श्रीकांत साहेबराव देशमुख हे कवी म्हणून सर्वपरिचित आहेत. त्यांचे ‘बळीवंत’, ‘आषाढमाती’, ‘बोलावे ते आम्ही’ व ‘लोळण फुगडी’ हे चार कवितासंग्रह आहेत. कवितेच्या प्रांतात अतिशय गांभीर्याने सृजनप्रवास करत त्यांनी ‘पडझड वार्याच्या भिंती’ या ललितगद्याद्वारे आपली दमदार मुद्रा उमटवली. याशिवाय त्यांचे वैचारिक लेखनही प्रसिद्ध आहे. त्यांची ‘पिढीजात’ ही पहिलीच कादंबरी. (या नंतर त्यांची ‘कोवळे वर्तमान’ ही एक कादंबरी आली.) त्यांच्या समग्र लेखनातून त्यांची प्रागतिक, शेती व शेतकरीनिष्ठ भूमिका प्रत्ययास येते.
देशमुख यांचा मूळ पिंड कवीचा आहे. ते शेतकरी परंपरेतील कवी आहेत. त्यांच्यावर वारकरी संप्रदाय व लोकजीवनाचे संस्कार झालेले आहेत. त्यातूनच त्यांची कविता आकारास आलेली आहे. मात्र ही कविता आधुनिकतावादी संवेदनशीलतेचा प्रभावी आविष्कार आहे. तीमधून प्रखर ग्रामसमाज वास्तव येते. तिच्यामध्ये दाहकता आहे. तद्वतच ग्रामीण जीवनाचा र्हास, शेतकर्यांची विविध व्यवस्थेकडून होणारी शिकार, त्यातून उद्ध्वस्त होत जाणारा शेतकरी व ग्रामव्यवस्था हे या कादंबरीचे केंद्र आहे. कृषी जीवनातील ताण-तणाव, श्रमनिष्ठा आणि अवहेलना, बदलत्या पर्यावरणातील नातेसंबंध, शेती-माती-माणसं-निसर्ग-कृषी व ग्रामसंस्कृती या सर्वांचे अंत:सूत्र उकलत सकसपणे ही कविता सत्त्व घेऊन अवतरते. हेच सूत्र ‘पडझड वार्याच्या भिंती’ या ललित गद्याद्वारे मार्गक्रमित होते. भू-सांस्कृतिक परिमाणांचा व कृषिसंस्कृतीचा शोध घेत वर्तमान काळातील ग्रामव्यवस्था व ग्रामसंस्कृतीची पडझड, मानवी हव्यासापोटी उजाड होत चाललेला निसर्गआदींचा प्रत्ययी काव्यमय आविष्कार या लेखांद्वारे होतो. तसेच ‘महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ’ व ‘कूळवाडी भूषण : शिवराय’ या वैचारिक ग्रंथाद्वारेही त्यांची भूमिका स्पष्ट होते. शिवाय श्रीकांत देशमुख हे एक कर्तव्यदक्ष प्रशासकीय अधिकारी होते. राज्य शासनाच्या प्रशासकीय सेवेत सहकार क्षेत्रात सनदी अधिकारी म्हणून त्यांनी सेवा पूर्ण केलेली आहे. दरम्यानच्या काळात त्यांची नाळ शेती-मातीशी जोडलेलीच होती. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांच्या ‘पिढीजात’विषयी उत्सुकता वाटते.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
‘पिढीजात’चा एक अर्थ ‘वंशपरंपरेने, पिढ्यानपिढ्या चालत आलेले’ असा तर दुसरा अर्थ ‘कुलीन’ आहे. पिढीजात म्हणजे एका पिढीकडून दुसर्या पिढीकडे येणारा वारसा. हा वारसा केवळ वंशपंरपरेने पूर्वजांकडून वशंजांकडे हस्तांतरीत झालेल्या संपत्तीचा नाही, तर वर्षानुवर्षे, पिढ्यानुपिढ्या शासन, प्रशासन व व्यापारी व्यवस्थेकडून गरीब शेतकर्यांचे होणारे शोषण, शेतकर्यांवर होणारा अन्याय यांचाही आहे. अशा प्रकारच्या लुटारू व्यवस्था या पिढी-दर-पिढी सक्रिय आहेत. या क्रियाशील शोषक व नाडलेल्या शोषित कृषिव्यवस्थेतील घटकांचे सूचन या कादंबरीद्वारे होते.
