‘विश्वामित्र सिण्ड्रोम’ : नव्वदच्या दशकात वयात आलेल्या पिढीचं मनोविश्व व्यापणाऱ्या पॉर्नच्या कांद्याचा उभा-आडवा छेद!
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
मकरंद जोशी
  • ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’
  • Wed , 06 April 2022
  • ग्रंथनामा शिफारस विश्वामित्र सिण्ड्रोम Vishwamitra Syndrome पंकज भोसले Pankaj Bhosle

नव्वदच्या दशकाला आरंभ झाला आणि जागतिकीकरण नावाच्या प्रक्रियेनं वेग घेतला. आंतरराष्ट्रीय स्तरापासून सुरुवात होऊन या प्रक्रियेनं आधी राष्ट्रीय, मग राज्य आणि मग चक्क शहर /गावपातळीपर्यंत आपला परिणाम (का हिसका?) दाखवला. आंतरराष्ट्रीय व्यापारापासून ते कृषी उत्पादनापर्यंत आणि कामगार संघटनांपासून ते किरकोळ विक्रेत्यांपर्यंत समाजाच्या विविध स्थरांवर खाजगीकरण- (आर्थिक) उदारीकरण- जागतिकीकरण (खाउजा) या प्रक्रियांचे उमटलेले पडसाद आणि त्यावर झडलेल्या चर्चा यांनी तो काळ भारलेला होता. मात्र आर्थिक-राजकीय परिणामांच्या चर्चांच्या या धुरळ्याखाली या जागतिकीकरणचा एक वेगळा परिणाम मात्र लपला (का लपवला?) गेला. हा परिणाम जितका उघडपणे दिसत होता, दृश्य होता; त्याहूनही अधिक प्रमाणात अदृश्य होता, कळून येत नव्हता. पण कळला नाही, दिसला नाही, म्हणून हा परिणाम झालाच नाही, असं मानणं ही फार मोठी आत्मवंचना ठरेल.

केवळ ठाणे-कल्याण-डोंबिवली-घाटकोपर-कुर्ला अशा शहरांमध्येच नाही, तर महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील गावांमध्येही हा परिणाम झिरपला, कदाचित शहरापेक्षा जरा सौम्यपणे आणि कमी आवेगाने असेल, पण झिरपला हे नक्की. जणू एक त्सुनामीसारखी प्रचंड लाट सगळ्या समाजाला कवेत घेऊ पाहात होती. आणि गंमत म्हणजे (खरं तर गंभीरपणे घ्यायची बाब म्हणजे) केवळ जी वयात येत होती/आली होती, ती एकच पिढी नाही, तर तिच्या मागची पिढीसुद्धा या लाटेमध्ये गटांगळ्या खात होती. ही लाट होती ‘पॉर्न’ची.

याला मराठीत खरं तर नेमका प्रतिशब्द नाही - अश्लील साहित्य/चित्रे/चित्रफिती म्हणजे पॉर्न. (असं का? हा स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे!) तर जागतिकीरणामुळे (म्हणजे असं निदान सांगितलं तरी गेलं!) भारतातील ललनांची निवड विश्वसुंदरी पदावर झाली आणि रंगरूप उजळणाऱ्या क्रिम्स-पावडरी तत्सम उत्पादनांचा लोंढा बाजारात आला, ज्याचं गिऱ्हाइक या सौंदर्य स्पर्धांच्या निर्णयाने आधीच तयार केलेलं होतं.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

फॅशनच्या दुनियेचे दरवाजे जसे तेव्हा उघडले गेले, त्याचबरोबर इंटरनेट नावाच्या जादुई खिडकीची कवाड किलकिली व्हायला सुरुवात झाली होती आणि पँडोराच्या बॉक्ससारखं या खिडकीतून आधी चोरून, मग राजरोसपणे पॉर्नची गंगा वाहायला लागली. मात्र एकूणच लैंगिक व्यवहार मग तो कितीही अधिकृत (म्हणजे समाजमान्यता मिळालेल्या जोडप्यांमधला - अर्थात नवरा- बायकोतला!) असला तरीही आपल्याकडे तो उघडपणे बोलण्याचा, सांगण्याचा विषय नव्हताच. त्यामुळे या पॉर्नगंगेबद्दल आळीमिळी-गुपचिळी असाच पवित्रा होता.

