, सिनेमा, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, तंत्रज्ञान प्रत्येक विषयाचं प्रचंड कुतूहल असलेला अभ्यासू लेखक-माणूस म्हणजे नंदा खरे.  

२०२१ साली त्यांच्या ‘उद्या’ या कादंबरीला साहित्य अकादमी मिळाला, तेव्हा त्यांनी ‘समाजाकडून मला भरपूर मिळाले आहे. त्यामुळे आणखी घेत राहणे मला इष्ट वाटत नाही’, असं सांगत नम्र आणि ठामपणे नाकारला. त्याच्या भरपूर बातम्या झाल्या, सोशल मीडियावर भरभरून लिहिलं गेलं. तेव्हा माझ्या बऱ्याच मित्रांना नंदा खरे या लेखकाचं नाव कळलं. दुर्दैवानं तोपर्यंत तरी मराठी साहित्याची आत्यंतिक गरज असूनसुद्धा हे नाव लोकांपर्यंत पोहचवण्यास आम्ही असमर्थ ठरलो होतो. पण साहित्य अकादमीच्या पुरस्काराच्या निमित्तानं हे झालं, उत्तम झालं! देर आये दुरुस्त आये!!

इंटरनेटवर सर्च केलंत तर त्यांची औपचारिक माहिती म्हणजे नंदा खरे उर्फ अनंत यशवंत खरे हे पेशानं स्थापत्य अभियंते होते. त्यांनी आयआयटी मुंबईमधून १९६७ साली पदवी मिळवली. त्यांनी ३४ वर्षे ‘खरे आणि तारकुंडे’ या धरणे, पूल, कारखाने, बांधणाऱ्या कंत्राटदार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केलं. २००१ साली त्यांनी स्वतःच्याच कंपनीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांनी १९९८ ते २०१७ या काळात ‘आजचा सुधारक’ या विवेकवादाला वाहिलेल्या मासिकाच्या संपादक मंडळात काम केलं आणि २००० ते २०११ दरम्यान ते या मासिकाचे प्रमुख संपादक होते. १९९०मध्ये आलेल्या ‘ज्ञाताच्या कुंपणावर’पासून ते २०२२ आलेल्या ‘बाजार’पर्यंत त्यांनी लिहिलेली, भाषांतरीत केलेली, संपादित केलेली एकूण २९ पुस्तकं आलेली आहेत, अशी औपचारिक माहिती मिळेल. 

सर्चचे की वर्डस नीट वापरलेत तर त्यांचे अलीकडे विविध वृत्तपत्रांत आलेले लेख, यु-ट्यूबवर ‘आयबीएन-लोकमत’च्या ‘वाचाल ते वाचाल’ या सदरात झालेली मुलाखत मिळू शकेल. त्यांच्या अतुल देऊळगावकर, राहुल बनसोडे व लोकेश शेवडे, आशुतोष शिर्के यांनी घेतलेल्या अतिशय मौलिक मुलाखती पाहायला मिळतील. अतुल देऊळगावकर यांच्या ‘ऐकता दाट’ या पुस्तकातली मुलाखतसुद्धा वाचता येईल. ज्यांनी या मुलाखती पाहिल्या नाहीत, त्यांनी त्या जरूर पाहाव्यात…   

माझ्यापुरतं लिहायचं तर नंदा खरे माझेच नाही, तर जयंत पवार, राजन गवस, अतुल देऊळगावकर, वीणा गवाणकर, आसाराम लोमटे, किरण गुरव यांसारख्या माझ्या अत्यंत आवडत्या लेखकांचेसुद्धा आवडते लेखक. साधारण २००७च्या सुमारास मी त्यांचं ‘ज्ञाताच्या कुंपणावरून’ वाचलं. त्यातील ‘विज्ञानाची वाट’, ‘विश्वरूप चित्राच्या शोधात’, ‘उत्क्रांतीचे तत्त्व’, ‘मी कोण?’, ‘गर्व आणि गर्वहरण’ इत्यादी प्रकरणं वाचून मजेदार, लज्जतदार, कुर्रम कर्र्म, विज्ञानाच्या कक्षेबाहेर फिरत असणाऱ्या साहित्याला चटावलेलं माझं डोकं झणाणलं. वाटून गेलं, मी जर हे पुस्तक दहा वर्षं आधी वाचलं असतं, तर ‘विज्ञान आणि साहित्य या दोन गोष्टी वेगळ्या असतात’ असल्या भपाऱ्या मारत मी माझ्या आयुष्यातली काही मोलाची वर्षं वाया घालवली नसती’!