कादंबरी या वाङ्मय प्रकारामध्ये मानवी जीवनाचा व्यापक पट येतो. ज्यामध्ये अनेकविध टिश्यूंचा अंतर्भाव झालेला असतो. स्वातंत्र्यपूर्व काळातील शेती व प्रशासनव्यवस्था स्वातंत्र्योत्तर काळात बदलत गेली. विविध प्रकारच्या शासकीय धोरणांचा परिणाम संपूर्ण समाजव्यवस्थेवर झाला. स्वातंत्र्यावेळी राज्यव्यवस्थेकडून असणार्या अपेक्षांना स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ठेच पोहोचायला सुरुवात झाली. याचे कारण म्हणजे राज्यकर्त्यांची उद्योग/भांडवलधार्जिणी धोरणे आणि प्रशासन व्यवस्थेने वाचलेला नष्ठनाचा पाढा. अशा कारणांमुळे शेतकर्यांचा कणा वाकवला गेला. एकीकडे भांडवली व्यवस्थेला प्रमोट करणारे पर्यावरण आणि दुसरीकडे जागतिकीकरणाचा रेटा अशा व्यापक पटलावर ‘पिढीजात’ आकारत जाते.
एका गरीब, सामान्य शेतकरी कुटुंबातून प्रशासकीय सेवेत क्लास वन पदापर्यंत पोहोचलेला नवनाथ शेळके हा या कादंबरीचा नायक. नवनाथ हा ज्या शेतकरी कुटुंबातून आलेला आहे, त्यांच्यासाठी काम करून समाजऋण फेडावे, यासाठी तो एका जिल्ह्याच्या ठिकाणी स्वत:ची बदली करून घेतो. जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) असल्याने तो जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत आहे. तेथील पद्मश्री सहकारी साखर कारखान्याचा अवसायक म्हणून त्याच्याकडे जबाबदारी आहे. जिल्ह्यातील राजकारणी रावसाहेब आवटे व विद्यमान आमदार दयानंद शिंदे यांच्यातील सत्तासंघर्ष हा अधिकार्यांसाठी त्रासदायक आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील राजकारण हे भूविकास बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, सहकारी सोसायटी, सहकारी साखर कारखाने यांच्याभोवती केंद्रीत झालेले असते. तसेच येथेही आहे. ‘पद्मश्री’ सुरू व्हावा म्हणून धडपडणारा रावसाहेब आवटे आणि दुसरीकडे ‘पद्मश्री’ सुरू झाला, तर सत्ताकेंद्र आवटेकडे जाऊ शकते, म्हणून कारखाना पुन्हा सुरू होऊ नये, यासाठी अत्यंत दक्षपणे दयानंद शिंदे राजकारण करतात. कारण कारखाना सुरू झाला की, शेतकरी वर्गाची व कारखान्यातील कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय, नातलग यांची सहानुभूती आवटेंना मिळणार. यामुळे रावसाहेब आवटेंचे वर्चस्व वाढेल. यासाठी एकीकडे कारखाना चालू होऊ नये, म्हणून प्रयत्न करायचे आणि दुसरीकडे बंद पडलेल्या कारखान्याला आवटे कसे जबाबदार आहेत, त्यांच्यामुळे शेतकरी व कर्मचारीवर्गाचे किती नुकसान होत आहे, अशा दुटप्पी पद्धतीने त्यांचे राजकारण सुरू असते.