वयात येणाऱ्या मुलींना मासिक पाळी सुरू झाल्यावर कदाचित घरातल्या मोठ्या बायकांकडून शरीरात होणारे बदल, त्याचे परिणाम आणि त्याची आवश्यकता याबाबत काही तुटक माहिती दिली जात असावी, परंतु पौंगंडावस्थेतील मुलांना त्यांच्या शरीरावर फुलणारे रोमवन आणि मनात उठणारी वादळे, याबाबत नेमकं, शास्त्रीय मार्गदर्शन मिळण्याची काही सोय आपल्या समाजारचनेत अस्तित्वात नव्हती- नाही. त्यामुळे समवयस्क किंवा जरा मोठ्या मित्रांकडून मिळणारे अर्धेकच्चे ज्ञान - जे त्यांनीही अशाच कुठल्यातरी अर्धपक्क्या सोर्सकडून मिळवलेलं असायचं, तेच ज्ञान पुढे प्रसारीत व्हायचं.

जोडीला  नव्वदीच्या पूर्वी वयात येणाऱ्या पिढीला आधार-आसरा होता, तो पिवळ्या पुस्तकांचा आणि ‘डेबोनिअर’, ‘प्लेबॉय’सारख्या मासिकांचा. इंटरनेटच्या आगमनामुळे कामक्रीडांच्या चित्रफिती सहजपणे बघायला उपलब्ध होऊ लागल्या आणि जणू शहराची पौगंडावस्था बहरात आली. मात्र जीवनाचे प्रतिबिंब दाखवण्यासाठी आणि जगण्याची स्पंदने वगैरे टिपण्यासाठी मशहूर असलेल्या मराठी साहित्याने मात्र शहराची ही बहरलेली (का बहकलेली!) पौगंडावस्था जणू नजरेआडच केली होती.

विसावे शतक सरत आले तरी साठच्या दशकातील चाळकऱ्यांमध्येच रमणाऱ्या मराठी वाचकांना नव्वदोत्तरीमधील आळीतले पॉर्नकरी जणू माहीतच नव्हते (खरंच?) हे काहीसं जाणीवपूर्वक दुर्लक्षिलेलं, कदाचित ‘हे’ कसं सांगायचं म्हणून झाकलेलं, किंवा आमच्याकडे नव्हतं बुवा असलं काही या टिपिकल वृत्तीने नाकारलेलं जग त्याच्या सगळ्या कोन्या-कंगोऱ्यांसहआणि रूप-विरूपासह ठाशीवपणे कथांमधून मांडण्याची कामगिरी बजावली आहे, पंकज भोसले याने.

रोहन प्रकाशनातर्फे पंकजचा ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झाला आहे. हा कथासंग्रह म्हणजे नव्वदच्या दशकात वयात आलेल्या पिढीचं मनोविश्व व्यापणाऱ्या पॉर्नच्या कांद्याचा जणू उभा-आडवा छेदच आहे.

पंकज भोसलेंच्या या कथा ठाण्यातील एका आळीत घडतात, मात्र ही आळी लेखकाने केवळ त्याच्या सोयीसाठी घेतलेली किंवा निर्माण केलेली आहे. या आळीऐवजी कल्याणमधील किंवा कुर्ल्यातील कोणत्याही आळीत, वाडीत, चाळीत या कथा घडू शकतात किंवा खरं तर घडल्याच असतील. कारण या कथा ठाण्यासारख्या झपाट्याने फुगणाऱ्या शहरातील नव्वदीच्या दशकातील पॉर्नग्रस्तांच्या कथा आहेत आणि असे पॉर्नग्रस्त तेव्हा शहरा-शहरंमध्ये, गावागावात होते. या कथांमध्ये वाचकांसमोर येतं, ते नाक्यावरच्या टपोरी पोरांचं असं एक जग आहे, जे आता नाक्यापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. पूर्वी नाक्यावर ज्या गोष्टी चविष्टपणे चघळल्या  जायच्या, त्याच टीव्ही, केबल आणि नंतर इंटरनेटमुळे घरात बसून बघण्याची सोय झाली आणि सगळ्या तरूण-प्रौढांना ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’ने ग्रासलं.

या विश्वामित्र सिण्ड्रोमच्या अनेक अवस्था लेखकाने आपल्या कथांमधून मांडल्या आहेत. या कथा जरी व्यक्तींच्या असल्या तरीही त्या त्याच वेळी समाजाच्या आहेत. लेखकाने ज्या व्यक्तीरेखा रंगवल्या आहेत त्या नमुन्यांसारख्या आहेत. लेखकाच्या या सॅम्पल्सवरून तत्कालीन समाजात पसरलेल्या विश्वामित्र सिण्ड्रोमची व्याप्ती आणि तीव्रता समजते. कोणत्याही आळीत किंवा नाक्यावर असतात, तशी या कथांमधली पोरं आहेत. वयात येताना होत असलेले शारीरीक-मानसिक बदल ते आपापल्या परीने झेलत असतात, उपभोगतही असतात. स्वतःच्या शरीरातील बदलांबरोबरच अवतीभवतीच्या स्त्रियांच्या देहाकडे त्यांचं लक्ष वेधलं गेलेलं असतं आणि आपण जे बघतोय - अर्थात स्त्रियांच्या देहाचे उभार\वळणं - ते त्यांना म्हणजे त्या स्त्रियांनाही आवडतंय, हे त्यांच्या चोरट्या प्रतिक्रियांवरून-पडसादांवरून लक्षात येत असलं तरीही उघडपणे मात्र या स्त्रिया याबाबत नापसंती का दाखवतात, हे या नव्याने जवान होऊ घातलेल्या पोरांना कळत नाहीये. त्यात एखादे नेमाडेकाका आपली शिंग मोडून या वासरांमध्ये घुसतात आणि मग नेमाडेकाकांच्या अनुभवी नजरेतून पोरं या सगळ्याकडे बघायला शिकतात.