यातील ‘विज्ञानाची वाट’ या पहिल्याच प्रकरणात त्यांनी वापरलेला ‘आठवणींचे ग्रंथालय’ हा शब्द महाभयंकर आवडून गेलेला. नंतर आलेली ‘अंताजीची बखर’ वाचलं आणि उडालो. या ऐतिहासिक कादंबरीमधील ‘....आणि संदर्भ’ शीर्षकाखाली मांडलेली अंताजीची कुळकथा, लेखकाचा इतिहास, लेखकाची वृत्ती, साधनं सांगणारी दोन पानी अर्पणपत्रिका जवळ जवळ तोंडपाठ झालेली.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

आणखी एक गंमतशीर गोष्ट म्हणजे, यांचं पहिलं पुस्तक वाचून मी माझ्या मित्रांना ‘नंदा खरे या लेखिका अफाट आहेत’, असं सांगितलं होतं. सत्य कळल्यावर माझ्या अज्ञान पसरवण्याच्या अक्षम्य कृतीची अतिशय लाजदेखील वाटली. पण जेव्हा मला कळालं की, नागपूर विद्यापीठात प्रबंध लिहिणारीकडूनसुद्धा अशीच घोडचूक झालीय, तेव्हा मात्र मी स्वतःला माफ करून टाकलं! नंदा खरे यांनी स्वतःच एकदा साहित्य अकादमीच्या ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमात या गोंधळाबद्दल ‘‘कधी कधी माझी ओळख ‘नंदा खरे मॅडम’ अशी केली जाते, जे मला मनापासून आवडतं. एखादा सांड जसा शिंगं उडवत, खुरांनी जमीन उकरत स्वतःच्या पौरुषाची जाहिरात करतो, तसं मला करावंसं वाटत नाही. माणूस तरी मानता? आभारी आहे!” असं सांगितलं आहे.

थोडक्यात, लेखक नंदा खरे स्त्री आहेत, पुरुष आहेत, यापेक्षा ते लेखक म्हणून ‘अफाट आणि अचाट’ आहेत, हेच महत्त्वाचं आहे. आणि ज्यांनी ज्यांनी त्यांची पुस्तकं वाचलेली आहेत, त्यांना याबद्दल तिळमात्र शंका नाही.

मी माझी ‘बगळा’ अन ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ ही दोन पुस्तकं त्यांना पाठवली होती. त्या निमित्तानं आमचा संवाद वाढत गेला. मग त्यांनी मला चित्रकार Georges-Pierre Seurat - ज्याचा उच्चार बहुधा ‘सूरा’ आहे असे सांगत – या त्यांच्या चित्रांची गाठ घालून दिली. सुराची चित्रं कशी असंख्य ठिपक्यांची घडलेली असतात, भारतीय द.रा. बेंद्रे कधी कधी असेच ठिपके देत चित्रं काढायचे हे सांगितलं. अमेरिकन लेखक जॉन रॉडेरिगो डॉस पासोसच्या यू.एस.ए. ट्रिलॉजीची तोंडओळख करून दिली. मग एकदा जोनाथन नोलानच्या ‘पर्सन ऑफ इंटरेस्ट’ (Person of Interest) सीरीजबद्दल सांगितलं. आणि हेसुद्धा की, त्यांच्या दृष्टीनं या अमेरिकन साय-फाय क्राईम ड्रामा सीरीज बौद्धिक कसरती असतात. पुढे काय काय होणार, याचा फक्त अंदाज बांधणाऱ्या. या सगळ्यांचा कसा शास्त्रशुद्ध अभ्यास केला पाहिजे, हेही सांगितलं. ‘बिलियन्स’ या सीरीजचा आता सहावा भाग येणार आहे, हे सांगितलं. शोशना झुबऑफ (Shoshana Zuboff) या अमेरिकन लेखिकेच्या ‘दि एज ऑफ सर्वेलियन्स कॅपिटॅलिशम’ (The Age of Surveillance Capitalism) या पुस्तकाबद्दल, मुघल साम्राज्याच्या पतनाच्या काळात आग्रा शहरात आलेल्या महामंदीबद्दल लिहिणाऱ्या कवी नजीर अकबराबादीबद्दल सांगितलं. ब्रॅड डीची ‘संस्कृतीसाठी काय पायजे?’ ही कविता, तिचा स्वतः केलेल्या कवितेचा अनुवाद शेअर केला. सर्वज्ञ असल्याचा आव आणून काहीही उत्तर न देता ‘प्रश्न इतका गुंतागुंतीचा आहे की, मी असं झटपट रंगारी उत्तर देणं बरं नाही’, असं सांगून जबाबदारीची जाणीव काय असते हे दाखवून दिलं. 