अर्थात अशा प्रकारचे सर्वसामान्य माणसांच्या डोळ्यात धूळ फेकणारे राजकारण प्रत्येक ठिकाणी असते. राजकारणामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्याचे स्वारस्य कुणालाही नसते. ते प्रश्न सुटले तर लोक आपल्याकडे येणार नाहीत, यासाठी प्रश्न प्रलंबित ठेवून आपली पोळी भाजून घ्यायची, त्यासाठी लोकभावना तीव्र करण्याकरता सहकारी संस्था, अधिकारी, कर्मचारी वेठीस धरायचे. यामुळे सहकाराचा स्वाहाकार कसा होतो, या सर्वांमध्ये प्रशासन व्यवस्था कशी काम करते, राजकारणामध्ये सर्वसामान्य माणूस कसा भरडला जातो, याचे प्रत्ययी वास्तव ‘पिढीजात’ मांडते.
देशात सर्वप्रथम १९०४ साली सहकारी संस्थांना प्रारंभ झाला. महाराष्ट्रात सहकारी चळवळीची सुरुवात १९१० साली प्राथमिक कृषी पतसंस्थेच्या स्थापनेने झाली. स्वातंत्र्यपूर्व काळात १९४६मध्ये देशातील पहिली सहकारी संस्था ‘अमूल’ची स्थापना झाली. यानंतर १९५०मध्ये प्रवरानगर येथे आशिया खंडातील पहिला साखर कारखाना उभारला गेला. एवढी प्रदीर्घ आणि समृद्ध अशी सहकाराची परंपरा असताना अलीकडच्या तीन-चार दशकांत सहकार चळवळ खिळखिळी झाली. राजकारण्यांनी स्वत:च्या स्वार्थासाठी सहकारी संस्थांचा दुरुपयोग केला. यामुळे या चळवळीकडे पाहण्याची दृष्टी बदलली. साखर कारखाने, सहकारी बँका, सोसायट्या, दूधसंघ, सूतगिरण्या अशा संस्थांमध्ये अपवाद वगळता उद्धाराचे चित्र धूसर दिसते. राजकीय स्वाहाकारामुळे सहकार, पर्यायाने ग्रामव्यवस्था, समाजव्यवस्था, मूल्यव्यवस्था, संस्कृती, कृषिव्यवस्था मोडकळीस आल्याचे चित्र दिसते.
यापूर्वीदेखील सहकार क्षेत्राचे चित्रण कलाकृतीद्वारे आलेले आहे; परंतु कादंबरीचा नायक नवनाथ शेळके हा या क्षेत्रातील ‘अधिकारी’ व्यक्ती. त्यामुळे तो जे जगतो, भोगतो आणि अनुभवतो ते अतिशय सूक्ष्मपणे अधिकारवाणीने मांडतो. परिणामी या क्षेत्रासह अन्य क्षेत्रातील खपल्या निघून भळभळणारे वास्तव समोर येते. नवनाथाची नाळ शेती-मातीशी कायम जोडलेली. ‘शेती करनं म्हणजे देवाचं काम करन्यासारखं. काही झालं तरी शेतीला आंतर देऊ नाही, ’ असे संस्कार वडील सोमाजीकडून झालेले. त्यामुळे नवनाथ शेतकर्यांसाठी काम करण्याच्या हेतूने सहकार खात्यातील जिल्हा उपनिबंधक पदाची निवड करतो.