हा सगळा प्रवास पंकज भोसलेंनी रंजकपणे मांडलेला असला तरी तो केवळ रंजनासाठी मांडलेला नाही. भोसलेंच्या कथा, त्यातल्या व्यक्तिरेखा सतत पॉर्नबद्दल, लैंगिक प्रेरणांबद्दल आणि काम व्यवहाराबद्दल बोलत असल्या तरीही या कथा काम-कथा नाहीत. या कथांचा उद्देश वाचकांची वासना चाळवणं नाही. या कथा नव्वदोत्तरीतलं एक समाज चित्र रेखाटतात जे अनेकांच्या परिचयाचं आहे, पण मराठी साहित्यात याआधी आलेलं नाही. त्यामुळे या कथा वाचताना भाऊ पाध्येंची आठवण होणं स्वाभाविक आहे. साठोत्तरी मराठी साहित्यात त्यांच्या ‘वासूनाका’ने प्रचंड खळबळ उडवली होती, कारण पोक्या आणि त्याच्या मित्रांची नाक्यावरची भंकस भाऊ पाध्येंनी जशीच्या तशी मराठी साहित्यात आणली.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

साहजिकच ‘वासूनाका’ची भाषा आणि आशय हा सोवळ्या मराठी वाचक-समीक्षकांसाठी फार मोठा धक्का ठरला. त्यानंतर सुमारे तीन दशकांनी पंकज भोसलेनं तसाच धक्का दिला आहे. मात्र मधल्या ३० वर्षांमध्ये मुंबई-ठाण्यासारख्या नगरांमधलं समाजजीवन इतकं बदलून गेलं आहे की, तेव्हा पोक्याचा अड्डा आणि त्यावरची भंकस फक्त नाक्यापुरतीच मर्यादित होती आणि तीही लालबाग-परळ सारख्या श्रमीक वस्तीच्या नाक्यापुरती. पण पंकज भोसलेंच्या ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’ने नाक्यावरून घरात - मग ते चाळीतलं असो वा टॉवरमधलं किंवा झोपडपट्टीतलं प्रवेश केलेला पाहायला मिळतो आणि तरीही त्याकडे कुणाचं लक्ष गेलेलं दिसत नाही.

पंकज भोसलेनं त्याच्या पौंगडावस्थेत पाहिलेलं, अनुभवलेलं, त्याला दिसलेलं आणि त्याने सोसलेलं जग या कथांमधून मांडलं आहे. हे जग एकाचवेळी क्रिस्पी-क्रंची आणि स्पायसी-सोअर आहे. इथे आजोबांच्या संग्रहातील १९६४ ते १९७८मधले ‘प्लेबॉय’चे अंक चवीने पाहणारा नातू जसा आहे, त्याचप्रमाणे मुलगा कॉलेजला गेल्यावर त्याच्या कॉम्प्युटरमधला पॉर्नसाठा शोधून बघणारा बापही आहे. आपल्याच बापाच्या कलेक्शनमधील पॉर्न बघणारी मुलगी आहे आणि बॉयफ्रेंड नसलेल्या मुलाकडे हक्काने बघायला पॉर्न क्लिप्स मागणारी मुलगीही आहे. सायबर कॅफेतील कामकथांपासून ते टिटवाळ्याच्या लॉजवरील चोरट्या शुटिंगपर्यंत नव्वदीच्या दशकातला सगळा कामव्यवहार या कथांमध्ये डोकावतो. एकापरीने त्या काळातील शहराची पौगंडावस्थाच या कथा मुखर करतात. ही अवस्था दाखवण्यासाठीच तर पंकजने या कथांमधून पॉर्नच्या कांद्याचे उभे-आडवे काप पेरले आहेत.

