अजूनकाही
जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील प्राध्यापक प्रा. शरद बाविस्कर यांचं ‘भुरा’ हे आत्मकथन नुकतंच प्रकाशित झालं आहे. ‘दहावीचा निकाल लागणार होता…’ या ओळीपासून सुरू होऊन ‘झिजीन मराणं, पण थिजीन नही मराणं!’ या ओळीनं या आत्मकथनाचा शेवट होतो. लेखकाच्या आईच्या तत्त्वज्ञानानुसार आयुष्यात झिजून मरावं, पण थिजून मरू नये. झिजत झिजत जगता येतं आणि ते जगणं माणसांतील जिद्द वेळोवेळी दाखवत असतं, म्हणून झगडत राहावं. त्यामुळे हा फक्त जीवन जगण्याचा प्रवास नाही, तर मानवी जगण्यातील चढ-उतारांच्या खोली-रूंदीचं तत्त्वज्ञान आहे. परिणामी हे आत्मकथन फक्त घटना व प्रसंग मांडून पुढे जात नाही, तर वाचकाला तर्क वापरून तथ्यांचा विचार करण्यास भाग पाडतं. यातून छोट्या छोट्या प्रसंगांतून मानवी नात्यातील आणि समाजातील दांभिकता, खोटारडेपणा, प्रामाणिकपणा, प्रेम, माया, आपुलकी आणि निष्ठूरताही परखडपणे पुढे येते.
लेखकाला दहावीत नापास झाल्यामुळे निराश वाटू लागतं; आयुष्यातील सर्व संपलं आहे, जगण्यात काहीच तथ्य नाही असं वाटू लागतं. आपण काही तरी चुकलो आहोत आणि पुढे आयुष्यात काहीच उरलेलं नाही, ही भावना त्याच्या मनात तयार होते. त्यामुळे मानसिक ताण येतो. त्या दरम्यान पाचवी शिकलेली लेखकाची आई जे सांगते, ते खूप महत्त्वाचं आहे- “लोकांना खूप घाण सवय आहे. ते काहीही बोलतात. मनाला लावून घेऊ नकोस. हसणारांना हासू दे. सगळं ठिक होईल. देव काय एका जन्मात म्हातारा होत नाय. पुढल्या वर्षी परीक्षा दे.” असं समजावून सांगून जेवायला घालते. कारण सकाळपासून उपाशीपोटी रडून रडून लेखकाचा जीव थकून गेलेला असतो.
..................................................................................................................................................................
.................................................................................................................................................................
आज लेखक जगभरातील शिक्षण व्यवस्था पाहिल्यानंतर म्हणतो, “जगभरातील शहरातील शालेय शिक्षणात कमालीची औपचारिकता आणि गांभीर्य दिसतं, तेवढं आपल्याकडील शाळेत नाही. शालेय शिक्षण म्हणजे इतर कामांसोबत, परिस्थितीनुसार जसा वेळ मिळेल आणि साधनं मिळतील तसं आणि जिथपर्यंत झेपेल तिथंपर्यंत शिक्षण घेणं. त्यामुळे दहावी-बारावीनंतर काही अपवाद वगळता जवळपास सगळेच शिक्षणाबाहेर फेकले जात आहेत.”
अशा कुचकामी शिक्षणामुळे ग्रामीण भागातील मुला-मुलींमध्ये स्व:विषयी भयंकर न्यूनगंड निर्माण होत आहे. लेखक अत्यंत टोकाच्या वेळी निघून जाण्याचा प्रयत्न करून विचार करू लागतो. त्यातून पुढे आलेला विचार म्हणजे “जीवनात कितीही निरर्थकता वाटली तरी ‘निघून’ जाता कामा नये. जीवनातील निरर्थकता फक्त विचारी लोकांना कळते आणि जीवनाला नवीन अर्थसुद्धा फक्त विचारी लोकच देऊ शकतात, म्हणून मध्येच ‘निघून’ जाणं हा पर्याय असूच शकत नाही.”