खेड्यापाड्यात असलेल्या सोसायट्या, जिल्हा बँक, नागरी सह. बँका, कृषी उत्पन्न बाजार समिती, सूत गिरण्या, खरेदी-विक्री संघ, साखर कारखाने या माध्यमांतून कृषकांना सेवा देऊन थोरामोठ्यांच्या स्वप्नातील भारत उभा करता येतो, अशी त्याची धारणा. जेव्हा नवनाथकडे नव्या जिल्ह्याची जबाबदारी येते, तेव्हा शेतकर्यांच्या सेवेपेक्षा मेवा खाणारे अधिक असल्याने प्रत्येकाला सामोरे जात उत्तरे शोधण्यात तो अधिक खोल गर्तेत जातो. ‘पद्मश्री’चा अवसायक म्हणून शेतकर्यांच्या अडचणी, कर्मचार्यांचे पगार, बँकेचे कर्ज, कोर्टकचेरी, मंत्री-सचिव-आयुक्त-आमदारांच्या बैठका, उपोषणं, निदर्शने, मशिनरी स्पेअर्स सप्लायर्स, भंगार, विधानसभेतील एलएक्यू आणि सर्व बाजूंनी अधिकार्यांना घेरणे, या सर्व अडचणींतून तो जातो. आपल्या राज्याने साखर कारखान्याच्या माध्यमातून आशिया खंडात एक आदर्श घालून दिला. पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील, यशवंतराव चव्हाण, धनंजय गाडगीळ, वसंतदादा पाटील, भाऊसाहेब हिरे यांनी सहकारी क्षेत्राला समृद्ध केले. पण सहकारमहर्षी रावसाहेब आवटे, ना. दयानंद शिंदे, ना. हैबतराव देसाई, मंत्री, मंत्र्यांचे पीए, सभापती, संचालक, आयुक्त, संघटनांचे नेते, विभागीय निबंधक, कार्यकर्ते, शेतकरी मित्र, अशा अनेकविध वृत्ती-प्रवृत्तीच्या माणसांशी भेट होऊन सहकारातील काळी बाजू अधिक गडदपणे समोर येते.
लेखक श्रीकांत देशमुख यांची भूमिका आणि विचार स्पष्ट असल्याचा प्रत्यय कादंबरीद्वारे येतो. त्यांना ‘शत्रू-मित्र विवेक’ असल्याने उत्तम जाण आहे. आपण कोणामुळे आहोत, कोणासाठी आहोत, आपल्याला कोणत्या हातांना बळ द्यायचे आहे आणि कोणाच्या हातातील बाहुले बनायचे नाही, याचे स्पष्ट चित्र त्यांच्यासमोर आहे. याचा प्रत्यय कादंबरीच्या टिश्यू टिश्यूमधून, तसेच नवनाथ शेळके या नायकाच्या व्यक्तिरेखेतून आणि लेखकाच्या पूर्वविधानातून येतो. ‘नवनाथ शेळके हा या कादंबरीचा नायक. तो बोलतो, चालतो, काम करतो आणि बहुतेकदा ऐकतो, पाहतो. त्याच्या जगण्याचा, विचारांचा असा एक परिप्रेक्ष्य आहे, जो त्याच्या मनातल्या भूमीशी जोडला गेला आहे. खेड्यातून अभावात शिक्षण घेऊन तो एका व्यवस्थेचा अपरिहार्य घटक बनला आहे. खरे तर त्याच्यासाठी ती अनिवार्य आपत्तीसारखी व्यवस्था आहे. त्या अर्थाने नवनाथ एकटा नाही, तो अनेकांर्थांनी प्रतिनिधी आहे. त्याचं प्रातिनिधिक असणं हाच त्याच्या संवेदनेचा सर्वोच्च बिंदू मानावा लागेल.
खरं तर नवनाथसारखे कष्टकरी, शेतकरी कुटुंबातून अधिकारी झालेले अनेक जण असतात, पण त्यांच्या सामान्य माणसांच्याप्रती संवेदना किती तीव्र आणि किती बोथट असतात, याचा अनुभव अनेकांनी घेतलेला आहे. मात्र लेखक पर्यायाने नायक हा विचार व भूमिकेशी बांधील आहे. लेखकाने प्रस्तुत कादंबरी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे या सत्यशोधकी महात्म्यास अर्पण केली आहे. शिवाय त्यांचा ‘...बळीराजा उभा राहील, तरच स्वराज्याची आशा’, हा विचारही उद्धृत केला आहे.
या पलीकडे जाऊन फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांशी असलेली बांधीलकी, त्यांच्या समाज परिवर्तनानंतर बहुजन समाजाकडून असलेल्या अपेक्षा आणि वर्तमान वास्तव, अशी चिकित्सा लेखक करतो, तेव्हा त्याची घुसमट होते.