पंकजच्या या कथांचे बलस्थान म्हणजे त्यातील मध्यवर्ती स्त्री व्यक्तिरेखा. डॉली गाला, नक्षी नेमाडे, शेंगदाणा चिंकी, रेवती चाळके, फुलसुंदरी पटवा, लतिका बर्वे, सायली पाठक, नालंदा रवळेकर या ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या अष्ट नायिका रूढार्थाने नायिका नाहीतच. लेनिन नगर नावाच्या झोपडपट्टीत राहून आजूबाजूच्या टॉवर्स आणि बिल्डिंगमध्ये जेवण बनवण्यापासून ते धुणी-भांडी-लादीपर्यंतची काम करणारी आणि जिला सातवीपासून प्रपोज यायला लागले, अशी फुलसुंदरी पटवा काय किंवा लहानपणीच बिस्किट-चॉकलेट खाऊन वजन भीषण वाढलेली, ऐन तरुणपणीच ‘भोंगा’ झालेली नालंदा रवळेकर काय, असे नमुने अनेकांनी आपल्या अवतीभवती बघितले असतीलच, पण पंकज भोसले या सगळ्या नायिकांच्या माध्यमातून नव्वदीच्या दशकातील शहरातल्या आळीतील तरुण मुलींचा जणू उभा छेदच दाखवतो.

या मुलींवर टीव्ही, केबल, इंटरनेटच्या माध्यमातून पडलेला प्रभाव, पॉप म्युझिक आणि बॉलिवुड म्युझीकच्या लाटांवरचं त्यांचं तरंगण, त्यांचा फॅशन सेन्स(?), त्यांची मुलांकडे बघण्याची दृष्टी आणि त्यांना आलेलं स्वतःच्या शरीराचं भान, हे सगळं या कथांमधून कधी ठळकपणे, तर कधी अतिशय ‘सटल’पणे पंकज मांडतो. मोबाईलच्या व्यसनामुळे मोबाइलच्या दुकानात काम करणाऱ्याबरोबर लफडं करणारी चिंकी शेंगदाणे आणि पॉप स्टार शकिराची डाय हार्ड फॅन असलेली, लेस्बियन म्हणजे सॉफ्टकोअर पॉर्न असल्याचं मानणारी नक्षी नेमाडे असे नमुने पंकज ज्या तपशिलांसह उभे करतो, त्यामुळे वाचकांना त्यांच्या माहितीतले, पाहिलेले-ऐकलेले असे किस्से आठवल्याशिवाय राहत नाहीत.

पंकजच्या नायिका एका मर्यादित अर्थाने न-नायिका आहेत, त्यांचं आयुष्य एका टोकाच्या विरोधाभासामध्ये घुसळून निघालेलं आहे. एकीकडे घरातले ‘संस्कार’ करणारे वडीलधारे (जे पंकजच्या लिखाणात जराही दिसत नाहीत, पण तरीही ते आहेत!) आणि दुसरीकडे केबल-इंटरनेटच्या माध्यमातून जवळ आलेलं फॅशन, पॉर्न आणि झिंग आणणाऱ्या संगीताचं जग, या घुसळीतच त्यांना जाणीव झाली आहेत त्यांच्यातल्या बाईपणाची, त्यांच्या देहाच्या नव्या भूकांची आणि त्या देहाच्या नव्या ताकदीची. त्यामुळे या मुलींचं पंकजने उभं केलेलं जग एकाच वेळी चटपटीत-खमंग-कुरकुरीतही आहे. त्याच वेळी त्यात एक वेदना, अस्वस्थता, बेचैनीही मिसळलेली आहे.

पंकजच्या कथांमध्ये भेटणारे नायक अर्थातच या नायिकांना साजेसे आहेत. हे नायक काही सर्वगुणसंपन्न, साहसी, विवेकी, बुद्धीमान आणि धनाढ्य वगैरे नाहीत, कारण हे नायक ज्या काळात अवतरले, (बि)घडले, मोठे झाले तो काळच एका संक्रमणाच्या सांध्यावरचा काळ आहे. त्यामुळे पिनाक कुरकुरे, विनायक समीर अर्थात वि.स. खांडेकर, विक्रम शांताराम सकट उर्फ म्हातारा, कृष्णा रवळेकर, सुदीप वैराळे, कलगोंडा डावल हे सगळे पंकजचे सो कॉल्ड नायकदेखील त्याच्या नायिकांप्रमाणेच नायकाची पारंपरिक गुणवैशिष्ट्ये नसतानाही नायकाच्या भूमिकेत आहेत.