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून इंग्लंड, इटली व फ्रान्ससारख्या देशांत राहून, शिक्षण घेतल्यानंतर लेखक शिक्षणाची व्याख्या करताना म्हणतो, “जर का ग्रामीण भागातील पोरं-पोरी मागे पडत असतील, तर त्यासाठी बऱ्याच दृष्टीने आपली विषमतावादी व्यवस्था जबाबदार आहे. ग्रामीण भागातील तकलादू शिक्षण तर नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांना निकामी करतं, म्हणून वाटतं की, ग्रामीण भागातील मुला-मुलींना दयादृष्टीची आणि मेहेरबानीची नव्हे, तर समान संधीची गरज आहे.
खरं तर सगळ्यांनाच जीवनातील निरर्थकतेचा अनुभव कधीतरी येत असतो; पण ज्यांच्या वाटेला सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणामुळे नरकासारखं जीवन वाढून ठेवलेलं असतं, त्यांना जीवनातील निरर्थकता प्रखरतेने जाणवते.” अशांना फक्त चालत राहिलं पाहिजे.
दहावीत नापास झाल्यानंतर लेखकाने कधी मिस्त्रीच्या हाताखाली, तर कधी दगडाच्या खाणीत, तर कधी क्रेन सर्व्हिसमध्ये अशा वेगवेगळ्या ठिकाणी काम करायला सुरुवात केली. त्यातून त्याला जाणवलं की, मालक आणि नोकर यांच्यात एक अलिखित करार असतो, ज्याचा संबंध श्रम आणि भांडवल या गोष्टींपलीकडे जातो. मालक नेहमी शारीरिक श्रमाबरोबर नोकराची मानसिक गुलामगिरीसुद्धा गृहीत धरत असतो. त्या दृष्टीने लेखकाने मानसिक गुलामगिरी नाकारली आहे. त्यामुळेच त्याला मानवाच्या जगण्याच्या तत्त्वज्ञानाला साद घालता आली. पुढे लेखक ऑक्टोबरच्या परीक्षेत पास होऊन अकरावी-बारावी पूर्ण करतो. आपल्याकडे कला शाखेला, त्यातही तत्त्वज्ञान या विषयाला तेवढं महत्त्व नाही, जेवढं युरोप खंडात आहे. त्यामुळे आपण चांगल्या तत्त्वज्ञानाला मुकतो, अशी खंत लेखक व्यक्त करतो.
लेखक क्रेन सर्व्हिसमध्ये काम करताना एका व्यक्तीने सर्वांसमोर सांगितलं की, ‘शरद म्हणजे फार तरबेज बुद्धी’. हे ऐकून लेखकाचं मन अंधार कोठडीतून बाहेर पडतं. कारण तिथून पुढे लेखकाचा शिक्षण घेण्याचा उत्साह वाढतो, आणि पुढच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा होतो. लेखक त्यांचं जीवन जगत असताना, जे निरीक्षण मांडतो ते खूप महत्त्वाचं आहे. कामाच्या ठिकाणी ज्या पद्धतीचं राजकारणं होतं, त्याबद्दल तो म्हणतो, “लोक समाजात वावरताना सतत एकमेकांवर कुरघोडी का करत असावीत किंवा कधी कारण नसताना एकमेकांवर अतोनात प्रेम का करत असावीत, या अशा गोष्टींचा अंतिम आधारसुद्धा काही तरी सामाजिक डार्क मॅटर असावा, जो सामाजिक विज्ञानांच्या हाती लागत नसावा.”
असा प्रवास करत लेखकाचं महाविद्यालयीन शिक्षण सुरू होतं. त्या वेळी त्यांना जाणवतं की, त्याच्या बरोबरीची मुलं पैसे कमवण्याच्या पाठीमगे लागली होती. ती म्हणायची की, ‘पैसा सब कुछ होता हैं मेरे यार’. तरीसुद्धा लेखकाने शिक्षणाची वाट सोडली नाही. खरं तर त्याची आर्थिक परिस्थिती इतर मित्रांपेक्षा कितीतरी पटीनं वाईट होती, पण त्याने मात्र शिक्षणाची वाट सोडली नाही. त्यामुळे तो म्हणतो, “कुठल्याही समाजाचं लोकशाहीकरण तेव्हाच शक्य आहे, जेव्हा लोकभाषांचा वापर सर्व स्तरांवर आणि सगळ्या ज्ञानशाखांसाठी केला जाईल. आणि शिक्षण हे सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण असेल.”