अल्पभूधारक कोरडवाहू शेतकरी सोमाजी शेळके यांचा नवनाथ हा मुलगा. तो ‘विद्यार्थिदशेपासूनच चळवळीत काम करायचा. रात्रीबेरात्री जागून चळवळीच्या घोषणांनी त्यानं चुना आणि गेरूनं कितीतरी भिंती रंगवलेल्या. मोर्चे काढले विद्याथ्र्यांच्या हक्कासाठी, अधिवेशनं भरवली. मोठमोठ्या विचारवंतांशी बौद्धिक वाद केले.’ त्यामुळे त्याची वैचारिक बैठक पक्की आहे. तथागत गौतम बुद्ध, कबीर, तुकाराम, छत्रपती शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर, महर्षी शिंदे, गाडगेबाबा, यशवंतराव चव्हाण आदींच्या विचारांनी त्याचे भरण-पोषण झालेले आहे. सामान्य कुटुंबातील मुलं सरकारी अधिकारी झाले की बेगडी होतात. ‘बहुतेकांना ज्ञानाचं महत्त्व वगैरे वाटेनासं होतं. एकप्रकारचा बथ्थडपणा येत जातो हाडामासात.’ (पृ. ४०). पण नवनाथ शेळके, अनिल ठाकरेसारखे अधिकारी त्याला अपवाद असतात. त्यांचा प्रयत्न हा आपल्यापरीने व्यवस्था बदलण्याचा असतो. मात्र तसे शक्य होत नाही. त्यांनाही ‘या’ व्यवस्थेचा भाग व्हावे लागते.
सरकारी कार्यालये ही जनतेच्या मालकीची असूनही कर्तव्यदक्ष अधिकार्यांचा वेळ हा सामान्य जनतेचे प्रश्न सोडवणे, त्यांची सेवा करणे यामध्ये जाण्याऐवजी सत्ताधीश राजकारण्यांची मर्जी सांभाळण्यातच जाते. यामुळे नवनाथची घुसमट होते. ‘आपल्याला मिळणारा पगार हा त्यांना खुश करण्यासाठी मिळतो का’ असा त्याला प्रश्न पडतो. सरकारी कार्यालयांमध्ये राजकारण्यांचे वाढते प्रस्थ, भ्रष्ट यंत्रणा, शेतकरी-कष्टकर्यांचे होणारे शोषण, मंत्र्यांची अनैतिकता, पत्रकारितेत नैतिकतेचा अभाव, अशा अनेक प्रवाही वृत्तींमुळे नवनाथ पुरता खचून जातो. सर्व काही उघड्या डोळ्यांनी पाहत उत्खनन करतो. त्यामुळे सहकारी कार्यक्षेत्राबाहेर पाझरत गेलेले विष निदर्शनास येते.
एका कर्तव्यदक्ष अधिकार्याचा जिथे जिथे वावर होतो, तेथील सूक्ष्म पदर या कादंबरीतून उकलत जातात. अगदी सहकाराशिवाय राजकारण, भ्रष्ट प्रशासन आणि सर्वच व्यवस्था ज्या फक्त सामान्यांच्या कैवारी म्हणून वावरतात, त्यांचा चेहरादेखील समोर येतो. स्वातंत्र्योत्तर काळात विशेषत: अलीकडच्या काळात जातवास्तवाने धारण केलेले टोकदार रूपही चिंतेचा विषय आहे. सर्व पुरोगामी सुधारकांनी बहुजन समाजात शिक्षणामुळे या समाजात बदल होईल. अभिजनांचे वर्चस्व संपून बहुजन समाजाच्याकडे सत्तासूत्र आल्यामुळे अमूलाग्र समाज परिवर्तन होईल, ही त्यांची अपेक्षा होती; पण बहुजन समाजातच संघर्ष निर्माण झाला. मराठी विरुद्ध दलित विरुद्ध ओबीसी या वादामुळे संपूर्ण बहुजन समाजाचे नुकसान झाले, होत आहे.