पोरींवर इम्प्रेशन मारण्यासाठी जीमला जाणं असो किंवा स्टाइलिशपणे गिटार खांद्याला अडकवून पॉप स्टार बनणं असो, ही पोरं जे काही करत होती, ते आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट ‘माल पटवणं’ हेच आहे, या भावनेनं करत होती. या पोरांची नाक्यावरच्या चावट गप्पांची गाडी सायबर कॅफेतल्या खुराड्यात बसून बघण्याच्या बी.पी.वरून मोबाइलवर क्लिप्स डाउनलोड करण्यापर्यंत ज्या वेगाने गेली, त्यामुळे त्यांना आलेली भोवंड पंकजच्या कथांमधून नेमकेपणानं व्यक्त होते. ही पोरं जगाच्या दृष्टीने ओवाळून टाकलेली, वाया गेलेली असतीलही कदाचित, पण नव्वदच्या दशकात एकूणच समाज जीवन ज्या गतीने, ज्या दिशेने आणि ज्या प्रकारे ढवळून निघालं होतं, त्या धामधुमीत नाक्यावरच्या पोरांकडे बघण्याचीसुद्धा फुरसद बाकीच्यांना असेल का, याचीच शंका येते. पण या पोरांचं त्यांचं त्यांचं असं एक विश्व होतं, या विश्वाचे सगळे कोपरे-कोने फक्त एकाच गोष्टीने व्यापलेले होते आणि ती होती ‘पॉर्न’.

मिसरुड आणि बरंच काही फुटलेल्या या पोरांना अवतीभवतीच्या ‘स्त्री’ नामक प्राण्याची एक वेगळीच ओळख पटू लागली होती. ही ओळख अधिक तपशिलात करून घेण्याचे त्यांचे अगदी आटोकाट  प्रयत्न सुरू होते. गच्चीवर वाळवणं घालायला येणाऱ्या प्रौढांपासून ते शाळेचा उंबरठाही न ओलांडलेल्या मुलींपर्यंत आपल्या अवतीभवती दिसणारे नमुने आणि सिडीवर, नेटवर पाहायला मिळत असलेल्या पॉर्नमधील नग, यांचा ताळमेळ घालण्याचा प्रयत्न ही पोरं करत होती. यातूनच मग पडद्यावरच्या पॉर्नपऱ्या आणि वास्तवात आसपास दिसणाऱ्या स्त्रिया, यांची सांगड घालण्याचा चाळा करताना ही पोरं पाहायला मिळतात.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

पंकजच्या कथांमधील पुरुष व्यक्तिरेखांमधून हा सगळा प्रवास अगदी ठसठशीतपणे समोर येतो. या कथांमधील आणखी काही व्यक्तिरेखांचा उल्लेख आवर्जून करायला हवा. त्यातली एक म्हणजे नेमाडेकाका (नेमाडे-खांडेकर या आडनावांचा खट्याळ वापर करून पंकजने त्याच्या वेगळ्या विनोदबुद्धीचा प्रत्यय दिला आहे). तर नेमाडेकाका म्हणजे पुन्हा एक नमुना आणि तो ही असा की, ज्याच्या वेगवेगळ्या आवृत्त्या प्रत्यक्षात पाहायला मिळतात. आपलं वय विसरून नाक्यावरच्या तरुण पोरांमध्ये मिसळणारे, त्यांना आपल्या अनुभवाच्या जोरावर बाईविषयीची अवांतर माहिती देणारे, बालगीतांची चावटगाणी बनवण्यापासून ते आळीतल्या मुलींच्या शरीरावर विशेष टिप्पणी करण्यापर्यंत तरुणांना मागे सारणारे नेमाडेकाका म्हणजे पॉर्नग्रस्त समाजातील एक टिपिकल नमुनाच. याबरोबरच आळीतल्या पामेला ॲन्डरसन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिसेस बामणे, वयात आलेल्या नातवालाही पदराखाली ठेवू पाहणाऱ्या सकट आजी, डॅशिंग फोटोग्राफर सबा, तुकाराम वॉचमन आणि तुकाराम कुत्रा, दिवसभर पतंगी उडवणारा मक्सूद, अशा अनेकांनी या कथा आणि त्यातील अनुभव जिवंत केले आहेत.   