असं सारं सुरू असताना वडिलांची आत्महत्या, भावाचं दारू पिणं, गावातील घरातून बाहेर काढणं, शेतीसाठीची भांडणं, बहिणीच्या लग्नात फसवणूक होणं, हे कौटुंबिक आघात पचवत लेखक धडपड करत एम.ए. इंग्रजी करून जेएनयू विद्यापीठात दुसऱ्या मास्टर्ससाठी प्रवेश घेतो. तिथून फ्रेंच तत्त्वज्ञानात पदवी मिळवतो. पुढे फ्रान्समध्ये जाऊन तिसरी मास्टर्स करतो. पुढे इटली आणि इंग्लंडमध्येही मास्टर्स करतो. असं पाच मास्टर्स पूर्ण करून पी.एचडी. करतो आणि जेएनयूमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरीला लागतो.
या दरम्यान लेखकाची मानसिक, शारिरीक, सामाजिक, सांस्कृतिक, भाषिक, तात्त्विक घुसळण होते. कारण त्या जगण्यातील एकेक प्रसंग मानसिक धक्का तर देतातच, पण विचारही करायला लावतात.
लेखकाच्या वडिलांचा आत्महत्येचा प्रसंग वाचल्यानंतर प्रचंड अस्वस्था येते. लेखक म्हणतो, “वडील गावात बऱ्यापैकी बदनाम होते. मला वाटतं की, संकीर्ण ग्रामीण मानसिकतेत जग फिरणारा आणि बाहेरचं ज्ञान सांगणारा मनुष्य बऱ्यापैकी मूर्ख ठरत असतो. जर त्याला सामाजिक आणि आर्थिक पाठबळ नसेल, तर त्याला सतत अपराधी ठरवून, त्याचा छळ केला जाण्याची शक्यता जास्तच आणि त्यातल्या त्यात जर तो दारू पिणारा असेल, तर त्याचा गुन्हा सिद्ध करण्याचीच गरज भासत नाही. या सगळ्या गोष्टी माझ्या वडिलांना लागू पडत. त्यामुळेच वडिलांचं जास्तच मानसिक खच्चीकरण झालं असावं. आज वाटतं की, वडील फार संवेदनशील होते, विचारी होते, पण असं निघून जाणं काही पर्याय नव्हता. निघून जाऊन असा अन्याय करायला नको होता.”
अशा या कौटुंबिक वादळामुळे लेखकाला जीवनच निरर्थक वाटतं. जेव्हा जीवनातील निरर्थकता आपल्याकडे टक लावून पाहते, ते क्षण सगळ्यात जास्त घातक आणि निर्णायकसुद्धा असतात. त्यामुळे जीवनात यश मिळवणं आणि यशस्वी जीवन जगणं, यातील फरक जरी सूक्ष्म असला तरी तत्त्वज्ञानात हा फरक महत्त्वाचा समजला जातो. ग्रीक परंपरेतील युलिसिस दैवी चिरतारुण्याला नकार देऊन मायदेशी इथाकाला परतून, संघर्षांनी आणि वेदनांनी भरलेल्या आयुष्याची निवड करून, याच सूक्ष्म फरकाला अधोरेखित करतो.
लेखकाचा जेएनयूमध्ये नोकरी करत असतानाचा वैचारिक व सांस्कृतिक संघर्ष, तिथल्या प्राध्यापकांची वागणूक, खाजगी विद्यापीठातील अनुभव आणि त्यावर केलेलं भाष्य, लेखकाची प्रामाणिकता दाखवून देतं. ज्यांच्या घरात शिक्षणाचा वारसा नसतो, अशा मुला-मुलींनी शिक्षण कितीही गांभीर्यानं घेतलं तरी आजूबाजूचा समाज त्यांची जास्त दखल घ्यायला तयार नसतो. त्याच्या अगदी उलट म्हणजे ज्यांच्या घरात लहानपणापासून शिक्षणासाठी पूरक वातावरण असतं, त्यांनी कितीही शिक्षण- शिक्षण खेळलं तरी त्यांची पावलोपावली दखल घेऊन कौतुक केलं जातं.