‘बहुजनांना काळाची पावलं कधीच नीट ओळखता आली नाहीत. मराठे, दलितांचा बिनडोकपणा मध्ययुगापासून आजतागायत कायम आहे. निदान इंग्रज आल्यामुळं इथं लोकशाही तरी आली... इंग्रज आले नसते तर शनिवारवाड्याचं वैभव आणखी प्रचंड वाढलं असतं. जे काही चांगलं घडलं ते फुले, शाहू, गांधी, आंबेडकरांमुळं, पण आपले लोक त्यांचाही उपयोग एखाद्या पत्रावळीसारखा करतात.’ (पृ. ४०).
हे बहुजनांचे वास्तव लेखक परखडपणे मांडतो. सर्वांनीच आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आल्याचे म्हणतो. शिवाय त्या-त्या समाजाच्या महापुरुषांच्या विचारांनी तोलून पाहण्याची गरजही व्यक्त करतो. यातच समकालीन समाजाची दशा आणि दिशा स्पष्ट होते.
ही केवळ कादंबरी नाही, तर विचारमंथनाचा सुंदर दस्तऐवजही आहे. येथे लेखकाचे विविधांगी चिंतन येते. या चिंतनाला भूमिका, वाचन, निष्ठा व ससंदर्भांची जोड आहे. खाजगी संपत्ती आणि भ्रष्ट माणसांच्या संदर्भात चिंतन – ‘खाजगी संपत्तीच्या उदयाचा एक सिद्धांत राज्यशास्त्रात सांगितलाय. एका माणसानं खूप आदिम काळी हातात मोठी काठी घेऊन आपल्या भोवती एक वर्तुळाकार रेघ मारली आणि त्यानं जाहीर केलं की, ही जागा माझी आहे. असं म्हणणं ही जगातल्या कौर्याची सुरुवात मानता येईल. माझ्या जागेत, माझ्या हितसंबंधात आडवं येणार्यांना मी खपवून घेणार नाही. माझा स्वार्थ हाच माझा विवेक, तेच माझं अध्यात्म आणि धर्म.’ (पृ. ३८).
किंवा यशवंतराव चव्हाणसाहेब नेहमी म्हणत की, ‘राजकारण्यांनी नाही म्हणायला आणि अधिकार्यांनी हो म्हणायला शिकले तरच विकास शक्य आहे; पण वास्तव स्थिती मात्र याउलट आहे. अधिकारी हे जनतेचे सेवक असताना ते कायम जनतेपासून अंतर ठेवून असतात.’ याविषयी नवनाथ म्हणतो, ‘जनता आणि प्रशासन यांचं एक विशिष्ट अंतर कायम राखता आलं पाहिजे. हा एक प्रचलित व्यावहारिक सिद्धांत. अधिकार्यांनी किमान मस्तीखोर म्हणजे माजलेलं असलं पाह्यजे... त्यामुळं बहुतेक अधिकारी सर्वसामान्य माणसांबद्दल तुच्छताभाव जोपासताना दिसतात. हे जे काही अधिकारीपण आहे ते कुठल्याही स्तरावरलं असू शकतं. यातूनच प्रशासकीय खात्यातला एक नवा मध्यमवर्ग, मध्यम आणि उच्चभ्रू, अति उच्च पातळीवर तयार झाला. त्यातून एक प्रकारची नवी जात, वर्गव्यवस्था आकाराला आली. फुले, आंबेडकरांनी जाती आणि पाखंडी धर्मव्यवस्थेविरोधात संघर्ष उभा केला. प्रशासनाने जी एक भयाण स्वरूपाची व्यवस्था सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावर उभी केली तिचं काय करायचं’. (पृ. १८५).
टोकदार जातीय अस्मितांनी समाजाची विण झिरझिर होत चालली आहे. जातीय द्वेष, जातींचा स्वार्थासाठी उपयोग हे भयंकर वास्तव लेखक मांडतो. ‘आपण जातीनं मराठा आहोत. त्यामुळं जातीयवादी नसतानासुद्धा आपल्याला जातीयवादी ठरवलं जाणार. जमेल तसा त्याचा सूड घेतला जाणार. दलितांना निदान अॅट्रॉसिटीची एखादी का होईना ढाल आहे. मराठा म्हणून आपण जन्माला आलो, पण सत्ताधारी मराठ्यांनी तर कधी शिकताना, नोकरी लागताना आणि लागल्यावरही कधी आधार दिला नाही. पण मराठा असण्याचे तोटे मात्र आपण भोगतोय कायम.’ (पृ. १९०).