प्रेमचंद यांचा ‘मिल मज़दूर’ सिनेमा बॅन झाला होता. त्याविषयीच्या पोस्ट व्हायरल झाल्या होत्या. त्या वाचून त्यातलं ‘भयरामजी जीजाभाय’ हे नाव, हिंदी भाषकांना पारशी नावाची सवय नसल्यानं ‘बैरामजी जीजीभॉय’चं तसं झालं असणार, अशी शक्यता सांगितली.

त्यांना आवडणाऱ्या लेखकांबद्दल ते अगदी मुक्तकंठानं बोलत असत. ‘जयंत पवारांचा मी फॅन आहे… मराठीत चमचा म्हणण्याइतका’ असं ते म्हणालेले. किरण गुरव यांचा ‘क्षुधाशांती भवन’चा खर्डा वाचून सांगितलेलं, ‘चला, तुमचं पुस्तक लवकर येऊ द्या. मी डफ-तुणतुणे घेऊन आधीच सुरुवात करतो!’

थोडक्यात, ते देताना हातचं काही राखून ठेवत नसत, जे आहे ते मुक्तकंठानं आणि मुक्तहस्तानं देत. ते सिनेमाविषयी सांगत, गाण्यांविषयी भरभरून बोलत, साहिर लुधियानवी, शैलेंद्र, मिर्जा ग़ालिब, कैफ़ी आजमी, उमर खैयाम त्यांच्या सोबतीला असत.  

नंदा खरे यांचा एकूण ‘रीच’ अफाट होता. भाषा, विज्ञान, स्थापत्यशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, तत्त्वज्ञान, चित्रपट, चित्रकला, कविता अशा असंख्य  विषयांवर ते बोलू शकत. त्यांचं बोलणं अगदी ठोक, स्वच्छ आणि खात्रीचंच असे. ते सांगत, ‘‘सगळ्या भाषा प्रमाणभाषेपेक्षा गोड असतात. जितक्या भाषा जास्त एकमेकांत मिसळतील, तेवढा माणसांचा गर्व कमी होतो, असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. भाषेला सत्याची भागीदार मानत ऐतिहासिक प्रेरणेनं लिहायला खूप, खूप वाव आहे. मी तो थोडाफार वापरला. नेहमीसारखा बचाव देऊन ठेवतो की, कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी दिलगीर आहे. खरं मात्र मी आनंदात आहे, कारण हे भावना आणि त्या दुखण्याचं क्षेत्रच नव्हे!’’

राहुल बनसोडे यांनी फेसबुकवर घेतलेल्या मुलाखतीत ‘आपण already १३५ कोटी पार केले आहेत, राजकारणी सांगताना १२५ कोटीचा आकडा सांगतात, पण तो २०११ सालचा आहे. दरवर्षी सव्वादोन ते अडीच टक्के लोकसंख्या वाढते. आता तुम्हीच अंदाज लावा, किती झाले असतील त्याचा?’, असं सांगून ऐकणाऱ्यांना तिथल्या तिथं अपडेट केलं होतं. 

साहित्य अकादमीच्या ‘लेखक आपल्या भेटीला’ या उपक्रमात त्यांनी केलेली एकूणच मांडणी मुळातून वाचण्यासारखी आहे. त्यातला एक तुकडा राहवत नाही म्हणून इथं देतो-