याच काळात आर्थिक उदारीकरणामुळे असेल पण समाजातील दोन वर्गातील आर्थिक अंतर काही बाबतीत झपाट्याने कमी होतं गेलेलं पाहायला मिळालं. वस्ती आणि सोसायटीमधले लोक काही बाबतीत एकाच पातळीवर आले. फ्रीज, कॅसेट प्लेयर, रंगीत टीव्ही, केबलसारख्या पूर्वी फक्त सोसायटीची मिरास असलेल्या गोष्टी याच काळात लेनिननगरसारख्या नाल्यावर उभ्या राहिलेल्या वस्तीमध्ये सर्रास दिसू लागल्या. या सगळ्याचं चित्रण पंकजच्या कथांमध्ये वेधकपणं पाहायला मिळतं. दूरदर्शनवरच्या जाहिरातींमधून आडून आडून दिसणारा स्त्री देह, बॉलिवुडच्या दिग्दर्शकांनी सेन्सॉरच्या कचाट्यात न सापडता दाखवलेला स्त्री देह, आजूबाजूला कधी चोरून तर कधी थेटपणे पाहायला मिळणारा स्त्रीदेह याच काळात आधी नेटच्या पडद्यावरुन आणि मग रस्त्यावर ढिगाने विकल्या जाणाऱ्या पायरेटेड सिडीजमधून अधिक उघडपणे (का भडकपणे?) पाहायला मिळू लागला. सुरुवातीला या पॉर्नच्या लाटेवर कुतुहलाने, उत्सुकतेनं आणि अर्थातच आनंदाने उसळणाऱ्या अनेकांच्या या उत्सुकतेचं, आनंदाचं रुपांतर थोड्याच काळात सवयीचा भाग म्हणून हे सारं पाहण्यात झालं.

पंकजच्या कथेतील म्हातारा सांगतो, ‘बायांचं नागडेपण आता इतकं पाहिलंय की, सालं हिंदी सिनेमातील कपडे घातलेल्या हिरॉईनीच चड्डीला जास्ती त्रास देतात. तरी मी रात्री झोप येईस्तोवर एक-दोन नवे बीपी पाहातोच. यातली गंमत सांगू? पूर्वी मला हे नागडेपण स्ट्रॉन्ग करायचं, आता ते तितकसं महत्त्वाचं राहिलेलं नसल्यानं पूर्ण कपड्यातलं कुठलंही मादक शरीर मला पाहायला चालतं. मला पॉर्न पाहिल्याचं समाधान आता तंग कपडे घालणाऱ्या बायकाही देऊ शकतात. म्हणजे माझी किती मजा आहे बघ. सारं जगच माझ्यासाठी पॉर्न बनलंय’. हा म्हातारा जणू या पिढीचा प्रतिनिधी आहे.

पंकजच्या कथांच वैशिष्ट्य म्हणजे यातल्या बहुतेक कथांमध्ये संगीत - पॉप\ रॉक आणि हिंदी सिने संगीत, हे या कथांचा अंतस्राव बनून येतं. कथांमधल्या व्यक्तिरेखा, त्यांचं जग या सगळ्याला भरीवपणा देण्याचं काम हे संगीताचे संदर्भ देतात. लकी अली, युफोरिया, शान अशा भारतीय पॉप स्टार्सपासून ते ए.आर. रहमान, एम.एम. करीम अशा तेव्हा नव्यानेच हिंदी सिनेसंगीतात अवतरलेल्या संगीतकारांपर्यंत, विविध भारतीवरच्या ‘तराने नये-पुराने’पासून ते ‘भूले बिसरे गीत’पर्यंत नव्वदीच्या काळातलं संगीत पंकजच्या कथांचा अविभाज्य भाग बनून येतं. 

‘हिप्स डोण्ट लाय’ या कथेत तर नक्षी नेमाडेला शकिरा आवडते, हे सांगताना ज्या पद्धतीने अन्य पॉप स्टार सिंगर्सचा धावता आढावा पंकजने घेतला आहे, त्यामुळे या कथेला एक वेगळाच नॉस्तेल्जिया लाभला आहे. संगीताच्या संदर्भांबरोबरच त्या काळात नव्याने बोकाळू लागलेल्या नाक्या-नाक्यावरच्या चायनिजच्या गाड्या, आवडत्या गाण्यांच्या कॅसेट्स भरून घेणं, सायबर कॅफेत बसून नको ते उद्योग करणं, आळीत बोकाळलेलं आणि ओसरलेलं ‘मॅक्सी-पर्व’, न कळणाऱ्या पॉप गाण्यांवर सोसायटीच्या गॅदरिंगमध्ये डान्स करणं, अशा अनेक गोष्टींच्या उल्लेखाने, सहभागाने त्या काळाचं नेमकं चित्र समोर उभं राहातं.

‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधल्या कथा जरी सुट्या सुट्या असल्या तरी त्या एकाच काळाच्या, एकाच परिसरात घडणाऱ्या आणि त्यामुळे एक अंतर्गत दुवा असलेल्या कथा आहेत. साहजिकच या संग्रहातल्या एका कथेमधली पात्रे-व्यक्तिरेखा सहजपणे दुसऱ्या कथेत डोकावतात. कधी एखाद्या कथेत वातावरण निर्मितीसाठी येणारी व्यक्तिरेखा दुसऱ्या कथेत निवेदक म्हणून किंवा मध्यवर्ती व्यक्तिरेखा म्हणून समोर येते.