लेखकाने जेएनयूमध्ये प्राध्यापक म्हणून काम करतानाच्या अनुभवाबद्दल आणि २०१४ नंतर बदलत गेलेल्या जेएनयूबद्दल मांडलेली मतं, वाचल्यावर हे सगळं येणाऱ्या पिढ्यांचं शिक्षण हिसकावून घेत आहे, असं वाटत राहतं. विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन आणि त्यांच्यावर झालेला हल्ला, याची लेखकानं बारकाईनं केलेली चिकित्सा आपल्याला विचार करायला भाग पाडते. वाटायला लागतं की, हेच शिक्षणाचं भविष्य असू शकेल?
..................................................................................................................................................................
'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...
................................................................................................................................................................
लेखक एवढ्यावरच न थांबता आजच्या प्रखर सामाजिक रचनेच्या वास्तवाचं परखड वास्तव तीव्रतेनं मांडत जातो. मानवी जगण्याचं मूळ तत्त्वज्ञान काय आहे? तो कशासाठी जगतो? कुठून आला आहे? त्याने कोणती व्यवस्था निर्माण केली आहे? आणि कशी केली आहे? त्या व्यवस्थेत कुणाला फायदा मिळतो? कोण बाहेर थांबतं? या साठी भाषा कशी काम करते? शब्द कसे वापरले जातात? शब्दांचं शास्त्र कसं असतं? भाषेमुळे माणसं कशी प्रेरित होतात? शब्दांना अर्थ व भावना कशा प्राप्त होतात? सामाजिक संकेत काय असतात? नैसर्गिक प्रवाह कसे असतात? फ्रान्स, इटली व इंग्लंड येथील सामाजिक शिष्टाचार कसे आहेत? त्यांची शिक्षणाविषयीची धारणा काय आहे? शिक्षणाला आणि सांस्कृतिक जडणघडणीला माणसांच्या आयुष्यात किती महत्त्व पाहिजे? समाजवाद, मार्क्सवाद, अतिउजवे, अतिडावे, उजवे-डावे, साम्यवाद, आंबेडकरवादी आणि असे अनेक विचार विद्यार्थी म्हणून कसे समजावून घेतले पाहिजेत? आपली नैतिकता कशाच्या आधारावर ठरवली पाहिजे? माणूस म्हणून जगताना काय महत्त्वाचं आहे? असंख्य निरर्थकतेनं भरलेल्या क्षणांना सामोरं जाताना आतापर्यंत हार मानून जीवनापुढे शरणागती का पत्करली नसावी? निरर्थकतेतूनसुद्धा काहीतरी अर्थ निर्माण करण्याची क्षमता कुठून येत असावी? या प्रतिकूल प्रवासात सतत चालत राहण्याची इच्छाशक्ती कुठून येत असावी? अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं या आत्मकथनातून आपल्या समोर येतात.
‘झिजीन मराणं, पण थिजीन नही मराणं!’ या एका ओळीच्या तत्त्वज्ञानानं प्रेरित होऊन ‘भुरा’चा प्रा. शरद बाविस्कर कसा होतो, हे या आत्मकथनातून जाणवतं. हा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. हे आत्मकथन मराठी साहित्यात एकूणच तात्त्विक व सांस्कृतिक अभ्यास करण्यासाठीही महत्त्वाचं आहे. मानवी मूल्यांची उच्चस्तरीय बैठक असणारी ही साहित्यकृती आहे.
‘भुरा’ – शरद बाविस्कर,
लोकवाङ्मय गृह, मुंबई
मूल्य – ५०० रुपये.
.................................................................................................................................................................
या पुस्तकातील एका प्रकरणाचा संपादित अंश वाचण्यासाठी पहा -
खरं तर आपण जेव्हा अशा बिकट परिस्थितीतून जात असतो, तेव्हा फार तीव्रतेने निश्चय करत असतो
.................................................................................................................................................................
लेखक ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे इथं माध्यम व संज्ञापन अभ्यास विभागात पी.एचडी. स्कॉलर आहेत.
.................................................................................................................................................................
‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे.
..................................................................................................................................................................
वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.
‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -
© 2025 अक्षरनामा. All rights reserved Developed by Exobytes Solutions LLP.
Post Comment