“कथा कापसाच्या धाग्याच्या लांबीची. वर्षानुवर्षं शाळेत शिकवतात की, भारतीय कापूस आखूड धाग्याचा असतो. त्यामुळे त्यापासून चांगलं कापड बनत नाही. इजिप्शियन, अमेरिकन वगैरे लांब धाग्याच्या कापसातूनच चांगलं कापड बनू शकतं. हे खोटं आहे. ग्रीक काळापासून, म्हणजे इसवीसनपूर्व साताठशे वर्षांपूर्वीपासून थेट सतराशे पन्नास इसवीसनापर्यंत भारतीय कापड जगभर सन्मानानं विकत घेतलं जात असे. मलमलच्या कापडाच्या आठ थरांमधून पलीकडचं वाचता येतं, हे नागपूरचा अजब-बंगला आजही दाखवतो. भारतीय लाल-हिरवं कापड आफ्रिकेत नवऱ्या मुलीसोबत दिलं जात असे. त्याला ‘इंजिरू’ म्हणत, जो बहुधा मराठी ‘अंजिरी’चा अपभ्रंश आहे. १७५०पर्यंत जगात दोनच देश औद्योगिक मानले जात- वस्त्रोद्योगी भारत आणि रेशीम व चिनीमातीची भांडी निर्यात करणारा चीन. आजच्या दरडोई उत्पन्नाच्या मापात भारत इतर जगापेक्षा ३०-४० टक्के श्रीमंत होता. सगळा कापड उद्योग विकेंद्रित ग्रामोद्योग नमुन्याचा होता. कापूस पिकवणारे, सूत कातणारे, कापड विणणारे आत्महत्या करत नसत. पण इंग्रजी सूत-कापड यंत्रांना आखूड धाग्याचा कापूस वापरता येत नसे. ग्रामोद्योगी कापडाचा दर्जाही, त्या यंत्रांना गाठता येत नसे. तेव्हा भारतीय कापड स्पर्धेतून बाद करायला आखूड धाग्याचा कापूस बदनाम केला गेला. पण तोच वाईट कापूस पिकवायला मात्र भरपूर आमिषं देऊन वऱ्हाडाला ‘सोन्याची कुऱ्हाड’ केलं गेलं. आपला कापडउद्योग मात्र संपला आणि त्याची जागा इंग्रजी यंत्रोद्योगानं घेतली. आज तर ही विकृती कीटकनाशकांमुळे होणारे मृत्यू, आत्महत्या, कधीच न मिळणारे हमीभाव वगैरेंपर्यंत पोचली आहे. हा खरा इतिहास जर मांडला गेला, त्याचा प्रसार केला, तर आजचे पॉलिएस्टर प्रिन्स नाराज होतील, त्यांच्याआडून राज्यकर्ते नाराज होतील, इत्यादी, वगैरे. तेव्हा खरा इतिहास शोधत राहणं ही आपली जबाबदारी आहे. मराठी ऐतिहासिक कादंबऱ्या असलं काही करत नाहीत. सर्व खूपविक्या, बेस्टसेलर कादंबऱ्या दोनशे ते चारशे वर्षांपूर्वीच्या काळातल्या राजेलोकांवर केंद्रित आहेत. नाही, राजेलोक चमकदार असायचे. त्यांच्यासाठी देखण्या नटनट्या वापरता येतात. पण प्रजेचं काय? भारतात साठेक हजार वर्षं माणसं वावरताहेत. २०-२५ हजार वर्षांपूर्वी नेवाशाला, जळगावच्या आसपास माणसं होती. हिमयुग होतं तेव्हा. प्राणीपक्षीही वेगळे असत. आज भारतात न सापडणारे शहामृग असत. त्यांची चित्रं माणसं काढत. त्यांच्या अंड्यांच्या टरफलाचे मणी बनवत. त्यांच्यावर कादंबऱ्या मात्र नाहीत. सोळाशे-अठराशे सनांमध्येही फक्त राजेलोक आहेत. प्रजा, तिचे व्यवहार वगैरे नाहीत.’’

नंदा खरे यांचं असं तर्कशुद्ध लेखन वाचून मीडिऑकर झापडबंद आयुष्याला सोकावलेलं डोकं थाऱ्यावर येतं. उघड्या डोळ्यासमोर असलेल्या अज्ञानाच्या, गैरसमजाच्या पडद्याला भसाभस भोकं पडू लागतात आणि समोरचं स्वच्छ दिसायला लागतं. आणि आठवत राहतात बा.सी.मर्ढेकरांच्या ‘भंगू दे काठिण्य माझे’ कवितेतील या चार ओळी

‘जाऊं दे ‘कार्पण्य’ ‘मी’ चे

दे धरुं सर्वांस पोटी;

भावनेला येऊ देगा

शास्त्र-काट्याची कसोटी!’

हल्ली सोशल मीडियावर मराठी मजकुराचं इंग्लिश भाषांतर येतं, ते फार चुकीचं असतं म्हणतात, पण त्यात नंदा खरे यांचं भाषांतर ‘Nanda is True’ असं येतं…. अन् ते सत्य आहे.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......