काही वेळा तर एका कथेत ओझरता उल्लेख आलेल्या घटनेचं साद्यंत वर्णनही दुसऱ्या कथेत वाचायला मिळतं. एकात एक गुंफलेल्या साखळीप्रमाणे आणि तरिही काही प्रमाणात स्वतंत्र असे या कथांचे वर्णन करता येईल. या कथांची रचनाही तितकीच अनोखी आहे. कदाचित समीक्षकी निकषांवर (!) या कथा म्हणजे कथा नव्हेतच, असेही म्हणता येईल, परंतु कथेच्या रूढ चौकटी तोडत पंकज जे सांगतो ती कथाच असते.

‘गर्लफ्रेंड एक्स्पिरिअन्स’, ‘रवळेकरची बहीण ‘पॉ’ आहे’, ‘शेरिल क्रो सारखी दिसणारी मुलगी’, ‘डावलच्या स्वप्नात पतंगी’सारख्या कथांची रचना खरोखरच बारकाईने अभ्यासावी अशीच आहे. काहीशा सैल पद्धतीने, कधी जरा जास्तच ऐसपैस पसरत कधी जाणीवपूर्वक मूळ कथानक किंवा व्यक्तिरेखेपासून वाचकांना भरकटवत नेत पंकज जी कथा सांगतो, तिची तुलना ॲबस्ट्रॅक्ट चित्राशी किंवा शास्त्रीय संगीतातील तराण्यांशी होऊ शकते. दोन्ही कलांमध्ये ज्या प्रमाणे कलाकाराला काय अभिप्रेत आहे, त्यापेक्षा बघणाऱ्याला-ऐकणाऱ्याला काय ऐकू येतंय- दिसतंय याला महत्त्व आहे, तसंच पंकजच्या या कथांचं आहे.

पंकज जे सांगतोय त्यापेक्षाही वाचणाऱ्याला काय भिडतंय, काय भावतंय हे इथे महत्त्वाचं आहे. ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’मधील कथांचे खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांना असलेली उप-शीर्षके, कादंबरीच्या प्रकरणांना असावीत, अशी ही उप-शीर्षके ज्या प्रमाणे लेखकाची सांधे बदलण्याची कामगिरी सोपी करतात, त्याचबरोबर चटपटीत शब्दांमध्ये वाचकांना मुद्द्याकडे नेतात.

पंकजच्या पंधरा वर्षांच्या पत्रकारितेचा हा साइड इफेक्ट फारच इफेक्टिव्ह आहे. ‘मुरुमपिढीची दास्तान अर्थात रेवतीचा नवा उपाय’, ‘माझे मायनस नव्व्याण्णव प्रपोज... ’, ‘मराठी साहित्यास्वाद अर्थात रेवतीचा रोमँटिसिझम’, ‘नक्षीची प्रपोजव्हर्जिनिटी...’ अशी शीर्षके जरी लेखकाने कथनातील मुद्दा बदलण्यासाठी वापरलेली असली तरी ती कथानक एकजीव करायला मदतच करतात.

या कथासंग्रहाचे मुखपृष्ठ चंद्रमोहन कुलकर्णी यांनी अतिशय नेमकेपणानं रेखाटलं आहे. पहिल्या नजरेत मुखपृष्ठावर शहरातल्या इमारतींची दाटी दिसते, त्या इमारतींवरच्या जुन्या पद्धतीच्या टीव्ही. ॲन्टेना, त्यांना लटकलेल्या पतंगी, वाळत घातलेले कपडे आणि बाम्बूंचे आधार, यामुळे शहराच्या बकालतेचं यथार्थदर्शन होतं. मात्र चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णींनी या इमारती रेखाटल्या आहेत, त्या नव्वदीच्या दशकातील व्हिडिओ कॅसेटच्या माध्यमातून, त्या काळातील एखाद्या कॅसेट लायब्ररीच्या रॅकमधील कॅसेट्सच्या मांडणीतून जणू शहराचे दृश्य उभे राहावे, असे रेखाटन त्यांनी केलं आहे. या अर्थपूर्ण मुखपृष्ठाने पुस्तकाचे दर्शनी मूल्य उंचावले आहे, यात शंकाच नाही.