नवनाथची ही व्यथा महाराष्ट्रातील तमाम मराठा समुदायाची व्यथा आहे. नव्हे तर बहुसंख्य असणार्या जातसमूहांचे हे वास्तव आहे. प्रत्येकाच्या मनात असलेल्या जातीय भावनेने जातजाणीव करून दिली जाते. या घटना समाजवादी विचारांच्या नवनाथला जिव्हारी लागतात. विविध जात समुदायांनी वाटून घेतलेल्या महापुरुषांच्या विचारांनी त्या-त्या ज्ञातीला तोलून पाहावं असेही तो म्हणतो.
विशेषत: मराठा समाजाने आत्मपरीक्षण करावे याप्रकारचे झणझणीत अंजन तो घालतो. ‘जे काही चांगलं घडलं ते फुले, शाहू, गांधी, आंबेडकरांमुळं पण आपले लोक त्यांचाही उपयोग पत्रावळीसारखा करतात. आंबेडकरवादाची मांडणी बरीच ऑथेंटिकपणे झाली आहे, तशी शिववादाचीही करता आली असती. शिवाजीराजांची ध्येय-धोरणं समजावून घ्यायला थोडी का होईना साधनं उपलब्ध आहेत. शिववादाच्या कसोटीवर आजच्या मराठ्यांना तोलून पहा. कशी वाट लागते.’ किंवा ‘आपली एकूण सामाजिक-राजकीय नैतिकता पाह्यली तर शिवाजी राजांचा फोटोही आपल्या घरात लावण्याचा आणि त्यांच्या डोळ्यात डोळे भिडवून पाहण्याचा आपला अधिकार नाही.’ (पृ. २१८).
सर्वधर्मसमभाव, समाजवादी समाजरचना, विविधतेत एकता असे ‘भारतीयत्व’ असताना समकालीन समाजाला असंवैधानिक विचारांनी पोखरून टाकले आहे. स्वातंत्र्यप्राप्ती, शिक्षणाचा वाढता प्रचार-प्रसार, विचारांचे व माध्यमांचे वाडीवस्त्यांपर्यंत वाढलेले जाळे, जागतिकीकरणात वैश्विक खेडे हे चित्र एकीकडे आणि दुसरीकडे प्रत्येकांमध्ये वृद्धिंगत होत चाललेल्या स्वजातीय जाणिवा.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘शहराकडे चला’ असे म्हणाले होते; पण आता शहरातही उलट चित्र निर्माण झाले आहे. शहरातही जातीनिहाय वसाहती वाढल्या आहेत, धर्म-जातीनुसार संस्था अस्तित्वात येऊन नव्या संस्थानिकांचे गड निर्माण झाले आहेत. यातून शोषणाचे नवे मार्ग तयार झाले. आज देशात एक टक्के श्रीमंतांकडे ७३ टक्के संपत्ती एकवटलेली आहे. हे त्याचेच द्योतक आहे. नवी भांडवली व्यवस्था अस्तित्वात आली आहे. या व्यवस्थेत सरकारी, निमसरकारी, सहकारी तत्त्व मोडीत निघत आहेत. याचा थेट परिणाम हा सामान्य माणूस, शेतकरी, कष्टकरी यांच्यावर होत आहे. ही सगळी दीर्घ मांडणी अंगावर येते. अशा स्थितीत कादंबरी रूक्ष होण्याची शक्यता असते, पण देशमुख यांच्या काव्यमय भाषेमुळे ती प्रवाही राहते. काव्यमयता, प्रतिमायुक्त भाषा व उपमांची केलेली पेरणी कादंबरीत माधुर्य निर्माण करते.