पंकज भोसलेच्या वर्तक आळीतील ‘विश्वामित्र सिण्ड्रोम’ने पछाडलेली माणसे जशी भाऊ पाध्येंच्या ‘वासूनाका’ची आठवण करून देतात, त्याच प्रमाणे पुलंच्या बटाट्याच्या चाळीची आठवणही करून देतात. पुलंनी पन्नास-साठच्या दशकातल्या उताराला लागलेल्या चाळ संस्कृतीमधील मध्यमवर्गीय- पापभिरू- संस्कारी लोकांचं जगणं लेखनातून मांडलं आणि एका पिढीला कायमस्वरूपी नॉस्टेल्जिया उपलब्ध करून दिला. पंकज नव्वदीच्या दशकातील शहराची पौगंडावस्था दाखवताना आज चाळीशीत-पन्नाशीत पोहोचलेल्यांना कळत नकळत, असाच एक नॉस्टेल्जिया देत आहे. बटाट्याच्या चाळीत पुलंनी समारोप करताना चिंतन लिहिले होते.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

पंकज ज्या काळाचं, पिढीचं प्रतिनिधित्व करतो, त्यांना चिंतन-मनन हेच मंजूर नाही. मात्र तरीही या कथांमधून त्या काळाचे कवडसे दाखवताना पंकज जे भाष्य विखुरलेल्या स्वरूपात करतो, ते अतिशय बोलकं आहे. त्याचेच शब्द जरा पुढे-मागे करून सांगायचं तर -  ‘‘८०-९० च्या दशकात भारतातल्या कानाकोपऱ्यात जन्माला आलेल्या कित्येक मुला-मुलींच्या बाबतीत हे घडलं. या काळात जन्माला आलेल्या कुणालाच आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि सांस्कृतिक स्थिर स्थितिचं दर्शन झालं नाही. जडण-घडणीच्या सुपीक काळात त्यांना केबलक्रांती, सिनेक्रांती, टेलिकॉम क्रांती, संगणकक्रांती, इंटरनेटक्रांतीच्या अजगरांनी गिळंकृत केलं. जागतिक प्रवाहाशी एकरूप झाल्यानंतर साहित्य, संगीत, नृत्य, चित्रपट यांचा देशी आविष्कार वाईटच असल्याचे मानण्याचा ट्रेंड त्यांच्यात आपसूक रुजत गेला. या पिढीचे आवड, छंद, रोलमॉडेल्स यांच्यामुळे या पिढीचा प्रत्यक्ष आयुष्यात कोणताही फायदा होणार नव्हता, तरीही या पिढीने त्यांना कवटाळलं. ही पिढी स्वतःचे नवे रोलमॉडल्स डेव्हलप करत होती आणि त्याच वेळी मागची पिढी परंपरा आणि आधुनिकतेशी आट्यापाट्या खेळत होती. त्यामुळे नव्या आदर्शांचा, नव्या प्रेरणांचा स्वीकार करणारे मात्र एकटे पाडले जात होते.

भोवतालच्या परिस्थितीने या पिढीवर जे दृश्यिक आणि सांस्कृतिक संस्कार केले, त्यातूनच ही पिढी घडत आणि बिघडात गेली. या पिढीच्या लैंगिक जाणीवा अकाली जागृत झाल्या होत्या आणि मग त्या शमवण्यासाठी सापडेल त्या मार्गावर ही पिढी स्वार झाली. या प्रयत्नात काही जण अडखळले, तर काही अलगद गंतव्य स्थानावर पोहोचले. मात्र या पिढीला - खरं तर या काळाला एक शाप मिळाला होता. एखादी गोष्ट मुळापासून पुसून टाकण्याचा आणि ती विस्मृतीत नेण्याचा. जिवापाड जपलेल्या कॅसेट्स सीडींच्या आगमनानंतर भंगारमध्ये टाकाव्या लागल्या. पेन ड्राईव्हने सीडी मोडीत काढल्या. पोरा-पोरींचे आश्रयस्थान असलेले इंटरनेट कॅफे घराघरांत नेट आल्यावर पुसले गेले. दोन आठवड्यांपूर्वीची हिट म्हणून ऐकली जाणारी गाणी आज आठवतीलच याची खात्री देता येत नाही आणि दोन आठवड्यांपूर्वी झालेला प्रेमभंग आज आठवेलच याची शक्यता उरलेली नाही, अशा अवस्थेत ही पिढी वाढली. आदल्या पिढीशी फटकून पुढल्या पिढीशी कोणताही वारसा न राखणारा या पिढीचा भूत, वर्तमान आणि भविष्यकाळ कोणत्या ना कोणत्या गोष्टीतून सावरणीसाठीच खर्च होणार हे न टळणार वास्तव स्विकारून ही पिढी जगत आहे. हीच या पिढीची सुखांतिका ही आहे आणि शोकांतिकाही.’’

‘विश्वामित्र सिण्ड्रोम’ - पंकज भोसले

रोहन प्रकाशन, पुणे

पाने - २९०

मूल्य - ३२५ रुपये.

.................................................................................................................................................................

लेखक मकरंद जोशी पर्यावरण-अभ्यासक, मुक्त पत्रकार आणि प्रवास-सल्लागार आहेत.

makarandvj@gmail.com             

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......