उदा. चोंडेकर आला आन त्यानं बाईच्या निरीला हात घालावा तसा ह्या जागेला घातला’, ‘प्रशासकीयदृष्ट्या साईड पोस्ट म्हणजे एक प्रकारचं भटके विमुक्तपणच’, ‘एक होती मंत्र्याची बायको, धर्मपत्नी. बाकी अधर्मपत्नी अनेक’, ‘बियरचा ग्लास भस्कन भरला की फेसाळतो तसे फेसाळलेले रस्ते’, ‘आपल्या जमिनीचा तुकडा खिशात सांभाळावा, तसा त्याने सातबाराचा जुना कागद आजही सांभाळला आहे’, ‘दु:ख निवारणाचा भ्रम निर्माण करणारी लोकशाही’, ‘नोकरशाही म्हणजे आपल्या मायलाच झवणारी एक जात हाये’, ‘प्रशासन म्हणजे गजानन वाटवे, अरुण दाते, कृष्णा कल्ले, सुधीर फडके किंवा सुमन कल्याणपूरनं गायलेलं एखादं भावगीत नाही’ इत्यादी.
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
थोडक्यात, ‘पिढीजात’ ही सहकार क्षेत्राबरोबरच भारतीय शासन-प्रशासन व्यवस्थेचा चेहरा मांडत ग्रामविकास, शिक्षण, पोलीस प्रशासन, राज्यकर्ते, कार्यकर्ते, शेतकरी, कामगार, शेतकरी संघटना, जातवास्तव, बहुजन समाजाच्या नेतृत्वाकडून होणारा अपेक्षाभंग, राजकारणातील नैतिक मूल्यांचा र्हास, माणसांचे बेगडीपण, बुद्धिजीवी वर्गाचे अध:पतन प्रभावीपणे मांडते. समाजातील एका क्षेत्राचे सूक्ष्म पदर ती उकलत नेते, तेव्हा संपूर्ण समाजव्यवस्थाच केंद्रस्थानी येते. हा प्रश्न केवळ सहकार, शासन, प्रशासन वा शेतकरी-कामगारांपुरता मर्यादित राहत नाही, तो व्यापक रूप धारण करतो. सावकारशाही, नामांतर चळवळ, नक्षलवाद, आदिवासींचे जीवन, शेतकरी संघटना, शेतकर्यांची स्थिती, कामगारांचे उपोषण, माहिती अधिकार, प्रशासन, वारकरी संप्रदायातील महाराज, मंत्रालय, आमदार निवास, शायनिंग इंडिया, विद्यापीठ, विद्यापीठातील विद्यार्थी चळवळ, दुष्काळ, महापुरुषांचा विचार, नैतिकता असलेले पूर्वसूरी राज्यकर्ते, अशा अनेकविध विषयांना ही कादंबरी हात घालते.
विशेष म्हणजे, कादंबरीत आलेले रेल्वेतील हिजड्यांच्या प्रसंगाचे रूपक समकालीन समाज व्यवस्थेचे विच्छेदन करते. कादंबरीचा अवकाश खूप मोठा असल्याने पात्रे आपल्याला वेढून असल्याचा प्रत्यय येतो. राजकीय वर्चस्व/सत्तासंघर्ष, नैतिक अध:पतन, शोषणाचे अनेकविध कंगोरे समोर येतात. एका अर्थाने राजसत्तेनंतर यत्र-तत्र-सर्वत्र व्यापून असलेल्या प्रशासकीय सत्तेचा पंचनामाच म्हणजे ‘पिढीजात’ होय.
.................................................................................................................................................................
हेही पहा\वाचा : ‘पिढीजात’ आत्मचरित्रात्मक कादंबरी वाटण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही! - श्रीकांत देशमुख
.................................................................................................................................................................
‘पिढीजात’ – श्रीकांत देशमुख
राजहंस प्रकाशन, पुणे
पाने – ६१२
मूल्य – ६०० रुपये.
(अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे वार्षिक ‘अक्षरयात्रा (२०२१-२०२२)’मधून साभार)
.................................................................................................................................................................
लेखक डॉ. कैलास अंभुरे औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक आहेत.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment
Sharad Thakar
Sat , 28 May 2022
पिढीजात मुळातून वाचायला भाग पाडणार समीक्षण